ईयोब

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42


धडा 1

1 ऊर देशात ईयोब नावाचा एक माणूस राहात होता. तो फार चांगला व श्रध्दाळू माणूस होता. ईयोब देवाची भक्ती करीत असे. ईयोब वाईट गोष्टीपासून दूर राहात असे.
2 ईयोबला सात मुले आणि तीन मुली होत्या.
3 ईयोब जवळ 7000 मेंढ्या, 3000 उंट, 1000 बैल आणि 500 गाढवी होत्या तसेच खूप नोकरही होते. पूर्वेकडच्या देशांतील तो सर्वात श्रीमंत माणूस होता.
4 ईयोबची मुले आळीपाळीने आपापल्या घरांत भोजन समारंभ करीत असत आणि आपल्या बहिणींनाही बोलवीत असत.
5 मुलांच्या भोजन समारंभानंतरच्या सकाळी ईयोब सर्वांत आधी उठून प्रत्येक मुलासाठी होमार्पणे करीत असे. तो म्हणे. “कदाचित् भोजन समारंभाच्यावेळी माझ्या मुलांनी निष्काळजीपणाने पाप केले असेल.” आपली मुलं देवाची उपासना करायला योग्य व्हावीत म्हणून ईयोब असे करीत असे.
6 नंतर एके दिवशी देवपुत्र (देवदूत) परमेश्वराला भेटायला आहे. त्यांच्याबरोबर सैतानही होता.
7 परमेश्वराने सैतानाला विचारले, “तू कोठे होतास?”सैतानाने उत्तर दिले, “मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडत फिरत होतो.”
8 मग परमेश्वर सैतानाला म्हणाला, “तू माझा सेवक, ईयोबला पाहिलेस का? पृथ्वीवर त्याच्यासारखा कुणीही नाही. तो खरोखरच फार चांगला सात्विक माणूस आहे. तो देवाची भक्ती करतो. तो वाईट गोष्टींपासून दूर राहातो.”
9 सैतानाने उत्तर दिले, “होय, पण त्याच्याजवळ देवाची भक्ती करण्यामागे सबळ कारण आहे.
10 तू नेहमी त्याचे, त्याच्या कुटुंबाचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतोस. तो जे जे काही करतो त्यांत तू त्याला यशस्वी करतोस. तू त्याला आशीर्वाद दिला आहेस. तो इतका श्रीमंत आहे की सर्व देशभर त्याचे पशुधन पसरलेले आहे.
11 पण जर तू त्याच्या जवळ जे काही आहे त्या सगळ्यावर आघात केलास तर तो तुझ्या तोंडावर तुझी निंदा करील हे मी खात्रीपूर्वक सांगतो.”
12 नंतर परमेश्वर सैतानाला म्हणाला. “बरं आहे, तू त्याच्याजवळ असलेल्या वस्तूंचे काहीही करु शकतोस. पण तू त्याच्या अंगाला मात्र हात लावायचा नाहीस.” मग सैतान परमेश्वरापुढून निघून गेला.
13 एक दिवस ईयोबच्या सर्वांत मोठ्या मुलाकडे त्याची इतर मुले व मुली जेवत होते व द्राक्षारस पीत होते.
14 तेव्हा एक निरोप्या ईयोब कडे आला व म्हणाला, “बैल नांगरीत होते आणि गाढवे जवळच चरत होती.
15 परंतु शबाई लोक आमच्यावर चाल करुन आले आणि त्यांनी तुझी गुरे पळवून नेली. त्यांनी माझ्याखेरीज इतर सर्व नोकरांना मारुन टाकले. तुला हे सांगण्यासाठी मी एकटा स्वत:चा कसाबसा बचाव करुन आलो आहे.”
16 पहिला निरोप्या हे सांगत असतानाच दुसरा निरोप्या ईयोबकडे आला. तो म्हणाला, “आकाशातून वीज पडून तुझ्या मेंढ्या व नोकर - चाकर जळून गेले. फक्त मीच तेवढा बचावलो आहे व तुला सांगायला आलो आहे.”
17 दुसरा निरोप्या हे सांगत असतानाच आणखी एक निरोप्या आला. तिसरा निरोप्या म्हणाला, “खास्द्यांनी तीन टोळ्या आपल्यावर हल्ला करण्यासाठी पाठवल्या. त्यांनी हल्ला करुन उंट पळवून नेले आणि नोकरांना मारुन टाकले. फक्त मीच त्यातून सुटून तुला सांगायला आलो आहे.”
18 तिसरा निरोप्या हे सर्व सांगत असताना आणखी एक निरोप्या तिथे आला. चौथा निरोप्या म्हणाला, “तुझी मुले व मुली तुझ्या मोठ्या मुलाकडे खात होते व द्राक्षारस पीत होते.
19 तेव्हा वाळवंटातून सोसाट्याचा वारा आला आणि त्याने तुझे घर पडले. घर तुझ्या मुलामुलींवर पडल्यामुळे ते मेले. केवळ मीच त्यातून बचावलो व तुला सांगायला इथे आलो.”
20 ईयोबने जेव्हा हे ऐकले तेव्हा आपल्याला खुप दु:ख झाले आहे हे दाखविण्यासाठी त्याने आपले कपडे फाडले, डोक्यावरचे केस काढले व जमिनीवर पडून त्याने देवाची आराधना सुरु केली.
21 तो म्हणाला:“मी जेव्हा या पृथ्वीवर आलो तेव्हा नागवाच होतो व माझ्याजवळ काहीही नव्हते. मी जेव्हा मरेन व हे जग सोडून जाईल तेव्हाही मी नागवाच असेन आणि माझ्याजवळ काहीही नसेल. परमेश्वर देतो व तोच ते परतही घेतो. परमेश्वराचे नाव धन्य असो.”
22 या रीतीने ईयोबच्या हातून पाप घडले नाही. देवाने चूक केली आहे असे काही तो बोलला नाही.
धडा 2

1 आणखी एके दिवशी देवपुत्र परमेश्वराला भेटायला आले. त्यांच्याबरोबर सैतानही होता. सैतान परमेश्वराला भेटायला आला होता.
2 परमेश्वर सैतानाला म्हणाला, “तू कुठे गेला होतास?”सैतान परमेश्वराला उत्तर देत म्हणाला, “मी पृथ्वीवरच इकडे तिकडे भटकत होतो.”
3 नंतर परमेश्वर सैतानाला म्हणाला, “माझा सेवक ईयोब याच्याकडे तू लक्ष देत होतास का? सर्व पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणीही नाही. तो खरोखरच फार चांगला व विश्वासू आहे. तो देवाची भक्ती करतो. तो वाईट गोष्टींपासून दूर राहातो. तू मला निष्कारण त्याच्या जवळच्या सर्व गोष्टींचा नाश करायला सांगितलेस आणि तरीही तो विश्वासू राहिला आहे.”
4 सैतानाने उत्तर दिले, “कातडीला कातडीमनुष्य जिवंत राहाण्यासाठी सर्व काही देऊ शकतो.
5 परंतु जर तू तुझ्या शक्तीचा वापर त्याला शारीरिक इजा करण्यासाठी केलास तर तो तुला तुझ्या तोंडावर शापदेईल.”
6 तेव्हा परमेश्वर सैतानाला म्हणाला, “ठीक आहे. तो आता तुझ्या हाती आहे. मात्र त्याला मारण्याची परवानगी मी तुला देत नाही.”
7 मग सैतान परमेश्वराकडून निघाला. त्याने ईयोबाला ठणकणारी गळवे दिली. ईयोबच्या सर्वांगावर तळव्यापासून डोक्यापर्यंत गळवे होती.
8 म्हणून ईयोब कचऱ्याच्या ढीगाजवळ बसला. आपली गळवे खाजविण्यासाठी त्याने खापराचा तुकडा वापरला.
9 ईयोबची बायको त्याला म्हणाली, “तू अजूनही देवाशी निष्ठावान आहेस का? तू देवाला शाप देऊन मरुन का जात नाहीस?”
10 ईयोबने बायकोला उत्तर दिले, “तू एखाद्या मूर्ख बाईसारखी बोलत आहेस. देव जेव्हा आपल्याला चांगल्या गोष्टी देतो तेव्हा आपण त्यांचा स्वीकार करतो. तसाच आपण संकटांचाही स्वीकार तक्रार न करता केला पाहिजे.” त्याच्या संकटकाळातसुध्दा ईयोबने पाप केले नाही. तो देवाच्याविरुध्द बोलला नाही.
11 ईयोबचे तीन मित्र म्हणजे अलीफज तेमानी, बिल्दद शूही आणि शोफर नामाथी या तिन्ही मित्रांनी ईयोब वर आलेल्या संकटांविषयी ऐकले होते. ते आपली घरे सोडून एका ठिकाणी भेटले. ईयोबला भेटून त्याला सहानुभूती दाखवावी व त्याचे सांत्वन करावे याबद्दल त्यांचे एकमत झाले.
12 परंतु बऱ्याच अंतरावरुन जेव्हा त्यांनी ईयोबला पाहिले तेव्हा तो ईयोबच आहे याची त्यांना खात्री वाटेना. तो खूप वेगळा दिसत होता. त्यांनी मोठ्याने रडायला सुरुवात केली. आपले दु:ख प्रकट करण्यासाठी त्यांनी आपले कपडे फाडले आणि धूळ आपल्या डोक्यावर उडवून घेतली.
13 नंतर तिन्ही मित्र सात दिवस व सात रात्री ईयोब बरोबर बसून राहिले. ईयोबशी कुणी एक शब्दही बोलले नाही कारण ईयोब किती सहन करत आहे ते त्यांना दिसत होते.
धडा 3

1 नंतर ईयोबने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसाला शाप दिला. इयोब आपल्या जन्मदिवसाला शाप देतो
2 तो म्हणाला,“मी ज्या दिवशी जन्मलो तो दिवस कायमचा नष्ट होवो. ज्या रात्री ‘तो मुलगा आहे’ असे म्हटले गेले ती रात्र कधीच आली नसती तर बरे झाले असते असे मला वाटते.
3
4 तो दिवस काळाकुटृ झाला असता, देवाला त्याचे विस्मरण झाले असते, त्या दिवशी उजेड पडला नसता तर फार बरे झाले असते.
5 तो दिवस मृत्यूसारखा काळा होवो. ढगही त्या दिवशी लपले असते आणि काळ्या ढगांनी प्रकाशाला घाबरवले असते तर बरे झाले असते असे मला वाटते.
6 अंधाराने त्या रात्रीला ठेवून घ्यावे. दिनदर्शिकेतून ती रात्र नष्ट होवो. तिचा अंर्तभाव कुठल्याही महिन्यात होऊ नये.
7 त्या रात्रीतून काहीही निर्माण होऊ नये. आनंददायी आवाज त्या रात्री ऐकू न येवोत.
8 जादुगाराने शापवाणी उच्चारावी आणि माझ्या जन्मदिवसाला शापावे. ते लिव्याथानाला चेतविण्यास सदैव तत्पर असतात.
9 त्या दिवसाचे पहाटेचे तारे काळे होवोत. त्या रात्रीला पहाटेच्या प्रकाशाची वाट बघू दे पण तो प्रकाश कधीही न येवो. सूर्याचे पाहिले किरण तिला कधीही न दिसोत.
10 का? कारण त्या रात्रीने माझ्या जन्माला अटकाव केला नाही. ही संकटे बघण्यापासून तिने मला परावृत केले नाही.
11 मी जन्माला आलो तेव्हाच का मरुन गेलो नाही? मी जन्मत:च का मेलो नाही?
12 माझ्या आईने मला आपल्या मांडीवर का घेतले? तिने मला स्तनपान का दिले?
13 मी जर जन्मत:च मेलो असतो तर आता मी अगदी शांत असतो. पूर्वी होऊन गेलेल्या राजेलोकांच्यात आणि विद्वानांच्यामध्ये मी झोपी गेलो असतो आणि विश्रींती घेतली असती तर किती बरे झाले असते.
14 त्या लोकांनी आपल्यासाठी प्रासाद आणि शहरे बांधली परंतु आता ती ओसाड आणि उध्वस्त झाली आहेत.
15 ज्या राजांनी आपली थडगी वा घरे सोन्या रुप्यांनी भरली त्यांच्या बरोबरच माझेही दफन झाले असते तर बरे झाले असते.
16 मी जन्मत:च मेलेले आणि जमिनीत पुरले गेलेले मूल का झालो नाही? दिवसाच्या प्रकाशाचा किरणही न पाहिलेले मूल मी असतो तर बरे झाले असते.
17 वाईट लोक थडग्यात गेल्यानंतरच त्रास देण्याचे थांबवितात. आणि जे लोक दमलेले असतात त्यांना थडग्यात विश्रांती मिळते.
18 थडग्यात कैद्यांनाही विसावा मिळतो. तेथे त्यांना रक्षकांचे ओरडणे ऐकू येत नाही.
19 थडग्यात, स्मशानात अनेक प्रकारचे लोक असतात, लहान थोर सर्व तेथे असतात, गुलामांचीही तेथे आपल्या मालकापासून सुटका होते.
20 “दु:खी कष्टी लोकांनी का जगत राहायचे? ज्याचा आत्मा कटू आहे अशाला जीवन का द्यायचे?
21 ज्याला मरायचे आहे त्याला मरण येत नाही, दु:खी माणूस गुप्त खजिन्यापेक्षा मृत्यूच्या शोधात असतो.
22 ते लोक थडगे दिसल्यावर अधिक सुखी होतील. आपली कबर मिळाली की आनंदी होतील.
23 परंतु देव त्यांचे भविष्य नेहमी गुप्त ठेवतो आणि त्यांच्या भोवती संरक्षक भिंत उभारतो.
24 जेव्हा खायची प्यायची वेळ होते तेव्हा मी दु:खाचा नि:श्वास टाकतो सुखाचा नाही! माझ्या तक्रारी, माझे गाऱ्हाणे पाण्यासारखे बाहेर ओतले जाते.
25 काहीतरी भयानक घडणार असल्याची मला सतत धास्ती वाटत होती. आणि तेच घडले. जे भयानक घडणार आहे अशी भीती वाटत होती तेच माझ्या बाबतीत घडले.
26 मी शांत होऊ शकत नाही. मी स्वस्थ राहू शकत नाही. मी विसावा घेऊ शकत नाही. मी अतिशय अस्वस्थ आहे.
धडा 4

1 तेमानच्या अलिफाजाने उत्तर दिले:“मी काहीतरी बोललेच पाहिजे. मी जर काही म्हटले तर तू अस्वस्थ होशील का?”
2
3 ईयोब, तू खूप लोकांना शिकवलं आहेस. अशक्त हातांना तू शक्ती दिली आहेस.
4 खाली पडणाऱ्या लोकांना तू तुझ्या शब्दांनी सावरले आहेस. ज्यांच्यात स्वत:हून उभे राहण्याचे बळ नव्हते त्यांना तू सबळ केले आहेस.
5 पण आता तुझ्यावर संकटे आली असताना तू खचला आहेस. संकटे कोसळल्यावर तू कष्टी झाला आहेस.
6 तू देवाची भक्ती करतोस. तुझा त्याच्यावर विश्वास आहे. तू चांगला माणूस आहेस आणि तीच तुझी आशा असू दे.
7 “ईयोब, तू याचा विचार कर. निष्पाप माणसाचा कधी नाश केला गेला नाही. चांगल्या लोकांचा कधीच नि:पात होत नाही.
8 मला काही अन्यायी आणि आयुष्य कष्टी करणारे लोक माहित आहेत, पण अशा लोकांना नेहमी शासन होते.
9 असे लोक देवाच्या शिक्षेमुळे मारले जातात. देवाचा क्रोध त्यांना नष्ट करतो.
10 वाईट लोक सिंहासारखी गर्जना करतात आणि गुरगुर करतात. परंतु देव त्यांना मुके करतो आणि त्यांचे दात पाडतो.
11 हे वाईट लोक ठार मारण्यासाठी ज्यांना कोणी प्राणी मिळत नाही अशा सिंहाप्रमाणे असतात. ते मरतात आणि त्यांची मुले इतस्तत: भटकत राहातात.
12 “माझ्याकडे गुप्तपणे एक निरोप आला आणि माझ्या कानी त्याची कुजबुज पडली.
13 त्यामुळे एखाद्या भयंकर स्वप्नाने झोप चाळवावी तशी माझी झोप चाळवली गेली.
14 मी घाबरलो. माझा थरकाप झाला. माझी सगळी हाडे थरथर कापू लागली.
15 एक आत्मा अगदी माझ्या चेहऱ्याजवळून गेला आणि माझ्या शरीरावरचे सगळे केस उभे राहिले.
16 तो आत्मा निश्र्चल उभा राहिला पण ते काय होते ते मला दिसू शकले नाही. माझ्या डोळ्यांसमोर एक आकार होता आणि सर्वत्र शांतता होती. आणि नंतर मला एक हलका आवाज ऐकू आला:
17 ‘देवापेक्षा माणूस जास्त बरोबर असू शकत नाही. माणूस त्याच्या निर्मात्यापेक्षा अधिक पवित्र असू शकत नाही.
18 हे बघा, देव त्याच्या स्वर्गातील दूतांवर देखील विश्वास टाकू शकत नाही. त्याला स्वत:च्या दूतांमध्ये सुध्दा काही दोष आढळतात.
19 तेव्हा माणसे नक्कीच वाईट आहेत. ते मातीच्या घरात राहातात (म्हणजे त्यांचे शरीर नाशवंत आहे) आणि या मातीच्या घरांचा पाया मातीतच असतो. ते पतंगापेक्षाही (किड्यापेक्षाही) अधिक सहजतेने चिरडले जातात.
20 माणसे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मरत असतात आणि ते कोणाच्या लक्षातही येत नाही. ते मरतात आणि कधीच परत न येण्यासाठी निघून जातात.
21 त्यांच्या तंबूच्या दोन्या वर खेचल्या जातातआणि ते शहाणपणा न मिळवताच मरतात.’
धडा 5

1 “ईयोब, हवे तर तू कुणाला हाक मार. पण तुला कुणीही ओ देणार नाही. देवदूतांपैकी कुणाकडेही तू वळू शकत नाहीस.
2 मुर्खाचा अनावर राग त्याला मारुन टाकतो. मूर्खाचा संतापच त्याचा घात करतो.
3 अगदी वैभवात असेल असे ज्याबद्दल वाटले असा एक मूर्ख मला दिसला पण अचानक त्याचा घात झाला.
4 त्याच्या मुलांना कुणीही मदत करु शकले नाही. कोर्टात त्यांच्या बाजूने लढायला कुणीही नव्हते.
5 भुकेल्या माणसांनी त्याची उभी पिके खाऊन टाकली. काट्याकु्यात वाढलेले धान्यही त्यांनी सोडले नाही. लोभी माणसांनी सर्व काही नेले.
6 वाईट दिवस धुळीतून येत नाहीत आणि संकटे मातीतून उगवत नाहीत.
7 अग्रीतून ठिणग्या उडतात तशी संकटे झेलण्यासाठीच माणूस जन्माला येतो.
8 पण ईयोब, मी जर तुझ्या जागी असतो तर देवाकडेच गेलो असतो. त्याला माझे गान्हाणे सांगितले असते.
9 देव ज्या आश्र्चर्यकारक गोष्टी करतो त्या माणसाला समजत नाहीत. त्याच्या अद्भुत गोष्टींची सीमा नाही.
10 देव पृथ्वीवर पाऊस आणतो. शेतांना पाणी देतो.
11 तो नम्र लोकांना उच्चस्थानी बसवतो आणि दु:खी जीवांना खूप आनंदी करतो.
12 देव धूर्तांचे कार्य बंद पाडतो आणि त्यांना सफलता मिळू देत नाही.
13 13तो विद्वानांना त्यांच्याच कचाट्यात पकडतो त्यामुळे त्यांचे कार्य सिध्दीस जात नाही. (मसलत फुकट जातेते दिवसासुध्दा ठेचाळतात.
14 ते धूर्त, भर दिवसासुध्दा अडखळतात. भर दुपारच्या वेळेला ते आंधळ्यासारखे त्यांचा रस्ता चाचपडत जातात.
15 देव गरीबांना मरणापासून वाचवतो. त्यांची धूर्ताच्या कचाट्यातून मुक्तता करतो.
16 म्हणूनच गरीबांना आशा वाटते. देव अन्यायी लोकांना नष्ट करतो.
17 “देव ज्याला चांगल्या मार्गावर आणतो तो नशीबवान होय. म्हणून सर्वशक्तिमान देवाच्या शिक्षेबद्दल तक्रार करु नकोस.
18 देव त्याने केलेल्या जखमांवर मलमपट्टी करतो. तो दुखापत करतो पण त्याचे हात ती बरी करतात.
19 देव तुला सहा प्रकारच्या संकटांतून तारील. आणि सात संकटांत तुला काहीही अपाय होणार नाही.
20 दुष्काळात देव तुला मृत्यूपासून वाचवेल आणि युध्दातही तो तुझे मृत्यूपासून रक्षण करेल.
21 लोक त्यांच्या धारदार जिभेने तुझ्याबद्दल वाटेल ते बोलतील परंतु देव तुझे रक्षण करेल. जेव्हा काही वाईट घडेल तेव्हा तुला घाबरुन जाण्याची गरज नाही.
22 तू विनाशात व दुष्काळात हसशील. तुला रानटी पशूंची भीती वाटणार नाही.
23 तू देवाशी करार केला आहेस तेव्हा मैदानातले खडकही तुझ्या या करारात सहभागी आहेत. रानटी पशूही तुझ्याशी सलोखा करतील.
24 तू शांती व समाधानात राहशील कारण तुझा तंबू सुरक्षीत आहे. तू तुझ्या संपत्तीची मोजदाद केलीस तर तुला त्यात काही कमतरता आढळणार नाही.
25 तुला खूप मुले असतील. पृथ्वीवर जितकी गवताची पाती आहेत तितकी मुले तुला असतील.
26 हंगामाच्या वेळेपर्यंत वाढणाऱ्या गव्हासारखा तू असशील. हो तू अगदी म्हातारा होईपर्यंत जगशील.
27 “ईयोब, आम्ही या साऱ्यांचा अभ्यास केला आहे आणि ते सर्व खरे आहे. म्हणून तू आमचे ऐक. आणि त्यातून स्वत:साठी काही शिक.”
धडा 6

1 नंतर ईयोबने उत्तर दिले:“जर माझ्या दु:खाचे वजन करता आले आणि माझ्या कष्टांना वजनाच्या काट्यात तोलता आले तर तुम्ही माझ्या दु:खाची कल्पना करु शकाल.
2
3 माझे दु:ख समुद्रातल्या वाळूपेक्षा जड आहे. म्हणूनच मी मूर्खासारखी बडबड करतो असे वाटते.
4 त्या सर्वशक्तीमान देवाचे बाण माझ्यात आहेत. माझ्या आत्म्याला त्या बाणांच्या विषाची जाणीव होते. देवाची भयानक शस्त्रे माझ्या विरुध्द सज्ज आहेत.
5 काहीही वाईट घडलेले नसते तेव्हा तुझे शब्द सहजपणे बोलता येतात. रानटी गाढवसुध्दा खायला गवत असले की कसली तक्रार करीत नाही. आणि गायसुध्दा तिला तिचा चारा मिळाला की मुकाट असते.
6 अन्न मिठाशिवाय चांगले लागत नाही आणि अंड्यातल्या पांढऱ्या भागाला काही चव नसते.
7 मी त्याला स्पर्शही करु शकत नाही. तसल्या बेचव अन्नाची मला शिसारी येते. तुमचे शब्दही मला आता तसेच वाटायला लागले आहेत.
8 “मी जे मागेन ते मला मिळायला पाहिजे असे मला वाटते. मला जे हवे ते देवाने द्यायला पाहिजे असे मला वाटते.
9 मला देवाच्या हातून मरण हवे. त्याने मला चिरडून टाकावे.
10 आणि जेव्हा तो मला मारेल तेव्हा मला एका गोष्टीचे समाधान मिळेल, एका गोष्टीबद्दल मी आनंदी असेन, या सगळ्या दु:खातही मी पवित्र परमेश्वराच्या आज्ञेचा कधीही भंग केला नाही.
11 “माझी शक्ती आता संपली आहे, त्यामुळे जगण्याची इच्छा माझ्यात नाही. माझे काय होणार आहे याची मला काहीच कल्पना नाही. त्यामुळे ज्याच्यासाठी धीर धरावा असे काही कारण उरलेले नाही.
12 मी पाषाणासारखा शक्तीमान नाही. माझे शरीर पितळेचे बनलेले नाही.
13 आता स्वत:ला सावरायची ताकद माझ्यात नाही. का? कारण यश माझ्यापासून हिरावून घेण्यात आले आहे.
14 “एखाद्यावर संकट आले तर त्याच्या मित्रांनी त्याला दया दाखवावी आणि आपला मित्र सर्वशक्तीमान देवापासून दूर गेला तरी माणसाने मित्राशी निष्ठा ठेवली पाहिजे.
15 पण मित्रांनो, तुम्ही मात्र निष्ठावान नाही. मी तुमच्यावर विसंबून राहू शकत नाही. जे कधी वाहतात, कधी वाहात नाहीत अशा ओढ्यासारखे तुम्ही आहात. ओढे जेव्हा हिमाने आणि
16 वितळणाऱ्या बफर्ाने गच्च होतात व दुथडी भरुन वाहू लागतात तसे तुम्ही आहात.
17 जेव्हा हवामान उष्ण आणि कोरडे होते तेव्हा पाणी वाहात नाही आणि ओढे नाहीसे होतात.
18 व्यापारी त्याची नागमोडी वळणे शोधत वाळवंटात जातात परंतु ते दिसेनासे झालेले असतात.
19 तेमाच्या व्यापाऱ्यांनी पाणी शोधले. शबाच्या प्रवाशांनी आशेने त्याचा शोध घेतला.
20 त्यांना पाणी सापडण्याची खात्री होती परंतु त्यांची निराशा झाली.
21 आता तुम्ही त्या ओढ्यासारखे आहात. तुम्ही माझ्या संकटांना पाहून घाबरता.
22 मी तुम्हाला मदत मागितली का? नाही. पण तुम्ही आपणहून मला उपदेश केला.
23 ‘माझे शत्रूपासून रक्षण करा! क्रूर लोकांपासून मला वाचवा!’ असे मी तुम्हाला म्हटले का?
24 “आता तुम्ही मला शिकवा म्हणजे मी शांत होईन. माझी काय चूक झाली ते मला दाखवा.
25 प्रामाणिक शब्द नेहमीच सामर्थ्यशाली असतात. परंतु तुमचे वादविवाद काहीच सिध्द करु शकत नाहीत.
26 माझ्यावर टीका करण्याचा तुमचा उद्देश आहे का? तुम्ही आणखी कंटाळवाणे बोलणार आहात का?
27 पोरक्या मुलांच्या वस्तू जिंकून घेण्यासाठी तुम्ही जुगार खेळायलाही तयार आहात. तुम्ही तुमच्या मित्रालाही विकून टाकाल.
28 पण आता माझ्याकडे लक्षपूर्वक पाहा. मी तुमच्याशी खोटे बोलणार नाही.
29 तुम्ही आता तुमचा विचार बदला. अन्यायी होऊ नका. पुन्हा विचार करा. मी काहीही चूक केलेली नाही.
30 मी खोटे बोलत नाही आणि खऱ्या-खोट्यातला फरक मला कळतो.”
धडा 7

1 ईयोब म्हणाला:“मनुष्याला पृथ्वीवर खूप धडपड करावी लागते. त्याचे आयुष्य मजुराच्या आयुष्यासारखे असते.
2 गुलामाप्रमाणे माणसालाही उन्हातान्हात काम केल्यानंतर थंडगार सावलीची गरज भासते. माणूस काम केल्यानंतर पगाराच्या दिवसाची वाट वघणान्या मजुराप्रमाणे आहे.
3 महिन्या मागून महिने निराशेत निघून गेले. माझ्या वाट्याला रात्रीमागून रात्र कष्टाचीच आली.
4 मी झोपी जाण्याच्या वेळी विचार करतो उठण्यासाठी किती वेळ आहे याचा आणि रात्र संपतच नाही. सूर्य उगवेपर्यंत मी या कुशीवरुन त्या कुशीवर तळमळत असतो.
5 माझे शरीर किड्यांनी आणि घार्णीनी भरलेले आहे. माझी कातडी सोलवटलेली आणि वाहत्या जखमांनी भरलेली आहे.
6 “माझे दिवस विणकऱ्याच्या मागापेक्षा भरभर जातात आणि माझे आयुष्य आशेशिवाय संपते.
7 देवा, माझे आयुष्य म्हणजे केवळ श्र्वास आहे हे आठव. मी पुन्हा कधीही काही चांगले पाहणार नाही.
8 आणि तुम्ही मला पुन्हा कधीही पाहणार नाही. तुम्ही मला शोधाल तेव्हा मी गेलेला असेन.
9 ढग दिसेनासा होतो आणि निघून जातो. त्याचप्रमाणे माणूस मरतो आणि थडग्यात पुरला जातो. तो पुन्हा कधीही परत येत नाही.
10 तो त्याच्या जुन्या घरात कधीही परत येणार नाही. त्याचे घर त्याला ओळखणार नाही.
11 “तेव्हा मी गप्प बसणार नाही. मी बोलेन. माझ्या आत्म्याला क्लेश होत आहेत. माझा आत्मा अगदी कडू जहर झाला आहे म्हणून मी तक्रार करीन.
12 देवा, तू माझ्यावर पाहारा का करीत आहेस? मी समुद्र आहे की त्यातला अक्राळ विक्राळ प्राणी?
13 माझे अंथरुणच मला स्वस्थता देऊ शकेल. माझा बिछानाच मला विश्रांती आणि स्वास्थ्य देईल.
14 पण देवा, मी जेव्हा स्वस्थ पडतो तेव्हा तू मला भयानक स्वप्नांनी घाबरवतोस. आणि तुझ्या दृष्टांतांनी मला भय वाटते.
15 म्हणून जगण्यापेक्षा गुदमरुन मरणे मी पसंत करतो.
16 मी माझ्या जीवनाचा तिरस्कार करतो. मी आशा सोडून दिली आहे. मला जगण्याची आसक्ती नाही. मला एकटा सोडून दे. माझ्या जीवनाला काही अर्थ नाही.
17 देवा, माणूस तुला इतका महत्वाचा वाटतो? तू त्याला इतका आदर का दाखवावास? तू त्याची दखल तरी का घेतोस?
18 तू त्याला रोज सकाळी का भेटतोस? आणि क्षणाक्षणाला त्याची परीक्षा का घेतोस?
19 देवा, तू एक क्षणभरही माझ्यावरची तुझी नजर वळवीत नाहीस. तू मला एक क्षणही एकटा सोडीत नाहीस.
20 देवा, तू लोकांवर नजर ठेवतोस. मी पाप केले असले तरी मी आता काय करु शकतो? तू मला तुझे लक्ष्य का बनवत आहेस? मी तुझ्यासाठी एक समस्या बनलो आहे का?
21 तू मला माझ्या पापाबद्दल क्षमा का करुन टाकीत नाहीस? मी लवकरच मरेन आणि माझ्या थडग्यात जाईन. तू नंतर माझा शोध घेशील पण मी गेलेला असेन.”
धडा 8

1 नंतर शूहीच्या बिल्ददने उत्तर दिले,
2 “तू किती वेळपर्यंत असा बोलत राहणार आहेस? तुझे शब्द सोसाट्याच्या वाऱ्यासारखे उडत आहेत.
3 देव नेहमीच न्यायी असतो. तो सर्वशक्तिमान देव बरोबर असलेल्या गोष्टी कधीच बदलत नाही.
4 तुझ्या मुलांनी देवाविरुध्द काही पाप केले असेल म्हणून त्यांना देवाने शिक्षा केली.
5 परंतु ईयोब, आता तू त्याच्या कडे लक्ष दे आणि त्या सर्वशक्तिमान देवाची दयेसाठी आवर्जून प्रार्थना कर.
6 तू जर चांगला आणि पवित्र असलास तर तुला मदत करण्यासाठी तो त्वरित येईल. तुझे कुटुंब तुला परत देईल.
7 नंतर तुझ्याकडे सुरुवातीला होते त्यापेक्षा किती तरी अधिक असेल.
8 “वृध्दांना त्यांचे पूर्वज काय काय शिकले ते विचार.
9 आपण अगदी कालच जन्माला आलो आहोत असे आपल्याला वाटते. सर्व जाणून घेण्याच्या दृष्टीने आपण खूप लहान आहोत. छायेप्रमाणे आपले पृथ्वीतलावरचे दिवस खूप कमी आहेत.
10 तुला कदाचित् वृध्द शिकवू शकतील. ते जे शिकले तेच तुलाही शिकवतील.”
11 बिल्दद म्हणाला: “लव्हाळी वाळवटांत उंच वाढू शकतात का? गवत (बोरु) पाण्याशीवाय उगवू शकेल का?
12 नाही, पाणी जेव्हा आटून जाते, तेव्हा तेही सुकून जातात. आणि कापून त्यांचा उपयोग ही करुन घेता येत नाही कारण ते खूपच लहान असतात.
13 जे लोक देवाला विसरतात ते या गवतासारखे असतात. जो देवाला विसरतो त्याला आशा नसते.
14 माथा टेकवण्यासाठी त्याच्या जवळ कुठेही जागा नसते. त्याची सुरक्षितता कोळ्याच्या जाळ्यासारखी असते.
15 तो जर कोळ्याच्या जाळ्यावर टेकला तर ते मोडेल. त्याने त्याचा आधार घेतला तरी ते त्याला आधार देऊ शकणार नाही.
16 मनुष्य खूप पाणी व सूर्यप्रकाश मिळालेल्या वनस्पतीसारखा आहे. तिच्या फांद्या सर्व बागेत पसरतात.
17 तिची मुळे खडकांभोवती आवळली जातात आणि खडकांवरही उगवण्याचा प्रयत्न करतात.
18 परंतु ती वनस्पती तिच्या जागेवरुन हलवली तर मरते आणि कुणालाही तिथे ती कधी होती हे कळत नाही.
19 परंतु ती वनस्पती आनंदी असते कारण तिच्याच जागी दुसरी वनस्पतीवाढत असते.
20 देव निरागस लोकांना सोडून देत नाही. तो वाईट माणसांना मदतही करत नाही.
21 देव तुझे तोंड हास्याने भरुन टाकेल आणि तुझे ओठ आनंदी चित्कारांनी!
22 पण तुझे शत्रू मात्र लज्जेची वस्त्रे घालतील आणि दुष्ट माणसांची घरे नष्ट होतील.”
धडा 9

1 मग ईयोब उत्तरा दाखल म्हणाला:
2 “तू जे काही म्हणत आहेस ते खरे असल्याची जाणीव मला आहे, परंतु देवापुढे माणूस कसा बरोबर ठरेल?
3 मनुष्य देवाशी वाद घालू शकत नाही. देव हजार प्रश्र्न विचारु शकतो आणि माणसाला त्याच्या एकाही प्रश्र्नाचे उत्तर देता येत नाही.
4 देव खूप विद्वान आहे आणि त्याची शक्ती अमर्याद आहे. देवाशी युध्द करु शकणारा माणूस जखमी झाल्याशिवाय कसा राहील?
5 देव क्रोधित झाला की पर्वत हलवतो आणि लोकांना ते कळत देखील नाही.
6 पृथ्वीचा थरकाप करण्यासाठी देव भूकंप पाठवतो. देव पृथ्वीचा पायाच हलवून टाकतो.
7 देव सूर्याशी बोलू शकतो आणि त्याला उगवू देत नाही. ताऱ्यांनी चमकू नये म्हणून देव त्यांना लपवू शकतो.
8 देवाने एकट्याने आकाश निर्माण केले. तो सागराच्या लाटांवर चालतो.
9 देवाने सप्तर्षि, मृगशील व कृत्तिका यांना निर्माण केले. दक्षिणेकडचे आकाशओलांडणारे ग्रहही त्यानेच निर्माण केले.
10 लोकांना न कळणाऱ्या आश्र्चर्यकारक गोष्टीही देवानेच निर्मिल्या. देवाच्या अद्भुत कृत्यांची सीमा नाही.
11 देव जेव्हा माझ्या जवळून जातो तेव्हा मी त्याला बघू शकत नाही. तो जातो तरी त्याची महानता माझ्या लक्षात येत नाही.
12 देवाने जरी काही घेतले तरी त्याला कोणीही अडवू शकत नाही. ‘तू काय करीत आहेस?’ असे त्याला कुणी विचारु शकत नाही.
13 देव त्याचा क्रोध काबूत ठेवणार नाही. राहाबाचे मदतनीससुध्दा देवाला घाबरतात.”
14 म्हणून मी देवाशी वाद घालू शकत नाही. त्याच्याशी काय बोलावे ते मला सुचणार नाही.
15 मी निष्याप आहे, पण मी त्याला उत्तर देऊ शकणार नाही. मी केवळ माझ्या देवाची कृपादृष्टी मिळावी म्हणून याचना करु शकतो.
16 मी हाक मारल्यानंतर त्याने ओ दिली तरी तो माझे ऐकतो यावर मी विश्वास ठेवणार नाही.
17 देव मला चिरडण्यासाठी वादळे पाठवील. काहीही कारण नसताना तो मला जखमा देईल.
18 देव मला माझा श्वास परत घेऊ देणार नाही. तो मला अधिक कष्ट देईल.
19 मी देवाचा पराभव करु शकत नाही. तो सर्वशक्तिमान आहे. मी त्याला न्यायालयात खेचू शकत नाही आणि त्याला माझ्या बाबतीत न्यायी बनवू शकत नाही. देवाला न्यायालयात नेण्यासाठी बळांचा वापर कोण करेल?
20 मी निष्पाप असलो तरी, माझे बोलणेच मला अपराधी बनवते. मी निष्पाप आहे, पण मी बोलल्यावर माझे तोंडच मला अपराधी शाबीत करते.
21 मी निष्पाप आहे, पण काय विचार करावा ते मला कळत नाही. मी माझ्याच आयुष्याचा धिक्कार करतो.
22 मी स्वत:शीच म्हणतो: ‘सगळ्याच्याच बाबतीत हे घडते. पापी लोकांसारखेच निष्पाप लोकही मरतात. देवच सगळ्यांचे जीवन संपवतो.’
23 काही तरी भयानक घडते आणि निष्पाप माणूस मरतो तेव्हा देव त्याला फक्त हसतो का?
24 एखादा वाईट माणूस सत्ता बळकावतो तेव्हा देव पुढाऱ्यांना जे घडते आहे ते बघण्यापासून दूर ठेवतो का? हे जर खरे असेल तर देव म्हणजे आहे तरी कोण?
25 “माझे दिवस एखाद्या धावपटू पेक्षाही वेगाने धावतात. माझे दिवस उडून जातात आणि त्यात सुखाचा लवलेशही नसतो.
26 भूर्जपत्रापासून बनवलेली जहाज जशी वेगात जाते तसे माझे दिवस वेगात सरतात. गरुडाने आपल्या भक्ष्यावर झडप घालावी त्या प्रमाणे माझे दिवस अतिशय वेगात जातात.
27 “मी जरी म्हणालो, ‘की मी तक्रार करणार नाही, माझे दु:ख विसरेन, मी चेहऱ्यावर हास्य आणेन.
28 तरी त्यामुळे काहीही बदल होणार नाही. दु:खाचे मला अजूनही भय वाटते.
29 मी आधीच अपराधी ठरवला गेलो आहे. मग प्रयत्न तरी कशाला करायचे? मी म्हणतो, ‘विसरुन जा सारे!’
30 मी माझे अंग बफर्ाने धुतले आणि हात साबणाने स्वच्छ केले.
31 तरीही देव मला घाणीच्या खड्ड्यात ढकलेल. नंतर माझे स्वत:चे कपडे देखील माझा तिरस्कार करतील.
32 देव माझ्यासारखा माणूस नाही. म्हणूनच मी त्याला उत्तर देऊ शकत नाही. आम्ही न्यायालयात एकमेकांना भेटू शकणार नाही.
33 दोन्ही बाजूऐकून घेणारा कुणी मध्यस्थ असावा असे मला वाटते. मध्यस्थ आम्हा दोघांना सारख्याच न्यायाने तोलणारा असावा.
34 देवाच्या शिक्षेची छडी दूर करणारा कुणी असावा असे मला वाटते. त्यामुळे देव मला भीती घालू शकणार नाही.
35 नंतर देवाला न घाबरता मला जे काही म्हणायचे आहे ते मी म्हणू शकेन. परंतु आता मात्र मी तसे करु शकत नाही.
धडा 10

1 मी माझ्या स्वत:च्या आयुष्याचा तिरस्कार करतो म्हणून मी मुक्तपणे तक्रार करीन. माझा आत्मा कडू जहर झालेला आहे म्हणून मी आता बोलेन.
2 मी देवाला म्हणेन, ‘मला दोष देऊ नकोस. मी काय चूक केली आहे ते मला सांग. माझ्याविरुध्द तुझ्या मनात काय आहे?
3 देवा, मला कष्ट देण्यात मुला सुख वाटते का? तुझ्या निर्मिती विषयी तुलाच आस्था नसावी असे वाटते, की वाईट लोकांनी ज्या मसलती केल्या त्या बाबतीत तू समाधानी आहेस?
4 देवा, तुला मानवी डोळे आहेत का? लोकांना दिसते ते तुला दिसते का?
5 तुझे आयुष्य आमच्या आयुष्याइतकेच लहान आहे का? ते माणसाच्या आयुष्याइतकेच थोडे आहे का? नाही तर मग त्या विषयी तू कसे जाणून घेतोस?
6 तू माझ्या चुका शोधत असतोस, माझी पापं धुंडाळीत असतोस.
7 मी निष्पाप आहे हे तुला माहित आहे. परंतु तुझ्या हातातून मला कुणीही वाचवू शकणार नाही.
8 देवा, तुझ्या हातांनी माझी निर्मिती केली, माझ्या शरीराला आकार दिला. परंतु आता तेच हात माझ्याभोवती आवळले जात आहेत आणि माझा नाश करीत आहेत.
9 देवा, जरा आठव तू मला मातीसारखे बनवलेस. आता तूच परत माझी माती करणार आहेस का?
10 तू मला दुधासारखे ओतलेस आता दही घुसळणाऱ्याप्रमाणे तू मला घुसळून बदलणार आहेस का?
11 हाडे आणि स्नायू यांनी तू मला एकत्र बांधलेस. नंतर तू मला कातडीचे आणि मांसाचे कपडे चढविलेस.
12 तू माझ्यात प्राण ओतलेस आणि माझ्याशी अंत्यत दयाळू राहिलास. तू माझी काळजी वाहिलीस आणि माझ्या जीवाचे रक्षण केलेस.
13 परंतु तू हे तुझ्या हृदयात लपवून ठेवलेस तू तुझ्या हृदयात याची गुप्तपणे आखणी केलीस हे मला माहित आहे. तुझ्या मनात हेच होते याची जाणीव मला आहे.
14 मी पाप करतो तेव्हा तू माझ्यावर नजर ठेवतोस कारण त्यामुळेच माझ्या पापाबद्दल तू मला शिक्षा करशील
15 पाप केल्यावर मी अपराधी असेन आणि माझ्या दृष्टीने ते फारच वाईट असेल. परंतु मी निष्पाप असूनही माथा उंच करु शकत नाही. मला खूप लाज वाटते आणि मी गोंधळून जातो.
16 मी जेव्हा यशस्वी होतो आणि मला गर्व चढू लागतो तेव्हा शिकाऱ्याने सिंहाची शिकार करावी तशी तू माझी शिकार करतोस. तू तुझे सामर्थ्य पुन्हा माझ्याविरुध्द दाखवितोस.
17 माझी चूक सिध्द करण्यासाठी तुझ्याकडे नेहमीच कुणीतरी असते. माझ्यावराचा तुझा राग अधिकच भडकेल. तू माझ्याविरुध्द सैन्याची आणखी कुमक पुन: पुन्हा आणशील.
18 म्हणून देवा, तू मला जन्माला तरी का घातलेस? मी कुणाच्या दृष्टीस पडण्याआधीच मेलो असतो तर बरे झाले असते.
19 मी जगलोच नसतो तर बरे झाले असते. माझ्या मातेच्या उदरातून मला सरळ थडग्यातच नेले असते तर किती चांगले झाले असते.
20 माझे आयुष्य जवळ जवळ संपले आहे, म्हणून तू मला एकटे सोड. जिथून कुणीही परत येत नाही तिथे म्हणजे अंधार आणि मृत्यूच्या जागी जाण्यापूर्वी जो काही थोडा वेळ माझ्यासाठी उरला आहे त्याचा मला उपभोग घेऊ दे.
21
22 काळोखाच्या गर्भात, मृत्यूलोकात जाण्यासाठी जो थोडा वेळ अजून आहे तो मला सुखाने घालवू दे, जिथून कुणीही परत येत नाही अशा काळोखाने दाट छायेने आणि गोंधळाने भरलेल्या, ज्या जागी प्रकाशसुध्दा अंधकारमय आहे अशा जागी जाण्यापूर्वी मला सुखाने जगू दे.”‘
धडा 11

1 नंतर नामाथीच्या सोफरने ईयोबला उत्तर दिले:तो म्हणाला,
2 “शब्दांच्या या भाडिमाराला उत्तर द्यायलाच हवे. ह्या सगळ्या बोलण्याने ईयोब बरोबर ठरतो का? नाही.
3 ईयोब, आमच्याजवळ तुला द्यायला उत्तर नाही असे तुला वाटते का? तू देवाला हसशील तेव्हा तुला कुणी ताकीद देणार नाही असे तुला वाटते का?
4 ईयोब तू देवाला म्हणतोस, ‘मी जे बोलतो ते बरोबर आहे आणि मी शुध्द पवित्र आहे हे तू बघू शकतोस.’
5 ईयोब देवाने तुला उत्तर द्यावे आणि तू चुकतो आहेस हे तुला सांगावे असे मला वाटते.
6 देव तुला ज्ञानाचे रहस्य सांगू शकेल. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हे तो तुला सांगेल. तुला जेवढी शिक्षा करायला हवी तेवढी देव करत नाही हे तू समजून घे.
7 “ईयोब, तू देवाला खरोखरीच समजू शकतोस असे तुला वाटते का? त्या सर्वशक्तिमान देवाला समजणे अशक्य आहे.
8 त्याचं शहाणपण स्वर्गाच्या उंचीइतकं आहे, तू काय करु शकतोस? ते मृत्यूच्या ठिकाणापेक्षा शेओलपेक्षा खोल आहे. तू काय जाणू शकतोस?
9 देव पृथ्वीपेक्षा मोठा आहे आणि सागरापेक्षा महान आहे.
10 “देवाने जर तुला कैद करुन न्यायालयात न्यायचे ठरवले, तर त्याला कोणीही अडवू शकत नाही.
11 कवडीमोलाचा कोण आहे ते देवाला माहीत आहे. तो ज्या वाईट गोष्टी बघतो त्या त्याच्या लक्षात राहातात.
12 रानटी गाढव माणसाला जन्म देऊ शकत नाही. आणि मूर्ख माणूस कधीही शहाणा होऊ शकणार नाही.
13 “पण ईयोब फक्त देवाची सेवा करण्यासाठी तू तुझ्या मनाची तयारी केली पाहिजेस आणि तू तुझे हात त्याची उपासना करण्यासाठी त्याच्या दिशेने उचलले पाहिजेस.
14 तुझ्या घरात असलेले पाप तू दूर ठेवले पाहिजेस. तुझ्या डेऱ्यात वाईट गोष्टींना थारा देऊ नकोस.
15 तरच तू उजळ माथ्याने देवाकडे बघू शकशील. तू न भीता सर्व सामर्थानिशी उभा राहू शकशील.
16 नंतर तू तुझे दु:ख विसरशील. तुझे दु:ख निचरा झालेल्या पाण्यासारखे वाहून जाईल.
17 भर दुपारच्या सूर्य प्रकाशापेक्षाही तुझे आयुष्य चमकदार होईल. आयुष्यातील अंधार सकाळच्या सूर्याप्रमाणे चमकेल.
18 नंतर तुला सुरक्षित वाटेल. कारण तेव्हा तिथे आशा असेल. देव तुझी चिंता वाहील आणि तुला विश्रांती देईल.
19 तू विश्रांती घेण्यासाठी आडवा होऊ शकशील आणि तुला कोणीही त्रास देणार नाही. तुझ्याकडे खूप लोक मदतीसाठी येतील.
20 वाईट लोकही मदतीची अपेक्षा करतील. परंतु त्यांची संकटापासून सुटका नाही त्यांची आशा त्यांना मृत्यूकडे नेईल.”
धडा 12

1 नंतर ईयोबने उत्तर दिले:
2 “तुम्हीच फक्त शहाणे आहात असे तुम्हाला वाटते याबद्दल माझी खात्री आहे. तुम्ही मेल्यानंतर तुमच्याबरोबरच शहाणपणाही जाईल असे तुम्हाला वाटते.
3 माझेही मन तुमच्या मनाइतकेच चांगले आहे, मीही तुमच्या इतकाच हुशार आहे. कोणालाही दिसेल की सत्य आहे.
4 “माझे मित्र मला आता हसत आहेत. ते म्हणतात, ‘त्याने देवाची प्रार्थना केली आणि त्याला उत्तर मिळाले. केवळ त्यामुळेच एवढ्या सगळ्या वाईट गोष्टी त्याच्या बाबतीत घडल्या.’ मी चांगला आहे मी निष्पाप आहे, पण तरीही ते मला हसतात.
5 ज्यांच्यावर संकटे येत नाहीत तेच लोक संकटे कोसळलेल्या लोकांना हसतात. तेच लोक खाली पडलेल्याला मारतात.
6 परंतु चोरांचे तंबू समृध्द होतात. जे लोक देवाला क्रोध आणतात ते शांततेने राहातात. केवळ त्यांची स्वत:ची शक्तीच त्यांचा देव असतो.
7 “तुम्ही प्राण्यांना विचारा, ते तुम्हाला शिकवतील किवा हवेत उडणाऱ्या पक्ष्यांना विचारा ते तुम्हाला सांगतील.
8 किंवा पृथ्वीला विचारा, ती तुम्हाला शिकवेल. समुद्रातल्या माशांना त्यांचे शहाणपण सांगू द्या.
9 या सर्व गोष्टी देवाने निर्माण केल्या आहेत हे सर्वांना ठाऊक आहे.
10 जगणारा प्रत्येक प्राणी आणि श्वास घेणारा प्रत्येक माणूस देवाच्या अधिपत्याखाली असतो.
11 ज्याप्रमाणे तोंडाला आवडत्या आणि नावडत्या अन्नातील फरक कळतो त्याप्रमाणे कानालाही शहाणपणाच्या आणि मूर्खपणाच्या शब्दातील फरक कळतो.
12 ‘वृध्द माणसे शहाणी असतात. दीर्घायुष्याने समजुतदारपणा येतो.’
13 ईयोब आणखी म्हणाला,: देवाच्या ठायी विद्वत्ता आणि सामर्थ्य आहेत. त्याच्याजवळ चांगला उपदेश आणि समजूतदारपणाही आहे.
14 देव जेव्हा एखादी गोष्ट उध्वस्त करतो तेव्हा लोकांना ती परत उभारता येत नाही. देवाने जर एखाद्याला तुरुंगात टाकले तर लोक त्याची सुटका करु शकत नाहीत.
15 देवाने जर पाऊस पडू दिला नाही तर पृथ्वी सुकून जाईल आणि जर त्याने पावसाला मोकळे सोडले तर सारी पृथ्वी जलमय होऊन जाईल.
16 देव सर्वशक्तीमान आहे आणि तो नेहमीच जिंकतो. जिंकणारे आणि हरणारे सर्वच देवाचे आहेत.
17 देव उपदेशकांना त्यांच्या विद्वत्तेपासून वंचित करतो आणि पुढाऱ्यांना मूर्खासारखे वागायला लावतो.
18 राजांनी जरी लोकांना तुरुंगात डांबले तरी देव त्यांची सुटका करतो. आणि त्यांना सामर्थ्यवान बनवतो.
19 तो याजकांचे सामर्थ्य काढून घेतो आणि मंदिरातील सेवकांना फारसे महत्व देत नाही.
20 देव विश्र्वासू उपदेशकांना गप्प बसवतो आणि वृध्दांची विद्वत्ता काढून घेतो.
21 तो पुढाऱ्यांचे महत्व कमी करतो आणि शासकांची सत्ता काढून घेतो.
22 देवाला काळीकुटृ रहस्ये माहित असतात. मृत्युलोकातल्या काळोखापेक्षा अधिक काळोख असलेल्या ठिकाणी तो प्रकाश पाठवतो.
23 तो राष्ट्रांना महान आणि सामर्थ्यवान बनवतो आणि नंतर तो ते नष्ट करतो. तो देशांना मोठे होऊ देतो आणि नंतर त्यांतील लोकांना विखरवून टाकतो.
24 देव नेत्यांना मूर्ख बनवतो. तो त्यांना वाळवंटात इकडे तिकडे मार्गहीन भटकायला लावतो.
25 हे नेते अंधारात वाट शोधणाऱ्या माणसाप्रमाणे असतात. दारु प्यायलेल्या माणसाला जसे आपण कुठे जात आहोत ते कळत नाही, तसे ते असतात.”
धडा 13

1 ईयोब म्हणाला: “हे सर्व मी पूर्वी पाहिले आहे, तू जे म्हणालास ते सर्व मी आधीच ऐकले आहे. त्या सर्व गोष्टी मला समजतात.
2 तुला जेवढे माहीत आहे तेवढेच मलाही माहीत आहे. मी तुझ्या इतकाच हुशार आहे.
3 परंतु मला तुझ्याशी वाद घालायचा नाही. मला सर्वशक्तीमान देवाशी बोलायचे आहे. मला देवाबरोबर माझ्या संकटांविषयी बोलायचे आहे.
4 तुम्ही तिघेजण खोटे बोलून तुमचे अज्ञान लपवीत आहात. ज्या वैद्याला कुणालाही बरे करता येत नाही अशा निरुपयोगी वैद्यासारखे तुम्ही आहात.
5 तुम्ही गप्प बसावे अशी माझी इच्छा आहे. ती तुम्हाला करता येण्याजोगी सर्वात शहाणपणाची गोष्ट असेल.
6 “आता माझ्या युक्तिवादाकडे लक्ष द्या मी काय म्हणतो ते ऐका.
7 तुम्ही देवासाठी खोटे बोलाल का? तुमचे खोटे बोलणे देवाच्या इच्छेनुसार आहे असे तुम्हाला वाटते का?
8 तुम्ही माझ्याविरुध्द देवाचा बचाव करीत आहात का? तुम्ही मुळीच न्यायाने वागत नाहीत तो देव आहे म्हणून तुम्ही त्याची बाजू घेत आहात.
9 जर देवाने अगदी जवळून तुमची तपासणी केली तर, त्याला काही तरी चांगले आढळेल का? तुम्ही लोकांना जसे मूर्ख बनवू शकता तसेच देवालाही बनवू शकाल असे तुम्हाला वाटते का?
10 तुम्ही जर एखादा माणूस महत्वाचा आहे म्हणून न्यायालयात त्याची बाजू घेतलीत तर देव तुमच्यावर टीका करेल हे तुम्हाला माहीत आहे.
11 देवाचे मोठेपण तुम्हाला घाबरवते. तुम्ही त्याला भीता.
12 तुमचे युक्तिवाद कुचकामाचे आहेत. तुमची उत्तरे कवडीमोलाची आहेत.
13 “आता जरा गप्प बसा आणि मला बोलू द्या! माझे जे काही होईल ते मला मान्य आहे.
14 मी मलाच संकटात लोटीन आणि माझ्याच हातात माझेच जीवन धरीन?
15 देवाने मला मारुन टाकले तरी मी देवावरच विश्वास ठेवीन. पण मी त्याच्या समोर माझा बचाव करीन.
16 आणि देवाने जर मला जिवंत राहू दिले तर ते मी बोलण्याइतका धीट होतो म्हणूनच असेल. पापी माणूस देवाच्या डोळ्याला डोळा भिडवू शकणार नाही.
17 मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐका. मला नीट सांगू द्या.
18 मी आता माझ्या बचावाला सिध्द झालो आहे. मी माझे मुद्दे काळजीपूर्वक मांडीन. मला माहीत आहे की मी बरोबर आहे हे मी दाखवून देईन.
19 माझे चुकले आहे असे जर कुणी दाखवून दिले तर मी गप्प बसेन.
20 “देवा, तू मला फक्त दोन गोष्टी दे, मग मी तुझ्यापासून लपणार नाही.
21 मला शिक्षा देणे बंद कर आणि तुझ्या भयानक गोष्टींनी मला भयभीत करण्याचे थांबव.
22 नंतर मला हाक मार. मी तुला ओ देईन किंवा मला बोलू दे आणि तू मला उत्तर दे.
23 मी किती पापे केली आहेत? मी काय चुका केल्या आहेत? तू मला माझी पापे आणि माझ्या चुका दाखव.
24 देवा, तू मला का चुकवीत आहेस? आणि मला शत्रूसारखे का वागवीत आहेस?
25 2तू मला घाबरवतो आाहेस का? मी वाऱ्यावर उडणारे एक पान मात्र आहे. तू गवताच्या एका काडीवर आक्रमण करीत आहेस.
26 देवा, तू माझ्याबद्दल फार कटू बोलतोस. मी तरुणपणात जी पापे केली त्याबद्दल तू मला कष्ट भोगायला लावतो आहेस का?
27 तू माझ्या पायात बेड्या घातल्या आहेस. माझ्या प्रत्येक पावलावर तू पाळत ठेवतोस, माझी प्रत्येक हालचाल तू टिपतोस.
28 म्हणून मी कुजलेल्या लाकडासारखा, कसरीने खाल्लेल्या कापडासारखा क्षीण होत चाललो आहे”
धडा 14

1 ईयोब म्हणाला: “आपण सर्व मनुष्यप्राणी आहोत. आपले आयुष्य अगदी कमी आणि कष्टांनी भरलेले आहे.
2 माणसाचे आयुष्य फुलासारखे आहे. तो लवकर वाढतो आणि मरुन जातो. माणसाचे आयुष्य छायेसारखे आहे. ती थोडा वेळ असते आणि नंतर नाहीशी होते.
3 ते खरे आहे पण देवा, माझ्याकडे एका माणसाकडे तू लक्ष देशील का? आणि तू माझ्याबरोबर न्यायालयात येशील का? आपण दोघेही आपापली मते मांडू या का?
4 “परंतु एखाद्या घाणेरड्या वस्तूचे स्वच्छ वस्तूशी काय साम्य असू शकते काहीच नाही.
5 माणसाचे आयुष्य मर्यादित आहे देवा, माणसाने किती जगायचे ते तूच ठरवतोस. तूच त्याची मर्यादा निश्र्चित करतोस आणि ती कुणीही बदलू शकत नाही.
6 देवा, म्हणून तू आमच्यावर नजर ठेवणे बंद कर. आम्हाला एकटे सोड. आमची वेळ संपेपर्यंत आमचे हे कष्टप्रद आयुष्य आम्हाला भोगू दे.
7 “वृक्षाला तोडून टाकले तरी त्याच्याबाबतीत आशा असते. ते पुन्हा वाढू शकते त्याला नवीन फांद्या फुटतच राहतात.
8 त्याची मुळे जरी जमिनीत जुनी झाली आणि त्याचे खोड जमिनीत मरुन गेले.
9 तरी ते पाण्यामुळे पुन्हा जिवंत होते. आणि त्याला नवीन रोपासारख्या फांद्या फुटतात.
10 परंतु माणूस जेव्हा मरतो तेव्हा तो संपतो. माणूस मरतो तेव्हा तो कायमचा जातो.
11 नद्या सुकून जाईपर्यंत तुम्ही समुद्रातील पाणी घेऊ शकता. तरीही माणूस मरुन जातो.
12 माणूस मरतो तेव्हा तो झोपतो आणि पुन्हा कधीही उठत नाही. आकाश नाहीसे होईपर्यंत मेलेला माणूस उठणार नाही. मनुष्यप्राणीत्या झोपेतून कधीच जागा होत नाही.
13 “तू मला माझ्या थडग्यात लपवावेस असे मला वाटते. तुझा राग निवळेपर्यंत तू मला तिथे लपवावेस. नंतर तू तुझ्या सोयीने माझी आठवण करु शकतोस.
14 मेलेला माणूस पुन्हा जिवंत होऊ शकतो का? मी माझी सुटका होईपर्यंत वाट बघत राहीन.
15 देवा तू मला हाक मारशील आणि मी तुला उत्तर देईन.मग जे तू मला निर्माण केलेस तो मी तुला महत्वाचा वाटेन.
16 तू माझी प्रत्येक हालचाल निरखशील. पण माझ्या पापांची तुला आठवण होणार नाही.
17 तू माझी पापे एखाद्या पिशवीत बांधून ठेवावीस अंसे मला वाटते. ती पिशवी मोहोरबंद कर आणि फेकून दे.
18 “डोंगर पडतात आणि नष्ट होतात. मोठमोठे खडक फुटतात आणि त्यांच्या ठिकऱ्या होतात.
19 खडकावरुन वाहणारे पाणी त्यांची झीज करते. पुरामुळे जमिनीवरची माती वाहून जाते. त्याचप्रमाणे देवा, तू माणसाची आशा नष्ट करतोस.
20 तू त्याचा संपूर्ण पराभव करतोस आणि मग तू तेथून निघून जातोस. तू त्याला दु:खी करतोस आणि त्याला नेहमीसाठी मृत्यूलोकात पाठवून देतोस.
21 त्यांच्या मुलांना मानसन्मान प्राप्त झाला तर ते त्याला कळत नाही. त्याच्या मुलांनी काही चुका केल्या तर त्या त्याला कधी दिसत नाहीत.
22 त्या माणसाला फक्त त्याच्या स्वत:च्या शारीरिक दु:खाची जाणीव असते. आणि तो केवळ स्वत:साठीच रडतो.”
धडा 15

1 नंतर तेमानच्या अलीफजने ईयोबला उत्तर दिले:
2 “ईयोब, जर तू खरोखरच शहाणा असशील तर तू पोकळ शब्दांनी उत्तर देणार नाहीस. शहाणा माणूस गरम हवेने इतका भरलेला नसतो.
3 विद्वान निरुपयोगी शब्दांनी आणि निरर्थक बोलण्याने वाद घालत बसेल असे तुला वाटते का?
4 ईयोब तुला जर तुझ्या मनाप्रमाणे वागू दिले तर कोणीही माणूस देवाला मान देणार नाही आणि त्याची प्रार्थना करणार नाही.
5 तुझ्या बोलण्यावरुन तुझे पाप चांगले कळते. ईयोब तू हुशारीने बोलून तुझे पाप लपवायचा प्रयत्न करीत आहेस.
6 तू चुकत आहेस हे सिध्द करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. का? कारण तू तुझ्या तोंडाने जे बोलतोस ते तू चुकात असल्याचे सिध्द करतात. तुझे स्वत:चेच ओठ तुझ्याविरुध्द बोलतात.
7 “ईयोब, जन्माला येणारा तू पहिलाच माणूस आहेस असे तुला वाटते का? टेकड्या निर्माण व्हायच्या आधीच तू जन्मलास का?
8 तू देवाच्या गुप्त मसलती ऐकल्यास का? केवळ तूच एक शहाणा माणूस आहेस असे तुला वाटते का?
9 ईयोब, तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त माहिती आहे. तुला न कळणाऱ्या गोष्टी आम्हाला समजतात.
10 केस पांढरे झालेले लोक आणि वृध्द आमच्याशी सहमत आहेत. होय, तुझ्या वडिलांपेक्षा वृध्द असलेले लोक आमच्या बाजूला आहेत.
11 देव तुझे सांत्वन करतो पण ते तुला पुरेसे वाटत नाही. देवाचा निरोप आम्ही तुला अगदी हळुवारपणे दिला आहे.
12 ईयोब, तू का समजून घेत नाहीस? तू सत्य का पाहात नाहीस?
13 तू हे रागाचे शब्द उच्चारतोस तेव्हा तू देवाच्या विरुध्द जातोस.
14 “मनुष्य कधीही निष्कलंक असू शकत नाही. मनुष्यप्राणी देवापेक्षा अधिक बरोबर असू शकत नाही.
15 देव त्याच्या पवित्र दूतांवर विश्र्वास ठेवत नाही. देवाशी तुलना करता स्वर्गसुध्दा निर्मळ नाही.
16 मनुष्याप्राणी सर्वांत वाईट आहे, तो अशुध्द आणि कुजलेला आहे. तो वाईट गोष्टी पाण्यासारख्या पितो.
17 “ईयोब, तू माझे ऐक मी तुला नीट सांगतो. मला जे माहीत आहे ते मी तुला सांगतो.
18 विद्वानांनी ज्या गोष्टी मला सांगीतल्या, त्या मी तुला सांगतो. विद्वानांच्या पूर्वजांनी त्यांना या गोष्टी सांगीतल्या. त्यांनी माझ्यापासून कुठलीही गुप्त गोष्ट लपवून ठेवली नाही.
19 ते त्यांच्या देशात एकटे राहात होते, तिथून दुसऱ्या देशांतील लोक जात नसत. त्यामुळे इतरांनी कुणी त्यांना काही विचित्र कल्पना सांगितल्या नाहीत.
20 हे विद्वान लोक म्हणाले, “दुष्ट माणूस जीवनभर यातना भोगतो. क्रूर माणूस मरण येईपर्यंत भीतीने कापत असतो. (क्रूर माणसाचे दिवस भरलेले असतात. तो त्या दिवसांत ही यातना भोगतो.)
21 त्याला प्रत्येक आवाजाची भीती वाटते. जेव्हा आपण सुरक्षित आहोत असे त्याला वाटते तेव्हा त्याचा शत्रू त्याच्यावर हल्ला करतो.
22 दुष्ट माणूस निराश झालेला असतो. व त्याला अंधारातून सुटका होण्याची आशा नसते. त्याला मारण्यासाठी तलवार टपून बसलेली असते.
23 तो इकडे तिकडे भटकत राहातो परंतु त्याचे शरीर गिधाडांचे अन्न असते. आपला मृत्यू अगदी जवळ आला आहे हे त्याला माहीत असते.
24 त्याला काळजी आणि यातना भयभीत करतात. एखाद्या राजाप्रमाणे त्याला नष्ट करण्यासाठी त्या त्याच्यावर हल्ला करतात.
25 का? कारण दुष्ट मनुष्य देवाची आज्ञा मानायला तयार नसतो. तो त्याच्या मुठी देवासमोर नाचवतो. तो सर्वशक्तिमान देवाचा पराभव करायचा प्रयत्न करतो.
26 दुष्ट माणूस अतिशय हट्टी असतो. तो जाड आणि मजबूत ढालीने देवावर हल्ला करतो.
27 “माणूस श्रीमंत आणि धष्टपुष्ट असू शकतो.
28 पण त्याचे शहर धुळीला मिळेल. त्याच्या घराचा नाश होईल. त्याचे घर रिकामे होईल.
29 दुष्ट माणूस फार दिवस श्रीमंत राहू शकत नाही. त्याची संपत्ती खूप दिवस टिकत नाही. त्याची पिके जास्त वाढत नाहीत.
30 दुष्ट माणसाची काळोखापासून सुटका नसते. तो त्या झाडासारखा असतो ज्याची पाने रोगामुळे मरतात आणि वारा त्यांना दूर उडवून नेतो.
31 निरुपयोगी गोष्टींवर विश्वास ठेवून दुष्ट माणसाने स्वत:चीच फसवणूक करुन घेऊ नये, का? कारण त्याला त्यातून काहीही मिळणार नाही.
32 आयुष्य संपायच्या आधीच दुष्ट माणूस म्हातारा आणि शुष्क झालेला असेल. तो पुन्हा कधीही हिरव्या न होणाऱ्या फंादीसारखा असेल.
33 दुष्ट माणूस द्राक्ष न पिकता गळून गेलेल्या द्राक्षाच्या वेलीसारखा असेल. तो फूल गळून गेलेल्या जैतून झाडाप्रमाणे असेल.
34 का? कारण ज्यांच्या जवळ देव नसतो त्यांच्याजवळ काहीही नसते. जे लोक पैशावर प्रेम करतात त्यांची घरे आगीत भस्मसात होतात.
35 दुष्ट माणसे सतत दुष्टपणा करण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी योजना आखत असतात. ते लोकांना फसविण्यासाठी योजना तयार करतात.”
धडा 16

1 नंतर ईयोबने उत्तर दिले,
2 “या सर्व गोष्टी मी पूर्वी ऐकल्या आहेत. तुम्ही तिघे जण मला त्रास देता, आराम नव्हे.
3 तुमची लांबलचक भाषणे कधीही संपत नाहीत. तुम्ही वाद घालणे का सुरु ठेवले आहे?
4 जर तुमच्यावर माझ्यासारखे संकट आले असते, तर जे आता तुम्ही म्हणत आहात तेच मीही म्हणू शकलो असतो. मी तुमच्याविरुध्द शहाणपणाच्या गोष्टी सांगू शकलो असतो आणि माझे डोके तुमच्यासमोर हलवू शकलो असतो.
5 पण मी तुम्हाला धीर देऊ शकलो असतो आणि माझ्या बोलण्याने तुमच्यात आशा निर्माण केली असती.
6 “परंतु मी काहीही बोललो तरी माझ्या यातना कमी होत नाहीत. पण मी बोललो नाही तर मला शांती लाभत नाही.
7 देवा, खरोखरच तू माझी शक्ती हिरावून घेतली आहेस. तू माझ्या सर्व कुटुंबाचा नाश केला आहेस.
8 तू मला खूप बारीक व अशक्त केले आहे म्हणून मी अपराधी आहे असे लोकांना वाटते.
9 “देव माझ्यावर हल्ला करतो. तो माझ्यावर रागावला आहे आणि तो माझे शरीर छिन्न विछिन्न करतो. तो माझ्याविरुध्द दात खातो, माझ्या शत्रूचे डोळे माझ्याकडे तिरस्काराने बघतात.
10 लोक माझ्या भोवती जमले आहेत. ते माझी थट्टा करतात व तोंडावर मारतात.
11 देवाने मला दुष्ट लोकांच्या स्वाधीन केले आहे. त्याने क्रूर माणसांना मला त्रास द्यायची परवानगी दिली आहे.
12 मी अगदी मजेत होतो. पण देवाने मला चिरडून टाकले. हो त्याने माझी मान पकडली आणि माझे तुकडे तुकडे केले. त्याने माझा निशाण्यासारखा उपयोग केला.
13 त्याचे धनुर्धारी मला घेरतात. तो माझ्या मुत्रपिंडात बाण सोडतो. तो दया दाखवीत नाही. तो माझे मूत्राशय धरतीवर रिकामे करतो.
14 देव माझ्यावर पुन्हा पुन्हा हल्ला करतो. युध्दातल्या सैनिकाप्रमाणे तो माझ्यावर चाल करुन येतो.
15 “मी फार दु:खी आहे म्हणून मी दु:खाचे कपडे घालतो. मी इथे धुळीत आणि राखेत बसतो आणि मला पराभूत झाल्यासारखे वाटते.
16 रडल्यामुळे माझा चेहरा लाल झाला आहे. माझ्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे आहेत.
17 मी कुणाशीही दुष्टपणाने वागलो नाही. तरीही माझ्या बाबतीत या वाईट गोष्टी घडल्या. माझ्या प्रार्थना नेहमी बरोबर आणि शुध्द असतात.
18 “हे धरतीमाते, माझ्यावर जे जुलूम झाले आहेत ते लपवू नकोस. मी न्यायासाठी भीक मागतो आहे ते थांबवू नकोस.
19 स्वर्गात कदाचित् माझ्या बाजूचा कुणीतरी असेल. कदाचित् मला पाठिंबा देणारा आणि माझा बचाव करणारा कुणी तिथे असेल.
20 माझा मित्र माझ्यासाठी बोलतो. पण माझे डोळे देवासमोर अश्रू ढाळतात.
21 जशी एखादी व्यक्ति आपंल्या मित्रासाठी वादविवाद करते तसा तो माझ्याविषयी देवाबरोबर बोलतो.
22 “मी अगदी थोड्या वर्षातच पुन्हा कधीही परतून न येणाऱ्या जागी जाणार आहे (मृत्युलोक).
धडा 17

1 माझा आत्मा भंगला आहे. मी आशा सोडून दिली आहे. माझे आयुष्य जवळ जवळ संपले आहे आणि थडगे माझी वाट पाहात आहे.
2 लोक माझ्याभोवती उभे राहातात आणि मला हसतात. ते मला चिडवतात. माझा अपमान करतात. तेव्हा मी फक्त बघत राहतो.
3 “देवा, तुझा मला खरोखरच पाठिंबा आहे हे मला दाखव. दुसरे कुणीही मला पाठिंबा देणार नाही.
4 “तू माझ्या मित्रांच्या मनाची कवाडे बंद करुन टाकलीस आणि आता त्यांना काही कळत नाही. कृपा करुन तू त्यांना विजयी होऊ देऊ नकोस.
5 “लोक काय म्हणतात ते तुला माहीत आहे ‘एखादा माणूस मित्रालामदत करण्यासाठी स्वत:च्या मुलांकडे दुर्लक्ष करतो’ परंतु माझे मित्र मात्र माझ्या विरुध्द गेलेत.
6 देवाने माझे नाव म्हणजे सर्वासाठी एक शिवी केली. लोक माझ्या तोंडावर थुंकतात.
7 दु:ख आणि यातना यांनी मी जवळ जवळ आंधळा झालो आहे, माझे शरीर छायेप्रमाणे अतिशय बारीक झाले आहे.
8 यामुळे चांगले लोक फार व्यथित झाले आहेत. देवाची पर्वा न करणाऱ्या लोकांमुळे निष्पाप लोक व्यथित होतात.
9 पण चांगली माणसे मात्र न्यायाने जीवन जगत राहातात. निष्पाप लोक अधिक सामर्थ्यवान होतात.
10 “पण तुम्ही सर्व एकत्र या आणि या सगळ्यात माझीच चूक आहे हे मला दाखवून द्या. तुमच्या पैकी कुणीही विद्वान नाही.
11 माझे आयुष्य संपत चालले आहे. माझ्या योजना धुळीला मिळवल्या गेल्या आणि माझी आशा नष्ट झाली.
12 माझे मित्र गोंधळून गेले आहेत. त्यांना रात्र दिवसासारखी वाटते. अंधार प्रकाशाला पळवून लावतो असे त्यांना वाटते.
13 “थडगेच माझे नवीन घर असेल अशी मी आशा करतो. अंधाऱ्या थडग्यांत माझे अंथरुण घालण्याची इच्छा मी धरतो.
14 “तू माझा जन्मदाता आहेस’ असे मी थडग्याला आणि किड्यांना ‘माझी आई’ किंवा ‘बहीण’ म्हणू शकेन.
15 परंतु मला जर तेवढी एकच आशा असेल, तर मला मुळीच आशा नाही. मला जर तेवढी एकच आशा असेल तर लोकांना मी आशे शिवायच दिसेन.
16 माझी आशा माझ्याबरोबरच मरेल का? ती सुध्दा मृत्युलोकात जाईल का? आम्ही बरोबरच मातीत जाऊ का?”
धडा 18

1 नंतर शूहीच्या बिल्ददने उत्तर दिले:
2 “ईयोब, तू बोलणे केव्हा बंद करणार आहेस? शांत राहा आणि लक्ष दे. आम्हाला काही बोलू दे.
3 आम्ही पशूसारखे मूर्ख आहोत असे तू का मानतोस?
4 ईयोब तुझा राग तुलाच अधिक त्रासदायक होत आहे. केवळ तुझ्यासाठी लोकांनी हे जग सोडून जावे का? देव केवळ तुझ्या समाधानसाठी डोंगर हलवेल असे तुला वाटते का?
5 “हो दुष्ट माणसाचा प्रकाश नाहीसा होईल. त्याचा अग्री पेटणे बंद होईल.
6 त्यांच्या घरातला प्रकाश अंधकारमय होईल. त्यांच्या जवळचा दिवा विझेल.
7 त्याची पाऊले पुन्हा दमदारपणे व भरभर पडणार नाहीत. तो हळु हळु चालेल आणि अशक्त बनेल. त्याच्या दुष्ट मसलती त्याचा अध:पात करतील.
8 त्याचेच पाय त्याला सापळ्यात अडकवतील. तो आपणहून सापळ्यात जाईल आणि त्यात अडकेल.
9 सापळा त्याची टाच पकडेल. त्याला घटृ पकडून ठेवेल.
10 जमिनीवरची दोरी त्याला जाळ्यात अडकवेल. सापळा त्याची त्याच्या मार्गातच वाट बघत असेल.
11 दहशत चहुबाजूंनी त्याची वाट पाहात आहे. भीती त्याच्या प्रत्येक पावलावर पाठलाग करीत आहे.
12 वाईट संकटे त्याच्यासाठी भुकेली आहेत. विध्वंस आणि अरिष्ट तो पडण्याचीच वाट पहात आहेत.
13 भयानक रोग त्याची कातडी खाऊन टाकेल. तो त्याचे हातपाय कुजवेल.
14 दुष्ट माणूस त्याच्या घराच्या सुरक्षिततेपासून दूर नेला जाईल. त्याला भयाच्या राजापुढे हजर करण्यासाठी दूर नेले जाईल.
15 त्याच्या घरात काहीही शिल्लक राहाणार नाही. का? कारण त्याच्या घरात सर्वत्र जळते गंधक विखरण्यात येईल.
16 त्याची खालची मुळे सुकून जातील आणि वरच्या फांद्या मरतील.
17 पृथ्वीवरील लोकांना त्याची आठवण राहाणार नाही. आता त्याची आठवण कुणालाही येणार नाही.
18 लोक त्याला प्रकाशापासून दूर अंधारात ढकलतील. लोक त्याचा पाठलाग करुन या जगातून पळवून लावतील.
19 त्याला मुले आणि नातवंडे असणार नाहीत. त्याच्या कुटुंबातले कुणीही जिवंत असणार नाही.
20 पश्र्चिमेकडचे लोक जेव्हा या दुष्ट माणसाचे काय झाले ते ऐकतील तेव्हा त्यांना धक्का बसेल. आणि पूर्वेकडचे लोक भयाने बधीर होतील.
21 दुष्ट माणसाच्या घराचे खरोखरच असे होईल. जो माणूस देवाची पर्वा करीत नाही त्याच्याबाबतीत असेच घडेल.”
धडा 19

1 नंतर ईयोबने उत्तर दिले:
2 “तुम्ही मला किती वेळ त्रास देणार आहात? आणि शब्दांनी मला मोडणार आहात?
3 तुम्ही आतापर्यंत दहा वेळा माझा अपमान केला आहे. तुम्ही माझ्यावर हल्ला करता तेव्हा अजिबात लाज, शरम बाळगीत नाही.
4 “मी पाप केले असेल तर तो माझा प्रश्र आहे. तुम्हाला त्याचा उपद्रव होत नाही.
5 तुम्ही माझ्यापेक्षा चांगले आहात एवढेच तुम्हाला दाखवायचे आहे, माझी संकटे माझ्या चुकीमुळेच निर्माण झाली आहेत असे तुम्ही (उगीचच) म्हणता.
6 परंतु देवानेच माझ्यावर अन्याय केला आहे. त्यानेच मला पकडण्यासाठी सापळा रचला.
7 ‘त्याने मला दुखवले’ असे मी ओरडतो. पण मला उत्तर मिळत नाही. मी मदतीसाठी जोरात ओरडलो तरी न्यायासाठी असलेले माझे रडणे कुणाला ऐकू येत नाही.
8 मी पुढे जाऊ नये म्हणून देवाने माझ्या मार्गात अडथळा आणला. त्याने माझा मार्ग अंधारात लपविला.
9 देवाने माझी प्रतिष्ठा धुळीला मिळवली. त्याने माझ्या डोक्यावरचा मुकुट काढून घेतला.
10 माझा सर्वनाश होईपर्यंत देव मला चाऱ्ही बाजूंनी झोडपतो. एखादे झाड मुळासकट उपटून काढावे त्याप्रमाणे त्याने माझ्या आशा उपटून नेल्या.
11 त्याचा क्रोध मला जाळीत आहे. तो मला त्याचा शत्रू म्हणतो.
12 देव त्याचे सैन्य माझ्यावर हल्ला करण्यासाठी पाठवतो. ते माझ्याभोवती मोर्चा उभारतात. ते माझ्या डेऱ्याभोवती छावणी टाकतात.
13 “देवाने माझ्या भावांना माझा द्वेष करायला भाग पाडले. माझ्या सर्व मित्रांमध्ये मी परका झालो आहे.
14 माझे नातलग मला सोडून गेले. माझे मित्र मला विसरले.
15 माझ्या घरी येणारे पाहुणे आणि माझ्या दासी मला परका आणि परदेशातला समजतात.
16 “मी माझ्या नोकराला बोलावतो पण तो उत्तर देत नाही. मी मदतीसाठी याचना केली तरी माझा नोकर उत्तर देणार नाही.
17 माझी बायको माझ्या श्वासाच्या वासाचा तिरस्कार करते. माझे भाऊ माझा तिरस्कार करतात.
18 लहान मुलेदेखील मला चिडवतात. मी त्यांच्याजवळ जातो तेव्हा ते माझ्याबद्दल वाईटसाईट बोलतात.
19 माझे जवळचे मित्रदेखील माझा तिरस्कार करतात. माझे ज्यांच्यावर प्रेम आहे ते लोक देखील माझ्याविरुध्द गेले आहेत.
20 “मी इतका कृश झालो आहे की माझी कातडी हाडांवर लोबंते. आता माझ्यात जिवंतपणाचा मागमुसही उरलेला नाही.
21 “माझी दया येऊ द्या. मित्रांनो, तुम्हाला माझी दया येऊ द्या! का? कारण देव माझ्यावर उलटला आहे.
22 देव जसा माझा छळ करीत आहे तसा तुम्ही पण माझा छळ का करीत आहात? मला सतत त्रास देण्याचा तुम्हाला कंटाळा येत नाही का?
23 “मी जे बोलतो ते कुणीतरी लक्षात ठेवून पुस्तकात लिहून ठेवावे असे मला वाटते. माझे शब्द पाषाणात कोरुन ठेवायला हवेत असे मला वाटते.
24 मी जे बोलतो ते लोखंडी कलमाने शिश्यावर किंवा पाषाणावर कोरुन कायम करायला हवे असे मला वाटते.
25 माझा बचाव करणारा कोणी तरी आहे याची मला खात्री आहे. तो हयात आहे हे मला माहीत आहे. आणि शेवटी तो या पृथ्वीतलावर येऊन उभा राहील आणि माझा बचाव करील.
26 मी जेव्हा माझे शरीर सोडून जाईन तेव्हा आणि माझी कातडी नष्ट होईल तेव्हा सुध्दा मी देवाला पाहू शकेन.
27 मी देवाला माझ्या डोळ्यांनी बघेन. अन्य कुणी नाही, तर मी स्वत:च त्याला पाहीन. आणि त्यामुळे मी किती हुरळून गेलो आहे ते मी सांगू शकत नाही.
28 तुम्ही कदाचित् म्हणाल: ‘आपण ईयोबचा छळ करु. त्याला दोषी ठरवण्यासाठी काहीतरी कारण शोधून काढू.
29 परंतु तुम्हाला स्वत:लाच तलवारीची भीती वाटायला हवी का.? कारण देव दोषी माणसांना शिक्षा करतो. देव तुम्हाला शिक्षा करण्यासाठी तलवारीचा उपयोग करेल. नंतर तुम्हाला कळेल की न्यायाचीसुध्दा वेळ यावी लागते.”
धडा 20

1 नंतर नामाथीचा शोफर म्हणाला:
2 “ईयोब, तुझे त्रस्त झालेले विचार मला तुला उत्तर द्यायला भाग पाडत आहेत. माझ्या मनात कोणते विचार चालले आहेत ते मी तुला लगेच सांगायला हवे.
3 तुझ्या उत्तरांनी तू आमचा अपमान केला आहेस परंतु मी शहाणा आहे. उत्तर कसे द्यायचे ते मला माहीत आहे.
4 “वाईट मनुष्याचा आनंद जास्त काळ टिकत नाही तुला हे माहीत आहे. आदाम या पुथ्वीतलावर आला त्या अतिप्राचीन काळापासूनचे हे सनातन सत्य आहे. जो माणूस देवाची पर्वा करीत नाही तो फारच थोडा काळ सुखी होतो.
5
6 दुष्ट माणसाचा अहंकार गगनाला जाऊन भिडेल आणि त्याचे मस्तक ढगांपर्यत पोहोचू शकेल.
7 परंतु त्याच्या विष्ठेप्रमाणे त्याचा मात्र नाश झालेला असेल. जे लोक त्याला ओळखतात ते विचारतील, ‘तू कुठे आहे?’
8 तो एखाद्या स्वप्नासारखाउडून जाईल व तो कोणालाही सापडणार नाही. त्याला घालवून देण्यात येईल आणि एखाद्या दु:स्वप्रासारखा तो विसरलाही जाईल.
9 ज्या लोकांनी त्याला पाहिले होते, त्यांना तो पुन्हा दिसणार नाही. त्याचे कुटुंब पुन्हा कधी त्याच्याकडे बघणार नाही,
10 दुष्ट माणसाने गरीब लोकांकडून जे काही घेतले होते ते त्याची मुले परत करतील. दुष्ट माणसाचे स्वत:चे हातच त्याची संपत्ती परत करतील.
11 तो तरुण होता तेव्हा त्याची हाडे मजबूत होती. परंतु आता इतर अवयवांप्रमाणे त्यांची सुध्दा माती होईल.
12 “दुष्टाला वाईट गोष्टी चांगल्या वाटतात. तो त्यांची चव नीट कळावी म्हणून त्या आपल्या जिभेखाली ठेवतो.
13 दुष्ट माणसाला वाईट गोष्टी आवडतात म्हणून तो त्यांना सोडीत नाही. गोडगोळीसारखं तो त्या आपल्या तोंडात ठेवतो.
14 परंतु त्या वाईट गोष्टीच त्याच्या पोटात विष होतील. त्याच्या आत त्याचे सर्वाच्या विषासारखे कडू जहर होईल.
15 दुष्ट माणसाने श्रीमंती गिळली तरी तो ती ओकून टाकेल. देव त्याला ती ओकायला भाग पाडेल.
16 दुष्ट माणसाचे पेय म्हणजे सर्पाचे विष. सर्पाचा दंशच त्याला मारुन टाकील.
17 नंतर दुष्ट मनुष्य मधाने आणि दुघाने भरुन वाहाणाऱ्या नद्या बघण्याचे सौख्य अनुभवू शकणार नाही.
18 दुष्ट माणसाला त्याचा नफा परत करणे भाग पडेल. त्याने जे सुख मिळवण्यासाठी कष्ट केले ते सुख भोगण्याची परवानगी त्याला मिळणार नाही.
19 का? कारण त्याने गरीबांना कष्ट दिले. त्यांना वाईट वागवले. त्याने त्यांची काळजी घेतली नाही. त्यांच्या वस्तू हिसकावून घेतल्या. दुसऱ्यांनी बांधलेली घरे त्यानी बळकावली.
20 “दुष्ट माणूस कधीही समाधानी नसतो. त्याची श्रीमंती त्याला वाचवू शकत नाही.
21 तो खातो तेव्हा काहीही शिल्लक ठेवीत नाही. त्याचे यश टिकणार नाही.
22 दुष्ट मनुष्याकडे जेव्हा भरपूर असेल तेव्हा तो संकटांनी दबून जाईल. त्याच्या समस्या त्याच्यावर कोसळतील.
23 दुष्ट माणसाने त्याला हवे तितके खाल्ल्यानंतर देव त्याचा क्रोधाग्नी त्याच्यावर फेकेल. देव दुष्टावर शिक्षेचा पाऊस पाडेल.
24 दुष्ट मनुष्य तलवारीला भिऊन पळून जाण्याचा प्रयत्न करेल. परंतु पितळी बाण त्याचा बळी घेईन.
25 पितळी बाण त्याच्या शरीरातून आरपार जाईल. त्याचे चकाकणारे टोक त्याचे आतडे भेदील आणि तो भयभीत होईल.
26 त्याच्या खजिन्याचा नाश होईल. मानवाने उत्पन्न केला नाही असा अग्री त्याचा नाश करेल. अग्री त्याच्या घरातल्या सर्व वस्तूंचा नाश करेल.
27 दुष्ट माणूस अपराधी आहे हे स्वर्ग सिध्द करेल. पृथ्वी त्याच्याविरुध्द साक्ष देईल.
28 देवाच्या क्रोधाने निर्माण झालेल्या पुरात त्याच्या घरातली चीजवस्तू वाहून जाईल.
29 दुष्ट माणसाच्या बाबतीत हे करायचे असे देवाने ठरवले आहे. देवाने ठरवलेले हे त्याचे प्रारब्ध आहे.”
धडा 21

1 नंतर ईयोबने उत्तर दिले:
2 “मी काय म्हणतो ते ऐक. माझे सांत्वन करण्याची ती तुझी पध्दत असू दे.
3 मी बोलेन तेव्हा तू थोडा धीर धर. माझे बोलणे संपल्यावर तू माझी थट्टा करु शकतोस.
4 “मी लोकांविरुध्द तक्रार करीत नाही. मी अधीर झालो आहे त्याला काही कारण आहे.
5 माझ्याकडे बघितल्यावर तुला धक्का बसेल. तुझे हात तोंडावर ठेव आणि माझ्याकडे अचंब्याने बघत रहा.
6 माझ्यावर आलेल्या प्रसंगांचा विचार करायला लागलो म्हणजे मला भीती वाटते आणि माझ्या शरीराचा थरकाप होतो.
7 दुष्ट माणसांना जास्त आयुष्य का असते? ते वृध्द आणि यशस्वी का होतात?
8 दुष्ट माणसे आपली मुले बाळे मोठी होत असलेली बघतात. आपली नातवंडे बघायला ती जिवंत राहतात.
9 त्यांची घरे सुरक्षित असतात आणि त्यांना भय नसते. दुष्टांना शिक्षा करण्यासाठी देव आपली छडी वापरीत नाही.
10 त्यांचे बैल प्रजोत्पादनात असफल होत नाही. त्यांच्या गायींना वासरे होतात आणि वासरे जन्मत:च मृत्युमुखी पडत नाहीत.
11 दुष्ट लोक आपल्या मुलांना कोकरा प्रमाणे बाहेर खेळायला पाठवतात. त्यांची मुले सभोवती नाचत असतात.
12 ते तंतुवाद्याच्या आणि वीणेच्या आवाजावर गातात आणि नाचतात.
13 दुष्ट लोक त्यांच्या आयुष्यात यशाचे सुख अनुभवतात. नंतर ते मरतात आणि दु:खी न होता थडग्यात जातात.
14 परंतु दुष्ट लोक ‘आम्हाला एकटे सोड. तू आम्हाला जे करायला सांगतोस त्याची आम्हाला पर्वा नाही’ असे देवाला सांगतात.
15 आणि दुष्ट लोक म्हणतात, ‘सर्वशक्तिमान देव कोण आहे? आम्हाला त्याची चाकरी करण्याची गरज नाही. त्याची प्रार्थना करण्यात काही अर्थ नाही.’
16 “दुष्ट लोकांचा त्यांच्या यशात स्वत:चा काही वाटा नसतो हे खरे आहे. मी त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागू शकत नाही.
17 परंतु देव दुष्ट माणसांचा प्रकाश किती वेळा मालवू शकतो? किती वेळा त्यांच्यावर संकटे कोसळतात? देव त्यांच्यावर रागावून त्यांना शिक्षा करतो का?
18 देव दुष्ट लोकांना वाऱ्यावर गवत किंवा धान्याची टरफले उडवून देतो का?
19 पण तू म्हणतोस ‘देव वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा करतो.’ नाही देवाने दुष्टालाच शिक्षा करायला हवी. तेव्हाच त्या दुष्टाला कळेल की त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळत आहे.
20 पापी माणसाला शिक्षा भोगू दे. त्याला सर्वशक्तिमान देवाच्या रागाचा अनुभव घेऊ दे.
21 दुष्टाचे आयुष्य संपल्यावर तो मरतो. तो मागे राहिलेल्या कुटुंबाची पर्वा करीत नाही.
22 “देवाला कुणीही ज्ञान शिकवू शकत नाही. देव मोठ्या पदावर असलेल्या लोकांचाही न्यायनिवाडा करतो.
23 एखादा माणूस संपूर्ण आणि यशस्वी जीवन जगल्यानंतर मरतो. त्याने अत्यंत सुरक्षित आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन जगलेले असते.
24 त्याचे शरीर चांगले पोसलेले होते आणि त्याची हाडे मजबूत होती.
25 परंतु दुसरा माणूस अत्यंत हालाखीचे जीवन जगतो व मरतो. त्यांचे अंत:करण कडवट झालेले असते. त्याने काहीही चांगले भोगलेले नसते.
26 शेवटी हे दोघेही बरोबरच मातीत जातील. किडे त्यांना झाकून टाकतील.
27 “पण तू कसला विचार करीत आहेस ते मला माहीत आहे. कोणत्या डावपेचांनी मला दु:ख द्यायची तुझी इच्छा आहे हे मला माहीत आहे.
28 तू कदाचित् म्हणशील ‘मला चांगल्या माणसाचे घर दाखव. आता मला दुष्ट माणसे कोठे राहतात ते दाखव.’
29 “तू प्रवाशांबरोबरच बोलला असशील आणि तू त्यांच्याच गोष्टी खऱ्या धरुन चालशील.
30 संकटे कोसळतात तेव्हा दुष्ट माणसे त्यातून वाचतात. देवाच्या क्रोधातून ते सहीसलामत सुटतात.
31 दुष्टांनी केलेल्या वाईट कृत्यांबद्दल त्यांना कुणी शिक्षा करत नाही. त्यांच्या तोंडावर कुणी त्याबद्दल टीका करीत नाही.
32 दुष्ट माणूस स्मशानात गेल्यावर तेथील रक्षक त्याच्या थडग्याची देखभाल करतो.
33 म्हणून दरीतली माती देखील दुष्ट माणसाठी सुखावह असेल. व त्याच्या अंत्ययात्रेत हजारो लोक सामील होतील.
34 “म्हणून तुमच्या पोकळ शब्दांनी तुम्ही माझे सांत्वन करु शकणार नाही. तुमची उत्तरे माझ्या उपयोगाची नाहीत.”
धडा 22

1 मग तेमानीच्या अलीफजने उत्तर दिले:
2 “देवाला आपल्या मदतीची गरज आहे का? नाही. अतिशय विद्वान माणसाचा सुध्दा देवाला फारसा उपयोग नाही.
3 तुमचे योग्य तऱ्हेने जगणे देवाला काही मदत करते का? नाही. तुम्ही त्या सर्वशक्तिमान देवाचे अनुसरण केलेत तर त्यातून त्याला काही मिळते का? नाही.
4 “ईयोब, देवाने तुला दोषी ठरवून शिक्षा का द्यावी? तू त्याला भितोस तू त्याची भक्ती करतोस म्हणून?
5 “नाही. तो तसे करतो कारण तू खूप पाप केले आहेस. ईयोब, तू पाप करणे कधीच थांबवले नाहीस.
6 कदाचित् तू तुझ्या भावाला काही पैसे दिले असशील आणि त्याने ते परत करावे म्हणून त्याच्याकडून एखादी वस्तू गहाण ठेवून घेतली असशील. कदाचित् तू गरीबाकडून त्याची वस्त्रे पैशासाठी गहाण ठेवून घेतली असशील. तसे करण्याला कदाचित् काही सबळ कारणही नसेल.
7 तू कदाचित् थकलेल्या आणि भुकेल्या लोकांना पाणी आणि अन्न दिले नसशील.
8 ईयोब, तुझ्याकडे पुष्कळ शेतजमीत आहे आणि लोक तुला मान देतात.
9 पण कदाचित् तू विधवांना काहीही न देता घालवून दिले असशील, ईयोब, तू कदाचित पोरक्या मुलांची फसवणूक केली असशील.
10 म्हणूनच तुझ्या भोवती सापळे आहेत आणि अचानक आलेल्या संकटांनी तू घाबरुन जात आहेस.
11 म्हणूनच सर्वत्र इतका अंधार आहे की तुला काही दिसत नाही आणि तू पुराच्या पाण्याने चहुबाजूंनी वेढला आहेस.
12 “देव स्वर्गाच्या सर्वात उंच भागात राहतो. तारे किती उंचावर आहेत ते बघ. देव सर्वात उंच ताऱ्यांमधून खाली वाकून बघतो,
13 पण ईयोब, तू कदाचित् म्हणशील देवाला काय समजते? देव काळ्याकुटृ ढाांतून आपल्याकडे बघून निवाडा करु शकतो का?
14 आकाशाच्या किनाऱ्यावरुन चालताना त्याने आपल्याला बघू नये म्हणून दाट ढग त्याला आपल्यापासून लपवतात.
15 “ईयोब, दुष्ट लोक पूर्वी ज्या जुन्या वाटेवरुन चालत गेले त्याच वाटेवरुन आज तू चालतो आहेस.
16 त्या दुष्टांना मरणघाटिका जवळ येण्यापूर्वीच त्यांचा नाश करण्यात आला. ते पुरात वाहून गेले.
17 त्या लोकांनी देवाला सांगितले, ‘आम्हाला एकटे सोड तो सर्वशक्तिमान देव आम्हाला काहीही करु शकत नाही.’
18 आणि देवानेच त्याची घरे चांगल्या वस्तूंनी भरली होती. नाही मी दुष्टांच्या उपदेशाचे पालन करु शकत नाही.
19 चांगले लोक दुष्टांचे निर्दालन झालेले पाहतील आणि संतोष पावतील. भोळे लोक वाईट लोकांना हसतात.
20 “खरोखरच आमच्या शत्रूंचा नाश झाला आहे. त्यांची संपत्ती आगीत नष्ट होत आहे.’
21 “ईयोब, तू आता देवाला शरण जा. त्याच्याशी सलोखा कर. तू हे केलेस तर तुला खूप चांगल्या गोष्टी मिळतील.
22 त्यांच्या वचनांचा स्विकार कर. तो काय म्हणतो त्याकडे नीट लक्ष दे.
23 ईयोब, तू सर्वशक्तिमान देवाकडे परत ये म्हणजे तुझी स्थिती पूर्ववत् होईल. परंतु तू तुझ्या घरातून वाईट गोष्टींचे उच्चाटन केले पाहिजेस.
24 तू तुझ्या जवळ असलेल्या सोन्याला मातीमोल मानले पाहिजेस. तू तुझ्या सर्वात चांगल्या सोन्याला दरीतल्या दगडाएवढी किंमत दिली पाहिजेस.
25 सर्वशक्तिमान देवच तुझे सोने असू दे. त्यालाच तुझा चांदीचा ढीग समज.
26 नंतर तू सर्वशक्तिमान देवाला अनुभवू शकशील. तू त्याच्याकडे बघू शकशील.
27 तू त्याची प्रार्थना करशील आणि तो तुझे ऐकेल आणि ज्या गोष्टी करण्याचे तू वचन दिले होतेस त्या गोष्टी तू करशील.
28 तू जर काही करायचे ठरवलेस तर तू त्यात यशस्वी होशील. आणि तुझा भविष्यकाळ खरोखरच उज्ज्वल असेल.
29 देव अहंकारी लोकांना मान खाली घालायला लावतो. परंतु विनम्र लोकांना तो मदत करतो.
30 नंतर तू चुका करणाऱ्या लोकांना मदत करु शकशील. तू देवाजवळ प्रार्थना केलीस तर तो त्या लोकांना क्षमा करेल. का? कारण तू अतिशय पवित्र असशील.”
धडा 23

1 नंतर ईयोबने उत्तर दिले:
2 “तरीही मी आज कडवटणे तक्रार करीन. का? कारण मी अजूनही दु:खी आहे.
3 देवाला कुठे शोधावे ते मला माहीत असेत तर किती बरे झाले असते. देवाकडे कसे जावे ते मला कळते तर किती बरे झाले असते.
4 मी देवाला माझी कथा सांगितली असती. माझा निरपराधीपणा सिध्द करण्यासाठी मी सतत वाद घातला असता.
5 देवाने माझ्या युक्तिवादाला कसे प्रत्युतर दिले असते ते मला कळले असते तर किती बरे झाले असते. मला देवाची उत्तरे समजून घ्यायची आहेत.
6 देव माझ्याविरुध्द त्याच्या सामर्थ्याचा उपयोग करेल का? नाही. तो मी काय म्हणतो ते ऐकेल.
7 मी सत्यप्रिय माणूस आहे. देव मला माझी गोष्ट सांगू देईल. नंतर माझा न्यायाधीश मला मुक्त करील.
8 “पण मी जर पूर्वेकडे गेलो, तर देव तेथे नसतो. मी पश्र्चिमेकडे गेलो तर तिथेही मला देव दिसत नाही.
9 देव दक्षिणेत कार्यमग्र असला तरी मला तो दिसत नाही. देव जेव्हा उत्तरेकडे वळतो तेव्हाही तो मला दिसत नाही.
10 परंतु देवाला मी माहीत आहे. तो माझी परीक्षा घेत आहे. आणि मी सोन्यासारखा शुध्द असेन याकडे तो लक्ष पुरवेल.
11 मी नेहमीच देवाच्या इच्छेनुसार जगत आलो आहे. आणि मी त्याचा मार्ग चोखाळणे कधीच थांबवले नाही.
12 मी त्याच्या आज्ञेचे पालन केले. मी माझ्या अन्नापेक्षा देवाच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांवर अधिक प्रेम करतो.
13 “परंतु देव कधी बदलत नाही. देवासमोर कुणीही उभा राहू शकणार नाही. देव त्याला हवे ते करु शकतो.
14 माझ्या बाबतीत देवाने जे योजिले आहे तेच तो करेल. माझ्यासाठी त्याच्या बऱ्याच योजना आहेत.
15 म्हणूनच मी देवाला भितो. मी या गोष्टी समजू शकतो आणि म्हणून मला देवाची भीती वाटते.
16 देव माझे हृदय कमजोर बनवतो आणि मी माझे धैर्य गमावून बसतो. सर्वशक्तिमान देव मला घाबरवतो.
17 माझ्या बाबतीत ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या माझ्या चेहऱ्यावरच्या काळ्या ढगाप्रमाणे आहेत. परंतु तो काळोख मला गप्प बसवू शकणार नाही.
धडा 24

1 “त्या सर्वशक्तिमान देवाला माणसाच्या आयुष्यातल्या सर्व गोष्टी कशा माहीत असतात? परंतु त्याच्या भक्तांना मात्र त्याच्याबद्दल काहीच माहीत नसते.”
2 “लोक शेतातली हद्द दर्शविणाऱ्या खुणा जास्त जमीन मिळवण्यासाठी सरकवतात. लोक पशूंचे कळप चोरुन दुसऱ्या रानात चरायला नेतात.
3 ते अनाथ मुलांची गाढवे चोरतात. ते विधवेची गाय पळवून नेतात आणि त्यांच्या ऋणाची ती जोपर्यंत परतफेड करत नाही तोपर्यंत ती गाय आपल्याकडे ठेवून घेतात.
4 ते गरीब लोकांना घरादाराशिवाय इकडे तिकडे हिंडायला लावतात. सगळ्या गरीबांना या दुष्टांपासून लपून राहावे लागते.
5 “गरीब लोक वाळवंटात हिंडून अन्न शोधणाऱ्या मोकाट गाढवाप्रमाणे आहेत ते अन्नाच्या शोधात लवकर उठतात. ते मुलाबाळांना अन्न देण्यासाठी रात्रीपर्यंत काम करतात.
6 गरीब लोकांना शेतात गवत आणि चारा कापत रात्रीपर्यंत काम करावे लागते. त्यांना श्रीमंतांच्या शेतातली द्राक्षे वेचावी लागतात.
7 त्यांना रात्री कपड्यांशिवाय झोपावे लागते. थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याजवळ पांघरुण नसते.
8 ते डोंगरावर पावसात भिजतात. थंडीवाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याजवळ काही नसते म्हणून ते मोठ्या खडकांना चिकटून बसतात.
9 दुष्ट लोक स्तनपान करणारे बाळ आईजवळून घेतात. ते गरीबाच्या त्याने काढलेल्या कर्जाबद्दल तारण म्हणून ठेवून घेतात.
10 गरीबांजवळ कपडे नसतात. म्हणून काम करताना ते उघडेच असतात. ते दुष्टांसाठी धान्याच्या पेढं्या वाहतात पण स्वत: मात्र उपाशीच राहतात.
11 ते आँलिव्हचे तेल काढतात. द्राक्षाचा रस काढतात. व त्यासाठी द्राक्षकुंडात द्राक्षं तुडवतात. परंतु त्यांच्याजवळ मात्र पिण्यासाठी काही नसते.
12 शहरात मरायला टेकलेल्या माणसांचे दु:खद रडणे ऐकू येते ते दु:खी कष्टी लोक मदतीसाठी हाका मारतात. परंतु देव ते ऐकत नाही.
13 “काही लोक प्रकाशाविरुद्द बंड करतात. देवाला काय हवे आहे हे जाणून घ्यायची त्यांची इच्छा नसते. देवाच्या इच्छेप्रमाणे जगणे त्यांना आवडत नाही.
14 खुनी सकाळी लवकर उठतो आणि गरीब व असहाय्य लोकांना ठार मारतो. तो रात्रीच्या वेळी चोर बनतो.
15 ज्या माणसाला व्यभिचार करायचा आहे तो रात्रीची वाट बघतो. ‘मला कुणीही बघणार नाही’ असे त्याला वाटते.’ पण तरीही तो त्याचा चेहरा झाकतो.
16 रात्रीच्या वेळी अंधार असतो तेव्हा दुष्ट लोक दुसऱ्यांची घरे फोडतात. पण दिवसा ते स्वत:ला त्यांच्या घरांत कोंडून घेतात. ते प्रकाशाला टाळतात.
17 त्या दुष्टांना काळीकुटृ रात्र सकाळसारखी वाटते. त्या भयंकर काळोखाची भयानकता त्यांना चांगलीच माहीत असते.
18 “पुरात जशा वस्तू वाहून जातात तशी दुष्ट माणसे वाहून नेली जातात. त्यांनी त्यांच्या शेतात द्राक्ष गोळा करु नयेत म्हणून त्यांच्या जमिनीला शाप दिला जातो.
19 हिवाळ्यातल्या बफर्पासून मिळालेले त्यांचे पाणी उष्ण आणि कोरडी हवा शोषून घेते. त्याप्रमाणे त्या पापी लोकांना थडग्यात नेले जाते.
20 हा दुष्ट माणूस मरेल आणि त्याची आईदेखील त्याला विसरुन जाईल. त्याची प्रेयसी म्हणजे त्याचे शरीर खाणारे किडे असतील. लोक त्याची आठवण ठेवणार नाहीत. त्यामुळे दुष्टपणा लाकडासारखा मोडून पडेल.
21 दुष्ट माणसे वांझ बायकांना त्रास देतात आणि ते विधवांना मदत करायचे नाकारतात.
22 सामर्थ्यवान लोकांना नष्ट करण्यासाठी दुष्ट आपली शक्ती खर्ची घालतात. दुष्ट माणसे सामर्थ्यवान बनू शकतात परंतु त्यांना त्यांच्या आयुष्याची खात्री नसते.
23 दुष्टांना थोड्या वेळासाठी सुरक्षित आणि निर्धास्त वाटते. आपण सामर्थ्यवान व्हावे असे त्यांना वाटते.
24 दुष्ट लोक थोड्या काळापुरते यशस्वी होतात. परंतु नंतर ते जातात. धान्याप्रमाणे त्यांची कापणी होते, इतर लोकांप्रमाणे दुष्टांनादेखील कापले जाते.
25 “या गोष्टी खऱ्या आहेत हे मी शपर्थपूर्वक सांगतो. मी खोटे बोललो हे कोण सिध्द करेल? मी चुकलो हे कोण दाखवेल?”
धडा 25

1 नंतर शूहीच्या बिल्ददने ईयोबला उत्तर दिले:
2 “देव राजा आहे. प्रत्येकान देवाला मान दिला पाहिजे आणि त्याचे भय बाळगले पाहिजे. देव त्याच्या स्वर्गीय राज्यात शांती राखतो.
3 कुठलाही माणूस त्याचे तारेमोजू शकत नाही. देवाचा सूर्य सर्व लोकांवर उगवतो.
4 देवाशी तुलना करता कुठलाही माणूस चांगला नाही. कुठलाही मनुष्याप्राणी पवित्र असणार नाही.
5 देवाला चंद्र सुध्दा तेजोमय आणि पवित्र वाटत नाही. देवाच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत.
6 माणसे तर त्याच्या दृष्टीने पवित्रतेत खूपच कमी पडतात. मनुष्यप्राणी एखाद्या अळीप्रमाणे (मँगाँट) आहे. तो कवडीमोलाच्या जंतूप्रमाणे आहे.”
धडा 26

1 नंतर ईयोबने बिल्ददला उत्तर दिले:
2 “बिल्दद, सोफर आणि अलीफज तुम्ही दुर्बल माणसासाठी खूप मोठे साहाय्य आहात. हो तुम्हीच दुबळ्या हातांना पुन्हा जोमदार बनवले. (हे ईयोबचे बोलणे उपरोधक आहे)
3 “विद्वत्ताहीन माणसाला तुम्ही फार चांगला उपदेश केला. तुम्ही किती विद्वान आहात ते तुम्ही दाखवून दिलेत.
4 हे बोलण्यासाठी तुम्हाला कुणाची मदत मिळाली? कुणाच्या आत्म्याने तुम्हांला याची प्रेरणा दिली?
5 “मेलेल्या माणसाचा आत्मा भयाने पृथ्वीच्या खाली पाण्यात घाबरतो.
6 परंतु देव मृत्युलोकात स्वच्छपणे बघू शकतो. मृत्यु देवापासून लपून राहात नाही.
7 देवाने रिकाम्या पोकळीत दक्षिणेकडचे आकाश सरकवले. देवाने पृथ्वी निराधार टांगली, अधांतरी ठेवली.
8 “देव घनदाट ढगांना पाण्याने भरतो. परंतु त्या वजनाने तो ढगांना फुटू देत नाही.
9 देव पूर्ण चंद्राचा चेहरा झाकून टाकतो. तो त्याच्यावर ढग पसरवतो आणि त्याला लपवतो.
10 देवाने सागरावर एक वर्तुळ आखले आणि प्रकाश काळोखापासून वेगळा करण्यासाठी क्षितिज निर्माण केले.
11 देव जेव्हा धमकी देतो तेव्हा आकाशाला आधार देणारा पाया भयाने थरथरायला लगतो.
12 देवाची शक्ती सागराला शांत करते. देवाच्या विद्वत्तेने राहाबाच्या मदतनीसांना नष्ट केले.
13 देवाचा नि:श्वास आकाश स्वच्छ करतो. देवाच्या हातांनी पळून जाणाऱ्या सापाला नष्ट केले.
14 देव ज्या काही अनामिक गोष्टी करतो त्यापैकी या काही गोष्टी आहेत. आपण देवाची एखादी लहानशी कुजबुज ऐकतो, देव किती सामर्थ्यवान आणि शक्तिशाली आहे. हे कोणालाच कळत नाही.”
धडा 27

1 नंतर ईयोब आपले बोलणे पुढे चालू ठेवत म्हणाला:
2 “खरोखरच देव आहे. आणि तो आहे हे जसे खरे आहे तसेच तो माझ्या बाबतीत अन्यायी होता हे ही खरे आहे. होय, त्या सर्वशक्तिमान देवाने माझे जीवन कडू करुन टाकले.
3 परंतु जोपर्यंत माझ्यात जीव आहे आणि देवाचा जिवंत श्वास माझ्या नाकात आहे तोपर्यंत,
4 माझे ओठ वाईट गोष्टी बोलणार नाहीत आणि माझी जीभ खोटे सांगणार नाही.
5 तुम्ही बरोबर आहात हेही मी कधी मान्य करणार नाही. मी निरपराध आहे हेच मी मरेपर्यंत सांगत राहीन.
6 मी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्यांना मी चिकटून राहीन. चांगले वागणे मी कधीही सोडणार नाही. मरेपर्यंत माझे मन मला कधीही खाणार नाही.
7 “लोक माझ्याविरुध्द उभे राहिले. वाईट माणसांना जशी शिक्षा होते तशी माझ्या शत्रूंना व्हावी अशी मी आशा करतो.
8 जर एखादा माणूस देवाला मानत नसेल तर तो मेल्यावर त्याला कसलीच आशा राहाणार नाही. देव त्याचे आयुष्य संपवतो तेव्हा त्याला आशा करायला जागा नसते.
9 त्या दुष्ट माणसावर संकटे येतील आणि तो देवाच्या मदतीसाठी रडेल. पण देव त्याचे ऐकणार नाही.
10 त्याने सर्वशक्तिमान देवाशी बोलून आनंद मिळवायला हवा होता. त्याने नेहमी देवाची प्रार्थना करायला हवी होती.
11 “मी तुम्हाला देवाच्या सामर्थ्याविषयी सांगू शकेन. सर्वशक्तिमान देवाच्या योजना मी तुमच्या पासून लपवणार नाही.
12 तुम्ही देवाचे सामर्थ्य तुमच्या डोळ्यांनी पाहिले आहे. मग तुम्ही असे निरर्थक का बोलता?
13 देवाने वाईट लोकांसाठी हीच योजना आखली होती. आणि सर्वशक्तिमान देवाकडून दुष्टांना हेच मिळाले होते.
14 दुष्ट माणसाला खूप मुले असतील परंतु त्याची मुले लढाईत मरतील. दुष्ट माणसाच्या मुलांना पुरेसे खायला मिळणार नाही.
15 त्याची सर्व मुले मरतील आणि त्याच्या विधवेला दु:ख वाटणार नाही.
16 दुष्ट माणसाला इतकी चांदी मिळेल की ती त्याला मातीमोल वाटेल, त्याला इतके कपडे मिळतील की ते त्याला मातीच्या ढिगाप्रमाणे वाटतील.
17 परंतु चागंल्या माणसाला त्याचे कपडे मिळतील आणि निरपराध्याला त्याची चांदी मिळेल.
18 दुष्ट माणूस घर बांधेल परंतु ते जासत दिवस टिकणार नाही. ते कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे किंवा रखवालदारच्या तंबूप्रमाणे असेल.
19 दुष्ट माणूस झोपी गेल्यावर श्रीमंत होईल. परंतु जेव्हा तो डोळे उघडेल तेव्हा त्याची श्रीमंती नष्ट झालेली असेल.
20 तो घाबरेल, महापुराने आणि वादळाने सर्वकाही वाहून न्यावे तसे होईल.
21 पूर्वेचा वारा त्याला वाहून नेईल आणि तो जाईल. वादळ त्याला त्याच्या घरातून उडवून लावेल.
22 दुष्ट माणूस वादळाच्या शक्तीपासून पळून जाण्याचा प्रयत्न करील परंतु कसलीही दयामाया न दाखवता वादळ त्याच्यावर आदळेल.
23 दुष्ट माणूस पळून गेला म्हणून लोक टाळ्या वाजवतील. तो आपल्या घरातून पळून जात असता लोक शिट्या मारतील.
धडा 28

1 “लोकांना जेथून चांदी मिळते अशा खाणी असतात आणि लोक जेथे सोने वितळवतात आणि ते शुध्द करतात अशा जागा असतात.
2 लोक जमिनीतून लोखंड काढतात. दगडांमधून तांबे वितळवले जाते.
3 मजूर गुहेत दिवा नेतात. ते गुहेत अगदी खोलवर शोध घेतात. ते अगदी खोल अंधारात दगडांचा शोध घेतात.
4 ते अशुध्द धातूचा शोध घेत घेत अगदी खोलवर जातात. लोकांच्या राहाण्याच्या जागेपासून ते खूप लांबवर आणि खोलवर जातात. जिथे आजपर्यंत कोणीही गेला नसेल तिथे ते जातात. ते दोरीला लोंबकळत इतरांपेक्षा खूप खोल जातात.
5 वरच्या जमिनीत धान्य उगवते. परंतु जमिनीच्या खाली काही वेगळेच असते, धातू शुध्द असतो अगदी अग्नीत वितळवल्यासारखा.
6 जमिनीच्या खाली इंद्रनील मणी आणि शुध्द सोन्याचे दाणे असतात.
7 रानटी पक्ष्यांना भूपृष्ठाखालील वाटांविषयी काही माहिती नसते. कुठल्याही बहिरी ससाण्याने त्या अंधारवाटा पाहिलेल्या नसतात.
8 रानटी जनावरे त्या वाटांवरुन गेलेली नसतात. सिंहही त्या वाटेने गेलेला नसतो.
9 मजूर अगदी कठीण खडक खोदतात. ते मजूर डोंगर पोखरतात आणि त्यांना बोडके करतात.
10 मजूर खडकातून बोगदा खणतात आणि खडकातला खजिना बघतात.
11 पाणी अडवण्यासाठी मजूर धरण बांधतात. ते दडलेल्या वस्तू बाहेर प्रकाशात आणतात.
12 “पण माणसाला शहाणपण कुठे मिलेल? समजूतदारपणा शोधण्यासाठी आपल्याला कुठे जावे लागेल?
13 शहाणपण किती मोलाचे आहे ते आपल्याला कळत नाही. पृथ्वीवरचे लोक जमीन खणून शहाणपण शोधू शकत नाहीत.
14 महासागर म्हणतो, ‘माझ्याजवळ शहाणपण नाही.’ सागर म्हणतो, ‘माझ्याजवळीही ते नाही.’
15 तुम्ही शुध्द सोने देऊन शहाणपण विकत घेऊ शकत नाही. ते विकत घेण्यासाठी जगात तेवढी चांदी नाही.
16 तुम्ही ओफिरच्या सोन्याने किंवा मौल्यवान शोहमच्या खड्याने वा नीलमण्याने शहाणपण विकत घेऊ शकत नाही.
17 शहाणपण सोन्यापेक्षा किंवा स्फटिकापेक्षा मौल्यवान असते. सोन्यात जडवलेले मौल्यवान खडेही शहाणपण विकत घेऊ शकत नाही.
18 शहाणपण पोवळ्यापेक्षा वा स्फटिकापेक्षाही मौल्यवान आहे. माणकापेक्षा ही त्याचे मोल अधिक आहे.
19 इथिओपियातले पीत स्फटिक शहाणपणापेक्षा अधिक मौल्यवान नाहीत. शुध्द सोन्याने तुम्ही तो विकत घेऊ शकत नाही.
20 “मग शहाणपणा कुठून येतो? समजूतदारपणा आपल्याला कुठे मिळेल?
21 पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्यापासून शहाणपण लपवून ठेवले आहे. आकाशातले पक्षीसुध्दा ते बघू शकत नाहीत.
22 मृत्यू आणि विनाशम्हणतात, ‘आम्हाला शहाणपण सापडले नाही. आम्ही त्याबद्दलच्या फक्त अफवाच ऐकल्या आहेत.’
23 “फक्त देवालाच शहाणपणाकडे नेणारा मार्ग माहीत आहे. फक्त देवालाच तो कुठे आहे ते माहीत आहे.
24 देवाला पृथ्वीचे अगदी शेवटचे टोकसुध्दा दिसू शकते. त्याला आकाशाखालचे सर्व काही दिसते.
25 देवाने वाऱ्याला त्यांची शक्ती दिली. सागराला किती मोठे करायचे ते त्यानेच ठरवले.
26 पावसाला कोठे पाठवायचे ते त्यानेच ठरवले आणि वादळाने कुठे जायचे तेही त्यानेच ठरवले.
27 त्याच वेळी देवाला शहाणपण दिसले आणि त्याने त्याचा विचार केला. शहाणपणाचे मूल्य किती आहे ते त्याने जोखले आणि त्या शहाणपणाला संमती दिली.
28 आणि देव लोकांना म्हणाला, “परमेश्वराची भीती बाळगा व त्याला मान द्या तेच शहाणपण आहे. वाईट गोष्टी करु नका तोच समजूतदारपणा आहे.”
धडा 29

1 ईयोबने बोलणे सुरु ठेवले तो म्हणाला:
2 “काही महिन्यांपूर्वी देव जसा माझ्यावर लक्ष ठेवून होता आणि माझी काळजी घेत होता, तसेच माझे आयुष्य आताही असते तर किती बरे झाले असते.
3 तेव्हा देवाचा प्रकाश माझ्यावर प्रकाशत होता आणि मला अंधारातून चालताना प्रकाश दाखवत होता. तसेच आताही असायला हवे होते असे मला वाटते.
4 मी जेव्हा यशस्वी होतो आणि देव माझा मित्र होता त्या दिवसांची मी आशा करतो. त्या दिवसात माझ्यावर देवाचे कृपाछत्र होते.
5 जेव्हा सर्वशक्तिमान देव माझ्याबरोबर होता आणि माझी मुले माझ्या जवळ होती त्या दिवसांची मी आशा धरतो.
6 त्या दिवसांत माझे आयुष्य अतिशय चांगले होते. मी माझे पाय मलईत धूत असे. माझ्याकडे उत्तम प्रकारची पुष्कळ तेले होती.
7 “त्या दिवसांत मी नगराच्या वेशीपर्यंत जात असे आणि नगरातल्या वृध्दांबरोबर सार्वजनिक ठिकाणी बसत असे.
8 सगळे लोक मला मान देत. मला येताना बघून तरुण माझ्या वाटेतून बाजूला होत आणि वृध्द उठून उभे राहात. मला आदर देण्यासाठी ते उठून उभे राहात असत.
9 लोकप्रमुख बोलणे थांबवीत आणि इतरांना शांत राहाण्याची सूचना देण्यासाठी तोंडावर बोट ठेवीत.
10 महत्वाचे लोक सुध्दा बोलताना त्यांचा आवाज लहान करीत. होय, तेव्हा त्यांची जीभ टाळूला चिकटण्यासाखी वाटे.
11 लोक माझ्या बोलण्याकडे लक्ष देत. आणि माझ्याबद्दल चांगले बोलत असत. मला भेटणारा प्रत्येकजण माझी स्तुती करी.
12 का? कारण जेव्हा एखादा गरीब मदतीची याचना करायचा तेव्हा मी त्याला मदत करीत असे आणि पोरक्या मुलाकडे लक्ष द्यायला कुणी नसले तर मी मदत करीत असे.
13 मृत्युपंथाला लागलेला माणूस मला आशीर्वाद देत असे. मी गरजू विधवांना मदत करीत असे.
14 सत्याने जगणे म्हणजे जणू माझे वस्त्र होते. माझे योग्य वागणे म्हणजे माझा अंगरखा आणि डोक्यावरची पगडी होती.
15 मी आंधळ्यांची दृष्टी होतो. त्यांना जिथे जायचे असेल तिथे मी नेत असे. मी अपंगांचे पाय होतो त्यांना हवे तिथे मी उचलून नेत असे.
16 गरीब लोकांना मी वडिलांसारखा वाटत असे. मला माहीत नसलेल्या लोकांनादेखील मी मदत करीत असे. मी कोर्टात न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करीत असे.
17 मी दुष्ट लोकांचे सामर्थ्य नष्ट केले. मी निरपराध लोकांचा त्यांच्यापासून बचाव केला.
18 “मला नेहमी वाटायचे मी खूप वर्षे जगेन, मला स्वत:च्या घरातच मृत्यू येईल.
19 मी खूप पाणी शोषून घेऊ शकणारी मुळे असलेल्या व ज्याच्या फांद्या दवाने ओल्या झालेल्या आहेत अशा झाडासारखा असेन, असे मला वाटत असे.
20 मला रोज नवतरुण झाल्यासारखे वाटत असे. रोज नवीन बाण सोडण्याइतकी शक्ती आपल्यात आहे असे मला वाटत असे.
21 “पूर्वी लोक माझे ऐकत असत माझ्या उपदेशाची वाट पाहात ते शांत बसत.
22 मी माझे बोलणे संपवल्यानंतर ऐकणाऱ्यांना आणखी काही बोलायचे नसे. माझे शब्द त्यांच्या कानावर हळूवारपणे पडत.
23 पावसाची वाट पाहिल्यासारखी ते माझ्या बोलण्याची वाट पाहात. वसंतातल्या पावसासारखे ते माझे शब्द पिऊन टाकत.
24 काही लोकांनी आशा सोडून दिली होती. त्यांचे धैर्य खचले होते. परंतु मी त्यांच्याबरोबर हसलो. माझ्या हास्याने त्याना बरे वाटले.
25 मी त्यांचा प्रमुख असूनही त्यांच्याबरोबर राहाण्याचे ठरवले. आपल्या सैन्याबरोबर तळ ठोकून बसलेल्या राजासारखा दु:खी असलेल्यांचे सांत्वन करणाऱ्या राजासारखा मी होतो.
धडा 30

1 परंतु आता माझ्यापेक्षा लहान माणसे देखील माझी थट्ट करत आहेत. आणि त्याचे पूर्वज इतके कवडी मोलाचे होते की मी त्यांना माझ्या मेंढ्यांची राखण करणाऱ्या कुत्र्यांमध्ये देखील ठेवले नसते.
2 त्या तरुणांचे वडील मला मदत करण्याच्या दृष्टीने अगदीच कुचकामाचे आहेत. ते म्हातारे झाले आहेत आणि दमले आहेत. आता त्यांचे स्नायू टणक आणि जोमदार राहिलेले नाहीत.
3 ते मृतप्राय झाले आहेत. खायला नसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे व म्हणून ते वाळवटांतील धूळ खात आहेत.
4 ते वाळवटांतील क्षार - झुडपे उपटून घेतात. रतम नावाच्या झाडाची मुळे खातात.
5 त्यांना दुसऱ्या माणसांपासून दूर ठेवण्यात येते. ते चोर दरोडेखोर असल्याप्रमाणे लोक त्यांच्यावर ओरडत असतात.
6 त्यांना नदीच्या कोरड्या पात्रात, डोंगराळ भागातील गुहेत किंवा जमिनीतील विवरात राहावे लागते.
7 ते झाडाझुडपात आक्रोश करतात. काटेरी झुडपात एकमेकांच्या आश्रयाने राहातात.
8 ते काडी इतकेही मोल नसलेले लोक आहेत. काहीही नाव नसलेल्या या लोकांना त्यांच्या देशातून हाकलून दिले आहे.
9 “अशा लोकांची मुले माझी चेष्टा करणारी गाणी गातात. त्यांच्या दृष्टीने माझे नाव म्हणजे एक शिवी आहे.
10 ते तरुण माझा तिरस्कार करतात ते माझ्यापासून लांब उभे राहातात. ते माझ्यापेक्षा उच्च आहेत असे त्यांना वाटते. ते माझ्या तोंडावर थुंकतात सुध्दा.
11 देवाने माझ्या धनुष्याची प्रत्यंचा काढून घेतली आणि मला दुबळा बनवले. ती तरुण माणसे स्वत:ला न थोपविता रागाने माझ्याविरुध्द वागतात.
12 ते माझ्या उजव्या भागावर वार करतात. ते माझ्या पायावर वकरुन पाडतात. एखाद्या शहरावर सैन्याने चालून जावे तसे मला वाटते. माझ्यावर हल्ला करुन माझा नाश करण्यासाठी माझ्या तटबंदीला मातीचे चढाव बांधतात.
13 मी पळून जाऊ नये म्हणून ते रस्त्यावर पहारा देतात. माझा नाश करण्यात त्यांना यश मिळते. कुणाच्या मदतीची त्यांना गरज नसते.
14 ते भिंतीला भोक पाडतात. ते त्यातून आत घुसतात आणि माझ्यावर दरडी कोसळतात.
15 भीतीने माझा थरकाप झाला आहे. वाऱ्याने सगळे काही उडून जावे त्याप्रमाणे त्यांनी माझी प्रतिष्ठा उडवून लावली आहे. माझी सुरक्षितता ढगांप्रमाणे नाहीशी झाली आहे.
16 “माझे आयुष्य आता गेल्यातच जमा आहे आणि मी लवकरच मरणार आहे. दु:खानी भरलेल्या दिवसांनी मला वेढून टाकले आहे.
17 माझी सगळी हाडे रात्री दुखतात. वेदना मला कुरतडणे थांबवत नाहीत.
18 देवाने माझ्या कोटाची कॉलर खेचून माझे कपडे आकारहीन केले आहेत.
19 देवाने मला चिखलात फेकून दिले आणि माझी राख व कचरा झाला.
20 देवा मी मदतीसाठी तुझी याचना करतो पण तू उत्तर देत नाहीस. मी उभा राहातो व तुझी प्रार्थना करतो पण तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस.
21 देवा तू माझ्याशी फार नीचपणे वागतोस. तू तुझ्या बळाचा उपयोग मला दु:ख देण्यासाठी करतोस.
22 देवा तू सोसाट्याच्या वाऱ्याने मला उडवून लावतोस. देवा तू मला वादळात फेकून देतोस.
23 तू मला माझ्या मृत्यूकडे नेत आहेस हे मला माहीत आहे. प्रत्येक जिवंत माणसाला मरावे हे लागतेच.
24 “परंतु जो आधीच दु:खाने पोळला आहे आणि मदतीची याचना करीत आहे त्याला कुणी अधिक दु:ख देणार नाही.
25 देवा, मी संकटात सापडलेल्यांसाठी मदतीची याचना केली होती हे तुला माहीत आहे. गरीबांसाठी माझे हृदय तीळ तीळ तुटत होते हे ही तुला माहीत आहे.
26 परंतु मी जेव्हा चांगल्याची अपेक्षा करीत होतो तेव्हा माझ्या वाट्याला वाईट गोष्टी आल्या. मला उजेड हवा होता तेव्हा अंधार मिळाला.
27 मी आतून अगदी मोडून गेलो आहे. माझ्या वेदना कधीच थांबत नाहीत आणि वेदना आणखी येणारच आहेत.
28 मी सदैव दु:खी असतो, पण मला स्वास्थ्य लाभत नाही. मी लोकांच्यात उभा राहून मदतीसाठी ओरडतो.
29 रानटी कुत्र्यांसारखा व वाळवंटातील शहामृगासारखा मी एकटा आहे.
30 माझी कातडी काळी पडली आहे आणि शरीर तापाने फणफणले आहे.
31 माझे वाद्य दु:खी गाणे गाण्यासाठीच लावले गेले आहे. माझ्या बासरीतून रडण्याचेच सूर उमटत आहेत.
धडा 31

1 “रस्त्यातल्या मुलीकडे अभिलाषेने न बघण्याचा करार मी माझ्या डोळ्यांशी केला आहे.
2 तो सर्वशाक्तिमान देव लोकांना काय करतो? तो त्याच्या स्वर्गातील घरातून लोकांची परतफेड कशी करतो?
3 देव दुष्टासाठी संकटे आणि विनाश पाठवतो. आणि जे चुका करतात त्यांच्यासाठी अरिष्टे पाठवतो.
4 मी जे काही करतो ते देवाला दिसते. माझी प्रत्येक हालचाल तो बघतो.
5 “मी खोटे बोललो नाही व लोकांना फसविण्याचा प्रयत्न केलेला नाही.
6 जर देव योग्य तागडी वापरेल तर त्याला समजेल की मी निरपराध आहे.
7 मी जर योग्य मार्गापासून दूर गेलो असेन आणि माझ्या डोळ्यांनी जर माझ्या मनाला वाईटाकडे वळवले असेल किंवा माझे हात पापांनी बरबटलेले असतील.
8 तर इतरांना मी पेरलेले धान्य खाऊ दे. आणि माझे पीक उपटून घेऊ दे.
9 “माझ्या मनात स्त्रियांबद्दल लंपट भावना उत्पन्न झाली असेल किंवा शेजाऱ्याच्या बायकोबरोबर व्यभिचार करण्यासाठी त्याच्या घराचे दार उघडण्याची मी वाट पहात असेन.
10 तर माझ्या बायकोला दुसऱ्याचे अन्न शिजवू दे आणि दुसऱ्यांना तिची शय्यासोबत करु दे.
11 का? कारण लैंगिक पाप लज्जास्पद आहे. या पापाला शिक्षा झालीच पाहिजे.
12 लैंगिक पाप माझ्या सर्वस्वाचा नाश करील. सर्वस्वाचा होम करणारी ती आग आहे.
13 “माझे गुलाम माझ्या विरुध्द तक्रार करतात तेव्हा मी न्यायाने वागण्याचे मान्य केले नाही,
14 तर मी जेव्हा देवासमोर जाईन तेव्हा मी काय करु? देवाने माझ्या वागण्याचा जाब विचारला तर मी काय उत्तर देऊ?
15 देवाने मला माझ्या आईच्या शरीरात निर्माण केले आणि त्यानेच माझ्या गुलामांनाही घडवले. देवाने आपल्या सर्वांचीच आईच्या पोटात निर्मिती केली आहे.
16 “मी गरीबांना मदत करणे कधीच अमान्य केले नाही. मी विधवांना नेहमीच त्यांना ज्याची गरज असते ते दिले.
17 मी माझ्या अन्नाविषयी कधीच स्वार्थी नव्हतो. मी पोरक्यांना नेहमी अन्न दिले आहे.
18 मी जन्मभर पोरक्यांचा बाप बनलो. मी विधवांची काळजी वाहिली.
19 जेव्हा जेव्हा मला कपडे नाहीत म्हणून दु:खी होणारे लोक दिसले किंवा कोट नसलेले गरीब लोक दिसले.
20 त्यांना मी नेहमी कपडे दिले. मी माझ्या मेंढ्यांची लोकर त्यांना उबदार ठेवण्यासाठी वापरली आणि त्यांनी अंत:करणापासून मला आशीर्वाद दिले.
21 माझ्या दाराजवळ एखादा पोरका मुलगा मदतीसाठी आलेला मला दिसला तर मी त्याच्यावर कधीही हात उगारला नाही.
22 मी जर कधी असे केले तर माझा हात माझ्या खांद्यांपासून निखळून पडो मी जर कधी असे केले तर माझा हात माझ्या खांद्याच्या सांध्यातून तुटून पडो.
23 परंतु यापैकी कुठलीही वाईट गोष्ट मी केली नाही. मला देवाच्या शिक्षेची भीती वाटते. परमेश्वराच्या महतीला मीघाबरतो.
24 “मला माझ्या श्रीमंतीचा कधीच भरंवसा वाटला नाही. देव मला मदत करेल याचा मला नेहमीच विश्वास वाटला. ‘तू माझी आशा आहेस असे’ मी शुध्द सोन्याला कधीच म्हटले नाही.
25 मी श्रीमंत होतो पण मला त्याचा अभिमान नव्हता. मी खूप पैसे कमावले पण मी सुखी झालो नाही.
26 मी चकाकत्या सूर्यांची सुंदर चंद्राची कधीच पूजा केली नाही.
27 सूर्य, चंद्राची पूजा करण्याइतका मूर्ख मी कधीच नव्हतो.
28 ते सुध्दा शिक्षा करण्यासारखेच पाप आहे. मी जर त्या गोष्टींची पूजा केली असती तर सर्वशक्तिमान देवाचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते.
29 “माझ्या शत्रूंचा पाडाव झाल्याचा मला कधीच आनंद वाटला नाही. माझ्या शत्रूंवर संकट कोसळल्यामुळे मी त्यांना कधी हसलो नाही.
30 माझ्या शत्रूंना शाप देऊन आणि त्यांच्या मरणाची इच्छा करुन मी माझ्या तोंडाला कधी पाप करायला लावले नाही.
31 मी अपरिचितांना अन्न देतो हे माझ्या घरातील सर्वाना माहीत आहे.
32 परदेशी लोकांना रात्रीच्या वेळी रस्त्यावर झोपायला लागू नये म्हणून मी त्यांना माझ्या घरी बोलावतो.
33 इतर लोक त्यांचे पाप लपवायचा प्रयत्न करतात परंतु मी माझा अपराध लपवायचा कधीच प्रयत्न केला नाही.
34 लोक काय म्हणतील याची भीती मी कधीच बाळगली नाही. मी भीतीपोटी कधीच गप्प बसलो नाही. भीतीमुळे मी बाहेर पडायला कचरलो नाही. मला लोकांच्या तिरस्काराची भीती वाटत नाही.
35 “माझे कुणीतरी ऐकावे असे मला वाटते. मला माझी बाजू मांडू द्या. सर्वशक्तिमान देवाने मला उत्तर द्यावे अशी माझी इच्छा आहे. त्याच्या दृष्टीने मी काय चूक केली ती त्याने लिहून काढावी असे मला वाटते.
36 नंतर मी ती खूण माझ्या गळ्याभोवती घालेन. मी ती राजमुकुटाप्रमाणे माझ्या मस्तकावर ठेवेन.
37 देवाने जर असे केले तर मी जे काही केले त्याचे स्पष्टीकरण देऊ शकेन. एखाद्या पुढाऱ्याप्रमाणे माझे मस्तक उंच करुन मी देवाकडे येऊ शकेन.
38 “मी दुसऱ्याकडून त्याची जमीन हिसकावून घेतली नाही. माझी जमीन चोरुन घेतली आहे असा आरोप माझ्यावर कुणीही करु शकणार नाही.
39 मी शेतकऱ्यांना माझ्या शेतातून मिळणाऱ्या धान्याबद्दल नेहमी मोबदला दिला आहे. आणि जे जमिनीचे मालक आहेत त्यांच्याकडून जमीन घेण्याचा प्रयत्न मी कधीही केला नाही.
40 मी यापैकी कुठलीही वाईट गोष्ट केली असेल तर माझ्या शेतात गहू आणि सातू या ऐवजी काटे आणि गवत उगवू दे” ईयोबचे शब्द इथे संपले.
धडा 32

1 नंतर ईयोबच्या तीन मित्रांनी ईयोबला उत्तर देणे सोडून दिले. त्यांनी ते सोडून दिले कारण ईयोबला स्वत:च्या निर्दोषपणाविषयी खात्री होती.
2 परंतु तिथे अलीहू नावाचा तरुण मुलगा होता. अलीहू बरखेलचा मुलगा होता. बरखेल बूजचा वंशज होता. अलीहू राम घराण्यातील होता. अलीहू ईयोबवर खूप रागावला. का? कारण ईयोब आपण स्वत: बरोबर आहोत असे म्हणत होता. ईयोब म्हणत होता की आपण देवापेक्षाही अधिक न्यायी आहोत.
3 अलीहू ईयोबच्या तीन मित्रांवरदेखील रागावला. का? कारण ईयोबचे तीन मित्र ईयोबच्या प्रश्रांची उत्तरे देऊ शकले नाहीत. ईयोब चुकला हे ते सिध्द करु शकले नाहीत.
4 अलीहू तिथे सगळ्यांत लहान होता. म्हणून तो सगळ्यांचे बोलणे संपेपर्यत थांबला. नंतर आपण बोलायला सुरुवात करावी असे त्याला वाटले.
5 परंतु नंतर अलीहूला दिसले की ईयोबच्या तीन मित्रांकडे काहीच बोलायचे उरले नाही. म्हणून त्याला राग आला.
6 म्हणून त्याने बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला:“मी खूप तरुण आहे आणि तुम्ही वृध्द आहात. म्हणून तुम्हाला काही सांगायला मी घाबरत होतो.
7 मी माझ्याशीच विचार केला, ‘वृध्दांनी आधी बोलायला पाहिजे. वृध्द खूप वर्ष जगलेले असतात, त्यामुळे ते खूप गोष्टी शिकलेले असतात.’
8 परंतु देवाचा आत्मा लोकांना शहाणे करतो. त्या सर्वशक्तिमान देवाचा ‘नि:श्वास’ लोकांना समजण्यास मदत करतो.
9 केवळ वृध्द माणसेच तेवढी शहाणी नसतात. केवळ वृध्दांनाच चांगले वाईट कळते असे नाही.
10 “तेव्हा कृपा करुन माझे ऐका! मी तुम्हांला माझे विचार सांगतो.
11 मी तुमचे बोलणे संपेपर्यंत धीर धरला. तुम्ही ईयोबला जी उत्तरे दिलीत ती मी ऐकली.
12 तुम्ही ज्या गोष्टी संगितल्या त्या मी लक्षपूर्वक ऐकल्या. तुमच्या पैकी कुणीही ईयोबवर टीका केली नाही. तुमच्यापैकी एकनेही त्याच्या मुद्यांना उत्तरे दिली नाहीत.
13 तुम्ही तिघे तुम्हांला शहाणपण मिळाले असे म्हणू शकत नाही. ईयोबच्या मुद्यांना देवानेच उत्तरे दिली पाहिजेत, माणसांनी नाही.
14 ईयोबने त्याचे मुद्दे माझ्यासामोर मांडले नाहीत. म्हणून तुम्ही तिघांनी ज्या मुद्यांचा उपयोग केला त्यांचा उपयोग मी करणार नाही.
15 “ईयोब, हे तिघेही वाद हरले आहेत. त्यांच्या जवळ बोलायला आणखी काही उरले नाही. त्यांच्या जवळ आणखी उत्तरे नाहीत.
16 ईयोब, यांनी तुला उत्तरे द्यावीत म्हणून मी थांबलो होतो. परंतु ते आता गप्प आहेत. त्यांनी तुझ्याशी वाद घालणे आता बंद केले आहे.
17 म्हणून आता मी तुला माझे उत्तर देतो. होय मला काय वाटते ते मी तुला आता सांगतो.
18 मला इतके काही सांगायचे आहे की मी आता फूटून जाईन की काय असे वाटते.
19 मी द्राक्षरसाच्या न फोडलेल्या बाटलीसारखा आहे. द्राक्षरसाच्या नव्या बुधल्याप्रमाणे मी फुटण्याच्या बेतात आहे.
20 म्हणून मला बोललेच पाहिजे तरच मला बरे वाटेल. मी बोलले पाहिजे आणि ईयोबच्या मुद्यांना उत्तरे दिली पाहिजेत.
21 मी इतर कुणाला वागवतो त्याप्रमाणे ईयोबला वागवले पाहिजे. मी त्याच्याशी उगीचच चांगले बोलायचा प्रयत्न करणार नाही. मला जे बोलायला हवे तेच मी बोलेन.
22 एकापेक्षा दुसऱ्याला अधिक चांगले वागवणे मला शक्य नाही. मी जर असे केले तर देव मला शिक्षा करेल.
धडा 33

1 “ईयोब, आता माझ्याकडे लक्ष दे. मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐक.
2 मी आता बोलायला तयार झालो आहे.
3 माझे अंत:करण प्रामाणिक आहे. म्हणून मी प्रामाणिक शब्दच बोलेन. मला जे माहीत आहे त्याबद्दल मी सत्य तेच सांगेन.
4 देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले. मला सर्वशक्तिमान देवाकडून जीवन मिळाले.
5 ईयोब, माझे बोलणे ऐक आणि तुला शक्य झाले तर मला उत्तर दे. माझ्याशी वाद घालण्याकरता तुझी उत्तरे तयार ठेव.
6 देवासमोर तू आणि मी सारखेच आहोत. आपल्याला निर्माण करण्यासाठी देवाने माती वापरली.
7 ईयोब, माझी भीती बाळगू नकोस. मी तुझ्याशी कडक वागणार नाही.
8 “पण ईयोब, तू जे बोललास ते मी ऐकले.
9 तू म्हणालास, ‘मी शुध्द आहे, मी निरपराध आहे, मी काहीही चूक केली नाही. मी अपराधी नाही.
10 मी काही चूक केली नाही तरीही देव माझ्याविरुध्द आहे. देवाने मला शत्रूप्रमाणे वागवले आहे.
11 देवाने माझ्या पायला साखळदंड बांधले. देव माझी प्रत्येक हालचाल बघतो.’
12 “परंतु ईयोब, तू या बाबतीत चुकतो आहेस. आणि तुझी चूक मी सिध्द करुन दाखवेन. का? कारण देवाला कोणत्याही माणसापेक्षा अधिक माहिती असते.
13 ईयोब, तू देवाशी वाद घालत आहेस. देवाने तुला सर्व काही नीट सांगावे असे तुला वाटते.
14 परंतु देव जे काही करतो ते खरोखरच स्पष्ट करुन सांगत असेल. कदाचित् देव निराळ्या रीतीने बोलत असेल आणि लोकांना ते समजत नसेल.
15 देव कदाचित् लोकांशी रात्री ते झोपेत असताना स्वप्नात किंवा दृष्टांतात बोलत असेल आणि तेव्हा देवाची ताकीद ऐकून ते खूप भयभीत होत असतील.
16
17 देव लोकांना चुकीच्या गोष्टी करणे बंद करण्याची ताकीद देतो आणि गर्व न करण्याचेही सांगतो.
18 देव लोकांना मृत्युलोकात जाण्यापासून वाचविण्यासाठी ताकीद देत असतो. देव हे सारे माणसाला नष्ट होण्यापासून वाचविण्यासाठी करतो.
19 “किंवा एखाद्याला देवाचा आवाज तेव्हा ऐकू येईल जेव्हा तो देवाने केलेल्या शिक्षेमुळे अंथरुणात पडून दु:ख भोगत असेल. देव त्याला दु:ख देऊन ताकीद देत असतो. तो माणूस वेदनेने इतका तळमळत असतो की त्याची सगळी हाडे दुखतात.
20 नंतर तो माणूस खाऊ शकत नाही. तो वेदनेने इतका तळमळतो की चांगल्या अन्नाचासुध्दा त्याला तिरस्कार वाटतो.
21 त्याचे शरीर इतके क्षीण होते की तो जवळ जवळ दिसेनासा होतो. त्याची सगळी हाडे दिसतात.
22 तो मृत्यूलोकंाजवळ येऊन ठेपतो आणि त्याचे जीवन मरणपंथाला लागलेले असते.
23 “देवाजवळ हजारो देवदूत असतात. कदिचित् त्यांच्याच पैकी एखादा त्या माणसावर लक्ष ठेवून असेल. तोच देवदूत त्याच्याबद्दल बोलेल आणि त्याच्या चांगल्या कृत्यांबद्दल सांगेल.
24 देवदूत त्याच्याशी देयेने वागेल. कदाचित् देवदूत देवाला सांगेल. ‘या माणसाला मृत्युलोकात जाण्यापासून वाचव. त्याच्या पापाची किंमत मोजण्याचा दुसरा एक मार्ग मला सापडला आहे.’
25 नंतर त्या माणसाचे शरीर पुन: तरुण आणि जोमदार बनेल. तो तरुणपणी जसा होता तसाच पुन्हा होईल.
26 तो देवाची प्रार्थना करेल आणि देव त्याला उत्तर देईल. तो माणूस आनंदाने ओरडेल आणि देवाची भक्ती करेल. नंतर तो मनुष्य पुन्हा चांगले जीवन जगायला लागेल.
27 नंतर तो लोकांना कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले. मी चांगल्याचे वाईट केले. पण देवाने मला जितकी वाईट शिक्षा करायला हवी होती तितकी केली नाही.
28 देवाने माझ्या आत्म्याला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवले. आता मी पुन्हा आयुष्य उपभोगू शकतो.’
29 “देव त्या माणसासाठी या गोष्टी पुन्हा पुन्हा करतो.
30 का? त्या माणसाला ताकीद देण्यासाठी आणि त्याच्या आत्म्याला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवण्यासाठी देव असे करतो असे केल्यामुळे तो त्याचे आयुष्य उपभोगू शकेल.
31 “ईयोब, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे. माझे ऐक! तू गप्प रहा आणि मला बोलू दे.
32 पण ईयोब, जर तुला माझे बोलणे पटत नसेल तर तू खुशाल बोल. मला तुझे मुद्दे सांग. कारण मला तुझे बोलणे सुधारायचे आहे.
33 परंतु ईयोब, तुइयाजवळ बोलण्यासारखे काही नसेल तर माझे ऐक. तू गप्प रहा आणि मी तुला शहाणपण शिकवेन.”
धडा 34

1 नंतर अलीहूने आपले बोलणे चालूच ठेवले तो म्हणाला:
2 शहाण्या माणसांनो मी काय सांगतो ते ऐका. हुशार माणसांनो, माझ्याकडे लक्ष द्या.
3 तुमची जीभ ज्या अन्नाला स्पर्श करते त्याची चव तिला कळते आणि तुमच्या कानांवर जे शब्द पडतात ते त्यांना पारखता येतात.
4 तेव्हा आपण आता या मुद्यांची तपासणी करु या आणि काय योग्य आहे याचा निर्णय करु या. काय चांगले आहे ते आपण सगळ्यांनी बरोबर शिकू या.
5 ईयोब म्हणतो, ‘मी, ईयोब निष्पाप आहे, आणि देव माझ्या बाबतीत न्यायी नाही.
6 मी निरपराध आहे, परंतु माझ्याविरुध्द लागलेला निकाल मला खोटारडा ठरवतो. मी निरपराध असूनही मला खूप कष्ट भोगायला लागले.’
7 “ईयोबसारखा आणखी कुणी आहे का? तुम्ही ईयोबची मानहानी केली तरी तो त्याकडे दुर्लक्ष करतो.
8 ईयोब वाईटांशी मैत्री करतो त्याला दुष्टांबरोबर राहायला आवडते.
9 मी असे का म्हणतो? कारण ईयोब म्हणतो की, ‘माणूस जर देवाला खुश करायला लागला तर त्याला त्यापासून काहीही मिळणार नाही.’
10 “तुम्हाला समजू शकते, म्हणून तुम्ही माझे ऐका. जे वाईट आहे ते देव कधीही करणार नाही. तो सर्वशक्तिमान देव कधीच चुकणार नाही.
11 एखादा माणूस जे काही करतो त्याबद्दल देव त्याची परतफेड करील. देव लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे देतो
12 हे सत्य आहे देव कधीही चुकत नाही, सर्वशक्तिमान देव नेहमीच न्याची असतो.
13 देवाला कुणीही पृथ्वीवरचा अधिकारी म्हणून निवडले नाही. सगळ्या जगाची काळजी देवावर कुणी सोपवली नाही. सारे काही देवानेच निर्माण केले आहे आणि सारे त्याच्याच नियंत्रणाखाली आहे.
14 जर देवाने पृथ्वीवरील लोकांचा आत्मा आणि श्वास घेऊन
15 टाकायचे ठरवले तर पृथ्वीवरील सर्वजण मरतील. सगळ्याची परत माती होईल.
16 “जर तुम्ही शहाणे असाल तर मी काय म्हणतो त्याकडे लक्ष द्याल.
17 जो माणूस न्यायी होण्यासंबंधी तिरस्कार करतो तो कधीच राज्यकर्ता होऊ शकत नाही. ईयोब, देव शक्तिमान आणि चांगला आहे. तू त्याला अपराधी ठरवू शकशील असे तुला वाटते का?
18 एक देवच असा आहे जो राजांना ‘तुम्ही कवडीमोलाचे आहात’ असे म्हणू शकतो. देव पुढाऱ्यांना, ‘तुम्ही वाईट आहात.’ असे सांगू शकतो.
19 देव इतरांपेक्षा पुढाऱ्यांवर अधिक प्रेम करीत नाही. देव गरीब माणसांपेक्षा श्रीमंतांवर अधिक प्रेम करत नाही. का? कारण त्यानेच प्रत्येकाला निर्माण केले आहे.
20 माणसे अर्ध्यारात्री एकाएकी मरुन जातात. ते आजारी पडतात आणि मरतात. अगदी शक्तिशाली लोकसुध्दा, कारण नसताना मरतात.
21 “लोक जे करतात ते देव बघतो. देव माणसाची प्रत्येक हालचाल बघत असतो.
22 जगात कुठेही अशी अंधारी जागा नाही जिथे वाईट माणसे देवापासून लपून बसू शकतील.
23 देवाला लोकांची अधिक परीक्षा घेण्यासाठी वेळ ठरवण्याची गरज नसते. लोकांचा न्यायनिवाडा करण्यासाठी त्यांना समोर आणण्याची गरजही देवाला भासत नाही.
24 “शक्तिशाली लोकांनी वाईट कुत्ये केल्यावर देवाला त्यांना प्रश्र्न विचारण्याची गरज वाटत नाही. तो सहजपणे त्यांचा नाश करु शकतो आणि त्यांच्या जागी इतरांना पुढारी बनवू शकतो.
25 तेव्हा लोक काय करतात ते देवाला माहीत असते. म्हणूनच देव रात्रीतून दुष्टांना पराभव करतो आणि त्यांचा नि:पात करतो.
26 वाईट माणसांनी जी दुष्कृत्ये केली असतील त्याबद्दल देव त्यांना शिक्षा करतो. आणि जिथे इतर लोक त्यांना पाहू शकतील अशा ठिकाणी देव त्यांना शिक्षा करतो.
27 का? कारण वाईट माणसांनी देवाची आज्ञा पाळायचे थांबवले आणि देवाला हवे ते करण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.
28 हे दुष्ट लोक गरीबांना कष्ट देतात, आणि मदतीसाठी देवाकडे याचना करायला भाग पाडतात.
29 देव गरीबांची मदतीसाठी हाक ऐकतो. परंतु गरीबांना मदत करायची नाही असे देवाने ठरवले तरी देवाला कुणी अपराधी ठरवू शकणार नाही. देवाने जर लोकांपासून लपून राहायचे असे ठरवले तर कोणालाही तो सापडू शकणार नाही. तो लोकांवर आणि राज्यांवर राज्य करणारा राज्यकर्ता आहे.
30 परंतु जर एखादा माणूस वाईट असेल आणि इतरांना पाप करायला भाग पाडत असेल तर देव त्या माणसाला कधीही राज्यकर्ता होऊ देणार नाही.
31 जर तो माणूस देवाला म्हणेल की, “मी अपराधी आहे. यापुढे मी पाप करणार नाही.
32 देवा, मी जरी तुला बघू शकत नसलो, तरी तू मला जगण्याचा योग्य मार्ग दाखव. मी जरी चुका केल्या असल्या तरी मी त्या पुन्हा करणार नाही.’ तरच असे घडेल.
33 “ईयोब, तुला देवाने बक्षीस द्यावे असे वाटते. परंतु तू मात्र बदलायला तयार नाहीस. ईयोब, हा तुझा निर्णय आहे. माझा नाही. तुला काय वाटते ते मला सांग.
34 शहाणा माणूस माझे ऐकेल. शहाणा माणूस म्हणेल.
35 ‘ईयोब एखाद्या अज्ञानी माणसासारखे बोलत आहे. तो जे काही बोलतो ते अर्थहीन आहे.’
36 ‘ईयोबला अजून शिक्षा करायला हवी असे मला वाटते. का? कारण ईयोब एखाद्या वाईट माणसासारखे आपल्याला उत्तर देत आहे.
37 ईयोब त्याच्या पापात बंडाची भर घालीत आहे. ईयोब इथे आपल्यासमोर बसून आपला अपमान करतो आहे आणि देवाची थट्टा करतो आहे.”
धडा 35

1 अलीहूने आपले बोलणे चालू ठेवले.तो म्हणाला:
2 “ईयोब, ‘मी देवापेक्षा अधिक बरोबर आहे’ हे तुझे म्हणणे योग्य नाही.
3 आणि ईयोब तू देवाला विचारतोस ‘जर एखाद्या माणसाने देवाला खुश करण्याचा प्रयत्न केला तर त्याला काय मिळेल? मी जर पाप केले नाही तर त्यामुळे माझे काय चांगले होणार आहे?’
4 “ईयोब, मी (अलीहू) तुला आणि तुझ्या मित्रांना उत्तर देण्याची इच्छा करतो.
5 ईयोब, तुझ्यापेक्षा उंच असणाऱ्या आकाशाकडे, ढगांकडे बघ.
6 ईयोब, तू पाप केलेस तर त्यामुळे देवाला कसली इजा होत नाही. तुझ्याकडे पापांच्या राशी असल्या तरी त्यामुळे देवाला काही होत नाही.
7 आणि ईयोब, तू खूप चांगला असलास तरी त्यामुळे देवाला कसली मदत होत नाही. देवाला तुझ्याकडून काहीच मिळत नाही.
8 ईयोब, तू ज्या चांगल्या आणि वाईट गोष्टी करतोस त्यांचा परिणाम तुझ्यावर आणि तुझ्यासारख्या इतरांवर होतो. त्यामुळे देवाला मदत होते किंवा त्याला दु:ख होते असे नाही.
9 “जर वाईट लोकांना दु:ख झाले तर ते मदतीसाठी ओरडतील. ते सामर्थ्यवान लोकांकडे जातात आणि मदतीची याचना करतात.
10 परंतु जे वाईट लोक देवाकडे मदत मागत नाहीत. ते असे म्हणणार नाहीत: ‘मला निर्माण करणारा देव कुठे आहे? लोक दु:खी कष्टी असले की देव त्यांना मदत करतो. आता तो कुठे आहे?’
11 ‘देवाने आम्हाला पशुपक्ष्यांपेक्षा शहाणे बनवले आहे तेव्हा तो कुठे आहे?’
12 “किंवा त्या वाईट माणसांनी देवाकडे मदत मागितली तरी देव त्यांना उत्तर देणार नाही. का? कारण ते लोक अतिशय गर्विष्ठ आहेत आपण फार मोठे आहोत. असे त्यांना अजूनही वाटते.
13 देव त्यांच्या तुच्छ याचनेकडे लक्ष देणार नाही हे खरे आहे. सर्वशक्तिमान देव त्यांच्याकडे लक्ष देणार नाही.
14 तेव्हा ईयोब, तू जेव्हा असे म्हणशील की देव तुला दिसत नाही तेव्हा देव तुझ्याकडे लक्ष देणार नाही. तू देवाला भेटण्याची आणि त्याला तू निरपराध आहेस हे पटवून देण्याच्या संधीची वाट पहात आहेस असे म्हण.
15 “ईयोब, देव वाईट लोकांना शिक्षा करत नाही असे तुला वाटते. तो पापाकडे लक्ष देत नाही असेही तुला वाटते.
16 म्हणून ईयोब त्याचे निरर्थक बोलणे चालूच ठेवतो. आपण खूप मोठे असल्याचा आव ईयोब आणतो. परंतु आपण काय बोलत आहोत हे ईयोबला कळत नाही हे सहजपणे समजून येते.”
धडा 36

1 अलीहू बोलणे चालू ठेवून म्हणाला:
2 “तू माझ्यासाठी आणखी थोडा धीर धर. देवाने मला आणखी बोलायला सांगितले आहे.
3 मी माझे ज्ञान सगळ्यांना वाटतो. देवाने मला निर्माण केले आणि देव न्यायी आहे हे मी सिध्द करेन.
4 ईयोब, मी खरे बोलत आहे आणि मी काय बोलतो आहे ते मला समजत आहे.
5 “देव अतिशय सामर्थ्यवान आहे, पण तो लोकांचा तिरस्कार करीत नाही. तो सामर्थ्यवान असून फार सूज्ञ आहे.
6 देव दुष्टांना जगू देणार नाही आणि तो गरीबांना नेहमीच न्यायाने वागवितो.
7 जे लोक योग्य रीतीने वागतात त्यांच्यावर देव नजर ठेवतो. तो चांगल्या लोकांना राज्य करु देतो. तो चांगल्यांना सदैव मान देतो.
8 म्हणून जर कुणाला शिक्षा झाली व त्यांना साखळदंडानी वा दोरीनी बांधून ठेवण्यात आले तर त्यांनी नक्कीच काही वाईट केले असणार.
9 आणि त्यांनी काय चूक केली ते देव त्यांना सांगेल. देव त्यांना सांगेल की त्यांनी पाप केले आहे. देव त्यांना ते गर्विष्ठ होते असे सांगेल.
10 देव त्या लोकांना त्याची ताकीद आणि सुधारणेच्या सूचना ऐकायला भाग पाडेल. तो त्यांना पाप न करण्याची आज्ञा देईल.
11 जर त्या लोकांनी देवाचे ऐकले, त्याची आज्ञा मानली, तर देव त्यांना यशस्वी करेल. आणि ते त्यांचे आयुष्य सुखाने जगतील.
12 परंतु जर त्यांनी देवाची आज्ञा पाळायचे नाकारले तर त्यांचा नाश होईल. त्यांना ज्ञान न होता मरण येईल.
13 जे लोक देवाची पर्वा करीत नाहीत ते सदा कटू (रागावलेले) असतात. देवाने जरी त्यांना शिक्षा केली तरी ते देवाकडे मदत मागायला तयार नसतात.
14 ते लोक पुरुष वेश्यासारखे अगदी तरुणपणी मरतील.
15 परंतु देव दु:खी लोकांना त्यांच्या दु:खातून सोडवील. देव त्या दु:खाचा उपयोग लोकांना जागवण्यासाठी आणि त्यांनी त्याचे ऐकावे यासाठी करतो.
16 “ईयोब, देवाला तुला मदत करायची इच्छा आहे. तू तुझ्या दु:खातून बाहेर पडावेस असे देवाला वाटते. तुझे आयुष्य साधे सरळ असावे अशी त्याची इच्छा आहे. तुझ्या जेवणाच्या टेबलावर अन्नाची रेलचेल असावी असे त्याला वाटते.
17 परंतु ईयोब, आता तुला अपराधी ठरवण्यात आले आहे, म्हणून तुला दुष्टांप्रमाणे शिक्षा करण्यात आली.
18 ईयोब, तू श्रीमंतीमुळे मूर्ख बनू नकोस. पैशामुळे तू आपला विचार बदलू नकोस.
19 आता तुझा पैसा तुझ्या कामी येणार नाही. आणि सामर्थ्यवान माणसे तुला मदत करणार नाहीत.
20 आता रात्र होण्याची इच्छा मनी बाळगू नकोस. लोक रात्री पसार व्हायचा प्रयत्न करतात. आपण देवापासून लपून राहू शकू असे त्यांना वाटते.
21 ईयोब, तू खूप त्रास भोगला आहेस पण म्हणून वाईटाची निवड करु नकोस. चूक न करण्याची दक्षता घे.
22 “देवाजवळ खूप शक्ती आहे. तो जागातला सगळ्यात मोठा गुरु आहे.
23 काय करावे ते देवाला कुणी सांगू शकत नाही ‘देवा तू अयोग्य केलेस’ असे कुणी त्याला म्हणू शकत नाही.
24 “देवाने जे काही केले त्याबद्दल नेहमी त्याची स्तुती करायची आठवण ठेव. लोकांनी देवाच्या स्तुतीवर अनेक गाणी रचली आहेत.
25 देवाने काय केले ते प्रत्येकाला दिसते. दूरदूरच्या देशांतील लोकांनाही देवाचे महान कार्य दिसतात.
26 होय, देव महान आहे परंतु त्याची महानता आपल्याला कळत नाही. आणि देवाचे अस्तित्व कधीपासून आहे तेही आपल्याला माहीत नाही.
27 “देव पृथ्वीवरुन पाणी घेऊन त्याचे धुके आणि पाऊस यात रुपांतर करतो.
28 अशा रीतीने ढग पाऊस पाडतात आणि तो खूप लोकांवर पडतो.
29 देव ढगांची पखरण कशी करतो किंवा आकाशात ढगांचा गडगडाट कसा होतो ते कुणाला कळत नाही.
30 बघ, देव विजेला पृथ्वीवर सर्वदूर पाठवतो आणि समुद्राचा खोल भागही त्यात येतो.
31 देव त्याचा उपयोग राष्ट्रांना काबूत ठेवण्यासाठी करतो आणि त्यांना भरपूर अन्न देतो.
32 देव आपल्या हातांनी विजेला पकडतो आणि त्याला हवे तेथे पडण्याची तिला आज्ञा करतो.
33 मेघांच्या गडगडाटामुळे वादळाची सूचना मिळते. जनावरांना सुध्दा वादळाची चाहूल लागते.
धडा 37

1 “गडगडाट व वीजा ह्यांची मला भिती वाटते. तेव्हा माझ्या ह्दयाची धडथड वाढते.
2 प्रत्येक जण लक्षपूर्वक ऐका! देवाचा आवाज गडगडाटासारखा वाटतो. देवाच्या मुखातून येणारा गडगडाटासारखा आवाज ऐका.
3 देव त्याच्या विजेला सर्व आकाशात चमकण्यासाठी पाठवतो. ती सर्व पृथ्वीभर चमकते.
4 वीज चमकते तेव्हा देव गडगडाटी आवाज काढतो. देव त्याच्या अद्भुत आवाजात गर्जतो. वीज चमकल्यानंतर देवाची गर्जना ऐकू येते.
5 “देवाचा गडगडाटी आवाज अद्भुत आहे. देव आपल्याला न काळणाऱ्या महान गोष्टी करत असतो.
6 देव ‘हिमाला पृथ्वीवर पडण्याची आज्ञा करतो.’ देव ‘पावसाला पृथ्वीवर जोरात पड असे सांगतो.’
7 देवाने निर्माण केलेल्या सर्व लोकांना तो काय करु शकतो हे कळावे म्हणून देव या गोष्टी करतो हा त्याचा पुरावा आहे.
8 पशू त्यांच्या घरकुलात जातात आणि तेथेच राहतात.
9 दक्षिणेकडून चक्रीवादळ येते. उत्तरेकडून थंड वारे येतात.
10 देवाच्या नि:श्वासाने बर्फ होते आणि समुद्र गोठतो.
11 देव ढगांना पाण्याने भरतो आणि तो ते पसरवतो.
12 तो ढगांना सर्व पृथ्वीभर पसरण्याची आज्ञा करतो. देव जी आज्ञा देती ती ढग पाळतात.
13 देव लोकांना शिक्षा करण्यासाठी ढग आणतो, पूर आणतो किंवा त्याचे प्रेम व्यक्त करण्यासाठी पाणी आणतो.
14 “ईयोब, एक क्षणभर थांब आणि लक्ष दे. थांब आणि देव ज्या अद्भुत गोष्टी करतो त्यांचा विचार कर.
15 ईयोब, देव ढगांवर आपला अधिकार कसा गाजवतो ते तुला माहीत आहे का? तो विजेला कसे चमकावितो ते तुला माहीत आहे का?
16 ढग आकाशात कसे तरंगतात ते तुला कळते का? देव ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याचे ढग हे केवळ एक उदाहरण आहे. आणि देवाला त्याबद्दल सारे माहीत आहे.
17 परंतु ईयोब तुला या गोष्टी माहीत नाहीत. तुला फक्त एवढेच माहीत आहे की दक्षिणेकडून गरम वारे वाहतात तेव्हा तुला घाम येतो, तुझे कपडे अंगाला चिकटतात आणि सगळे काही स्तब्ध असते.
18 ईयोब, तू देवाला आकाश पसरवण्यात आणि ते आरशाप्रमाणे करण्यात मदत करु शकशील का?
19 “ईयोब, देवाला आम्ही काय सांगायचे ते तू आम्हांला सांग. काय बोलावे ते आम्हाला कळत नाही कारण आम्हाला जास्त माहिती नाही.
20 मला देवाशी बोलायचे आहे असे मी म्हणणार नाही. तसे म्हणणे म्हणजे स्वत:चा नाश करुन घेणे आहे.
21 माणूस सूर्याकडे बघू शकत नाही. वाऱ्याने ढग पळवून लावले की तो फार तेजस्वी आणि चकचकीत दिसतो.
22 आणि देवसुध्दा तसाच आहे. देवाची सुवर्णप्रभा दक्षिणेकडील पर्वतावरुनचमकते. देवाच्या भोवती तेजोवलय असते.
23 तो सर्वशक्तिमान देव महान आहे. आपण त्याला समजू शकत नाही. तो सामर्थ्यवान आहे. परंतु तो आपल्याशी चांगला आणि न्यायाने वागतो. देवाला आपल्याला त्रास द्यायची इच्छा नसते.
24 म्हणूनच लोक देवाला मान देतात. परंतु देव आपल्या शहाणपणाचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांना मान देत नाही.”
धडा 38

1 नंतर परमेश्वर वावटळींतून ईयोबशी बोलला. तो म्हणाला:
2 “जो मूर्खासारखा बोलत आहे तो हा अज्ञानी मनुष्य कोण आहे?
3 ईयोब, स्वत:ला सावरआणि मी जे प्रश्र विचारतो त्याची उत्तरे द्यायला तयार हो.
4 “ईयोब, मी पृथ्वी निर्माण केली तेव्हा तू कुठे होतास? तू स्वत:ला इतका शहाणा समजत असशील तर मला उत्तर दे.
5 तू जर एवढा चलाख असशील तर जग इतके मोठे असावे हे कुणी ठरवले ते सांग. मोजायच्या दोरीने ते कुणी मोजले का?
6 पृथ्वीचा पाया कशावर घातला आहे? तिची कोनशिला कुणी ठेवली?
7 जेव्हा ते घडले तेव्हा पहाटेच्या ताऱ्यांनी गायन केले आणि देवपुत्रांनी आनंदाने जयजयकार केला.
8 “ईयोब, जेव्हा समुद्र पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडला तेव्हा दरवाजे बंद करुन त्याला कुणी अडवला?
9 त्यावेळी मी त्याला मेघांनी झाकले आणि काळोखात गुंडाळले.
10 मी समुद्राला मर्यादा घातल्या आणि त्याला कुलुपांनी बंद केलेल्या दरवाजाबाहेर थोपविले.
11 मी समुद्राला म्हणालो, ‘तू इथपर्यंतच येऊ शकतोस या पलिकडे मात्र नाही. तुझ्या उन्मत्त लाटा इथेच थांबतील.’
12 “ईयोब, तुझ्या आयुष्यात तू कधीतरी पहाटेला आरंभ करायला आणि दिवसाला सुरु व्हायला सांगितलेस का?
13 ईयोब, तू कधी तरी पहाटेच्या प्रकाशाला पृथ्वीला पकडून दुष्ट लोकांना त्यांच्या लपायच्या जागेतून हुसकायला सांगितलेस का?
14 पहाटेच्या प्रकाशात डोंगरदऱ्या नीट दिसतात. दिवसाच्या प्रकाशात ह्या जगाचा आकार अंगरख्याला असलेल्या घडीप्रमाणे ठळक दिसतात. ओल्या मातीवर उमटलेल्या ठशाप्रमाणे त्या जागा दिसतात.
15 दुष्ट लोकांना दिवसाचा प्रकाश आवडत नाही. प्रकाश दैदीप्यमान असतो तेव्हा त्यांना त्यांच्या वाईट गोष्टी करता येत नाहीत.
16 “ईयोब, सागराला जिथे सुरुवात होते तिथे अगदी खोल जागेत तू कधी गेला आहेस का? समुद्राच्या तळात तू कधी चालला आहेस का?
17 ईयोब, मृत्युलोकात नेणारे दरवाजे तू कधी पाहिलेस का? काळोख्या जगात नेणारे दरवाजे तू कधी बघितलेस का?
18 ईयोब, ही पृथ्वी किती मोठी आहे ते तुला कधी समजले का? तुला जर हे सर्व माहीत असेल तर मला सांग.
19 “ईयोब, प्रकाश कुठून येतो? काळोख कुठून येतो?
20 ईयोब, तू प्रकाशाला आणि काळोखाला ते जिथून आले तेथे परत नेऊ शकशील का? तिथे कसे जायचे ते तुला माहीत आहे का?
21 ईयोब, तुला या सर्व गोष्टी नक्कीच माहीत असतील. तू खूप वृध्द आणि विद्वान आहेस मी तेव्हा या गोष्टी निर्माण केल्या तेव्हा तू जिवंत होतास होय ना?”
22 “ईयोब, मी ज्या भांडारात हिम आणि गारा ठेवतो तिथे तू कधी गेला आहेस का?
23 मी बर्फ आणि गारांचा साठा संकटकाळासाठी, युध्द आणि लढाईच्या दिवसांसाठी करुन ठेवतो.
24 ईयोब, सूर्य उगवतो त्या ठिकाणी तू कधी गेला आहेस का? पूर्वेकडचा वारा जिथून सर्व जगभर वाहातो तिथे तू कधी गेला आहेस का?
25 जोरदार पावसासाठी आकाशात पाट कोणी खोदले? गरजणाऱ्या वादळासाठी कुणी मार्ग मोकळा केला?
26 वैराण वाळवंटात देखील कोण पाऊस पाडतो?
27 निर्जन प्रदेशात पावसाचे खूप पाणी पडते आणि गवत उगवायला सुरुवात होते.
28 ईयोब, पावसाला वडील आहेत का? दवबिंदू कुठून येतात?
29 हिमाची आई कोण आहे? आकाशातून पडणाऱ्या हिमकणास कोण जन्म देतो?
30 पाणी दगडासारखे गोठते. सागराचा पृष्ठभागदेखील गोठून जातो.
31 “ईयोब, तू कृत्तिकांना बांधून ठेवू शकशील का? तुला मृगशीर्षाचे बंध सोडता येतील का?
32 ईयोब, तुला राशीचक्र योग्यवेळी आकाशात आणता येईल का? किंवा तुला सप्तर्षीना त्यांच्या समूहासह मार्ग दाखवता येईल का?
33 ईयोब, तुला आकाशातील नियम माहीत आहेत का? तुला त्याच नियमांचा पृथ्वीवर उपयोग करता येईल का?
34 “ईयोब, तुला मेघावर ओरडून त्यांना तुझ्यावर वर्षाव करायला भाग पाडता येईल का?
35 तुला विद्युतलतेला आज्ञा करता येईल का? ती तुझ्याकडे येऊन. ‘आम्ही आलो आहोत काय आज्ञा आहे?’ असे म्हणेल का? तुझ्या सांगण्याप्रमाणे ती तुला हवे तिथे जाईल का?
36 “ईयोब, लोकांना शहाणे कोण बनवतो? त्यांच्यात अगदी खोल शहाणपण कोण आणतो?
37 ईयोब, ढग मोजण्याइतका विद्वान कोण आहे? त्यांना पाऊस पाडायला कोण सांगतो?
38 त्यामुळे धुळीचा चिखल होतो आणि धुळीचे लोट एकमेकास चिकटतात.
39 “ईयोब, तू सिंहासाठी अन्न शोधून आणतोस का? त्यांच्या भुकेल्या पिल्लांना तू अन्न देतोस का?
40 ते सिंह त्यांच्या गुहेत झोपतात. ते गवतावर दबा धरुन बसतात आणि भक्ष्यावर तुटून पडतात.
41 ईयोब, डोंब कावळ्याला कोण अन्न देतो? जेव्हा त्याची पिल्ले देवाकडे याचना करतात आणि अन्नासाठी चारी दिशा भटकतात तेव्हा त्यांना कोण अन्न पुरवितो?
धडा 39

1 “ईयोब, पहाडी बकऱ्या कधी व्यायतात ते तुला माहीत आहे का? हरिणी आपल्याबछड्याला जन्म देताना तू पाहिले आहेस का?
2 ईयोब पहाडी बकरी आणि हरिणी किती महिने आपल्या पिलांना पोटात वाढवतात ते तुला माहीत आहे का? त्यांची जन्माला यायची वेळ कोणती ते तुला माहीत आहे का?
3 ते प्राणी लोळतात प्रसूतिवेदना सहन करतात आणि त्यांची पिल्ले जन्माला येतात.
4 ती बछडी शेतात मोठी होतात. नंतर ती आपल्या आईला सोडून जातात आणि पुन्हा कधीही परतून येत नाहीत.
5 ईयोब, रानटी गाढवांना कोणी सोडून दिले? त्यांची दोरी सोडून त्यांना कोणी मोकळे केले?
6 मी (देव) रानटी गाढवांना वाळवंटात घर दिले. मी त्यांना राहण्यासाठी क्षारभूमी दिली.
7 रानटी गाढवे गजबजलेल्या शहरांना हसतात (त्यांना शहरातला गजबजाट आवडत नाही) आणि त्यांना कुठलाही माणूस आव घालू शकत नाही.
8 रानगाढवे डोंगरात राहतात. तेच त्यांचे कुरण आहे. ते आपले अन्न तिथेच शोधतात.
9 “ईयोब, गवा (रानटी बैल) तुझी सेवा करायला तयार होईल का? तो रात्री तुझ्या खळ्यावर राहील का?
10 ईयोब, गवा तुला त्याच्या गळ्यात दोरी बांधू देईल का? आणि तू त्याला तुझे शेत नांगरायला लावू शकशील का?
11 गवा खूप बलवान असतो, परंतु तो तुझे काम करील असा विश्वास तुला वाटतो का?
12 तो तुझे धान्य शेतातून गोळा करेल आणि खळ्यात नेईल असा भरवसा तुला वाटतो का?
13 “शहामृगी आपले पंख आनंदाने फडफडवते. परंतु तिला उडता येत नाही. तिचे पंख आणि पिसे करकोचाच्या पंखासारखी नाहीत.
14 शहामृगी आपली अंडी जमिनीत घालते आणि ती वाळूत उबदार होतात.
15 आपल्या अंड्यांवरुन कुणी चालत जाईल किंवा रानटी प्राणी ती फोडतील हे ती विसरते.
16 शहामृगी आपल्या पिलांना सोडून जाते. ती जणू स्वत:ची नाहीतच असे ती वागते. तिची पिल्ले मेली तरी तिला त्याची पर्वा नसते. काम निष्कळ झाल्याचे सुखदु:ख तिला नसते.
17 का? कारण मी (देव) शहामृगीला शहाणे केले नाही. शहामृगी मूर्ख असते. मीच तिला तसे केले आहे.
18 परंतु शहामृगी जेव्हा पळण्यासाठी उठते तेव्हा ती घोड्याला आणि घोडेस्वाराला हसते, कारण ती कुठल्याही घोड्यापेक्षा जोरात पळू शकते.
19 “ईयोब, तू घोड्याला त्याची शक्ती दिलीस का? तू त्याच्या मानेवर त्याची आयाळ ठेवलीस का?
20 ईयोब, तू घोड्याला टोळाप्रमाणे लांब उडी मारायला सांगितलेस का? घोडा जोरात फुरफुरतोआणि लोक त्याला घाबरतात.
21 घोडा बलवान आहे म्हणून आनंदात असतो. तो आपल्या खुराने जमीन उकरतो आणि धावत युध्दभूमीवर जातो.
22 घोडा भीतीला हसतो, तो कशालाही भीत नाही. तो युध्दातून कधीही पळ काढीत नाही.
23 सैनिकाचा भाता घोड्याच्या बाजूला हलत असतो. त्याचा स्वार जे भाले आणि इतर शस्त्रे बाळगतो ते उन्हात चमकतात.
24 घोडा फार अनावर होतो. तो जमिनीवरजोरात धावतो. तो जेव्हा रणशिंग फुकलेले ऐकतो तेव्हा तो एका जागी स्थिर राहू शकत नाही.
25 रणशिंग ऐकू येते तेव्हा घोडा घाई करतो. त्याला दुरुनही लढाईचा वास येतो. सेनापतींनी दिलेल्या आज्ञा आणि युध्दातले इतर अनेक आवाज त्याला ऐकू येतात.
26 “ईयोब, तू ससण्याला पंख पसरुन दक्षिणेकडेउडायला शिकवलेस का?
27 ईयोब, गरुडाला आकाशात उंच उडायला शिकवणारा तूच का? तूच त्याला त्याचे घरटे उंच पहाडावर बांधायला सांगितलेस का?
28 गरुड उंच सुळक्यावर राहातो. तीच त्याची तटबंदी आहे
29 गरुड त्याच्या तटबंदीवरुन आपले भक्ष्य शोधतो. गरुडाला एवढ्या उंचीवरुन आपले भक्ष्य दिसू शकते.
30 गरुड प्रेताभोवती गोळा होतात आणि त्यांची पिल्ले रक्त पितात.”
धडा 40

1 परमेश्वर ईयोबला म्हणाला:
2 “ईयोब, तू सर्वशक्तिमान देवाशी वाद घातलास. तू मला चूक केल्याबद्दल दोषी ठरवलेस. आता तू चुकलास हे तू कबूल करशील का? तू मला उत्तर देशील का?”
3 मग ईयोबने देवाला उत्तर दिले तो म्हणाला:
4 “मी अगदी नगण्यआहे. मी काय बोलू? मी तुला उत्तर देऊ शकत नाही. मी माझा हात माझ्या तोंडावर ठेवतो.
5 मी एकदा बोललो होतो. पण आता अधिक बोलणार नाही.” मी दोनदा बोललो पण मी आता अधिक बोलणार नाही.”
6 नंतर परमेश्वर वादळातून पुन्हा ईयोबशी बोलला. तो म्हणाला:
7 “ईयोब, तू आता कंबर कसूनउभा राहा आणि मी जे प्रश्र विचारतो त्याची उत्तरे द्यायला सिध्द हो.
8 “ईयोब, मी न्यायी नाही असे तुला वाटते का? मी काही चूक केल्याचा आरोप करुन तू स्वत:चे निरपराधित्व सिध्द करु पहात आहेस.
9 ईयोब तुझे बाहू देवाच्या बाहूंइतके शक्तिशाली आहेत का? देवाच्या आवाजासारखा तुझा आवाज गडगडाटी आहे का?
10 जर तू देवासारखा असलास तर तुला स्वत:बद्दल अभिमान वाटू दे. आणि तुला मान मिळू दे. तू जर देवासारखा असलास तर तू मानमरातब आणि वैभव कपड्यांसारखे घालू शकतोस.
11 तू जर देवासारखा असलास तर तू तुझा राग दाखवू शकतोस आणि गर्विष्ठ लोकांना शिक्षा करु शकतोस. गर्विष्ठांना मान खाली घालायला लावू शकतोस.
12 होय ईयोब त्या गर्विष्ठांकडे बघ आणि त्यांना नम्र कर. वाईट लोकांना जागच्या जागी चिरडून टाक.
13 त्यांना चिखलात पुरुन टाक. त्यांचे शरीर गुंडाळून थडग्यात टाकून दे.
14 ईयोब, तू जर या सगळ्या गोष्टी करु शकशील तर मी सुध्दा तुझी स्तुती करीन. आणि तु तुझ्या सामर्थ्याने स्वत:ला वाचवू शकतोस हे मी मान्य करीन.
15 “ईयोब, तू बेहेमोथ कडे बघ. मी (देवाने) तुला आणि बेहेमोथला एकाच वेळी निर्माण केले. बेहेमोथ गायीसारखे गवत खातो.
16 बेहेमोथच्या अंगात बरीच शक्ती आहे. त्याच्या पोटातले स्नायू खूप बळकट आहेत.
17 बेहेमोथची शेपटी देवदाराच्या झाडासारखी उभी राहते. त्याच्या पायातले स्नायूही बळकट आहेत.
18 “बेहेमोथची हाडे पितळेसारखी बळकट आहेत. त्यांचे पाय म्हणजे जणू लोखंडाच्या कांबी.
19 बेहेमोथ हा अतिशय आश्र्चर्यकारक प्राणी मी (देवाने) निर्माण केला आहे. परंतु मी त्याचा पराभव करु शकतो.
20 डोंगरावर जिथे जंगली श्र्वापदे खेळतात तिथले गवत बेहेमोथ खातो.
21 तो कमळाच्या झाडाखाली झोपतो. बेहेमोथ दलदलीतल्या लव्हाळ्यात लपतो.
22 कमळाचे झाड बेहेमोथला आपल्या सावलीत लपवते. तो नदीजवळ उगवणाऱ्या एका वृक्षाखाली (विलोवृक्ष) राहतो.
23 नदीला पूर आला तर बेहेमोथ पळून जात नाही. यार्देन नदीचा प्रवाह त्याच्या तोंडावर आदळला तरी तो घाबरत नाही.
24 बेहेमोथचे डोळे कुणीही बांधू शकणार नाही आणि त्याला सापळ्यात अडकवू शकणार नाही.
धडा 41

1 “ईयोब, तुला लिव्याथानाला गळ टाकून पकडता येईल का? तुला त्याची जीभ दोरीने बांधता येईल का?
2 ईयोब, तुला लिव्याथानाच्या नाकातून दोरी घालून त्याला वेसण घालता येईल का? किंवा त्याच्या जबड्यात गळ घालता येईल का?
3 ईयोब, लिव्याथान तुझ्याकडे सोडून देण्यासाठी याचना करील का? तो तुझ्याशी मृदू शब्दात बोलेल का?
4 ईयोब, लिव्याथान तुझ्याशी करार करुन जन्मभर तुझा दास होऊन राहील का?
5 ईयोब, तू पक्ष्याशी जसा खेळशील तसा लिव्याथानाशी खेळशील का? तू त्याला दोरीने बांधशील का? म्हणजे तुझ्या सेवक मुली त्याच्याशी खेळू शकतील?
6 ईयोब मच्छीमार तुझ्याकडून लिव्याथानाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील का? ते त्याचे तुकडे करुन ते व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न करतील का?
7 ईयोब, तू लिव्याथानाच्या कातडीत किंवा डोक्यात भाला फेकशील का?
8 “ईयोब, तू एकदा का लिव्याथानावर हात टाकलास तर पुन्हा तसे कधी करु शकणार नाहीस. ती कशा प्रकारची लढाई असेल याचा एकदा विचार कर.
9 तू लिव्याथानाचा पराभव करु शकशील असे तुला वाटत असेल तर ते विसरुन जा. तशा आशेला जागाच नाही. त्याच्याकडे नजर टाकताच तुझी भीतीने गाळण उडेल.
10 एकही माणूस त्याला जागे करुन त्याचा राग ओढवून घेण्याइतका शूर नाही. “माझ्याविरुध्द उभा राहाणाराही कुणी नाही.
11 मी (देव) कुणाचाही देणेकरी नाही. या नभोमंडळाखाली जे जे आहे ते सर्व माझे आहे.
12 “ईयोब, मी तुला लिव्याथानाच्या पायांविषयी, त्याच्या शक्तीविषयी आणि त्याच्या ऐटदार बांध्याविषयी सांगेन.
13 कुणीही त्याची कातडी छेदू शकत नाही. त्याची कातडी चिलखतासारखीआहे.
14 लिव्याथानाला त्याचा जबडा उघडायला कुणीही भाग पाडू शकत नाही. त्याच्या तोंडातल्या दातांची लोकांना भीती वाटते.
15 लिव्याथानाच्या पाठीवर ढालीसारख्या खवल्यांच्या रांगा एकमेकांना चिकटून आहेत.
16 ते खवले एकमेकांना इतके चिकटले आहेत की त्यातून हवासुध्दा जाऊ शकत नाही.
17 त्याचे खवले एकमेकांशी घटृ बांधलेले आहेत. ते एकमेकांशी इतके घटृ बांधलेले आहेत की कुणी ते ओढून वेगळे करु शकत नाही.
18 लिव्याथान जेव्हा शिंकतो तेव्हा वीज चमकल्यासारखी वाटते. त्याचे डोळे पहाटेच्या प्रकाशासारखे चमकतात.
19 त्याच्या तोंडातून आगीचे लोळ बाहेर पडतात. आगीच्या ठिणग्या निघतात.
20 उकळत्या भांड्याखाली ठेवलेल्या जळत्या गवतातून निघतो तसा धूर त्याच्या नाकातून येतो.
21 लिव्याथानाच्या श्र्वासानी कोळसे पेटतात आणि त्याच्या तोंडातून ज्वाला बाहेर पडतात.
22 लिव्याथानाची मान मजबूत आहे. लोक त्याला घाबरतात आणि त्याच्यापासून दूर पळत सुटतात.
23 त्याच्या कातडीवर एकही मऊ भाग नाही. ती लोखंडासाखी कठीण आहे.
24 लिव्याथानाचे हृदय पाषाणासारखे आहे. त्याला भीती वाटत नाही. ते पाट्यासारखे आहे. जात्याच्या खालच्या तळीसारखे ते आहे.
25 लिव्याथान उठून उभा राहिला की शूर वीरही घाबरतात. लिव्याथानाने त्यांची शेपटी हलवली की ते पळून जातात.
26 तलवारी, भाले आणि तीर त्याच्यावर फेकले तरी ते त्याला न लागता परत येतात. त्या शस्त्रांनी त्याला काहीही इजा होत नाही.
27 तो लोखांडाची कांब गवताच्या काडीसारखी मोडू शकतो. कुजलेले लाकूड जसे पटकन मोडते तसे तो पितळ मोडतो.
28 तो बाणांना घाबरुन पळून जात नाही. वाळलेल्या गवताप्रमाणे दगड त्याच्यावर आपटून परत येतात.
29 जेव्हा लाकडी गदा त्याच्यावर आपटली जाते तेव्हा त्याला ते गवत आपटल्याप्रमाणे वाटते. लोक त्याच्यावर भाले फेकतात तेव्हा तो हसतो.
30 लिव्याथानाच्या शरीरावरची कातडी तीक्ष्ण, टणक खापरासाखी आहे. तो चिखलात कुळक फिरवल्याप्रमाणे तास पाडतो.
31 लिव्याथान पाण्याला उकळी आल्याप्रमाणे हलवतो. तो त्याला उकळत्या तेलाच्या भांड्याप्रमाणे तो त्यावर बुडबुडे आणतो.
32 लिव्याथान पोहतो तेव्हा तो आपल्यामागे मार्ग तयार करतो. तो पाणी ढवळून टाकतो आणि आपल्यामागे पांढरा फेस ठेवतो.
33 पृथ्वीवरचा एकही पशू लिव्याथानासारखा नाही. तो एक भीतिविरहित प्राणी आहे.
34 लिव्याथान गर्विष्ठ प्राण्याला कमी (तुच्छ) लेखतो. तो सगळ्या रानटी श्वापदांचा राजा आहे. आणि मी, परमेश्वराने त्याला निर्माण केले आहे”
धडा 42

1 नंतर ईयोबने परमेश्वराला उत्तर दिले, तो म्हणाला:
2 “परमेश्वरा सर्वकाही तूच करु शकतोस ते मला माहीत आहे. तू योजना आखतोस आणि त्या प्रत्यक्षात येण्यास कोणीही आणि काहीही प्रतिबंध करु शकत नाही.
3 परमेश्वरा, तू प्रश्र विचारलास. ‘हा अज्ञानी माणूस कोण आहे जो असे मूर्खासारखेबोलतो आहे?’ परमश्वरा मला ज्या गोष्टी कळत तव्हत्या त्यांच्याविषयीच मी बोलत होतो. ज्या गोष्टी समजणे माझ्या आवाक्याबाहेरचे होते त्यांच्याविषयी मी बोलत होतो.
4 “परमेश्वरा, तू मला म्हणालास, ‘ईयोब, तू ऐक, मी बोलेन. मी तुला प्रश्न विचारेन आणि तू मला उत्तर दे.’
5 “परमेश्वरा, मी तुझ्याबद्दल पूर्वी ऐकले होते. परंतु आता मी माझ्या डोळ्यांनी तुला बघतो आहे.
6 आणि परमेश्वरा आता मलाच माझी लाज वाटते. मला पश्चात्ताप होत आहे. मी आता धुळीत आणि राखेतबसून माझे मन आणि माझे आयुष्य बदलण्याचे वचन देत आहे.”
7 परमेश्वराचे ईयोबाशी बोलणे झाल्यावर तो तेमानीच्या अलीफजला म्हणाला, “मला तुझा आणि तुझ्या दोन मित्रांचा राग आला आहे. का? कारण तुम्ही माझ्याबद्दल योग्य बोलला नाही. परंतु ईयोब माझा सेवक आहे. तो माझ्याविषयी बरोबर बोलला.
8 म्हणून अलीफज, आता सात बैल आणि सात एडके घे. ते घेऊन माझ्या सेवकाकडे, ईयोबाकडे जा. त्यांना मार आणि त्यांचा स्वत:साठी होमबली अर्पण कर. माझा सेवक ईयोब तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि मी त्याच्या प्रार्थनेला उत्तर देईन. मग मी तुम्हाला योग्य असलेली शिक्षा देणार नाही. तुम्ही अतिशय मुर्ख होता म्हणून तुम्हाला शिक्षा करायला हवी. तुम्ही माझ्याविषयी नीट बोलला नाही. परंतु माझा सेवक ईयोब मात्र माझ्याबद्दल अगदी योग्य बोलला.”
9 तेव्हा अलीफज तेमानी, बिल्दद शूही आणि सोफर नामाथीचा यांनी देवाचे ऐकले. नंतर परमेश्वराने ईयोबाच्या प्रार्थनेला उत्तर दिले.
10 ईयोबाने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने ईयोबाला पुन्हा यशस्वी केले. देवाने त्याला पूर्वी त्याच्याकडे होते त्यापेक्षा दुप्पट दिले.
11 ईयोबाचे सगळे भाऊ आणि बहिणी त्याच्या घरी आले. ईयोबाला जो कोणी ओळखत होता तो ही त्याच्याकडे आला. त्यांनी ईयोबबरोबर भोजन घेतले. त्यांनी ईयोबाचे सांत्वन केले. परमेश्वराने ईयोबावर इतकी संकटे आणली त्याचे त्यांना वाईट वाटले. प्रत्येकाने ईयोबाला चांदीचा तुकडाआणि सोन्याची अंगठी दिली.
12 परमेश्वराने ईयोबाच्या आयुष्याच्या उत्तरार्धावर त्याच्या पूर्वार्धापेक्षा अधिक कृपा केली. ईयोबाकडे आता 14000 मेंढ्या, 6,000 उंट, 2,000 गायी आणि 1,000 गाढवी आहेत.
13 ईयोबाला सात मुले आणि तीन मुली झाल्या.
14 ईयोबाने त्याच्या पहिल्या मुलीचे नाव यमीमा, दुसऱ्या मुलींचे नाव कसीया ठेवले. तिसऱ्या मुलीचे नाव केरेन हप्पूक ठेवले.
15 त्याच्या मुली त्या देशातील सर्वात सुंदर मुली होत्या, ईयोबाने त्याच्या मुलींना त्याच्या मालमत्तेतला वाटा दिला. त्यांच्या भावांनासुध्दा ईयोबच्या मालमत्तेतला वाटा मिळाला.
16 अशा तऱ्हेने ईयोब 140 वर्षे जगला. तो त्याची मुले, नातवंडे, पंतवंडे पाहीपर्यंत जगला.
17 नंतर ईयोब मरण पावला. ईयोब चांगले आयुष्य जगला. तो अगदी वयोवृध्द होऊन मेला.