1 शमुवेल 1

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31


धडा 1

1 एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील रामा येथला, एलकाना नावाचा एक गृहस्थ होता. हा एलकाना सूफ घराण्यातला असून यरोहाम (किंवा यरामील) याचा मुलगा. यरोहाम एलिहूचा मुलगा आणि एलिहू तोहूचा. तोहू, एफ्राईम घराण्यातील सूफचा मुलगा होय.
2 एलकानाला दोन बायका होत्या. एकीचे नाव हन्ना आणि दुसरीचे पनिन्ना. पनिन्नाला मुलंबाळं होती, पण हन्नाला मात्र अजून मूल झाले नव्हते.
3 एलकाना दरवर्षी रामा या आपल्या गावाहून शिलो येथे जात असे. तेथे तो यज्ञ आणि सर्वशक्तीमान परमेश्वराची भक्ती करत असे. तेथे हफनी आणि फिनहास हे एलीचे मुलगे याजक म्हणून पौरोहित्य करीत होते.
4 एलकाना दर यज्ञाच्या वेळी पनिन्ना आणि तिची मुले यांना त्यांच्या वाटचे अन्न देई.
5 हन्नालाही तो समान वाटा देई. परमेश्वराने तिची कूस उजवलेली नसतानाही तो देई, कारण हन्नावर त्याचे खरेखुरे प्रेम होते.
6 पनिन्ना दर वेळी काहीतरी बोलून हन्नाला दु:खवी. मूलबाळ नसल्यावरुन दूषणे देई.
7 असे दरवर्षी चालायचे. शिलो येथील परमेश्वराच्या मंदिरात सर्व कुटुंबीय जमले की पनिन्नाच्या बोलण्यामुळे हन्ना कष्टी होई. एकदा असेच एलकाना यज्ञ करीत असताना हन्ना दु:खीकष्टी होऊन रडू लागली. ती काही खाईना.
8 एलकाना ते पाहून म्हणाला, “तू का रडतेस? तू का खात नाहीस? तू का दु:खी आहेस? तुला मी आहे-मी तुझा नवरा आहे. तू असा विचार कर की मी दहा मुलांपेक्षा अधिक आहे.”
9 सर्वांचे खाणे पिणे झाल्यावर हन्ना गूपचूप उठली आणि परमेश्वराची प्रार्थना करायला गेली. एली हा याजक तेव्हा परमेश्वराच्या पवित्रस्थानाच्या दरवाजाजवळ आपल्या आसनावर बसला होता.
10 हन्ना अतिशय खिन्न होती. परमेश्वराची प्रार्थना करताना तिला रडू कोसळले.
11 परमेश्वराला ती एक नवस बोलली. ती म्हणाली, “हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझे दु:ख तू बघतोच आहेस. माझा विसर पडू देऊ नकोस. तू मला मुलगा दिलास तर मी तो तुलाच अर्पण करीन. तो परमेश्वराचा नाजीर होईल. तो मद्यपान करणार नाही. त्याचे आम्ही जावळ काढणार नाही.”
12 हन्नाची प्रार्थना बराच वेळ चालली होती. त्यावेळी एलीचे तिच्या तोंडाकडे लक्ष होते.
13 ती मनोमन प्रार्थना करत होती त्यामुळे तिचे ओठ हलत होते पण शब्द बाहेर फुटत नव्हते. त्यामुळे ती दारुच्या नशेत आहे असे एलीला वाटले.
14 एली तिला म्हणाला, “तू फार प्यायलेली दिसतेस. आता मद्यापासून दूर राहा.”
15 हन्ना म्हणाली, “महाशय, मी कोणतेही मद्य घेतलेले नाही. मी अतिशय त्रासलेली आहे. परमेश्वराला मी माझी सर्व गाऱ्हाणी सांगत होते.
16 मी वाईट बाई आहे असे समजू नका. मी फार व्यभित आहे, मला फार दु:खं आहेत म्हणून मी खूप वेळ प्रार्थना करीत होते इतकंच.”
17 तेव्हा एली म्हणाला, “शांती ने जा. इस्राएलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो तुला देवो.”
18 “तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात अशी आशा आहे.” असे त्याला म्हणून हन्ना निघाली. तिने नंतर थोडे खाल्लेही. आता तिला उदास वाटत नव्हते.
19 दुसऱ्या दिवशी पहाटे उठून परमेश्वराची भक्ती करुन एलकानाचे कुटुंबीय रामा येथे आपल्या घरी परतले.पुढे एलकाना आणि हन्नाचा संबंध आला तेव्हा परमेश्वराला तिचे स्मरण झाले.
20 यथावकाश तिला दिवस राहिले व मुलगा झाला. हन्नाने त्याचे नाव शमुवेल ठेवले. ती म्हणाली, “मी परमेश्वराकडे त्याला मागितले म्हणून त्याचे नाव शमुवेल.”
21 एलकाना त्या वर्षी यज्ञ करण्यासाठी आणि देवाला बोललेले नवस फेडण्यासाठी शिलो येथे सहकुटुंब गेला
22 हन्ना मात्र गेली नाही. ती म्हणाली, “मुलगा जेवण खाऊ शकेल इतपत मोठा झाला की मी त्याला शिलोला घेऊन जाईन. त्याला परमेश्वराला वाहीन. तो नाजीर होईल. मग तो तिथेच राहील.”
23 हन्नाचा पती एलकाना त्यावर म्हणाला, “तुला योग्य वाटेल तसे कर. तो खायला लागेपर्यंत तू हवी तर घरीच राहा. परमेश्वराने दिलेला आशीर्वाद खरा ठरो“. तेव्हा हन्ना घरीच राहिली कारण शमुवेल अंगावर पीत होता. त्याचे दूध तुटेपर्यंत ती राहिली.
24 तो पुरेसा मोठा झाल्यावर हन्ना त्याला शिलो येथे परमेश्वराच्या मंदिरात घेऊन आली. तिने तीन वर्षाचा एक गोऱ्हा वीस पौंड पीठ आणि द्राक्षरसाचा बुधला हे ही आणले.
25 ते सर्व परमेश्वरासमोर गेले. एलकानाने नेहमी प्रमाणे परमेश्वरासमोर गोऱ्ह्याचाबळी दिला.मग हन्नाने मुलाला एलीच्या स्वाधीन केले.
26 ती एलीला म्हणाली “महाशय, माझ्यावर कृपादृष्टी असू द्या मी खरे तेच सांगते. मीच इथे तुमच्याजवळ बसून पूर्वी परमेश्वराजवळ याचना केली होती.
27 परमेश्वराकडे मी मुलगा मागितला आणि परमेश्वराने माझी इच्छा पूर्ण केली. परमेश्वराने हा मुलगा मला दिला.
28 आता मी तो परमेश्वराला अर्पण करते. तो आयुष्यभर परमेश्वराची सेवा करील.” हन्नाने मग मुलाला तिथेच ठेवलेआणि परमेश्वराची भक्ती केली.
धडा 2

1 हन्नाने परमेश्वराला धन्यवाद देणारे गीत म्हटले;“परमेश्वराबद्दल माझ्या मनात आनंद मावत नाही. त्याच्यामुळे मला सामर्थ्य आलेमाझ्या शत्रुंना मी हसते.माझ्या विजयाचा मला आनंद आहे!
2 परमेश्वरासारखा पवित्र कोणी देव नाही. देवा, तुझ्यावाचून कोणी नाही. आमच्या देवासारखा अभेद्य दुर्ग दुसरा नाही.
3 लोकहो, बढाया मारु नका. गर्वाने बोलू नका. कारण परमेश्वर सर्वज्ञ आहे. तोच लोकांचे नेतृत्व करतो आणि त्यांना न्याय देतो.
4 शूरांची धनुष्यं भंगतात आणि दुर्बळ लोक शक्तीशाली होतात.
5 पूर्वी ज्यांच्याकडे अन्नाधान्याचे मुबलक साठे होते त्यांना आज अन्नासाठी मोल मजुरी करावी लागत आहे. आणि जे पूर्वी भुकेकंगाल होते ते आता आराम करत आहेत. आजपर्यंत नि:संतान होती तिला आता सात मुलं आहेत. पण मुलबाळ असलेली दु:खी आहे. कारण तिची मुलं तिच्यापासून लांब गेली आहेत.
6 परमेश्वर लोकांना मरण देतो आणि परमेश्वरच त्यांना जीवन देतो. तोच अधोलोकाला नेतो आणि वरही आणतो.
7 परमेश्वरच काहीना दरिद्री तर काहींना श्रीमंत करतो. काही लोकांना लाचार करतो तर काहींचा सन्मान परमेश्वरच करतो.
8 गरीबांना धुळीतून उचलून त्यांचे दु:ख हरणत्यांचा गौरव करुन त्यांना राजपुत्रांच्या बरोबरीने बसवतो, मानाचे स्थान देतो. जगाची निर्मिती परमेश्वरानेच केली. सर्वजगावर त्याचीच सत्ता आहे.
9 सज्जनांना तो आधार देतो. त्यांना लटपटू देत नाही. पण दुर्जनांचा संहार करतो. त्यांना गर्तेत ढकलतो दुर्जनांचे बळ अशा वेळी कुचकामी ठरते.
10 शत्रूंचा तो नाश करुन त्याच्यावर गर्जेल. दूरदूरच्या प्रदेशांचाही तो न्याय करील. राजाला सामर्थ्य देईल. आपल्या खास राजाला बलवान करील.”
11 एलकाना आणि त्याचे कुटुंबीय रामा येथे परतले. मुलगा मात्र शिलो येथे एली याजकाच्या हाताखाली परमेश्वराच्या सेवेत राहिला.
12 एलीची मुले वाईट होती. त्यांना परमेश्वराची पर्वा नव्हती.
13 याजकांनी लोकांना जशी वागणूक द्यावी तशी ते देत नव्हते. खरी रीत अशी होती की लोकांनी यज्ञासाठी बळी आणल्यावर याजकांनी ते मांस शिजत ठेवायचे. याजकाच्या नोकराने तीन काटे असलेली आकडी आणायची.
14 तपेल्यात तो त्रिशूल खुपसून त्यावर येईल तेवढेच मांस याजकाने स्वीकारायचे. शिलो येथे यज्ञासाठी येणाऱ्या सर्व इस्राएलीच्या बाबतीत याजकांनी असेच करायला हवे होते.
15 पण एलीची मुले मात्र असे करत नसत. वेदीवर चरबीचे हवन करण्याआधीच त्यांचा नोकर लोकांजवळ येऊन म्हणे, “याजकांसाठी म्हणून थोडे मांस भाजायला द्या. शिजलेले मांस ते घेणार नाहीत.”
16 “हवान तर होऊ दे, मग हवे तेवढे त्यातून काढून घे,” असे कोणी म्हणालेच तर तो नोकर म्हणे, “नाही, आत्ताच द्या नाहीतर मी जबरदस्तीने काढून घेईन.”
17 परमेश्वराला देण्यात येणाऱ्या यज्ञबली विषयी हफनी आणि फिनेहास यांना कोणताही आदरभाव नव्हता हेच यातून दिसून येई. हे परमेश्वराविरुध्द असलेले मोठे पाप होते.
18 पण शमुवेल मात्र परमेश्वराची सेवा करत असे. एफोद घालून तो मदत करी.
19 त्याची आई दरवर्षी त्याच्यासाठी लहानसा अंगरखा शिवत असे. दरवर्षी नवऱ्याबरोबर शिलो येथे यज्ञासाठी जाताना ती तो घेऊन जाई.
20 एलकाना आणि त्याची बायको यांना एली मनापासून आशीर्वाद देई. तो म्हणे, “हन्नापासून तुला आणखी संतती होवो. परमेश्वराच्या आशीर्वादाने झालेला मुलगा तुम्ही परमेश्वराला दिलात, तेव्हा तुम्हाला आणखी मुले होवोत.”हन्ना आणि एलकाना मग घरी परतत.
21 परमेश्वराने हन्नावर कृपा केली आणि तिला नंतर तीन मुलगे आणि दोन मुली झाल्या. शमुवेल परमेश्वराच्या पवित्र सान्निध्यात वाढत होता.
22 एली आता म्हतारा होत चालला. शिलो येथे येणाऱ्या इस्राएलींशी होणारे आपल्या मुलांचे वर्तन पुन्हा पुन्हा त्याच्या कानावर येऊ लागले. दर्शन मंडपाच्या दाराशी सेवेत असलेल्या बायकांशी त्यांनी कसा अतिप्रसंग केला हेही त्याने ऐकले.
23 तेव्हा तो मुलांना म्हणाला, “तुमचे प्रताप माझ्या कानावर आले आहेत. अशी नीच कृत्ये तुम्ही का करता?
24 मुलांनो, असे करत जाऊ नका. परमेश्वराचे लोक तुमच्याविषयी फार वाईट बोलत आहेत.
25 एका माणसाने दुसऱ्या माणसाचा काही अपराध केला तर परमेश्वर एकवेळ त्याच्या मदतीला येईल. पण परमेश्वराविरुध्दच पातक केले तर त्याच्या मदतीला कोण धावून येणार?”पण एलीच्या मुलांनी वडिलांच्या सांगण्याकडे साफ दुर्लक्ष केले. तेव्हा परमेश्वराने या मुलांना मारायचे ठरवले.
26 शमुवेल मोठा होत चालला. परमेश्वर आणि लोक त्याच्यावर प्रसन्न होते.
27 एकदा परमेश्वराचा संदेष्टा एलीकडे आला आणि म्हणाला, “परमेश्वराने हा निरोप दिला आहे; ‘तुझे पूर्वज फारोच्या घराण्यात दास होते. तेव्हा मी त्यांच्या पुढे प्रगट झालो.
28 इस्राएलच्या सर्व घराण्यांमधून तुमच्याच घराण्याची मी माझे याजक होण्यासाठी म्हणून निवड केली. वेदीवर यज्ञबली अर्पण करावा, धूप जाळावा, एफोद घालावा म्हणून मी तुम्हाला निवडले. इस्राएलचे लोक यज्ञ करतात त्यातील मांस मी तुम्हाला घेऊ दिले.
29 तेव्हा तुम्ही त्या यज्ञाचा आणि देणग्यांचा आदर ठेवत नाही हे कसे? माझ्यापेक्षा तू आपल्या मुलांचाच मान ठेवतोस? इस्राएल लोक मला जे मांस वाहतात, त्यातील उत्कृष्ट भाग स्वत:साठी घेऊन तू पुष्ट झाला आहेस.’
30 “तुझे घराणेच निरंतर त्याची सेवा करील असे इस्राएलचा देव जो परमेश्वर याने म्हटले होते खरे. पण आता त्याचे म्हणणे असे आहे की, ‘इथून पुढे असे होणार नाही. माझा आदर ठेवतात त्यांचा मी मान राखीन. पण जे अनादर करतात त्यांच्यावर संकटे कोसळतील.
31 तुझ्या सर्व वंशजांचा संहार करायची वेळ येऊन ठेपली आहे. तुझ्या घराण्यातील कोणीही आता दीर्घायुषी होणार नाही..
32 इस्राएलमध्ये सर्व चांगले घडेल. पण तुझ्या घरात मात्र सगळी दुर्दशा होईल.तुझ्या घरातले कोणी म्हातारा होई पर्यत जगणार नाही.
33 माझ्या वेदीजवळ याजक म्हणून सेवा करायला फक्त एकाला मी शिल्लक ठेवीन. त्याला दीर्घायुष्य लाभेल. तो जराजर्जर होईपर्यंत जगेल. तुझे वंशज मात्र तलवारीला बळी पडतील.
34 हे सर्व खरेच घडणार आहे याची प्राचीती मी तुला दाखवीन. तुझे दोनही मुलगे हफनी आणि फिनहास, एकाच दिवशी मरतील.
35 मी एका विश्वासू याजकाची माझ्यासाठी निवड करीन. तो माझे ऐकेल आणि माझ्या मनाप्रमाणे काम करील. या याजकाच्या घराण्याला मी स्थिरस्थावर करीन. मी निवडलेल्या राजापुढे तो सेवेत राहील.
36 मग तुझ्या घरातील उरले सुरले लोक येऊन या याजकापुढे नतमस्तक होतील. किरकोळ रक्कम किंवा भाकरतुकडा याच्यासाठी ते पदर पसरतील आणि म्हणतील, “माझ्या भाकरीची सोय व्हावी म्हणून याजकपदातील एखादे काम मला द्या.”
धडा 3

1 लहानगा शमुवेल एलीच्या हाताखाली परमेश्वराच्या सेवेत मगन्न होता. त्या काळी परमेश्वराने लोकांशी प्रत्यक्ष बोलण्याचे प्रसंग फार क्वचित येत असत. तो सहसा दृष्टांत देत नसे.
2 एलीची दृष्टी आता अधू झाल्यामुळे तो जवळजवळ आंधळाच झाला होता. एकदा तो रात्री झोपला होता.
3 परमेश्वराचा पवित्र कोश परमेश्वराच्या पवित्र मंदिरात होता, तेथे शमुवेल झोपलेला होता. परमेश्वरापुढचा दिवा अजून जळत होता.
4 तेव्हा परमेश्वराने शमुवेलला हाक मारली. शमुवेल म्हणाला, “मी येथे आहे”
5 एली आपल्याला बोलवत आहे असे वाटल्याने तो लगबगीने एलीजवळ गेला. त्याला म्हणाला, “मला बोलावलत ना? हा मी आलो.”पण एली म्हणाला, “मी नाही हाक मारली जा, जाऊन झोप.” शमुवेल झोपायला गेला.
6 पुन्हा परमेश्वराने हाक मारली. “शमुवेल.” शमुवेल परत धावत एलीकडे गेला आणि आपण आल्याचे त्याने सांगितले. एली म्हणाला, “मी कोठे बोलावलं तुला? जा, झोप.”
7 परमेश्वर अजून शमुवेलशी कधी प्रत्यक्ष बोलला नव्हता, त्याला त्याने दर्शन दिले नव्हते. त्यामुळे शमुवेलने परमेश्वराला ओळखले नाही.
8 परमेश्वराने शमुवेलला तिसऱ्यांदा हाक मारली. शमुवेल पुन्हा उठून एलीकडे गेला. मला बोलवलेत म्हणून मी आलो असे त्याने सांगितले.परमेश्वरच या मुलाला हाक मारत आहे हे आता एलीच्या लक्षात आले.
9 तो शमुवेलला म्हणाला, “जाऊन झोप. पुन्हा हाक आली तर म्हण, ‘हे परमेश्वरा, बोल हा तुझा सेवक ऐकत आहे.” तेव्हा शमुवेल परत जाऊन झोपला.
10 परमेश्वर आला आणि तिथे उभा राहिला. पहिल्या सारखीच त्याने “शमुवेल, शमुवेल”, म्हणून हाक मारली.शमुवेल म्हणाला, “बोल, मी तुझा दास ऐकत आहे.”
11 तेव्हा परमेश्वराने शमुवेलला सांगितले, “इस्राएलामध्ये मी आता लौकरच काहीतरी करणार आहे. ते ऐकून लोकांना धक्का बसेल.
12 एली आणि त्याच्या कुटुंबियाबद्दल मी जे बोललो होतो ते सर्व मी अथ पासून इतिपर्यंत करुन दाखवणार आहे.
13 त्याच्या घराण्याचे पारिपत्य करीन असे मी एलीला म्हणालो होतो. आपल्या बहकलेल्या मुलांचे वागणे बोलणे परमेश्वराविरुध्द आहे हे त्याला माहीत असून त्यांना तो ताळ्यावर आणू शकलेला नाही, म्हणून मी हे करणार आहे.
14 आता यज्ञ आणि अर्पण यांनी त्याच्या घरच्यांची पापे धुतली जाणार नाहीत अशी मी शपथ वाहिली आहे.”
15 रात्र सरेपर्यंत शमुवेल आपल्या बिछान्यावर पडून राहिला. सकाळ होताच उठून त्याने मंदिराची दारे उघडली. आपल्याला झालेल्या दृष्टांताची हकीकत एलीला सांगायची त्याला भीती वाटली.
16 पण एलीनेच शमुवेलला प्रेमाने हाक मारुन जवळ बोलावले. तेव्हा शमुवेल आज्ञाधारकपणे जवळ उभा राहिला.
17 एली म्हणाला, “परमेश्वर तुझ्याशी काय बोलला?मोकळेपणाने सर्व सांग. काही लपवलेस तर परमेश्वर तुला शिक्षा करील.”
18 तेव्हा काहीही न लपवता एलीला शमुवेलने सर्व काही सांगितले. एली म्हणाला, “तो परमेश्वर आहे. त्याला योग्य वाटेल ते तो करो.”
19 शमुवेल वाढत होता. तेव्हा परमेश्वर त्याच्या बरोबर होता. शमुवेलचे कुठलेही वचन त्याने खोटे ठरु दिले नाही.
20 परमेश्वराचा खरा संदेष्टा म्हणून दान पासून बैर शेबापर्यंत सर्व इस्राएलमध्ये शमुवेलची ख्याती पसरली.
21 शिलो येथे परमेश्वर त्याला दर्शन देत राहिला. म्हणजेच आपल्या वचनाच्याद्वारे तो शमुवेलसमोर प्रगट झाला.
धडा 4

1 इस्राएलभर शमुवेलचे नाव झाले. एली आता फार वृध्द झाला होता. त्याच्या मुलांचे दुर्वर्तन चालूच होते.याच सुमारास सर्व पलिष्टी इस्राएल लोकांविरुध्द एकत्र आले. इस्राएल लोक त्यांच्याशी लढण्यास निघाले. त्यांचा तळ एबन एजर येथे तर पलिष्ट्यांचा अफेक येथे होता.
2 पलिष्टी इस्राएल लोकांवर चालून जायला सज्ज झाले. अशाप्रकारे युद्धाला तोंड लागले.पलिष्ट्यांनी इस्राएल लोकांचा पराभव केला. त्यांचे चार हजार सैनिक मारले.
3 इस्राएली सैनिक आपल्या तळावर परतले तेव्हा वडीलधाऱ्यांनी त्यांना विचारले, “परमेश्वराने का बरे पलिष्ट्यांमार्फत आपला पराभव करवला? आपण शिलोहून परमेश्वराच्या कराराचा कोश येथे आणू या. म्हणजे या लढाईत परमेश्वर आपल्याबरोबर राहील आणि शत्रू पासून आपले संरक्षण करील.”
4 मग त्यांनी शिलो येथे माणसे पाठवली. त्यांनी तो सर्वशक्तिमान परमेश्वराच्या कराराचा कोश आणला. त्या कोशाच्या वरच्या बाजूला करुबांची बैठक होती. परमेश्वराचे ते सिंहासन होते. कोश आणला तेव्हा त्या बरोबर हफनी आणि फिनहास हे एलीचे दोन पुत्रही होते.
5 सैन्याच्या तळावर जेव्हा परमेश्वराच्या कराराचा कोश आणला तेव्हा सर्व इस्राएल लोकांमध्ये एकच जल्लोष झाला. या जयघोषाने भूमीही दणाणली.
6 पलिष्ट्यांपर्यंत हा आवाज पोहोंचला तेव्हा इब्रींच्या छावणीत हा जल्लोष कसला म्हणून ते विचारात पडले.
7 परमेश्वराच्या पवित्र कराराचा कोश छावणीत आणला गेल्याचे त्यांना कळले तेव्हा त्यांची भीतीने गाळण उडाली. ते म्हणू लागले, “त्यांच्या तळावर परमेश्वर आला आहे. आता आपले कसे होणार? असे यापूर्वी कधी झालेले नाही.
8 या शक्तिमान परमेश्वरापासून आता आपल्याला कोण वाचवील, याची धास्ती पडली आहे. मिसरच्या लोकांना नाना तऱ्हेच्या पीडांनी हैराण केले ते याच परमेश्वराने.
9 पण पलिष्ट्यांनो, धीर धरा. मर्दासारखे लढा. पूर्वी हेच इस्राएल लोक आपले गुलाम होते. तेव्हा शौर्य दाखवा, नाहीतर तुम्ही त्यांचे गुलाम व्हाल.”
10 तेव्हा पलिष्ट्यांनी पराक्रमाची शर्थ करुन इस्राएल लोकांचा पाडाव केला. सर्व इस्राएली सैनिकांनी घाबरुन आपल्या छावणीकडे पळ काढला. त्यांचा तो दारुन पराभव होता. तीस हजार इस्राएली सैनिक मारले गेले.
11 पलिष्ट्यांनी परमेश्वराच्या कराराचा कोश घेतला आणि हफनी आणि फिनहास या एलीच्या मुलांचा वध केला.
12 त्या दिवशी एक बन्यामीन माणूस युद्धातून धावत निघाला. दु:खाने तो कपडे फाडत होता. डोक्यात धूळ घालून घेत होता.
13 तो शिलो येथे पोहोंचला तेव्हा एली वेशीजवळ आपल्या आसनावर बसला होता. त्याला कराराच्या कोशाची काळजी वाटत होती म्हणून तो वाट पाहात होता. त्याचवेळी या बन्यामीनाने तेथे येऊन सर्व वृत्तांत सांगितला. लोक तो ऐकून आकांत करु लागले.
14 एली आता अठ्ठ्याण्णव वर्षांचा झाला होता. आंधळा झाल्यामुळे त्याला काय घडतेय हे दिसत नव्हते. पण त्याला हा आक्रोश ऐकू येत होता. तेव्हा त्याने त्याबद्दल विचारले.तेव्हा त्या बन्यामीन माणसाने एलीजवळ जाऊन सर्व सांगितले
15
16 तो म्हणाला, “मी नुकताच तेथून आलो आहे मी आज युद्धातून पळून आलो आहे.”एलीने त्याला सर्व हकीकत सांगायला सांगितले.
17 तेव्हा तो म्हणाला, “इस्राएलींनी पळ काढला आहे. इस्राएली सैन्यातील अनेक सैनिक प्राणाला मुकले. तुमची दोन्ही मुले मेली आहेत. आणि परमेश्वराचा पवित्र करारकोश पलिष्ट्यांनी ताब्यात घेतला आहे.
18 करारकोशाचे वृत्त समजताच वेशीजवळ आसनावर बसलेला एली तिथेच मागच्यामागे पडला आणि त्याची मान मोडली. तो वृध्द आणि स्थूल झाला होता. तात्काळ त्याचा प्राण गेला. वीस वर्षे तो इस्राएलचा शास्ता होता.
19 एलीची सून, फिनहासची बायको त्यावेळी गरोदर होती. ती प्रसूत व्हायची वेळ येऊन ठेपली होती. कराराचा कोश पळवल्याचे तसेच सासरा व नवरा यांचे निधन झाल्याचे वृत्त तिच्या कानावर आले. ते ऐकताच त्या धक्कयाने तिला कळा येऊ लगल्या आणि ती प्रसूत झाली.
20 तिच्या मदतीला आलेल्या बायका म्हणाल्या, “आता काळजी करु नको तुला मुलगा झालाय,” पण तिने लक्ष दिले नाही की काही उत्तर दिले नाही. ती फक्त एवढेच म्हणाली, “इस्राएलचे वैभव मावळले.” तिने मुलाचे नाव ईखाबोद असे ठेवले आणि ती गतप्राण झाली.
21 करारकोशाचे हरण झाले, सासरा व नवरा यांना मृत्यू आला म्हणून तिने मुलाचे नाव ईखाबोद (हरपलेले वैभाव) असे ठेवले.
22 पलिष्ट्यांनी परमेश्वराचा पवित्र करार कोश हस्तगत केला म्हणून “इस्राएलचे वैभव गेले” असे ती म्हणाली.
धडा 5

1 पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश घेतला. तो एबन-एजर येथून अश्दोद येथे नेला.
2 तो त्यांनी दागोनच्या मंदिरात दागोनच्या जवळ ठेवला.
3 दुसऱ्या दिवशी अश्दोदचे लोक उठून पाहतात तो, दागेनची मूर्ती करार कोशा जवळ जमीनीवर पालथी पडलेली आढळली.
4 पण दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी ती जमिनीवर पडलेली आढळली अश्दोदच्या लोकांनी ती मूर्ती उचलून पर्ववत ठेवली.यावेळी परमेश्वराच्या पवित्र करारकोशा जवळ पडताना दागोनचे शिर आणि हात तुटून उंबरठ्यावर पडले होते. धड तेवढे शाबूत होते.
5 त्यामुळे अजूनही पुरोहित किंवा इतर लोक अश्दोदला दागोनच्या देवळात शिरतात तेव्हा उंबरठ्यावर पाऊल ठेवत नाही.
6 अश्दोद आणि त्याच्या आसपासचा प्रदेश यातील लोकांना परमेश्वराने सळो की पळो केले. त्यांना हर प्रकार त्रास दिला. लोकांच्या अंगावर गाठी, गळवे आले. शिवाय परमेश्वराने उंदीर सोडून त्यांना हैराण केले. जमीन, गलबतं यावर उंदरानी उच्छाद मांडला, गावातील लोक भयभीत झाले होते.
7 या घटना पाहून अश्दोदचे लोक म्हणाले, “इस्राएलच्या परमेश्वराचा पवित्र करार कोश येथे ठेवण्यात अर्थ नाही. आपल्यावर आणि आपल्या देवावर त्या परमेश्वराचा कोप झाला आहे.”
8 अशदोदच्या लोकांनी पलिष्ट्यांच्या पाचही अधिकाऱ्यांना एकत्र बोलावून या पवित्र कोशाचे काय करावे याविषयी सल्लामसलत केली.अधिकाऱ्यांनी हा पवित्र कोश गेथ येथे हलवायला सांगितला. त्यानुसार पलिष्ट्यांनी तो पवित्र करारकोश हलवला.
9 गथ येथे तो नेऊन ठेवल्यावर त्या शहरावर परमेश्वराचा कोप ओढवला. त्यामुळे तेथील लोक भयभीत झाले. लहान मोठी सगळी माणसे वेगवेगळ्या व्यार्धींनी हैराण झाली. तेथील लोकांच्या अंगावर गळवे उठली.
10 तेव्हा पलिष्ट्यांनी हा पवित्र कोश एक्रोन येथे हलवला.एक्रोन येथे हा पवित्र कोश येताच तेथील लोक तक्रार करु लागले. “इस्राएलच्या परमेश्वराचा हा पवित्र कोश आमच्या एक्रोनमध्ये आणून आमचा जीव द्यायचा आहे का?” असे ते विचारु लागले.
11 एक्रोनच्या लोकांनी सर्व पलिष्टी अधिकाऱ्यांना एकत्र बोलावून सांगितले “तो पवित्र कोश आमचे बळी घ्यायच्या आधी तो कोश होता तेथे परत पाठवा.”एक्रोनचे लोक फार घाबरले. परमेश्वराने त्यांना त्रस्त करुन सोडले.
12 अनेक लोक मरण पावले. जे जगले त्यांच्या अंगावर गळवे आली. एक्रोनच्या लोकांच्या आक्रोश आकाशाला भिडला.
धडा 6

1 पलिष्ट्यांनी हा पवित्र कोश आपल्या प्रदेशात सात महिने ठेवला.
2 त्यांनी याजकांना आणि शकुन पाहणाऱ्यांना बोलावून विचारले “या कोशाचे आता काय करायचे? तो परत कसा पाठवायचा ते सांगा.”
3 याजक आणि शकुन पाहणारे म्हणाले, “तुम्ही हा कोश परत पाठवणार असाल तर तो तसाच पाठवू नका. त्याच्या बरोबर देणगीदाखल काही अर्पण पाठवा म्हणजे इस्राएलांचा देव तुमच्या पापांचे हरण करील. तुम्ही बरे व्हाल. शुध्द व्हाल. त्याचा क्रोध मावळावा म्हणून तुम्ही एवढे करा.”
4 पलिष्ट्यांनी विचारले, “इस्राएलच्या परमेश्वराने क्षमा करावी म्हणून आम्ही कोणत्या भेटी अर्पण कराव्यात?”याजक आणि शकुन पाहणारे यांनी सांगितले, “प्रत्येक नगराचा एक असे तुम्ही पाच पलिष्टी अधिकारी आहात. तुम्ही सर्व सारखेच हैराण झालेले आहात. तेव्हा, गळवांसारख्या दिसणाऱ्या पाच सोन्याच्या प्रतिमा आणि पाच सोन्याचे उंदीर करा.
5 अशा पाच पाच प्रतिमा करुन त्या इस्राएलींच्या देवाला भरपाई म्हणून द्या. मग कदाचित् तुमच्या प्रदेशाला, तुमच्या परमेश्वराला, व तुम्हाला होणारा त्रास तो थांबवेल.
6 मिसरचे लोक आणि फारो यांच्यासारखे आडमुठेपणा करु नका. मिसरच्या लोकांना देवाने शिक्षा केली. म्हणूनच इस्राएल लोक मिसर सोडून जाऊ शकले.
7 “एक नवीन गाडी तयार करुन नुकत्याच व्यायलेल्या दोन गाई तिला जुंपा त्या गाईंनी शेतात कधीच काम केलेले नसावे. त्यांच्यावर जू चढवून मग त्यांची वासरे माघारी गोठ्यात आणून बांधा. त्यांना आपल्या आईच्या मागे जाऊ देऊ नका.
8 आता परमेश्वराचा पवित्र करारकोश गाडीत ठेवा. त्याच्याशेजारी एका थैलीत त्या सुवर्ण प्रतिमा ठेवा. तुमच्या पापक्षालनासाठी त्या परमेश्वराला अर्पण केलेल्या आहेत. मग गाडी सरळ जाऊ द्या.
9 ती कशी जाते ते पाहा. गाडी बेथशेमेश कडे इस्राएलांच्या प्रदेशात गेली तर या व्याधी, हे अरिष्ट परमेश्वरामुळेच ओढवले होते असे समजू. पण गाई सरळ त्या दिशेने गेल्या नाहीत, तर हा इस्राएलच्या परमेश्वराचा कोप नव्हता, हे अरिष्ट असेच कोसळले असे आपण समजू.”
10 पलिष्ट्यांनी हा सल्ला मानून त्या प्रमाणे सर्व काही केले. नुकत्याच व्यालेल्या दोन गाई त्यांनी मिळवल्या. त्यांना गाडीला जुंपून वासरे गोठ्यात ठेवली.
11 मग करार कोश गाडीत चढवला. गळवे आणि उंदीर यांच्या सुवर्ण प्रतिमांची थैलीही त्याशेजारी ठेवली.
12 गाई सरळ बेथशेमेश कडे निघाल्या. त्या हंबरत चालल्या होत्या व मुख्य रस्ता सोडून इकडे तिकडे वळल्या नाहीत. बेथशेमेशच्या हद्दीपर्यंत पलिष्ट्यांचे अधिकारी गाईच्या मागोमाग होते.
13 बेथशेमेशमधले शेतकरी त्या खोऱ्यात गव्हाची कापणी करत होते. समोर पाहतात तो पवित्र कारारकोश. कोशाचे दर्शन झाल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला आणि ते धावतच जवळ गेले.
14 बेथशेमेश येथील यहोशवाच्या शेतात येऊन एका मोठ्या खडकापाशी गाडी थांबली. स्थानिक लोकांनी त्या गाडीची लाकडे फोडली आणि गाईचा बळी दिला. परमेश्वराला तो अर्पण केला. लेवींनी मग परमेश्वराचा पवित्र कोश उतरवला. तसेच सुवर्ण प्रतिमांची थैली घेतली. कोश आणि ती थैली त्या प्रचंड खडकावर ठेवली. बेथशेमेशच्या लोकांनी त्या दिवशी परमेश्वराला यज्ञार्पणे वाहिली.
15
16 त्या पाच पलिष्टी अधिकाऱ्यांनी हे सर्व नीट पाहिले आणि ते त्याच दिवशी एक्रोन येथे परतले.
17 अशाप्रकारे पलिष्ट्यांनी आपल्या पापक्षालनार्थ परमेश्वराला गळवांच्या पाच सुवर्ण प्रतिमा दिल्या. प्रत्येक पलिष्टी गावातर्फे एक अशा त्या होत्या. अश्दोद, गज्जा, अष्कलोन, गथ, एक्रोन ही ती पाच गावे होत.
18 सोन्याचे उंदीरही करुन पाठवले. पाच पलिष्टी अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत जेवढी गावे येत होती त्यांच्या संख्येच्या प्रमाणात ते होते. या प्रत्येक गावाभोवती तटबंदी असून सभोवार खेडी होती.बेथशेमेशच्या लोकांनी परमेश्वराचा पवित्र कोश त्या खडकावर ठेवला. यहोशवाच्या शेतात तो खडक अजूनही आहे.
19 पण हा कोश दृष्टीस पडला तेव्हा तेथे याजक नव्हते. तेव्हा बेथशेमेश मधली सत्तर माणसे परमेश्वराने मारली. परमेश्वराने अशी कठोर शिक्षा करावी याबद्दल बेथशेमेशच्या लोकांनी आक्रोश केला.
20 ते म्हणाले, “त्या कोशाचे जतन करील असा याजक कोठे आहे? इथून हा कोश कोठे जायला पाहिजे?”
21 किर्याथ-यारीम येथे एक याजक होता. लोकांनी त्याच्याकडे संदेश पाठवला. “पलिष्ट्यांनी परमेश्वराचा पवित्र कोश पाठवला आहे. तरी येऊन तो आपल्या नगरात घेऊन जा” असा त्याला निरोप पाठवला.
धडा 7

1 किर्याथ यारीमचे लोक आले आणि परमेश्वराचा तो पवित्र कोश घेऊन गेले. त्यांनी तो डोंगरावरील अबीनादाबच्या घरात ठेवला. त्या परमेश्वराच्या कोशाची जपणूक करण्यासाठी त्यांनी अबीनादाबचा मुलगा एलाजार याला विधिवत पवित्र केले.
2 पुढे हा कोश किर्याथ यारीम येथे वीस वर्षे होता.इस्राएली लोक पुन्हा परमेश्वराची भक्ती करु लागले.
3 शमुवेलने तेव्हा लोकांना सांगितले, “तुम्ही खरोखरच मन:पूर्वक परमेश्वराकडे वळला असाल तर इतर देव-देवता, अष्टरोथ यांना निग्रहाने दूर सारा. परमेश्वराचीच एकचित्ताने उपासना करा. केवळ त्याचीच सेवा करा. मग परमेश्वर तुमची पलिष्ट्यांच्या तावडीतून सोडवणूक करील.”
4 तेव्हा मग इस्राएली लोकांनी बाल आणि अष्टोरोथच्या मूर्तींचा त्याग करुन फक्त परमेश्वराची सेवा करायला सुरुवात केली.
5 शमुवेल त्यांना म्हणाला, “सर्व इस्राएली मिस्पा येथे एकत्र या. मी परमेश्वराकडे तुमच्या साठी प्रार्थना करीन.”
6 मग सर्व इस्राएल लोक मिस्पा येथे जमले. त्यांनी पाणी आणून परमेश्वरापुढे ओतले. मग त्यांच्या उपासाला सुरुवात झाली. अन्नापाणी वर्ज्य करुन त्यांनी परमेश्वरापुढे आपल्या पातकांची कबुली दिली. शमुवेल त्या वेळी इस्राएलमध्ये न्याय निवाडा करत असे.
7 मिस्पा येथील इस्राएलींच्या या मेळाव्याबद्दल पलिष्ट्यांनी ऐकले. त्यांनी इस्राएली विरुध्द लढण्याची तयारी केली. पलिष्टे येत आहेत ही बातमी ऐकून इस्राएलामध्ये घबराट पसरली.
8 ते शमुवेलला म्हणाले, “आमच्यासाठी परमेश्वराकडे करायच्या प्रार्थनेत खंड पडू देऊ नकोस. पलिष्ट्यांपासून आमचे रक्षण व्हावे असे परमेश्वराकडे मागणे माग.”
9 तेव्हा शमुवेलने एक आख्खे कोकरु परमेश्वराला यज्ञात अर्पण केले. इस्राएलासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली. परमेश्वराने त्याच्या प्रार्थनेला ओ दिली.
10 हा होम चालू असताना पलिष्ट्यांनी इस्राएलवर हल्ला केला. त्यावेळी प्रंचड गडगडाट करुन परमेश्वराने पलिष्ट्यांमध्ये गोंधळ माजवला. प्रंचड गर्जनेमुळे घाबरुन ते गोंधळले. सेनापतींचा सैन्यावरचा ताबा सुटला. त्यामुळे इस्राएलींनी त्यांचा पराभव केला.
11 मिस्पापासून पलिष्ट्यांचा पाठलाग करत बेथ-कारपर्यंत नेले आणि सैन्याला कापून आणले.
12 देवाने ही जी मदत केली तिचे स्मरण लोकांना राहावे म्हणून शमुवेलने मिस्पा आणि शेन यांच्या दरम्यान एका दगडाची स्थापना केली. “परमेश्वराने आपल्याला येथवर सहाय्य केले” असे म्हणून त्याने “सहाय्य दगड असे त्याचे नामकरण केले.
13 पराभूत झाल्यावर पुन्हा म्हणून पलिष्ट्यांनी इस्राएलच्या भूमीत पाऊल टाकले नाही. शमुवेलच्या उर्वरित आयुष्यात परमेश्वर पलिष्ट्यांच्या विरुध्द होता.
14 पलिष्ट्यांनी इस्राएलची काही नगरे काबीज केली होती. एक्रोन पासून गथपर्यंतची ही नगरे आणि त्याच्या आसपासची गावे इस्राएलींनी पुन्हा ताब्यात घेतली. इस्राएल आणि अमोरी यांच्यातही शांततेचा करार झाला.
15 शमुवेलने आयुष्यभर इस्राएलसाठी न्यायनिवाडा केला.
16 त्यासाठी तो जागोजाग हिंडला. बेथेल, गिलगाल, मिस्पा या सर्व ठिकाणी तो दरवर्षी जाई त्या ठिकाणच्या लोकांचा न्यायनिवाडा करी.
17 पण रामा येथे त्याचे घर असल्यामुळे तेथे त्याचे वारंवार जाणे होई. तेथूनच तो सर्व कारभार पाही. रामा येथे त्याने परमेश्वरासाठी वेदी बांधली.
धडा 8

1 शमुवेल खूप म्हतारा झाला तेव्हा त्याने आपल्या मुलांना इस्राएलचे न्यायाधिश म्हणून नेमले.
2 मोठ्या मुलाचे नाव योएल आणि दुसऱ्याचे नाव अबीया. बैर-शीबा येथे राहून ते काम करु लागले.
3 पण ते त्यांच्या वडिलांसारखे वागले नाही. पैशाच्या लोभाने लाच खाऊन ते न्यानिवाड्यात फेरफार करीत. लोकांना फसवीत.
4 तेव्हा इस्राएलची सर्व वडील धारी मंडळी एकत्र जमून रामा येथे शमुवेलला भेटायला गेली.
5 शमुवेलला ते लोक म्हणाले, “तुम्ही तर वृध्द झालात. तुमच्या मुलांचे वागणे बरोबर नाही. ती तुमच्यासारखी नाहीत. तेव्हा इतर राष्ट्राप्रमाणेच आमच्यावर ही राज्यकारभार करण्यासाठी राजा नेमा.”
6 आपल्यावर शासन करण्यासाठी त्यांनी राजाची मागणी करावी हे शमुवेलला ठीक वाटले नाही. तेव्हा त्याने परमेश्वराची प्रार्थना केली.
7 परमेश्वर त्याला म्हणाला, “लोक म्हणतात तसे कर. त्यांनी काही तुला नाकारलेले नाही. त्यांनी माझा धिक्कार केला आहे. त्यांना मी राजा म्हणून नको आहे.
8 हे त्यांचे वागणे नेहमीचेच आहे. मी त्यांना मिसरमधून बाहेर आणले पण मला सोडून ते इतर दैवतांच्या मागे लागले. आता ते तुझ्याशीही तसेच वागत आहेत.
9 त्यांचे ऐक आणि त्यांना हवे तसे कर. पण त्या आधी त्यांना इशारा दे. राजाचा कारभार कसा असतो, तो कशी सत्ता गाजवतो ते त्यांना सांग.”
10 लोकांनी राजा मागितला, तेव्हा, शमुवेलने, परमेश्वराने सांगितले ते सर्व त्यांना ऐकवले.
11 तो म्हणाला, “राजा आपली सत्ता कशी गाजवेल ते ऐका. तुमच्या मुलांना तो तुमच्यापासून हिरावून घेईल. त्यांना बळजबरीने सैन्यात दाखल करील. रथावर, घोड्यांवर स्वार व्हायला लावून तो त्यांना युद्धाला जुंपील. तुमची मुले राजाच्या रथा पुढे रक्षक म्हणून धावतील.
12 काहीजण हजाराहजारावर तर काही पन्नास-पन्नास सैनिकांवर नायक म्हणून नेमली जातील. काही मुलं शेतीच्या कामात राबतील तर काहींना शस्त्रास्त्रे, रथाचे भाग बनविणे या कामाला लावले जाईल.
13 “राजा तुमच्या मुलींनाही कामाला लावील. अत्तरे करणे, स्वयंपाकपाणी, भटारखान्यात राबणे ही कामे त्यांच्याकडून करुन घेईल.
14 “तुमची उत्तम शेती, द्राक्षमळे, जैतुनांच्या बागा तुमच्या कडून काढून घेऊन तो त्या आपल्या अधिकाऱ्यांच्या हवाली करील.
15 धान्यातील आणि द्राक्षांतील एकदशांश हिस्सा तुमच्या कडून घेऊन राजा आपल्या अधिकांऱ्याना आणि नोकरांना देईल.
16 तुमचे नोकर, दासी, दुभती जनावरे, गाढवे तुमच्याकडून काढून स्वत:च्या ताब्यात घेईल.
17 तुमच्या शेरडामेंढरांचा एक दशांश हिस्साही घेईल.“तुम्ही त्याचे दास व्हाल.
18 तुमच्यावर अशी वेळ आली की मग असा राजा निवडल्याबद्दल परमेश्वराकडे गाऱ्हाणे न्याल. पण तेव्हा परमेश्वर तुमचे ऐकणार नाही.”
19 पण लोक शमुवेलचे ऐकायला तयार नव्हते ते म्हणाले, “आम्हाला राजा हवाच आहे.
20 मग आम्ही इतर राष्ट्रांच्या बरोबरीला येऊ. तो आमचे नेतृत्व करील. आमच्यासाठी लढाया करील.”
21 शमुवेलने लोकांचे ऐकून घेतले आणि परमेश्वराला त्यांचे म्हणणे जसेच्या तसे सांगितले.
22 परमेश्वर म्हणाला, “तू त्याचे ऐकायलाच हवेस. त्यांच्यावर राजा नेम.”मग शमुवेल इस्राएली लोकांना म्हणाला, “ठीक तर! तुम्हाला राजा मिळेल. आता सर्वजण आपापल्या गावी परत जा.”
धडा 9

1 अबीएलचा मुलगा कीश हा बन्यामीन घराण्यातील एक ख्यातनाम गृहस्थ होता. अबीएलचे वडील सरोर, सरोरचे वडील बखोरथ आणि बखोरथचे वडील अफीया अशी ही परंपरा होती.
2 कीशाला शौल नावाचा मुलगा होता. हा देखणा आणि तरुण असून देखणेपणात आणि उंचीच्या बाबतीत इस्राएलात त्याच्याशी बरोबरी करणारे कोणीही नव्हते. प्रत्येक इस्राएल मनुष्य त्याच्या खांद्याला लागे.
3 एकदा कीशाची गाढवे वाट चुकली. तेव्हा कीश शौलाला म्हणाला, “नोकारांपैकी कोणाला तरी बरोबर घेऊन गाढवांचा शोध घे.”
4 शौल त्याप्रमाणे आपल्या वडीलांच्या गाढवांच्या शोधार्थ निघाला. एफ्राईमचा डोंगराळ प्रदेश, शलीशाच्या भोवतालचा प्रांत पालथा घातला तरी त्याला आणि त्याच्या नोकराला गाढवे सापडेनात. तेव्हा ते शालीम प्रांतात गेले. पण तिथेही शोध लागला नाही. म्हणून पुढे ते बन्यामीन प्रदेशातून हिंडले. पण गाढवे मिळाली नाहीतच.
5 शेवटी ते दोघे सूफ या नगराशी आले. तेव्हा शौल आपल्या नोकराला म्हणाला, “आता आपण परतीच्या वाटेला लागलेले बरे. कारण गाढवांचा विचार सोडून देऊन वडील आता आपल्याच चिंतेत पडतील.”
6 पण नोकर म्हणाला, “या गावात एक परमेश्वराचा माणूस संदेष्टा आहे. लोक त्याला मानतात. तो बोललेले खरे ठरते. तेव्हा आपण या गावात जाऊ. कदाचित् तो आपल्याला पुढचा मार्ग दाखवील.”
7 शौल म्हणाला, “तर मग आपण जाऊच या पण त्याला द्यायचे काय? त्याला देण्यासारखे तर आपल्याजवळ काहीच नाही. आपल्याजवळचे फराळचे सुध्दा संपले. मग त्याला काय देणार?”
8 तेव्हा पुन्हा नोकाराने सांगितले, “माझ्याकडे थोडे पैसेआहेत तेच आपण त्या परमेश्वराच्या माणसाला देऊ. मग तो आपल्याला पुढची वाट दाखवेल.”
9 शौंल नोकराला म्हणाला, “ठीक आहे, चल जाऊ.” आणि ते तिकडे निघाले. चढण जात असताना वाटेत त्यांना पाण्याला चाललेल्या काही तरुण मुली भेटल्या. त्यांना त्यांनी संदेष्ट्याचा पत्ता विचारला.
10
11
12 तेव्हा त्या म्हणाल्या, “तो आत्ताच पुढे गेला आहे. लवकर पुढे जा. तो आजच या गावी आला आहे कारण लोक उच्च स्थानी शांत्यर्पण करणार आहेत.
13 पुढे गेल्यावर तुम्हाला तो दिसेल. घाई केलीत तर भोजनासाठी तो भक्ती स्थळापाशी पोचायच्या अगादेर तुम्ही त्याला भेटू शकाल. तो यज्ञाला आशीर्वाद देतो म्हणून तो तिथे पोहोंचे पर्यंत लोक जेवायला सुरुवात करत नाहीत. म्हणून लौकर जा.” पूर्वी कोणी असे परमेश्वराला प्रश्न विचारायला निघाले, “चला, संदेष्ट्याकडे जाऊ” असे म्हणत असत. कारण तेव्हा परमेश्वराच्या माणसाला संदेष्टा म्हणत.
14 तेव्हा शौल आणि त्याचा नोकर वर नगराच्या दिशेने जाऊ लागले. नगरात शिरतात तो त्यांना शमुवेल त्यांच्या दिशेने येताना दिसला. तो त्या यज्ञाच्या ठिकाणी जायला निघालाच होता.
15 आदल्या दिवशी परमेश्वराने शमुवेलला सांगितले होते,
16 “उद्या यावेळी मी तुझ्याकडे बन्यामीन घराण्यातील एकाला पाठवीन. त्याला तू अभिषेकपूर्वक इस्राएलवर राजा म्हणून नेम. पलिष्ट्यांपासून तो माझ्या लोकांना वाचवील. लोकांचे गाऱ्हाणे माझ्याकडे आले आहे. ते मी ऐकून घेतले आहे.”
17 शौल शमुवेलच्या दृष्टीस पडताक्षणीच परमेश्वर म्हणाला, “हाच तो मी सांगितलेला माणूस. तो माझ्या लोकांवर राज्य करील.”
18 शौलने शमुवेलला वेशीजवळ गाठले आणि तो म्हणाला, “संदेष्ट्यांचे घर कोठे आहे ते कृपा करुन मला सांगाल का?”
19 शमुवेल म्हणाला, “मीच तो तू पुढे हो आणि भक्तीच्या ठिकाणी जा. तुम्ही दोघेजण आज माझ्याबरोबर भोजन करा. उद्या सकाळी मी तुझी रवानगी करीन. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन.
20 आणि तीन दिवसांपूर्वी हरवलेल्या त्या गाढवांची काळजी करु नकोस. ती सापडली आहेत. आता इस्राएलला तुझी गरज आहे. इस्राएलला तू आणि तुमच्या घराण्यातील सर्व हवे आहात.”
21 शौल म्हणाला, “मी बन्यामीन घराण्यातला आहे. आमचे घराणे इस्राएल मधले सर्वात लहान घराणे आहे आणि बन्यामीन घराण्यात आमचे कुटुंब सगळ्यात छोटे आहे. मग इस्राएलला मी कशासाठी हवा आहे बरे?”
22 शमुवेलने मग त्यांना आणि त्याच्या नोकराला भोजनाच्या ठिकाणी नेले. तेथे तीस एक लोकांना भोजनासाठी आणि यज्ञात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. शमुवेलने या दोघांना पंगतीतल्या मानाच्या ठिकाणी बसवले.
23 शमुवेल आचाऱ्याला म्हणाला, “मांसाचा मी तुला राखून ठेवायला सांगितलेला वाटा आण.”
24 आचाऱ्याने मांडीचा भाग आणून शौलच्या पुढे ठेवला. शमुवेल म्हणाला, “तुझ्यासाठी मी हा राखून ठेवला आहे. या विशेष प्रसंगासाठी मी तो ठेवला होता. तो तू खा.” तेव्हा शौल शमुवेलच्या पंगतीला बसून जेवला.
25 भोजन आटोपल्यावर ते उपासना स्थळाहून खाली नगरात आले. शमुवेलने शौलसाठी घराच्या गच्चीत बिछाना घातला. शौल तेथे झोपला.
26 दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे शमुवेलने शौलला जोरात हाक मारुन उठवले. तो म्हणाला, “ऊठ आता मी तुझी रवानगी करतो.” शौल उठला आणि शमुवेल बरोबर घराच्या बाहेर पडला.
27 शौल त्याचा नोकर आणि शमुवेल गावाच्या सीमेपाशी आले. तेव्हा शमुवेल शौलला म्हणाला, “तुझ्या नोकराला पुढे व्हायला सांग तुझ्यासाठी परमेश्वराचा संदेश आहे.” तेव्हा नोकर पुढे चालू लागला.
धडा 10

1 शमुवेलने मग एका खास तेलाची कुपी घेतली आणि शौलच्या मस्तकावर ती ओतली. शौलचे चुंबन घेऊन तो म्हणाला, “परमेश्वराने त्याच्या प्रजेचा नेता म्हणून तुला आभिषिक्त केले (निवडले) आहे. त्यांचा तू अधिपती होशील. भोवतालच्या शत्रूंपासून त्यांचे रक्षण करशील. त्यासाठीच परमेश्वराने तुझा अभिषेक केला आहे हे खरे आहे. याची साक्ष पटवणाऱ्या या खुणा ऐक
2 येथून निघालास की तुला बन्यामीनांच्या हद्दीत सेल्सह येथे राहेलीच्या कबरीजवळ दोन माणसे भेटतील. तुला ती म्हणतील, ‘तुमची गाढवे मिळाली. तेव्हा तुमच्या वडिलांची काळजी मिटली, पण आता ते तुमच्या काळजीत पडले आहेत. आता माझ्या मुलाला कुठे शोधू असे ते म्हणत आहेत.”
3 शमुवेल पुढे म्हणाला, “पुढे गेलास की तुला ताबोरचा एला ओक वृक्ष लागेल. तिथे तुला देवाच्या भक्तीसाठी बेथलकडे निघालेली तीन माणसे भेटतील. त्यातल्या एकाजवळ तीन तान्ही करडं दुसऱ्याजवळ तीन भाकरी आणि तिसऱ्याकडे द्राक्षरसाचा बुधला असेल.
4 ती माणसे तुझी विचारपूस करतील. त्यांच्याजवळच्या दोन भाकरी ते तुला देतील आणि तू त्या घेशील.
5 मग तू गिबाथ एलोहिम येथे पोचशील. या ठिकाणी पलिष्ट्यांचा किल्ला आहे. या नगरात तू गेल्यावर भक्तीच्या उच्चस्थानाहून खाली येणारे संदेष्टे तुला भेटतील. भविष्य कथन करतील ते चालू असतानाच, परमेश्वराचा संचार झाल्याप्रमाणे ते नृत्य गायनात मशगुल असतील. ते सतार, संबळ, सनई, वीणा ही वाद्ये वाजवत असतील.
6 तुझ्यात त्यावेळी परमेश्वराच्या आत्म्याचा जोरदार संचार होऊन तू राहणार नाहीस. अगदी वेगळाच होशील. त्यांच्याबरोबर तूही भविष्यकथन करु लागशील.
7 असे झाले की तुला जे हवे ते तू साध्य करु शकशील. कारण परमेश्वराचीच तुला साथ असेल.
8 गिलगाल येथे तू माझ्याआधी जा. मग मी तिथे येईन. यज्ञात होमार्पण आणि शांत्यर्पणे करीन. माझी तू सात दिवस वाट पाहा. मग मी तुला भेटेन आणि काय करायचे ते सांगेन.”
9 शमुवेलला निरोप देऊन शौल जायला निघताच परमेश्वराने त्याचे आयुष्यच बदलून टाकले. सर्व खुणांचा प्रत्यय त्याला त्या दिवशीच आला.
10 शौल आपल्या नोकरासह गिबाथ एलोहिम या टेकडीवर आला. तिथे त्याला इतर संदेष्टे भेटले. परमेश्वराच्या आत्म्याचा जोरदार संचार होऊन तो ही इतर संदेष्ट्यां प्रमाणे भविष्य करु लागला.
11 त्याला आधीपासून ओळखणाऱ्या लोकांनी हे पाहिले. तेव्हा ते आपापसात याची चर्चा करु लागले. “कीशच्या मुलाला काय झाले? तो ही संदेष्ट्यांपैकीच आहे की काय?” असे म्हणून लागले.
12 तिथे राहणारा एक माणूस म्हणाला, “हो ना! हा यांचा नेता आहे असे दिसते.”तेव्हापासून “शौल संदेष्ट्यांपैकीच आहे की काय” अशी म्हणंच पडली.
13 यानंतर शौल आपल्या घराजवळच्या भक्तीस्थळापाशी पोचला.
14 त्याला व त्याच्या नोकराला शौलच्या काकाने इतके दिवस तुम्ही कोठे होतात म्हणून विचारले.शौल म्हणाला, “आम्ही आपली गाढवे शोधायला गेलो होतो. ती मिळाली नाहीत तेव्हा शमुवेलला भेटायला आम्ही गेलो.”
15 तेव्हा काका म्हणाला, “मग काय म्हणाला शमुवेल ते सांग ना!”
16 शौलने सांगितले, “गाढवांचा शोध लागला आहे असे शमुवेल म्हणाला.” शमुवेलच्या इतर वक्तव्याबद्दल, राज्याबद्दल त्याने काकाला काहीही सांगितले नाही.
17 शमुवेलने सर्व इस्राएली लोकांना मिस्पा येथे पमरेश्वराजवळ बोलावले.
18 शमुवेल त्यांना तेव्हा म्हणाला, “इस्राएलच्या परमेश्वर देवाचे म्हणणे असे आहे: इस्राएलला मी मिसरमधून बाहेर काढले. मिसर आणि इतर राष्ट्रे यांच्या जाचातून मुक्त केले.
19 सर्व आपत्तीतून तुम्हाला सोडवणाऱ्या परमेश्वराचाच आज तुम्ही त्याग करायला निघालेला आहात. राजा हवा अशी तुमची मागणी आहे. तेव्हा आता आपापल्या वंशांप्रमाणे, घराण्यांसकट परमेश्वरापुढे हजर व्हा.”
20 सर्व वंशातील लोकांना त्याने आपल्या जवळ बोलावले, आणि राजाची निवड करायला सुरुवात केली. सर्वात आधी शमुवेलने बन्यामीन वंशाची निवड केली.
21 व त्यापैकी प्रत्येक कुळाला क्रमाक्रमाने समोर बोलावले. त्यातून मात्रीच्या कुळाची निवड केली. मग त्यांच्यापैकी प्रत्येकाला समोरुन जायला सांगितले. अशा रीतीने कीशचा मुलगा शौल याची निवड केली.पण लोकांना शौल कुठे दिसेना.
22 त्यांनी परमेश्वराला विचारले, “शौल इथे आला आहे का?”परमेश्वर म्हणाला, “शौल कोठारामागे लपून बसला आहे.”
23 लोकांनी धावत जाऊन त्याला तिथून बाहेर आणले. तो सर्वांच्या घोळक्यात उभा राहिला. सगळ्यांपेक्षा तो उंच होता.
24 शमुवेल तेव्हा सर्व लोकांना उद्देशून म्हणाला, “परमेश्वराने निवडलेला माणूस पाहा. याच्यासारखा तुमच्यात कोणीही नाही.”तेव्हा लोकांनी “राजा चिरायु होवो” म्हणून जयजयकार केला.
25 शमुवेलने राज्याचे सर्व नियम लोकांना समजावून सांगितले. राजनीतीचा ग्रंथ लिहून परमेश्वरापुढे ठेवला आणि लोकांना घरोघरी परतायला सागितले.
26 शौलही गिबा येथे आपल्या घरी गेला. शूर सैनिकांना परमेश्वराकडून प्रेरणा मिळाली आणि त्यांनी शौलचे अनुयायित्व पत्करले.
27 पण काही कुरापती काढणारे मात्र म्हणालेच, “हा काय आमचे रक्षण करणार?” शौलवर टीका करत त्यांनी नजराणेही आणले नाहीत. पण शौल काही बोलला नाही.अम्मोन्यांचा राजा नाहाश गादी आणि रुबेनी लोकांचा छळ करत होता. त्याने प्रत्येक इस्राएल माणसाचा उजवा डोळा काढला. कोणालाही त्यांच्या मदतीला जाऊ दिले नाही. यार्देन नदीच्या पुर्वेकडील एकाही इस्राएली पुरुषाची यातून सुटका झाली नाही. पण सात हजार इस्राएली माणसे मात्र अम्मोन्यांच्या तावडीतून कशीबशी सुटली आणि याबेश गिलाद येथे आली
धडा 11

1 साधारण महिन्याभरानंतर अम्मोनी राजा नाहाश याने आपल्या सैन्यासह याबोश गिलादला वेढा दिला. तेव्हा याबेशाच्या लोकांनी नाहाशला निरोप पाठवला की तू आमच्याशी करार केल्यास तुझ्या आधिपत्याखाली आम्ही राहू.
2 पण नाहाशने उत्तर दिले, “तुम्हा सर्वांचा उजवा डोळा फोडून इस्राएलची नाचक्की करीन तेव्हाच तुमच्याशी मी करार करीन.”
3 तेव्हा याबेशमधील वडीलधारी मंडळी त्याला म्हणाली, “आम्हाला सात दिवसाची मुदत दे. तेवढ्या वेळात आम्ही इस्राएलभर आमचा संदेश देऊन माणसे पाठवतो. आमचा बचाव करायला कोणीच आले नाही तर आम्ही आपण होऊन तुझ्या स्वाधीन होऊ.”
4 शौल राहात होता तेथे म्हणजे गिबा येथे याबेशचे दूत येऊन पोचले. त्यांनी लोकांना हे सर्व सांगितले. तेव्हा लोकांनी रडून आकांत मांडला.
5 शौल तेव्हा आपली गुरे चरायला घेऊन गेला होता. कुरणातून येतांना त्याने लोकांचा आक्रोश ऐकला. तेव्हा त्याने विचारले, “हे काय चालले आहे? लोकांना शोक करायला काय झाले?”तेव्हा लोकांनी त्याला दूताचे म्हणणे सांगितले.
6 शौलने ते ऐकून घेतले. त्याच वेळी त्याच्यात देवाच्या आत्म्याचा संचार होऊन तो संतप्त झाला.
7 त्याने एक बैलांची जोडी घेऊन तिचे तुकडे तुकडे केले आणि दूतांना ते इस्राएलच्या सर्व प्रांतात फिरवायला सांगितले. त्याचबरोबर ही दवंडी पिटायला सांगितली. “सर्वजण शौल आणि शमुवेल यांच्या पाठीशी राहा. यात हयगय झाल्यास त्याच्या गुरांचीही अशीच गत होईल.”परमेश्वराच्या धास्तीने लोक एकदिलाने एकत्र आले.
8 शौलने बेजेक येथे या सर्वांना एकत्र बोलावले. तेथे इस्राएल मधून तीन लाख आणि यहूदातून प्रत्येकी तीस हजार माणसे होती.
9 या सर्वांनी शौलच्या सुरात सूर मिसळून याबेशच्या दूतांना सांगितले, “उद्या दुपारपर्यंत तुमच्या बचावासाठी आम्ही येत आहोत असे याबेश गिलाद मधील लोकांना सांगा.”शौलचा हा निरोप दूतांनी पोचवल्यावर याबेशच्या लोकांमध्ये आनंदी आनंद झाला.
10 ते अम्मोनी राजा नाहाश याला म्हणाले, “उद्या आम्ही तुमच्याकडे येतो मग आमचे हवे ते कर.
11 दुसऱ्या दिवशी सकाळी शौलने आपल्या सैन्याची तीन गटात विभागणी केली. त्यांच्यासह शौलने दिवस उजाडताच अम्मोन्यांच्या छावणीत प्रवेश केला. पहारा बदलत असताना त्यांच्यावर हल्ला केला. दुपार व्हायच्या आधीच अम्मोन्यांचा त्यांनी पराभव केला. अम्मोनी सैन्याची दाणादाण उडाली. ते वाट सापडेल तिकडे पळत सुटले. प्रत्येक जण वेगळ्या दिशेला गेला. कोणी दोन सैनिक एका ठिकाणी नव्हते.
12 एवढे झाल्यावर लोक शमुवेलला म्हणाले, “शौलला विरोध करणारे, त्याचे राज्य नको असलेले कुठे आहेत ते लोक? त्यांना आमच्या समोर आणा. त्यांनाही मारुन टाकतो.”
13 पण शौल म्हणाला, “नाही, आज कोणाचीही हत्या आता करायची नाही. परमेश्वराने इस्राएलला तारले आहे.”
14 तेव्हा शमुवेल लोकांना म्हणाला, “चला आता आपण सगळे गिलगाल येथे जाऊ. तेथे पुन्हा नव्याने शौलला राजा म्हणून घोषित करु.”
15 त्याप्रमाणे सर्वजण गिलगाल येथे जमले. परमेश्वरासमोर त्यांनी शौलला राजा केले. परमेश्वरासमोर शांत्यर्पणे केली. शौल आणि सर्व इस्राएली यांनी उत्सव साजरा केला.
धडा 12

1 शमुवेल सर्व इस्राएलांना उद्देशून म्हणाला, “मी सर्व काही तुमच्या म्हणण्याप्रमाणे केले आहे. तुमच्यावर राजा नेमला आहे.
2 तो आता तुमचे नेतृत्व करील. मी आता म्हातारा झालो, थकलो पण माझी मुल तुमच्या बरोबर आहेत. मी अगदी लहान असल्यापासून तुमचे नेतृत्व केले.
3 हा मी इथे आहे. माझ्या हातून काही चुकलेले असेल तर ते परमेश्वराला आणि तुम्ही निवडलेल्या राजाला सांगा. मी कोणाचा बैल किंवा गाढव चोरले आहे का? कोणाला दुखवले किंवा फसवले का? कोणाकडून मी कधी पैसाच काय पण जोडा तरी लाच म्हणून घेतला का? तसे असेल तर मी त्याची भरपाई करीन.”
4 यावर सर्व इस्राएलांनी उत्तर दिले, “नाही, तुमच्या हातून कोणतेही कुकर्म झालेले नाही. तुम्ही कधी आम्हाला फसवले नाहीत की लाच घेतली नाहीत.”
5 तेव्हा शमुवेल सर्वाना म्हणाला, “आज या घटनेला परमेश्वर आणि त्याने निवडलेला राजा साक्षी आहेत. तुमचे म्हणणे त्यांनी ऐकले आहे. माझ्याहातून काहीही वावगे घडले नसल्याचे तुमचे मत त्यांना माहीत आहे.” तेव्हा लोक एकमताने म्हणाले, “होय! परमेश्वर त्याला साक्षी आहे.”
6 मग शमुवेल म्हणाला, “काय काय घडले ते परमेश्वराला माहीत आहे. मोशे आणि अहरोन यांना त्यानेच नेमले. तुमच्या पूर्वजांनाही त्यानेच मिसरमधून सोडवले.
7 आता सर्वजण येथे शांत उभे राहा म्हणजे परमेश्वराने तुमच्यासाठी आणि तुमच्या पूर्वजांसाठी कोणकोणती सत्कृत्ये केली ती मी तुम्हाला सांगतो.
8 याकोब मिसरमध्ये गेल्यावर तेथील लोकांनी त्याच्या वंशजांचे जिणे कठीण केले तेव्हा त्यांनी परमेश्वराची करुणा भाकली. म्हणून परमेश्वराने मोशे आणि अहरोन यांना पाठवले. त्यानी मग त्या तुमच्या पूर्वजांना मिसरमधून सोडवले आणि या ठिकाणी आणले.
9 “पण तुमचे पूर्वज आपला स्वामी जो परमेश्वर त्याला विसरले. तेव्हा परमेश्वराने त्यांना सीसराचे गुलाम बनू दिले. सीसरा हा हासोर येथील सैन्याचा सेनापती होता. त्यानंतर परमेश्वराने त्यांना पलिष्टी आणि मवाबचा राजा यांचे गुलाम बनवले. हे सर्व तुमच्या पूर्वजांबरोबर घडले.
10 तेव्हा तुमच्या पूर्वजांनी परमेश्वराकडे मदतीची याचना केली. ते म्हणाले, “आमच्या हातून पातक घडले. परमेश्वराला सोडून बाल, अष्टारोथ या भलत्या दैवतांची आम्ही भक्ती केली. पण आता आमची शत्रूच्या तावडीतून सुटका कर म्हणजे आम्ही फक्त तुझीच सेवा करु.”
11 “तेव्हा मग परमेश्वराने यरुबाबेल (गिदोन), बदान, इफताह आणि शमुवेल यांना पाठवून शत्रूंपासून तुमची सुटका केली. तेव्हा तुम्हाला स्वस्थता लाभली.
12 पण मग अम्मोन्यांचा राजा नाहाश याला तुमच्यावर चाल करुन येताना तुम्ही पाहिले आणि तुम्हाला संरक्षणासाठी राजा असाव असे वाटले. प्रत्यक्ष परमेश्वर तुमचा देव राजा असतानाही तुम्हाला असे वाटले.
13 तेव्हा तोही तुम्हाला मिळाला. परमेश्वरानेच त्याची निवड केली.
14 परमेश्वर तुमचे सतत रक्षण करील पण तुम्ही मात्र त्यासाठी खालील गोष्टी पाळल्या पाहिजेत; सन्मानपूर्वक परमेश्वराची सेवा करा. त्याच्या आज्ञेविरुध्द जाऊन कोणाशी लढू नका. तुम्ही व तुमचा राजा यांनी परमेश्वर देवालाच मानावे. असे वागल्याने परमेश्वर तुमचे रक्षण करील.
15 पण त्याचा अवमान केलात, त्याच्या आज्ञेविरुध्द बंड केलेत तर तो तुमच्याकडे पाठ फिरवील. तुमचा व तुमच्या राजाचा नाश करील.
16 “आता स्तब्ध उभे राहा आणि परमेश्वराचे महान कृत्य आपल्या डोळ्यांदेखत पाहा.
17 सध्या गव्हाच्या कापणीचे दिवसआहेत. मी परमेश्वराची प्रार्थना करतो. त्याने ढगांच्या गडाडाटासह पाऊस पाडावा अशी मी विनंती करतो. तेव्हा, राजाची मागणी करुन आपण परमेश्वराच्या दृष्टीने दुष्कृत्य केले आहे हे तुम्हाला कळेल.”
18 आणि शमुवेलने परमेश्वराची प्रार्थना केली. त्याच दिवशी मेघगर्जनेसह जोरदार वृष्टी झाली. त्यामुळे लोकांनी परमेश्वराची आणि शमुवेलची धास्ती घेतली.
19 ते शमुवेलला म्हणाले, “आम्हा दासांच्या वतीने तुम्ही परमेश्वराची प्रार्थना करा. आम्हाला मरु देऊ नका. आमच्या हातून अनेक पातके घडली आहेत. राजाची मागणी करुन तर आम्ही त्यात आणखी भरच घातली आहे.”
20 शमुवेल त्यांना म्हणाला, “तुमच्या हातून पापे घडली आहेत हे खरे, पण घाबरुन जाऊ नका. परमेश्वराला अनुसरायचे सोडू नका. मनोभावे त्याची सेवा करा.
21 मूर्ती म्हणजे निरर्थक वस्तू. निळळ पुतळे. तेव्हा त्यांची पूजा करु नका. मूर्ती तुमचे रक्षण करत नाहीत की मदतीला येत नाहीत त्या व्यर्थ होत.
22 “पण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करत नाही. उलट त्याने मोठ्या प्रेमाने तुम्हाला आपले मानले आहे. तेव्हा त्याच्या मोठ्या नावाखातर तो तुम्हाला सोडून देणार नाही.
23 आणि माझे म्हणाल, तर मी तुमच्या वतीने नेहमीच प्रार्थना करत राहीन. तसे मी केले नाही तर परमेश्वराच्या दृष्टीने ते मोठे पाप ठरेल. चांगले आयुष्य जगायचा योग्य मार्ग मी तुम्हाला दाखवत राहीन.
24 पण तुम्ही परमेश्वराला मानले पाहिजे. मनापासून त्याचीच सेवा केली पाहिजे. त्याने तुमच्यासाठी जे चमत्कार केले ते आठवले पाहिजेत.
25 पण तुम्ही आडमुठेपणा आणि दुष्टपणा दाखवलात तर मात्र केरसुणीने केर झटकावा तसा, तुम्हाला तुमच्या राजासह परमेश्वर नष्ट करुन टाकील.”
धडा 13

1 आता शौलला राजा होऊन वर्ष झाले होते. इस्राएलवरील त्याच्या सत्तेला दोन वर्षे झाल्यावर
2 त्याने इस्राएलमधून तीन हजार माणसे निवडली. त्यापैकी दोन हजार मिखमाश येथे त्याच्या बरोबर बेथेलच्या डोंगराळ प्रदेशात राहिली. हजार जण योनाथान बरोबर बन्यामीनमधील गिबा येथे राहिले. सैन्यातील इतर सर्वांना त्याने घरोघरी पाठवले.
3 गिबा येथील छावणीतील पलिष्ट्यांच्या योनाथानने पराभव केला. ते पलिष्ट्यांच्या सेनापतीच्या कानावर गेले. ते म्हणाले, “इब्री लोकांनी बंड केले आहे.”शौल म्हणाला, “नेमके काय घडले ते इब्रींना ऐकू द्या” आणि त्याने आपल्या लोकांना इस्राएलभर रणशिंग फुंकून ही बातमी सांगायला सांगितली.
4 सर्व इस्राएसांच्या हे कानावर आले. त्यांना वाटले, “शौलने पलिष्ट्यांच्या नेत्याला मारले. तेव्हा पलिष्ट्यांना आता इस्राएलांबद्दल द्वेष वाटतो.”सर्व इस्राएलांना गिलगाल येथे शौलजवळ एकत्र जमायचा निरोप गेला.
5 इस्राएलांशी सामना करायला पलिष्टे ही सिध्द झाले. पलिष्ट्यांचा सेनासागर किनाऱ्यावर जेवढे वाळूचे कण असतील तेवढे सैनिक त्यांच्याकडे होते. सेनासागर विशाल होता. त्यांच्याकडे तीन हजार रथआणि सहा हजारांचे घोडदळ होते. त्यांनी बेथ-ओवनच्या पूर्वेला मिखमाश येथे तळ दिला.
6 आता आपण संकटात सापडले आहोत, पुरते पलिष्ट्यांच्या कचाट्यांत सापडलो आहोत हे इस्राएलांच्या लक्षात आले. ते गुहांमध्ये आणि खडकांच्या कपारीत लपून बसले. विवर, विहिरी यात त्यांनी आश्रय घेतला.
7 काही तर यार्देन नदी पलीकडे गाद, गिलाद या प्रांतात पळाले. शौल या वेळी गिलगाल येथेच होता. त्याच्या सैन्याचा भीतीने थरकाप उडाला होता.
8 शमुवेलने गिलगाल येथे भेटतो असे शौलाला सांगितले होते. त्याप्रमाणे शौलने सात दिवस त्याची वाट पाहिली. पण शमुवेल पोचला नाही. तेव्हा सैन्य शौलला सोडून जायला लागले.
9 तेव्हा शौल म्हणाला, “होमार्पणे आणि शांत्यर्पणे आणून द्या.” ती आणल्यावर शौलने यज्ञार्पणे केली.
10 त्याचे हे आटोपते आहे तोच शमुवेल तेथे पोचला. शौल त्याला भेटायला पुढे झाला.
11 शमुवेलने विचारले, “तू काय केलेस?” शौल म्हणाला, “माझे सैन्य पांगले. तुम्हीही दिलेल्या वेळेत आला नाहीत. पलिष्ट्यांची सेना मिखमाश येथे जमली.
12 तेव्हा मी विचार केला, पलिष्टी इथे गिलगाल मध्ये येऊन माझ्यावर हल्ला करतील आणि मी तर अजून परमेश्वराला मदतीचे आवाहनही केले नाही. तेव्हा मी हे होमार्पण करण्याचे घाडस केले आहे.”
13 शमुवेल म्हणाला, “तुझा हा मूर्खपणा आहे. परमेश्वर तुझा देव याची आज्ञा तू पाळली नाहीस. त्याचे म्हणणे ऐकले असतेस तर इस्राएलवर तुझ्या वंशाचे राज्य निरंतर राहिले असते.
14 पण आता तुझे राज्य सतत राहाणार नाही. परमेश्वराला त्याचा शब्द मानणारा माणूस हवा आहे आणि तसा तो मिळाला आहे. तो आता नवा नेता बनेल. तू परमेश्वराची अवज्ञा केलीस म्हणून त्याने नवीन अधिपती नेमला आहे.” आणि शमुवेल गिलगाल सोडून चालता झाला.
15 शौल आपल्या उर्वरित सैन्यासह गिलगाल सोडून बन्यामीन मधील गिबा येथे गेला. त्याने बरोबरची माणसे मोजली. ती जवळपास सहाशे भरली.
16 आपला मुलगा योनाथान आणि हे सैन्य यांसह तो गिबा येथे राहिला. मिखमाश येथे पलिष्ट्यांचा तळ होता.
17 त्यांनी त्या भागातील इस्राएल रहिवाश्यांना धडा शिकवायचे ठरवले आणि निवडक सैन्याने हल्ला सुरु केला. पलिष्ट्यांच्या सैन्याच्या तीन तुकडया होत्या. पहिली तुकडी उत्तरेला अफ्राच्या वाटेने शुवाल जवळ गेली.
18 दुसरी बेथ-होरोनच्या वाटेने आग्न्नेय दिशेला गेली आणि तिसरी टोळी वाळवंटाच्या दिशेला असलेल्या सबोईम दरी कडील वाटेने गेली.
19 इस्राएलमध्ये लोहार नव्हते. त्यामुळे त्यांना लोखंडाच्या वस्तू करता येत नसत. पलिष्ट्यांनीही त्यांना ही विद्या शिकवली नाही कारण ते लोखंडी भाले, तलवारी करतील ही त्यांना धास्ती होती.
20 पलिष्टी फक्त त्यांना धार लावून देत असत. तेव्हा इस्राएलांना फाळ, कुदळी, कुऱ्हाडी यांना धार लावायची असेल तेव्हा ते पलिष्ट्यांकडे जात.
21 फाळ आणि कुदळीला धार लावण्यासाठी पलिष्टी लोहार 1/3 औंस रुपे घेत तर कुऱ्हाडी, दाताळे, अरी, पराण्या यांना धार लावायचा आकार 1/6 औंस रुपे एवढा होता.
22 अशाप्रकारे युद्धाच्या दिवशी शौलच्या सैन्यातील एकाच्याही जवळ तलवार किंवा भाला नव्हता. शौल आणि त्याचा मुलगा योनाथान यांच्याजवळ तेवढी लोखंडी हत्यारे होती.
23 पलिष्टी सैन्याच्या एका तुकडीने मिखमाशची खिंड रोखून धरली होती.
धडा 14

1 त्यादिवशी शौलचा मुलगा योनाथान आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकाला म्हणाला, “चल, आपण खिंडीपलीकडील पलिष्ट्यांच्या छावणीकडे जाऊ. आपल्या वडीलांना मात्र त्याने हे सांगितले नाही.”
2 शौल तेव्हा गिबाच्या सीमेपाशी मिग्रोन येथील डाळिंबाच्या झाडाखाली बसला होता. जवळच धान्याचे खळे होते. शौल सोबत सहाशे माणसे होती.
3 त्यातील एकाचे नाव अहीया. शिलो येथे एली म्हणून परमेश्वराचा याजक होता. त्याच्या जागी आता हा होता. अहीयाने एफोद घातला होता. ईखाबोदचा भाऊ अहीदूब याचा हा मुलगा. ईखाबोद फिनहासचा आणि फिनहास एलीचा मुलगा. योनाथान निघून गेला हे लोकांना माहीत नव्हते.
4 खिंडीच्या दोन्ही बाजूला मोठमोठे सुळके होते. योनाथानने त्यांच्या मधूनपलिष्ट्यांच्या ठाण्यावर जायचे ठरवले. एका सुळक्याचे नाव बोसेस व दुसऱ्याचे सेने असे होते.
5 एक सुळका उत्तरेला मिखमाशच्या दिशेने तर दुसरा दक्षिणेला गिबाकडे वळलेला होता.
6 योनाथान आपल्या शस्त्रवाहक सेवकाला म्हणाला, “चल त्या परकीयांच्या ठाण्यावर जाऊ. कदाचित परमेश्वर आपल्या हातून त्यांचा पराभव करील. सैन्य कमी की जास्त याचा परमेश्वराला काय फरक पडतो?”
7 तेव्हा तो सेवक म्हणाला, “तुम्ही म्हणाल तसे करु. मी आपल्याबरोबरच आहे.”
8 योनाथान म्हणाला, “चल तर! ही खिंड ओलांडून त्यांच्या पहारेकऱ्यांपर्यंत जाऊ. त्यांना आपल्याला पाहू दे.
9 ‘आहात तिथेच थांबा, आम्ही तेथे येतो’ असे ते म्हणाले तर आपण तिथेच थांबू. आपण पुढे जायचे नाही.
10 पण त्यांनी पुढे यायला सांगितले तर मात्र पुढे व्हायचे. तसे झाले तर ती देवाची खूण समजायची. याचा अर्थ असा की त्यांचा पराभव करण्याची परमेश्वराने आपणास मुभा दिली आहे.”
11 हे दोघे, पलिष्टी सैनिकांच्या नजरेच्या टप्प्यात आले. ते सैनिक म्हणाले, “पाहा, ते बिळात लपून राहिलेले इब्री आता बाहेर पडत आहेत.”
12 त्या छावणीतील पलिष्ट्यांनी या दोघांना “वर या म्हणजे चांगला धडा शिकवतो” असे धमकावले. योनाथान आपल्या सेवकाला म्हणाला, “चल माझ्या मागोमाग. परमेश्वर आता आपल्या हातून पलिष्ट्यांना नेस्तनाबूत करील.”
13 योनाथान मग हाता पायांनी आधार घेत घेत तो कडा चढून गेला. त्याचा सेवक त्याच्या पाठोपाठ होताच. दोघांनी मिळून पलिष्ट्यांवर हल्ला चढवला. त्यांनी त्या एक बिघा जमिनीवर पहिल्या चढाईत वीसजणांना ठार केले. समोरुन येणाऱ्यांवर योनाथानने हल्ला केला आणि त्यात जखमी झालेल्यांना योनाथानच्या सेवकाने मागोमाग येऊन ठार केले.
14
15 तेव्हा छावणीत, शेतात, किल्ल्यावर पसरलेल्या सर्व पलिष्ट्यांमध्ये घबराट पसरली. चांगल्या शूर सैनिकांनीही धास्ती घेतली. त्यांच्या पायाखालची भूमी कंपायमान झाली आणि पलिष्टी भयभीत झाले.
16 इकडे बन्यामीनच्या भूमीतील गिबा येथे असलेल्या शौलच्या रक्षकांनी पलिष्ट्यांना सैरावैरा पळताना पाहिले.
17 शौल आपल्या रक्षकांना म्हणाला, “आपली माणसे मोजा. कोण छावणी सोडून गेले ते पाहू.”मोजणीतून योनाथान आणि त्याचा सेवक गेल्याचे लक्षात आले.
18 शौल अहीयाला म्हणाला, “परमेश्वराचा पवित्रकरारकोश आण” (त्यावेळी देवाचा हा पवित्र करारकोश इस्राएलांजवळ होता.)
19 अहीयाशी बोलत आसताना शौल परमेश्वर काही सल्ला देईल म्हणून वाट पाहात होता. इकडे पलिष्ट्यांच्या ठाण्यावरील गलबला व गोंधळ वाढत चालला. शौलचा धीर सुटत चालला. शेवटी तो याजक अहीया याला म्हणाला, “आता प्रार्थना पुरे. तु थांब.”
20 शौलने सैन्य जमा केले आणि तो युद्धाला भिडला. पलिष्ट्यांची आता दाणादाण उडाली. इतकी की ते आपापसातच लढू लागले.
21 पूर्वी पलिष्ट्यांचे सेवक असलेले काही इब्री सध्या पलिष्ट्यांच्या छावणीत होते. ते आता शौल आणि योनाथान यांना जाऊन मिळाले.
22 एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात दडून राहिलेल्या इस्राएलांनी पलिष्ट्यांच्या पलायनाची बातमी ऐकली. तेव्हा तेही युद्धात उतरले आणि त्यांनी पलिष्ट्यांचा पाठलाग सुरु केला.
23 अशाप्रकारे परमेश्वराने त्यादिवशी इस्राएलांचा बचाव केला. युद्ध बेथ-आवेन कडे सरकले. जवळ जवळ दहा हजाराचे सर्व सैन्य शौलच्या पाठीशी होते. एफ्राईमच्या डोंगराळ परदेशातील सर्व नगरांमध्ये युद्ध पसरले.
24 पण शौलच्या हातून त्या दिवशी मोठी चूक झाली. सर्व इस्राएल लोक दमले भागलेले आणि भुकेले होते. शौलने त्यांच्याकडून सक्तीने एक शपथ घेतली होती. “संध्याकाळ व्हायच्या आत आणि शत्रूचा पाडाव करण्यापूर्वी कोणी काही खाल्ले तर त्याला शासन होईल.” अशा त्या शपथेमुळे कोणीही अन्नग्रहण केले नव्हते.
25 लढत लढत लोक रानात शिरले. तिथे त्यांना जमिनीवर मधाचे पोळे दिसले पण ते पाहूनही लोकांनी त्यातील मधाला हात लावला नाही कारण शपथेचा धाक त्यांच्या मनात होता.
26
27 आपल्या वडीलांनी सर्वाना बळजबरीने अशी शपथ घ्यायाला लावली आहे याबद्दल योनाथानला काहीच माहीत नव्हते. तेव्हा त्याने आपल्या हातातील काठी पोळ्यात खुपसली आणि मध काढला. थोडा मध खाल्यावर त्याला चांगली तरतरी आली.
28 एक सैनिक योनाथानला म्हणाला, “तुमच्या वडीलांनी लोकांना शपथ घालून बजावले आहे की आज कोणी काही खाल्ले तर त्याला शाप लागेल. म्हणून लोकांनी काही खाल्लेले नाही. ते भुकेने व्याकुळ झाले आहेत.”
29 योनाथान म्हणाला, “माझ्या वडीलांनी देशावर खूप संकटे आणली आहेत. थोडासा मध खाताच मला पाहा कसे ताजेतवाने वाटू लागले!
30 लोकांनीही शत्रूच्या लूटीतून थोडे खाल्ले असते तर बरे झाले असते. आपण यापेक्षा जास्त पलिष्ट्यांना गारद करु शकलो असतो.”
31 मिखामाशापासून अयालोन पर्यंत पलिष्ट्यांचा पाडाव करता करता इस्राएल लोक फार थकून गेले होते. ते भुकेलेही होते.
32 त्यांनी पलिष्ट्यांची मेंढरे गुरे, वासरे लुटून आणली होती. आता ते भुकेने इतके कासावीस झाले होते की त्यांनी ती गुरे तिथेच जमिनीवर मारुन खाल्ली. त्यांचे रक्तसुद्धा चाटले.
33 तेव्हा एक जण शौलला म्हणाला, “पाहा, हा परमेश्वराच्या दृष्टीने अपराध आहे. ही माणसे तर रक्तासकट मांस खात आहे.”शौल म्हणाला, “तुम्ही पाप केले आहे. आता एक मोठा दगड लोटून येथे आणा.”
34 पुढे तो म्हणाला, “जा, त्या लोकांना जाऊन सांगा की प्रत्येकाने बैल मेंढरे माझ्यासमोर आणावी आणि मगच त्यांनी ती इथे कापावी. असे पाप करु नका. रक्ताने भरलेले मांस खाऊ नका.”मग सर्वानी आपापली जनावरे तेथे आणली आणि मारली.
35 तेव्हा शौलने स्वत:हून परमेश्वरासाठी वेदी बांधली.
36 तो म्हणाला, “आज रात्री आपण पलिष्ट्यांवर हल्ला करु. त्यांचे सर्व हिरावून घेऊन त्या सर्वाना कापून काढू.”सर्व सैन्याने त्याच्या म्हणण्याला साथ दिली.पण याजक म्हणाला, “आपण परमेश्वराचा कौल मागू.”
37 म्हणून शौलने परमेश्वराला विचारले, “आम्ही आज पलिष्ट्यांवर चालून जाऊ का? तू आम्हाला त्यांचा पराभव करु देशील का?” पण त्यादिवशी परमेश्वराने शौलला उत्तर दिले नाही.
38 तेव्हा शौल म्हणाला, सर्व अधिकाऱ्यांना, लोकनायकांना माझ्यासमोर बोलवा. आज कोणाच्या हातून पाप घडले आहे ते पाहू.
39 इस्राएलला तारणाऱ्या परमेश्वराची शपथ घेऊन मी सांगतो की अगदी माझा पोटचा मुलगा योनाथान याच्याहातून अपराध घडला असेल तरी त्याला देहान्त शासन होईल.” यावर कोणीही चकार शब्द ही काढला नाही.
40 मग शौल सर्व इस्राएलांना म्हणाला, “तुम्ही सर्व एका बाजूला उभे राहा. मी आणि माझा मुलगा योनाथान दुसऱ्या बाजूला होतो.”सर्वानी ते मानले.
41 मग शौलाने प्रार्थना केली, “इस्राएलच्या परमेश्वरा, देवा, आज तू माझी प्रार्थना का ऐकली नाहीस? मी किंवा माझा मुलगा योनाथान याच्या हातून पाप घडले असेल तर उरीम टाक आणि लोकांच्या हातून पाप घडले असेल तर थुम्मीम टाक”शौल आणि योनाथानच्या नावाने दान पडले आणि लोक सुटले.
42 शौल म्हणाला, “पुन्हा त्या टाका व दाखवा की मी व माझा मुलगा योनाथान पैकी कोण दोषी आहे.” मग योनाथान पकडला गेला.
43 शौल त्याला म्हणाला, “तू काय केलेस ते सांग.”योनाथान म्हणाला, “कोठीच्या टोकावर मावेल एवढाच मध तेवढा मी चाखला त्यासाठी मी प्राणार्पण करायला हवे का?”
44 शौल म्हणाला, “माझा शब्द पाळला गेला नाही तर शासन करायला मी परमेश्वराला सांगितले आहे. तेव्हा तुला मेलेच पाहिजे.”
45 पण सर्व सैनिक शौलला म्हणाल, “योनाथानने आज इस्राएलकडे विजय खेचून आणला आहे. तेव्हा त्याने मेलेच पाहिजे का? खचितच नाही. आम्ही परमेश्वरापुढे शपथ घेऊन सांगतो की त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. पलिष्ट्यांविरुद्ध लढायला परमेश्वराने योनाथानला मदत केली आहे.” अशाप्रकारे लोकांनी योनाथानला वाचवले. त्याला मृत्यूची सजा झाली नाही.
46 शौलने पलिष्ट्यांचा पाठलाग केला नाही. पलिष्टी आपल्या जागी परतले.
47 शौलने सर्व अधिकार आपल्या हाती घेऊन राज्य स्थापित केले. मवाबी, अम्मोनी, अदोमी, सोबाचे राज, पलिष्टी इत्यादी इस्राएलच्या भोवतालच्या सर्व शत्रूशी युद्ध केले. शौल जेथे जेथे गेला तेथे तेथे त्यांने शत्रूंचा पाडाव केला.
48 पराक्रम गाजवला. इस्राएलांची लूट करणाऱ्या सर्व शत्रूंपासून इस्राएलांची सुटका केली. अमालेकांचाही त्याने पराभव केला.
49 योनाथान, इश्वी, आणि मलकीशुवा हे शौलचे मुलगे. शौलच्या मोठ्या मुलीचे नाव मेरब आणि धाकटीचे मीखल.
50 अहीनाम ही त्याची पत्नी. ती अहीमासची मुलगी.शौलचा काका नेर याचा मुलगा अबनेर त्याचा सेनापती होता.
51 शौलचे वडील कीश आणि काका नेर. ही अबियेलची मुले.
52 शौलने आयुष्यभर पराक्रम गाजवले. पलिष्ट्यांचा त्याने कडवा प्रतिकार केला. त्याला कुठेही शूर, पराक्रमी माणूस आढळला की त्याला तो सैनिकात भरती करुन घेई आणि अंगरक्षक म्हणून नेमी.
धडा 15

1 एक दिवस शमुवेल शौलला म्हणाला, “इस्राएलचा राजा म्हणून तुला राज्याभिषेक करायला परमेश्वराने मला पाठवले. आता परमेश्वर काय म्हणतो ते ऐक.
2 सर्व शक्तिमान परमेश्वराचे म्हणणे आहे. “इस्राएल लोक मिसर मधून बाहेर पडले तेव्हा अमालेकींनी त्यांना कनानच्या वाटेवर अडवले. अमालेक्यांचे हे कृत्य मी पाहिले आहे.
3 तेव्हा आता त्यांच्याशी जाऊन लढ. त्यांचा आणि त्यांच्या मालमत्तेचा पूर्णपणे बीमोड कर. काहीही शिल्लक ठेवू नकोस. पुरुष, बायका, मुले, अगदी तान्ही बाळेसुध्दा मारुन टाक. त्याची गुरे, मेंढरे, उंट, गाढवे या सर्वाचा संहार कर.”
4 तलाईम येथे शौलाने सर्व सैन्याची जमवाजमव केली. दोन लाखांचे पायदळ आणि यहूदातील दहा हजार माणसे त्यात होती.
5 मग शौल अमालेक नगरापाशी जाऊन एका खोऱ्यात दबा धरुन बसला.
6 केनी लोकांना तो म्हणाला, “तुम्ही अमालेक्यांची संगत सोडून दूर निघून जा. म्हणजे मग आम्ही अमलेक्यांच्या बरोबर तुमचा नाश करणार नाही. कारण मिसरमधून इस्राएल बाहेर पडले तेव्हा तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने वागला होता.” तेव्हा केनी लोक अमालेक्यांना सोडून निघून गेले.
7 शौलने अमालेक्यांचा पराभव केला. हवीलापासून मिसरच्या हद्दीजवळच्या शूरपर्यंत त्याने अमालेक्यांचा पाठलाग केला.
8 अगाग हा अमालेक्यांचा राजा होता. त्याला शौलने ताब्यात घेतले. त्याला जिवंत ठेवून बाकी अमालेकी लोकांना त्याने कापून आणले.
9 सर्वच गोष्टींचा संहार करायचे शौलच्या आणि त्याच्या सैन्याच्या जिवावर आले. म्हणून त्यांनी अगागला जिवंत ठेवले. तसेच धष्टपुष्ट गुरे. उत्तम मेंढरे, कोकरे आणि काही चांगल्या ठेवण्यायोग्य गोष्टी त्यांनी ठेवल्या. जे टाकाऊ आणि कुचकामी त्याचा नाश केला.
10 यानंतर शमुवेलला परमेश्वरा कडून संदेश आला.
11 परमेश्वर त्याला म्हणाला, “शौला आता मला अनुसरत नाही. त्याला राजा केले याचे मला दु:ख होते. माझ्या सांगण्याप्रमाणे तो आता वागत नाही. शमुवेलला हे ऐकून फार खेद वाटला. रात्रभर त्याने अश्रू ढाळत परमेश्वराची प्रार्थना केली.
12 दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून तो शौलला भेटायला गेला. पण तिथे गेल्यावर त्याला कळले की शौल यहूदातील कर्मेल येथे गेला आहे. तिथे स्वत:च्या सन्मानार्थ एक दगडी स्तंभ उभारुन अनेक गावे फिरुन तो गिलगाल येथे येणार आहे.तेव्हा शौल होता त्या ठिकाणी शमुवेल गेला. तिथे अमालेक्याच्या लुटीतील पहिला भाग परमेश्वरासाठी शौलने नुकताच यज्ञात अर्पण केला होता.
13 शमुवेल शौलजवळ पोचला तेव्हा शौलने त्याला अभिवादन केले. तो म्हणाला, “परमेश्वर तुमचे कल्याण करो. मी परमेश्वराच्या आज्ञेत आहे.”
14 तेव्हा शमुवेल म्हणाला, “मग मला हा कसला आवाज ऐकायला येत आहे? शेरडामेंढरांचे केकारणे आणि गुरांचे हंबरणे याचा अर्थ काय?”
15 शौल म्हणाला, “सैनिकांनी ती गुरे अमाले क्यांकडून लुटीत आणली आहेत. प्रभु परमेश्वरासाठी यज्ञ अर्पण करायला म्हणून त्यांनी उत्तमोत्तम गुरेमेंढरे बाजूला ठेवली आहेत. बाकीच्या सगळ्याचा मात्र आम्ही संहार केला.”
16 यावर शमुवेल शौलला म्हणाला, “बस्स कर! काल रात्री परमेश्वर माझ्याशी काय बोलला ते सांगतो.”शौल म्हणाला, “बरे तर, सांगा.”
17 शमुवेल सांगायला लागला, “पूर्वी तू स्वत:ला मोठा समजत नव्हतास. पण तू सर्व इस्राएलांचा प्रमुख बनलास. परमेश्वराने तुला राजा म्हणून नेमले.
18 परमेश्वराने तुला विशेष कामगिरीवर पाठवले. तो म्हणाला, ‘सर्व अमालेक्यांच्या संहार कर. ते नीच असल्याने त्यांना शिल्लक ठेवू नको. त्यांची नावनिशाणीही उरु देऊ नको.
19 पण तू परमेश्वराचे ऐकले नाहीस. तुला या गोष्टी ठेवायच्या होत्या म्हणून परमेश्वराने जे करु नको म्हणून सांगितले ते तू केलेस.”
20 शौल म्हणाला, “पण मी तर परमेश्वराची आज्ञा पाळली आहे. त्याने पाठवले तिकडे मी गेलो. सर्व अमालेक्यांना नष्ट केले. राजा अगाग याला तेवढे मी परत आणले.
21 आणि सैनिकांनी जी निवडक गुरेमेंढरे घेतली ती गिलगाल येथे यज्ञात तुमचा देव परमेश्वर ह्याला अर्पण करण्यासाठी.”
22 पण शमुवेल म्हणाला, “परमेश्वर जास्त प्रसन्न कशामुळे होईल? यज्ञ आणि होमार्पणे देऊन की त्याच्या आज्ञा पाळल्याने? त्याच्यासाठी यज्ञ करण्यापेक्षा परमेश्वराची आज्ञा पाळणे केव्हाही श्रेयस्कर. मेंढराची चरबी त्याला वाहण्यापेक्षा त्याचे ऐकणे चांगले.
23 परमेश्वराची अवज्ञा करणे हे जादूटोण्याचे पाप करण्या इतकेच वाईट. आडमुठेपणाने आपल्याला हव ते करणे हे मूर्तीपूजेसारखंच पातक आहे. तू परमेश्वराचा आज्ञाभंग केलास. तेव्हा परमेश्वरालाही तू राजा असणे आता मान्य नाही.”
24 तेव्हा शौल शमुवेलला म्हणाला, “माझ्या हातून पाप झाले आहे. मी परमेश्वराचे वचन पाळले नाही. तुम्ही सांगितले तसे वागलो नाही. लोकांचा मला धाक वाटला आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी वागलो.
25 पण आता या पापाबद्दल मला क्षमा करा. मी तुम्हाला ही विनवणी करतो. माझ्या बरोबर चला. मी परमेश्वराची उपासना करीन.”
26 पण शमुवेल म्हणाला, “मी आता तुझ्याबरोबर परत येणार नाही. तू परमेश्वराचा शब्द मोडलास तेव्हा परमेश्वरही तुला इस्राएलच्या राजेपदावरुन झुगारुन देत आहे.”
27 एवढे बोलून शमुवेल जायला निघाला तेव्हा शौलने त्याच्या अंगरख्याचे टोक धरुन त्याला थोपवायचा प्रयत्न केला. यात अंगरखा फाटला.
28 शमुवेल म्हणाला, “तू हा अंगराखा फाडलास तसे इस्राएलचे राज्य तुझ्याकडून परमेश्वराने हिसकावून घेतले आहे. तुझ्याच एका मित्राकडे ते सोपवले आहे. तो तुझ्या पेक्षा भला आहे.
29 परमेश्वर इस्राएलचा देव असून तो सर्वकाळ आहे. परमेश्वर आपला शब्द फिरवत नाही की विचार बदलत नाही. माणसासारखा तो चंचल नव्हे.”
30 शौल म्हणाला, “ठीक आहे माझ्याहातून पाप झाले आहे. पण कृपाकरुन माझ्या बरोबर परत चल. इस्राएलचे लोक आणि अधिकारी मंडळी यांच्यासमोर माझा अवमान करु नको. तू बरोबर चल. मग मी प्रभु परमेश्वराची उपासना करतो.”
31 शमुवेल त्या प्रमाणे शौलबरोबर गेला. शौलने परमेश्वराची उपासना केली.
32 शमुवेल म्हणाला, “आता अमालेक्यांचा राजा अगाग याला माझ्या समोर आणा.”अगाग आला. त्याला साखळदंडांनी बांधले होते. त्याला वाटले, “हा काही आपला जीव घेणार नाही.”
33 पण शमुवेल अगागला म्हणाला, “तुझ्या तलवारीने तू मुलांना आई वेगळे केलेस. आता तुझ्या आईची गतीही तशीच होईल.” आणि त्याने गिलगाल येते परमेश्वरासमोर अगागचे तुकडे तुकडे केले.
34 मग शमुवेल तिथून निघाला. तो रामा येथे गेला. शौल आपल्या गिबा येथील घरी परतला.
35 पुढे आयूष्यभर शमुवेलला शौलचे दर्शन झाले नाही. शौलबद्दल त्याला फार वाईट वाटले. शौलला इस्राएलचा राजा केल्याबद्दल परमेश्वरालाही खेद झाला.
धडा 16

1 परमेश्वर शमुवेलला म्हणाला, “शौलसाठी तू किती दिवस शोक करत बसणार आहेस? राजा म्हणून मी त्याला झिडकारले तरी तू त्याच्याबद्दल वाईट वाटून घेत आहेस? आपल्या शिंगात तेल भरुन घे आणि बेथलहेमला जायला नीघ. तुला मी इशाय नावाच्या माणसाकडे पाठवतो. इशाय बेथलहेमला राहतो. त्याच्या एका मुलाची मी राजा म्हणून निवड केली आहे.”
2 तेव्हा शमुवेल म्हणाला, “मी कसा जाऊ? ही गोष्ट शौलने ऐकली तर तो माझा जीव घ्यायचा प्रयत्न करील.” परमेश्वर त्यावर त्याला म्हणाला, “तू बेथलहेमला जायला नीघ, बरोबर एक वासरु घे. “मी परमेश्वराला यज्ञ कायला चाललो आहे” असे म्हण.
3 इशायला यज्ञासाठी बोलाव. मग मी काय करायचे ते सांगिन. मी सांगेन त्या व्यक्तीला अभिषेक कर.”
4 शमुवेलने मग परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे केले. तो बेथलहेम येथे आला. तेव्हा तेथील वडीलधाऱ्यांना धास्ती वाटली. ते शमुवेलला भेटले. “आपली ही सलोख्याचीच भेट आहे ना”, असे त्यांनी शमुवेलला विचारले.
5 शमुवेल म्हणाला, “होय, मी स्नेहभावाने आलो आहे. मला परमेश्वरासाठी यज्ञ करायचा आहे. तयारीला लागा आणि माझ्याबरोबर यज्ञासाठी या.” शमुवेलने इशायला व त्याच्या मुलांना तयार केले. त्यांनाही यज्ञात आमंत्रित करुन त्यात भाग घ्यायला सांगितले.
6 इशाय आणि त्याची मुले आली तेव्हा शमुवेलने अलियाबला पाहिले. शमुवेलला वाटले, “हाच तो परमेश्वराने निवडलेला माणूस!”
7 तेव्हा परमेश्वर शमुवेलला म्हणाला, “अलियाब उंचापुरा आणि देखणा आहे. पण रुपावर जाऊ नको. परमेश्वराची नजर माणसांसारखी नसते. तुम्ही बाह्यरुपाला भाळता पण परमेश्वर अंतरंग पाहतो. अलियाब ही योग्य व्यक्ती नव्हे.”
8 मग इशायने आपला दुसरा मुलगा अबीनादाब याला बोलावले. तो शमुवेल समोरुन गेला. शमुवेल म्हणाला, “हीही परमेश्वराची निवड नव्हे.”
9 मग इशायने शम्माला शमुवेलच्या समोर यायला सांगितले. तेव्हाही शमुवेल म्हणाला, “हाही तो नव्हे.”
10 इशायने आपल्या सातही मुलांना शमुवेल पुढे हजर केले. पण शमुवेल म्हणाला, “यापैकी कोणालाही परमेश्वराने निवडलेले नाही.”
11 त्याने पुढे इशायला विचारले, “इथे तुझी सगळी मुलं हजर आहेत ना?” इशाय म्हणाला, “नाही आणखी एक आहे सगळ्यात धाकटा तो रानात मेंढरे राखायला गेला आहे.”शमुवेल म्हणाला, “त्याला बोलावणे पाठवून इथे आण. तो येईपर्यंत आपण जेवायला सुरुवात करयाची नाही.
12 इशायने मग कोणालातरी पाठवून आपल्या धाकट्या मुलाला यायला सांगितले. तो अतिशय देखणा, तांबूस वर्णाचा तरुण होता. परमेश्वर आता शमुवेलला म्हणाला, “ऊठ आणि याला अभिषेक कर. हाच तो.”
13 शमुवेलने आपले तेलाने भरलेले शिंग उचलले आणि इशायच्या या धाकट्या मुलावर सर्व भावंडांसमोर त्या खास तेलाने अभिषेक केला. तेथून पुढे दावीदवर परमेश्वराच्या आत्म्याचा जोरदार संचार होऊ लागला. एवढे झाल्यावर शमुवेल रामा येथे परतला.
14 इकडे परमेश्वराच्या आत्म्याने शौलची साथ सोडली. परमेश्वराने पाठवलेला एक दुरात्मा त्याला त्रस्त करु लागला.
15 शौलचे नोकर त्याला म्हणाले “हा परमेश्वराकडचा दुरात्मा तुम्हाला त्रास देत आहे.
16 आम्हाला आज्ञा द्या आम्ही कोणी चांगला वीणा वाजवणारा शोधतो. तुम्ही त्या दुरात्म्याने त्रस्त व्हाल तेव्हा हा वादक वीणा वाजवेल. म्हणजे तो दुष्ट आत्मा तुम्हाला सोडून जाईल आणि तुम्हाला बरे वाटेल.”
17 तेव्हा शौल आपल्या सेवकांना म्हणाला, “शोधा तर असा कुणीतरी आणि त्याला माझ्याकडे आणा.”
18 यावर एक चाकर म्हणाला, “इशाय नावाचा एक माणूस बेथलहेम येथे राहतो. त्याचा मुलगा मला माहीत आहे. त्याला वीणा वाजवता येते. तो चांगला लढवय्या सुध्दा आहे. तो तरनरीत, देखणा असून परमेश्वराची त्याला साथ आहे.”
19 तेव्हा शौलने इशायकडे संदेश पाठवला. निरोप्यांनी इशायला सांगितले, “तुला दावीद म्हणून मुलगा आहे. तुझी मेंढरे तो राखतो. त्याला माझ्याकडे पाठव.”
20 तेव्हा इशायने शौलसाठी काही भेटवस्तू घेतल्या. एक गाढव. थोडी भाकरी, द्राक्षारसाचा एक बुधला आणि एक करडू या वस्तू दावीदजवळ देऊन त्याला शौलकडे पाठवले.
21 दावीद शौलकडे गेला आणि त्याच्या समोर उभा राहिला. शौलला तो फारच आवडला. दावीद त्याचा शस्त्रवाहक बनला.
22 शौलने इशायला निरोप पाठवला, “दावीदला माझा सेवक म्हणून इथेच राहू दे. त्याच्यावर माझा फार लोभ आहे.”
23 मग जेव्हा जेव्हा शौल दुरात्म्या मुळे हैराण होई तेव्हा तेव्हा दावीद वीणावादन करी. त्यामुळे दुरात्मा पळून जाऊन शौलला दिलासा मिळे.
धडा 17

1 पलिष्ट्यांनी आपापल्या सैन्यांची जमवाजमव केली आणि ते यहूदामधील सोखो येथ जमले. सोखो आणि अजेका यांच्यामध्ये अफसऱ्दम्मीन येथे त्यांनी छावणी दिली.
2 शौल आणि इस्राएलचे सैन्यही एकत्र आले. त्यांचा तळ एलाच्या खोऱ्यात होता. पलिष्ट्यांशी लढायला शौलचे सैन्य सज्ज झाले.
3 खोऱ्याच्या दुतफर् असलेल्या टेकड्यांवर ही दोन्ही सैन्ये समोरामसोर ठाकली होती.
4 पलिष्ट्यांकडे गल्याथ नावाचा कुशल योध्दा होता. तो गथ येथील होता. त्याची उंची नऊ फुटापेक्षाजास्त होती. पलिष्ट्यांच्या छावणीतून तो बाहेर आला.
5 पितळी शिरस्त्राण आणि खवल्या खवल्यांचे चिलखत त्याने परिधान केले होते. हे चिलखतही पितळी असून त्याचे वजन जवजवळ एकशेपंचवीस पौंड होते.
6 त्याच्या पायांवरही पितळी कवच असून पाठीवर पितळी बरची होती.
7 त्या बरचीचा लाकडी भाग विणकरच्या दांडक्याएवढा होता. आणि बरचीचं पातं पंधरा पौंड वजनाचं होतं एक ढाल वाहणारा सेवक गल्याथच्या समोर चालला होता.
8 गल्याथ रोज बाहेर पडे आणि इस्राएली सैनिकांना ओरडून आव्हात देई. तो म्हणे, “तुम्ही येथे येऊन युध्दासाठी का उभे आहात? तुम्ही शौलचे सेवक आहात. मी पलिष्टी आहे. तुमच्यापैकी एकाला निवडा आणि माझ्याकडे पाठवा.
9 त्याने मला मारले तर आम्ही पलिष्टी तुमचे दास बनू. पण मी त्याला मारले तर मी जिंकलो आणि मग तुम्ही आमचे दास व्हाल. तुम्हाला आमची चाकरी करावी लागेल.”
10 तो असेही म्हणे, “आज मी इस्राएल सैन्याला तुच्छ लेखतो. तुम्ही एकाला तरी पाठवा आणि आम्हाला लढू द्या.”
11 गल्याथची हे आव्हान ऐकून शौल व त्याचे सैन्य यांच्यात घबराट निर्माण झाली.
12 यहूदातील बेथलहेम येथील इफ्राथ वंशामधल्या इशायचा दावीद हा मुलगा. इशायला एकंदर आठ मुलगे होते. शौलच्या कारकीर्दीत इशाय एक वयस्क गृहस्थ होता.
13 इशायचे तीन मोठे मलुगे शौलबरोबर युध्दाला गेले होते. पाहिला अलीयाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शम्मा.
14 दावीद सगळ्यात धाकटा होता. मोठी तीन मुलं शौलच्या सैन्यात असली तरी
15 दावीद अनेकदा बेथलहेमला आपल्या वडिलांची मेंढरं राखायला शौलकडून येत जात असे.
16 इकडे हा पलिष्टी गल्याथ रोज सकाळ संध्याकाळ इस्राएल सैन्यासमोर उभे राहून आव्हात देत होता. हा त्याचा क्रम चाळीस दिवस चालला होता.
17 एक दिवस इशाय दावीदला म्हणाला, “आपल्या भावांसाठी एवढं टोपलंभर शिजवलेले धान्य आणि हे दहा पावाच्या लाद्या छावणीवर घेऊन जा.
18 तसंच, तुझ्या भावांच्या छावणीवरच्या हजारी अधिकाऱ्याला या पनीरच्या दहा वड्या दे. भावांची खुशाली विचार. ते सुखरुप आहेत याची पावती म्हणून माझ्यासाठी काहीतरी खूण आण.
19 तुझे भाऊ शौल आणि इतर इस्राएली सैनिक यांच्या बरोबर एलाच्या खोऱ्यात आहेत. पलिष्ट्यांबरोबर त्यांची लढाई आहे.”
20 दुसऱ्या दिवशी दावीदाने आपली मेंढरे दुसऱ्या एका मेंढपाळाच्या हाती सोपवली आणि तो इशायच्या म्हणण्याप्रमाणे सर्व सामान घेऊन निघाला. दावीद आपली गाडी घेऊन तळाशी पोचला तेव्हा सर्व सैनिक रणगर्जना करत आपापल्या युध्दव्यूहातल्या जागांवर चालले होते.
21 इस्राएलचे सैन्य आणि पलिष्टी समोरासमोर उभे होते.
22 आपले सामान रसदीच्या राखणदारावर सोपवून दावीद सैन्याकडे धावला. भावांचा शोध घेऊन.
23 त्याने त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली.तेवढ्यात पलिष्ट्यांचा गथ येथील झूंजार सैनिक गल्याथ आपल्या आव्हात सैन्यातून बाहेर येऊन नेहमी प्रमाणे इस्राएलला आव्हान देऊ लागला. ते सर्व दावीदाने ऐकले.
24 गल्याथला पाहून इस्राएल सैनिकांनी भीतीने पळ काढला.
25 त्यातला एक इस्राएली म्हणाला, “बघितलंस त्याला? पाहून घे. हा गल्याथ पुन्हा पुन्हा येऊन इस्राएलची निर्भत्सना करतो. जो कोणी त्याला ठार करील त्याला शौल राजा भरपूर द्रव्य देईल. आपल्या मुलीचे त्याच्याशी लग्न लावून देईल. शिवाय इस्राएलमध्ये त्याचे घराणे स्वतंत्र करील.”
26 दावीदाने आपल्या आसपासच्या लोकांना विचारले, “काय म्हणाला तो? या पलिष्ट्याला ठार करुन इस्राएलवरचा कलंक पुसून टाकणाऱ्याला इनाम काय आहे? आणि हा गल्याथ तरी एवढा कोण? बोलूनचालून परका.एक पलिष्टी आमच्या जीवंत परमेश्वराच्या सैन्याविरुद्ध बोलतो म्हणजे काय?”
27 तेव्हा इस्राएली सैनिकांनी पुन्हा एकदा दावीदला इनाम काय ते सांगितले.
28 अलीयाबने दावीदला सैनिकांशी बोलत असताना पाहिले. त्याला दावीदचा राग आला. अलीयाबने दावीदला रागाने विचारले, “तू इथे का आलास? आणि वाळवंटात आपळी मेंढरे कोणापाशी सोडून आलास? मला माहीत आहे तू इथे का आलास ते! तुला जे करायला सांगितले ते करायला नको. नुसती लढाई बघत बसायला आलास.”
29 दावीद म्हणाला, “माझं काय चुकलं? मी फक्त बोलत होतो.”
30 दावीदाने मग इतरांनाही तेच विचारले. पूर्वीसारखीच उत्तरे त्याला मिळाली.
31 काहींनी दावीदला बोलताना ऐकले. त्यांनी त्याला शौल कडे नेले आणि दावीदचे शब्द त्याच्या कानावर घातले.
32 दावीद शौलला म्हणाला, “गल्याथच्या बोलण्याने लोकांनी खचून जाता कामा नये. मी तुमच्या सेवेला हजर आहे. त्या पलिष्ट्याचा मी सामना करतो.”
33 शौल त्याला म्हणाला, “तू त्याला युध्दात पुढे पडू शकणार नाहीस. तू साधा सैनिकसुध्दा नाहीस.गल्याथ तर लहानपणापासून लढाईवर जातो आहे.”
34 पण दावीद म्हणाला, “मी माझ्या वडिलांची शेरडे-मेंढरे राखतो. एकदा एक सिंह आणि अस्वल येऊन कळपातील कोकरु उचलून घेऊन गेले.
35 मी त्यांचा पाठलाग केला. त्यांच्यावर हल्ला करुन कोकराला त्याच्या तोंडातून सोडवले. त्या हिंस्त्र पशूंनी माझ्यावर झेप घेतली पण त्याच्या जबडयाखाली धरुन त्याला आपटून मी ठार केले.
36 सिंह आणि अस्वल दोघांना मी मारले. त्या परक्या गल्याथचीही मी तशीच गत करीन. आपल्या जीवंत परमेश्वराच्या सैन्याची टर उडवतो. त्याला मृत्यूला सामोरे जायलाच पाहिजे.
37 परमेश्वराने मला सिंह आणि अस्वल यांच्या तावडीतून सोडवले. तो मला या पलिष्ट्यांच्या हातूनही सोडवील.”तेव्हा शौल दावीदला म्हणाला, “ठीक तर! देव तुझे रक्षण करो.”
38 शौलने आपली स्वत:ची वस्त्रे दावीदला दिली. पितळी शिरस्त्राण आणि चिलखत त्याच्या अंगावर चढवले.
39 दावीदाने मग तलवार लावली आणि तो चालून पाहू लागला. पण त्याला हालचाल जमेना कारण त्याला अशा अवजड गोष्टींची सवय नव्हती.तेव्हा तो म्हणाला, “हे सर्व चढवून मला लढता येणार नाही. याची मला सवय नाही.” आणि त्याने ते सगळे उतरवले.
40 एल काठी तेवढी हातात घेऊन तो वाहत्या झऱ्यातले गुळगुळीत गोटे शोधायला बाहेर पडला. आपल्या धनगरी बटव्यात त्याने पाच गोटे घेतले आणि हातात गोफण घेऊन तो गल्याथाच्या समाचाराला निघाला.
41 गल्याथ हळू हळू पावले टाकत दावीद कडे येऊ लागला. गल्याथचा मदतनीस ढाल धरुन त्याच्या पुढे चालला होता.
42 दावीदकडे बघून गल्याथला हसू फुटले. हा देखणा, तांबूस वर्णाचा तरुण सैनिक नव्हे हे त्याच्या लक्षात आले.
43 तो दावीदला म्हणाला, “ही काठी कशाला? कुत्र्याला हाकलतात तसे मला हाकलणार आहेस की काय?” मग गल्याथने आपल्या दैवतांची नावे घेऊन दावीदला शिव्याशाप द्यायला सुरुवात केली.
44 दावीदला तो म्हणाला, “जवळ ये आज पक्ष्यांना आणि वन्य, प्राण्यांना तुझे मांस खाऊ घालतो.”
45 यावर दावीद त्या पलिष्टी गल्याथला म्हणाला, “तुझी तलवार, भाला-बरची यांच्या बळावर तू माझ्याकडे आला आहेस. पण मी मात्र इस्राएलच्या सैन्याच्या सर्व शक्तिमान परमेश्वराचे नाव घेऊन तुला सामोरा येत आहे. तू त्याला दूषणे दिली होतीस.
46 आज आमचा देव तुझा पराभव करील. मी तुला ठार करीन. तुझे मुंडके छाटीन आणि धड पशुपक्ष्यांना खायला टाकीन. सगळ्या पलिष्ट्यांची आम्ही अशीच अवस्था करुन टाकू. मग इस्राएलमधील परमेश्वराचे अस्तित्व सगळ्या जगाला कळेल.
47 लोकांचे रक्षण करायला परमेश्वराला तलवार, भाल्यांची गरज नसते हे इथे जमलेल्या सगळ्यांना कळून चुकेल. हे परमेश्वराचे युध्द आहे. तुम्हा पलिष्ट्यांच्या पराभव करायला देव आमचा पाठिराखा आहे.”
48 गल्याथ तेव्हा दावीदवर हल्ला करायला सरसावला. संथपणे तो जवळ जवळ सरकू लागला. तेव्हा दावीद चपळपणे त्याला सामोरा गेला.
49 थैलीतून एक दगड काढून गोफणीत घातला आणि गोफण फिरवली. त्याबरोबर गल्याथच्या दोन डोळ्यांच्या बरोबर मध्यभागी त्या दगडाचा नेम लागला. कपाळात दगड घुसला आणि गल्याथ जमिनीवर पालथा पडला.
50 अशा प्रकारे निळळ गोफण धोंड्याच्या साहाय्याने त्याने पलिष्ट्याला ठार केले. दावीदकडे तलवार नव्हती.
51 चपळाईने तो गल्याथच्या बाजूला जाऊन उभा राहिला. गल्याथचीच तलवार म्यानातून काढून त्याने त्याचे शिर धडावेगळे केले. पलिष्ट्याचा वध शेवटी असा झाला.आपला खंदा वीर गतप्राण झाल्याचे पाहताच इतर पलिष्टे पळून गेले.
52 तेव्हा यहूदा आणि इस्राएलच्या सैनिकांनी गर्जना करत त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. गथच्या वेशीपर्यंत तसेच एक्रोनाच्या दिंडीदरवाजपर्यंत ते पाठलाग करत गेले. अनेक पलिष्ट्यांना त्यांनी ठार केले. शारईमच्या वाटेवर थेट गथ आणि एक्रोनपर्यंत त्यांचे मृतदेह विखुरलेले होते.
53 या पाठलागानंतर इस्राएल लोक पलिष्ट्यांच्या छावणीवर आले आणि छावणी लुटली.
54 दावीदाने या पलिष्ट्याचे शिर यरुशलेमला आणले आणि त्याची शस्त्रास्त्रे आपल्या तंबूत ठेवली.
55 शौलने दावीदला गल्याथशी लढायला जाताना पाहिले आणि आबनेर या आपल्या सेनापतीला विचारले, “हा तरुण कोणाचा मुलगा?”आबनेर म्हणाला, “मला काहीच कल्यना नाही, धनी.”
56 शौल राजा म्हणाला, “याच्या वडीलांचा ठावाठिकाणा शोधून काढा.”
57 गल्याथला ठार करुन परत आल्यावर दावीदला आबनेर ने शौलकडे नेले. गल्याथचे मुंडके अजूनही दावीदाच्या हातातच होते.
58 शौलने त्याला विचारले, “तरुण मुला तुझे वडील कोण आहेत? दाविद म्हणाला, “बेथलहेम येथील आपला दास इशाय यांचा मी मुलगा.”
धडा 18

1 शौलशी चाललेले दावीदचे बोलणे झाल्यावर योनाथान मनाने दावीदाच्या निकट आला. दावीदवर तो स्वत:इतकेच प्रेम करु लागला.
2 त्या दिवसापासून शौलने दावीदला आपल्याजवळच ठेवून घेतले. त्याला तो आपल्या वडीलांकडे परत जाऊ देईना.
3 योनाथानचे दावीदवर अपार प्रेम होते. त्याने दावीदशी एक करार केला.
4 योनाथानने आपल्या अंगावरचा अंगरखा काढून दावीदला दिला. आपला गणवेष इतकेच नव्हे तर धनुष्य, तलवार कमरबंद हे ही दिले.
5 शौलने मग दावीदला अनेक लढायांवर पाठवले. सगळीकडे त्याने विजय मिळवला. तेव्हा शौलने दावीदला सेनापतिपद दिले. याने शौलच्या अधिकाऱ्यांसह सर्वजण खूश झाले.
6 दावीद पलिष्ट्यांचा सामना करायला लढाईवर जाई तेव्हा मुक्कामावर परतताना इस्राएलमधल्या सर्व गावातल्या स्त्रिया त्याच्या स्वागताला समोर येत. त्या आनंदाने गात नाचत. डफ, वीणा वाजवत. शौलच्या समोरच हे चाले.
7 त्या म्हणत,“शौलने हजार शत्रूंना ठार केले तर, दावीदाने लाखो मारले.”
8 या गीतामुळे शौलची मर्जी फिरली आणि त्याला संताप आला. “दावीद लाखो शत्रूंना ठार करतो आणि मी फक्त हजारोंना मारतो असे या म्हणतात काय”
9 तेव्हा पासून तो दावीदकडे असूयेने आणि ईर्ष्येने पाहू लागला.
10 दुसऱ्याच दिवशी शौल मध्ये दुष्ट आत्म्याचा संचार झाला. शौल बेफाम होऊन बडबड करु लागला. दावीद तेव्हा नित्याप्रमाणे वीणा वाजवत होता.
11 शौलच्या हातात तेव्हा भाला होता. शौलला वाटले, “याला आपण भिंतीशी खिळवावे.” शौलने मग दोनदा भाला नेम धरुन मारला पण दोन्ही वेळा दावीद निसटला.
12 दावीदला परमेश्वराची साथ होती. आणि शौलचा त्याने त्याग केला होता. तेव्हा दावीदबद्दल शौलच्या मनात धास्ती होती.
13 शौलने दावीदला दूर पाठवले. हजार सैनिकांचा अधिकारी म्हणून त्याला नेमले. दावीदाने या सैन्याचे लढाईत नेतृत्व केले.
14 परमेश्वर दावीदाच्या पाठीशी होता. तेव्हा दावीदला सर्व ठिकाणी यश मिळाले.
15 जिकडे तिकडे त्याची सरशी होताना पाहून शौलाला दावीदची आणखीच धास्ती वाटू लागली.
16 पण इस्राएल आणि यहूदामधील सर्व लोकांचे मात्र दावीदवर प्रेम होते. युध्दात त्यांच्या पुढे राहून त्यांच्यासाठी त्याने लढाया केल्यामुळे त्यांचा दावीदवर जीव होता.
17 शौल मात्र दावीदाच्या जिवावर उठला होता. त्याला पेचात पकडण्यासाठी शौलने एक योजना आखली. तो दावीदला म्हणाला, “ही मेरब माझी मोठी मुलगी. तू हवे तर हिच्यशी लग्न्न कर. मग तू आणखीच सामर्थ्यवान होसील. तू माझ्या मुलासारखाच होशील. मग तू परमेश्वराच्या वतीने लढाया कर.” ही एक युक्ती होती. प्रत्यक्षात शौलचा विचार वेगळाच होता. ‘आता मला त्याचा जीव घ्यायला नको. परस्पर पलिष्टीच त्याचा काटा काढतील’ असा त्याचा बेत होता.
18 पण दावीद म्हणाला, “माझे घराणे तुमच्या तोलामोलाचे नाही. मीही काही मोठा माणूस नव्हे. तेव्ही मी राजकन्येशी कसा विवाह करु?”
19 त्यामुळे जेव्हा मेरबचा विवाह दावीदशी व्हायचा तो महोलाच्या अद्रीएलशी झाला.
20 शौलची दुसरी मलुगी मीखल हिचे दावीदवर प्रेम होते. लोकांनी ही गोष्ट शौलच्या कानावर घातली. तेव्हा त्याला फारच आनंद झाला.
21 त्याने विचार केला. “आता मीखलमुळे माझा बेत सफल होईल. तिचे लग्न मी दावीदशी करुन देतो. मग पलिष्टी त्याचा वध करतील.” आणि दुसऱ्यांदा शौलने दावीदला लग्न्नाची अनुमती दिली.
22 शौलने आपल्या अधिकाऱ्यांना आज्ञा दिल्या. त्यांना तो म्हणाला, “त्याला विश्वासात घेऊन हळूच सांगा, ‘राजाला तू आवडतोस. तू त्याच्या अधिकाऱ्यांच्या मर्जीतला आहेस. तेव्हा राजाच्या मुलीशी तू लग्न्न कर.”
23 शौलच्या अधिकाऱ्यांनी दावीदला हे सर्व सांगितले. पण तो म्हणाला, “राजाचा जावई होणं सोपं आहे अस तुम्हाला वाटतं का? मी सामान्य, निर्धन माणूस, तिच्यासाठी खर्च कुठून करणार?”
24 दावीदचे मनोगत शौलच्या अधिकाऱ्यांनी शौलला सांगितले.
25 शौल त्यांना म्हणाला, “त्याला सांगा, राजाला तुझ्याकडून हुंडा नको आहे. फक्त शत्रूंचा सूड उगवावा म्हणून त्याला पलिष्ट्यांच्या शंभर अग्रत्वचा तेवढ्या हव्या आहेत.” हे अर्थात कपट होते. अशाने पलिष्टी दावीदचा काटा काढतील असे त्याला वाटले.
26 अधिकाऱ्यांनी हे सर्व दावीदला सांगितले. दावीदला राजाचा जावई होणे पसंत पडले. तेव्हा त्याने भराभर पावले उचलली.
27 तो काही लोकांना बरोबर घेऊन पलिष्ट्यांवर चालून गेला. त्याने दोनशेपलिष्ट्यांना मारले. त्यांच्या अग्रत्वचा काढून दावीदाने त्या शौलला दिल्या. कारण राजाचा जावई व्हायचे त्याच्या मनात होते.
28 शौलने दावीदशी मीखलचे लग्न्न करुन दिले. दावीदला परमेश्वराची साथ आहे आणि आपल्या मुलीचे, मीखलचे, त्याच्यावर प्रेम आहे हे शौलच्या लक्षात आले.
29 तेव्हा तो मनातून आणखी धास्तावला. तो दावीदला सतत पाण्यात पाहात होता.
30 पलिष्ट्यांचे सरदार सतत इस्राएलींवर चालून जात. पण दावीद दरवेळी त्यांना पराभूत करी. शौलचा तो एक यशस्वी अधिकारी होता. त्यामुळे दावीदची ख्याती पसरली.
धडा 19

1 शौलने आपला मुलगा योनाथान आणि इतर अधिकारी यांना दावीदचा वध करायला सांगितले. पण योनाथानला दावीद अतिशय आवडत असे.
2 त्याने दावीदला सावध केले. त्याला सांगितले, “जपून राहा. शौल तुला मारायची संधी शोधत आहे. सकाळी तू शेतात जाऊन लप. मी ही वडीलांना घेऊन शेतात येतो. तू लपला असशील तेथे येऊन थांबतो. तुझ्याबद्दल मग मी वडीलांशी बोलेन. त्यांच्याकडून काही कळले की तुला सांगीन.”
3
4 योनाथान आपल्या वडीलांशी बोलला. दावीदबद्दल त्याने चांगले उद्गार आणले. तो म्हणाला, “तुम्ही राजे आहात. दावीद तुमचा सेवक. त्याने तुमचे काहीच वाकडे केलेले नाही. तेव्हा तुम्हीही त्याला इजा पोचू देऊ नका. तो तुमच्याशी चांगलाच वागत आलेला आहे.
5 गल्याथ पलिष्ट्याचा वध करताना त्याने आपले प्राण पणाला लावले. परमेश्वराने इस्राएलला विजय मिळवून दिला. तुम्हालाही ते पाहून आनंद झाला. मग तुम्ही त्याला का दुखावता? तो निरपराध आहे. त्याला कशासाठी मारायचे?”
6 शौलने योनाथानचे म्हणणे ऐकले आणि त्याला वचन दिले. तो म्हणाला, “परमेश्वर असेपर्यंत दावीदाच्या जिवाला धोका नाही.”
7 तेव्हा योनाथानने दावीदला बोलवून सर्व काही सांगितले. मग त्याला तो शौलकडे घेऊन गेला. पूर्वीप्रमाणेच तो त्याच्याकडे राहू लागला.
8 पुन्हा युध्द सुरु झाले आणि दावीद पलिष्ट्यांशी लढायला गेला. पलिष्ट्यांचा त्याने पराभव केला. त्यांनी पळ काढला.
9 पण शौलवर परमेश्वराच्या दुष्ट आत्म्याचा संचार झाला. शौल आपल्या घरात बसला होता. त्याच्या हातात भाला होता. दावीद वीणा वाजवत होता.
10 शौलने हातातील भाला फेकून दावीदला भिंतीत चिणायचा प्रयत्न केला. पण दावीद उडी मारुन निसटला. भाल्याचा नेम चुकून तो भिंतीत गेला. त्या रात्री दावीद पळून गेला.
11 शौलाने काही जणांना दावीदाच्या घरी पाठवले. त्यांनी त्याच्या घरावर पहारा दिला. रात्रभर ते बसून राहिले. सकाळी त्याला मारावे असा त्यांचा बेत होता. पण दावीदाच्या बायकोने, मीखलने. दावीदाला सावध केले. तिने त्याला रातोरात पळून जाऊन जीव वाचवायला सांगितले, नाही तर उद्या तुझा खून होईल असे ती त्याला म्हणाली.
12 तिने त्याला खिडकीतून पळून जायला मदत केली. दावीद निसटला आणि पळाला.
13 मीखलने घरातील देवतेची मूर्ती घेतली आणि पलंगावर ठेवून त्यावर पांघरुण घातले. बकरीचे केस डोक्याच्या ठिकाणी लावले.
14 दावीदला पकडून आणण्यासाठी शौलने जासूद पाठवले. पण मीखलने दावीद आजारी असल्याचे सांगितले.
15 जासूद परतले. त्यांनी राजाला वर्तमान सांगितले. राजाने त्यांना दावीदला पाहून यायला फर्मावले. शौल म्हणाला, “त्याला माझ्यापुढे हजर करा. त्याला शक्य नसेल तर पलंगावर झोपवूनच आणा. मग मीच त्याला मारतो.”
16 जासूद परत गेले, त्याच्या शोधार्थ आत शिरतात तर त्यांना पलंगावर पुतळा आढळला. बकरीचे केस लावल्याचेही त्यांच्या लक्षात आले.
17 शौल मीखलला म्हणाला, “तू मला असे का फसवलेस? तू माझ्या शत्रूला दाविदला पळून जायला मदत केलीस.”मीखल म्हणाली, “मी त्याला पळून जायला मदत केली नाही तर तो माझा जीव घेईल असे म्हणाला.”
18 दावीद जो पळाला तो रामा येथे शमुवेलकडे गेला. शमुवेलला त्याने शौलने जे जे केले ते सर्व सांगितले. मग शमुवेल आणि दावीद संदेष्ट्यांच्या राहण्याच्या ठिकाणी गेले. दावीद तेथे राहिला.
19 दावीद रामा नजीकच्या छावणीवर असल्याचे शौलला कळले.
20 त्याने दावीदाच्या अटकेसाठी माणसे पाठवली. पण ती माणसे तिथे पोहोंचली तेव्हा संदेष्टे संदेश देत होते. शमुवेल त्यांचे नेतृत्व करत उभा होता. शौलच्या निरोप्यांवर ही परमेश्वराच्या आत्म्याचा संचार होवून ते ही संदेश देऊ लागले.
21 शौलच्या हे कानावर आल्यावर त्याने दुसरे दूत पाठवले. त्यांचीही तीच गत झाली. तेव्हा शौलने तिसऱ्यांदा जासूद पाठवले. तेही तसेच करु लागले.
22 शेवटी शौल स्वत:च रामा येथे आला. सेखू येथील खळड्या जवळच्या मोठ्या विहिरीशी तो आला तेव्हा त्याने शमुवेल आणि दावीदाचा ठावठिकाणा विचारला.लोक म्हणाले, “ते रामाजवळच्या तळावर आहेत.”
23 तेव्हा शौल तेथे पोचला. परमेश्वराच्या आत्म्याचा संचार शौलमध्येही होऊन तोही संदेश देऊ लागला. रामा येथे पोचेपर्यंत त्याचे तेच चालले होते.
24 नंतर त्याने अंगावरची वस्त्रे उतरवली. शमुवेलच्या समोर तो संदेश देऊ लागला. दिवसभर आणि रात्रभर तो विवस्त्र अवस्थेत होता म्हणून लोक म्हणू लागले, “शौलही संदेष्टयांपैकी आहे की काय?”
धडा 20

1 दावीद रामा येथील शिबिरापासून दूर पळून गेला. योनाथानकडे येऊन तो म्हणाला, “माझं काय चुकल? माझा अपराध तरी काय? तुझे वडील का माझ्या जिवावर उठले आहेत?”
2 योनाथान म्हणाला, “हे काय भलतेच? ते कशाला तुझ्या जिवावर उठतील? मला सांगितल्या शिवाय ते कधीच कुठली गोष्ट करत नाहीत. कोणतीही महत्वाची किंवा क्षुल्लक गोष्ट असो, ते ती मला सांगतातच. मग तुझा वध करायची बाब ते कशी माझ्यापासून लपवून ठेवतील? तेव्हा हे काही खरं नव्हे!”
3 तेव्हा दावीद म्हणाला, “आपण मित्र आहोत ही गोष्ट तुझे वडील चांगली जाणून आहेत. ते स्वत:शी म्हणाले, “योनाथानला हे कळता कामा नये. त्याला कळले तर तो हे दावीदला सांगेल.” पण परमेश्वराची आणि तुझ्या जीविताची शपथ घेवून सांगतो, मृत्यू माझ्याभोवती घोटाळतो आहे.”
4 योनाथान मग दावीदला म्हणाला, “तू काय म्हणशील ते करायला मी तयार आहे.
5 मग दावीद म्हणाला, “उद्या अमावस्ये निमित्त मेजवानी आहे. तेव्हा राजाच्या पंक्तीला मी असायला हवे. पण संध्याकाळपर्यंत मी शेतात लपून बसतो
6 मी नसल्याचे तुझ्या वडीलांच्या लक्षात आले तर त्यांना सांग, ‘दावीदला बेथलहेमला तातडीने जायचे होते. त्याच्या सगळ्या कुटुंबाचा मासिक यज्ञ तेथे आहे. त्यात हजर राहायला जाण्यासाठी त्याने माझी परवानगी मागितली.’
7 तुझ्या वडीलांनी हे सहजगत्या मान्य केले तर मला काही धोका नाही. पण ते संतापले तर मात्र माझ्या जिवाला धोका आहे हे तू ओळख.
8 योनाथान, माझ्यावर कृपा कर. मी तुझा दास आहे. परमेश्वराच्या साक्षीने तू माझ्याशी करार केला आहेस. मी अपराधी आढळल्यास खुशाल तू माझा वध कर. पण मला तुझ्या वडीलांकडे नेऊ नको.”
9 यावर योनाथान म्हणाला, “अस घडणार नाही. ते तुझ्या वाईटावर आहेत असं माझ्या लक्षात आलं तर मी तूला तसं सांगीन.”
10 दावीद म्हणाला, “तुझ्याशी ते कठोरपणे वागले तर मला कोण खबर देईल?”
11 तेव्हा योनाथानने सुचवले, “चल आपण शेताकडे जाऊ.” आणि ते दोघे ही शेतात गेले.
12 तिथे योनाथान दावीदला म्हणाला, “देव जो, इस्राएलचा परमेश्वर या समोर मी तुला वचन देतो. माझ्या वडीलांच्या तुझ्याबद्दल काय भल्याबुऱ्या भावना आहेत ते मी जाणून घेईन. मग तीन दिवसात तुला तसं इथे याच शेतात कळवीन.
13 त्यांच्याकडून तुला काही घातपात होणार असेल तर तुला त्याची कल्पना देईन. तुला सुखरुप निसटू देईन. माझ्याहातून यात हयगय झाल्यास परमेश्वर मला त्याची शिक्षा देवो. माझ्या वडीलांना परमेश्वराची साथ आहे तशीच तुला मिळो.
14 मी हयात असेपर्यंत तुझा माझ्यावर लोभ असू दे. मी गेल्यावरही
15 माझ्या कुटुंबावरील तुझ्या लोभात खंड न पडो. परमेश्वर तुझ्या वैऱ्यांचा पृथ्वीतलावरुन नि:पात करील.
16 मग त्या वेळी योनाथानच्या कुटुंबाला दावीदपासून वेगळे व्हावे लागले तरी बेहत्तर. देव दावीदाच्या शत्रूंना शासन करो.” मग योनाथानने दावीदाच्या घराण्याशी करार केला.
17 योनाथानने मग दावीदला परस्परांवरील प्रेमाच्या आणाभाका परत घ्यायला लावल्या. दावीदावर त्याचे स्वत: इतकेच प्रेम होते म्हणून त्या प्रेमापोटी त्याने असे केले.
18 योनाथान दावीदला म्हणाला, “उद्या अमावास्येची मेजवानी आहे. पंक्तीतील तुझे आसन रिकामे असेल त्यामुळे तुझी अनुपस्थिती माझ्या वडीलांच्या लक्षात येईल.
19 या सगळ्यांला सुरुवात झाली तेव्हा तू जिथे लपला होतास त्याच ठिकाणी तू तिसऱ्या दिवशी थांब. त्या टेकडी जवळ माझी वाट पाहा.
20 तिसऱ्या दिवशी मी तिथे येईन आणि नेमबजी चालली आहे असे भासवीन. काही बाण मी मारीन.
21 आणि हाताखालच्या मुलाला बाण शोधून आणायला पाठवीन. सर्वकाही ठीक असेल तर त्या मुलाला मी म्हणेन, ‘तू खूप लांब गेलास बाण माझ्या जवळ आहेत. तर ये व तो घे.’ जर मी असा म्हणालो तर तू खुशाल बाहेर ये मग, परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुझ्या सुरक्षिततेची हमी माझ्यावर, कोणताही धोका तेव्हा नसेल.
22 पण काही धोका असल्यास मी म्हणेन, ‘बाण आणखी पुढे आहेत. जा, जाऊन आण.’ तसे मी म्हटले तर मात्र तू निघून जा. प्रत्यक्ष परमेश्वरच तुला लांब पाठवत आहे असे समज.
23 आपल्या दोघांमधला हा करार लक्षात ठेव. परमेश्वर याला साक्ष आहे.”
24 त्यानंतर दावीद शेतात लपून बसला.अमावास्येच्या मेजवानीची वेळ झाली आणि राजा भोजनासाठी बसला.
25 भिंती जवळच्या आपल्या नेहमीच्या आसनावर राजा बसला. त्याच्या समोर योनाथान होता. आबनेर शौलजवळ होता. दावीदाचे आसन मात्र रिकामे होते.
26 त्यादिवशी शौल काहीच बोलला नाही. त्याला वाटले, “काही कारणाने आज तो शुचिर्भूत नसेल.”
27 दुसऱ्या दिवशी पुन्हा दावीदाचे आसन रिकामेच राहिले. तेव्हा मात्र शौल योनाथानला म्हणाला, “इशायचा मुलगा या प्रंसगी दिसत नाही. कालही नव्हता, आजही नाही. असे का?”
28 योनाथानने सांगितले, “त्याने माझ्याजवळ बेथलहेमला जायची परवानगी मागितली.”
29 तो म्हणाला, “मला जायला हवे. बेथलहेमला आमच्या कुटुंबात यज्ञ आहे. माझ्या भावाने मला यायची आज्ञा केली आहे. आपल्या मैत्रीला स्मरुन तू मला भावांना भेटायला जायची परवानगी दे.” दावीद आज राजाच्या पंक्तीला नाही याचे हे कारण आहे.”
30 शौल योनाथानवर संतापला. तो म्हणाला, “अरे दासीपुत्रा, तू माझी अवज्ञा करतोस? आणि तू तिच्यासारखाच निपजलास. तू दावीदाच्या बाजूचा आहेस हे मला माहीत आहे. तू तुला आणि तुझ्या आईला लाज आणली आहेस.
31 हा इशायचा मुलगा जिवंत असेपर्यंत तू राज्यावर येणार नाहीस. आत्ताच्या आत्ता दावीदला आणून हजर कर. त्याला मेलेच पाहिजे.”
32 योनाथान आपल्या वडीलांना म्हणाला, “त्याने काय केले? का म्हणून त्याने मेले पाहिजे?”
33 यावर शौलने योनाथानवर आपला भाला फेकला आणि त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. तेव्हा, दावीदला मारायचा आपल्या वडीलांनी निश्चय केला आहे हे योनाथानच्या लक्षात आले.
34 संतापाने तो पंक्तीतून चालता झाला. त्या रागात त्याने अन्नाला स्पर्शासुध्दा केला नाही. शौलने आपल्याला शरमिंदे केले आणि दावीदला मारायचे ठरवले म्हणून त्याला फार राग आला.
35 दुसऱ्या दिवशी सकाळी योनाथान शेतावर आला. ठरल्याप्रमाणे दावीदला भेटायला तो आला. आपल्याबरोबर त्याने मदतनीस मुलालापण आणले.
36 त्याला तो म्हणाला, “धावत पुढे हो. मी बाण मारतो तो आण.” मुलगा धावत जायला लागल्यावर योनाथानने त्याच्या डोक्यावरुन बाण मारले.
37 बाण पडले त्या ठिकाणी तो मुलगा पोचल्यावर योनाथान म्हणाला, “बाण आणखी पुढेच आहेत.”
38 ग तो म्हणाला, “जा धावत जा, लौकर आणि नुसता उभा राहू नको.” मुलाने मग बाण उचलून गोळा करुन आणले.
39 काय चालले आहे याची त्या मुलाला अजिबात कल्पना नव्हती. फक्त योनाथान आणि दावीदला ते कळत होते.
40 योनाथानने धनुष्यबाण त्या मुलाकडे दिले आणि त्याला तो म्हणाला, “आता तू गावात परत जा.”
41 मुलगा दिसेनासा झाल्यावर दावीद डोंगराच्या पलीकडे लपला होता तिथून बाहेर आला. त्याने योनाथानला तीनदा वाकून अभिवादन केले. मग त्यांनी परस्परांचे मुके घेतले. दोघेही रडू लागले. पण दावीदाचा आक्रोश योनाथानपेक्षा जास्त होता.
42 योनाथान दावीदला म्हणाला, “शांत चित्ताने जा. परमेश्वराची शपथ घेऊन आपण मैत्रीच्या आणाशपथा घेतल्या आहेत. आपण आणि आपले वंशज यांना परमेश्वर, चिरंतन साक्षी आहे.”
धडा 21

1 मग दावीद निघून गेला आणि योनाथान आपल्या गावी परत आला.
2 दावीद नोब नामक गावी अहीमलेख या याजकाला भेटायला गेला.अहीमलेख त्याला भेटायला चार पावले पुढे चालून गेला. अहीमलेखला भीतीने कापरे भरले होते. दावीदला त्याने विचारले, “तू एकटाच का? तुझ्याबरोबर कोणीच नाही हे कसे?”
3 दावीदाने सांगितले, “राजाच्या खास आज्ञेवरुन मी आलो आहे. त्यानुसार हे काम गुप्त ठेवायचे आहे. त्याबद्दल कोणालाही काही काळू द्यायचे नाही. माझी माणसे विशिष्ट संकेतस्थळी मला भेटणार आहेत.
4 आता आधी तुझ्या जवळ खायला द्यायला काय आहे ते सांग. पाच भाकरी किंवा जे असेल ते दे.”
5 तेव्हा याजक म्हणाला, “साधी भाकर तर आत्ता नाही पण पवित्र भाकर आहे. तुझ्या अधिकाऱ्यांचा बायकांशी संबंध आला नसेल तर त्यांना ती चालेल.”
6 दावीद म्हणाला, “आमचा बायकांशी संपर्क आलेला नाही. युध्दावरच काय पण अगदी सामान्य मोहिमेवर निघाको तरी आमची माणसे शुचिर्भूत असतात. मग या खास कामाबद्दल तर बोलायलाच नको.”
7 पवित्र भाकरी खेरीज दुसरी भाकर नव्हतीच. तेव्हा याजकाने दावीदला तीच दिली परमेश्वरापुढच्या पवित्र मेजावर याजक रोजच्या रोज ताजी भाकर ठेवत, त्यातलीही होती.
8 दवेग नावाचा शौलचा एक अधिकारी त्या दिवशी तेथे होता. तो अदोमी असून शौलच्या मेंढपाळांचा प्रमुख होता. परमेश्वरासमोर त्याला थांबवून ठेवलेलेहोते.
9 दावीदाने अहीमलेखला विचारले, “इथे भाला किंवा तलवार आहे का? राजाचे काम फार निकडीचे असल्यामुळे मला तातडीने निघावे लागले. त्यामुळे मी माझे शस्त्र बरोबर आणू शकलो नाही.”
10 पुरोहित म्हणाला, “गल्याथ या पलिष्ट्याला तू एलाच्या खोऱ्यात मारलेस तेव्हा त्याची तलवार काढून घेतलीस. तीच काय ती इथे आहे. एफोदच्या मागे एका कापडात ती गुंडाळून ठेवलेली आहे. हवीतर ती घे.”दावीद म्हणाला, “तीच दे. तिच्यासारखी दुसरी तलवार नाही.”
11 शौलाकडून दावीद पळाला, तो गथचा राजा आखीश याच्याकडे आला.
12 आखीशच्या अधिकाऱ्याला हे आवडले नाही. त्याचे अधिकारी म्हणाले, “हा दावीद, इस्राएल भूमीचा राजा. इस्राएल याचे गुणगान गातात. नाचत गात ते याच्याविषयी म्हणतात, “शौलने हजार शत्रूंना मारले तर दावीदाने लाखोंचा वध केला.”
13 दावीदाने त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले. गथचा राजा आखीश याला सामोरे जायची त्याला भीती वाटली.
14 म्हणून राजा व त्याचा दरबार यांच्यापुढे त्याने वेड्याचे सोंग वठवले. प्रवेशद्वारावर थुंकला, दाढीवर लाळ ओघळू दिली.
15 आखीश हे पाहून आपल्या अधिकाऱ्यांना म्हणाला, “पाहा, हा माणूस वेडा आहे. याला इथे कशाला येऊ दिलेत? [16] वेड्यांची इथे कमतरता आहे की काय? माझ्यासमोर याचे वेडेचार चालायचे नाहीत. त्याला पुन्हा इथे येऊ देऊ नका.”
धडा 22

1 दावीद मग गथहून निघाला तो अदुल्लाम गुहेत पोचला. दावीदाच्या भावांनी आणि नातलगांनी हे ऐकले तेव्हा ते त्याला तिथे भेटायला गेले.
2 वेगवेगळ्या प्रकारे अडचणीत सापडलेले, कर्जबाजारी झालेले. आयुष्याला त्रासलेले असे बरेच जण दावीदकडे आले. त्याच्या भोवती अशी चारशे माणसे जमली. त्यांचा तो नेता होता.
3 अदुल्लामहून तो मवाबातील मिस्पा येथे गेला. मवाबच्या राजाला तो म्हणाला, “परमेश्वराने माझे काय करायचे ठरवले हे मला कळेपर्यंत कृपया माझ्या आईवडिलांना तुमच्या आश्रयाने राहू द्या.”
4 एवढे बोलून आपल्या आईवडिलांना त्याने तिथे सोडले आणि स्वत: किल्ल्याकडे परतला.
5 पण गाद हा संदेष्टा दावीदला म्हणाला, “इथे राहू नको. यहूदा प्रांतात जा.” तेव्हा दावीद निघाला आणि हरेथ नामक वनात आला.
6 दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक यांचा इतरांना पत्ता लागला आहे हे शौलला कळले. तो गिबा येथे एका टेकडीवर झाडाखाली बसला होता. हातात भाला होता. सर्व अधिकारी त्याच्या भोवती उभे होते.
7 शौल त्यांना उद्देशून म्हणाला, “बन्यामीन लोकहो, ऐका हा इशायपुत्र दावीद तुम्हाला शेत आणि द्राक्षमळे देईल असे तुम्हाला वाटते का? तो तुम्हाला बढत्या देऊन शंभरांवर, हजारांवर अधिकारी नेमील असे तुम्ही समजता का?
8 माझ्याविरुद्ध तुम्ही कटकारस्थाने रचत आहात. योनाथान बद्दल तुमच्या पैकी एकानेही मला विश्वासात घेतले नाही. या इशायच्या मुलाबरोबर त्याचा करार झालेला आहे हे कोणी मला सांगितले नाही. तुमच्या पैकी कोणी माझी काळजी घेत नाही. योनाथानने दावीदला प्रोत्साहन दिले हे तुमच्यापैकी कोणीही मला कळू दिले नाही. लपून राहून माझ्यावर हल्ला करायला योनाथानने दावीदला, माझ्या सेवकाला सांगितले. दावीदाचे सध्या तेच चालले आहे.”
9 अदोमी दवेग तेव्हा तिथेच होता. तो म्हणाला, “मी दावीदला नोब येथे पाहिले. अहिटूबचा मुलगा अहीमलेख याला भेटायला तो आला होता.
10 अहीमलेखने दावीदासाठी परमेश्वरापुढे प्रार्थना केली, दावीदला खायला दिले. शिवाय त्याला गल्याथ या पलिष्ट्याची तलवार सुध्दा दिली.”
11 हे ऐकून शौलने या याजकाला आपल्यापुढे हजर करायची आज्ञा दिली. त्याच्या सर्व नातेवाईकांनाही आणायला सांगितले. अहीमलेखचे नातेवाईक नोब येथे पुरोहित होते. ते सर्व जण राजासमोर आले.
12 शौल अहीमलेखाला म्हणाला, “अहीटूबच्या मुला, आता ऐक.”अहीमलेख म्हणाला, “आज्ञा. सरकार.”
13 शौल अहीमलेखला म्हणाला, “तू आणि इशायचा मुलगा दावीद यांनी माझ्याविरुध्द कट का केलात? दावीदला तू भाकर दिलीस व तलवारही पुरवलीस. त्याच्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना केलीस आणि आता दावीद हल्ला करायला सज्ज आहे.”
14 अहीमलेख म्हणाला, “दावीद अतिशय भरवशाचा आहे. तुमच्या अधिकाऱ्यांमध्ये त्याच्याइतका विश्वासू कोणी नाही. तो तुमचा जावईही आहे. तुमच्या अंगरक्षकांचा तो प्रमुख आहे. तुमचे कुटुंबीय त्याला मान देतात.
15 त्याच्यासाठी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करायची ही पहिलीच वेळ नव्हे. मला किंवा माझ्या नातेवाईकांना बोल लावू नका. आम्ही तुमचे सेवक आहोत. काय चालले आहे याची आम्हाला अजिबात कल्पना नाही.”
16 पण राजा त्याला म्हणाला, “तू आणि तुझे नातेवाईक यांना मृत्युदंड दिला पाहिजे.”
17 राजाने मग आपल्या जवळच्या रक्षकांना हुकूम केला, “परमेश्वराच्या याजकांना ठार करा. त्यांनी दावीदाची बाजू घेतली म्हणून त्यांना ही सजा आहे. दावीदाच्या पलायनाची त्यांना खबर असून त्यांनी मला तसे कळवले नाही.”पण राजाच्या सेवकांनी परमेश्वराच्या याजकांवर शस्त्र उगारायला नकार दिला.
18 तेव्हा शौल राजाने दवेगला आज्ञा केली, “याजकांना तू ठार कर.” तेव्हा अदोमी दवेगाने ती आज्ञा अंमलात आणली. दवेगने त्यादिवशी पंच्याऐंशी याजकांना जिवे मारले.
19 नोब ही याजकांची नगरी होती. दवेगने तेथील सर्वांना ठार केले. पुरुष बायका, मुले, तान्ही बाळे, इतकेच नव्हे तर गायीगुरे, गाढवे, मेंढरे सुद्धा त्याने तलवारीने कापून काढली.
20 पण त्यातून अब्याथार हा अहीमलेखचा मुलगा निसटला. अहीमलेख हा अहीटूबचा मुलगा. अब्याथार पळून जाऊन दावीदाला मिळाला.
21 परमेश्वराच्या याजकांना शौलने ठार केल्याचे त्याने दावीदला सांगितले.
22 तेव्हा दावीद अब्याथारला म्हणाला, “मी नोब येथे त्यादिवशी त्या अदोमी दवेगला पाहिले होते. तो शौलला ही खबर देईल हेही मला माहीत होते. तुझ्या वडीलांच्या कुटुंबाच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे.
23 शौल तुझ्या जिवावर उठला आहे तसा माझ्याही जीवावर उठला आहे. माझ्याजवळ राहा. भिऊ नको. माझ्याजवळ तू सुरक्षित राहशील.”
धडा 23

1 लोकांनी दावीदला सांगितले, पलिष्टी कईला विरुद्ध लढत आहेत. तेथील खळ्यावरचे धान्य ते लुटून नेत आहेत.
2 दावीदाने परमेश्वराला विचारले, “पलिष्ट्यांवर मी हल्ला करु का?”परमेश्वराने सांगितले, “जरुर पलिष्ट्यांवर हल्ला कर आणि कईलाचे रक्षण कर.”
3 पण दावीद बरोबरचे लोक त्याला म्हणाले, “जरी आपण यहूदात आहोत. तरी किती भीतीच्या वातावरणात आपण इथे आहोत. मग प्रत्यक्ष पालिष्टी सैन्याजवळ गेल्यावर आपले काय होईल?”
4 दावीदाने पुन्हा परमेश्वराला विचारले, परमेश्वराने पुन्हा सांगितले, “कईला येथे जा. पलिष्ट्यांचा पाडाव करायला मी तुम्हाला मदत करतो.”
5 तेव्हा दावीद आपल्या लोकांबरोबर कईला येथे गेला. त्यांनी पलिष्ट्यांशी युध्द केले. पलिष्ट्यांचा पराभव करुन त्यांची गुरे पळवली. अशाप्रकारे कईलाच्या लोकांचे त्यांनी रक्षण केले.
6 (अब्याथार दावीदाकडे पळून आला तेव्हा त्याने आपल्याबरोबर एफोद आणाला होता.)
7 दावीद कईला येथे असल्याचे लोकांनी शौलला सांगिते. शौल म्हणाला, “परमेश्वरानेच दावीदला माझ्या हाती दिले आहे. दावीद आता चांगला अडकला आहे. दरवाजे आणि अडसर असलेल्या नगरात तो आता कोंडला गेला आहे.”
8 शौलने मग युध्दासाठी आपल्या सैन्याला पुकारले. दावीदला आणि त्याच्या लोकांना घेरण्यासाठी ते कईलाला जायला निघाले.
9 शौलची आपल्याविरुध्द मसलत चाललेली आहे हे दावीदला कळले. तेव्हा दावीदाने अब्याथार याजकाला एफोद आणण्याच सांगितले.
10 मग दावीदाने प्रार्थना केली, “परमेश्वरा, इस्राएलच्या देवा! कईला येथे येऊन माझ्यामुळे संपूर्ण नगराचा विध्वंस करायचा शौलचा बेत आहे असे मी ऐकले.
11 खरोखरच शौल येथे येईल का? येथील लोक मला शौलच्या हवाली करतील का? इस्राएलच्या परमेश्वर देवा, तुझ्या सेवकाला नीट सांग.”
12 पुन्हा दावीदाने विचारले, “कईलाचे लोक मला आणि माझ्या साथीदारांना शौलच्या ताब्यात देतील का?” परमेश्वराने याचेही होय असे उत्तर दिले.
13 तेव्हा दावीद आणि त्याच्या बरोबर आलेली सुमारे साहशे माणसे यांनी कईला सोडले. ते गावोगाव भटकंत राहिले, दावीद निसटल्याचे शौलला कळले. त्यामुळे तो तेथे आलाच नाही.
14 दावीद मग वाळवंटातील गढ्या, किल्ले यांच्या आश्रयाने राहू लागला. झीफच्या वाळवंटातील डोंगराळ भागातही तो राहिला. शौल दावीदाचा माग काढायचा प्रयत्न करत होता. पण परमेश्वराने दावीदला त्याच्या हाती लागू दिले नाही.
15 झीफच्या वाळवंटात होरेश येथे असताना शौल आपल्या पाठलागावर येत आहे हे पाहून दावीद घाबरला.
16 शौलचा मुलगा योनाथान दावीदला होरेश येथे भेटायला गेला. त्याने दावीदची परमेश्वरावरची श्रद्धा आणखी दृढ केली.
17 योनाथान दावीदला म्हणाला, “घाबरु नको. माझ्या वडीलांकडून तुला दुखापत होणार नाही. तू इस्राएलचा राजा होशील. मी तुझ्या खालोखाल असेन. माझ्या वडीलांनाही हे माहीत आहे.”
18 मग त्या दोघांनी परमेश्वरासमोर करार केला. तिथून योनाथान आपल्या घरी गेला. दावीद होरेश येथेच राहिला
19 झीफचे लोक गिबा येथे शौल कडे येऊन म्हणाले, “दावीद आमच्या भागात लपून बसलेला आहे. यशीमोनच्या दक्षिणेला हकीला पर्वतावरील होरेशच्या गढीत तो आहे.
20 हे राजा तू आता केव्हाही तिकडे ये, दावीदला तुझ्या हवाली करणे हे आमचे कर्तव्यच आहे.”
21 शौल त्यांना म्हणाला, “या मदतीबद्दल परमेश्वर तुमचे भले करो.
22 आता त्याच्या बद्दल अधिक माहिती काढा. तो कुठे आहे, त्याला कोणीकोणी पाहिले आहे याचा पत्ता लावा.” शौलने विचार केला. ‘दावीद फार धूर्थ आहे, तो माझ्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न करत आहे.’
23 पुढे तो म्हणाला, त्याच्या दबा धरुन बसायच्या सर्व जागा हेरुन ठेवा आणि मग इथे येऊन मला सगळ्याची खबर द्या. मी मग तुमच्याबरोबर येईन. त्या भागात दावीद असेल तर त्याला शोधून काढीन. मग यहूदातील घराघरात शोधायची वेळ आली तरी बेहत्तर.”
24 झीफचे लोक मग परत गेले. शौल तेथे नंतर गेला. दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक यशीमोनच्या दक्षिणेला मावोनच्या वाळवंटात होते.
25 शौल आणि त्याची माणसे दावीदचा मागोवा काढत निघाली. पण लोकांनी त्याबद्दल दावीदला सावध केले. तेव्हा तो मावोनच्या वाळवंटातील खडका कडे गेला. शौलला तो मावोनच्या वाळवंटात असल्याचे कळले म्हणून शौल तिकडे गेला.
26 शौल डोंगराच्या एका बाजूला तर दावीद आणि त्याची माणसे त्याच डोंगराच्या दुसऱ्या बाजूला होती. दावीद शौलपासून निसटून जाण्याच्या घाईत होता. शौल आणि त्याचे सैनिक दावीदला पकडण्यासाठी डोंगराला वेढा घालत होते.
27 तेवढ्यात एक निरोप्या शौलकडे आला. “पलिष्टी आपल्यावर हल्ला करायला आले आहेत. ताबडतोब चला” असा त्याने निरोप आणला.
28 तेव्हा शौलने दावीदचा पाठलाग थांबवून पलिष्ट्यांकडे कूच केले. म्हणून त्या खडकाला “निसटून जाण्याचा खडक” (सेला हम्मालकोथ) असे नाव पडले.
29 दावीद मग मावोनचे वाळवंट सोडून एन गेदीच्या गडावर राहिला.
धडा 24

1 शौलने पलिष्ट्यांचा पाठलाग करुन त्यांना घालवल्यावर लोक त्याला म्हणाले, “दावीद एन गेदीजवळच्या वाळवंटात आहे.”
2 तेव्हा शौलने सर्व इस्राएलमधून तीन हजार माणसे निवडली. त्यांना घेऊन तो दावीदाच्या शोधार्थ निघाला. रानबकऱ्याच्या खडकाजवळ त्यांनी टेहेळणी केली.
3 रस्त्यालगतच्या मेंढवाड्याजवळ शौल आला. तिथे एक गुहा होती. शौल तिथे बहिर्दीशेकरता गेला. दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक गुहेत पार आतल्या बाजूला होते.
4 ते लोक दावीदला म्हणाले, “परमेश्वराने वर्तवलेला हाच तो दिवस. तो म्हणाला होता, “मी शत्रूला तुमच्या ताब्यात देईन मग तुम्ही त्याचे काहीही करा.”दावीद मग हळूच सरकत शौलजवळ पोचला. शौलच्या अंगरख्याचा एक तुकडा त्याने हळूच कापून घेतला. शौलने दावीदला पाहिले नाही.
5 दावीदला नंतर आपल्या कृत्याबद्दल फार वाईट वाटले.
6 तो आपल्या सोबत्यांना म्हणाला, “माझ्या धन्याच्या विरुद्ध अशी गोष्टी परमेश्वराने माझ्या हातून पुन्हा होऊ देऊ नये. शौल हा परमेश्वराने निवडलेला राजा आहे. त्या अभिषिक्त राजाच्या विरुद्ध मी असे काही करता कामा नये.”
7 आपल्या माणसांना थोपवण्यासाठी, त्यांनी शौलला इजा करु नये म्हणून तो असे म्हणाला. शौल गुहेतून बाहेर पडून चालायला लागला.
8 दावीद गुहेतून बाहेर आला आणि त्याने शौलला साद घातली, “महाराज, माझे स्वामी!”शौलने मागे वळून पाहिले. दावीदाने मान लववून त्याला अभिवादन केले.
9 शौलला तो म्हणाला, “दावीद आपला घात करील असे लोक म्हणतात तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे का लक्ष देता?
10 मी तुमच्या केसाला धक्का लावणार नाही. आता तुम्हीच पाहा. आज गुहेत परमेश्वराने तुम्हाला माझ्या समक्ष आणले होते. पण मी तुमची गय केली. तुमचा वध केला नाही. ‘हे माझे धनी आहेत शौल हा परमेश्वराचा अभिषिक्त राजा आहे. त्याला मी धक्का लावणार नाही’ असे मी म्हणालो.
11 हा तुकडा पाहा तुमच्या अंगरख्याचा हा तुकडा मी कापून घेतला. मी तुमचा जीव घेऊ शकलो असतो पण मी तसे केले नाही. हे तुम्ही समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. तुमच्याविरुद्ध माझे कसलेही कारस्थान चाललेले नाही हे कृपया घ्यानात घ्या. मी तुमचे काहीही वाकडे केलेले नाही. पण तुम्ही मात्र माझा जीव घेण्यास सारखे टपलेले आहात.
12 परमेश्वरानेच याचा न्याय करावा. माझ्याशी तुम्ही असे वागलात याचे परमेश्वराने शासन खुशाल करावे. पण मी तुमच्या विरुद्ध लढणार नाही.
13 एक जुनी म्हण आहे,‘वाईट लोकांपासून वाईटच निपजते.’माझ्या हातून काहीच वाईट झालेले नाही. मी दुष्ट नाही. मी तुमचा घात करणार नाही.
14 तुम्ही कोणाचा पाठलाग करत आहात? कोणाविरुद्ध इस्राएलचा हा राजा युद्धासाठी सज्ज आहे? तुम्ही ज्याचा पाठलाग करताय तो तुमच्या वाईटावर नाही. हा तर निळळ मेलेल्या कुत्र्याचा किंवा पिसवेचा पाठलाग झाला.
15 परमेश्वरालाच या गोष्टीचा न्याय करु द्या. आपल्या दोघांमध्ये निवाडा करु द्या. मला पठिंबा देवून माझेच खरे असल्याचे तो दाखवील. माझे तुमच्यापासून रक्षण करील.”
16 दावीदचे बोलून झाले तेव्हा शौलने विचारले, ‘दावीद, माझ्या मुला, तुच हे बोलतो आहेस का?’ शौलला रडू फुटले. तो हमसाहमशी रडला.
17 तो पुढे म्हणाला, “तुझे खरे आहे. माझे चुकले. तू माझ्याशी नेहमी चांगलाच वागलास. पण मी मात्र वाईट वागलो.
18 तू काय चांगले केलेस ते आता सांगितलेस. परमेश्वराने तुझ्यासमोर मला आणूनही तू मला मारले नाहीस.
19 मी तुझा शत्रू नव्हे हे यावरुन दिसतेच. शत्रू आपल्या तावडीत सापडल्यावर त्याला कोणी असे जाऊ देत नाही. शत्रूशी कोणी असे चांगले वागत नाही. आज तू माझ्याशी ज्या चांगुलपणाने वागलास त्याचे तुला देव चांगले फळ देईल.
20 तू आता राजा होणार आहेस हे मला माहीत आहे. तू इस्राएलवर राज्य करशील.
21 आता मला एक वचन दे. परमेश्वराची शपथ घेऊन तू माझ्या मुलाबाळांना मारणार नाहीस असे कबूल कर. माझी नावनिशाणी नाहीशी करणार नाहीस असे कबूल कर.”
22 तेव्हा दावीदाने त्याला तसे वचन दिले. शौलच्या कुटुंबाचा संहार न करण्याचे कबूल केले. तेव्हा शौल घरी परतला. दावीद आणि त्याची माणसे गडावर परतली.
धडा 25

1 शमुवेल मरण पावला. तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी एकत्र जमून दुखवटा व्यक्त केला. शमुवेलचे दफन त्यांनी रामा येथील त्याच्या घराजवळ केले. नंतर दावीद पारानच्या वाळवंटाकडे गेला.
2 मावोन येथे तेव्हा एक धनाढ्य माणूस राहात असे. त्याच्याकडे तीन हजार मेंढरे आणि हजार बकऱ्या होत्या. हा एकदा आपल्या मेंढरांची लोकर कातरायला कर्मेल येथे गेला.
3 हा कालेब वंशातला असून त्याचे नाव नाबाल होते. त्याची बायको अबीगाईल. ती हुशार तसेच सुंदर होती. पण नाबाल मात्र नीच आणि दुष्ट होता.
4 नाबाल त्याचे लोकर कातरण्याचे काम करत होता तेव्हा दावीद वाळवंटात होता. त्याला काही नाबालची गोष्टी कळली.
5 तेव्हा दावीदाने दहा तरुणांना त्याच्याशी बोलायला पाठवले. तो म्हणाला, “कर्मेलला जा. नाबालला भेटा आणि माझ्यातर्फे त्याला नमस्कार सांगा.”
6 दावीदाने याखेरीज नाबालसाठी निरोपही दिला. तो असा, “तुझे आणि तुझ्या कुटुंबियांचे कुशल आहेना? तुझे सर्व व्यवस्थित चालले आहेना?
7 तुझ्याकडे लोकर कातरण्याचे काम चालले आहे असे मी ऐकले. तुझ्याकडचे धनगर तुकतेच इथे आले होते. त्यांना आमच्याकडून काहीही उपद्रव झालेला नाही. कर्मेल येथे ते असताना त्यांच्याकडून आम्ही काही घेतलेले नाही.
8 तू त्यांनाही विचार तेही हेच सांगतील. मी पाठवलेल्या या तरुणांवर लोभ असू दे. तुझ्या या भरभराटीच्या काळात आम्ही तुझ्याकडे आलो आहोत. तेव्हा या तरुणांना तू तथाशक्ती काही तरी द्यावेस. माझ्यासाठी, तुझा या मित्र दावीदासाठी म्हणून एवढे कर.”
9 दावीदाच्या सांगण्याप्रमाणे ते तरुण नाबाल कडे गेले. त्यांनी दावीदचा निरोप नाबालला सांगितला.
10 पण नाबाल त्यांच्याशी अतिशय क्षुद्रपणे वागला. तो म्हणाला, “कोण हा दावीद? हा इशायचा मुलगा कोण? आजकाल बरेच दास आपल्या मालकांकडून पळून जातात.
11 भाकर आणि पाणी माझ्याकडे आहे. तसेच या लोकर कातरणाऱ्या माझ्या नोकरांसाठी काही मांस आहे. पण असल्या अनोळखी लोकांना मी काहीही देणार नाही.”
12 हे एकून ते सगळे दावीदकडे परत आले आणि नाबाल बोलला ते सर्व त्यांनी त्याला सांगितले.
13 तेव्हा दावीद त्यांना म्हणाला, “आता तलवारी हाती घ्या” आणि दावीदसकट या सर्वांनी शस्त्र उचलले. जवळजवळ चारशे जण दावीद बरोबर होते. दोनशे माणसे तेथेच सामानसुमानाजवळ राहिली.
14 नाबालच्या एका सेवकाने अबीगईलला ही खबर दिली. तो म्हणाला, “दावीदाने आपल्या धन्याकडे काही तरुणांना भेटायला पाठवले होते. पण नाबाल त्यांच्याशी क्षुद्रपणे वागला.
15 त्या माणसांची वागणूक मात्र चांगली होती. मेंढरांबरोबर आम्ही उघड्यावर होतो. दावीदची माणसेही तेथेच वावरत होती. पण त्यांनी आमचे काहीही वाकडे केले नाही. आमची कुठलीही गोष्ट चोरीला गेली नाही.
16 दावीदाच्या लोकांनी आमचे दिवस रात्र रक्षण केले. जणू त्यांनी आमच्या भोवती तटच उभारला होता. आम्ही मेंढरांमागे असतांना त्यांचे आम्हाला संरक्षण होते.
17 आता तुम्हीच विचार करून काया ते ठरव. नाबालचे कृत्य अविचारीपणाचे आहे. त्या मुळे आमच्या धन्यावर आणि त्याचा कुटुंबावर संकट ओढवणार आहे.“
18 अबीगईलने तेव्या वेळ न गमावता दोनशे भाकरी, द्राक्षारसाचे दोन बुधले, पाच मेंढरांचे रांधलेले मांस, पाच मापे धान्य, द्रक्षचे शंभर घड, आणि सुक्या अंजिराच्य दोनसे ढेपा एवढे सामान गाढवांवर लादले।
19 आपल्या नोकारांना तिने संगितले,“तुम्ही हे घेउन पुढे व्हा. मी आनेच.“नवर्याला तिने ही गोष्ट सांगितली नाही.
20 आल्पा गाढवावर बसून ती डोंगराच्य दुसर्या बाजूकडून जायगा लागली . तेव्हा तिला समोरून दावीद आणि त्याचा बरोबरचि माणसे येताना दिसली.
21 ती भेटायच्या आधी दावीद म्हणत होता, बाल बंटातमी नाबालच्या माल मत्तेचे रक्षण केले. त्याची मेंढरे चुकू देली नाहीत. मी काहीही अपेक्षा न ठेवता हे केले. त्याच्याशी चांगले वागूनही तो आता असे वाईट वागत आहे.
22 आता मात्र त्याच्या कुटुंबातील एकजण जरी उद्यापर्पंत शिल्लक राहिला तरी देव मला शिक्षा करील.”
23 तेवढ्यात अबीगईल तेथे पोचली. दावीदला पाहताच ती लगबगीने गाढवावरुन उतरली. दावीदला तिने वाकून आभिवादन केले.
24 त्याच्या पायाशी लोळण घेत ती त्याला म्हणाली, “कृपया मला बोलू द्या. मी काय म्हणते ते ऐकून घ्या. जे झाले त्याबद्दल दोष माझा आहे.
25 तुमच्या माणसांना मी पाहिले नाही. त्या नीच नाबालकडे लक्ष देऊ नका. तो त्याच्या नावाप्रमाणेच आहे. त्याच्या नावाचा अर्थच नीच असा आहे आणि तो खरोखर तसाच आहे.
26 निर्दोष लोकांची हत्या तुमच्याहातून होण्यापासून परमेश्वराने तुम्हाला वाचवले आहे. परमेश्वर जिवंत असेपर्यंत तुम्ही येथे असेपर्यंत, तुमच्या वाईटावर असलेले लोक, तुमचे शत्रु यांची गत नाबाल प्रमाणेच होईल असे वाटते.
27 मी आत्ता तुमच्यासाठी हे भेट म्हणून आणले आहे. तुमच्या बरोबरच्या लोकांना हे सर्व द्या.
28 माझ्याहातून घडलेल्या चुकीबद्दल मला क्षमा करा. परमेश्वर तुमच्या घराण्यावर कृपादृष्टी ठेवील. तुमच्या घराण्यातील खुप लोक राज्य करतील. तुम्ही परमेश्वराच्या वतीने युद्ध करता म्हणून परमेश्वर हे घडवून आणील. तुमच्या हयातीत तुमच्या बद्दल लोकांच्या मनात कधीही किंतू उदभवणार नाही.
29 कोणी तुमच्या जिवावर उठले तर परमेश्वर तुमचे रक्षण करील. पण गोफणीतीले धोंड्याप्रमाणे त्या मारेकऱ्याचा मात्र जीव घेईल.
30 परमेश्वराने तुमच्या भल्याचे आश्वासन दिले आहे आणि त्याचे वचन तो प्रत्यक्षात आणेल. परमेश्वर तुम्हाला इस्राएलचा प्रमुख म्हणून नेमेल.
31 निर्दोष लोकांच्या हत्येचे पाप तुम्हाला लागणार नाही. तुम्ही असा सूड उगवणार नाही. तुमची भरभराट होईल तेव्हा माझी आठवण असू द्या.”
32 तेव्हा दावीद अबीगईलला म्हणाला, “परमेश्वराचे, इस्राएलच्या परमेश्वराचे आभार मान. मला भेटायला पाठवल्या बद्दल परमेश्वराची स्तुतीकर.
33 तुझ्या निर्णयाबद्दल देव तुझे भले करो. आज निरपराध लोकांच्या हत्येपासून तू मला वाचवलेस.
34 खरोखर परमेश्वराची शपथ, तू लगबगीने आत्ता मला भेटायला आली नसतीस तर उद्या सकाळपर्यंत नाबालच्या कुटुंबातील एकही जण वाचला नसता.”
35 दावीदाने मग तिच्या भेटी स्वीकारल्या. तो तिला म्हणाला, “तू आता निर्धास्तपणे जा. तुझी विनंती मी ऐकली आहे. मी त्या प्रमाणे वागीन.”
36 अबीगईल नाबालकडे गेली. तो घरीच होता. राजाच्या इतमामात खात पीत होता. मद्याच्या नशेत झिंगला होता व मजेत होता. तेव्हा दुसऱ्या दिवशीपर्यंत ती त्याच्याशी या विषयावर काहीच बोलली नाही.
37 सकाळी नशा उतरल्यावर तो पूर्ण भानावर आला. तेव्हा त्याच्या बायकोने त्याला सर्व काही सांगितले. हे ऐकून त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो दगडासारखा कड़क बनला.
38 जवळपास दहा दिवसानंतर परमेश्वराने त्याला मृत्युमुखी लोटले.
39 नाबालच्या मृत्युची बातमी दावीदाने ऐकली. तेव्हा तो म्हणाला, परमेश्वर धन्य होय. नाबालने माझा अपमान करायचा प्रयत्न केला. पण परमेश्वानेच मला वाचवले. माझ्या हातून अपराध घडणार होता. पण नाबालच्या चुकीबद्दल परमेश्वराने त्याला मृत्युदंड दिला.”दावीदाने मग अबीगईलकडे निरोप पाठवला. तिला आपली पत्नी होण्याविषयी विनंती केली.
40 दावीदाचे सेवक कर्मेल येथे गेले आणि तिला म्हणाले, “दावीदाने आम्हाला पाठवले आहे. तू त्याच्याशी लग्न करवेस अशी त्याची इच्छा आहे.”
41 तिने नतमस्तक होऊन अभिवादन केले. ती म्हणाली, “मी तुमची दासी आहे. तुमच्या सेवेला तत्पर आहे. माझ्या धन्याच्या सेवकांचेही चरण धुण्यास माझी तयारी आहे.”
42 मग ती तात्काळ गाढवावर बसून, त्या सेवकांबरोबर दावीदकडे निघाली. आल्याबरोबर तिने पाच दासी घेतल्या. दावीदची ती पत्नी झाली.
43 इज्रेल येथील अहीनवाम ही सुध्दा दावीदची बायको होती. तेव्हा अबीगईल आणि अहीनवाम अशा त्याच्या दोन बायका झाल्या.
44 शौलची मुलगी मीखल हिच्याशीही त्याचे लग्न्न झाले होते, पण शौलने आपल्या मुलीला माहेरी आणून तिचे पालती याच्याशी लग्न्न लावले. हा पालती गल्लीम येथील असून लइश याचा मुलगा होता.
धडा 26

1 \1 जीफचे रहिवासी गिबा येथे शौलला भेटायला गेले. त्याला ते म्हणाले, “यशीमोन जवळच्या हकीला होंगरात दावीद लपून बसलेला आहे.”
2 शौल जीफच्या वाळवंटात गेला. त्याच्याबरोबर तेव्हा इस्राएलचे निवडक तीन हजाराचे सैन्य होते. दावीदचा त्या सर्वांनी जीफच्या वाळवंटात शोध घेतला.
3 यशीमोन समोरच्या मार्गावर हकीला डोंगरावरच शौलने तळ ठोकला.दावीद वाळवंटातच होता. त्याला शौलच्या या पाठलागाचे वृत्त समजले.
4 तेव्हा त्याने काही हेर नेमले. त्यांच्याकडून त्याला शौल हकीला येथे आल्याचे समजले.
5 तेव्हा शौलच्या तळावरच तो गेला. शौल आणि अबनेर त्याला झोपलेले आढळले. (नेरचा मुलगा अबनेर हा शौलच्या सैन्याचा प्रमुख होता.) शौल मध्यभागी झोपलेला असून बाकी सर्वजण त्याच्याभोवती झोपलेले होते.
6 दावीद हित्ती, अहीमलेख, आणि सरुवेचा मुलगा अहीशय यांच्याशी बोलला. (अबीशय हा यवाबचा भाऊ). या दोघांना दावीदाने विचारले, “माझ्याबरोबर शौलच्या तळावर यायला कोण तयार आहे”अबीशय म्हणाला, “मी येतो.”
7 रात्र झाली दावीद आणि अबीशय छावणीवर पोचले. शौल मध्यभागी झोपलेला होता. त्याचा भाला उशाकडे जमिनीत रोवलेला होता. अबनेर आणि इतर सैनिक भोवतली झोपलेले होते.
8 अबीशय दावीदला म्हणाला, “आज परमेश्वराने शुत्रला तुमच्या हवाली केले आहे. शौलच्याच भाल्याने मला त्याचा वध करु द्या. एकच वार मी करीन.”
9 पण दावीद त्याला म्हणाला, “त्याला ठार करु नको. परमेश्वराच्या अभिष्किक्त राजावर हल्ला करणाऱ्याला देव प्रायाश्र्चित करील.
10 परमेश्वराच्या जीविताची शपथ, तोच शौलला शासन करील. शौलला नैसर्गिक मृत्यू येईल किंवा युध्दात मरण येईल.
11 पण परमेश्वराने निवडलेल्या राजाला मारायची वेळ परमेश्वर माझ्यावर आणणार नाही. तू फक्त त्याच्या उशाजवळचा भाला आणि पाण्याचा तांब्या उचल आणि मग आपण जाऊ”
12 तेवढा भाला आणि पाण्याचा तांब्या घेऊन दावीद आणि अबीशय छावणीबाहेर पडले. घडलेली गोष्ट कोणालाही समजली नाही. कोणी पाहिले नाही. कोणी जागे झाले नाही. परमेश्वरामुळेच सर्वजण गाढ झोपेच्या अमलाखाली होते.
13 दावीद नंतर खोरे ओलांडून पलीकडे गेला. शौलच्या छावणी समोरच्या डोंगर माथ्यावर तो उभा राहिला. दावीद आणि शौल यांच्या छावण्यांमध्ये बरेच अंतर होते.
14 दावीदाने तेथून सैन्याला आणि अबनेरला हाका मारल्या. “अबनेर, ओ दे” असा पुकारा केला.अबनेर म्हणाला, “तू कोण आहेस? राजाला हाका मारणारा तू कोण?”
15 दावीद म्हणाला, “तू मर्द आहेस ना? इस्राएल मध्ये तुझ्या तोडीचा दुसरा कोणी आहे का? मग तू आपल्या धन्याचे रक्षण कसे केले नाहीस? एक सामान्य माणूस तुमच्या छावणीत शिरतो, धन्याला, राजाला मारायला येतो.
16 आणि तुम्ही गाफील राहण्याची चूक करता. परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुम्ही मृत्युदंडाला पात्र आहात. परमेश्वराच्या अभिषिक राजाला, तुमच्या स्वामीला तुम्ही संरक्षण देऊ शकत नाही. शौलच्या उशालगतचा भाला आणि पाण्याचा तांब्या याचा शोध घ्या बरे! कुठे आहेत या वस्तू?”
17 शौलला दावीदचा आवाज ओळखू आला. तो म्हणाला, “दावीद मुला, तुझाच का हा आवाज?”दावीद म्हणाला, “स्वामी मीच बोलतोय.”
18 तो पुढे म्हणाला, “धनी, तुम्ही माझा पाठलाग का करत आहात? मी काय केले? माझा अपराध कोणता?
19 राजेसाहेब, माझे ऐका. तुमच्या माझ्यावरील क्रोधाचे कारण परमेश्वर असेल तर तो माझ्या अर्पणाचा स्वीकार करील. पण माणसांनी तुम्हाला माझ्याविरुद्ध भडकवले असेल तर परमेश्वर त्यांचा सत्यानाश करो. या लोकांमुळेच मला परमेश्वराने दिलेल्या भूमीतून काढता पाय घ्यावा लागला. “दुसऱ्या कुठल्या परमेश्वराची उपासना कर, इथून चालता हो” असे यांनीच मला सांगितले.
20 आता मरताना तरी परमेश्वराचे सान्निध्य मला लाभू द्या. इस्राएलचा राजा तर जणू क्षुल्लक पिसवेच्या शिकारीला निघालाय. डोंगरात तितराची पारध करतोय!
21 यावर शौल म्हणाला, “मी पापी आहे. तू परत ये. दावीद, माझ्या मुला, माझ्या जिवाचे तुला मोल वाटते हे तू तुझ्या कृतीतून आज दाखवले आहेस तेव्हा आता तुला मी उपद्रव देणार नाही. मी अविचाराने वागलो. फार मोठी चूक केली.”
22 दावीद त्याला म्हणाला, “हा राजाचा भाला इथे आहे. तुमच्यापैकी एखाद्या सेवकाने येऊन घेऊन जावा.
23 आपल्या करणीचे फळ परमेश्वर आपल्याला देतो. आपल्या योग्य वागण्याचे बक्षीस मिळते, तसंच चुकीचीही शिक्षा भोगावी लागाते. तुझा पराभव करायची संधी आज मला परमेश्वराने दिली होती. पण परमेश्वराच्या अभिषिक्त राजाला मी इजा पोचू दिली नाही.
24 तुझ्या आयुष्याचे मला किती महत्व वाटते ते मी आज दाखवले. तसाच माझा जीव परमेश्वराला मोलाचा वाटतो हे तो दाखवून देईल. तो माझी संकटातून मुक्तता करील.”
25 तेव्हा दावीदला शौल म्हणाला, “देव तुझे कल्याण करो. दावीद, माझ्या मुला, तुझ्या हातून मोठी कार्ये होतील आणि तू यशस्वी होशील.”मग दावीद आपल्या मार्गाने गेला आणि शौल स्वगृही आला.
धडा 27

1 पण दावीद मनात म्हणाला, “कधीतरी शौल मला पकडेल आणि ठार मारेल. त्यापेक्षा पलिष्ट्यांच्या भूमीत आश्रय घेणे उत्तम. तेव्हाच इस्राएलमध्ये माझा शोध घ्यायचे शौल थांबवेल. माझी त्याच्या तावडीतून सुटका होईल.
2 मग दावीद आपल्या बरोबरच्या सहाशे माणसांना घेऊन इस्राएल सोडून गेला. मवोखचा मुलगा आखीश याच्याकडे ते सगळे आले. आखीश गथचा राजा होता.
3 दावीद मग आपल्या बरोबरचे लोक आणि त्यांचा परिवार यांच्यासह गथ येथे आखीशच्या राज्यात राहिला. इज्रेलची अहीनवाम आणि कर्मेलची अबीगईल या दावीदाच्या दोन बायकाही त्याच्यासह होत्या. अबीगईल म्हणजे नाबालची विधवा.
4 दावीद गथ येथे पळून गेला असल्याचे लोकांकडून शौलला कळले. तेव्हा त्याने दावीदचा पाठलाग सोडून दिला.
5 दावीद आखीशला म्हणाला, “माझ्यावर तुझी मेहेरनजर असेल तर या मुलखातील एखाद्या ठिकाणी मला राहायला जागा दे. मी केवळ एक सेवक आहे. मी असेच कुठेतरी राहायला पाहिजे, तुझ्याबरोबर इथे राजधानीच्या शहरी नव्हे.”
6 तेव्हा आखीशने त्याला सिकलाग हे नगर वस्तीला दिले. ते तेव्हापासून आजतागायत यहूदांच्या राजांच्या ताब्यात आहे.
7 दावीद त्या पलिष्ट्यांच्या मुलखात एक वर्ष चार महिने राहिला.
8 शूर जवळच्या तेलेमपासून पार मिसरर्यंत जे अमालेकी आणि गशूरी लोक राहात त्यांच्यावर दावीदाने आपल्या माणसांसह हल्ले केले. त्यांचा पराभव करुन त्यांना लुटले.
9 त्या भागातील सर्वांना दावीदाने नेस्तनाबूत केले. त्यांची मेंढरे, गाई गुरे, गाढवे, उंट, कापड चोपड लूटून आखीशच्या स्वाधीने केले. पण त्याने या लोकांपैकी कोणालाही जिवंत ठेवले नाही.
10 हे दावीदाने अनेकदा केले. कोणत्या लढाईवरुन ही लूट आणली असे आखीशने दरवेळी विचारल्यावर दावीद प्रत्येक वेळी सांगत असे, “यहूदाच्या दक्षिण भागावर हल्ला केला.” किंवा “यहरमेलीच्या दक्षिण प्रांतात लढाई केली” किंवा “केनीच्या दक्षिण प्रदेशावर चढाई केली”
11 पराभूतांपैकी कोणालाही त्याने गथला जिवंत येऊ दिले नाही. दावीदला वाटायचे, “त्यांच्यापैकी कोणी इथे आले तर प्रत्यक्षात काय आहे ते आखीशला कळायचे.” पलिष्ट्यांच्या भूमीत असेपर्यंत दावीदाने असेच केले.
12 दावीदाने आखीशचा विश्वास संपादन केला. आखीश मनात म्हणाला, “इस्राएलचे लोक आता दावीदचा द्वेष करतात. त्याच्याशी त्यांचा उभा दावा आहे. तेव्हा दावीद आता चिरकाल माझीच सेवा करील.”
धडा 28

1 तेव्हा पुढे पलिष्ट्यांनी इस्राएलवर स्वारी करायला सैन्याची जमवाजमव केली. आखीश दावीदला म्हणाला, “इस्राएलशी युद्ध करायला तू आणि तुझे लोक यांना माझ्या बाजूला असले पाहिजे हे लक्षात ठेव.”
2 दावीद म्हणाला, “निश्चितच माझी कामगिरी पाहालच तुम्ही.” आखीश म्हणाला, “उत्तम. मी तुला माझा अंगरक्षक म्हणून नेमतो. तू माझ्या संरक्षणाची काळजी घेशील.”
3 शमुवेल मरण पावला होता. सर्व इस्राएलांनी निधनाबद्दल शोक व्यक्त करुन त्याच्या गावी रामा येथे शमुवेलचे दफन केले होते. शौलने मांत्रिक आणि दैवज्ञ यांना इस्राएल मधून घालवून दिले होते.
4 पलिष्ट्यांनी युद्धाच्या तयारीने शूनेम येथे तळ दिला. शौलने सर्व इस्राएलांना एकत्र आणून गिलबोवा येथे तळ दिला.
5 पलिष्ट्यांचे सैन्य पाहून शौल घाबरला. त्याची छाती धडधडू लागली.
6 त्याने परमेश्वराची प्रार्थना केली पण परमेश्वराने त्याला उत्तर दिले नाही. स्वपन्न, संदेष्टे किंवा उरीम यापैकी कोणत्याही माध्यामातून देव त्याच्याशी बोलला नाही.
7 शेवटी शौल आपल्या अधिकाऱ्यांना म्हणाला, एखाद्या भूतविद्याप्रवीण बाईला गाठा. तिलाच या युध्दाविषयी प्रश्न विचारतो. ते अधिकारी म्हणाले, “अशी एक बाई एन-दोन येथे आहे.”
8 आपणच शौल आहोत हे ओळखू देऊ नये म्हणून वेष पालटून शौल दोन सेवकांना सोबतीला घेऊन रात्रीच त्या बाईकडे गेला. तिला म्हणाला, “पुढे काय होणार हे मला जाणून घ्यायचे आहे. तेव्हा आपल्या भूतविद्येचा प्रयोग करुन, मी ज्याचे नाव घेईन त्याला इथे हजर कर.”
9 तेव्हा ती बाई शौलला म्हणाली, “शौलने काय केले माहीत आहेना? त्याने सर्व भूताविद्याप्रवीण आणि भविष्यवादी लोकांना इस्राएलमधून हद्दपार केले आहे. मलाही त्यात अडकवून मारायचा तुझा विचार दिसतो.”
10 शौलने परमेश्वराची शपथ घेऊन तिला वचन दिले की परमेश्वर जिवंतअसेतो तुला शिक्षा होणार नाही.
11 तेव्हा कोणाला समोर आणू असे तिने त्याला विचारले. शौल म्हणाला, शमुवेलला आण.
12 आणि तसे झाले. शमुवेलला पाहताच ती मोठ्याने किंचाळली. शौलला ती म्हणाली, “तू मला फसवलेस तू शौल आहेस.”
13 तेव्हा राजा म्हणाला, “घाबरु नकोस. तुला काय दिसते ते सांग.” ती म्हणाली, “मला एक आत्मा भूमीतून वर येताना दिसतोय.”
14 शौलने विचारले, “तो दिसायला कोणासारखा आहे?” ती म्हणाली, “एक विशिष्ट प्रकारचा अंगरखा घातलेला एक वृध्द आहे.” तो शमुवेलच असल्याचे शौलाच्या लक्षात आले. जमिनीपर्यंत वाकून त्याने त्याला अभिवादन केले.
15 शमुवेल शौलला म्हणाला, “मला तू त्रास का दिलास? मला का उठवलेस?”शौल म्हणाला, “मी अडचणीत सापडलो आहे. पलिष्टी माझ्यावर हल्ला करायला आले आहेत. परमेश्वराने माझी साथ सोडली आहे. त्याच्याकडून मला प्रतिसाद मिळत नाही. स्वपन्न किंवा संदेष्टे यांच्यामार्फत मला उत्तरे मिळत नाहीत. म्हणून मी तुला बोलावले. मी काय करु ते तू सांग.”
16 शमुवेल म्हणाला, “परमेश्वराने तुझा त्याग केला आहे. तो आता दावीद या तुझ्या शेजाऱ्याच्या बाजूचा आहे. तेव्हा मला का त्रास देतोस?
17 परमेश्वराने माझ्या द्वारे जे जे सांगितले होते तेच तो आता करत आहे. तुझ्या हातातून राज्य खेचून घेऊन ते तो तुझ्या लगतच्या दुसऱ्यांच्या हाती सोपवत आहे हा शेजारी म्हणजे दावीद.
18 तू परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागला नाहीस. परमेश्वराचा क्रोध किती आहे ते दाखवायला तू अमालेक्यांचा नाश करायाला हवा होतास, तसा तू केला नाहीस. म्हणून परमेश्वर आज तुझ्याशी असे वागत आहे.
19 पलिष्ट्यांच्या हातून प्रभु तुझा आणि इस्राएल सैन्याचा पराभव करील आणि उद्या तू आणि तुझी मुले इथे माझ्याबरोबर असाल.”
20 हे ऐकून शौलने जमिनीवर लोळण घेतली. शमुवेलच्या भाकिताने त्याला कापरे भरले. त्याआधी दिवसभर आणि रात्र भर त्याने काही खाल्ले नव्हते म्हणून त्याच्या अंगात त्राण उरले नव्हते.
21 तेव्हा ती बाई शौलजवळ आली. तो घाबरल्याचे तिने पाहिले आणि त्याला ती म्हणाली, “पाहा, मी तुझ्या सेवेत आहे. तुझे म्हणणे मी ऐकले आहे. मला जे करायला सांगितले ते मी जीव धोक्यात घालून केले आहे.
22 आता कृपा करुन माझे ऐक. मी खायला देते ते खा तरच तुला वाटचाल करायला तरतरी येईल.”
23 पण शौलने खायचा आग्रह निग्रहाने धुडकावून लावला. शेवटी शौल बरोबरच्या सेवकांनीही तिच्याच सारखी त्याला खायची विनंती केली. तेव्हा अखेर शौलने त्यांचे म्हणणे मानले. जमिनीवरुन उठून तो पलंगावर बसला.
24 एक चांगले धष्टपुष्ट वासरु त्या बाईकडे होते ते तिने पटकन् मारले. मग पीठ मळून त्याची खमीर विरहित भाकर भाजली.
25 शौल आणि त्याचे सेवक यांना खायला दिले. त्या सर्वांनी ते खाऊन त्याच रात्री तिचा निरोप घेतला.
धडा 29

1 पलिष्ट्यांनी आपल्या सर्व सैन्याला अफेक येथे एकत्र आणले. इज्रेल येथे एका झऱ्याजवळ इस्राएलांनी छावणी टाकली.
2 आपल्या शंभर शंभर आणि हजार हजार माणसांच्या समूहा बरोबर पलिष्टी अधिकारी चालले होते. दावीद आणि त्याची माणसे आखीश बरोबर पिझाडीला होती.
3 तेव्हा पलिष्ट्यांच्या सरदारांनी विचारले, “या इब्रींचे येथे काय काम?” आखीशने त्यांना सांगितले, “हा दावीद हा शौलच्या अधिकाऱ्यांपैकी एक होता. आता माझ्या बरोबर तो बराच काळ आहे. शौलला सोडून तो येथे आल्यापासून त्याच्यात मला काही वावगे आढळले नाही.”
4 पण त्या सरदारांना आखीशचा फार राग आला. ते म्हणाले, “या दावीदला परत पाठवा. त्याला दिलेल्या नगरात त्याने परत जावे. आमच्या बरोबर तो युध्दावर येता कामा नये. तो इथे राहिला तर शत्रूलाच आपल्या छावणीत घेतल्यासारखे होईल. आपली माणसे मारुन तो त्यांच्या राजाला, शौलला, खूश ठेवील.
5 शौलने हजार शत्रू मारले, तर या दावीदाने लाखोंचा वध केला असे एक गाणे गात इस्राएल लोक जल्लोष करतात तोच हा दावीद.
6 तेव्हा आखीश दावीदला बोलावून म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, तू माझ्याशी सचोटीने वागला आहेस. माझ्या सैन्यात तुला भरती करुन घेणे मला आवडले असते. तू मला सामील झाल्यापासून मला तुझ्यात आक्षेपाई काही आढळले नाही. पण पलिष्टी अधिकाऱ्यांचे तुझ्याबद्दल चांगले मत नाही.
7 तेव्हा तू शांतपणे माघारी फीर. पलिष्टी अधिकाऱ्यांना काहीही उपद्रव देऊ नको.”
8 तेव्हा दावीदाने विचारले, “माझे काय चुकले? मी तुमच्याकडे आलो त्या दिवसापासून आजतागायत माझ्यात तुम्हाला काही दोषास्पद आढळले का? माझे स्वामी महाराज यांच्या शत्रूंचा मुकाबला मी का करु नये?’
9 आखीशने त्याला सांगितले, “मला तू आवडतोस. तू देवाने पाठवलेल्या दूतासारखाच आहेस. पण दावीदाने आमच्या बरोबर युध्दावर येऊ नये असे पलिष्टी सरदारांचे म्हणणे आहे.
10 उद्या सकाळी लौकर उठून तू आणि तुझ्या बरोबरची माणसे परत जा. तुम्हाला दिलेल्या नगरात जा. या सरदारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष कर. तू भला माणूस आहेस उद्या उजाडताच निघून जा.”
11 तेव्हा दावीद आपल्या बरोबरच्या लोकांसह पहाटेच पलिष्ट्यांच्या देशात परतला आणि पलिष्ट्यांनी इज्रेलवर चढाई केली.
धडा 30

1 दावीद आणि त्याची माणसे तिसऱ्या दिवशी सिकलाग येथे आली. अमालेक्यांनी सिकलाग आणि नेगेव भागावर हल्ला चढवून सिकलाग शहर भस्मसात केलेले त्यांनी पाहिले.
2 अमालेक्यांनी बायका, गावातील तरुण आणि वृध्द लोक यांना कैदी म्हणून नेले होते. त्यांनी कोणाला ठार केले नाही. पण धरुन मात्र नेले.
3 दावीद आणि त्याच्या बरोबरची माणसे सिकलाग येथे येऊन पोचतात तो त्यांना शहर जळत असलेले दिसले. त्यांच्या बायका मुलेबाळे यांना नेण्यात आले होते. अमालेक्यांनी सर्वांना उचलून नेले होते.
4 दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक यांनी खूप आक्रोश केला. आक्रोश करुन करुन त्यांची शक्ती संपुष्टात आली.
5 इज्रेलची अहीनवास आणि कर्मेल येथील नाबालची बायको आबीगईल या दावीदाच्या बायकांनाही नेले होते.
6 आपल्या सर्व मुलाबाळांना कैदी म्हणून धरुन नेलेले पाहून सर्व सैन्याला दु:ख आणि संतापाने घेरले. दावीदला दगडांनी ठेचून मारावे असा विचार लोक बोलून दाखवू लागले. त्यामुळे दावीद फार व्याथित झाला. पण तो परमेश्वरावर भरवंसा ठेवून खंबीर राहिला.
7 अब्याथार या याजकाला त्याने आपला एफोद आणण्यास सांगितले.
8 दावीदाने मग परमेश्वराला विचारले, “आमच्या कुटुंबियांना धरुन नेणाऱ्या शत्रूंचा पाठलाग करु का? शत्रू आमच्या तावडीत सापडेल का?” यावर परमेश्वराने सांगितले, “अवश्य त्यांच्या पाठलागावर जाऊन त्यांना पकड. आपल्या घरच्यांची तू सोडवाणूक करशील.”
9 दावीदाने मग आपल्याबरोबर सहाशे जणांना घेतले आणि ते सर्व बसोर नदीजवळ पोचले. त्यांच्यापैकी दोनशेजण इतके थकले की त्यांना पुढे जाववेना. ते तिथेच राहिले. तेव्हा उरलेली चारशे माणसे दावीद बरोबर पुढे अमालेक्यांच्या पाठलागावर गेली.
10
11 त्यांना एका शेतात एक मिसरी आढळला. त्याला त्यांनी दावीदकडे नेले. त्याला खाऊ पिऊ घातले.
12 अंजिराच्या ढेपेचा एक तुकडा आणि द्राक्षाचे दोन घड त्यांनी त्याला दिले. तेव्हा त्याला बरे वाटू लागले. तीन दिवस आणि रात्री त्याच्या पोटात अन्न पाणी गेले नव्हते.
13 दावीदाने त्याला विचारले, “तुझा मालक कोण? तू आलास कुठून?”तो मिसरी म्हणाला, “मी मिसरी असून एका अमालेक्यांचा गुलाम आहे. तीन दिवसांपूर्वी मी आजारी पडलो तेव्हा माझ्या धन्याने मला सोडून दिले.
14 करेथी राहतात त्या नेगेव प्रदेशावर, यहूदा प्रांतावर व कालेब लोकांच्या दक्षिण भागावर आम्ही हल्ले केले होते. सिकलागही आम्ही जाळले.”
15 दावीद त्याला म्हणाला, “आमच्या बायकामुलांना तुम्ही नेलेत तिथे मला घेऊन जाशील का?”तेव्हा तो मिसरी दास म्हणाला, “तुम्ही परमेश्वरापुढे शपथ घेतलीत तर मी तुम्हाला मदत करीन. पण तुम्ही मला मारणार नाही किंवा माझ्या धन्याकडे देणार नाही असे मला वचन द्या.”
16 त्या मिसरी माणसाने दावीदला अमालेक्यांच्या तळापर्यंत नेले. तेथे ते लोक खात पित आणि मौजमजा करत इतस्तत: पसरले होते. पलिष्टी आणि यहूदा प्रांतातून आणलेल्या लुटीचा ते मनसोक्त उपभोग घेत होते.
17 दावीदाने त्यांच्यावर हल्ला करुन त्यांना मारले. सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्यांच्यात लढाई झाली. अमालेक्यांपैकी चारशे तरुण आपापल्या उंटांवर स्वार होऊन पळून गेले. ते वगळता कोणीही वाचले नाही.
18 आपल्या दोन बायकांसकट अमलेक्यांनी जे जे पळवले होते ते सर्व दावीदाने परत मिळवले.
19 कोणीही गहाळ झाले नाही. मुलं, वृध्द, माणसं, मुलगे, मुली सर्व मैल्यावान वस्तू ज्याच्या त्याला मिळाल्या. अमालेक्यांच्या लूटीतील सर्व काही दावीदाने परत आणले.
20 त्यांची सर्व शेरडे मेंढरे आणि गुरे दावीदाने आणली. दावीदाच्या माणसांनी त्यांना पुढे घातले आणि ते म्हणाले, “हे दावीदाने मिळवलेले बक्षीस आहे.”
21 जे दमले भागलेले लोक दावीद बरोबर पुढे जाऊ शकले नाहीत आणि बसोर नदीपाशीच थांबले होते तेथे, त्या दोनशे जणांकडे दावीद आला. दावीद आणि त्याचे सैन्य येताना पाहून ते त्यांना सामोरे आले. त्यांनी दावीदाच्या सैन्याचे आगत स्वागत केले. दावीदाने त्यांचे क्षेम कुशल विचारले.
22 दावीद बरोबर गेलेल्यांमध्ये काही विघन्नसंतोषी माणसे होती. ती म्हणाली, “ही दोनशे माणसे आपल्या बरोबर पुढे आली नाहीत. तेव्हा त्यांना आपल्या लुटीतील हिस्सा मिळाणार नाही. त्यांची बायका मुले तेवढी ज्याची त्याने घ्यावीत.”
23 दावीद त्यांना म्हणाला, “नाही, असे वागू नका. परमेश्वराने आपल्याला काय दिले त्याचा विचार करा. परमेश्वरामुळे शत्रूचा पारभव आपण करु शकलो.
24 तुम्ही म्हणता ते कोणी ऐकणार नाही. जे इथे सामानसुमानाजवळ थांबले ते आणि युध्दावर आले ते अशा सर्वांना सारखाच वाटा मिळेल. वाटण्या समान होतील.”
25 तेव्हापासून इस्राएलसाठी हीच वहिवाट पडली; हाच नियम झाला. आजतागायत तो चालू आहे.
26 दावीद सिकलाग येथे आला. त्याने अमालेक्यांकडून आणलेल्या लुटीतील काही वस्तू आपले मित्र, यहूदातील वडीलधारी मंडळी यांना पाठवल्या. त्याने सांगितले, “परमेश्वराच्या शत्रूकडून आणलेल्या लुटीतीला ही भेट”
27 बेथेल, दक्षिणेकडील रामोथ, यत्तोर,
28 अरोएर, सिफमोथ, एष्टमो,
29 राखाल, येरहमेलीतील नगरे तसेच केनीची नगरे,
30 हर्मा, कोर आशान, अथाख,
31 आणि हेब्रोन अशा ज्या ज्या ठिकाणी दावीद आपल्या साथीदारांसह फिरत असे तेथील वडीलधाऱ्यांनाही त्याने या लुटीतील वस्तू पाठवल्या.
धडा 31

1 पलिष्ट्यांची इस्राएलांशी लढाई झाली तेव्हा इस्राएलांनी शत्रूड़पासून पळ काढला. बरेच इस्राएल लोक गिलबोवा डोंगरात मारले गेले.
2 शौल आणि त्याची मुले यांच्याशी पलिष्टी निकराने लढले. योनाथान, अबीनादाब आणि मलकीशुवा या शौलच्या मुलांना पलिष्ट्यांनी वध केला.
3 युद्ध शौलच्या हाताबाहेर जाऊ लागले. तिरंदाजांनी शौलवर बाणांचा वर्षाव केला आणि शौल चांगलाच घायाळ झाला.
4 तो आपल्या शस्त्रवाहक सेवकाला म्हणाला, “तुझी तलवार उचल आणि माझ्यावर चालव. नाहीतर हे परकीय मला भोसकून माझी टिंगल टवाळी करतील.” पण त्या शस्त्रवाहकाने भेदरुन या गोष्टीला नकार दिला.तेव्हा शौलने आपली तलवार उपसली व स्वत:ला भोसकले.
5 शस्त्रवाहकाने शौल मेला हे पाहून आपली तलवार काढली आणि आत्महत्या केली. शौल बरोबरच त्याने देह ठेवला.
6 अशा प्रकारे त्या दिवशी शौल, त्याची तीन मुले आणि त्याचा शस्त्रवाहक असे सर्व एकदम मृत्युमुखी पडले.
7 खोऱ्याच्या दुसऱ्या बाजूला राहणाऱ्या इस्राएली लोकांनी, इस्राएली सैन्याला पळ काढताना पाहिले. शौल आणि त्याची मुले मरण पावल्याचे त्यांना आढळले. तेव्हा त्यांनी ही आपापली गावे सोडून पलायन केले. त्या ठिकाणी मग पलिष्ट्यांनी वस्ती केली.
8 दुसऱ्या दिवशी हे पलिष्टी मृतांच्या अंगावरील चीजवस्तू लुबाडायला आले. त्यांना शौल आणि त्याची तीन मुले गिलबोवा डोंगरात मरुन पडलेली आढळली.
9 पलिष्ट्यांनी शौलचे मुंडके कापले आणि चिलखत, शस्त्रे पळवली सर्व देशभरच्या लोकांना आणि देवळांमधून त्यांनी हे वर्तमान कळवले.
10 शौलची शस्त्रे त्यांना अष्टारोथच्या देवळात ठेवली आणि त्याचा मृतदेह बेथ-शानच्या गावकुसावर टांगला.
11 पलिष्ट्यांनी शौलची काय गत केली ते याबेश-गिलाद येथील रहिवाश्यांनी ऐकले.
12 तेव्हा तेथील सैनिक रातोरात तेथून निघून बेथ-शान येथे पोचले. तेथे गावकुसावर टांगलेला शौलचा मृतदेह त्यांनी काढला. शौलच्या मुलांची प्रेते ही काढली. याबेश येथे त्यांनी हे सर्व मृतदेह आणले आणि याबेश येथील सर्वांनी त्यांचे दहन केले.
13 मग त्यांच्या अस्थी काढून याबेश मधील झाडाखाली पुरल्या. सर्व लोकांनी सात दिवस उपास करुन शोक प्रगट केला.