धडा 1

1 आमोजचा मुलगा यशया ह्याला पुढीलप्रमाणे देवाचा दृष्टान्त झाला आणि यहूदा व यरूशलेम येथे पुढे घडणाऱ्या गोष्टी देवाने यशयाला दाखविल्या उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया या यहूदी राजांच्या काळात घडून येणाऱ्या गोष्टी यशयाने पाहिल्या.
2 हे स्वर्गा आणि हे पृथ्वी, परमेश्वर काय म्हणतो ते ऐका. परमेश्वर म्हणतो,“मी माझ्या मुलांचे पालनपोषण केले त्यांना लहानाचे मोठे केले. पण तीच मुले माझ्यावर उलटली.
3 गाय आपल्या मालकाला ओळखते. गाढवालासुध्दा, आपला मालक आपल्याला कोठे खायला देणार ते, कळते. पण इस्राएल लोक मला जाणत नाहीत. माझ्या लोकांना काही समजत नाही.”
4 इस्राएल हे राष्ट्र पापांनी भरले आहे. अन्याय, दुष्कृत्ये ह्यांचा बोजा त्यांच्यावर पडला आहे. पापी कुटुंबातील दुर्वर्तनी मुलांप्रमाणे इस्राएल लोक वागत आहेत. त्यांनी परमेश्वराचा त्याग केला आहे. इस्राएलच्या पवित्र देवाचा त्यांनी अपमान केला आहे. त्यांनी त्याचा त्याग केला व त्याला एखाद्या परक्या माणसाप्रमाणे वागवले.
5 देव म्हणतो, “मला तुम्हाला सतत शिक्षा का करावी लागावी? मी तुम्हाला शिक्षा केली तरी तुम्ही सुधारत नाही. तुम्ही माझ्याविरूध्द बंड करीतच राहता. सध्या प्रत्येकाचे डोके व हृदय कमकुवत झाले आहे.
6 तुमच्या पायापासून डोक्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर जखमा, घाव व वाहते व्रण आहेत. त्या वाहत्या व्रणीची तुम्ही काळजी घेतली नाही. तुमच्या जखमा तेल सोडून नरम केल्या नाहीत आणि त्यावर पट्टीही बांधली नाही.
7 “तुमच्या देशाचा नाश झाला आहे. तुमची शहरे जाळली गेली आहेत. तुमच्या शत्रूंनी तुमचा देश काबीज केला आहे. सैन्यांनी एखादा देश उद्ध्वस्त करावा तशी तुमची भूमी झाली आहे.
8 सीयोनची मुलगी (यरूशलेम) द्राक्षांच्या बागेतील रिकाम्या खोपटाप्रमाणे झाली आहे. तिची अवस्था काकडीच्या शेतातील जुन्या घराप्रमाणे झाली आहे. शत्रूने पराभूत केलेल्या नगराप्रमाणे ती दिसते.”
9 सर्व शक्तिमान परमेश्वराने काही लोकांना जिवंत ठेवले नसते तर सदोम अथवा गमोरा ह्या शहरांप्रमाणे आपला संपूर्ण नाश झाला असता.
10 सदोमच्या नेत्यांनो, परमेश्वराचा संदेश ऐका गमोराच्या लोकांनो, देवाच्या शिकवणुकीकडे लक्ष द्या.
11 देव म्हणतो, “तुम्ही माझ्यापुढे सतत यज्ञबलि का करता? मला तुमच्या मेंढ्यांच्या, वासरांच्या चरबीच्या, आणि बैल, कोकरे आणि बकऱ्यांच्या यज्ञबलिंचा आता वीट आला आहे.
12 तुम्ही माझ्या दर्शनाला येता तेव्हा माझ्या अंगणातील प्रत्येक गोष्ट तुडविता. असे करायला तुम्हाला कोणी सांगितले?
13 “माझ्यासाठी निरर्थक यज्ञबलि देणे थांबवा. माझ्यापुढे जळणाऱ्या धुपाचा मला वीट आला आहे. चंद्रदर्शन शब्बाथ व सुटी यांच्या निमित्ताने होणाऱ्या मेजवान्या मला आवडत नाहीत. धार्मिक सभेत तुम्ही करीत असलेली दुष्कृत्ये मला अजिबात पसंत नाहीत.
14 तुमच्या मासिक सभा व मेळावे यांची मला मनापासून घृणा वाटते. ह्या सभांचे मला ओझे झाले आहे. मी ह्याला कंटाळलो आहे.
15 “प्रार्थना करण्यासाठी उचललेल्या तुमच्या हाताकडे मी लक्ष देणार नाही. तुम्ही कितीही प्रार्थना केली तरी ऐकणार नाही. का? कारण तुमचे हातरक्ताने माखले आहेत.
16 “शुचिर्भूत व्हा. स्वच्छ व्हा. तुमची दुष्कृत्ये थांबवा. मला वाईट गोष्टी बघायच्या नाहीत. चुकीचे वागू नका.
17 चांगल्या गोष्टी करायला शिका. दुसऱ्यांशी न्यायाने वागा. जे दुसऱ्यांना क्लेष देतात त्यांना शासन करा. अनाथ मुलांना मदत करा. विधवांना साहाय्य करा.”
18 परमेश्वर म्हणातो, “या, आपण या गोष्टींची चर्चा करू या. तुमची पातके कितीही काळीकुट्ट (शब्दश: शेंदरासारखी लाल) असली तरी ती धुता येतील आणि तुम्ही हिमाप्रमाणे पांढरेशुभ्र व्हाल. जरी तुमची पापे लाल असली तरी तुम्ही शुभ्र लोकरीसारखे व्हाल.
19 “तुम्ही माझे म्हणणे ऐकाल तर ह्या देशातील चांगल्या वस्तू तुम्हाल प्राप्त होतील.
20 माझे म्हणणे न ऐकणे हे माझ्याविरूध्द जाण्यासारखे होईल आणि शत्रू तुमचा नाश करेल.”स्वत: परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या.
21 देव म्हणतो, “यरूशलेमेकडे पाहा. ही नगरी माझ्यावर श्रध्दा ठेवणारी आणि माझ्या मताप्रमाणे वागणारी होती. आताच तिला असे वारांगनेप्रमाणे वागायला काय झाले? आता ती माझ्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही. यरूशलेमला प्रामणिक बनवली पाहिजे. यरूशलेममध्ये राहणाऱ्या लोकांनी देवाच्या इच्छेप्रमाणे राहिले पाहिजे. पण सध्या तेथे खुनी लोक राहतात.
22 “चांगुलपणा हा चांदीसारखा असतो. पण तुझ्या चांदीला काहीही मोल राहिलेले नाही. तुझ्या द्राक्षरसात (चांगुलपणात) पाणी मिसळल्याने तो पातळ झाला आहे.
23 तुझे सत्ताधीश बंडखोर व चोरांचे साथीदार झाले आहेत. तुझे सगळे सत्ताधीश लाच मागतात. चुकीच्या गोष्टी करण्यासाठी ते पैसे घेतात. लोकांना फसविण्यासाठी ते पगार घेतात. ते अनाथ मुलांना मदत करीत नाहीत आणि विधवांच्या गरजांकडे लक्ष देत नाहीत.”
24 यामुळे प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा सामर्थ्यवान ईश्वर म्हणतो, “माझ्या शत्रूंनो, मी तुम्हाला शिक्षा करीन. तुम्ही मला जास्त त्रास देऊ शकणार नाही.
25 चांदी स्वच्छ करण्यासाठी लोक एक रसायन वापरतात. मी तसेच करीन आणि तुझी दुष्कृते धुवून काढीन. मी तुझ्यातील सर्व निरर्थक गोष्टी काढून टाकीन.
26 सुरूवातीला होते त्याप्रमाणे मी न्यायाधीश नेमीन. पूर्वीप्रमाणेच मंत्री नेमीन मग तुला सर्वजण ‘चांगली व निष्ठावंत नगरी म्हणतील.”‘
27 देव कल्याण करणारा आहे आणि तो योग्य त्याच गोष्टी करतो. म्हणूनच सीयोनचा व जे त्याला शरण येतील अशा लोकांचा, देव उध्दार करेल.
28 पण सर्व गुन्हेगारांचा आणि पापी लोकांचा नाश होईल. (हे लोक परमेश्वराचे ऐकणारे नाहीत.)
29 भविष्यात, ज्या ओकच्या झाडांची लोक पूजा करतात व ज्या खास बागांमध्ये जाऊन मूर्तींची पूजा करतात, त्या झाडांची व बागांची लोकांना लाज वाटेल.
30 असे होण्याचे कारण तुम्ही त्या पाने गळून जाणाऱ्या ओकच्या झाडांप्रमाणे किंवा पाणी नसल्याने सुकत चाललेल्या बागांप्रमाणे व्हाल.
31 बलाढ्य माणसे लहानशा वाळलेल्या लाकडाच्या ढलपीप्रमाणे होतील. त्यांची कर्मे आग लावणाऱ्या ठिणगीसारखी असतील. ती बलाढ्य माणसे व त्यांची कर्मे ह्यांना एकदमच आग लागेल आणि ती आग कोणीही विझवू शकणार नाहीत.
धडा 2

1 आमोजचा मुलगा यशया याला यहुदा व यरूशलेम यांच्या बद्दल दृष्टान्त झाला.
2 शेवटच्या दिवसात, परमेश्वराचे मंदिर असलेला डोंगर सर्व डोंगरांपेक्षा उंच होईल. तो टेकड्यांपेक्षा उंच उचलला जाईल. सर्व देशांतील लोक तेथे जातील.
3 पुष्कळ लोक तेथे जातील. ते म्हणतील, “आपण परमेश्वराच्या डोंगरावर जाऊ या. आपण याकोबच्या देवाच्या मंदिरात जाऊ या. मग देव, त्याचा जगण्याचा मार्ग आपल्याला दाखवील. आणि आपण त्या मार्गाने जाऊ.”देवाच्या शिकवणुकीची सुरूवात, परमेश्वराच्या संदेशाचा आरंभ यरूशलेममधील सीयोनच्या डोंगरात होईल. व तो सर्व जगात पोहोचेल.
4 नंतर सर्व देशांतील लोकांचा न्याय देवच करील. देव माणसा-माणसांतील वाद मिटवील. लोक लढण्यासाठी शस्त्र वापरणार नाहीत. लोक भाल्यांचे कोयते करतील. लोक एकमेकांविरूध्द लढणार नाहीत. इत:पर युध्दाचे शिक्षण दिले जाणार नाही.
5 याकोबच्या वंशजांनो, या आपण परमेश्वराच्या प्रकाशातून चालू या.
6 तुम्हाला हे सांगायचे कारण तुम्ही तुमच्या लोकांपासून दूर गेलात. तुमचे लोक पूर्वेकडील चुकीच्या कल्पनांनी भारावून गेले आहेत. पलिष्ट्यांप्रमाणे ते भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी परकीयांच्या कल्पनांचा स्वीकार केला आहे.
7 दुसरीकडून आणलेल्या सोन्याचांदीने तुमचा देश भरलेला आहे. तुमच्याकडे खूप खजिने आहेत. असंख्य घोडे व रथ आहेत.
8 तुमचा देश लोक पूजत असलेल्या मूर्तीनी भरून गेला आहे. लोकच त्या मूर्ती घडवितात आणि त्यांची पूजा करतात.
9 दिवसेंदिवस लोक वाईट होत चालले आहेत. ते नीच पातळीवर पोहोचले आहेत. देवा, तू नक्कीच त्यांना क्षमा करणार नाहीस. हो ना?
10 येथून चालते व्हा. कडेकपारीमागे धुळीत लपून बसा. तुम्ही परमेश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि त्याच्या महान सामर्थ्यापासून लपून राहिले पाहिजे.
11 गर्विष्ठांचा गर्व गळून पडेल आणि ते शरमिंदे होऊन माना खाली घालतील. अशा वेळी फक्त परमेश्वरच ताठ मानेने उभा असेल.
12 परमेश्वराने एक दिवस निश्चित केला आहे. त्या दिवशी परमेश्वर गर्विष्ठ व फुशारक्या मारणाऱ्या लोकांना शिक्षा करील. मग त्या लोकांचे महत्व कमी होईल.
13 जरी हे लोक लबानोनामधील उंच गंधसरूप्रमाणे वा बाशानमधील मोठ्या एला वृक्षांप्रमाणे असले तरी देव त्यांना शिक्षा करील.
14 हे गर्विष्ठ लोक उतुंग पर्वत उंच टेकड्या व
15 उंच मनोरे आणि उंच भक्कम भिंतीप्रमाणे असले तरी देव त्यांना शिक्षा करील.
16 हे गर्विष्ठ लोक तार्शीशहूनयेणाऱ्या प्रचंड मालवाहू जहाजांप्रमाणे (ह्या जहाजांत महत्वाचा माल भरलेला असतो.) असले तरीसुध्दा देव त्यांना शिक्षा करील.
17 त्या वेळी गर्विष्ठांचा गर्व गळून पडेल. ते माना खाली घालतील व फक्त परमेश्वरच ताठ मानेने उभा राहील.
18 सर्व मूर्ती (खोटे देव) नाहीशा होतील.
19 लोक कडेकपारीच्या मागे व जमिनीच्या भेगांत लपून बसतील. लोकांना परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांचे भय वाटेल. जेव्हा परमेश्वर भूकंप घडवून आणील तेव्हा हे असे घडेल.
20 त्या वेळी लोक आपल्याजवळील सोन्याचांदीच्या मूर्ती फेकून देतील. (लोकांनी ह्या मूर्ती पूजेसाठी घडविल्या होत्या.) वटवागुळे व चिचुंद्र्या राहतात अशा बिळांत लोक त्या मूर्ती टाकून देतील.
21 मग परमेश्वराला व त्याच्या सामर्थ्याला भिऊन सर्व कडेकपारीत लपतील. हे सर्व परमेश्वराने घडवून आणलेल्या भूकंपाच्या वेळी घडून येईल.
22 जर तुम्हाला स्वत:चे रक्षण करायचे असेल तर तुम्ही दुसऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका. शेवटी ती माणसेच आहेत म्हणजेच मर्त्य आहेत. म्हणूनच त्यांना देवाप्रमाणे सामर्थ्यवान समजू नका.
धडा 3

1 माझे म्हणणे समजून घ्या. यहुदा व यरूशलेम ज्यावर अवलंबून आहेत अशा सर्व गोष्टी तो प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर काढून घेईल. देव त्यांची भाकरी व पाणी बंद करील.
2 तो (देव) वीरांचा व मोठ्या योध्द्यांना दूर करील. न्यायासनावर बसणारे, भोंदू संदेष्टे, मांत्रिक व तथाकथित वडीलधारी मंडळी इत्यादीनां दुसरीकडे नेऊन ठेवील.
3 देव सैनिक शासक व शासनकर्त्ते यांना दूर करील. निपुण सल्लागार व जादूटोणा करून भविष्यकथन करण्याचा प्रयत्न करणारे चाणाक्ष लोक यांनाही दूर ठेवील.
4 देव म्हणतो, “तरूण मुले नेतेपदी बसतील अशी परिस्थिती मी निर्माण करीन.
5 प्रत्येकजण दुसऱ्याविरूध्द उभा राहील, लहान थोरांचा मान राखणार नाहीत व सामान्य प्रतिष्ठितांचा आदर करणार नाहीत.”
6 त्या वेळी एखादा उठेल व आपल्या घरातील एकाद्या भावाला पकडेल व त्याला म्हणेल “तुझ्याजवळ अंगरखा आहे, तर मग ह्या विध्वंस झालेल्या अवशेषांवर तूच नेता होशील.”
7 पण तो भाऊ उभाराहील व म्हणेल, “माझ्याच घरात पुरेसे अन्न, वस्त्र नाही. मी तुम्हाला काय मदत करू शकत नाही? तुम्ही मला तुमचा नेता करू नका.”
8 हे घडेल कारण यरूशलेम अडखळले आहे व त्याने चूक केली आहे. यहुदाने देवाला अनुसरायचे थांबवले आणि त्याचे पतन झाले. यरूशलेम व यहुदा यांची वाणी आणि कृती परमेश्वराच्या विरूध्द आहे. परमेश्वराच्या तेजस्वी डोळ्यांना हे सर्व स्पष्टपणे दिसत आहे.
9 चुकीची कृत्ये केल्याची अपराधी भावना लोकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आपल्या पापांबद्दल त्यांना गर्व वाटत आहे. ते सदोम शहरातील रहिवाशांसारखे झाले आहेत. आपली पापे कोण पाहत आहे ह्याची त्यांना पर्वा नाही. हे त्यांच्या दृष्टीने फारच वाईट आहे. त्यांनी स्वत:ला आपत्तीत लोटले आहे.
10 सज्जनांना सांगा की त्यांचा उत्कर्ष होईल. सत्कृत्यांचे फळ त्यांना मिळेल.
11 पण दुर्जनांची काही धडगत नाही. त्यांना खूप त्रास होईल. त्यांच्या दुष्कृत्यांची त्यांना सजा मिळेल.
12 लहान बालके मोठ्यांचा पराभव करतील. अबलांचे राज्य येईल. माझ्या लोकांनो, तुमच्या मार्गदर्शकांनी तुम्हाला योग्य मार्गापासून परावृत्त केले व चुकीच्या मार्गाने नेले.
13 परमेश्वर स्वत:च लोकांचा न्यायनिवाडा करील.
14 वडीलधारी मंडळी व नेते यांनी केलेल्या कृत्यांविरूध्द परमेश्वर न्याय देईल.परमेश्वर म्हणतो, “तुम्ही लोकांनी द्राक्षांची बाग(यहुदा) जाळली आहे. तुम्ही गरिबांच्या वस्तू बळकावल्या व स्वत:च्या घरात भरल्या.
15 माझ्या लोकांना दुखवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? गरिबांना धुळीत मिळवायचा तुम्हाला काय हक्क आहे?” माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणाला.
16 परमेश्वर म्हणतो, “सीयोनमधल्या स्त्रिया फार गर्विष्ठ झाल्या आहेत. आपण इतर लोकांपेक्षा उच्च आहोत हे दाखवीत त्या ताठ मानेने वावरत असतात. त्या डोळे मारीत, आपल्या पैंजणांचा आवाज करीत ठुमकत चालतात.”
17 माझा प्रभु सीयोनच्या स्त्रियांच्या डोक्यांत व्रण करील. त्यांचे सर्व केस गळून पडतील.
18 त्या वेळी परमेश्वर ह्या स्त्रियांना ज्यांचा अभिमान वाटतो अशा सर्व गोष्टी म्हणजे पैजण, चंद्रसूर्याप्रमाणे असलेले हार, कर्णभूषणे, तोडे, बुरखे, गळपट्टे, पायातल्या साखळ्या, कमरपट्टे, अत्तरांच्या बाटल्या, ताईत, विशेष प्रकारच्या अंगठ्या, नथी, उंची रेशमी वस्त्रे, शेले व शाली, बटवे, आरसे, सुती वस्त्रे फेटे, लांब शाली काढून घेईल.
19
20
21
22
23
24 आता या स्त्रियांजवळ मधुर सुवासाची अत्तरे आहेत पण देव त्यांना शिक्षा करील त्या वेळी त्या अत्तरांना बुरशी येऊन कुजट घाण येईल. आता या स्त्रिया कमरपट्टे वापरतात पण त्या ऐवजी दोऱ्या वापरण्याची वेळ त्यांच्यावर येईल. आता त्या विविध केशरचना करतात पण नंतर त्यांच्या डोक्यावर केसच नसतील. त्यांचे केशवपन होईल. त्यांच्या मेजवान्यांसाठी असलेल्या विशेष वस्त्रप्रावरणांऐवजी त्यांना जे कपडे घालावे लागतील त्यातून त्यांची वाईट स्थिती दिसून येईल. त्यांच्या चेहेऱ्यावरील सौंदर्यखुणांच्या जागी भाजल्याचे डाग पडतील.
25 त्याच वेळी लढाईत तुमची माणसे तलवारीने मारली जातील. वीर लढाईत कामी येतील.
26 वेशीजवळ असलेल्या सभा-संमेलनाच्या जागी शोककळा पसरेल. चोर व लुटारूंनी सर्वस्व लुटलेल्या स्त्रीप्रमाणे यरूशलेम नगरी एकटीच बसून शोक करेल.
धडा 4

1 त्यावेळी सात स्त्रिया एका माणसाला पकडून म्हणतील, “आम्ही आमचे अन्न व वस्त्र स्वत: मिळवू. फक्त तू आमच्याशी लग्न कर. तुझे नाव आम्हाला लावू दे. कृपया आमच्या अब्रूचे रक्षण कर.”
2 ह्याच वेळी परमेश्वराचे रोपटे (यहुदा) खूप सुंदर व महान होईल. त्या वेळी इस्राएलमध्ये राहणाऱ्यांना भूमीतून पिकणाऱ्या सर्व गोष्टींचा अभिमान वाटेल.
3 त्यावेळी सीयोन व यरूशलेम येथे जे लोक राहत असतील त्यांना पवित्र मानले जाईल. देवाची कृपा झाल्याने त्यांची नावे खास यादीत समाविष्ट केली गेली आहेत. त्या सर्व लोकांच्या बाबतीत हे घडेल. त्या सर्व यादीतील लोकांना जिवंत राहण्याची संमत्ती दिली जाईल.
4 सीयोनमधील स्त्रियांचे रक्त परमेश्वर धुवून टाकील. यरूशलेमलाही परमेश्वर निर्मळ करील. देव न्यायीपणाचा आत्मा वापरून योग्य न्याय करील आणि प्रत्येक गोष्ट जळणाऱ्या आत्म्याद्वारे शुध्द करील.
5 ह्यावेळी आपण आपल्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत हे देव सिध्द करील. दिवसा तो धुराचा ढग तयार करील व रात्री अग्नीचा झगझगीत प्रकाश निर्माण करील. प्रत्येक इमारतीवरच्या आकाशात आणि सीयोनच्या डोंगरावरील मेळाव्याच्या जागेवर देवाच्या कृपेच्या ह्या निशाण्या दिसतील. संरक्षणासाठी प्रत्येक माणसावर आच्छादन असेल.
6 हे आच्छादन म्हणजे सुरक्षित ठिकाण असेल. ते माणसाचा उन्हापासून बचाव करील तसेच सर्व प्रकारच्या पुरांपासून आणि पावसापासून रक्षण करण्यासाठी लपून बसण्याची ती सुरक्षित जागा असेल.
धडा 5

1 मी माझ्या मित्रासाठी (देवासाठी) गाणे गाईन. हे गाणे, माझ्या मित्राच्या द्राक्षमळ्याच्या (इस्राएलच्या) प्रेमासंबंधी असेल.माझ्या मित्राचा द्राक्षमळा अतिशय सुपीक जमिनीत होता.
2 माझ्या मित्राने खणून जमीन साफसूफ केली. तिच्यामध्ये अतिशय उत्तम प्रतीच्या द्राक्षाची लागवड केली. त्याने मळ्याच्या मध्यभागी एक मनोरा बांधला. द्राक्षाचे उत्तम पीक येईल अशी त्याला आशा होती पण त्यातून निकृष्ट प्रतीचीच फळे आली.
3 म्हणून देव म्हणाला, “यरूशलेममध्ये राहणाऱ्या लोकांनो व यहूदात राहणाऱ्या लोकांनो, माझा आणि माझ्या द्राक्षमळ्याचा जरा विचार करा.
4 माझ्या द्राक्षमळ्यासाठी मी आणखी काय करू शकलो असतो? मला जे करणे शक्य होते ते सर्व मी केले मी चांगल्या पिकाची आशा केली पण पीक वाईट आले. असे का झाले?
5 आता मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे ते तुम्हाला सांगतो.मळ्याच्या संरक्षणासाठी लावलेले काटेरी कुंपण काढून मी जाळून टाकीन. त्याच्या आवाराची दगडी भिंत फोडून दगड पायाने तुडवीन.
6 मी माझा द्राक्षमळा उजाड करीन. कोणीही वेलीची काळजी घेणार नाही. कोणीही त्या मळ्यात काम करणार नाही. त्यात तण व काटेकुटे माजतील. तेथे पाऊस न पाडण्याची मी ढगांना आज्ञा करीन.”
7 सर्वशक्तिमान परमेश्वराच्या मालकीचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएल हा देश होय. ज्या द्राक्षवेली परमेश्वराला प्रिय आहेत त्या म्हणजे यहुदी लोक होत.परमेश्वराने न्यायाची आशा केली पण तेथे फक्त हत्याच घडली. परमेश्वराने प्रामाणिकपणाची आशा धरली पण तेथे फक्त वाईट रितीने वागविलेल्या लोकांचे आक्रोश होते.
8 अजिबात जागा शिल्लक राहणार नाही अशारीतीने घराला घर व शेताला शेत जोडणाऱ्यांना तुमचा धिक्कार असो. परन्तु परमेश्वर तुम्हाला शिक्षा करील. असे हे तुम्हाला देशात एकाकी राहण्यास भाग पाडेपर्यंत चालू राहील.
9 सर्वशक्तिमान परमेश्वराने मला हे सांगितले व मी ऐकले, “आता तेथे खूप घरे आहेत पण मी नक्की सांगतो की ती सर्व उध्वस्त होतील. मोठी व सुंदर घरे तेथे आहेत पण ती सर्व रिकामी पडतील.
10 तेव्हा दहा एकराच्या द्राक्षाच्या मळ्यातून अगदी थोडा द्राक्षरस मिळेल आणि खूप पोती बियाणे वापरले तरी अगदी थोडे पीक येईल.”
11 लवकर उठून नशा आणणाऱ्या पेयाच्या शोधास लागणाऱ्यांनो तुमचा धिक्कार असो. तुम्ही मद्यापानाने धुंद होऊन रात्री उशिरापर्यंत जागत राहता.
12 मद्य, सारंगी, डफ, बासरी आणि इतर वाद्ये यांच्या संगतीत तुम्ही मेजवान्या करता आणि परमेश्वराची करणी तुम्हाला दिसत नाही. परमेश्वराने आपल्या हाताने अनेक गोष्टी घडवल्या आहेत पण त्या तुमच्या लक्षात येत नाहीत. हे तुमच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही.
13 परमेश्वर म्हणतो, “माझ्या लोकांना पकडून नेले जाईल. का? कारण ते समजदार नाहीत. त्यांच्यातील उच्चपदस्थांची उपासमार होईल. त्यांतील बहुसंख्य तहानेने तळमळतील.
14 पण ती सर्व मोठी माणसे मरतील व (शिओल) अधोलोकात अधिक भर पडेल. मृत्यु आपला अजस्त्र जबडा पसरेल आणि ते सर्व लोक खाली अधोलोकात जातील.”
15 लोक हीनदीन होतील. गर्विष्ठ माणसांच्या माना खाली जातील.
16 सर्वशक्तिमान परमेश्वर प्रामाणिकपणाने योग्य न्याय करील आणि लोकांना त्याची महानता कळेल. पवित्र देव योग्य त्याच गोष्टी करेल आणि लोक त्याचा आदर करतील.
17 देव इस्राएल लोकांना त्यांचा देश सोडून जाण्यास भाग पाडेल. सर्व भूमी ओसाड होईल. शेळ्या-मेंढ्यांना मोकळे कुरण मिळेल. एकेकाळी श्रीमंतांची मालकी असलेल्या जमिनीवर कोकरे चरतील.
18 त्या लोकांकडे पाहा लोक दोरांनी गाड्या खेचून नेतात तसे ते आपले गुन्हे व पापे वाहून नेत आहेत.
19 ते लोक म्हणतात, “देवाने त्याच्या इच्छेप्रमाणे जे करायचे ते लवकरात लवकर करावे, म्हणजे आम्हाला काय घडणार आहे ते तरी कळेल. परमेश्वराची इच्छा लवकर पूर्ण व्हावी म्हणजे आम्हांला त्याची योजना कळेल.”
20 ते लोक चांगल्या गोष्टी वाईट आहेत व वाईट गोष्टी चांगल्या आहेत असे म्हणतात. ते प्रकाशाला अंधार व अंधाराला प्रकाश समजतात. त्यांना आंबट गोड लागते व गोड आंबट लागते.
21 ते स्वत:ला फार चलाख समजतात. त्यांना वाटते आपण फार बुध्दिमान आहोत.
22 मद्य पिण्यात त्यांची प्रसिध्दी आहे आणि मद्याचे मिश्रण करण्यात ते तरबेज आहेत.
23 जर त्यांना पैसे चारले तर गुन्हेगारालाही ते माफ करतील पण ते सज्जनांना प्रामणिकपणे न्याय मिळू देणार नाहीत.
24 अशा लोकांचे वाईट होईल. ज्याप्रमाणे आगीमध्ये पाने आणि गवत जळून भस्मसात होते त्याप्रमाणे त्यांच्या वंशजांचा पूर्णपणे नाश होईल. अंकुर मरून धुळीला मिळावा अथवा आगीत फूल जळून त्याची राख वाऱ्यावर कोठल्या कोठे उडून जावी तसाच त्यांच्या वंशजांचा समूळ नाश होईल.त्या लोकांनी, सर्वशक्तिमान परमेश्वराची आज्ञा मानण्यास, नकार दिला. इस्राएलच्या पवित्र देवाच्या संदेशाचा त्यांनी तिरस्कार केला.
25 म्हणून परमेश्वर त्यांच्यावर रागावला आहे. तो आपला हात त्यांच्यावर उगारेल आणि त्यांना शिक्षा करील. मग डोंगरसुध्दा भीतीने कापतील. मृतदेह कचऱ्याप्रमाणे रस्त्यावर पडतील. पण तरीही देवाचा राग शांत होणार नाही. त्याचा हात लोकांना शिक्षा करण्याकरीता उगारलेलाच राहील.
26 पाहा! दूरच्या राष्ट्रांना देव खूण करीत आहे, झेंडा उभारून तो त्या राष्ट्रांना आवाहन करीत आहे. दूरवरून शत्रू येत आहे. लवकरच तो या देशात प्रवेश करील. तो फार वेगाने येत आहे.
27 शत्रू कधीच थकत नाहीत वा खाली पडत नाहीत. ते कधीच पेंगुळत नाहीत अथवा गाढ झोपून राहत नाहीत. ते नेहमीच शस्त्रसज्ज असतात. त्यांच्या पादत्राणांचे बंद कधीच तुटत नाहीत.
28 त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत. त्यांची धनुष्ये सज्ज आहेत. त्यांच्या घोड्यांचे खूर दगडासारखे कठीण आहेत. त्यांच्या रथांच्या मागे धुळीचे लोट उठतात.
29 ते गर्जना करतात आणि त्या गर्जना एखाद्या तरूण सिंहाच्या गर्जनेइतक्या मोठ्या असतात. जे लोक त्यांच्याशी लढतात त्यांना ते गुरगुरत पकडतात. लोक झगडतात आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना वाचविणारा तेथे कोणीही नसतो.
30 मग ते “सिंह” समुद्रगर्जना करतात. बंदिवासातील लोकांची नजर खाली वळते. त्यांच्या डोळ्यांपुढे अंधकार पसरतो. अंधकाराशिवाय तेथे काहीच असत नाही. सर्व प्रकाश या अंधकारातच लुप्त होतो.
धडा 6

1 उज्जीया राजाच्या मृत्यूच्या वर्षीच मी माझ्या प्रभूला पाहिले. तो एका उच्च व विलक्षण सुंदर सिंहासनावर बसला होता. त्याच्या पायघोळ पोशाखाने सर्व मंदिर भरून गेले होते.
2 देवदूत परमेश्वराभोवती उभे होते. प्रत्येक देवदूताला सहा पंख होते. त्यातील दोन पंखांनी ते चेहरा झाकीत. दोनने पाय झाकीत व उरलेल्या दोन पंखांनी उडत.
3 ते देवदूत एकमेकांशी बोलत होते. ते म्हणत होते, “पवित्र, पवित्र, पवित्र सर्वशक्तिमान परमेश्वर परमपवित्र आहे. त्याची प्रभा सगळ्या पृथ्वीला व्यापून राहिली आहे.” देवदूतांचे आवाज फार मोठे होते.
4 त्यांच्या आवाजाने मंदिराच्या दाराची चौकट हादरली नंतर मंदिर धुराने भरून गेले.
5 मी फारच घाबरलो. मी म्हणालो, “हाय रे देवा! आता माझा नाश होणार देवाशी संवाद करण्याइतका मी पवित्र किंवा शुध्द नाही आणि मी ज्या माणसांत राहतो, तीही देवाशी प्रत्यक्ष बोलण्याइतकी शुध्द नाहीत.तरीसुध्दा राजाधिराज, सर्वशक्तिमान परमेश्वराला मी पाहिले आहे.”
6 तेथे वेदीवर अग्नी प्रज्वलित केलेला होता एका सराफ देवदूताने चिमट्याने त्यातील निखारा उचलला. सराफ देवदूत तो निखारा घेऊन माझ्याकडे उडत आला.
7 त्या निखांऱ्याचा स्पर्श त्याने माझ्या तोंडाला केला नंतर तो देवदूत म्हणाला, “हे बघ! ह्या निखाऱ्याच्या स्पर्शाने तुझी सर्व दुष्कृत्ये नाहिशी झाली आहेत. तुझी पापे आता पुसली गेली आहेत.”
8 नंतर मला माझ्या परमेश्वराचा आवाज ऐकू आला. परमेश्वर म्हणाला, “मी कोणाला पाठवू! आमच्यासाठी कोण जाईल?”मग मी म्हणालो, “हा मी तयार आहे, मला पाठव.”
9 नंतर परमेश्वर म्हणाला, “जा आणि ह्या लोकांना सांग: ‘काळजीपूर्वक ऐका पण समजून घेऊ नका. काळजीपूर्वक पाहा पण शिकू नका.’
10 लोकांना गोंधळात टाक, लोक जे ऐकतील आणि पाहतील ते त्यांना समजणार नाही असे कर. तू असे केले नाहीस तर कदाचित् लोक जे कानांनी ऐकतील आणि डोळ्यांनी पाहतील, तेच खरे समजतील. असे जर झाले तर ते मला शरण येतील आणि बरे होतील.”
11 नंतर मी विचारले, ‘प्रभू, मी हे असे किती दिवस करू?’ परमेश्वर उत्तरला, “लोक पळून जाऊन शहरे निर्जन होईपर्यंत, आता भरलेली घरे निर्मनुष्य होईपर्यंत, किंबहुना ही सर्व भूमी उजाड व वैराण होईपर्यंत तू असे कर.”
12 परमेश्वर लोकांना दूर पळवून लावील ह्या देशात खूप मोठी ओसाड जमीन तयार होईल.
13 पण लोकसंख्येचा दहावा हिस्सा ह्या भूमीवर राहतील. त्यांचा नाश होणार होता तरीही ते परमेश्वराकडे परत येतील. हे लोक एलाच्या झाडाप्रमाणे असतील. एलाचे झाड कापले तरी बुडखा शिल्लक राहतोच. हे राहिलेले लोक त्या बुडख्याप्रमाणे असतील. हे लोक खास बीज म्हणजेच देवाची लाडकी लेकरे असतील.
धडा 7

1 यहुदाचा राजा आहाज हा योथामचा पुत्र व योथाम हा उज्जीयाचा पुत्र. आहाजच्याकारकिर्दीत रसीन हा सिरीयावर राज्य करीत होता तर रमाल्याचा पुत्र पेकह हा इस्राएलचा राजा होता. एकदा रसीन व पेकह हे दोघे यरूशलेमवर चाल करून गेले. पण त्यांना ते शहर काही जिंकता आले नाही.
2 “सिरीया आणि एफ्राइम (इस्राएल) यांच्या सैन्यांची एकजूट झाली आहे आणि त्यांनी एकत्र तळ ठोकला आहे,” असे दाविदच्या वंशजाला कळविण्यात आले.”जेव्हा राजा आहाज ह्याला हा. संदेश कळला तेव्हा तो व त्याची प्रजा अतिशय घाबरून गेले. रानातील वृक्ष वाऱ्याने ज्याप्रमाणे कापतात तशीच भीतीने त्यांची स्थिती झाली.
3 तेव्हा परमेश्वर यशयाला म्हणाला, “धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर जेथे वरच्या डोहाला पाणी मिळते तेथे तू व तुझा मुलगा शआर-याशूब असे दोघे आहाजला भेटा व त्याच्याशी बोला.
4 “आहाजला सांगा, ‘सावध राहा पण शांत राहा भिऊ नकोस. रसीन आणि रमाल्याचा पुत्र ह्यांना घाबरू नकोस. ते दोघे जळलेल्या काड्यांप्रमाणे आहेत. पूर्वी त्यांच्यात आग होती पण आता ते नुसते धुमसताहेत! रसीन, सिरीया आणि रमाल्याचा पुत्र हे खूप चिडले आहेत.
5 त्यांनी तुझ्याविरूध्द कट केला आहे. ते म्हणाले,
6 आपण चाल करून जाऊ आणि यहुदाविरूध्द लढून यहुदा जिंकू. आपण आपापसात यहुदाची वाटणी करू आणि ताबेलाच्या पुत्राला यहुदाच्या गादीवर बसवू. असा त्यांचा बेत आहे.”‘
7 “पण त्यांचा बेत सिध्दीस जाणार नाही. असे काही घडणार नाही. असे माझा परमेश्वर प्रभू म्हणाला.
8 आता एफ्राइम (इस्राएल) एक राष्ट्र आहे पण 65 वर्षांनी ते राष्ट्र म्हणून राहाणार नाही. तेव्हा, जोपर्यंत रसीन हा दमास्कसचा राजा आहे
9 आणि एफ्राईमची (इस्राएलची) राजधानी शोमरोन येथे रमाल्याचा पुत्र राज्य करीत आहे तोपर्यंत, रसीन व रमाल्याचा पुत्र यांनी केलेला बेत सिध्दीस जाणार नाही. तू जर ह्या संदेशावर विश्वास ठेवला नाहीस तर तुझी लोकांनीही तुझ्यावर विश्वास ठेवू नये.”
10 परमेश्वर आहाजशी बोलतच राहिला
11 परमेश्वर म्हणाला, “ह्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत हे सिध्द करण्यासाठी तू काही निशाणी मागून घे. तू तुला हवी असलेली निशाणी माग. ती निशाणी पाताळातून येवो अगर आकाशातून.”
12 पण आहाज म्हणाला, ‘पुरावा म्हणून मी कोठलीही निशाणी मागणार नाही. मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही.’
13 तेव्हा यशया म्हणाला, “हे दाविदाच्या वंशजा, लक्षपूर्वक ऐक. तू लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहातोस. हे पुरेसे नाही म्हणून आता तू देवाच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहेस का?
14 तेव्हा देव माझा प्रभु तुला स्वत:हून चिन्ह देईल.”त्या कुमारिकेकडे पाहाती गर्भवती आहे. ती मुलाला जन्म देईल. ती त्याचे नाव इम्मानुएल ठेवील.
15 इम्मानुएल मध व लोणी खाईल. अशा रीतीने जगत असतानाच ह्यातूनच तो चांगले करावे व वाईट सोडावे हे शिकेल.
16 पण तो चांगल्या वाईट गोष्टीतील फरक कळण्याइतका मोठा होण्याआधी एफ्राइम (इस्राएल) व सिरीया हे वैराण बनलेले असतील.“तुला आता त्या दोन राजांची भीती वाटते.
17 पण खरे म्हणजे तू परमेश्वराला भ्यायला पाहिजेस. का? कारण परमेश्वर तुझ्या वाट्याला काही काळ क्लेश देईल. ते क्लेश यहूदातून एफ्राइमच्या निघून जाण्याच्या वेळेप्रमाणे असतील, त्यानंतर असे क्लेश आताच तुमच्या वाट्याला येतील. तुझ्या वडिलांच्या वंशजांना आणि तुझ्या प्रजेला हे क्लेश सोसावे लागतील. देव काय करील बरे? देव अश्शूरच्या राजाला तुझ्याविरूध्द लढण्यास भाग पाडील.
18 “त्यावेळी परमेश्वर ‘माशा’ व ‘मध माश्यांना’ बोलावील.
19 वाळवटांतील झऱ्याजवळच्या खडकाळ दऱ्यांत, झाडांझुडपांत व पाणथळ जागांत ते आपला तळ ठोकतील.
20 परमेश्वर अश्शूर देशाचा उपयोग यहुदाला शिक्षा करण्यासाठी करून घेईल. अश्शूर देशाला भाडोत्री म्हणून घेऊन त्याचा उपयोग वस्तऱ्याप्रमाणे केला जाईल. देव जणू काही ह्या वस्तऱ्याचा उपयोग करून यहुदाचे डोके, पाय भादरेल आणि त्याची हजामतही करील.
21 “त्यावेळी प्रत्येक माणूस एक कालवड व दोन मेंढरे पाळू शकेल.
22 त्या माणसाला पुरेल एवढे लोणी त्याला त्यांच्या दुधापासून मिळेल. देशातील प्रत्येक माणूस त्या वेळी लोणी व मध खाऊन राहील.
23 आता ह्या देशातील भूमीवर एक हजार द्राक्षवेली असलेले द्राक्षमळे आहेत. प्रत्येक द्राक्षवेलीची किमंत एक हजार चांदीची नाणी एवढी आहे.
24 पण हे द्राक्षमळे काट्यांनी व तणांनी भरून नष्ट होतील. ह्या भूमीत जंगल माजेल. व तिचा उपयोग शिकारीसाठीच होईल.
25 एकेकाळी ज्या टेकड्यांवर लोक शेती करून धान्य पिकवीत होते त्या टेकड्यांवर काट्याकुट्यांचे रान माजेल. कोणीही माणूस तिकडे फिरकणार नाही. फक्त मेंढ्या व गुरेढोरे तिकडे जातील.”
धडा 8

1 परमेश्वर मला म्हणाला, “एक मोठी गुंडाळी घे आणि टाकाने त्यावर पुढील शब्द लिही, ‘महेर-शालाल-हाश-बज.’ (याचा अर्थ- ‘लवकरच येथे लूटालूट व चोऱ्या होतील.’)”
2 साक्षीदार म्हणून विश्वास टाकता येईल अशा काही लोकांना मी गोळा केले. (ते होते उरिया हा याजक व यबरेख्याचा मुलगा जखऱ्या) त्यांच्या समोरच मी लिहिले.
3 नंतर मी संदेष्ट्रीशी समागम केला. ती गर्भवती होऊन तिला पुत्र झाला. “परमेश्वराने मला त्याचे नाव महेर-शालाल-हाश-बज असे ठेवण्यास सांगितले.
4 कारण तो मुलगा ‘आई-बाबा’ असे बोलायला लागण्यापूर्वीच देव दमास्कसची व शोमरोनची सर्व धनसंपत्ती काढून अश्शूरच्या राजाला देईल.”
5 पुन्हा एकदा परमेश्वर माझ्याशी बोलला.
6 माझा प्रभु, म्हणाला, “हे लोक संथ वाहणारे शिलोहाचे पाणी नाकारतात. ते रसीन व रमाल्याचा पुत्र (पेकह) यांच्या सहवासात आनंद मानतात.
7 पण मी, परमेश्वर, अश्शूरच्या राजाला त्याच्या सर्व शक्तीनीशी तुमच्यावर आक्रमण करण्यास भाग पाडीन. युफ्राटिस नदीच्या लोंढ्याप्रमाणे ते येतील. पुराचे पाणी चढत जाऊन नदीच्या किनाऱ्यावरून बाहेर ओसंडून वाहते तसेच ते येतील.
8 नदीचा काठ ओलांडून बाहेर पसरलेल्या पाण्याप्रमाणे अश्शूरचे सैन्य सर्व यहुदाभर पसरेल. ते यहुदाच्या गळ्यापर्यंत चढेल व जवळजवळ यहुदाला बुडवून टाकील.“इम्मानुएल, हे पुराचे पाणी सर्व देशाला व्यापेपर्यंत पसरत राहील.”
9 सर्व राष्ट्रांनो, युध्दाची तयारी करा, तुम्ही पराभूत व्हाल, दुरवरच्या सर्व देशांनो, ऐका! लढाईची तयारी करा, तुमचा पराभव होईल.
10 लढण्याचे बेत करा, ते सिध्दीस जाणार नाहीत. तुम्ही तुमच्या सैन्याला हुकूम करा, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. का? कारण देव आमच्या पाठीशी आहे.
11 परमेश्वर माझ्याशी त्याच्या महान सामर्थ्यानिशी बोलला ‘मी ह्या लोकांच्या मार्गाने जाऊ नये. असे परमेश्वराने मला बजावले. परमेश्वर म्हणाला,
12 “दुसरे त्यांच्याविरूध्द कट करीत आहेत, असे ते म्हणत आहेत. तू त्या गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस, ज्या गोष्टींना हे लोक घाबरतात, त्या गोष्टींना घाबरू नकोस. त्या गोष्टींची मुळीच भीती बाळगू नकोस.”
13 सर्वशक्तिमान परमेश्वर हाच असा आहे की त्याचे भय मानावे. त्याचाच फक्त आदर करावा. त्यालाच फक्त पवित्र मानावे.
14 तु जर परमेश्वराचा मान राखलास, तो पवित्र आहे असे मानलेस, तर तो तुला अभय देईल, पण जर तू त्याचा अनादर केलास, तर देव रस्त्यावरील दगडाप्रमाणे होईल आणि तुम्ही लोक त्यावर ठेचकाळून पडाल. इस्राएलच्या दोन घराण्यांना तो दगड अडखळवतो. यरूशलेमच्या सर्व लोकांचा परमेश्वरच सापळा आहे.
15 (पुष्कळ माणसे ह्याच अडथळ्याला अडखळून पडतील व त्यांची हाडे मोडतील. ते सापळ्यात अडकतील व पकडले जातील.)
16 यशया म्हणाला, “करार करा व त्यावर शिक्कामोर्तब करा माझ्या शिकवणुकीचे भविष्यकाळासाठी जतन करा. माझ्या शिष्यांसमोर हे करा.
17 तो करार असा:परमेश्वराने आपल्याला मदत करावी म्हणून मी वाट पाहीन. याकोबच्या वंशजांची परमेश्वराला लाज वाटते. तो त्यांच्याकडे पाहण्याचे नाकारतो. पण मी परमेश्वराची प्रतीक्षा करीन. तो आम्हाला वाचवील.
18 “माझी मुले आणि मी इस्राएल लोकांकरिता निशाणी आणि पुरावे आहोत. सीयोनच्या डोंगरावर राहणाऱ्या सर्वशक्तिमान परमेश्वराने आम्हाला पाठविले आहे.”
19 काही लोक “काय करावे ते ज्योतिषी व जादूटोणा करणारे यांना विचारा” असे म्हणतात. (ते ज्योतिषी व जादूटोणा करणारे कुजबुजतात व आपल्याला गुपित समजते असे लोकांना वाटावे म्हणून पक्षांप्रमाणे बोलतात.) पण मी सांगतो की तुम्ही मदतीसाठी देवाला हाक मारावी. ते ज्योतिषी आणि जादूटोणा करणारे मृतांची मदत घेतात. सजीवांनी मृतांची मदत का घ्यावी?
20 तुम्ही शिकवणुकीप्रमाणे वागा व कराराचे पालन करा. तुम्ही ह्या आज्ञांचे पालन केले नाही तर तुम्ही चुकीच्या आज्ञांचे पालन कराल. (चुकीच्या आज्ञा म्हणजे ज्योतिषी व जादूटोणा करणारे ह्यांनी दिलेल्या आज्ञा होत. त्या आज्ञांना काही अर्थ नाही. त्या आज्ञांचे पालन करून तुम्हाला काहीही मिळणार नाही.)
21 तुम्ही चुकीच्या आज्ञांचे पालन कराल तर देशावर संकटे येतील आणि उपासमार होईल. लोकांची उपासमार झाल्यावर लोक संतापतील व ते राजा आणि त्याचे देव ह्यांच्याविरूध्द बोलू लागतील. मग मदतीसाठी देवाकडे पाहतील.
22 जर त्यांनी त्यांच्या आजूबाजूला पाहिले तर त्यांना संकटे आणि निराशेचा अंधकार दिसेल, बळजबरीने देश सोडून जावे लागणाऱ्या लोकांचे अतीव दु:ख त्यांना दिसेल आणि जे लोक या अंधकारात अडकतील त्यांना आपली सुटका करून घेता येणार नाही.
धडा 9

1 पूर्वी लोकांनी जबुलून व नफताली या प्रांताना महत्व दिले नाही पण पुढील काळात देव त्या भूमीला श्रेष्ठ बनवील समुद्राजवळील भूमी, यार्देन नदीच्या पलीकडचा प्रदेश व यहुदी सोडून दुसरे जे लोक राहतात तो गालील प्रदेश म्हणजे ही भूमी होय.
2 आता तेथील लोक अधोलोका सारख्या अंधकारात दिवस कंठीत आहेत पण ते तेजस्वी प्रकाश पाहतील. पाताळासारख्या अंधकारमय प्रदेशात सध्या ते लोक राहत आहेत पण त्यांना “तेजस्वी प्रकाश” दिसेल.
3 देवा, तूच राष्ट्राच्या वाढीचे कारण होशील, तेथल्या लोकांना तू सुखी करशील ते लोक त्यांचा आनंद तुझ्याजवळ व्यक्त करतील. सुगीच्या काळातील आनंदासारखा हा आनंद असेल. जेव्हा लोक लढाईतील जिंकलेल्या गोष्टींचा वाटा घेतात तेव्हा होणाऱ्या आनंदाप्रमाणे हा आनंद असेल.
4 असे का? कारण तू त्यांचा मोठा भार उतरवशील. त्यांच्या पाठीवरील जोखड काढून घेशील, तुझ्या लोकांना शिक्षा करण्यासाठी शत्रू वापरीत असलेली छडी तू काढून घेशील. तू मिद्यानचा पराभव केलास त्या वेळेप्रमाणेच ही स्थिती असेल.
5 लढाईत वापरलेला प्रत्येक बूट आणि रक्ताळलेला प्रत्येक गणवेश ह्यांचा नाश होईल. ह्या गोष्टींची होळी केली जाईल.
6 असामान्य बालकाच्या जन्माच्यावेळी ह्या गोष्टी घडतील. देव आम्हाला पुत्र देईल. हा पुत्र लोकांच्या नेतृत्वाची जबाबदारी घेईल. त्याचे नाव असेल “अदभुत सल्लागार, सामर्थ्यशाली देव, चिरंजीव पिता, शांतीचा राजपुत्र.”
7 त्याच्या राज्यात सामर्थ्य आणि शांती नांदेल. आणि दाविदच्या वंशाच्या ह्या राजाच्या काळात ती वाढतच जाईल. हा राजा सदासर्वकाळ सदाचार आणि प्रामाणिक न्यायबुध्दीने राज्य करील.सर्वशक्तिमान परमेश्वराला त्याच्या लोकांबद्दल अतिशय प्रेम आहे. ह्या प्रेमापोटीच ह्या सर्व गोष्टी घडून येतील.
8 याकोबाच्या (इस्त्राएलच्या) लोकांविरूध्द माझ्या परमेश्वराने आज्ञा दिली आहे. ती खरी ठरेल.
9 मग एफ्राइमच्या (इस्राएलच्या) प्रत्येक माणसाला, एवढेच नव्हे तर शोमरोनच्या नेत्यांना कळून चुकेल की देवाने आपल्याला शिक्षा केली आहे.सध्या ती माणसे गर्विष्ठ व बढाईखोर झाली आहेत, ते म्हणतात.
10 “ह्या विटा पडल्या तर आम्ही पुन्हा बांधकाम करू आणि तेही भक्कम दगडांचे, ही लहान झाडे कापली जातील पण आम्ही त्यांच्या जागी उंच व भक्कम असे नवे वृक्ष लावू.”
11 म्हणून परमेश्वर इस्राएलच्याविरूध्द लढण्यासाठी लोकांना समर्थ करील. परमेश्वर रसीनच्या शत्रूंना इस्राएलविरूध्द उठवील.
12 परमेश्वर पूर्वेकडून अरामी लोकांना व पश्चिमेकडून पलिष्ट्यांना आक्रमण करायला लावील. हे शत्रू आपल्या सैन्यबळावर इस्राएलचा पराभव करतील. पण एवढे झाले तरी परमेश्वराचा इस्राएलवरचा राग शांत होणार नाही. परमेश्वर लोकांना आणखी शिक्षा करण्याच्या विचारात असेल.
13 देवाने लोकांना शिक्षा केली तरी ते पाप करायचे थांबवणार नाहीत. ते देवाला शरण येणार नाहीत. ते सर्वशक्तिमान परमेश्वराला अनुसरणार नाहीत.
14 म्हणून परमेश्वर इस्राएलचे डोके व शेपूट कापून टाकील. एका दिवसात परमेश्वर फांदी व देठ कापून टाकील.
15 (इस्राएलचे डोके म्हणजे तेथील वडीलधारी मंडळी व प्रतिष्ठित नेते आणि शेपूट म्हणजे असत्य कथन करणारे तोतये संदेष्टे.)
16 लोकांचे नेतृत्व करणारे त्यांना चुकीच्या मार्गाने नेतात आणि त्यांच्या मागून जाणाऱ्या लोकांचा नाश होतो.
17 सर्वच लोक पापी आहेत. म्हणून परमेश्वर तरूणांवर प्रसन्न नाही आणि परमेश्वर त्यांच्या विधवांवर व अनाथांवरही दया करणार नाही. ते सर्व देव सांगतो त्याच्या विरूध्द वागतात. ते खोटे बोलतात. त्यामुळे देवाचा क्रोध शमणार नाही. व देव त्यांना शिक्षा करीतच राहील.
18 कुकर्म हे ठिणगीसारखे असते. प्रथम, ते तण व काटेकुटे जाळते. नंतर रानातील झाडेझुडपे पेट घेतात आणि शेवटी त्याचा वणवा होऊन सगळेच त्याचे भक्ष्य होते.
19 सर्वशक्तिमान परमेश्वर रागावला आहे म्हणून सर्व भूमी जाळली जाईल. सर्व माणसेही त्यात जाळली जातील. कोणीही आपल्या भावाला वाचविण्याचा प्रयत्न करणार नाही.
20 माणसे उजवीकडचे काही तरी पकडून खायला बघतील, पण त्यांची भूक भागणार नाही. मग ते डावीकडचे काही तरी खातील पण त्यांची भूक तरीही भागणार नाही. मग प्रत्येक जण वळेल आणि स्वत:चेच शरीर खाईल.
21 (मनश्शे एफ्राईमशी आणि एफ्राईम मनश्शेशी लढेल व नंतर दोघेही युहदाच्या विरोधात उभे राहतील.)परमेश्वर अजूनही इस्राएलवर रागावला आहे. तो तेथील लोकांना शिक्षा करण्याच्या तयारीत आहेत.
धडा 10

1 अन्यायकारक कायदे करणाऱ्यांकडे पाहा घातक निर्णय लिहिणाऱ्या लेखकांकडे पाहा, लोकांना जगणे कठीण होईल असे कायदे ते करतात.
2 ते गरिबांशी न्यायाने वागत नाहीत. गरिबांचे हक्क ते डावलतात. विधवांना व अनाथांना लुबाडण्यास ते लोकांना मुभा देतात.
3 कायदे करणाऱ्यांनो, तुम्हाला तुमच्या कृत्याचा जाब द्यावा लागेल, तेव्हा तुम्ही काय सांगाल? दूरच्या देशातून तुमचा विध्वंस येत आहे. तेव्हा मदतीसाठी कोठे धावाल? तुमची धनसंपत्ती तेव्हा उपयोगी पडणार नाही.
4 कैद्याप्रमाणे तुम्हाला वाकावे लागेल, मृताप्रमाणे तुम्हाला जमिनीवर पडावे लागेल. पण एवढ्यानेही भागणार नाही. कारण अजूनही देवाचा राग शांत झाला नसेल. अजूनही देव शिक्षा करण्याच्या तयारीत असेल.
5 देव म्हणेल, “मी अश्शूरचा उपयोग छडीप्रमाणे करीन. रागाच्या भरात मी अश्शूरकडून इस्राएलला शिक्षा करीन.
6 पापे करणाऱ्या लोकांविरूध्द लढण्यासाठी मी अश्शूरला पाठवीन. मला त्या लोकांचा अतिशय राग आला आहे म्हणून मी अश्शूरला त्यांच्यावर चाल करून जाण्याची आज्ञा करीन. अश्शूर त्यांचा पराभव करील व त्यांची सर्व संपत्ती लुटून नेईल. रस्त्यातील कचऱ्याप्रमाणे इस्राएल अश्शूरच्या पायाखाली तुडविला जाईल.
7 “पण मी अश्शूरचा उपयोग करून घेणार आहे हे त्याला कळत नाही. मी त्याचा साधन म्हणून उपयोग करीन असे त्याच्या लक्षात येत नाही. अश्शूरला फक्त इतर लोकांचा नाश करायचा आहे, खूप राष्ट्रांचा घात करण्याचा त्याचा बेत आहे.
8 कदाचित् आपण जिंकलेल्या आणि त्याच्या हुकमतीखाली असलेल्या प्रदेशांच्या राजांचा अश्शूर येथे निर्देश करत असेल. अश्शूर स्वत:शीच म्हणतो, ‘माझे सर्व राजपुत्र राजेच नाहीत का?
9 कालनो शहर कर्कमीश शहरासारखे, हमाथ अर्पादसारखे व शोमरोन दमास्कससारखे आहे.
10 मी त्या दुष्ट राज्यांचा पराभव केला आणि आता मी त्यांच्यावर सत्ता गाजवितो. त्यांच्या पूजेच्या मूर्ती यरूशलेममधील व शोमरोनमधील मूर्तीपेक्षा चांगल्या आहेत.
11 मी शोमरोनचा व तेथील मूर्तीचा पराभव केला. तसेच मी यरूशलेमचे करीन.”‘
12 सीयोनचा डोंगर व यरूशलेम यांच्याबाबतीत योजलेल्या गोष्टी माझा परमेश्वर पार पाडील. नंतर तो अश्शूरला शिक्षा करील. अश्शूरचा राजा फार गर्विष्ठ आहे. त्याच्या अहंकारामुळे त्याने अनेक दुष्कृत्ये केली आहेत. म्हणून परमेश्वर त्याला शिक्षा करील.
13 अश्शूरचा राजा म्हणतो, “मी फार सुज्ञ आहे. माझ्या चातुर्याच्या व सामर्थ्याच्या बळावर मी फार मोठ्या गोष्टी केल्या आहेत. मी पुष्कळ राष्ट्रंाना पराभूत केले आहे. मी त्यांची संपत्ती लुटली आणि तेथील लोकांना गुलाम केले. मी फार सामर्थ्यवान आहे.
14 पक्ष्याच्या घरट्यातून एखाद्याने सहज अंडी काढून घ्यावीत त्याप्रमाणे माझ्या ह्या दोन हातांनी ह्या सवंर्ाची संपत्ती घेतली आहे. पक्षी नेहमी घरटी व अंडी सोडून जातो. आणि घरट्याचे रक्षण करण्यास कोणीच नसते. तेथे एकही पक्षी चिवचिवाट करायला अथवा पंख व चोच ह्याने टोचा मारायला नसतो. त्यामुळे लोक सहज अंडी काढून घेऊ शकतात. अगदी असेच मी सर्व जगातील माणसांना लुटले. मला थांबविणारा कोणीही नव्हता.”
15 कुऱ्हाड चालविणाऱ्यापेक्षा, कुऱ्हाड श्रेष्ठ नसते. करवत, कापणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ व सामर्थ्यवान आहे. एखाद्या माणसाने एखादी काठी उचलून तिने एखाद्याला शिक्षा करावी व त्याबद्दल काठीने स्वत:ला त्या माणसापेक्षा श्रेष्ठ व सामर्थ्यवान समजावे, तसेच हे आहे.
16 अश्शूर स्वत:ला श्रेष्ठ समजतो पण सर्वशक्तिमान परमेश्वर एक भयानक रोग अश्शूरमध्ये पसरवील. ज्याप्रमाणे रोगी माणसाचे वजन घटते, त्याप्रमाणे अश्शूरचे वैभव व सामर्थ्य घटेल. नंतर अश्शूरचे वैभव नष्ट होईल. तो रोग सर्वभक्षक आगीप्रमाणे असेल.
17 इस्राएलचा प्रकाश (देव) अग्नीप्रमाणे होईल. पवित्र देव ज्वालेप्रमाणे होईल. तण व काटेकुटे प्रथम जाळणाऱ्या आग्रीप्रमाणे तो असेल.
18 नंतर आग पसरते आणि मोठे वृक्ष, द्राक्षमळे जळून जातात. व सर्वांत शेवटी प्रत्येक गोष्ट जळून नष्ट होते-अगदी माणसेसुध्दा, तसेच तेव्हा होईल आणि अश्शूरचा देवाकडून नाश होईल. अश्शूर कुजणाऱ्या ओंडक्याप्रमाणे होईल.
19 हाताच्या बोटावर मोजण्याइतके वृक्ष जंगलात उभे असतील. लहान मूलही ते मोजू शकेल.
20 त्यावेळी याकोबचे जे वंशज इस्राएलमध्ये राहत असतील ते त्यांना मारणाऱ्या माणसावर अवलंबून राहणे सोडतील आणि इस्राएलच्या पवित्र परमेश्वरावर मनापासून श्रध्दा ठेवायला शिकतील.
21 याकोबचे हे राहिलेले वंशज पुन्हा सामर्थ्यशाली देवाला अनुसरतील.
22 समुद्रकाठच्या वाळूच्या कणांप्रमाणे तुझे लोक खूप असले तरी त्यातील फक्त थोडेच परमेश्वराकडे परत येतील. ते देवाकडे वळतील पण त्यापूर्वी देशाचा नाश केला जाईल. देवाने घोषित केले आहे की तो देश उध्वस्त करणार आहे. नंतर चांगुलपणा देशात येईल. तो दुथडीभरून वाहाणाऱ्या नदीसारखा असेल.
23 माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर, निश्चित ह्या संपूर्ण प्रदेशाचा नाश घडवून आणील.
24 माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “माझ्या सीयोनवासीयांनो, अश्शूरला घाबरू नका. मिसरने पूर्वी तुम्हाला जसे हरविले होते तसेच अश्शूर तुम्हाला हरवील. जणू काही अश्शूर तुम्हाला काठीने मारील.
25 पण थोड्या काळात माझा राग शांत होईल. अश्शूरने तुम्हाला दिलेली शिक्षा मला पुरेशी वाटेल.”
26 पूर्वी सर्वशक्तिमान परमेश्वराने मिद्यानला ओरेबाच्या खडकाजवळ हरविले होते, त्याप्रमाणेच परमेश्वर अश्शूरवर हल्ला करून त्याला चाबकाने फोडून काढील. पूर्वी परमेश्वराने मिसरला शिक्षा करताना, आपल्या हातातील दंडाने समुद्र दुभंगून आपल्या लोकांना समुद्रपार केले व मिसरच्या लोकांना बुडविले. अशाच तऱ्हेने परमेश्वर अश्शूरपासून आपल्या लोकांना
27 अश्शूर तुझ्यावर जी संकटे आणील ती तुला ओझ्याप्रमाणे अथवा जोखंडाप्रमाणे खांद्यावर वाहावी लागतील पण लवकरच ते ओझे उतरविले जाईल. तुझे सामर्थ्य (देव) ते जोखंड मोडून टाकील.
28 अश्शूरचे सैन्य अयाथ जवळून (“भग्न अवशेष” जवळून) प्रवेश करील. मिग्रोन (“मळणीची जागा”) तुडवून ते जाईल. मिखमाशात (“गुदामात”) ते आपले अन्नधान्य ठेवील.
29 ते ‘उताराच्या’ (माबाराच्या) येथे नदी ओलांडतील, गेबा येथे ते मुक्काम करतील. रामा घाबरून जाईल. शौलच्या गिबातील माणसे पळून जातील.
30 बाथ गल्लीम, मोठ्याने ओरड, लईशा, ऐक, अनाथोथ, मला उत्तर दे.
31 मदमेनाचे रहिवासी पळत आहेत. गेबीमचे रहिवासी लपून बसत आहेत.
32 ह्या दिवशी सैन्य नोब येथे मुक्काम करील आणि यरूशलेममधील टेकडी सीयोन हिच्याविरूध्द लढण्याची तयारी करील.
33 लक्ष द्या. आपला प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर, प्रचंड वृक्ष (अश्शूर) कापून टाकील. आपल्या सामर्थ्याच्या बळावर देव हे करील. श्रेष्ठ व प्रतिष्ठित लोकांचे महत्व तो कमी करील.
34 परमेश्वर त्याच्या कुऱ्हाडीने जंगल तोडील आणि लबानोनमधील प्रचंड वृक्ष (प्रतिष्ठित लोक) कोसळतील.
धडा 11

1 इशायाच्या बुंध्याला (वंशाला) अंकुर (मूल) फुटून वाढू लागेल. ती फांदी इशायाच्या मुळाची असेल.
2 परमेश्वराचा आत्मा त्या मुलात असेल. तो आत्मा त्याला सुज्ञपणा, समजूत, मार्गदर्शन आणि सामर्थ्य देईल. हा आत्मा परमेश्वराला जाणून घेण्यास व श्रध्दा ठेवण्यास त्या मुलाला शिकवील.
3 परमेश्वराचे भय वाटण्यातच त्या मुलाला आनंद वाटेल. तो त्याच्या डोळ्यांना जे दिसते वा कानांनी जे ऐकू येते, त्याच्यावरून निर्णय घेणार नाही.हा मुलगा गोष्टी जशा दिसतात त्या वरून लोकांची पारख करणार नाही. तो जे ऐकेल त्यावरून लोकांची परीक्षा करणार नाही.
4 तो गरिबांना प्रामाणिकपणे व सरळपणे न्याय देईल. ह्या देशातील गरिबांसाठी ज्या गोष्टी करण्याचे त्याने ठरविले असेल त्या तो न्यायबुध्दीने करील. त्याने जर काही लोकांना फटकावयाचे ठरविले तर तो तशी आज्ञा देईल आणि त्या माणसांना फटके बसतील. त्याने दुष्टांना मारायचे ठरविले, तर त्याच्या आज्ञेने त्यांना ठार मारले जाईल. चांगलुपणा व प्रामाणिकपणा ह्या मुलाला सामर्थ्य देईल. ते त्याचे संरक्षक कवच असतील.
5
6 त्या वेळेला लांडगे मेंढरांबरोबर सुखशांतीने राहतील, वाघ कोकरांबरोबर शांतपणे झोपेल. वासरे, सिंह, आणि बैल शांततेने एकत्र राहतील आणि एक लहान मुलगा त्यांना वळवील.
7 गायी आणि अस्वले एकत्र गुण्यागोविंदाने राहतील. सगळ्यांची पिल्ले एकत्र राहतील आणि कोणीच कोणाला इजा करणार नाही. सिंह गाईसारखे चारा खातील. एवढेच नव्हे तर सापही माणसाला दंश करणार नाहीत.
8 तान्हे मूलसुध्दा नागाच्या वारूळाजवळ खेळू शकेल. ते सापाच्या बिळात त्याचा हात घालू शकेल.
9 ह्या सगळ्या गोष्टीवरून, तेथे शांती नांदेल, हेच दिसते. कोणीही माणूस दुसऱ्याला दुखविणार नाही. माझ्या पवित्र डोंगरावर राहणारे लोक वस्तूंचा नाश करू इच्छिणार नाहीत. का? कारण लोकांना परमेश्वराची खरी ओळख पटेल. समुद्रात जसे अथांग पाणी असते, तसेच त्यांना परमेश्वराबद्दल खूपच ज्ञान झालेले असेल.
10 त्या वेळेला इशायाच्या घराण्यात एक विशेष व्यक्ती असेल ती व्यक्ती ध्वजाप्रमाणे असेल हा “ध्वज” सर्व राष्ट्रांना त्याच्याभोवती जमण्याचे आवाहन करील. सर्व राष्ट्रे, त्यांनी करायच्या कार्याबद्दल ह्या ‘ध्वजाकडे’ विचारणा करतील तो जेथे असेल तेथे वैभव नांदेल.
11 त्या वेळेला माझा प्रभू (देव) मागे राहिलेल्या लोकांपर्यंत पुन्हा पोहोचेल. असे तो दुसऱ्यांदा करील. आणि त्यांना बाहेर आणील. (अश्शूर, उत्तर मिसर, द्रक्षिण मिसर, इथिओपिया, एलाम, बॉबिलॉन, हमाथ आणि पृथ्वीवरील दूरची सर्व राष्ट्रे येथे असलेल्या ह्या त्याच्या लोकांना तो बाहेर आणील.
12 देव “तो ध्वज” सर्व लोकांची निशाणी म्हणून उभारेल. इस्राएल व यहुदा येथील लोकांना बळजबरीने देशाच्या बाहेर घालवून देण्यात आले ते पृथ्वीवरील दूरदूरच्या देशात विखुरले. पण देव त्यांना एकत्र आणील.
13 तेव्हा एफ्राइमला (इस्राएलला) यहुदाचा मत्सर वाटणार नाही. यहुदाला कोणी शत्रूच राहणार नाहीत. यहुदा एफ्राइमला (इस्राएलला) काही त्रास देणार नाही.
14 पण एफ्राइम (इस्राएल) व यहुदा दोघे मात्र पलिष्ट्यांवर हल्ला करतील. आकाशात उडणाऱ्या दोन पक्ष्यांनी जमिनीवरील किड्याकाटकावर झडप घालावी तसेच हे दोन देश पलिष्ट्यांवर तुटून पडतील. दोघे मिळून पूर्वेकडच्या लोकांना लुटतील व अदोम, मवाब, व अम्मोन ह्यांच्यावर राज्य करतील.
15 पूर्वी परमेश्वराला राग आला व त्याने समुद्र दुभंगून आपल्या माणसांना मिसरमधून बाहेर काढले आता पण तसेच होईल परमेश्वर युफ्राटिस नदी दुभंगवेल. तो नदीवर हातातील दंड मारील आणि तिचे सात लहान नद्यांत विभाजन करील. त्या नद्या खोल नसतील. लोक त्या चालत सहज पार करू शकतील.
16 ह्यामुळे अश्शूरमध्ये मागे राहिलेल्या त्याच्या लोकांना अश्शूर सोडून जाता येईल. हे देवाने मिसरमधून इस्राएली लोकांना बाहेर काढले, त्या वेळे प्रमाणेच असेल.
धडा 12

1 त्या वेळेला तू म्हणशील:“परमेश्वरा, मी तुझे स्तवन करतो तू माझ्यावर रागावला होतास पण आता राग सोड तुझ्या प्रेमाची प्रचिती दे.”
2 देव माझा तारक आहे माझी त्याच्यावर श्रध्दा आहे. मी निर्भय आहे तो मला तारतो. परमेश्वर हीच माझी शक्तीआहे. तो मला तारतो म्हणूनच मी त्याचे स्तुतिस्तोत्र गातो.
3 तारणाच्या झऱ्यातून तुम्ही पाणी घ्या म्हणजे सुखी व्हाल आणि म्हणाल, “परमेश्वराची स्तुती असो. त्याच्या नावाची उपासना करा. त्याच्या करणीची माहिती लोकांना सांगा.”
4
5 परमेश्वराचे स्तुतिस्तोत्र गा कारण त्याने महान कार्य केले आहे. देवबाद्दल ही वार्ता सर्व जगात पसरवा सर्व लोकांना हे कळू द्या.
6 सीयोनवासीयांनो, तुम्ही गजर करा. कारण इस्राएलचा एकमेव पवित्र देव समर्थपणे तुमच्यामध्ये आहे. तेव्हा आनंदी व्हा..
धडा 13

1 आमोजचा मुलगा यशया ह्याला देवाने बाबेलोनबद्दल दु:खदायक हा संदेश दिला.
2 देव म्हणाला,“जेथे काहीही उगवत नाही अशा ओसाड डोंगरावर ध्वज उभारा. लोकांना हाका मारा. हातांनी खुणा करा. त्यांना प्रतिष्ठितासाठी असलेल्या दारातून प्रवेश करायला सांगा.”
3 देव पुढे म्हणाला, “मी त्या लोकांना इतरांपासून वेगळे केले आहे. मी स्वत: त्याच्यावर सत्ता गाजवीन. मी रागावलो आहे. मी माझ्या योध्द्यांना त्या लोकांना शिक्षा करण्यासाठी, गोळा केले आहे. मला ह्या सुखी लोकांचा अभिमान वाटतो.
4 “डोंगरावर मोठा आवाज होत आहे तो लक्षपूर्वक ऐका. खूप माणसांच्या गोंगाटासारखा तो आवाज आहे कारण पुष्कळ राज्यातील माणसे एकत्र येत आहेत. सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या सैन्याला एकत्र बोलावीत आहे.
5 दूरच्या प्रदेशातून परमेश्वर व हे सैन्य येत आहे. क्षितिजापलीकडून ते येत आहेत. ह्या सैन्याचा उपयोग परमेश्वर आपला राग व्यक्त करण्याचे शस्त्र म्हणून करणार आहे. हे सैन्य सर्व देशाचा नाश करील.”
6 परमेश्वराने ठरविलेला खास दिवस जवळ आला आहे. तेव्हा आक्रोश करा व शोक करा शत्रूकडून तुमची लूट होण्याची वेळ जवळ येत आहे. सर्व शक्कितमान देव हे घडवून आणील.
7 लोकांचे धैर्य गळेल. त्यांची भीतीने गाळण उडेल.
8 प्रत्येक माणूस भेदरलेला असेल. बाळंत होत असलेल्या स्त्रीप्रमाणे भितीने त्यांच्या पोटात गोळा उठेल. त्यांची तोंडे अग्रीप्रमाणे लाल होतील. सर्वांच्याच तोंडावर ही कळा पाहून ते आश्चर्यचकीत होतील.
9 पाहा परमेश्वराचा खास दिवस येत आहे. तो फारच भयानक दिवस असेल. देव फारच संतप्त होईल. आणि तो देशाचा नाश करील. ह्या देशातील पापी लोकांना देश सोडण्यास तो भाग पाडील.
10 आकाश अंधकारमय होईल. सूर्य, चंद्र, तारे प्रकाश देणार नाहीत.
11 देव म्हणतो, “मी जगात वाईट गोष्टी घडवून आणीन. पाप्यांना त्यांच्या पापांबद्दल मी शिक्षा करीन. मी गर्विष्ठांचे गर्वहरण करीन. दुसऱ्यांशी क्षुद्र वृत्तीने वागणाऱ्या बढाईखोरांचा तोरा उतरवीन. तेव्हा थोडेच लोक शिल्लक राहतील.
12 दुर्मिळ सोन्याप्रमाणे चांगले लोकही थोडेच राहतील आणि शुध्द सोन्याहून त्यांची किंमत जास्त असेल.
13 माझ्या रागाने मी आकाशाला हलवेन व पृथ्वी तिच्या स्थानावरून ढळविली जाईल.”हे सर्व, सर्वशक्तिमान परमेश्वर रागावेल तेव्हा घडून येईल.
14 त्या वेळी बाबेलोनमधील प्रजा घायाळ हरणाप्रमाणे पळ काढेल. मेंढपाळ नसलेल्या मेंढराप्रमाणे ते सैरावैरा धावतील. प्रत्येकजण आपल्या देशात व आपल्या लोकात पळून जाईल.
15 पण शत्रू त्यांचा पाठलाग करील. आणि शत्रूच्या हाती सापडणाऱ्याला शत्रू तलवारीने ठार मारील.
16 त्यांची घरे लुटली जातील. त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार होतील, त्यांच्या डोळ्यादेखत लहान मुलांना मरेपर्यंत मारले जाईल.
17 देव म्हणतो, “पाहा! बाबेलोनवर हल्ला करण्यासाठी मी मेदीचे सैन्य वापरीन. मेदीच्या सैन्याला चांदी, सोने दिले तरी ते हल्ला करीतच राहील.
18 ते बाबेलोनमधील तरूणावर हल्ला करून त्यांना मारतील मुलांना ते दया दाखविणार नाहीत. लहानग्यांची ते कीव करणार नाहीत. सदोम व गमोरा यांच्याप्रमाणे बाबेलोनचा संपूर्ण नाश होईल. देव सर्वनाश घडवून आणील मागे काहीही उरणार नाही.
19 “बाबेलोन सर्व देशांहून सुंदर आहे. बाबेलोनच्या रहिवाशांना आपल्या शहराबद्दल गर्व आहे.
20 पण बाबेलोनचे सौंदर्य टिकणार नाही. भविष्यकाळात लोक तेथे राहणार नाहीत. अरब आपले तंबू तेथे ठोकणार नाहीत. मेंढपाळ मेंढ्या चारण्यास तेथे येणार नाहीत.
21 वाळवंटातील जंगली प्राण्यांशिवाय तेथे कोणी राहणार नाही. बाबेलोनमधील घरे ओस पडतील. वटवाघुळांची व घुबडांची तेथे वस्ती असेल. बोकडांच्या रूपातील पिशाच्चे त्या घरात खेळतील.
22 बाबेलोनच्या भव्य आणि सुंदर इमारतीतून रानकुत्री आणि लांडगे केकाटतील, बाबेलोन नष्ट होईल. त्याचा शेवट जवळ आला आहे. मी त्याचा नाश लांबणीवर टाकू देणार नाही.”
धडा 14

1 पुढील काळात, परमेश्वर याकोबाला प्रेमाची पुन्हा प्रचिती देईल. तो इस्राएली लोकांची पुन्हा निवड करील. तो त्यांना त्यांची जमीन परत देईल. यहुद्यां व्यतिरिक्त अन्य लोक त्यांना येऊन मिळतील. ते एकत्र होतील आणि त्यांचा एकच वंश याकोबाचा वंश होईल.
2 इतर राष्ट्रे इस्राएलला त्याची जमीन परत देतील, इतर राष्ट्रांतील स्त्री पुरूष इस्राएलचे गुलाम होतील. पूर्वी ह्याच लोकांनी इस्राएलच्या प्रजेला गुलाम होण्यास भाग पाडले होते. पण आता इस्राएलच त्यांचा पराभव करील व त्यांच्यावर राज्य करील.
3 परमेश्वर तुमचे कष्ट कमी करून सुख व आराम देईल. पूर्वी तुम्ही गुलाम होता. लोक तुम्हाला राबवून घेत. पण परमेश्वर तुमचे कष्ट नाहीसे करील.
4 त्या वेळी बाबेलोनच्या राजाबद्दलचे हे गाणे तुम्ही म्हणायला लागाल, राजा आमच्यावर राज्य करीत.असताना नीचपणे वागत होता, पण आता त्याची सत्ता नष्ट झाली.
5 परमेश्वर दुष्ट राजांचा राजदंड मोडतो. परमेश्वर त्यांची सत्ता काढून घेतो.
6 रागाच्या भरात बाबेलोनच्या राजाने लोकांना फटकावले. तो नेहमीच लोकांना फटकावत असे. त्या दुष्ट राजाने क्रोधाने लोकांवर सत्ता गाजवली. तो नेहमीच लोकांना दुखवत असे.
7 पण आता संपूर्ण देशाला स्वास्थ्य मिळाले आहे. देश शांत आहे. लोक उत्सव, समारंभ करू लागले आहेत.
8 तू दुष्ट राजा होतास. पण आता तू संपला आहेस. लबानोनमधील गंधसरू व सरूवृक्षसुध्दा आनंदित झाले आहेत. वृक्ष म्हणतात, “राजाने आम्हाला कापून टाकले होते. पण आता राजाच पडला आहे. तो आता कधीच उठणार नाही.”
9 राजा, तू येणार म्हणून अधोलोकात खळबळ उडाली आहे. पृथ्वीवरच्या नेत्यांच्या आत्म्यांना, तू येणार म्हणून जागे करीत आहे, सिंहासनावरून त्यांना उठवीत आहे, ते तुझ्या आगमनाची तयारी करतील.
10 ते सर्व तुझी चेष्टा करतील. ते म्हणतील, “आता तू अगदी आमच्याप्रमाणे निर्जीवकलेवर झाला आहेस.”
11 तुझा गर्व अधोलोकात पाठविला आहे. तुझ्या सारंगीचा नाद तुझ्या गर्विष्ठ आत्म्याचे आगमनच घोषित करीत आहे. अळ्या तुझे शरीर खाऊन टाकतील. तू अळ्यांच्या अंथरूणावर झोपशील व कीटकांचे पांघरूण घेशील.
12 तू प्रभात ताऱ्याप्रमाणे होतास, पण आता तू आकाशातून खाली पडला आहेस. पूर्वी सर्व राष्ट्रे तुझ्यापुढे नेहमीच वाकत होती, पण आता तू संपला आहेस.
13 तू नेहमीच स्वत:ला सांगायचास, “मी परात्पर देवासारखा होईन. मी आकाशात उंच जाईन. देवाच्या तांरागणाच्यावर उच्चस्थानी मी माझे सिंहासन स्थापन करीन. मी पवित्र साफोन डोंगरवरच्या देवसभेत बसून देवांना भेटीन.
14 मी मेघांवर आरोहण करून वेदीवर जाईन. मी परात्पर देवासारखा होईन.”
15 पण तसे घडले नाही. तू देवाबरोबर आकाशात गेला नाहीस. तुला अधोलोकात, पाताळात आणले गेले.
16 लोक तुझ्याकडे निरखून पाहतील व तुझ्याबद्दल विचार करतील. तू एक कलेवर आहेस हे ते पाहतील आणि म्हणतील, “पृथ्वीवर सगळीकडे ज्याने प्रचंड भय निर्माण केले होते तो हाच का?
17 ज्याने शहरांचा विध्वंस करून सर्व जमिनीचे वाळवंट केले तो हाच मनुष्य का? ज्यांने युध्दात लोकांना कैदी केले व त्यांना घरी जाऊ दिले नाही तो हाच का?”
18 पृथ्वीवरील प्रत्येक राजा वैभवात मरण पावला, प्रत्येकजण आपापल्या थडग्यात विसावा घेत आहे.
19 पण, हे दुष्ट राजा, तुला तुझ्या थडग्याच्या बाहेर टाकले आहे. तू झाडाच्या तोडलेल्या फांदीप्रमाणे आहेस. लढाईत मारल्या गेलेल्या सैनिकाला बाकीचे सैनिक तुडवून जातात तशी तुझी स्थिती आहे. आता तुझ्यात व इतर कलेवरात काहीही फरक नाही तुला कफनात गुंडाळले आहे.
20 इतर खूप राजे मृत्यू पावले, व आपापल्या थडग्यात विसावले पण तुला त्यांच्यात जाता येणार नाही. का? कारण तू स्वत:च्याच देशाचा विध्वंस केलास. स्वत:च्याच प्रजेला ठार मारलेस. तुझी मुले तुझ्यासारखा नाश करीत राहू शकणार नाहीत. त्यांना परावृत्त केले जाईल.
21 त्याच्या मुलांना ठार मारण्याची तयारी करा, कारण त्यांचे वडील गुन्हेगार आहेत. त्यांची मुले नातेवाईक, नातवंडे कधीही ह्या देशावर राज्य करणार नाहीत. ते, पुन्हा कधीही ह्या जगात, त्यांची शहरे वसविणार नाहीत.
22 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणाला, “मी स्वत: त्या लोकांविरूध्द लढण्यास उभा राहीन. मी प्रसिध्द शहर बाबेलोनचा नाश करीन. मी सर्व बाबेलोन वासीयांचा नाश करीन. त्यांची मुले, नातवंडे, परतवंडे ह्यांचा नाश करीन.” हे सर्व स्वत: परमेश्वर बोलला.
23 परमेश्वर पुढे म्हणाला, “मी बाबेलोनचे रूप बदलून टाकीन. ती जागा लोकांना नव्हे तर जनावरांना राहण्यालायक करीन. त्या जागी दलदल करीन ‘नाशरूपी झाडूने’ मी बाबेलोन स्वच्छ करीन.” सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणाला.
24 सर्वशक्तिमान परमेश्वराने वचन दिले आहे. परमेश्वर म्हणाला, “मी वचन देतो, मी सांगितल्याप्रमाणे गोष्टी घडून येतील. मी योजल्याप्रमाणे सर्व होईल.
25 मी माझ्या देशात अश्शूरच्या राजाचा नाश करीन. माझ्या डोंगरावर मी त्या राजाला पायाखाली तुडवीन. त्याने माझ्या माणसांना त्याचे गुलाम केले, त्यांच्या मानेवर जोखड घातले. यहुदाच्या मानेवरील जोखड दूर केले जाईल. त्याच्यावरी ओझे दूर सारले जाईल.
26 माझ्या लोकांकरिता मी हा बेत केला आहे. मी माझ्या हाताचा (बळाचा) सर्व राष्ट्रांना शिक्षा करण्यासाठी उपयोग करीन.”
27 जेव्हा परमेश्वरच संकल्प करतो तेव्हा कोणीच तो रद्द करू शकत नाही. जेव्हा लोकांना शिक्षा करण्यासाठी परमेश्वरच हात उगारतो, तेव्हा कोणीच त्याला थांबवू शकत नाही.
28 राजा आहाजच्या मृत्यूच्या वर्षीच ही शापवाणी झाली.
29 पलेशेथ देशा, तुला पराभूत करणारा राजा गेला म्हणून तुला आनंद झाला आहे. पण खरे तर तुला आनंद व्हायचे काही कारण नाही. हे खरे आहे की त्या राजाची सत्ता संपली आहे. पण राजाचा मुलगा गादीवर बसेल व राज्य करील. हे एका सापाने दुसऱ्या अती विषारी सापाला जन्म दिल्यासारखे होईल. हा नवा राजा तुझ्या दृष्टीने चपळ व भयानक सापासारखा असेल.
30 पण माझी गरीब प्रजा मात्र सुखाने खाईल. त्यांची मुले सुरक्षित राहतील. माझे गरीब लोक सुखशांतीने राहतील. पण मी तुझ्या कुळाचा उपासमारीने अंत करीन. तुझ्या कुळातील उरलेले सर्व लोक मरतील.
31 नगरच्या वेशीजवळील प्रजाजनांनो, रडा. नगरवासीयांनो, आक्रोश करा. पलेशेथ मधील सर्व लोक भयभीत होतील. त्यांचे धैर्य गरम मेणाप्रमाणे वितळून जाईल. उत्तरेकडे पाहा! धुळीचा लोट उठला आहे. अश्शूरचे सैन्य येत आहे. त्या सैन्यातील सर्व माणसे बलवान आहेत.
32 ते सैन्य त्यांच्या देशात निरोप पाठवील. ते जासूद त्यांच्या लोकांना काय सांगतील? ते सांगतील की पलेशेथचा पराभव झाला आहे. पण परमेश्वराने सीयोनला बलवान बनवले व सर्व गरीब तिकडे आश्रयासाठी गेले.
धडा 15

1 मवाबबद्दल ही शापवाणी. एका रात्रीत आर मवाब लुटले गेले. त्या रात्री शहराचा नाश केला गेला. एका रात्री सैन्याने कीर मवाब लुटले. त्या रात्री शहराचा नाश केला गेला.
2 राजघराणे व दीबोनमधील लोक गाऱ्हाणे गायला पूजास्थानाला जात आहेत. नबो व मेदबा यांच्यासाठी मवाबचे लोक रडत आहेत. आपले दु:ख प्रकट करण्यासाठी सर्वांनी मुंडन केले आहे व दाढी केली आहे.
3 मवाबमधील सर्वांनी घरादारातील सर्वांनी काळे कपडे घातले आहेत व ते रडत आहेत.
4 हेशबोन व एलाले येथील लोक एवढ्यामोठ्याने रडत आहेत की त्यांचा आवाज दूरच्या याहसा शहरापर्यंत ऐकू येत आहे. एवढेच काय पण सैनिकही गर्भगळीत होऊन भीतीने कापत आहेत.
5 मवाबच्या दु:खाने माझे मन रडत आहे. लोक बचावासाठी धावत आहेत. ते दूर सोअर व एगलाथ शलिशीयापर्यंत पळतात. लूहीथच्या चढणीवर ते रडत रडत चढत आहेत. होरोनाइमच्या वाटेवर लोक मोठ्याने आक्रोश करीत जात आहेत.
6 पण निम्रीमाचे पाणी आटले आहे. सर्व झाडेझुडपे वाळली आहेत. कोठेच हिरवेपणा नाही.
7 म्हणून लोक स्वत:ची संपत्ती गोळा करून मवाब सोडतात. ते ही संपत्ती घेऊन वाळुंजच्या खाडीपलीकडे जातात.
8 मवाबमध्ये सगळीकडे रडणे ऐकू येत आहे. लांब असलेल्या एग्लाइममधील लोक रडत आहेत आणि बैर-एलिममध्येही आक्रोश सुरू आहे.
9 दीमोनचेपाणी सक्ताने लालभडक झाले आहे. मी परमेश्वर दीमोनवर आणखी संकटे आणीन, मवाबमधील काही थोडी माणसे शत्रूच्या हातातून निसटली आहेत पण मी त्यांच्यावर त्यांना खाऊन टाकण्यासाठी सिंह पाठवीन.
धडा 16

1 तुम्ही लोकांनी राजाला नजराणा पाठविला पाहिजे. तुम्ही सेला येथील कोकरू वाळवंटामार्गे सीयोनकन्येच्या डोंगरावर (यरूशलेमला) पाठविले पाहिजे.
2 मवाबच्या स्त्रिया अर्णोन नदी ओलांडण्याचा प्रयत्न करतील. त्या मदतीसाठी सैरभैर धावतील. त्यांची स्थिती, घरटे मोडल्यामुळे जमिनीवर पडलेल्या चिमुकल्या पाखराप्रमाणे होईल.
3 त्या म्हणतात, “आम्हाला मदत करा, आम्ही काय करावे ते सांगा. जशी सावली दुपारच्या उन्हापासून आपले रक्षण करते, तसे शत्रूपासून आमचे रक्षण करा. आम्ही शत्रूला चुकवून पळत आहोत. आम्हाला लपवा. आम्हाला शत्रूच्या ताब्यात देऊ नका.”
4 मवाबमधील लोकांना बळजबरीने त्यांची घरे सोडावी लागली. म्हणून त्यांना तुमच्या देशात राहू द्या. शत्रूंपासून त्यांना लपवा. लुटालूट थांबेल. शत्रूचा पराभव होईल. दुसऱ्यांना त्रास देणारे ह्या भूमीतून जातील.
5 नंतर नवा राजा गादीवर बसेल. तो दाविदाच्या वंशातला असेल. तो सत्यप्रिय, प्रेमळ व दयाळू असेल. तो खरेपणाने न्याय देईल. तो योग्य व बरोबर अशाच गोष्टी करील.
6 आम्ही मवाबवासीयांच्या गर्वाविषयी व अहंकारविषयी ऐकले आहे. ते दांडगट व बढाईखोर आहेत. पण त्यांच्या बढाया निरर्थक आहेत.
7 त्या गर्वामुळे सर्व देशाला दु:ख भोगावे लागेल. सर्व मवाबवासीयांना रडावे लागेल लोक दु:खी होतील. पूर्वीच्या गोष्टी त्यांना हव्याशा वाटतील. कीर हेरेसेथमध्ये तयार झालेले अंजिराचे केक त्यांना हवे असतील.
8 हेशबोनमधील मळे व सिब्मेच्या द्राक्षवेली सुकून गेल्या म्हणून लोकांना वाईट वाटेल. परकीय राजांनी द्राक्षवेली तोडून टाकल्या. शत्रूचे सैन्य दूर याजेरपर्यत पसरले आहे. ते वाळवंटापासून समुद्रापर्यंत पसरले आहे.
9 “द्राक्षांचा नाश झाला म्हणून मी याजेर व सब्मे यांच्याबरोबर शोक करीन. सुगीचा मोसम येणार नाही म्हणून मी हेशबोन व एलाले यांच्याबरोबर रडीन. उन्हाळी फळे पण नसतील आणि हर्षोल्लास पण नसेल.
10 कारमेलमध्ये (द्राक्षमळ्यात) आनंदगान होणार नाही. सुगीच्या काळातील आनंद मी कोणालाही होऊ देणार नाही. द्राक्ष मद्य काढण्यासाठी तयार आहेत पण ती नासून जातील.
11 म्हणून मला मवाबबद्दल आणि कीर हेरेसबद्दल फार वाईट वाटते या शहरांबद्दल मला खरोखरच अतिशय वाईट वाटते.
12 मवाबवासी त्यांच्या प्रार्थनास्थळी जाऊन प्रार्थना करण्याचा प्रयत्न करतील, पण काय घडले ते त्यांना दिसेल. ते इतके दुर्बल झालेले असतील की प्रार्थना करण्याची शक्ती त्यांच्यात नसेल.”
13 मवाबबद्दलच्या ह्या गोष्टी परमेश्वराने बऱ्याच वेळा सांगितल्या. 14आणि आता परमेश्वर म्हणतो, “तीन वर्षांत सर्व लोक आणि लोक ज्या वस्तूंचा अभिमान बाळगत होते, त्या सर्व वस्तू नाहीशा होतील. तेथे अगदी थोडे लोक उरतील.”
14
धडा 17

1 दमास्कसला हा शोक संदेश आहे. परमेश्वर म्हणतो की पुढील गोष्टी दमास्कसला घडतील.“आता दमास्कस एक शहर आहे. पण त्याचा नाश होईल. फक्त पडझड झालेल्या इमारती तेथे शिल्लक राहतील.
2 लोक अरोएराची शहरे सोडून जातील. त्या ओसाड शहरांतून शेळ्यामेंढ्यांचे कळप मुक्तपणे हिंडतील. त्यांना हाकलायला तेथे कोणी माणूस नसेल.
3 एफ्राइमची (इस्राएलची) किल्ले असलेली शहरे नष्ट होतील. दमास्कसचे सरकार पडेल. इस्राएलला जे घडले तेच सिरीयात घडेल. सगळी प्रतिष्ठित माणसे दूर केली जातील.” सर्वशक्तिमान परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे ह्या गोष्टी घडतील.
4 त्या वेळी याकोबाची (इस्राएलची) सर्व संपत्ती नष्ट होईल. आजारी माणसाप्रमाणे याकोब दुबळा व बारीक होईल.
5 एफ्राइम खोऱ्यातील धान्याच्या मोसमाप्रमाणे तो काळ असेल. मजूर शेतात पिकलेली पिके कापून गोळा करतात. नंतर कणसे तोडून ते धान्य गोळा करतात.
6 तो काळ जैतूनच्या मोसमाप्रमाणेही असेल. लोक झाड हलवून जैतूनची फळे पाडतात. पण काही झाडावर राहतातच. उंचावरच्या फांद्यावर चार-पाच फळे राहून जातातच. ह्या शहरांचेही असेच होईल. सर्वशक्तिमान परमेश्वराने हे सांगितले आहे.
7 त्या वेळी लोक देवाकडे म्हणजे आपल्या जन्मदात्याकडे पाहतील. त्यांना इस्राएलच्या पवित्र देवाचे दर्शन होईल.
8 लोक, स्वत:च्या हाताने केलेल्या वेद्यांकडे जाणार नाहीत. त्यांनी खोट्या देवांसाठी तयार केलेल्या अशेरा स्तंभाचा आणि धूपाच्या वेद्यांचा ते मान ठेवणार नाहीत.
9 त्या वेळेला किल्ले असलेली सर्व शहरे ओस पडतील. इस्राएलचे लोक येण्याआधी त्या भूमीवर जसे डोंगर आणि जंगले होतीत्याप्रमाणे ती शहरे होतील. पूर्वी इस्राएली लोकांना येताना पाहून तेथे राहणारे लोक पळून गेले. भविष्यात परत एकदा देश ओस पडेल.
10 असे घडण्याचे कारण तू तुला वाचवणाऱ्या देवाला विसरलास. देव हे तुझ्यासाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे, हे तुझ्या लक्षात राहिले नाही.दूरच्या देशांतून तू चांगल्या जातीच्या द्राक्षवेली आणल्यास तू त्यांची लावणी करशील पण त्या वाढणार नाहीत.
11 एके दिवशी तू द्राक्षवेलींची लागवड करशील, त्या वाढाव्या म्हणून प्रयत्न करशील. दुसऱ्या दिवसापासून त्या वाढूही लागतील पण सुगीच्या काळात तू फळे गोळा करायला जाशील तेव्हा तुला सगळे सुकून गेलेले दिसेल. रोगाने सर्व वेली मरून जातील.
12 समुद्राच्या गर्जनेप्रमाणे येणारा पुष्कळ लोकांचा आक्रोश ऐक. ते मोठ्याने रडत आहेत. लाटा एकमेकीवर आदळून उठणाऱ्या आवाजाप्रमाणे हा आक्रोश आहे.
13 लोकांची स्थितीही त्या लाटांप्रमाणेच होईल. देव त्यांची कानउघाडणी करील आणि ते लांबवर धावत सुटतील. लोकांची स्थिती वाऱ्यावर उडून जाणाऱ्या फोलपटाप्रमाणे होईल. वावटळीत उडून जाणाऱ्या गवताप्रमाणे त्यांची अवस्था होईल.
14 त्या रात्री सर्व माणसे अतिशय भयभीत होतील. उजाडण्यापूर्वी सर्व नष्ट झालेले असेल. त्यामुळे आमच्या शत्रूंना काहीही मिळणार नाही ते ह्या भूमीवर पाय ठेवतील तेव्हा येथे काहीही उरलेले नसेल.
धडा 18

1 इथिओपियामधील नद्यांकाठच्या प्रदेशाकडे पाहा. तेथे इतके कीटक आहेत की त्यांचे गुणगुणणे तुम्ही ऐकू शकाल.
2 तेथील लोक बांबूच्या नावातून समुद्र पार करतात.शीघ्रगती दुतांनो, त्या उंच आणि बलवान लोकांकडे जा. (ह्या उंच व धडधाकट लोकांना इतर लोक घाबरतात. त्याचे राष्ट्र बलशाली आहे. त्यांच्या राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राचा पराभव केला आहे. त्यांचा देश नद्यांनी विभागलेला आहे.)
3 त्यांना इशारा करा की त्यांचे काहीतरी वाईट होणार आहे. त्या राष्ट्रांचे वाईट होताना जगातील सर्व लोक पाहतील. डोंगरावर फडकणाऱ्या ध्वजाप्रमाणे ही गोष्ट सर्वांना स्वच्छ दिसेल. ह्या उंच लोकांबाबत घडणारी गोष्ट जगातील सर्व लोक रणशिंगाच्या आवाजाप्रमाणे स्पष्टपणे ऐकतील.
4 परमेश्वर मला म्हणाला, “माझ्यासाठी तयार केलेल्या ठिकाणी मी असेन.मी शांतपणे ह्या गोष्टी घडताना पाहीन.
5 उन्हाळ्यातील प्रसन्न दिवशी दुपारी लोक विश्रांती घेत असतील. (उन्हाळा असल्यामुळे पाऊस अजिबात नसेल. फक्त सकाळी दव असेल.) तेव्हाच काहीतरी भयानक घडेल. सगळीकडे फुले फुललेली असतील, द्राक्षे पिकत असतील, पण सुगीचा हंगाम येण्याआधीच शत्रू येईल व सर्व झाडे कापून टाकील. तो द्राक्षाच्या वेली तोडून फेकून देईल.
6 त्या वेली डोंगरावरील पक्ष्यांच्या आणि जंगली जनावरांच्या उपयोगी पडतील. उन्हाळ्यात पक्षी त्यात राहतील आणि थंडीत जंगली जनावरे त्या खाऊन टाकतील.”
7 त्या वेळेला, सर्वशक्तिमान परमेश्वराला अर्पण करण्यासाठी खास वस्तू आणल्या जातील. ह्या वस्तू, उंच आणि धडधाकट लोक, देवाच्या स्थळी सीयोनच्या डोंगरावर आणतील. (ह्या उंच व धडधाकट लोकांना सर्व लोक घाबरतात. त्यांचे राष्ट्र बलाढ्य आहे. ते इतर राष्ट्रांना हरवते. हे राष्ट्र नद्यांनी विभागले गेले आहे.)
धडा 19

1 मिसरबद्दल शोक संदेश पाहा, परमेश्वर, जलद गतीने जाणाऱ्या मेघावर आरूढ होऊन येत आहे. देव मिसरमध्ये प्रवेश करील आणि तेथील खोटे देव भीतीने थरथर कापू लागतील. मिसर खरा धैर्यवान होता पण त्याचे धैर्य गरम मेणाप्रमाणे वितळून जाईल.
2 देव म्हणतो, “मी मिसरमधील लोकांना त्यांच्याच लोकांविरूध्द लढायला लावीन. भावाभावात लढाई होईल शेजारी शेजाऱ्याच्याविरूध्द जाईल. शहरे एकमेकांच्या विरूध्द जातील. प्रदेश एकमेकांच्या विरोधात जातील.
3 मिसरच्या लोकांचे बेत मी उधळून टाकीन. मिसरवासी गोंधळून जातील. ते काय करावे याबाबत त्यांचे खोटे देव, चाणाक्ष लोक, जादूगार, मांत्रिक यांचा सल्ला घेतील. पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही.
4 प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “मी मिसरला कठोर शासकाच्या हातात देईन. एक सामर्थ्यवान राजा मिसरवर राज्य करील.
5 नाईल नदी कोरडी पडेल. समुद्र आटतील.”
6 सर्व नद्यांच्या पाण्याला दुर्गंध येईल. सर्व कालवे सुकतील आणि मिसरमधील पाणी नाहीसे होईल. पाणवनस्पती कुजून जातील.
7 नदीकाठची झाडे सुकतील, मरतील व वाऱ्यावर उडून जातील. नदीच्या रूंदट पात्रातील वनस्पतीसुध्दा मरतील.
8 “नाईल नदीत मच्छिमारी करणारे कोळी दु:खाने रडतील. कारण ते अन्नासाठी नाईल नदीवर विसंबून असतात. पण तीच कोरडी होईल.
9 विणकर फार दु:खी होतील. कारण त्यांना कापड तयार करण्यासाठी आंबाडी लागते. पण नदी कोरडी पडल्यामुळे त्यात आंबाडी होणार नाही.
10 पाण्यावर बांध बांधणाऱ्यांना काम न राहिल्याने ते सुध्दा कष्टी होतील.
11 “सोअनचे नेते मूर्ख आहेत. फारोचे ‘शहाणे सल्लागार’ चुकीचा सल्ला देतात. हे नेते स्वत:ला शहाणे समजतात. ते म्हणतात की आम्ही पूर्वीच्या राजघराण्यातील आहोत. पण ते स्वत:ला जेवढे शहाणे समजतात तेवढे ते नाहीत.”
12 मिसर देशा, तुझे ते सुज्ञ लोक कोठे आहेत? त्यांना सर्वशक्तिमान परमेश्वराने मिसरबद्दल काय योजले आहे ते समजले पाहिजे. त्यांनी तुला काय घडणार आहे ते सांगितले पाहिजे.
13 सोअनाच्या नेत्यांना मूर्ख बनविले गेले आहे. नोफाचे नेते खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. म्हणून ते सर्व मिसरला चुकीच्या मार्गाने नेतात.
14 परमेश्वराने नेत्यांना गोंधळात टाकले आहे. ते स्वत:भरकटतात आणि मिसरला चुकीच्या वाटेने नेतात. ते जे काय करतात ते चूकच असते. ते मद्यप्यांसारखे मळमळून येऊन गडबडा लोळत आहेत.
15 नेत्यांना करण्यासारखे आता काही नाही. (हे नेते म्हणजे “डोके व शेपूट,” “शेंडे व बुडखे” आहेत.)
16 त्या वेळी मिसरवासी घाबरलेल्या बायकांसारखे दिसतील. ते सर्वशक्तिमान परमेश्वराला भितील. देव शिक्षा करण्यासाठी हात उगारील व त्यांची घाबरगुंडी उडेल.
17 यहुद्यांच्या भूमीला मिसरमधील सर्व लोक घाबरतील. मिसरमधील प्रत्येकजण यहुदाचे नाव ऐकताच भयभीत होईल. असे होण्याचे कारण हेच की सर्वशक्तिमान परमेश्वराने मिसरमध्ये भयानक गोष्टी घडून आणण्याची योजना आखली आहे.
18 ह्या वेळेला मिसरमधील पाच शहंरातील लोक युहद्यांची कनान भाषा बोलतील. त्या पाच शहरांपैकी एका शहराचे नाव “ईर-हरेस” असेल.ह्या शहरांत राहणारे लोक सर्व शक्तिमान परमेश्वरला अनुसरण्याची शपथ वाहतील.
19 तेव्हा मिसरच्या मध्यावर परमेश्वरासाठी एक वेदी असेल. व परमेश्वराविषयी आदर दाखविण्यासाठी मिसरच्या सीमेवर एक स्मारक उभारले जाईल.
20 सर्वशक्तिमान परमेश्वराच्या सामर्थ्यशाली कृत्यांची मिसरमधील ही निशाणी आणि पुरावा असेल. केव्हाही लोकांनी परमेश्वराकडे मदतीसाठी धावा केला की परमेश्वर मदत पाठवील. लोकांचे रक्षण व बचाव करण्यास देव एका माणसाला पाठवील हा माणूस अत्याचार करणाऱ्यापासून लोकांना सोडवील.
21 त्या वेळेला मिसरवासीयांना परमेश्वराची खरी ओळख होईल. ते देवावर प्रेम करतील. ते देवाची उपासना करतील आणि बळी अर्पण करतील. ते परमेश्वराला नवस बोलतील आणि ते फेडतील.
22 परमेश्वर मिसरमधील लोकांना शिक्षा करील. नंतर परमेश्वर त्यांना क्षमा करील. ते परमेश्वराला शरण जातील. परमेश्वर त्यांच्या प्रार्थनेला पावेल व त्यांना क्षमा करील.
23 त्या वेळी मिसर ते अश्शूर असा महामार्ग असेल. त्यामुळे मिसर व अश्शूर त्यांच्यामधे ये-जा होईल. मिसर अश्शूरच्या बरोबरीने वागेल.
24 त्या वेळी इस्राएल, अश्शूर व मिसर एकत्र येऊन राज्य करतील. हा देशाच्या दृष्टीने ईश्वराचा कृपाप्रसादच ठरेल.
25 सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या देशांवर कृपा करील. तो म्हणेल, “मिसरवासीयांनो, तुम्ही माझे आहात अश्शूरच्या रहिवाशांनो, तुम्हाला तर मीच घडवलय्! इस्राएलच्या लोकांनो, मी तर तुमचा स्वामी आहे. तुम्हासर्वांना माझे आशीर्वाद!”
धडा 20

1 सर्गोन अश्शूरचा राजा होता. त्याने तर्तानला अश्दोदवर स्वारी करायला पाठविले. तर्तानने चढाई करून ते शहर जिंकून घेतले.
2 त्या वेळेला आमोजचा मुलगा यशया याला परमेश्वर म्हणाला, “जा तुझ्या अंगावरील शोकप्रदर्शक कपडे व जोडे काढ.” यशयाने परमेश्वराच्या आज्ञेच पालन केले आणि तो उघडा व अनवाणी चालला.
3 तेव्हा परमेश्वर म्हणाला, “यशया तीन वर्षे उघडा व अनवाणी फिरला. हा मिसर व कूशयाला संकेत आहे.
4 अश्शूरचा राजा त्यांना कैद करील व त्यांच्या देशापासून त्यांना दूर घेऊन जाईल. आबालवृध्दांना वस्त्रे व जोडे काढून नेले जाईल व त्यांना संपूर्ण नग्न केले जाईल. मिसरचें लोक लज्जित होतील.
5 जे कुशकडे मदतीची अपेक्षा करीत होते. त्यांचा अपेक्षाभंग होईल. मिसरच्या वैभवाने लोक आश्चर्यचकीत झाले होते परंतु ते लज्जित होतील.”
6 समुद्रकाठी राहणारे लोक म्हणतील, “त्या देशांवर आम्ही मदतीसाठी विश्वास टाकला, अश्शूरच्या राजापासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे धाव घेतली पण त्यांचाच पराभव झाला, मग आता आमचा निभाव कसा लागणार?”
धडा 21

1 बाबेलोनबद्दल (समुद्राजवळचे वाळवंट) देवाचा शोक संदेश.वाळवंटातून काहीतरी येत आहे. नेगेबच्या वाळवंटातून येणाऱ्या वादळाप्रमाणे ते आहे. भयंकर देशातून ते येत आहे.
2 काहीतरी भयंकर घडणार असल्याचा दृष्टान्त मला होत आहे. विश्वासघातकी तुझ्याविरूध्द जाताना मला दिसत आहे. लोक तुझी संपत्ती लुटून नेताना मी पाहतोय, एलाम, जा आणि लोकांवर चढाई कर. मादया, शहराला वेढा घाल आणि त्याचा पाडाव कर. त्या शहरातील सर्व दुष्कृत्ये मी नाहीशी करीन.
3 भयंकर गोष्टी पाहून मी घाबरलो आहे. भीतीने माझ्या पोटात गोळा उठतो त्या भीतीच्या वेदना प्रसूतिवेदनेप्रमाणे आहेत. जे मी ऐकतो त्याने भयभीत होतो, जे पाहतो त्यामुळे भीतीने माझा थरकाप होतो.
4 मी चिंताग्रस्त आहे आणि भीतीने थरथर कापत आहे. माझी प्रसन्न संध्याकाळ काळरात्र बनली आहे.
5 लोकांना वाटते सारे काही ठीक चालले आहे. लोक म्हणत आहेत “जेवणाची तयारी करा. खा. प्या.” त्याच वेळी तिकडे सैनिक म्हणत आहेत “टेहळणीदार ठेवा. सेनाधिकाण्यांनो, उठा व ढाली सज्ज करा.”
6 माझा प्रभू मला म्हणाला, “जा आणि ह्या शहराचे रक्षण करण्यासाठी पहारेकऱ्याची नेमणूक कर. तो जे जे पाहील त्याची त्याने वर्दी द्यावयास हवी.
7 जर त्या रखवालदाराने घोडेस्वारांच्या रांगा, गाढवे किंवा उंट पाहिले तर त्याने अतिशय काळजीपूर्वक चाहूल घेतली पाहिजे.”
8 मग एके दिवशी रखवालदाराने इशारा दिला. सिहंनाद करून रखवालदार म्हणाला, “हे प्रभु! रोज मी टेहळणी बुरूजावरून टेहळणी करीत असतो. रोज रात्री माझा खडा पहारा असतो.
9 पण पाहा! ते येत आहेत! लोकांच्या व घोडेस्वारांच्या रांगा मला दिसत आहेत!”नंतर दूत म्हणाला, “बाबेलोनचा पराभव झाला. ते जमीनदोस्त झाले, बाबेलोनच्या खोट्या देवांच्या सर्व मूर्तींची मोडतोड होऊन त्या धुळीला मिळाल्या आहेत.”
10 0यशया म्हणाला, “माझ्या लोकांनो, सर्वशक्तिमान परमेश्वराने, इस्राएलच्या देवाने जे मला ऐकवले, ते मी तुम्हाला सांगितले. खळ्यातील धान्याप्रमाणे तुम्ही झोडपले जाल.”
11 दुमाविषयीचा शोक संदेश.सेईराहून (एदोमहून) मला एकजण भेटायला आला. तो म्हणाला, “रखवालदारा, रात्र किती राहिली? अंधार सरायला अजून किती वेळ आहे?”
12 रखवालदार उत्तरला, “सकाळ होत आहे पण परत रात्र होईल. तुम्हाला काही विचारायचे असल्यास परत याव मग विचारा.”
13 अरेबियाविषयी शोक संदेशददार्नीच्या काफल्याने अरेबियाच्या वाळवंटातील काही झाडांखाली रात्र काढली.
14 त्यांनी तहानेलेल्या प्रवाशांना पाणी दिले तेमा देशातील लोकांनी प्रवाशांना अन्न दिले.
15 ते प्रवासी, त्यांना ठार मारायला उठलेल्या तलवारीपासून व युध्द करायला सज्ज असलेल्या धनुष्यांपासून दूर पळत होते. ते घनघोर युध्दापासून दूर पळत होते.
16 ह्या गोष्टी घडून येतील असे माझ्या प्रभु परमेश्वराने मला सांगितले. परमेश्वर म्हणाला, “एक वर्षात (सालदाराच्या मोजणीप्रमाणे) केदारचे वैभव लयाला जाईल.
17 त्या वेळी अगदी थोडे धनुर्धारी, केदारचे महान योध्दे, मागे उरतील.” इस्राएलच्या परमेश्वर देवाने सांगितले आहे.
धडा 22

1 दृष्टान्ताच्या दरीविषयी शोक संदेश.लोकहो, तुमचे काय बिघडले आहे? तुम्ही घराच्या छपरावर का लपला आहात?
2 पूर्वी हे शहर फार गजबजलेले होते. येथे गलबलाट होता आणि शहर सुखी होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. तुझे लोक मारले गेले पण तलवारीच्या वाराने नव्हे. तुझे लोक मेले हे खरे, पण लढताना नव्हे.
3 तुझे नेते एकत्र होऊन खूप लांब जरी पळून गेले, तरी ते पकडले गेले. ते पकडले गेले ते धनुष्याचा उपयोग न करता. ते सर्व नेते एकत्रितपणे पळून गेले पण पकडले गेलेच.
4 म्हणून मी म्हणतो, “माझ्याकडे बघू नका, मला रडू द्या. माझ्या लोकांच्या नाशाबद्दल माझे सांत्वन करू नका.”
5 परमेश्वराने एक विशेष दिवस निश्चित केला आहे. त्या दिवशी तेथे दंगली व गोंधळ होईल. दृष्टांन्ताच्या दरीत लोकांची तुडवातुडवी होईल. शहराची तटबंदी पाडली जाईल. दरीतील लोक डोंगर माथ्यावर असलेल्या शहरातील लोकांकडे बघून आरडाओरडा करतील.
6 एलामचे घोडदळ भाते अडकवून लढाईसाठी दौड करील. कीरवासीयांच्या ढालींचा खणखणाट होईल.
7 तुझ्या खास दरीत सैन्यांची गाठ पडेल. रथांनी दरी भरून जाईल. घोडदळ शहराच्या वेशीपाशी ठेवले जाईल.
8 तेव्हा यहुदी लोक रानातील राजवाड्यात ठेवलेल्या शस्त्रांचा उपयोग करू पाहतील.शत्रू यहुदाचे तट पाडतील.
9 दावीदाच्या शहरांच्या भितींना भगदाडे पडायला सुरवात होईल. आणि तुम्हाला ती स्पष्टपणे दिसतील. मग तुम्ही घरांची मोजदाद कराल आणि तुम्ही घरांचे दगड तटाची भगदाडे बुजवायला वापराल. पाणी साठविण्यासाठी दोन भिंतीत जागा करून तुम्ही जुन्या झऱ्याचे पाणी सोडाल.तुमच्या बचावासाठी तुम्ही हे सर्व कराल पण ज्याने हे सर्व केले त्या देवावर तुम्ही श्रध्दा ठेवणार नाही. ज्याने फार पूर्वीच या गोष्टी करून ठेवल्या त्या देवाकडे तुमचे लक्षच जाणार नाही.
10
11
12 म्हणून माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर तुमच्या मृत मित्रांसाठी शोक करण्यास व रडण्यास सांगेल. लोक मुंडन करून शोकप्रदर्शक वस्त्रे घालतील.
13 पण पाहा! आता लोक आनंदात आहेत. ते आनंदोत्सव साजरा करत आहेत. ते म्हणत आहेत,गुरे, मेंढ्या मारा. आपण उत्सव साजरा करू. आपण जेवण करू, मद्यपान करू कारण उद्या आपल्याला मरायचे आहे.
14 सर्वशक्तिमान परमेश्वराने सांगितलेल्या ह्या गोष्टी मी स्वत: माझ्या कानाने ऐकल्या. “तुमच्या दुष्कृत्यांबद्दल तुम्ही अपराधी आहात. या अपराधांबद्दल क्षमा करण्यापूर्वीच तुम्ही मराल याची मला खात्री आहे.” माझ्या प्रभूने, सर्वशक्तिमान परमेश्वराने मला हे सांगितले.
15 माझ्या प्रभूने, सर्वशक्तिमान परमेश्वराने मला सांगितले, ‘राजप्रासादातील कारभारी शेबना याच्याकडे जा. तो राजवाड्याचा कारभार पाहतो.
16 राजप्रासादातील त्या नोकराला जाब विचार, ‘येथे काय करीत आहेस? तुझ्या कुटुंबातील कोणाचे येथे दफन केले आहे का? तू येथे थडगे का खणीत आहेस?”यशया म्हणाला, “हा माणूस पाहा, हा स्वत:चे थडगे महत्वाच्या जागी खणत आहे. खडक फोडून तो स्वत:चे थडगे खणत आहे.”
17 “हे माणसा, परमेश्वर तुला चिरडून टाकील. परमेश्वर तुझा लहानसा चेंडू करून तुला दुसऱ्या मोठ्या देशात भिरकावून देईल. तेथेच तू मरशील.”परमेश्वर म्हणाला, “तुला तुझ्या रथांचा फार गर्व आहे पण त्या दूरदेशातील तुझ्या नवीन राजाचे रथ तुझ्यापेक्षा चांगले असतील. त्याच्या राजवाड्यात तुझे रथ शोभणार नाहीत.
18
19 येथल्या महत्वाच्या पदावरून तुला कमी करायला मी भाग पाडीन. तुझा नवा राजा तुला महत्वाच्या पदावरून दूर करील.
20 त्या वेळी मी माझा सेवक आणि हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम ह्याला बोलावीन.
21 “मी तुझी वस्त्रे व राजदंड काढून एल्याकीमला देईन. तुझे महत्वाचे पद त्याला देईन. तो सेवक यरूशलेमच्या लोकांना व यहुद्याच्या कुटुंबीयांना पित्याप्रमाणे असेल.
22 “दावीदाच्या घराची किल्ली मी एल्याकीमच्या ताब्यात देईन. त्याने उघडलेले दार उघडेच राहील. कोणीही ते बंद करू शकणार नाही. त्याने बंद केलेले दार बंदच राहील. ते कोणीही उघडू शकणार नाही. त्याच्या वडिलांच्या घरात त्याला महत्वाचे स्थान प्राप्त होईल.
23 अतिशय कठीण पृष्ठ भागावर ठोकून बसवलेल्या खिळ्याप्रमाणे मी त्याला मजबूत करीन.
24 त्याच्या वडिलांच्या घरातील महत्वाच्या व पूज्य वस्तू त्याच्या ताब्यात जातील. आबालवृद्ध त्याच्यावर अवलंबून असतील. हे अवलंबून राहणेभक्कम खिळ्याला अडकविलेल्या छोट्या ताटल्या व मोठ्या पाण्याच्या बाटल्यांप्रमाणे असेल.
25 “आता, कठीण पृष्ठभागावर ठोकून बसविलेला खिळा (शेबना) त्या वेळी कमकुवत होऊन तुटून पडेल. तो खिळा जमिनीवर तुटून पडल्याने त्याला अडकविलेल्या वस्तूंचा नाश होईल. नंतर मी दृष्टांन्तात सांगितल्याप्रमाणे सर्व होईल.” (परमेश्वराने सांगितले असल्यामुळे ह्या गोष्टी घडतील)
धडा 23

1 सोरविषयी शोक संदेश तार्शीशच्या गलबतावरील प्रवाशांनो, तुमची गलबते जेथे लागतात ते बंदर उध्वस्त झाले आहे तेव्हा शोक करा. (कित्तीहून परतणाऱ्या गलबतांवरील प्रवाशांना ही बातमी सांगितली गेली.)
2 समुद्रकाठी राहणाऱ्या लोकांनो, दु:खाने स्तब्ध व्हा. सोर हे “सीदोनचे व्यापारी केंद्र आहे.” तेथील व्यापारी समुद्रपार जाऊन व्यापार करतात आणि धनदौलत आणतात.
3 ते समुद्रमार्गे जाऊन धान्याचा शोध घेतात. नाईल नदीच्या तीरावर पिकलेले धान्य ते विकत घेतात आणि इतर राष्ट्रांत विकतात.
4 सीदोन, तू खरे म्हणजे जास्त खिन्न व्हायला पाहिजेस. का? कारण आता समुद्र व समुद्रातील किल्ला म्हणजे सोर म्हणतात,“मला मुले नाहीत. मी प्रसूतिवेदना अनुभवल्या नाहीत. मी मुलांना जन्म दिला नाही. मी मुलांना वाढवले नाही.”
5 मिसरला सोरची वार्ता कळेल. ह्या वार्तेने मिसरला धक्का बसेल दु:ख होईल.
6 गलबतांनो, तुम्ही तार्शीशला माघारी जाणे बरे! समुद्रकाठी राहणाऱ्या लोकांनी खिन्न व्हायला पाहिजे.
7 पूर्वी तुम्ही सोरमध्ये मजा केली. आरंभापासून त्या शहराची वाढ होत आहे. त्या शहरवासीयांनी उपजीविकेसाठी दूरवर प्रवास केला आहे.
8 सोर शहराने पुष्कळ नेते दिले. तेथील व्यापारी म्हणजे जणूराजपुत्रच. व्यापाऱ्यांना सगळीकडे मान मिळतो. मग सोरविरूध्द कट कोणी रचला?
9 ही सर्वशक्तिमान परमेश्वराचीच करणी होती. त्याने सोरचे महत्व कमी करायचे ठरविले.
10 तार्शीशच्या गलबतांनो, तुम्ही स्वदेशी परत जाणे योग्य. लहान नदी जशी पार करतात, तसा समुद्र पार करा. तुम्हाला आता कोणीही अडवणार नाही.
11 परमेश्वराने आपला हात समुद्रापर्यंत पसरला आहे. सोरविरूध्द लढण्यासाठी तो राज्यांना गोळा करीत आहे. त्याने, तार्शीशचे सुरक्षित ठिकाण सोर नष्ट करण्याची कनानला आज्ञा दिली आहे.
12 परमेश्वर म्हणतो, “सीदोनच्या कुमारिके, तुझा नाश होईल. तू पुन्हा आनंदित होणार नाहीस.” पण सोरचे रहिवासी म्हणतात, “सायप्रस आम्हाला मदत करील.” पण जरी तुम्ही समुद्र पार करून सायप्रसला गेलात, तरी तुम्हाला तेथे आराम करायला जागा मिळणार नाही.
13 मग सोर लोक म्हणतात, “बाबेलोनमधील लोक आम्हाला मदत करतील.” पण खास्द्यांच्या भूमीकडे (बाबेलोनकडे) पाहा. बाबेलोन आता देश राहिलेला नाही. अश्शूरने बाबेलोनवर हल्ला केला आणि त्याच्या भोवती युध्दस्तंभ उभारले. सुंदर घरातील सर्व चीजवस्तू सैनिकांनी लुटल्या. अश्शूरांनी बाबेलोनला जंगली जनावरांना राहण्यायोग्य बनविले. त्यांनी बाबेलोनला पूर्णपणे उजाड केले.
14 तार्शीशच्या गलबतांनो, तुमचे सुरक्षिततेचे ठिकाण-सोर-हे नष्ट केले जाणार आहे म्हणून तुम्ही शोक करा.
15 सत्तर वर्षे सोर शहराला लोक विसरून जातील. (हा एका राज्याच्या कारकिर्दी इतका कालखंड आहे.) सत्तर वर्षांनंतर सोरची स्थिती पुढील गाण्यातील वेश्येसारखी असेल.
16 पुरूषांच्या विस्मरणात गेलेल्या वारांगने, तुझी सारंगी उचल आणि शहरातील रस्त्यातून फीर. सारंगीवर सुरेल गाणे वाजव. तुझे गाणे पुन्हा पुन्हा म्हण. म्हणजे लोकांना तुझी आठवण होईल.
17 सत्तर वर्षांनंतर परमेश्वर सोरबद्दल फेरविचार करील. आणि आपला निर्णय देईल. तेथे परत व्यापार सुरू होईल. ती पृथ्वीवरील सर्व देशांची वारांगना होईल.
18 पण तिने मिळविलेला पैसा ती जवळ ठेवणार नाही. व्यापारात तिला झालेला फायदा परमेश्वरासाठी राखून ठेवला जाईल. तो फायदा, ती परमेश्वराची सेवा करणाऱ्यांना देईल. मग परमेश्वराची सेवा करणाऱ्यांना पोटभर अन्न मिळेल. ते चांगले कपडे घालतील.
धडा 24

1 पाहा! परमेश्वर ह्या देशाचा नाश करील. ही भूमी पूर्णपणे स्वच्छ करील. परमेश्वर लोकांना बळजबरीने दूर जायला लावील.
2 त्या वेळेला सामान्य लोक आणि याजक यांना एकाच मापाने मोजले जाईल. गुलाम व मालक हे सारखेच समजले जातील. दासी आणि मालकीण यांच्यात फरक केला जाणार नाही. खरीददार व विक्रेते, कर्ज घेणारे व कर्ज देणारे आणि धनको व ऋणको ह्यांत भेद केला जाणार नाही.
3 सर्व लोकांना देशातून बळजबरीने हाकलून दिले जाईल. सर्व संपत्ती लुटली जाईल. परमेश्वराच्या आज्ञेवरून हे घडेल.
4 देश ओस पडून त्याच्यावर शोककळा पसरेल. जग ओसाड व दु:खी होईल. ह्या देशातील महान नेते दुबळे होतील.
5 ह्या देशातील लोकांनी देशाला ओंगळ केले. हे कसे झाले? देवाच्या शिकवणुकी विरूध्द जाऊन त्यांनी चुकीचे आचरण केले. देवाचे नियम त्यांनी मानले नाहीत. पूर्वी लोकांनी देवाबरोबर करार केला पण ती त्यांनीच मोडला.
6 ह्या देशात राहणारे लोक दुष्कृत्यांचे धनी आहेत. म्हणून देवाने हा देश नष्ट करायचा पण केला. लोकांना शिक्षा होईल. फारच थोडे वाचतील.
7 द्राक्षवेली सुकत चालल्या आहेत. नवीन मद्य खराब आहे. पूर्वी लोक सुखी होते. पण आता तेच लोक दु:खी झाले आहेत.
8 लोकांचे आनंदप्रदर्शन थांबले आहे. सगळे आनंददात थांबले आहेत. सांरगीतून आणि डफातून उठणारे आनंदसंगीत बंद पडले आहे.
9 लोक मद्य पिताना आनंदगीते म्हणत नाहीत. मद्याची चव कडू झाली आहे.
10 “संपूर्ण गोंधळ” हेच नाव या शहराला शोभेल. शहराचा नाश झाला आहे. लोक घरात प्रवेश करू शकत नाहीत. दारांना अडसर घातले आहेत.
11 बाजारात लोक अजूनही मद्याची मागणी करतात पण त्यात पूर्वीचा आनंद नाही. सगळीच मजा गेली आहे.
12 सर्वत्र पडझड झाली आहे. वेशीसुध्दा कोलमडून पडल्या आहेत.
13 सुगीच्या काळात, लोक जैतूनची फळे झाडावरून पाडतात. पण काही झाडावर राहतातच. अनेक देशांमध्ये असलेल्या ह्या देशाचे देखील असेच होईल.
14 वाचलेले लोक आरडाओरड सुरू करतील. त्यांचा आवाज महासागराच्या गर्जनेपेक्षा मोठा असेल. परमेश्वराची महानता पाहून ते आनंदित होतील.
15 ते लोक म्हणतील, “पूर्वेकडच्या लोकांनो, परमेश्वराचे स्तवन करा. दूरच्या देशांतील लोकांनो, इस्राएलच्या परमेश्वर देवाचे स्तवन करा.”
16 जगाच्या कानाकोपऱ्यातून देवाचे स्तुतिस्तोत्र आपल्याला ऐकायला येतील. ह्या गीतांतून खऱ्या देवाची स्तुती असेल. पण मी म्हणतो, “पुरे पुष्कळ झाले. मी ज्या गोष्टी पाहतो त्या भयानक आहेत. लोकांच्या विरूध्द विश्वासघातकी उठले आहेत. व त्यांना त्रास देत आहेत.
17 ह्या देशात राहणाऱ्या लोकांवर येणारे संकट मला दिसत आहे. त्यांची भीती, त्यांच्या पुढे असलेले खाचखळगे व सापळे मला दिसतात.
18 लोकांना संकटाची चाहूल लागून ते घाबरून जातील. काही लोक सैरावैरा पळतील. पण ते खाचखळग्यात पडतील आणि सापळ्यात अडकतील. त्यातील काही खड्ड्यातून चढून बाहेर येतील. पण ते दुसऱ्या सापळ्यात अडकतील,” आकाश फाटेल आणि प्रलय होईल. पृथ्वीचा पाय कापू लागेल.
19 धरणीकंप होऊन जमीन दुभंगेल.
20 पृथ्वीला पापांचा भार झाला आहे. म्हणून ती त्या ओझ्याखाली दबून जाईल. पृथ्वी एखाद्या खिळखिळ्या झालेल्या घरासारखी उगमगेल. एखाद्या मद्यप्याप्रमाणे कोसळेल आणि पुन्हा उठणार नाही.
21 त्या वेळी, परमेश्वर, स्वर्गातील सैन्यांचा स्वर्गात व पृथ्वीवरील राजांचा पृथ्वीवर, न्यायानिवाडा करील.
22 खूप राजे एकत्र जमतील आणि त्यांना तुरूंगात टाकले जाईल. पण शेवटी, बऱ्याच काळानंतर, त्यांना न्याय दिला जाईल.
23 यरूशलेममधील सीयोन पर्वतावर परमेश्वराचे राज्य असेल. त्या देवाचे तेज नेत्यांना दिसेल. त्याच्या तेजापुढे चंद्र ओशाळेल आणि सूर्याला लाज वाटेल.
धडा 25

1 प्रभू, तू माझा परमेश्वर आहेस. मला तुझ्याबद्दल आदर वाटतो व तुझे मी स्तवन करतो. तू आश्चर्य घडवली आहेस. तू पूर्वी केलेले भाकीत पूर्णपणे खरे ठरले आहे. तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी घडली आहे.
2 तू ज्या शहराचा नाश केलास, ते शहर मजबूत तटबंदीने सुरक्षित केलेले होते. पण आता तेथे फक्त दगडांचा खच पडला आहे परकीयांचा राजवाडा जमीनदोस्त केला गेला आहे. तो परत कधीच बांधला जाणार नाही.
3 बलाढ्य राष्ट्रातील लोक तुला मान देतील. क्रूर राष्ट्रांतील शहरे तुला घाबरतील.
4 परमेश्वरा, तू गरजू गरीब लोकांचा आसरा आहेस. त्यांच्यापुढील अनेक समस्या त्यांना खच्ची करू पाहतात पण तू त्यांचे रक्षण करतोस. परमेश्वरा, तू उन्हापावसापासून रक्षण करणाऱ्या निवाऱ्यासारखा आहेस. पीडा या तुफान वादळ व पावसासारख्या असतात. पण पावसाची झड भिंतीवर आपटून खाली पडते. घरातल्या लोकांना तिचा त्रास होत नाही.
5 शत्रू आरडाओरडा करून गोंगाट करतो. भयंकर शत्रू आव्हाने देतो. पण देवा तू त्यांचा बंदोबस्त करतोस. ज्याप्रमाणे उन्हाळ्यात वाळवंटातील झाडेझुडपे सुकून जमिनीवर गळून पडतात, त्याप्रमाणे तू शत्रूचा पराभव करून त्यांना तुझ्यापुढे गुडघे टेकायला लावतोस. ज्याप्रमाणे मोठे ढग उष्णतेचा ताप कमी करतात, त्याप्रमाणे तू भयंकर शत्रूच्या गर्जना थांबवतोस.
6 त्या वेळेस, सर्वशक्तिमानपरमेश्वर, डोंगरावरील सर्व लोकांना मेजवानी देईल. मेजवानीत उत्कृष्ट अन्नपदार्थ व उंची मद्य असेल. मांस कोवळे व चांगल्या प्रतीचे असेल.
7 सध्या बुरख्याने सर्व राष्ट्रे आणि लोक झाकून गेले आहेत. हा बुरखा म्हणजेच “मृत्यू” होय.
8 पण मृत्यूवर पूर्णपणे मात करता येईल आणि परमेश्वर माझा प्रभू, प्रत्येक चेहऱ्यावरचा, प्रत्येक अश्रू पुसून टाकील. पूर्वी त्याच्या लोकांनी दु:ख भोगले पण देव पृथ्वीवरचे दु:ख दूर करील. परमेश्वराने सांगितले असल्यामुळेच हे सर्व घडून येईल.
9 तेव्हा लोक म्हणतील, “हा आपला देव आहे. आपण ज्याची वाट पाहत आहोत तोच हा. तो आपले रक्षण करायला आला आहे. आपण त्या आपल्या परमेश्वराची वाट पाहत आहोत, म्हणून जेव्हा परमेश्वर आपले रक्षण करील तेव्हा आनंद साजरा करू आणि सुखी होऊ.”
10 परमेश्वराचे सामर्थ्य ह्या डोंगरावर असल्याने मवाबचा पराभव होईल. परमेश्वर कचऱ्याच्या ढिगातील गवताच्या काडीप्रमाणे शत्रूला पायाखाली तुडवील.
11 पोहणाऱ्या माणसाच्या हाताप्रमाणे परमेश्वर स्वत:चा हात लांब करील आणि लोकांना ज्यांचा अभिमान आहे अशा सर्व गोष्टी तो जमा करील. लोकांनी घडविलेल्या सर्व सुंदर वस्तू परमेश्वर गोळा करील आणि दूर फेकून देईल.
12 लोकांनी बांधलेल्या उंच भिंती व सुरक्षित जागा परमेश्वर पाडून टाकून धुळीला मिळवील.
धडा 26

1 त्या वेळेस, यहुदात, लोक पुढील गाणे म्हणतील परमेश्वराने आम्हाला तारण दिले आहे. भक्कम तटबंदी व पुरेशी संरक्षणव्यवस्था असलेले आमचे शहर अभेद्द आहे.
2 वेशी उघडा म्हणजे देवाची चांगली शिकवण मानणारे सज्जन लोक आत प्रवेश करतील.
3 परमेश्वरा, तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना आणि तुझ्यावर श्रध्दा ठेवणाऱ्यांना, तू खरी शांती देतोस.
4 म्हणून नेहमी परमेश्वरावर विश्वास ठेवा, कारण परमेश्वर हा तुमच्यासाठी निरंतर सुरक्षित आसरा आहे.
5 पण परमेश्वर उद्दाम शहराचा नाश करील, आणि तेथील लोकांना शिक्षा करील. परमेश्वर ते मोठे शहर धुळीला मिळवील.
6 नंतर दीनदुबळे त्याचे भग्नावशेष पायाखाली तुडवतील.
7 प्रामाणिकपणा हे सज्जनांचे ब्रीद असते. सज्जन सत्याच्या सरळ मार्गाने जातात, आणि देवा तू तो मार्ग सुकर व सुलभ करतोस.
8 पण परमेश्वरा, तू न्याय कसा करतोस ते बघण्यास आम्ही उत्सुक आहोत. आमचे आत्मे तुला व तुझ्या नांवाला कायम स्मरणात ठेवू इच्छितात.
9 प्रत्येक रात्रीबरोबर तुझ्याशी एकरूप होण्याची आमची इच्छा आहे, आणि प्रत्येक पहाटेबरोबर माझ्यातील आत्मा तुझ्याशी समरस होऊ इच्छितो. जेव्हा तू न्याय देशील तेव्हा लोकांना जगण्याचा योग्य मार्ग सापडेल.
10 पापी माणसावर तू फक्त दयाच करीत राहिलास तर तो कधीच सत्कृत्य करायला शिकणार नाही. वाईट माणूस चांगल्या लोकांत राहिला तरी वाईट गोष्टीच करील: दुष्टाला परमेश्वराची महानता कदाचित कधीच कळणार नाही.
11 पण परमेश्वरा, तू त्यांना शिक्षा करण्यास तयार हो. नक्कीच ते हे पाहातील नाही का? परमेश्वरा, तुझ्या लोकांबद्दल असलेले तुझे भक्कम प्रेम तू पाप्यांना दाखव. मग ते नक्कीच खजील होतील. तुझे शत्रू नक्कीच त्यांच्याच आगीत भस्मसात होतील.
12 परमेश्वरा, आम्ही तडीस नेलेल्या सर्व गोष्टी तूच आमच्यासाठी केल्या आहेस तेव्हा आम्हाला शांती दे.
13 परमेश्वरा, तू आमचा देव आहेस. पूर्वी आम्ही इतर भोंदू देवांना अनुसरलो आम्ही त्यांना जवळ केले. पण आता लोकांनी फक्त तुझेच नाव घ्यावे असे आम्हाला वाटते.
14 ते मृत देव जीवंत होणार नाहीत. त्यांची भुते आता उठणार नाहीत. तू त्यांचा नाश करायचे ठरविलेस आणि त्यांची आठवण देणाऱ्या सर्व खाणाखुणा तू नष्ट केल्यास.
15 तुझ्या आवडत्या राष्ट्राला तू मदत केलीस. इतर लोकांना त्या राष्ट्राचा पराभव करण्यापासून थांबविलेस.
16 परमेश्वरा, संकटात असताना लोक तुझे स्मरण करतात. तू शिक्षा केल्यास लोक मनात तुझा धावा करतात.
17 परमेश्वरा, आम्ही तुझ्याबरोबर नाही. प्रसूति वेदना होऊन रडणाऱ्या स्त्रीसारखे आम्ही आहोत. ती वेदनेने विव्हळते.
18 त्याचप्रमाणे आम्हाल वेदना आहेत. आम्ही जन्म देतो पण तो फक्त वाऱ्याला. आम्ही जगासाठी नवीन लोक तयार करत नाही. आम्ही देशासाठी तारण आणत नाही.
19 परंतु परमेश्वर म्हणतो, “तुझे लोक मेले असले तरी जिवंत होतील. आमच्या माणसांचे मृतदेह सजीव होतील. मृतांनो, थडग्यातून उठा आणि आनंदित व्हा. तुमच्यावर पडलेले दव हे जणू नव्या दिवसाचा प्रकाश आहे. तो प्रकाश नवाकाळ येत आहे हे दाखवितो. मृत लोकांना आता जमिनीत पुरले आहे पण त्यांना नवजीवन मिळेल.”
20 माझ्या लोकांनो, आपापल्या खोल्यांत जा. दारे लावून घ्या. थोडा्या वेळ खोलीतच लपून बसा. देवाचा राग शांत होईपर्यंत लपून राहा.
21 परमेश्वर दुष्कृत्यांबद्दल जगातील लोकांचा न्यायनिवाडा करण्यासाठी देव आपले स्थान सोडून येईल. मारल्या गेलेल्या लोकांचे रक्त पृथ्वी त्याला दाखवील.
धडा 27

1 भूमी यापुढे मृतांना झाकून ठेवणार नाही. त्या वेळेला लिव्याथान ह्या कपटी सर्पाचा परमेश्वर न्यायनिवाडा करील. वेटोळे घालून बसलेल्या लिव्याथान सर्पाला परमेश्वर आपल्या मोठ्या, कठीण व बलवान तलवारीने शिक्षा करील. समुद्रातील प्रचंड धुडाला तो मारील.
2 तेव्हा लोक रम्य द्राक्षमळ्याबद्दलचे गाणे म्हणतील.
3 “मी स्वत: परमेश्वर, त्या बागेची निगा राखीन. मी योग्य वेळी बागेला पाणी देईन. रात्रंदिवस मी त्या बागेची राखण करीन. कोणीही बागेची नासधूस करणार नाही.
4 मी रागवलेलो नाही, पण युध्द झाले आणि बागेभोवती कोणी काटेरी कुंपण घातले तर मी तेथे जाऊन ते नष्ट करीन.
5 जर कोणी व्यक्ति माझ्याकडे आश्रयासाठी आली व तिला माझ्याबरोबर शांतता करावयाची असली तर तिला माझ्याकडे येऊ द्या, व माझ्याबरोबर शांती करू द्या.
6 ज्याप्रमाणे खोलवर गेलेली मुळे झाडालाभक्कम आधार देतात. त्याप्रमाणे माझ्याकडे आलेली ही माणसे याकोबचे हात मजबूत करतील. ही माणसे, फुलू लागलेल्या झाडाप्रमाणे, इस्राएलचा विकास करतील. फळांनी बहरलेल्या वृक्षाप्रमाणे इस्राएलची मुले हा देश व्यापून टाकतील.”
7 परमेश्वर त्याच्या लोकांना कशी शिक्षा करील? पूर्वी जसा शत्रूंनी लोकांना त्रास दिला, तसाच आता परमेश्वर देईल का? पूर्वी जसे अनेक लोक मारले गेले तसेच आता परमेश्वर करील का? तो लोकांना मारील का?
8 इस्राएलला दूर पाठवून परमेश्वर हा वाद निकालात काढील. परमेश्वर इस्राएलची निर्भत्सना करील. वाळवंटातील गरम वाऱ्याप्रमाणे त्याचे शब्द जळजळीत असतील.
9 याकोबाच्या अपराधांना क्षमा कशी केली जाईल? काय केले असता त्याची पापे नाहिशी होतील? पुढील गोष्टी घडून येतील: वेदीतील चिऱ्यांचा चुरा केला जाईल. पूजेसाठी घडविलेल्या खोट्या देवांच्या मूर्ती व बांधलेल्या वेदी या सर्व नष्ट केल्या जातील.
10 त्या वेळेला तटबंदी असलेले शहर वाळवंटाप्रमाणे ओसाड होईल. सर्व लोक दूर पळून गेलेले असतील. ते शहर चरायचे कुरण होईल. तेथे वासरे चरतील. गुरे वेलींची पाने खातील.
11 वेली सुकतील, त्यांच्या फांद्या तुटून पडतील आणि, बायका त्या सरपणासाठी वापरतील. लोक समजून घेण्याचे नाकारतात. म्हणून त्यांना घडविणारा देव त्यांची समजूत घालणार नाही. आणि तो त्यांच्यावर दया करणार नाही.
12 त्या वेळेस परमेश्वर त्याच्या लोकांना इतरांपासून वेगळे करील. परमेश्वर युफ्राटिसपासून सुरवात करून मिसरच्या नदीपर्यंतच्या सर्व लोकांना गोळा करील.एक एक करून तुम्ही इस्राएलचे सर्व लोक एकत्र गोळा व्हाल.
13 माझी बरीच माणसे अश्शूरमध्ये गमावली आहेत. माझी काही माणसे मिसरला पळून गेली आहेत. पण त्या वेळी प्रचंड तुतारी फुंकली जाईल आणि ते सर्व लोक यरूशलेमला परत येतील. ते सर्व जण त्या पवित्र डोंगरावरील देवापुढे नमन करतील.
धडा 28

1 शोमरोनकडे पाहा. एफ्राइममधील मद्यप्यांना त्या शहराचा फार गर्व आहे. आजूबाजूला सुपीक दरी असलेल्या टेकडीवर ते शहर वसले आहे. शोमरोनमधील रहिवाशांना आपले शहर फुलांच्या सुंदर मुकुटाप्रमाणे वाटते. पण ते मद्यपान करून धुंद झाले आहेत आणि हा “सुंदर मुकुट” सुकून चालला आहे.
2 पाहा! माझ्या प्रभूकडे एक सशक्त व शूर वीर आहे. तो गारपिटीप्रमाणे व पावसाच्या झडीप्रमाणे येईल. वादळाप्रमाणे किंवा महापुराप्रमाणे तो या देशात येईल आणि हा मुकुट (शोमरोन) धुळीत फेकून देईल.
3 एफ्राइममधील मद्याप्यांना “सुंदर मुकुटाप्रमाणे” असलेल्या त्यांच्या शहराचा अभिमान आहे, पण ते शहर पायाखाली तुडविले जाईल.
4 सभोवती सुपीक दरी असलेल्या टेकडीवर ते शहर वसले आहे. पण तो “सुंदर फुलांचा मुकुट” सुकत चालला आहे. उन्हाळ्यात झाडावर प्रथम आलेल्या अंजिरांप्रमाणे ह्या शहराची स्थिती होईल. जेव्हा माणूस झाडांवर अंजिरे पाहतो तेव्हा तो त्यांपैकी एक तोडतो आणि खाऊन टाकतो.
5 त्या वेळेला, सर्वशक्तिमान परमेश्वर स्वत: “सुंदर फुलांचा मुकुट” होईल. जे काही देवाला अनुसरणारे लोक म्हणजेच देवाचे लोक मागे उरले असतील, त्यांच्याकरिता देव “सुंदर फुलांचा मुकुट” होईल.
6 परमेश्वर, त्याच्या लोकांवर राज्य करणाऱ्या न्यायाधीशांना सद्बुध्दी देईल. वेशीपाशी लढणाऱ्या लोकांना परमेश्वर सामर्थ्य देईल.
7 पण सध्या ते नेते मद्याने धुंद झाले आहेत. याजक व संदेष्टे सर्वच जण द्राक्षरस व मद्य पिऊन धुंद झाले आहेत. ते अडखळून पडतात. संदेष्टे आपली स्वप्ने पाहताना मद्याच्या नशेत असतात. न्यायधीश न्यायनिवाडा करताना मद्याच्या धुंदीत असतात.
8 सर्व मेज ओकारीने भरलेले आहेत. कोठेही स्वच्छ जागा राहिलेली नाही.
9 लोकांना धडा शिकविण्याचा परमेश्वर प्रयत्न करीत आहे. त्याची शिकवण लोकांच्या लक्षात यावी म्हणून तो प्रयत्नशील आहे. पण लोक परवा परवापर्यंत आईचे दूध पिणाऱ्या तान्ह्या मुलांप्रमाणे वागतात;
10 म्हणून परमेश्वर लहान बाळांशी बोलावे तसा त्यांच्याशी बोलतो.एक हुकूम इकडे, एक हूकूम तिकडे; एक नियम इकडे, एक नियम तिकडे, एक धडा इकडे, एक धडा तिकडे.
11 परमेश्वर ह्या लोकांशी वेगळ्याच पध्दतीने बोलेल किंवा त्यांच्याशी वेगळ्याच भाषेचा वापर करील.
12 पूर्वीच्या काळी, देव लोकांना म्हणाला, “येथे विश्रांतीची जागा आहे. ही शांत जागा आहे. थकलेल्यांना येथे येऊन विश्रांती घेऊ द्या. ही शांतीची जागा आहे.”पण लोकांनी देवाचे ऐकले नाही.
13 लोकांना देवाचे बोलणे परक्या भाषेसारखे अनाकलनीय वाटले.एक हुकूम इकडे, एक हुकूम तिकडे, एक नियम इकडे, एक नियम तिकडे, एक धडा इकडे; एक धडा तिकडे.लोकांनी स्वत:ला पाहिजे ते केले. म्हणून ते मागे पडून पराभूत झाले, ते सापळ्यात अडकले आणि पकडले गेले.
14 यरूशलेमच्या नेत्यांनो, तुम्ही परमेश्वराचा संदेश ऐकावा पण सध्या तुम्ही त्याचे ऐकायचे नाकारता.
15 तुम्ही लोक म्हणता, “आम्ही मृत्यूबरोबर करारनामा केला आहे. अधोलोकाशी आम्ही करार केला आहे म्हणून आम्हांला शिक्षा होणार नाही. शिक्षा आमचे काही वाकडे करू शकणार नाही. कारण आम्ही कपट व असत्य याच्यांमागे लपून बसू.”
16 यासाठी परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “सियोनमध्ये मी कोनशिला बसवीन. हा एक अमूल्य दगड असेल. ह्या महत्वाच्या दगडावर सर्व बांधकाम उभारले जाईल. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची निराशा होणार नाही.
17 “भिंतीचा सरळपणा पाहण्यासाठी लोक जसा ओळंबा वापरतात, तसाच योग्य गोष्ट दाखविण्यासाठी मी न्यायबुध्दी व चांगुलपणा ह्यांचा वापर करीन.“तुम्ही पापी, तुमच्या कपटाच्या व असत्याच्या मागे लपण्याचा प्रयत्न करता, पण तुम्हांला शिक्षा होईल. मी वादळाप्रमाणे अथवा पुराप्रमाणे येऊन तुमच्या लपायच्या जागा नष्ट करीन.
18 तुमचा मृत्यूशी असलेला करारनामा पुसला जाईल. अधोलोकाशी तुमचा झालेला करार तुम्हांला उपयोगी पडणार नाही.“कोणीतरी येईल आणि तुम्हाला शिक्षा करील. तुमचा कचरा करून तुम्हाला पायाखाली तुडवील.
19 तो माणूस येऊन तुम्हाला घेऊन जाईल. तुमची शिक्षा भयंकर असेल. ती सकाळी सुरू होईल व रात्री उशिरापर्यंत चालू राहील.
20 “मग तुम्हांला पुढील कथा समजेल. एक माणूस त्याच्या उंचीच्या मानाने खूपच आखूड असलेल्या अंथरूणावर झोपायचा प्रयत्न करत होता. त्याचे पांघरूणसुध्दा त्याला पूर्ण पणे पांघरता येईल इतपत रूंद नव्हते. त्याचे अंथरूण आणि पांघरूण दोन्ही निरूपयोगी होती. अगदी त्याप्रमाणे तुमचे करार निरूपयोगी ठरलेले आहेत.”
21 परासीम डोंगरावरच्या प्रमाणे परमेश्वर लढाई करील. गीबोन दरीत ज्याप्रमाणे तो रागावला होता त्याप्रमाणे तो रागावेल.नंतर परमेश्वर त्याला पाहिजे ते घडवून आणील. तो काही विलक्षण गोष्टी करील, पण तो त्याचे काम तडीस नेईल. परमेश्वराचे कार्य अगाध आहे.
22 आता तुम्ही त्या गोष्टीविरूध्द लढू नका. लढलात तर तुमच्या भोवतीची फास अधिक आवळला जाईल.मी ऐकलेल्या शब्दांत फरक होणार नाही. सर्वशक्तिमान परमेश्वराच्या, पृथ्वीच्या नियंत्याच्या, तोंडचे हे शब्द आहेत म्हणून त्या गोष्टी घडून येतीलच.
23 मी सांगत असलेला संदेश लक्षपूर्वक ऐका.
24 शेतकरी सतत शेत नांगरतो का? नाही. तो सतत मशागत करतो का? नाही.
25 तो जमिनीची मशागत करतो आणि मग पेरणी करतो. तो निरनिराळ्या बियांची पेरणी निरनिराळ्या तऱ्हेने करतो. तो बडिशेप विखरून टाकतो, जिरे शेतात फेकतो तर गहू ओळीत पेरतो. तो सातू विशिष्ट जागेत पेरतो तर शेताच्याकडेला काठ्या गहू पेरतो.
26 तुम्हाला शिकविण्यासाठी आमचा देव उदाहरणे देत आहे. ह्यावरून दिसून येईल की देव विवेकबुध्दीने लोकांना शिक्षा करतो.
27 मोठ्या दातेरी फळीने शेतकरी बडिशेप मळतो का? नाही. मोहरी मळण्यासाठी शेतकरी त्यावरून गाडीचे चाक फिरवितो का? नाही. शेतकरी बडिशेप व मोहरी मळण्यासाठी लहान काठी वापरतो.
28 पाव करताना बाई पीठ मळते पण सारखी सारखी ते तिंबत नाही. परमेश्वर लोकांना शिक्षा करताना असेच करतो. तो गाडीचे चाक अंगावर घालण्याची त्यांना भीती दाखविल पण पूर्णपणे चिरडून टाकणार नाही. तो घोड्यांच्या टापांखाली त्यांना तुडवू देणार नाही.
29 हा धडा सर्वशक्तिमान परमेश्वराने स्वत: दिला आहे. देव चांगलाच सल्ला देतो. तो खरोखरच ज्ञानी आहे.
धडा 29

1 देव म्हणतो, “अरीएलकडे पाहा. तेथे दाविदाने तळ ठोकला होता. त्या शहराची सुटी वर्षानुवर्षे सुरूच आहे.
2 मी अरीएलला शिक्षा केली आहे. त्यामुळे ते शहर दु:ख व शोक यांनी भरून गेले आहे. पण तरीसुध्दा ते माझे अरीएल आहे.
3 अरीएल, मी तुझ्यासभोवती सैनिक ठेवले आहेत. मी तुझ्याविरूध्द मोर्चे बांधले आहेत.
4 तुझा पराभव झाला, तुला जमीनदोस्त केले गेले. आता भुताप्रमाणे जमिनीतून येणारा तुझा आवाज मी ऐकतो. तुझे शब्द, धुळीतून आल्याप्रमाणे येतात.”
5 धुळीच्या कणांप्रमाणे खूप परके येथे आहेत. ते क्रूर लोक, वाऱ्यावर उडणाऱ्या फोलकटाप्रमाणे आहेत.
6 सर्वशक्तिमान परमेश्वराने भूकंप, मेघगर्जना व मोठा गडगडाट यांच्याद्वारे तुला शिक्षा केली. तेव्हा सगळीकडे वादळे, वावटळी व सर्वनाशक आग पसरली होती.
7 अनेक राष्ट्रे अरीएलविरूध्द लढली. ते सर्व रात्रीच्या दु:स्वप्नासारखे होते. सैन्यांनी अरीएलला वेढा घातला आणि शिक्षा केली.
8 पण त्या सैन्यांनाही ते स्वप्नासारखेच वाटेल. त्यांना पाहिजे असलेले मिळणार नाही. उपाशी माणसाला अन्नाबद्दलचे स्वप्न पाहावे तसेच ते असेल. तो जागा झाला तरी त्याची तहान भागलेली नसते.सियोनविरूध्द लढणाऱ्या राष्ट्रांची अशीच स्थिती आहे. त्या राष्ट्रांना जे हवे आहे ते मिळणार नाही.
9 तुम्ही विस्मित व आश्चर्यचकीत व्हा. तुम्ही धुंद व्हाल पण मद्याने नव्हे. तुम्ही झोक जाऊन पडाल पण दारूने नव्हे.
10 परमेश्वर तुम्हाला झोपेची गुंगी आणील. परमेश्वर तुमचे डोळे मिटेल. (संदेष्टे हेच तुमचे डोळे आहेत) परमेश्वर तुमची डोकी झाकील. (संदेष्टे हेच तुमची डोकी आहेत.)
11 हे असे घडेल असे मी तुम्हाला सांगतो पण तुम्हाला माझे म्हणणे कळणार नाही. माझे शब्द, मोहरबंद केलेल्या पुस्तकाप्रमाणे आहेत. तुम्ही असे पुस्तक वाचता येणाऱ्याला देऊन त्याला वाचायला सांगू शकता. पण तो म्हणेल. “मी हे पुस्तक वाचू शकत नाही. ते मोहरबंद आहे. मी ते उघडू शकत नाही.”
12 किंवा तुम्ही असे पुस्तक वाचता न येणाऱ्याला देऊन त्यास ते वाचायला सांगू शकता. तो म्हणेल, “मला वाचता येत नसल्याने मी हे पुस्तक वाचू शकत नाही.”
13 माझा प्रभू म्हणतो, “हे लोक, माझ्यावर त्यांचे प्रेम आहे, असे म्हणतात ते शब्दांनी माझ्याबद्दलचा आदर व्यक्त करतात. पण त्यांची मने माझ्यापासून फार दूर आहेत. त्यांचा माझ्याबद्दलचा आदर, म्हणजे फक्त त्यांनी पाठ केलेले व माणसांनी घालून दिलेले नियम आहेत.
14 म्हणून मी शक्तिशाली व चमत्कारिक गोष्टी करून या लोकांना विस्मित करीत राहीन. त्यांच्यातील सुज्ञ स्वत:तील शहाणपण गमावतील. त्यांना काही समजू शकणार नाही.”
15 ते लोक परमेश्वरापासून काही लपविण्याचा प्रयत्न करतात. ते त्यांची दुष्कृत्ये अंधारात करतात. ते लोक स्वत:शीच म्हणतात, “आम्हांला कोणीही पाहू शकत नाही. आम्ही कोण आहोत हे कोणालाही माहीत नाही.”
16 तुम्ही गोंधळलेले आहात. तुम्हाला वाटते की चिखल व कुंभार सारखेच. तुम्हाला वाटते की एखाद्याने तयार केलेली वस्तूच त्या तयार करणाऱ्याला सांगेल, “तू मला घडवले नाहीस.” असे म्हणणे म्हणजे मातीच्या भांड्याने कुंभाराला “तुला काही समजत नाही” असे सांगण्यासारखेच होय.
17 हे सत्य आहे: काही काळानंतर कर्मेलच्या डोंगरावरील भूमीप्रमाणे लबानोनची भूमी सुपीक होईल आणि कर्मेलच्या भूमीवर घनदाट जंगल माजेल.
18 बहिरा पुस्तकातील शब्द ऐकू शकेल आणि आंधळ अंधारातून आणि धुक्यातून पाहू शकेल.
19 परमेश्वर दरिद्री लोकांना सुखी करील आणि ते लोक इस्राएलच्या पवित्रदेवाबद्दल हर्ष व्यक्त करतील.
20 कोते आणि कंजूष लोक व दुष्कृत्ये करण्यात आनंद मानणारे लोक नाहीसे होतील तेव्हा हे घडून येईल.
21 (हे लोक सज्जनांना खोटे पाडतात. लोकांना न्यायालयात खेचून जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतात. ते भोळ्या लोकांना उध्वस्त करण्याचा यत्न करतात.
22 म्हणून परमेश्वर याकोबच्या वंशजांशी बोलतो. (ह्याच परमेश्वराने अब्राहामला मुक्त केले होते.) परमेश्वर म्हणतो, “याकोब, (इस्राएलमधील लोकांनो,) आता तुम्हाला ओशाळवाणे व लज्जित व्हावे लागणार नाही.
23 तो त्याची सर्व मुले पाहील आणि तो माझ्या नावाला पवित्र म्हणेल. मी ह्या मुलांना स्वत:च्या हाताने घडविले आहे आणि ही मुले म्हणतील की याकोबाचा पवित्र देव हा असामान्य आहे. ही मुले इस्राएलाच्या देवाचा आदर करतील.
24 ह्यातील पुष्कळांना काही कळत नव्हते म्हणून त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या. त्यांना काही समजले नाही पण ते धडा शिकतील.”
धडा 30

1 परमेश्वर म्हणतो, “ह्या मुलांकडे पाहा! ती माझ्या आज्ञा पाळत नाहीत. ते योजना करतात, पण माझी मदत मागत नाहीत. ते इतर लोकांबरोबर मैत्रीचा करार करतात. पण माझ्या आत्म्याला तो नको असतो. हे लोक त्यांच्या पापात आणखी भर घालीत आहेत.
2 ही मुले मिसरकडे मदत मागायला जात आहेत. पण ते जे करीत आहेत, ते योग्य आहे का; असे मला विचारावे, असे त्यांना वाटत नाही. फारो त्यांचा बचाव करील असे त्यांना वाटते. मिसरने त्यांचे रक्षण करावे अशी त्यांची इच्छा आहे.
3 “पण मी सांगतो की मिसरमध्ये लपण्याने तुमचा काही फायदा होणार नाही. मिसर तुमचे रक्षण करू शकणार नाही.
4 तुमचे नेते सोअनला आणि तुमचे राजदूत हानेसला गेले आहेत.
5 पण त्यांची निराशा होईल. त्यांना मदत करू न शकणाऱ्या देशावर ते विसंबले आहेत. मिसर काहीच उपयोगाचा नाही. मिसर काही मदत करणार नाही. उलट तो तुम्हाला लज्जित व ओशाळवाणे करील.”
6 नेगेवमधल्या प्राण्यांविषयी शोक संदेश:नेगेव ही धोकादायक जागा आहे. ही भूमी सिंह, फुरसे व उडणारे साप ह्यांनी व्यापलेली आहे. पण काही लोक नेगेवमधूनच प्रवास करीत आहेत. ते मिसरला जात आहेत. त्यांनी आपली धन संपत्ती गाढवांवर व उटांवर लादली आहे. ह्याचा अर्थ त्यांना मदत न करू शकणाऱ्या राष्ट्रांवर ते विसंबले आहेत.
7 मिसरला काही अर्थ नाही. मिसरच्या मदतीला काही किंमत नाही. म्हणून मी मिसरला ‘स्वस्थ बसणारा रहाब’ असे म्हणतो.
8 आता तू हे पाटीवर लिही म्हणजे सर्व लोकांना ते दिसेल आणि हे तू पुस्तकातही लिही म्हणजे भविष्यात दूर असलेल्या शेवटच्या दिवसांसाठी ते उपयोगी पडेल.
9 पालकांचे न ऐकणाऱ्या मुलांसारखे हे लोक आहेत. ते खोटे बोलतात आणि परमेश्वराच्या शिकवणुकीकडे लक्ष देण्यास नकार देतात.
10 ते संदेष्ट्यांना म्हणतात, “आम्ही काय करावे हे तुम्ही दिव्य दृष्टीने पाहू नका. आम्हाला सत्य सांगू नका. आम्हाला बऱ्यावाटतील, आवडतील अशाच गोष्टी सांगा, आमच्यासाठी फक्त चागंल्याच गोष्टी तुमच्या दिव्य दृष्टीने बघा.
11 खऱ्या घडणाऱ्या गोष्टी बघायचे टाळा. आमच्या रस्त्यातून दूर व्हा. इस्राएलच्या पवित्र देवाबद्दल आमच्याशी बोलू नका.”
12 इस्राएलचा पवित्र देव म्हणतो, “परमेश्वराने दिलेला संदेश तुम्ही स्वीकारायचे नाकारले आहे. तुम्ही लोक जुलूम व कपट यांवर विसंबून राहता.
13 लढाया व खोटेपणा करून तुम्ही अपराध केला आहे म्हणून तडे गेलेल्या उंच भिंतीप्रमाणे तुमची स्थिती होईल ही भिंत पडेल व तिचे तुकडे तुकडे होतील.
14 तुमची स्थिती मातीच्या बरणीप्रमाणे होईल. ही बरणी फुटल्यास तिचा चक्काचूर होतो. हे बारीक तुकडे काही उपयोगाचे नसतात. ह्या तुकड्यांनी तुम्ही विस्तवातले निखारे काढू शकत नाही. किंवा डोहातले पाणी काढू शकत नाही.”
15 परमेश्वर, माझा प्रभू, इस्राएलचा पवित्र देव म्हणतो, “तुम्ही मला शरण आलात, तर तुम्ही वाचाल. शांतता आणि विश्वास हीच तुमची शक्ती आहे.”पण तुम्हाला हेच नको आहे.
16 तुम्ही म्हणता, “नाही! आम्हाला पळून जायला घोडे हवेत.” ते खरेच आहे. तुम्हाला घोड्यांवरून पळून जावे लागेल. पण शत्रू तुमचा पाठलाग करील. शत्रूचा वेग तुमच्यापेक्षा जास्त असेल.
17 शत्रूपक्षातील एकाने धमकी दिल्यास तुमची हजारो माणसे पळून जातील. पाचजणांनी धमकी दिल्यास तुमचे सर्वच लोक पळून जातील. तुमच्या सैन्यातील फक्त एकच गोष्ट शिल्लक राहील. व ती म्हणजे टेकडीवरचा ध्वजस्तंभ.
18 तुमच्यावर दया करण्याची परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वर वाट पाहत आहे. परमेश्वराला प्रकट होऊन तुमचे सांत्वन करायचे आहे. परमेश्वर देव न्यायी आहे. त्याच्या मदतीची इच्छा करणाऱ्या प्रत्येक माणसाला तो आशीर्वाद देईल.
19 यरूशलेमच्या सियोन डोंगरावर परमेश्वराची माणसे राहतील. तुमचा शोक थांबेल तुमचे रडणे परमेश्वर ऐकेल व तुमचे सांत्वन करील. परमेश्वर तुमचे म्हणणे ऐकेल आणि तुम्हाला मदत करील.
20 माझ्या प्रभूने, देवाने, पूर्वी तुम्हाला दु:ख व यातना दिल्या. त्या रोजच्या भाकरीसारख्या व पाण्यासारख्याच होत्या. देव तुमचा शिक्षक आहे आता यापुढे तो तुमच्यापासून लपून शहाणार नाही. तुम्ही त्याला तुमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहाल.
21 नंतर, जर तुम्ही चुकलात आणि चुकीच्या मार्गाने गेलात (डावीकडे वा उजवीकडे) तर तुमच्या मागून आवाज येईल, “हा मार्ग बरोबर आहे. तुम्ही ह्या मार्गाने जावे.”
22 तुमच्या मूर्ती सोन्या-चांदीने मढविलेल्या आहेत. ह्या खोट्या देवांनी तुम्हाला पापांच्या घाणीत लोटले आहे. पण तुम्ही त्यांची पूजा करण्याचे सोडून द्याल. तुम्ही त्या देवांना कचऱ्याप्रमाणे वा विटाळाच्या कपड्यांप्रमाणे फेकून द्याल.
23 त्या वेळेला परमेश्वर पाऊस पाडील. तुम्ही बी पेराल आणि भूमी तुम्हाला अन्न देईल. त्या वेळी पीक मुबलक येईल. तुमच्या गुरांना भरपूर चारा मिळेल. मेंढ्यांना चरायला खूप मोठे रान मिळेल.
24 तुमच्या गुरांना आणि गाढवांना भरपूर आंबोण मिळेल. सगळीकडे अन्नधान्याचा सुकाळ होईल. गुरांपुढे आंबोण पसरण्यासाठी तुम्हाला कुदळफावड्याचा उपयोग करावा लागेल.
25 प्रत्येक डोंगरावरून, प्रत्येक टेकडीवरून पाण्याचे झरे वाहतील. पुष्कळ लोक मारले गेल्यावर आणि बुरूज ढासळल्यावर हे सर्व घडून येईल.
26 त्या वेळी, चंद्राचा प्रकाश सूर्यप्रकाशाप्रमाणे प्रखर होईल आणि सूर्यप्रकाश आतापेक्षा सातपट प्रखर होईल. एकादिवसाचा सूर्यप्रकाशआठवड्यातील सूर्यप्रकांशाइतका असेल. परमेश्वर जेव्हा त्याच्या जखमी लोकांना मलमपट्टी करील आणि माराने झालेल्या त्यांच्या जखमा बऱ्या करील तेव्हा असे घडेल.
27 पाहा! परमेश्वराचे नाव दुरवरून येत आहे, दाट धुराचे ढग पसरविणाऱ्या आगीप्रमाणे त्याचा राग आहे. परमेश्वराचे तोंड रागाने भरले आहे. त्याची जीभ ज्वालेप्रमाणे दिसत आहे.
28 परमेश्वराचा श्वास (आत्मा), पाणी वाढत जाऊन गळ्यापर्यंत पोहोचणाऱ्या एखाद्या मोठ्या नदीप्रमाणे आहे. परमेश्वर राष्ट्रांचा न्याय करील. हा न्याय कसा असेल? तर ‘नाशाच्या चाळणीतून’ राष्ट्रांना चाळून काढल्याप्रमाणे तो असेल. जसे लगाम घालून जनावरांना ताब्यात ठेवले जाते तसे लोकांना लगाम घालून परमेश्वर नियंत्रणात ठेवील.
29 त्या वेळेला तुम्ही आनंदगीते गाल. सुटीच्या दिवसातील रात्रीप्रमाणे हा काळ असेल. परमेश्वराच्या डोंगरावर जाताना तुम्हाला आनंद वाटतो, इस्राएलच्या खडकाकडे जाताना (परमेश्वराच्या उपासनेला जाताना) बासरीचा स्वर ऐकून तुम्हाला हर्ष होतो, तसाच हा आनंद असेल.
30 परमेश्वर आपला प्रचंड आवाज लोकांना ऐकायला भाग पाडील. परमेश्वराचा शक्तिशाली हात रागाने खाली पृथ्वीवर येताना पाहण्यास परमेश्वर लोकांना भाग पाडेल. सर्व जाळून टाकणाऱ्या अग्नीप्रमाणे हा हात असेल. मुसळधार पाऊस व गारपीट करणाऱ्या वादळाप्रमाणे देवाचे सामर्थ्य असेल.
31 परमेश्वराचा आवाज ऐकून अश्शूर घाबरून जाईल. परमेश्वर दंडाने अश्शूरला मारील.
32 डफावर व सारंगीवर संगीत वाजवावे तसे परमेश्वर अश्शूरला मारील. आपल्या हाताने शक्तीने परमेश्वर अश्शूरचा पराभव करील.
33 पूर्वीपासून तोफेत तयार करून ठेवले आहे. ते राजासाठी तयार केले आहे. ते पुष्कळ खोल आणि रूंद केले आहे. त्यात लाकडाचा ढीग आणि विस्तव आहे. परमेश्वराचा श्वास (आत्मा) जळत्या गंधकाच्या प्रवाहाप्रमाणे येऊन ते जाळून टाकील.
धडा 31

1 मदत मागण्यासाठी मिसरमध्ये जाणारे ते लोक पाहा ते घोडे मागतात. घोडे आपला बचाव करतील असे त्यांना वाटते. मिसरमधील रथ आणि घोडेस्वार आपल्याला वाचवतील असा या लोकांचा समज आहे. मिसरचे सैन्य मोठे असल्याने आपण सुरक्षित आहोत असेच त्यांना वाटते. हे लोक इस्राएलच्या पवित्र देवावर विश्वास ठेवत नाही. ते परमेश्वराची मदत मागत नाहीत.
2 पण खरा ज्ञानी परमेश्वर आहे. त्यांच्यावर संकटे आणणारा परमेश्वरच असेल. परमेश्वराची आज्ञा बदलण्याची ताकद लोकांत असणार नाही. पापी लोकांच्याविरूध्द (यहुदाच्याविरूद्द) देव उभा राहील आणि लढेल. ह्या पापी लोकांना मदत करणाऱ्या लोकांविरूध्द म्हणजे मिसरच्या लोकांविरूध्दही देव लढेल.
3 मिसरमधील लोक फक्त माणसे आहेत देव नाहीत. मिसरमधील घोडे फक्त प्राणी आहेत पण आत्मे नाहीत. परमेश्वर स्वत:चा हात लांब करील आणि मदतनीसाचा (मिसरचा) पराभव होईल. त्याची मदत घेणारे लोक (यहुदा) पडतील. त्या सर्व लोकांचा बरोबरच नाश केला जाईल.
4 परमेश्वराने मला सांगितले, “जेव्हा एखादा सिंह किंवा त्याचा छावा, खाण्यासाठी, जनावर पकडतो तेव्हा तो त्या मारलेल्या प्राण्यापाशी उभा राहून डरकाळ्या फोडतो. त्या वेळी कोणीही त्या शक्तिशाली सिंहाला घाबरवू शकत नाही. जरी माणसे आली आणि त्यांनी आरोळ्या ठोकल्या तरी तो सिंह भिणार नाही. लोकांनी कितीही कोलाहल केला तरी तो सिंह पळून जाणार नाही.”ह्याचप्रमाणे सर्वशक्तिमान परमेश्वर खाली उतरून सियोन पर्वतावर येईल. तो तेथे लढेल.
5 पक्षी ज्याप्रमाणे घिरट्या घालून आपल्या घरट्याचे रक्षण करतात, त्याचप्रमाणे सर्वशक्तिमान परमेश्वर यरूशलेमचे रक्षण करील. परमेश्वर तिला वाचवील. परमेश्वर यरूशलेमचे “वरून जाऊन” रक्षण करील.
6 इस्राएलच्या मुलांनो, तुम्ही देवाच्याविरूध्द गेलात. तुम्ही देवाकडे परत यावे.
7 मग, तुम्ही बनविलेल्या सोन्या चांदीच्या मूर्तींची पूजा करणे लोक बंद करतील. त्या मूर्ती तयार करून तुम्ही खरोखरच पाप केले.
8 इस्राएलच्या ईशान्येकडील एकेकाळी शक्तिशाली असलेले हे (अश्शूर) राष्ट्र तलवारीच्या बळावर पराभूत होईल. पण ही तलवार मानवाची नसेल. अश्शूरचा नाश होईल. पण हा नाश मानवाच्या तलवारीने होणार नाही. देवाच्या तलवारीमुळे अश्शूर पळून जाईल. पण त्यातील तरूणांना पकडून गुलाम केले जाईल.
9 त्याच्या संरक्षणाच्या जागा नष्ट केल्या जातील. त्यांचे नेते पराभूत होतील आणि ते त्यांचा ध्वज सोडून देतील म्हणजेच त्यांची सत्ता नाहीशी होईल. परमेश्वराने या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. परमेश्वराची शेकोटी (वेदी) सियोनवर आहे. परमेश्वराची भट्टी (वेदी) यरूशलेममध्ये आहे.
धडा 32

1 मी सांगतो ते ऐका सगळीकडे चांगुलपणा नांदावा अशा तऱ्हेने राजाने राज्य करावे. नेत्यांनी लोकांना मार्गदर्शन करताना न्याय निर्णय घ्यावेत.
2 असे जर झाले तर वारा व पाऊस ह्यापासून बचाव करण्यासाठी जसा अडोसा असतो तसा राजा निवाऱ्याची जागा होईल. वाळवंटातील झऱ्याप्रमाणे अथवा उष्ण प्रदेशातील मोठ्या खडकाखालील सावलीसारखा लोकांना तो वाटेल.
3 लोक मदतीसाठी त्याच्याकडे धाव घेतील व त्याचे म्हणणे ते खरोखरच ऐकतील.
4 आता जे लोक गोंधळलेले आहेत त्यांना त्या वेळी सर्व समजून येईल. आता स्पष्ट बोलू न शकणारे लोक त्या वेळी स्पष्टपणे व लवकर बोलतील.
5 दुष्ट आणि अनीतीमान लोकांना कोणी थोर म्हणणार नाही. जे लोक गुप्त योजना करतात त्यांना लोक मान देणार नाहीत.
6 मूर्ख माणूस मूर्खपणाच्या गोष्टी सांगतो आणि मनात वाईट गोष्टींचे बेत आखतो. त्याला चुकीच्याच गोष्टी करायच्या असतात. तो परमेश्वराबद्दल वाईटसाईट बोलतो. तो भुकेलेल्यांना अन्न खाऊ देत नाही. तहानेलेल्यांना पाणी पिऊ देत नाही.
7 तो मूर्ख दुष्टपणाचा उपयोग हत्यारासारखा करतो. गरीबांना लुबाडण्याच्या योजना तो करतो. तो गरीबांबद्दल खोटेनाटे सांगतो आणि ह्यामुळे गरीब न्यायापासून वंचित होतात.
8 परंतु भला नेता चांगल्या गोष्टींच्या योजना आखतो आणि ह्या चांगल्या गोष्टीच त्याला भला नेता बनवितात.
9 तुम्ही काही स्त्रिया आता शांत आहात. तुम्हाला आता सुरक्षित वाटते आहे. पण तुम्ही जरा उभे राहून माझे म्हणणे ऐकावे.
10 आता तुम्हाला सुरक्षित वाटते पण आणखी एक वर्षाने तुम्ही अडचणीत याल. का? कारण तुम्ही पुढच्या वर्षी द्राक्षे गोळा करू शकणार नाही. पुढच्या वर्षी द्राक्षाचे पीक येणार नाही.
11 स्त्रियांनो, आता तुम्ही शांत आहात पण तुम्हाला भिती वाटली पाहिजे. आता तुम्हाला सुरक्षित वाटते, पण तुम्ही चिंता केली पाहिजे. तुमची चांगली वस्त्रे काढा आणि शोकप्रदर्शक कपडे घाला. ते कपडे तुमच्या कमरेभोवती गुंडाळा.
12 दु:खाने भरलेल्या छातीवर शोकप्रदर्शक कपडे चढवा. रडा! कारण तुमची शेते उजाड झाली आहेत.तुम्हाला द्राक्षे देणारे तुमचे द्राक्षमळे ओस पडले आहेत.
13 माझ्या लोकांच्या भूमीसाठी शोक करा. कारण तेथे फक्त काटेकुटे आणि तण माजतील. एकेकाळी आनंदाने भरलेल्या शहरासाठी व हर्षभरित घरांसाठी आता शोक करा.
14 लोक राजधानी सोडून जातील. राजवाडा व बुरूज रिकामी पडतील. लोक घरांत न राहता गुहेत राहतील. रानगाढवे व मेंढ्या शहरात राहतील. जनावरे गवत खाव्यास तेथे जातील.
15 देव वरून त्याचा आत्मा आम्हांला देईपर्यंत असेच घडत राहील. आता या भूमीवर चांगुलपणा राहिला नाही. ही भूमी जणू वाळवंट झाली आहे. पण भविष्यात, ते वाळवंट कर्मेल प्रमाणे होईल. तेथे योग्य न्याय नांदेल आणि कर्मेल हिरव्यागार रानासारखे होईल. चांगुलपणा तेथे वस्ती करील.
16
17 तो चांगलुपणा कायमची शांती आणि सुरक्षितता आणील.
18 माझे लोक शांतीच्या सुंदर मळ्यात राहतील. माझी माणसे सुरक्षिततेच्या तंबूत राहतील. ते निवांत आणि शांत जागी राहतील.
19 पण ह्या गोष्टी घडण्यापूर्वी जंगल उजाड झालेच पाहिजे, शहराचा पाडाव झाला पाहिजे.
20 तुम्ही काहीजण प्रत्येक झऱ्याकाठी बी पेरा. तुमच्या गुरांना आणि गाढवंाना मोकळे सोडा. व तेथे चरू द्या. तुम्ही लोक खूप सुखी व्हाल.
धडा 33

1 पाहा! तुम्ही युध्द करता आणि दुसऱ्यांच्या वस्तू चोरता. पण त्यांनी तुमचे काहीही चोरले नाही. तुम्ही दुसऱ्यांविरूध्द उठता पण त्यांनी तुमच्याविरूध्द कधीच उठाव केला नाही. म्हणून जेव्हा तुम्ही चोरी करायचे थांबवाल तेव्हा ते तुमच्या वस्तू चोरतील. तुम्ही लोकांविरूध्द उठाव करायचे सोडाल तेव्हा ते तुमच्याविरूध्द उठाव करतील.मग तुम्ही म्हणाल:
2 “परमेश्वरा,” आमच्यावर दया कर. आम्ही तुझ्या मदतीची वाट पाहिली. परमेश्वरा, रोज आम्हाला शक्ती दे. संकटकाळी आमचे रक्षण कर.
3 तुझा प्रचंड आवाज लोकांना घाबरवितो. आणि ते तुझ्यापासून दूर पळतात. तुझी महानता राष्ट्रांना पळून जाण्यास भाग पाडते.”
4 तुम्ही लोकांनी युध्दात वस्तू चोरल्या. त्या तुमच्याकडून परत घेतल्या जातील. खूप लोक येतील आणि तुमची संपत्ती लुटतील. टोळधाड ज्याप्रमाणे सर्व पीक फस्त करते तसे हे होईल.
5 परमेश्वर महान आहे. तो उच्च स्थानी राहातो. परमेश्वर सियोनमध्ये प्रामाणिकपणा व चांगुलपणा भरतो.
6 यरूशलेमा तू श्रीमंत आहेस. देवाच्या शहाणपणात व ज्ञानात तू श्रीमंत आहेत. तू तारणात श्रीमंत आहेस. तू परमेश्वराचा आदर करतो व तेच तुला श्रीमंत करते. म्हणून लक्षात असू दे की तू सतत राहाशील.
7 पण ऐक! बाहेर देवदूत रडत आहेत. शांती आणणारे दूत फार जोराने रडत आहेत.
8 रस्ते नष्ट केले गेले आहेत. रस्त्यावर कोणीही नाही. लोकांनी केलेले करार मोडले आहेत. साक्षीदारांच्या पुराव्यावर विश्वास ठेवायला लोक तयार नाहीत. कोणी कोणाला मान देत नाही.
9 भूमी शोक करीत मरणपंथाला लागली आहे. लबानोन मरत आहे आणि शारोन दरी कोरडी व ओसाड झाली आहे. बाशान व कर्मेल यामध्ये एकेकाळी सुंदर झाडे होती. पण आता त्या झाडांची वाढ खुंटली आहे.
10 परमेश्वर म्हणतो, “आता मी उठून माझी महानता दाखवीन. आता मी लोकांना माझे महत्व पटवीन.
11 तुम्ही लोकांनी निरर्थक गोष्टी केल्यात. त्या गोष्टी वाळलेल्या गवताप्रमाणे वा पेंढ्यातील काडीप्रमाणे आहेत. त्यांची किंमत शून्य आहे. तुमचा आत्माअग्नीप्रमाणे आहे. तो तुम्हाला जाळील.
12 लोकांची हाडे चुन्याप्रमाणेहोईपर्यंत म्हणजेच हाडांचा भुगा होईपर्यंत लोक जाळले जातील. काटे आणि वाळलेली झुडुपे ह्यांच्याप्रमाणे चटकन ते जळतील.
13 “दूर देशांत राहणाऱ्या लोकांनो, मी काय केले ते ऐका. माझ्याजवळ राहणाऱ्या, लोकांनो, माझे सामर्थ्य जाणा.”
14 सियोनमधील पापी घाबरले आहेत. दुष्कृत्ये केलेले भीतीने कांपत आहेत. ते म्हणतात, “ह्या नाश करणाऱ्या अग्नीपासून आपल्याला कोणी वाचवू शकेल का? निरंतर जळणाऱ्या ह्या अग्नीजवळकोणी राहू शकेल का?”
15 हो! पैशासाठी दुसऱ्यांना जे त्रास देत नाहीत असे प्रामाणिक लोक या अग्नीमधूनही वाचतील. ते लोक लाच घेत नाहीत. दुसऱ्याची हत्या करण्याच्या बेताला ते नकार देतात. दुष्कृत्यांच्या योजनांकडे ते पाहण्याचे टाळतात.
16 ते लोक उच्च स्थानावर सुरक्षित राहतील. उंच पर्वतांवरील दुर्ग त्यांचे रक्षण करतील. त्यांना नेहमीच अन्न व पाणी मिळेल.
17 तुम्ही स्वत:च्या डोळ्यांनी राजाला (देवाला) त्याच्या सुंदर रूपात पाहाल. तुम्ही महान भूमी पाहाल.
18 तुम्ही तुमच्या भूतकाळातील संकटांबद्दल विचार कराल. तुम्ही विचार कराल, “ते दुसऱ्या देशातील लोक कोठे ओहेत? ते आम्हाला न समजणारी भाषा बोलत. दुसऱ्या देशातील ते अधिकारी आणि कर गोळा करणारे कोठे आहेत? आमच्या संरक्षक बुरूजांची मोजदाद करणारे हेर कोठे आहेत? ते सर्व नाहीसे झाले.”
19
20 आमच्या धार्मिक सणांच्या नगरीकडे सियोनकडे पाहा, विश्राम करण्याच्या सुंदर जागेकडे, यरूशलेमकडे पाहा. यरूशलेम, कधीही न हालणाऱ्या तंबूसारखी आहे. त्याच्या घट्ट रोवलेल्या मेखा कधीही उखडल्या जाणार नाहीत. त्याच्या दोऱ्या कधीही कापल्या जाणार नाहीत.
21 का? कारण सर्वशक्तिमान परमेश्वर तेथे आहे. त्या भूमीवर झरे व रूंद पात्रांच्या नद्या आहेत. पण तेथे शत्रूंच्या नावा अथवा जहाजे नसतील. त्या नावांवर काम करणारे तुम्ही लोक दोऱ्या सोडतात तसेच काम सोडू शकाल. तुम्ही डोलकाठी पुरेशी घट्ट करू शकणार नाही. तुम्हाला शीड उभारता येणार नाही का? कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. परमेश्वरच आमचे कायदे करतो. परमेश्वर आमचा राजा आहे. तो आमचे रक्षण करतो. म्हणून तो आम्हाला खूप संपत्ती देईल. पंगूनासुध्दा युध्दात खूप धन मिळेल.
22
23
24 येथे राहणारा कोणीही “मी विटलो आहे” असे म्हणणार नाही. ज्यांना क्षमा केली गेली आहे असेच लोक तेथे राहतात.
धडा 34

1 सर्व राष्ट्रांनो, जवळ येऊन ऐका. सर्व लोकांनी कान देऊन ऐकावे. पृथ्वी व तीवर राहणाऱ्या सर्व लोकांनी ह्या गोष्टी ऐकाव्या.
2 परमेश्वर सर्व राष्ट्रांवर व त्यांच्या सैन्यांवर रागावला आहे. परमेश्वर त्या सर्वांचा नाश करील. तो त्या सर्वाना मरायला भाग पाडील.
3 त्यांची प्रेते बाहेर टाकली जातील. त्यातून दुर्गंधी येईल व त्यातील रक्त डोंगरावरून ओघळेल.
4 आकाश कागदाच्या गुंडाळीप्रमाणे गुंडाळले जाईल. द्राक्षाच्यावेलीवर ची सुकलेलीपाने वा सुकलेलीअंजिरे अंजिराच्या झाडावरून गळून पडावीत त्या प्रमाणे तारे गळून पडतील. आकाशातील सर्व तारे वितळून जातील.
5 परमेश्वर म्हणतो, “माझी आकाशातील तलवार रक्ताने माखेल तेव्हा हे सर्व घडेल.” पाहा! परमेश्वराची तलवार अदोमला आरपार कापील. परमेश्वराने तेथील लोकांना अपराधी ठरविले आहे आणि त्यांना मेलेच पाहिजे.
6 बळींच्या रक्ताने परमेश्वराची तलवारमाखली आहे. मेंढ्या आणि बकरे ह्यांच्या रक्तानेभरली आहे. एडक्याच्या मूत्र पिंडाच्या चरबीचे तिला वंगण मिळाले आहे. कारण देवाने बस्रा मध्ये नाशकरण्याची आणि अदोम मध्ये कत्तल करण्याची वेळ निश्चित केली आहे.
7 म्हणून मेंढे, गुरेढोरे व मस्त बैल मारले जातील. त्यांच्या रक्ताने जमीन माखेल. त्यांच्या चरबीने माती झाकली जाईल.
8 देवाने शिक्षेची वेळ ठरवली असल्याने ह्या गोष्टी घडून येतील. लोकांनी सियोनवर केलेल्या अन्यायाची भरपाई करण्याचे वर्ष परमेश्वराने निश्चित केले आहे.
9 अदोमच्या नद्या उकळत्या डांबराप्रमाणे होतील. तेथील भूमी उकळत्या गंधकाप्रमाणे होईल.
10 आग रात्रंदिवस पेटत राहील. कोणीही ती विझविणार नाही. अदोममधून निघणारा धूर कायमचा राहील. ती भूमी कायमची नाश पावेल. कोणीही, त्या भूमीतून, पुन्हा कधीही प्रवास करणार नाही.
11 पक्षी आणि लहान सहान प्राणी तिचा ताबा घेतील. घुबडे आणि डोमकावळे तेथे वस्ती करतील. त्या भूमीला “रिकामे वाळवंट”असे नाव पडेल.
12 प्रतिष्ठित नागरिक आणि नेते नाहीसे होतील. त्यांना राज्य करायला काहीही शिल्लक राहणार नाही.
13 तेथल्या सुंदर घरांतून काटेकुटे आणि रानटी झुडुपे वाढतील. त्या घरांतून जंगली कुत्रे व घुबडे राहतील. जंगली प्राणी तेथे वस्ती करतील. तेथे वाढलेल्या गवतात मोठमोठे पक्षी घरटी बांधतील.
14 रानमांजरे तरसांबरोबर तेथे राहतील. रानबोकड आपल्या मित्रांना हाका मारतील. निशाचरांना विश्रांतीचे ठिकाण मिळेल.
15 साप तेथे वारूळे करतील आणि अंडी घालतील. अंडी फुटून छोटे छोटे साप त्या अंधाऱ्या जागेत वळवळतील. स्त्रिया जशा घोळक्याने आपल्या मैत्रिणींना भेटायला जातात, तशीच गिधाडे मेलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यास गोळा होतील.
16 परमेश्वराच्या पाटीकडे पाहा. त्यावर लिहिलेले वाचा त्यातून काहीही सुटलेले नाही. ते प्राणी सर्वएकत्र येतील असेच त्यावर लिहिले आहे. ‘मी त्यांना एकत्र आणीन. असे देव म्हणाला म्हणून देवाचा आत्मा त्यांना एकत्र करील.
17 त्यांचे काय करायचे ते देवाने ठरविले, नंतर देवाने त्यांच्यासाठी जागा निवडली. देवाने रेघ काढून त्यांना त्यांची जागा दाखविली. ते प्राणी ती जागा कायमची व्यापतील. वर्षांनुवर्षे ते तेथे राहतील.
धडा 35

1 शुष्क वाळवंट सुखी होईल. वाळवंट आनंदी होईल आणि फुलासारखे फुलेल.
2 वाळवंट फुलणाऱ्या फुलांनी भरून जाईल आणि आपला आनंद दाखवेल. त्या वेळी वाळवंट जणू आनंदाने नाचत असल्याचे भासेल. लेबानोनचे बन, कर्मेलची टेकडी व शारोनची दरी ह्यांच्याप्रमाणे ते सुंदर होईल. सर्व लोकांनी परमेश्वराचे गौरव पाहिल्यामुळे हे सर्व घडेल. लोक आमच्या देवाचे लावण्य पाहतील.
3 दुर्बल हात बळकट करा. दुर्बळ पाय घट्ट करा.
4 लोक घाबरले व गोंधळले आहेत. त्यांना सांगा, “सामर्थ्यवान व्हा. भीऊ नका.” तुमचा देव येऊन तुमच्या शत्रूला शिक्षा करील. तो येईल आणि तुमच्या वर कृपा करील. परमेश्वर तुमचे रक्षण करील.
5 मग आंधळे पुन्हा डोळस होतील. त्यांचे डोळे उघडतील. बाहिरे ऐकू शकतील. त्यांना श्रवणशक्ती मिळेल.
6 पंगु हरणांप्रमाणे नाचतील. मुके आनंदगीते गाऊ लागतील. वाळवंटात झरे वाहू लागतील, तेव्हा असे होईल. कोरड्या जमिनीतून झरे वाहतील.
7 आता लोक मृगजळे पाहतात. पण त्या वेळेला खऱ्या पाण्याची तळी दिसतील. कोरड्या जमिनीत विहिरी खोदलेल्या असतील. जमिनीतून पाणी वाहील. जेथे एकेकाळी जंगली जनावरे वावरले, तेथे मोठ्या पाणवनस्पती वाढतील.
8 त्या वेळेला तेथे रस्ता असेल. ह्या महामार्गाला “पवित्र मार्ग” असे नाव मिळेल. पापी लोकांना त्या रस्त्यावरून जाण्यास परवानगी नसेल. कोणीही मूर्ख त्या मार्गाकडे जाणार नाही. फक्त सज्जन माणसेच त्या मार्गावरून चालतील.
9 त्या मार्गावर कोणताही धोका असणार नाही. तेथे लोकांना मारणारे सिंह नसतील, हिंस्त्र श्वापदे नसतील. देवाने रक्षिलेले त्या मार्गावरून चालतील.
10 देव त्याच्या लोकांना मुक्त करील आणि ते लोक त्याला शरण येतील. सियोनमध्ये येताना लोक गात येतील. त्यांना कायमचा आनंद मिळेल. तो आनंद त्यांच्या डोक्यावरील मुकुटाप्रमाणे असेल. ते आनंदाने व हर्षांने भारून जातील. दु:ख आणि शोक दूर सरेल.
धडा 36

1 हिज्कीया यहुदाचा राजा होता. सन्हेरीब अश्शूरचा राजा होता. हिज्कीयाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी सन्हेरीबने यहुदाच्या तटबंदी असलेल्या नगरांविरूध्द उठाव केला आणि त्यांचा पाडाव केला.
2 सन्हेरीबने आपल्या सेनापतीला यरूशलेमवर स्वारी करण्यासाठी पाठविले. सेनापती लाखीशहून निघाला आणि यरूशलेममध्ये हिज्कीया राजाकडे गेला. त्याने आपले शक्तिशाली सैन्य बरोबर घेतले होते. परटाच्या शेताजवळच्या रस्त्याकडे ते गेले हा रस्ता वरच्या डोहातून पाणी वाहून आणणाऱ्या चराजवळ होता.
3 यरूशलेममधील तिघेजण सेनापतीशी बोलणी करण्याकरिता गेले. हिज्कीयाचा मुलगा एल्याकीम, आसाफचा मुलगा यवाह आणि शेबना हे ते तिघे होत. ह्यातील एल्याकीम हा राजाचा कारभारी होता. यवाह हा राजाच्या कारकिर्दीची नोंद ठेवणारा होता. तर शेबना राजाचा चिटणीस होता.
4 सेनापती त्या तिघांना म्हणाला, “तुम्ही जाऊन हिज्कीया राजाला अश्शूरचा महान राजा काय सांगतो ते सांगा.सम्राटाचे म्हणजेच अश्शूरच्या राजाचा असा प्रश्र्न आहे की, तुला मदत मिळावी म्हणून तू कशावर पूर्णपणे विश्वास ठेवतोस?
5 सामर्थ्याच्या व चातुर्याच्या योजना ह्यावर तू विश्वास ठेवत असशील तर ते सगळे पोकळ आहे हे मीच तुला सांगतो. मग तू माझ्याविरूध्द का लढत आहेस? आता मी तुला असे विचारतो की तू तुझ्या मदतीसाठी कोणावर विश्वास ठेवतोस?
6 तू त्यासाठी मिसरवर विसंबतोस का? पण मिसर पिचलेल्या काठीसारखा आहे. तू त्याच्यावर आधारासाठी टेकलास तर तुला फक्त इजा होईल आणि तुझ्या हाताला जखम होईल. मिसरवर मदतीसाठी अवलंबून असलेले कोणीही मिसरचा राजा फारो याच्यावर भरवसा ठेवू शकत नाही.”
7 तू कदाचित् म्हणशील” आम्हाला मदत मिळावी म्हणून मी परमेश्वर, आमचा देव, ह्यावर पूर्णपणे विश्वास टाकतो.” पण मी सांगतो की हिज्कीयाने देवाच्या वेद्या व पूजेसाठी असलेली उच्चासने ह्यांचा नाश केला. हे खरे आहे हो ना? आणि हे ही खरे आहे की हिज्कीयाने यहुदाला आणि यरूशलेमला सांगितले “तुम्ही यरूशलेममध्ये असलेल्या वेदीचीच फक्त पूजा करा.”
8 तुम्हाला अजूनही आमच्याशी लढायचे असेल तर माझा प्रभु, अश्शूरचा राजा, तुमच्याबरोबर एक करार करील. तो असा तुमच्याकडे दोन हजार घोड्यांवर स्वार होऊन लढण्यास पुरेसे घोडेस्वार असतील तर मी तुम्हाला दोन हजार घोडे देईन.
9 पण एवढे केले तरी तुम्ही आमच्या राजाच्या एका गुलामालासुध्दा हरवू शकणार नाही. त्याच्या सर्वांत खालच्या पातळीवर असलेल्या अधिकाऱ्याचाही पराभव करू शकणार नाही. मग तुम्ही मिसरच्या घोड्यांवर व रथांवर का अवलंबून राहता?
10 शिवाय हेही लक्षात ठेवा की मी या देशात येऊन लढलो तेव्हा परमेश्वर माझ्याच बाजूला होता. मी शहरांचा नाश केला तेव्हा परमेश्वर माझ्याच पाठीशी होता. परमेश्वरानेच मला सांगितले, “ऊठ ह्या देशात जा आणि त्याचा नाश कर.”
11 एल्याकीम, शेबना व यवाह ह्या यरूशलेममधल्या तिघांनी सेनापतीला सांगितले, “कृपया आमच्याशी अरामी भाषेत बोला. आमच्या यहुदी भाषेत बोलू नका. तुम्ही यहुदी भाषेत बोललात तर कोटावरील लोकांना तुमचे बोलणे समजेल.”
12 पण सेनापती म्हणाला “माझ्या स्वामीने, मला, ह्या गोष्टी, फक्त तुम्हाला किंवा तुमच्या हिज्कीया राजालाच सांगण्यासाठी पाठविलेले नाही. कोटाच्या भिंतींवर बसलेल्या लोकांनाही हे सांगण्यासाठी मला माझ्या राजाने पाठविले आहे. त्या लोकांनाही पुरेसे अन्न वा पाणी मिळणार नाही. त्यांनाही तुमच्याप्रमाणेच स्वत:ची विष्ठा खावी लागेल व स्वत:चे मूत्र प्यावे लागेल.”
13 नंतर सेनापती उभा राहिला व खूप मोठ्या आवाजात यहुदी भाषेत बोलला.
14 सेनापती म्हणाला, “सम्राटाचे म्हणजे अश्शूरच्या राजाचे म्हणणे ऐका:हिज्कीयाकडून तुम्ही फसवले जाऊ नका. तो तुमचे रक्षण करू शकणार नाही.
15 ‘परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वर तुमचे रक्षण करील. परमेश्वर अश्शूरच्या राजाकडून शहराचा पराभव होऊ देणार नाही.’ असे हिज्कीया म्हणेल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवू नका.
16 हिज्कीयाचे हे म्हणणे ऐकू नका. अश्शूरच्या राजाचे म्हणणे ऐका. अश्शूरचा राजा म्हणतो, “आपण एक करार करू तुम्ही शहराबाहेर माझ्याकडे यावे. नंतर प्रत्येकाला घरी जाण्यास मोकळीक मिळेल. प्रत्येकाला आपापल्या द्राक्षवेलींची द्राक्षे व आपापल्या अंजिराच्या झाडाची अंजिरे खाण्यास मुभा मिळे. प्रत्येकाला स्वत:च्या विहिरीचे पाणी पिता येईल.
17 मी परत येऊन तुमच्यातील प्रत्येकाला स्वदेशच वाटावा अशा देशात घेऊन जाईपर्यंत तुम्हाला असे राहता येईल. त्या नव्या देशात तुम्हाला चांगले अन्नधान्य व नवे मद्य मिळेल. त्या देशात अन्नधान्य व द्राक्षमळे असतील.”
18 हिज्कीयाकडून फसवले जाऊ नका. तो म्हणतो, “परमेश्वर आपल्याला वाचवील.” पण मी तुम्हाला विचारतो की कोठल्या राष्ट्रतील देवाने आपल्या राष्ट्रातील लोकांना अश्शूरच्या सामर्थ्यापासून वाचाविले आहे? कोणीही नाही. आम्ही त्या प्रत्येकाला पराभूत केले.
19 हमाथ आणि अर्पाद यांचे देव कोठे आहेत? ते हरले आहेत. सफखाईमचे देव कोठे आहेत? तेही हरले. आहेत शोमरोनच्या देवांनी तेथील लोकांना माझ्या सामर्थ्यापसून वाचविले का? नाही.
20 माझ्या सामर्थ्यापासून एखाद्या राष्ट्रातील लोकांना वाचविले आहे अशा एका तरी देवाचे नाव मला सांगा. मी त्या सर्वांचा पराभव केला. म्हणूनच म्हणतो की परमेश्वर माझ्या सामर्थ्यापासून यरूशलेमला वाचवू शकणार नाही.”
21 यरूशलेममधील लोक अगदी शांत होते त्यांनी सेनापतीला उत्तर दिले नाही. “सेनापतीला उत्तर देऊ नका” असा हुकूम हिज्कीयाने त्यांना दिला होता.
22 नंतर राजाचा कारभारी (हिज्कीयाचा मुलगा एल्याकीम) राजाचा चिटणीस (शेबना) व राजाच्या कारकिर्दीची नोंद ठेवणारा (आसाफचा मुलगा यवाह) ह्यांनी आपले कपडे फाडले, (ह्याचा अर्थ त्यांना फार दु:ख झाले होते.) ते तिघे हिज्कीयाकडे गेले व त्यांनी सेनापतीचे सर्व म्हणणे त्याला सांगितले.
धडा 37

1 हिज्कीयाने सेनापतीचा निरोप ऐकला. निरोप ऐकताच त्याने आपले कपडे फाडले. नंतर त्याने शोकप्रदर्शक कपडे घातले व तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.
2 हिज्कीयाने कारभारी (एल्याकीम) चिटणीस (शेबना) आणि याजकातील वडिलधारी मंडळी (नेते) ह्यांना अमोजचा मुलगा यशया या प्रेषिताकडे पाठविले. त्या सगळ्यांनी खास शोकप्रदर्शक कपडे घातले.
3 ते तिघे यशयाला म्हणाले, “आजचा दिवस विशेष शोकाचा व दु:खाचा समजावा असा हिज्कीया राजाने हुकूम दिला आहे. हा दिवस फार दु:खाचा असेल. कळा सुरू व्हाव्यात पण प्रसूती होऊ नये तसा हा दिवस असेल.
4 सेनापतीने सांगितलेल्या गोष्टी, परमेश्वर तुमचा देव कदचित् ऐकेल. अश्शूरच्या राजाने प्रत्यक्षातील देवाबद्दल वाईटसाईट बोलण्यास आपल्या सेनापतीला पाठविले आणि परमेश्वराने, तुमच्या देवाने. ती निंदा ऐकली. इस्राएलमध्ये राहिलेल्या थोड्या लोकांसाठी प्रार्थना करा.”
5 हिज्कीयाचे नोकर यशयाकडे गेले. यशया त्यांना म्हाणाला, “तुझ्या धन्याला पुढील गोष्टी सांग : परमेश्वर म्हणतो, ‘तुम्ही सेनापतीकडून जे ऐकले त्याने घाबरून जाऊ नका. माझ्याबद्दल अश्शूरची “मुले” जे वाईट बोलत आहेत त्यावर विश्वास ठेवू नका.
6
7 पाहा! मी माझा आत्मा अश्शूरविरूध्द पाठवीन. अश्शूरच्या राजाला, त्याच्या देशाला असलेल्या धोक्याच्या सुचनेचा वृत्तांत समजेल मग तो त्याच्या देशाला परत जाईल. त्या वेळी त्याच्याच देशात मी त्याला तलवारीने मारीन.”‘
8 अश्शूरच्या राजाला एक वृत्तांत कळला तो वृत्तांत असा होता: “कूशचा राजा तिऱ्हाका तुमच्यावर स्वारी करण्यास येत आहे.” म्हणून अश्शूरच्या राजाने लाखीश सोडले व तो लिब्नाला गेला. सेनापतीने हे ऐकले व तो राजा लढत होता तेथे म्हणजे लिब्नाला गेला नंतर सेनापतीने हिज्कीयाकडे दूत पाठविले. सेनापती म्हणाला,
9
10 “तुम्ही पुढील गोष्टी यहुदाचा राजा हिज्कीया याला सांगाव्या: तू ज्या देवावर विश्वास ठेवतोस त्याच्याकडून फसू नको.‘देव अश्शूरच्या राजाकडून यरूशलेमचा पराभव होऊ देणार नाही.”‘ असे म्हणू नको.
11 ऐक! तू अश्शूरच्या राजांबद्दल ऐकले आहेस. अश्शूरच्या सैन्याने प्रत्येक देशाचा पराभव केला आहे. अश्शूरचा राजा तुझा पराभव करून तुला ठार मारील.
12 त्या सर्व पराभूत झालेल्या लोकांना त्यांच्या देवांनी वाचविले का? नाही माझ्या पूर्वजांनी त्यांचा नाश केला. माझ्या सैन्याने गोजान, हारान, रेसफ व तलस्सारातील एदेनमध्ये राहणाऱ्या लोकांचा पराभव केला.
13 हमाथ आणि अर्पाद येथील राजे कोठे आहेत? सफखाईमचा राजा कोठे आहे? हेनाचा व इव्वाचा राजा कोठे आहे? ते सर्व संपले नाश पावले.
14 हिज्कीयाने दूतांकडून संदेश घेऊन वाचला. नंतर हिज्कीया परमेश्वराच्या मंदिरात गेला. हिज्कीयाने तो संदेश उघडून परमेश्वरापुढे ठेवला.
15 तो परमेश्वराची प्रार्थना करू लागला. तो म्हणाला:
16 सर्वशक्तिमान परमेश्वरा, इस्राएलच्या देवा, करूब देवदूतांचा राजा म्हणून तू सिंहासनी बसतोस. देवा, तुझी आणि तुझीच सत्ता पृथ्वीवरील सर्व राज्यांवर चालते. तूच स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केलीस.
17 परमेश्वरा माझे म्हणणे ऐक डोळे उघड आणि सन्हेरिबकडून आलेला संदेश पाहा. सन्हेरिबने मला हा संदेश पाठविला, त्यात जिवंत देवाची म्हणजेच तुझी निंदानालस्ती केली आहे.
18 परमेश्वरा, अश्शूरच्या राजाने खरोखरीच सर्व देश व त्यांची भूमी यांचा नाश केला आहे.
19 त्याने त्या देशांतील देव जाळले आहेत पण ते देव खरे नव्हते. माणसाने घडविलेले ते पुतळे होते. ते फक्त लाकूड व दगडच होते. म्हणून ते हरवले व नष्ट झाले.
20 पण तू परमेश्वर आमचा देव आहेस म्हणून अश्शूरच्या राजाच्या बळापासून आम्हाला वाचव. म्हणजे सर्व देशांना कळेल की परमेश्वरच फक्त खरा देव आहेस.
21 नंतर आमोजचा मुलगा यशया याने हिज्कीयाला निरोप पाठविला. यशया म्हणाला, “इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो. ‘तू परमेश्वराची, इस्राएलच्या देवाची, प्रार्थना केलीस. सन्हेरिबकडून आलेल्या निरोपासाठी ती प्रार्थना होती. मी ती प्रार्थना ऐकली आहे.’
22 “सन्हेरिब बाबत परमेश्वराचा संदेश असा आहे:‘अश्शूरच्या राजा, सियोनची वधू (यरूशलेम) तुला महत्व देत नाही. ती तुला हसते. यरूशलेमची कुमारी मुलगी, तुझी टर उडविते.
23 अश्शूरच्या राजा, तू माझी निंदा केलीस. तू माझी चेष्टा केलीस. मी कोण आहे हे तुला माहीत आहे का? पापण्या उंचावून स्वर्गाकडे पाहा. मग तुला दिसेल की इस्राएलच्या पवित्र देवाची तू निंदा केली आहेस.
24 परमेश्वर, माझ्या प्रभुविरूध्द बोलण्यासाठी तू तुझ्या नोकरांचा उपयोग केलास. तू म्हणालास, “मी फार सामर्थ्यवान आहे माझ्याजवळ पुष्कळ रथ आहेत माझ्या बळावर मी लबानोनला हरविले. मी तेथील उंच डोंगरावर चढलो. मी तेथील सर्व उंच झाडे (सैन्ये) तोडली, मी तेथील उंच डोंगरावर व घनदाट जंगलात जाऊन आलो.
25 मी विहिरी खणल्या व नवीन ठिकाणी पाणी प्यायलो. मी मिसरच्या नद्या सुकवल्या व त्या प्रदेशावरून चालत गेलो.”
26 “पण देव म्हणतो, “अश्शूरच्या राजा, मी, देवाने फार पूर्वीच हे केले आहे हे तू ऐकलेच असशील. फार वर्षापूर्वी मी अश्शूरला निर्मिले, मीच तुला येथवर आणले. मीच तुला त्या शहरांचा नाश करण्याची परवानगी दिली. माझे काम करून घेण्यासाठी आणि त्या शहरांना दगडधोड्यांच्या राशीत बदलण्यासाठी मी तुझा उपयोग केला.
27 त्या शहरात राहणारे लोक दुबळे होते. ते घाबरलेले व खजील झालेले होते. शेतात वाढणाऱ्या तणाप्रमाणे ते लोक होते. घराच्या छपरावर उगवणाऱ्या गवतासारखे ते होते. ते उंच होण्यापूर्वीच वाळवंटातील गरम झळांनी जळून जाते.
28 मी तुझ्या सैन्याबद्दल व तुझ्या लढायांबद्दल सर्व जाणतो. तू कधी विश्रांती घेतलीस, कधी युध्दावर गेलास व युध्दावरून घरी कधी परतलास हे सर्व मला माहीत आहे. तू माझ्यावर रागावला आहेस, हे ही मला ठाऊक आहे.
29 तू माझ्यावर रागावला आहेस व माझी निंदा केली आहेस. तुझे बोलणे मी ऐकले. म्हणून मी तुला शिक्षा करीन. मी तुझ्या नाकात वेसण घालीन. तुला लगाम घालीन आणि तू ज्या रस्त्याने माझ्या देशात आलास, त्याच रस्त्याने मी तुला माझ्या देशातून हाकलून देईन.”
30 नंतर परमेश्वर हिज्कीयाला म्हणाला, “हिज्कीया, माझे हे बोलणे खरे आहे हे दाखविण्यासाठी मी तुला खूण देईन. ह्या वर्षी धान्य पेरले जाणार नाही. म्हणून या वर्षी तुम्हाला मागच्या वर्षांच्या पिकातील जुनं धान्य खावे लागेल. पण तीन वर्षांत तुम्ही पेरलेले धान्य खाल. तुम्ही पिकाची कापणी कराल आणि तुमच्याजवळ खाणे मुबलक असेल तुम्ही द्राक्षांची लागवड कराल आणि द्राक्षे खाल.
31 “यहुदाच्या वंशातील काही लोक वाचले त्या थोड्या लोकांचे खूप मोठे राष्ट्र होईल. मुळे खोलवर रूजून भक्कम वाढणाऱ्या झाडांप्रमाणे ते लोक असतील मुळे खोल रूजलेल्या झाडांना खूप फळे लागतात. त्याचप्रमाणे ह्या लोकांना पुष्कळ संतती होईल.
32 जिवंत राहिलेले थोडे लोक यरूशलेममधून येतील सियोनच्या डोंगरावरून वाचलेले येतील.” सर्वशक्तिमान परमेश्वराच्या तीव्र प्रेमामुळे हे होईल.
33 म्हणून अश्शूरच्या राजाला परमेश्वराचा संदेश असा आहे.“तो ह्या शहरात प्रवेश करणार नाही, तो ह्या शहराच्या दिशेने एकसुध्दा बाण मारणार नाही. तो ढाली घेऊन ह्या शहराशी लढण्यास पुढे सरसावणार नाही. तो वेशीच्या भिंतीला उतरंड बांधणार नाही.
34 तो आला त्याच रस्त्याने स्वत:च्या देशाला परत जाईल. तो ह्या शहरात प्रवेश करणार नाही, हा परमेश्वराने दिलेला संदेश होता.
35 देव म्हणतो:मी ह्या शहराचे रक्षण करीन. आणि त्याला वाचवीन. मी हे माझ्यासाठी आणि माझा सेवक दाविदासाठी करीन.”
36 मग परमेश्वराच्या दूताने जाऊन अश्शूरच्या तळावरील
18 5,000 माणसांना ठार मारले. सकाळी उठून लोक पाहतात तो त्यांच्या सभोवती प्रेते पडलेली.
37 मग अश्शूरचा राजा, सन्हेरिब निनवेला परत गेला आणि तेथेच राहिला.
38 एके दिवशी, सन्हेरीब त्याच्या निस्त्रोख देवाच्या देवळात पूजा करीत असताना, त्याच्या दोन मुलांनी, अद्रम्मेलेक व शरेसर यांनी, त्यास तलवारीने ठार मारले. मग ते अराराटला पळून गेले. म्हणून सन्हेरीबचा मुलगा एसर-हद्दोन अश्शूरचा राजा झाला.
धडा 38

1 ह्या वेळेस, हिज्कीया फार आजारी पडला. जवळ जवळ तो मेलाच होता. अमोजचा मुलगा यशया हा संदेष्टा त्याला भेटायला गेला.यशया राजाला म्हणाला, “परमेश्वराने मला तुला सांगायला सांगितले आहे ‘तू लवकरच मरशील, म्हणून तू गेल्यावर तुझ्या घरातील लोकांनी काय करावे हे तू त्यांना सांगावेस. तू ह्या आजारातून उठणार नाहीस.”‘
2 हिज्कीया मंदिराच्या दिशेला वळला आणि त्याने प्रार्थना करण्यास सुरवात केली. तो म्हणाला,
3 “परमेश्वरा, मी नेहमीच शुध्द मनाने आणि प्रामाणिकपणाने तुझ्यासमोरच जगलो, हे कृपया लक्षात असू दे. मी तू सांगितलेल्या चांगल्या गोष्टीच नेहमी केल्या.” मग हिज्कीया कळवळून रडू लागला.
4 यशयाला परमेश्वराकडून संदेश मिळाला,
5 “हिज्कीयाकडे जाऊन त्याला सांग परमेश्वर, तुझ्या पूर्वजाचा, दाविदाचा, देव म्हणतो, ‘मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे दु:खाश्रू पाहिले, मी तुझ्या आयुष्यात पंधरा वर्षे वाढवीन.
6 मी अश्शूराच्या राजापासून तुझा व ह्या शहराचा बचाव करीन.”‘22पण हिज्कीयाने यशयाला विचारले, “मी बरा होईन ह्याची खात्री पटण्यासाठी परमेश्वराचा संकेत काय असेल? मी परमेश्वराच्या मंदिरात जाण्यायोग्य होईन हे कसे ओळखायचे?”
7 परमेश्वर जे म्हणतो ते करतो हे दाखविण्याची ही खूण असेल. “सूर्यास्तानंतर सूर्य क्षितिजाखाली गेल्यामुळे आहाजच्या पायऱ्यांवर पडणारी सावली मी दहा पावले मागे आणीन. सूर्यास्त होताच सूर्याची सावली दहा पावले मागे जाईल.”21मग यशया हिज्कीयाला म्हणाला, “अंजिरे वाटून तू तुझ्या दुखऱ्या भागावर लाव. मग तू बरा होशील.”
8
9 आजारातून उठल्यावर हिज्कीयाने लिहिलेले हे पत्र:
10 मी म्हातारा होईपर्यंत जगावे असे मीच स्वत:शी म्हटले होते. पण अधोलोकाच्या दारातून जाण्याची माझी वेळ आली, आता मला सर्व काळ तेथेच काढावा लागेल असे मला वाटते.
11 म्हणून मी म्हणालो, “मी याह परमेश्वराला जिवंतांच्या भूमीवर यापुढे कधी पाहणार नाही. मी पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना पाहणार नाही.
12 माझे घर, माझा मेंढपाळाचा तंबू जमीनदोस्त केला जात आहे आणि माझ्यापासून हिसकावून घेतला गेला. जसे मागावरचे कापड कापून त्याची गुंडाळी केली जाते, तसा मी संपलो आहे. तू माझे आयुष्य अल्प काळातच संपविलेस.
13 सबंध रात्रभर मी सिंहगर्जनेप्रमाणे मोठमोठयाने रडलो. सिंहाने हाडेसुध्दा खाऊन नष्ट करावीत तशा माझ्या आशा नष्ट झाल्या. तू माझे आयुष्य फार लवकर संपविलेस.
14 मी कबुतराप्रमाणे घुमलो, पक्ष्याप्रमाणे कलकललो, माझे डोळे थकले, तरीही मी स्वर्गाकडे बघत राहिलो. माझ्या प्रभू, मी खूप निराश झालो आहे. मला मदत करशील असे वचन दे.”
15 मी काय बोलू? माझ्या प्रभूने काय घडणार ते मला सांगितले. आणि माझा प्रभूच ते घडवून आणील माझ्या मनाला खूप क्लेश झाले म्हणून आता माझ्या सगळ्या आयुष्यात मी नम्र होईन.
16 माझ्या प्रभू, या कठीण काळाचा उपयोग माझ्यात परत आत्मा आणण्यासाठी कर. मला शुध्द व निरोगी व्हायला मदत कर. मला परत जिवंत कर.
17 पाहा! माझ्या अडचणी संपल्या. मला आता शांतता मिळाली आहे. तू माझ्यावर खूप प्रेम करतोस. तू मला थडग्यात सडू दिले नाहीस तू माझे अपराध पोटात घातलेस. (मला क्षमा केलीस) माझी पापे दूर फेकलीस.
18 मृत तुझी स्तुतिस्तोत्रे गात नाहीत. अधोलोकातील लोक तुझे स्तवन करीत नाहीत. मृत तुझ्या मदतीची आशा करीत नाहीत. ते जमिनीतील खड्ड्यात जातात आणि परत कधीही बोलत नाहीत.
19 माझ्याप्रमाणे जिवंत असणारी माणसे तुझी स्तुती करतात. म्हणून वडिलांनी मुलांना तुझ्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही असे सांगावे.
20 मी म्हणतो, “परमेश्वराने माझे रक्षण केले. म्हणून आम्ही आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात गाऊ व वाद्य वाजवू.”
21
22
धडा 39

1 त्या वेळेला, बलदानचा मुलगा मरोदख बलदान बाबेलचा राजा होता. मरोदखने हिज्कीयाच्या आजारपणाबद्दल आणि त्याच्या बरे होण्याविषयी ऐकले, म्हणून त्याने हिज्कीयाला पत्रे व भेटी पाठविल्या.
2 ह्या भेटींमुळे हिज्कीयाला आनंद झाला. म्हणून त्याने आपल्या राज्यातील अगदी खास अशा गोष्टी मरोदखच्या माणसांना पाहू दिल्या. हिज्कीयाने आपली संपत्ती त्यांना दाखविली. त्यात चांदी, सोने, अमूल्य तेले आणि अत्तरे होती. युध्दात वापरलेल्या तलवारी आणि ढालीही हिज्कीयाने त्यांना दाखविल्या. त्याने जमविलेल्या सर्व वस्तू मरोदखच्या माणसांना दाखविल्या. त्याने आपल्या घरातील व राज्यातील सर्व काही दाखविले.
3 संदेष्टा यशया, हिज्कीया राजाकडे गेला आणि त्याने विचारले, “ही माणसे काय म्हणत होती? ती कोठून आली होती?” हिज्कीया उत्तरला, “ती फार दूरच्या देशातून माझ्याकडे आली होती. ती बाबेलमधून आली होती.”
4 मग यशयाने विचारले, “तुझ्या राज्यात त्यांनी काय काय पाहिले?”हिज्कीया उत्तरला, “माझ्या राजवाड्यातील प्रत्येक गोष्ट त्यांनी पाहिली. माझी सर्व संपत्ती मी त्यांना दाखविली.”
5 यशया हिज्कीयाला म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वराचे म्हणणे ऐक.
6 “भविष्यात, तुझ्या पूर्वजांनी आणि तू आतापर्यंत जे जमविले आहे ते सर्व लुटले जाईल आणि बाबेलला नेले जाईल.’ सर्वशक्तिमान परमेश्वराने हे सांगितले.
7 तू ज्यांना जन्म देशील त्या तुझ्या मुलांना बाबेलचा राजा घेऊन जाईल. बाबेलच्या राजवाड्यात तुझी मुले नोकर म्हणून राहतील.”
8 हिज्कीया यशयाला म्हणाला, “परमेश्वरचे हे बोल ऐकायला बरे वाटतात.” (हिज्कीयाला वाटले मी राजा असताना सगळीकडे शांतता असेल, कसलाही त्रास असणार नाही.” म्हणून तो असे म्हणाला.)
धडा 40

1 तुमचा देव म्हणतो,“माझ्या लोकांचे सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा.
2 यरूशलेमशी ममतेने बोला यरूशलेमला सांगा: ‘तुझ्या सेवेचा काळ संपला तुझ्या पापांची किंमत तू मोजली आहेस.”‘ परमेश्वराने यरूशलेमला शिक्षा केली. तिने केलेल्या प्रत्येक पापाकरिता दोनदा शिक्षा केली.
3 ऐका! कोणीतरी ओरडत आहे, “परमेश्वरासाठी वाळवंटातून मार्ग काढा. आमच्या देवासाठी वाळवंटात सपाट रस्ता तयार करा.
4 प्रत्येक दरी भरून काढा. प्रत्येक डोंगर आणि टेकडी सपाट करा. वेडेवाकडे रस्ते सरळ करा. खडकाळ जमीन गुळगुळीत करा.
5 मग देवाची प्रभा फाकेल आणि सर्व लोक एकत्रितपणे परमेश्वराचे तेज पाहतील. हो! स्वत: परमेश्वराने हे सर्व सांगितले आहे.”
6 एक आवाज आला, “बोल!” मग माणूस म्हणाला, “मी काय बोलू?” आवाज म्हणाला, हे बोल: “सर्व माणसे गवतासारखी आहेत. माणसाचा चांगुलपणा कोवळ्या गवताच्या पात्यासारखा आहे.
7 परमेश्वराकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्याने हे गवत सुकते व मरते, सर्व माणसे गवतासारखी आहेत हेच सत्य आहे.”
8 “गवत सुकते आणि फुले कोमेजतात पण आमच्या देवाची वाणी सदासर्वकाळ राहते.”
9 सियोन, तुझ्याकडे सांगण्यासाठी एक सुर्वाता आहे. उंच डोंगरावर चढून जा आणि ही सुवार्ता ओरडून सांग. यरूशलेम, तुझ्यासाठी चांगली वार्ता आहे. घाबरू नकोस. मोठ्याने बोल.यहुदातील सर्व शहरांना ही वार्ता सांग, “हा पाहा तुमचा देव!
10 परमेश्वर, माझा प्रभू सर्व सामर्थ्यानिशी येत आहे लोकांवर अधिकार चालविण्यासाठी तो त्याचे सामर्थ्य वापरील तो आपल्या लोकांसाठी बक्षिस आणील. तो त्यांचा मोबदला चुकता करील.
11 ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढ्या वळवतो त्याप्रमाणे परमेश्वर आपल्या लोकांना वळवेल. परमेश्वर आपल्या हाताने (सामर्थ्याने) त्यांना एकत्र गोळा करील. तो लहान मेढ्यांना हातांत उचलून घेईल व त्या लहानग्यांच्या आया परमेश्वराच्या बाजूबाजूने चालतील.
12 आपल्या ओंजळीने समुद्राचे पाणी कोणी मोजले? आकाशाचे मोजमाप करण्यासाठी कोणी आपला हात वापरला? पृथ्वीवरची धूळ वाडग्याने कोणी मापली? डोंगर आणि टेकड्या तराजूने कोणी तोलल्या? हे सर्व करणारा परमेश्वर होता.
13 काय करावे हे कोणीही माणसाने परमेश्वराला सांगितले नाही. त्याने ज्या गोष्टी केल्या, त्या कशा कराव्या हे ही परमेश्वराला कोणी माणसाने सांगितले नाही.
14 परमेश्वराने कोणा माणसाची मदत मागितली का? कोणा माणसाने परमेश्वराला प्रामाणिकपणा शिकविला का? परमेश्वराला कोणा माणसाने ज्ञान दिले का? कोणी परमेश्वराला शहाणपण शिकविले का? नाही. या गोष्टी परमेश्वराला अगोदरच माहीत होत्या.
15 हे बघा! राष्ट्र हा परमेश्वराच्या सृष्टीचा फार सूक्ष्म अंश आहे. राष्ट्र हे बादलीतल्या पाण्याच्या एका थेंबाप्रमाणे आहे. जर परमेश्वराने सर्व राष्ट्रे गोळा करून त्याच्या तराजूच्या पारडयात टाकली तर ती धुळीच्या लहान लहान कणांप्रमाणे दिसतील.
16 परमेश्वरापुढे होम करायला लबानोनमधील सर्व झाडेही पुरणार नाहीत. आणि त्याच्यापुढे बळी देण्यासाठी तेथील सर्व प्राणी मारले तरी अपुरेच पडतील.
17 तुलनेने देवापुढे जगातील सर्व राष्ट्रे म्हणजे काहीच नाहीत. देवाच्या तुलनेत जगातील सर्व राष्ट्रांची किंमत शून्य आहे.
18 देवाची तुलना तुम्ही कशाशी करू शकता का? नाही. तुम्ही देवाचे चित्र काढू शकता का? नाही.
19 पण काहीजण लाकूड आणि दगड यांपासून मूर्ती तयार करतात आणि त्यांनाच देव मानतात. एक कारागीर मूर्ती तयार करतो. दुसरा तिला सोन्याने मढवतो आणि तिच्यासाठी चांदीच्या साखळ्या करतो.
20 पायासाठी तो न कुजणारे विशेष प्रकारचे लाकूड निवडतो. नंतर तो चांगला सुतार शोधतो आणि “देवाच्या” मूर्तीसाठी भक्कम पाया तयार करतो.
21 तुम्हाला सत्य नक्कीच माहीत आहे. नाही का? तुम्ही नक्कीच त्याबद्दल ऐकले आहे. फार पूर्वी नक्कीच कोणीतरी तुम्हाला ते सांगितले आहे. ही पृथ्वी कोणी निर्मिली हे तुम्ही जाणता.
22 परमेश्वरच खरा देव आहे तो पृथ्वीगोलावर स्थानापन्न होतो. त्याच्या तुलनेत लोक म्हणजे नाकतोडे आहेत. त्याने कापडाच्या गुंडाळीप्रमाणे आकाश उलगडून उघडले. आकाशाखाली बसण्यासाठी त्याने ते तंबूच्या कनातीप्रमाणे ताणले.
23 तो अधिपतींना निरूपयोगी करतो आणि जगातील न्यायाधीशांना पूर्णपणे कवडीमोल ठरवितो.
24 ते राजे (अधिपती) रोपट्यांप्रमाणे आहेत. जमिनीत लावल्यावर ती रूजायच्या आधीच देवाच्या जोरदार वाऱ्याने ती “रोपटी” सुकतात आणि मरतात व वारा त्यांना गवताच्या काडीप्रमाणे दूर उडवून देतो.
25 पवित्र देव म्हणतो, “तुम्ही माझी तुलना कोणाशी करू शकता का? नाही. कोणीही माझ्या बरोबरीचे नाही.
26 आकाशाकडे पाहा. हे तारे कोणी निर्मिले? ही आकाशातील ‘सेना’ कोणाची निर्मिती आहे. प्रत्येक ताऱ्याला त्याच्या नावाने कोण ओळखतो? खरा देव फार बलवान व सामर्थ्यवान आहे. म्हणून त्यातील एकही तारा हरवत नाही.”
27 याकोब, हे खरे आहे इस्राएल, तू ह्यावर विश्वास ठेवावा. मग तुम्ही “मी कसा जगतो हे परमेश्वराला दिसू शकत नाही. देव मला शोधून शिक्षा करणार नाही.” असे का म्हणता?
28 परमेश्वर देव फार सुज्ञ आहे, हे तुम्ही नक्कीच ऐकले आहे व तुम्हाला ते माहीतही आहे. देवाला ज्ञान असलेली प्रत्येक गोष्ट माणूस शिकू शकत नाही. परमेश्वर कधी दमत नाही, आणि त्याला विश्रांतीची गरज नाही. जगातील दूरदूरची स्थळे परमेश्वरानेच निर्मिली. परमेश्वर चिरंजीव आहे.
29 परमेश्वर दुबळ्यांना सबळ व्हायला मदत करतो. तो लोकांना शक्तीशिवाय सामर्थ्यवान होण्यास कारणीभूत होतो.
30 तरूण माणसे थकतात आणि त्यांना विश्रांतीची गरज वाटते. लहान मुलेसुध्दा अडखळतात आणि पडतात.
31 पण परमेश्वरावर विश्वास ठेवणारे, ज्याप्रमाणे गरूड पंख पसरून वर उडतात, त्याप्रमाणे पुन्हा सामर्थ्यशाली होतात. ही माणसे न दमता धावतात व न थकता चालतात.
धडा 41

1 परमेश्वर म्हणतो, “दूरवरच्या देशांनो, शांत व्हा आणि माझ्याकडे या. राष्ट्रांनो, शूर व्हा, येऊन माझ्याशी बोला. आपण एकत्र जमून कोणाचे बरोबर आहे ते ठरवू.
2 माझ्या पुढील प्रश्नांना उत्तरे द्या:पूर्वेकडून येणाऱ्या माणसाला कोणी उठविले? चांगलुपणा त्याच्याबरोबर आहे. तो त्याच्या तलवारीच्या जोरावर राष्ट्रांना पराभूत करतो मग त्यांची जणू माती होते. तो तीर सोडतो आणि राजांना जिंकतो. वाऱ्याने गवताची काठी उडावी तसे ते दूर पळतात.
3 तो सैन्याचा पाठलाग करतो पण त्याला कधीच ईजा होत नाही पूर्वी कधीही न गेलेल्या ठिकाणी तो जातो.
4 ह्या गोष्टी कोणी घडवून आणल्या? हे कोणी केले? सुरवातीपासून लोकांना कोणी बोलाविले? मी, परमेश्वराने, या गोष्टी केल्या आरंभापासून मी म्हणजे परमेश्वर आहे, आरंभापूर्वीही मी येथे होतो आणि सर्व संपल्यावर मीच येथे असेन.
5 अती दूरच्या सर्व स्थळांनो, पाहा आणि भिऊन असा! पृथ्वीवरच्या दूरवरच्या सर्व ठिकाणांनो, भीतीने थरथर कापा! इकडे या आणि माझे ऐका.” आणि ते आले.
6 “कामगार एकमेकांना मदत करतात. ते बळकटी येण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देतात.
7 एकजण मूर्ती करण्यासाठी लाकूड कापतो. तो सोन्याचे काम करणाऱ्याला उत्तेजन देतो. दुसरा हातोडीने धातू मऊ करतो. तो ऐरणी वर घाव घालणाऱ्याला उत्तर देतो हा शेवटचा कामगार म्हणतो, ‘हे काम चांगले झाले. सोने आता निघून येणार नाही.’ नंतर तो खिळ्याने मूर्ती पायावर पक्की बसवितो. मग मूर्ती खाली पडू शकत नाही आणि ती कधीही सरकत नाही.”
8 परमेश्वर म्हणतो, “इस्राएल, तू माझा सेवक आहेस. याकोब, मी तुझी निवड केली. तू अब्राहामच्या वंशातील आहेस. आणि अब्राहामवर प्रेम केले.
9 पृथ्वीवर खूप लांब, दूरच्या देशात होतास, पण मी तुला बोलाविले व सांगितले, ‘तू माझा सेवक आहेस.”‘ मी तुझी निवड केली आणि मी कधीच तुझ्याविरूध्द गेलो नाही.
10 काळजी करू नकोस मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस. मी तुझा देव आहे. मी तुला मदत करीन. मी माझ्या चांगलुपणाच्या उजव्या हाताने तुला आधार देईन.
11 बघ! काही लोक तुझ्यावर रागावले आहेत. पण ते लज्जित होतील. तुझे शत्रू नाहीसे होतील व कायमचे निघून जातील.
12 तू तुझ्याविरूध्द असणाऱ्या लोकांना शोधशील पण ते तुला सापडू शकणार नाहीत. ते संपूर्णपणे नाहीसे होतील.
13 मी परमेश्वर तुझा देव आहे, मी तुझा उजवा हात धरतो आहे, मी तुला सांगतो: घाबरू नकोस मी तुला मदत करीन.
14 बहुमोल यहुदा, घाबरू नकोस. इस्राएलमधील माझ्या लाडक्या लोकांनो, भिऊ नका. मी खरोखरच तुम्हाला मदत करीन.” परमेश्वराने स्वत:च ह्या गोष्टी सांगितल्या. जो तुम्हाला वाचवितो तोच इस्राएलचा पवित्र देव हे बोलला.
15 “मी तुम्हाला कोऱ्या मळणीयंत्राप्रमाणे केले आहे. त्या यंत्राला खूप तीक्ष्ण दाते आहेत. शेतकरी त्याचा उपयोग टरफलांपासून धान्य वेगळे करण्याकरिता करतात. त्याचप्रमाणे तुम्ही डोंगर पायाखाली तुडवून चिरडून टाकाल. तुम्ही टेकडयांची अवस्था धान्याच्या भुसकटाप्रमाणे कराल.
16 तुम्ही त्या फेकून द्याल आणि वाऱ्याबरोबर वाहत जाऊन त्या सगळीकडे विखुरल्या जातील. नंतर तुम्ही परमेश्वराबद्दल आनंद मानाल. तुम्हाला इस्राएलच्या पवित्र (देवाबद्दल) अभिमान वाटेल.”
17 “गरीब आणि गरजू पाण्याचा शोध घेतात. पण त्यांना पाणी मिळू शकत नाही. ते तहानेलेले आहेत. त्यांच्या तोंडाला कोरड पडली आहे. मी त्यांनी केलेली आळवणी ऐकेन. मी इस्राएलचा देव, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.
18 वैराण टेकड्यांवर मी नद्या वाहायला लावीन आणि दऱ्यांतून झऱ्याचे पाणी वाहायला लावीन. मी वाळवंटाचे रूपांतर पाण्याने भरलेल्या सरोवरात करीन. त्या शुष्क भूमीवर पाण्याचे झरे वाहतील.
19 वाळवंटात गंधसरू, बाभूळ, ऑलिव्ह (तेल) सरू, देवदारू आणि भद्रदारू हे वृक्ष वाढतील.
20 लोक हे सर्व पाहतील आणि परमेश्वराच्या सामर्थ्यामुळेच हे सर्व झाले आहे हे त्यांना कळेल. हे सर्व घडवून आणणारा एकमेव पवित्र (देव) आहे हे लोकांना, हे सर्व पाहिल्यावर कळेल.”
21 परमेश्वर, याकोबचा राजा म्हणतो, “या आणि तुमचे काय मुद्दे आहेत ते मला सांगा तुमचे त्याबद्दलचे पुरावे मला दाखवा आणि मग आपण काय बरोबर आहे ते ठरवू.
22 तुमच्या मूर्तीनी (खोट्या देवांनी) यावे व काय घडत आहे ते सांगावे.“सुरवातीला काय झाले? भविष्यात काय घडणार आहे? ते आम्हाला सांगा. आम्ही लक्षपूर्वक ऐकू. मग नंतर काय घडणार आहे ते आम्हाला कळेल.
23 काय घडेल हे समजण्यासाठी कोणत्या गोष्टी आम्ही पाहाव्या ते आम्हाला सांगा. मग आमचा तुमच्यावर खरोखरचे देव म्हणून विश्वास बसेल. काहीतरी चांगले किंवा वाईट करा म्हणजे आम्हाला तुम्ही प्रत्यक्षात आहात, जिवंत आहात हे दिसेल व आम्ही तुम्हाला अनुसरू.
24 “बघा! तुम्ही शून्य किंमतीचे आहात तुम्ही काहीच करू शकत नाही फक्त कवडी किंमतीची माणसेच तुमची पूजा करू इच्छितात.”
25 “मी उत्तरेकडील एका माणसालाउठविले तो उगवत्या सूर्याच्या दिशेकडून म्हणजे पूर्वेकडून येत आहे. तो माझी उपासना करतो. कुंभार ज्याप्रमाणे चिखल तुडवितो, त्याप्रमाणे तो विशिष्ट माणूस राजांना तुडवेल.”
26 हे सर्व घडण्यापूर्वी आम्हाला कोणी सांगितले? त्याला आम्ही देव म्हणावे, तुमच्या कोणात्या मूर्तीने हे सांगितले का? नाही. त्या मूर्तीपैकी कोणीही आम्हाला काहीही सांगितले नाही. त्या मूर्ती एक शब्दसुध्दा बोलत नाहीत. आणि आपण बोललेले ते खोटे देव ऐकू शकत नाहीत.
27 सियोनला ह्या गोष्टीबद्दल सांगणारा पहिला मी म्हणजेच परमेश्वर आहे. मी यरूशलेमला दूताबरोबर संदेश पाठविला. “पाहा! तुझे लोक परत येत आहेत.”
28 मी त्या खोट्या देवांना पाहिले. काहीही सांगण्याइतके ते शहाणे नाहीत. मी त्यांना प्रश्न विचारले, पण त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही.
29 ते सगळे देव कवडीमोलाचे आहेत. ते काही करू शकत नाहीत. त्या मूर्ती शून्य किंमतीच्या आहेत.
धडा 42

1 “माझ्या सेवकाकडे पाहा. मी त्याला आधार देतो. मी ज्याला निवडले आहे असा तो एक आहे आणि मी त्याच्यावर खूष आहे. मी माझा आत्मा त्याच्यात घालतो. तो न्याय्यमार्गाने राष्ट्रांना न्याय देईल.
2 तो रस्त्यात आवाज चढवणार नाही. तो रडणार अथवा किंचाळणार नाही.
3 तो सभ्य असेल तो पिचलेला बांबूसुध्दा मोडणार नाही. मिणमिणणारी वातसुध्दा तो विझविणार नाही. तो प्रामाणिकपणाने न्याय देईल आणि सत्य शोधून काढेल.
4 जगाला न्याय प्रस्थापित करीपर्यंत तो दुर्बळ होणार नाही वा चिरडला जाणार नाही. दूरदूरच्या ठिकाणचे लोक त्याच्या शिकवणुकीवर विश्वास ठेवतील.”
5 परमेश्वराने, खऱ्या देवाने या गोष्टी सांगितल्या: (परमेश्वराने आकाश निर्माण केले. परमेश्वराने ते जगावर पसरले. पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट त्यानेच निर्माण केली. पृथ्वीवरील सर्व लोकात त्याने प्राण घातला, चालणाऱ्या प्रत्येक माणसात चैतन्य घातले.)
6 मी, परमेश्वराने, तुला योग्य गोष्टी करण्यासाठी बोलाविले आहे. मी तुझा हात धरीन आणि तुझे रक्षण करीन. मी लोकांबरोबर केलेल्या कराराची तू खूण असशील. सर्वाना प्रकाश देणाऱ्या दिव्यासारखा तू असशील.
7 आंधळ्यांचे डोळे तू उघडशील आणि ते पाहू शकतील. खूप लोक तुरंगात आहेत, त्यांना तू मुक्त करशील. खूप लोक अंधारात राहतात, त्यातून तू त्यांना बाहेर काढशील.
8 “मी परमेश्वर आहे माझे नाव यहोवा, मी माझे गौरव दुसऱ्यांना देणार नाही. माझ्याकरिता असलेली स्तुती मी मूर्तीच्या (खोट्या देवांच्या) वाट्याला येऊ देणार नाही.
9 काही गोष्टी घडतील असे मी सुरवातीलाच सांगितले होते त्या गोष्टी घडल्या आणि आता काही गोष्टी घडायच्या पूर्वीच मी त्याबद्दल सांगत आहे आणि भविष्यात तसेच घडेल.”
10 परमेश्वरासाठी नवीन स्तोत्र गा. दूरवरच्या देशांतील सर्व लोकांनो, समुद्रावरून सफर करणाऱ्या सर्वानो, समुद्रातील सर्व प्राण्यांनो, दूरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनो, परमेश्वराची स्तुती करा.
11 वाळवंटांनो, नगरांनो, केदार मधील शेतांनो, परमेश्वराचे स्तुतिस्तोत्र गा. सेलातील लोकांनो, आनंदाने गा. तुमच्या उंच डोंगरकड्यावरून गा.
12 परमेश्वराचा गौरव करा. दूरवरच्या देशातील लोकांनो, त्याची स्तुती करा.
13 परमेश्वर शूर सैनिकाप्रमाणे बाहेर जाईल लढण्यास सज्ज असलेल्या माणसाप्रमाणे तो असेल. तो खूप उत्तेजित होईल. तो आरोळी ठोकेल आणि मोठ्याने ओरडेल. तो त्याच्या शत्रूचा पराभव करील.
14 “बराच वेळ मी काही बोललो नाही. मी संयम ठेवला आणि गप्प राहिलो. पण आता प्रसूतिवेदना होणाऱ्या स्त्रीसारखा मी मोठ्याने ओरडेन. मी खूप जोराने व मोठ्याने श्वासोच्छवास करीन.
15 मी टेकड्या आणि पर्वत नष्ट करीन. तेथे वाढणारी सर्व झाडेझुडपे मी सुकवून टाकीन. मी नद्यांच्या जागी कोरडी जमीन निर्माण करीन. तळी आटवीन.
16 आंधळ्यांना कधीही माहीत नसलेल्या मार्गाने मी घेऊन जाईन. पूर्वी कधीही ते गेले नव्हते अशा स्थळी मी त्यांना नेईन. मी त्यांच्यासाठी अंधार प्रकाशात बदलीन. खडबडीत जमीन गुळगुळीत करीन. मी कबूल केलेल्या गोष्टी करीन. मी माझ्या लोकांचा त्याग करणार नाही.
17 पण काही लोकांनी मला अनुसरायचे थांबविले आहे, त्यांच्याजवळ सोन्याने मढविलेल्या मूर्ती आहेत. ते त्यांना म्हणतात, ‘तुम्हीच आमचे देव आहात.’ ते त्या खोट्या देवांवर विश्वास ठेवतात, पण त्या लोकांची निराशा होईल.
18 “तुम्ही बहिऱ्यांनी माझे म्हणणे ऐकावे. आंधळ्यांनी नजर उचलून मला पाहावे.
19 ह्या सर्व जगात, सर्वात आंधळा माझा सेवक आहे. मी ज्याला जगात पाठवितो तो माझा दूत सर्वात बहिरा आहे. माझा स्वत:चा माणूस परमेश्वराचा सेवक सर्वांत अधिक आंधळा आहे.
20 माझ्या सेवकाने काय करायला हवे ते त्याला दिसते पण ते माझी आज्ञा पाळत नाही. तो कानाने ऐकू शकतो पण माझे म्हणणे ऐकण्यायचे तो नाकारतो.”
21 सेवकाने चांगले व्हावे व परमेश्वराच्या अद्भुत शिकवणुकीचा परमेश्वराच्या प्रमाणिकपणाखातर आदर करावा असे परमेश्वराला वाटते.
22 पण लोकांकडे पाहा. दुसऱ्यांनी त्यांना पराभूत करून लटूले आहे. सर्व तरूण घाबरले आहेत. ते तुरूंगात बंद केले गेले आहेत. दुसऱ्या लोकांनी त्यांच्याकडून पैसा काढून घेतला आहे. त्यांना वाचविणारा कोणीही नाही. दुसऱ्यांनी त्यांचा पैसा घेतला आणि “तो परत दे” असे म्हणायला तेथे कोणीही नव्हते.
23 तुमच्यातील कोणी देवाचे म्हणणे ऐकले आहे का? नाही. पण तुम्ही ते लक्षपूर्वक ऐकावे व काय घडले आहे त्याचा विचार करावा.
24 याकोबची व इस्राएलची संपत्ती लुटायला कोणी लावली? परमेश्वरानेच त्यांना तसे करण्याची परवानगी दिली. आपण परमेश्वराच्या विरूध्द वागून पाप केले आहे. म्हणून परमेश्वराने लोकांना आपली संपत्ती लुटू दिली. इस्राएलमधील लोकांना परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगायचे नव्हते. त्यांनी परमेश्वराची शिकवण ऐकली नाही.
25 म्हणून परमेश्वर त्यांच्यावर रागावला.देवाने त्यांच्याविरूध्द मोठी युध्दे घडवून आणली. इस्राएलच्या लोकांभोवती जणू आग भडकावी तसे हे होते. पण काय घडत आहे त्यांना कळले नाही. ते जणू जळत होते पण काय होत होते ते समजावून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही.
धडा 43

1 याकोब, परमेश्वराने तुला जन्म दिला. इस्राएल, परमेश्वराने तुला निर्मिले. आता देव म्हणतो, “भिऊ नकोस मी तुझे रक्षण करीन. मी तुला निवडले आहे. तू माझा आहेस.
2 जेव्हा तू अडचणीत असतोस, तेव्हा मी तुझ्या पाठीशी असतो. जेव्हा तू नद्या ओलांडशील तेव्हा इजा होणार नाही. आगीमधून चालताना तुला भाजणार नाही. ज्वाळा तुला पोळणार नाहीत.
3 का? कारण मी स्वत: तुझा परमेश्वर आहे. मी, इस्राएलचा पवित्र देव तुझा तारणहार आहे. मी तुझ्या मोबदल्यात मिसर देश दिला. तुला माझा करण्यासाठी मी इथिओपिआ व सेबा यांचे दान केले.
4 तू माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहेस. म्हणून मी तुझा आदर करतो. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्यासाठी मी सर्व लोक आणि सर्व राष्ट्रे दान करीन.”
5 “म्हणून घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या सर्व मुलांना गोळा करून तुझ्याकडे आणीन, मी त्यांना पूर्व आणि पश्चिम दिशेकडून गोळा करीन.
6 मी उत्तरेला म्हणेन : माझे लोक मला परत दे. मी दक्षिणेला सांगेन, माझ्या लोकांना तुरूंगात ठेवू नको. दूरदूरच्या ठिकाणांहून माझ्या मुलांमुलींना माझ्याकडे परत आण.
7 जी माणसे माझी आहेत, जी माझे नाव लावतात, त्या सर्वांना माझ्याकडे आण. मी त्या लोकांना माझ्यासाठी निर्मिले आहे मीच त्यांना घडविले व ते माझे आहेत.”
8 देव म्हणतो, “डोळे असून आंधळे व कान असून बहिरे असणाऱ्यांना लोकांना बाहेर आणा.
9 सर्व लोकांनी आणि सर्व राष्ट्रांनीसुध्दा एकत्र जमावे. त्यांच्यातील एखादा खोटा देव, आरंभी काय घडले याबद्दल कदाचित सांगू इच्छित असेल, त्यांनी आपल्याबरोबर साक्षीदार आणावेत. साक्षीदारांनी सत्य सांगावे त्यावरून ते बरोबर आहेत हे सिध्द होईल.”
10 परमेश्वर म्हणतो, “तुम्ही लोक माझे साक्षीदार आहात. मी निवडलेले तुम्ही लोक माझे सेवक आहात माझ्यावर विश्वास ठेवायला लोकांना तुम्ही मदत करावी म्हणून मी तुम्हाला निवडले आहे. ‘मीच तो आहे,’ मीच खरा देव आहे. हे तुम्हाला कळावे म्हणून मी तुमची निवड केली. माझ्याआधी कोणी देव नव्हता आणि माझ्यानंतर कोणी देव नसेल.
11 मी स्वत:च परमेश्वर आहे मी एकमेव आहे. दुसरा कोणीही तारणकर्ता नाही. मीच एकटा आहे.
12 तुमच्याशी बोलला तो मीच होतो. मी तुम्हाला वाचवले मी तुम्हाला त्या गोष्टी सांगितल्या आहेत. तुमच्या पाठीशी कोणी परका नव्हता. तुम्हीच माझे साक्षीदार आहात. मी देव आहे.” (परमेश्वर स्वत:च हे बोलला.)
13 “मीच अक्षय असतो. मी जे काही करतो, ते कोणीही बदलू शकत नाही. माझ्या सामर्थ्यापासून लोकांना कोणीही वाचवू शकत नाही.”
14 परमेश्वर, इस्राएलचा पवित्र देव तुमचे रक्षण करतो. देव म्हणतो, “मी तुझ्यासाठी बाबेलला सैन्य पाठवीन. खूप लोकांना बंदी केले जाईल. त्या खास्दी (खाल्डियन) लोकांना त्यांच्याच नावांतून दूर नेले जाईल. (खास्दयांना (खाल्डियन लोकांना) त्यांच्या नावांचा फार गर्व आहे.)
15 मी परमेश्वर तुमचा पवित्र देव आहे. मी इस्राएल निर्मिले. मी तुमचा राजा आहे.”
16 परमेश्वर समुद्रातून मार्ग काढील. त्याच्या लोकांकरिता खवळलेल्या पाण्यातून तो रस्ता तयार करील. देव म्हणतो,
17 “जे लोक रथ, घोडे व सैन्ये यांच्यानिशी माझ्याशी लढतात त्यांचा परा़भव होईल. ते पुन्हा उठणार नाहीत त्यांचा नाश होईल. पण त्यातील ज्योत मावळावी तसे ते नाहीसे होतील.
18 म्हणून आरंभी घडलेल्या गोष्टी आठवू नका. फार पूर्वी घडलेल्या गोष्टींचा विचार करू नका.
19 का? कारण मी आता नव्या गोष्टी घडवून आणीन. आता तुम्ही कोवळ्या रोपटयाप्रमाणे वाढाल. हे सत्य आहे, ने नक्कीच तुम्हाला माहीत आहे. मी खरोखरच वाळवंटातून रस्ता तयार करीन. कोरड्या भूमीवर नद्या निर्माण करीन.
20 हिंस्र पशुसुध्दा माझे आभार मानतील. मोठे प्राणी आणि पक्षी मला मान देतील. मी जेव्हा वाळवंटात पाणी आणि कोरड्या जमिनीवर नद्या निर्माण करीन तेव्हा ते माझा आदर करतील. मी निवडलेल्या. माझ्या लोकांना पाणी मिळावे म्हणून मी हे करीन.
21 ह्या लोकांना मी निर्मिले आहे. ते माझी स्तुतिस्तोत्रे गातील.
22 “याकोब, तू माझी प्रार्थना केली नाहीस का? कारण इस्राएल मला विटला आहे.
23 तू तुझ्या मेंढ्या होमबलि देण्यासाठी माझ्याकडे आणल्या नाहीस तू माझा मान राखला नाहीस. तू मला बळी अर्पण केले नाहीस. मला होमबलि अर्पण करावे म्हणून मी तुला बळजबरी केली नाही. तू तुला वीट येईपर्यंत धूप जाळावा असा आग्रह मी धरला नाही.
24 मला तृप्त करण्यासाठी लागणाऱ्या अर्पणांसाठी आणि धुपासाठी तू स्वत:चा पैसा वापरला नाहीस. उलट तुझ्या पापांचे ओझे माझ्यावर लादलेस तुझ्या दुष्कृत्यांचा मला वीट येईपर्यंत तू पाप केलेस.
25 “मी, आणि फक्त मीच तुझी पापे धुतो. मी हे माझ्या आनंदासाठी करतो. मी तुझी पापे लक्षात ठेवणार नाही.
26 पण तू मात्र माझी आठवण ठेवावीस आपण एकत्र येऊन योग्य काय ते ठरवावे. तू केलेल्या गोष्टी तू सांगाव्यास आणि त्या योग्य आहेत हे दाखवावे.
27 तुझ्या पूर्वजांनी पाप केले आणि तुझे शिक्षक माझ्याविरूध्द वागले.
28 म्हणून मी तुझ्या पवित्र राज्यकर्त्यांना अपवित्र करीन. मी याकोबला संपूर्णपणे माझा होण्यास भाग पाडीन.इस्राएलमध्ये वाईट घडेल.”
धडा 44

1 “याकोब, तू माझा सेवक आहेस. माझे ऐक इस्राएल, मी तुला निवडले आहे. मी काय म्हणतो ते ऐक.
2 मी परमेश्वर आहे. मी तुला निर्माण केले. तुला तुझे हे रूप देणारा मी आहे. तू आईच्या गर्भात असल्यापासून मी तुला मदत केली. याकोबा, माझ्या सेवका, घाबरू नकोस. यशुरूना, मी तुझी निवड केली.
3 “मी तहानेलेल्यांसाठी पाण्याचा वर्षाव करीन. मी कोरड्या जमिनीवर झरे निर्माण करीन. मी तुझ्या संततीमध्ये माझा आत्मा घालीन. आणि वंशजांना आशीर्वाद देईन. ते वाहत्या पाण्याच्या झऱ्याप्रमाणे असतील.
4 झऱ्याकाठी वाढणाऱ्या झाडांप्रमाणे ते जगातील लोकांत वाढतील.
5 “एकजण म्हणेल, ‘मी परमेश्वराचा आहे’ दुसरा ‘याकोबचे’ नाव लावील आणखी एक आपली सही ‘मी परमेश्वराचा’ अशी करील, तर आणखी एक स्वत:ला ‘इस्राएल’ म्हणवून घेईल.”
6 परमेश्वर इस्राएलचा राजा आहे सर्वशक्तिमान परमेश्वर इस्राएलला वाचवितो. परमेश्वर म्हणतो, “मीच फक्त देव आहे. दुसरे कोणीही देव नाहीत. मीच आरंभ आहे आणि मीच अंत आहे.
7 माझ्यासारखा दुसरा कोणीही देव नाही. जर असा कोणी असेल, तर त्याने आता बोलावे. त्याने यावे व तो माझ्यासारखा आहे हे सिध्द करावे. मी ह्या लोकांनी निर्माण केल्यापासून जे घडले आणि जे अनंत काळ घडत राहील ते काय ते त्याने मला सांगावे. भविष्यात काय घडणार आहे हे त्याला माहीत असल्याचे त्याने काही खुणेने पटवून द्यावे.
8 घाबरू नका. काळजी करू नका. मी काय घडणार हे नेहमीच तुम्हाला सांगितले आहे. तुम्ही लोक माझे साक्षीदार आहात. दुसरा कोणीही देव नाही. मीच एकमेव देव आहे. दुसरा कोणीही ‘खडक’ नाही. मला माहीत आहे की मी एकमेव आहे.”
9 काही लोक मूर्ती करतात. (म्हणजेच खोटे देव करतात.) पण त्यांचा काही उपयोग नाही. लोक त्या मूर्तीवर प्रेम करतात पण त्यांना काही किंमत नाही. हे लोक त्या मूर्तीचे साक्षीदार आहेत पण ते काही पाहू शकत नाहीत. ते काही जाणत नाहीत. आपल्या कृत्यांबद्दल लज्जित व्हावे एवढेही ज्ञान त्यांना नाही.
10 हे खोटे देव कोणी घडवले? ह्या निरूपयोगी मूर्ती कोणी निर्माण केल्या?
11 कारगिरांनी त्या तयार केल्या. ते सर्व कारगीर माणसेच होती देव नव्हते. त्या सर्व लोकांनी एकत्र येऊन ह्या गोष्टीबद्दल विचार केला तर ते लज्जित होतील व घाबरतील.
12 एकजण लोखंड चिमट्यात धरून विस्तवावर तापवितो. मग तो त्यावर घणाचे घाव घालतो आणि त्यातून मूर्ती तयार होते. हा कारागीर आपल्या बळकट हातांचा उपयोग करतो पण तो उपाशी असताना त्याची शक्ती कमी होते. पाणी न मिळाल्यास तो अशक्त होतो.
13 दुसरा कारागीर ओळंबा आणि कर्कटक यांच्या साहाय्याने लाकडावर कापण्यासाठी रेषा आखून घेतो. मग छिन्नीने लाकडातून तो मूर्ती कोरतो. तो मोजपट्टीने मूर्तीचे मोजमाप करतो. अशा तऱ्हेने कारागीर हुबेहूब मनुष्याप्रमाणे दिसणारी मूर्ती करतो आणि ही माणसाची मूर्ती घरात बसून राहण्यापलीकडे काहीही करीत नाही.
14 माणूस गंधसरू, देवदारू वा कधी कधी अल्लोनची झाडे तोडतो (त्या माणसाने ती झाडे वाढवलेली नव्हती. ती जंगलात आपल्या सामर्थ्याने वाढली. जर कोणी भद्रदारू लावला तर पावसामुळे तो वाढतो.)
15 तो ह्या झाडांचा उपयोग सरपणासाठी करतो. तो झाडांच्या बारीक ढलप्या करतो आणि त्यांचा उपयोग अन्न शिजविण्यासाठी व ऊबेसाठी करतो. एखाद्या लाकडाच्या ढलपीने अग्नी प्रज्वलित करून तो भाकरी भाजतो आणि त्याच लाकडाच्या तुकड्याचा उपयोग तो देवाची मूर्ती करण्यासाठी करतो व त्या देवाची पूजा करतो. तो देव म्हणजे माणसाने तयार केलेला पुतळा आहे. पण माणूस त्यापुढे नतमस्तक होतो.
16 माणूस अर्ध्याहून अधिक लाकूड जाळतो. अग्नीचा उपयोग तो अन्न स्वत:ला ऊबदार ठेवण्यासाठी तो करतो. मग तो म्हणतो, “छान! मला ऊब आली. अग्नीच्या प्रकाशात मी पाहूही शकतो.”
17 पण थोडे लाकूड शिल्लक आहे. मग त्यापासून मूर्ती करून तो त्या मूर्तीलाच देव म्हणतो. तो तिच्यापुढे वाकतो आणि तिची पूजा करतो. तो प्रार्थना करतो, “तू माझा देव आहेस. माझे रक्षण कर.”
18 त्या लोकांना ते काय करीत आहे कळत नाही. त्यांना काही समजत नाही. जणू काही त्यांच्या डोळ्यावर पडदा पडला आहे, त्यामुळे ते पाहू शकत नाही. त्यांची हृदये (मने) समजून घ्यायचा प्रयत्न करीत नाहीत.
19 त्यांनी ह्या गोष्टींचा कधीच विचार केला नाही. त्यांना काही समजत नसल्याने त्यांनी असा विचार केला नाही “अर्धे लाकूड मी जाळले. त्या विस्तवावर मी भाकरी भाजली, मांस शिजविले. मग मी जेवलो आणि उरलेल्या लाकडातून मी ही भयानक वस्तू तयार केली. मी लाकडाच्या ओंडक्याचीच पूजा करीत आहे.”
20 त्या माणसाला, तो काय करीत आहे, ते कळत नाही. तो गोंधळलेला आहे. त्यामुळे त्याचे मन त्याला चुकीच्या मार्गाने नेते. तो स्वत:ला वाचवू शकत नाही. तो चूक करतोय हे त्याला दिसत नाही. “मी हातात धरलेली मूर्ती म्हणजे खोटा देव आहे” असे तो म्हणणार नाही.
21 “याकोबा, ह्या गोष्टी लक्षात ठेव. इस्राएला, तू माझा सेवक आहेस. हे लक्षात ठेव. मी तुला निर्माण केले. तू माझा सेवक आहेस. म्हणून इस्राएल, तू मला विसरू नकोस.
22 तुझी पापे मोठ्या ढगासारखी होती. पण मी ती सर्व पुसून टाकली. ढग हवेत विरून जातो तशी तुझी पापे दिसेनाशी झाली. मी तुला सोडविले आणि तुझे रक्षण केले. म्हणून तू माझ्याकडे परत ये.”
23 परमेश्वराने महान गोष्टी केल्या म्हणून आकाश आनंदात आहे खोलवरची भूमीसुध्दा सुखात आहे. डोंगर गाण्यातून देवाचे आभार मानीत आहेत. रानातील सर्व वृक्ष आनंदात आहेत. का? कारण परमेश्वराने याकोबला वाचविले. परमेश्वराने इस्राएलसाठी फार मोठ्या गोष्टी केल्या.
24 तू आता आहेस तसा तुला परमेश्वराने बनविले. तू आईच्या गर्भात असताना परमेश्वराने हे केले. परमेश्वर म्हणतो, “मी, परमेश्वराने प्रत्येक गोष्ट निर्माण केली. मी स्वत: आकाश तेथे ठेवले आणि माझ्यासमोर जमीन पसरली.”
25 खोटे संदेष्टे खोट्या गोष्टी सांगतात. पण परमेश्वर त्यांचा खोटेपणा उघड करतो. जादूटोणा करणाऱ्यांना परमेश्वर मूर्ख बनवितो. शहाण्यांनासुध्दा परमेश्वर गोंधळात टाकतो. त्यांना वाटते आपल्याला फार समजते पण देव त्यांना हास्यास्पद बनवितो. 26लोकांना संदेश देण्यासाठी परमेश्वर त्याच्या सेवकांना पाठवितो. आणि परमेश्वर त्या संदेशातील गोष्टी खऱ्या करून दाखवितो. लोकांनी काय करावे हे सांगण्यासाठी परमेश्वर दूत पाठवितो आणि त्यांचा सल्ला योग्य आहे हे परमेश्वर दाखवून देतो.
26 परमेश्वर यरूशलेमला म्हणतो, “तुझ्यात परत लोक राहू लागतील.” परमेश्वर यहुदातील नगरांना म्हणतो, “तुमची पुनर्बांधणी होईल.” ज्या शहरांचा नाश झाला, त्या शहरांना परमेश्वर म्हणतो, “मी तुम्हाला परत शहराचे रूप देईन.”
27 परमेश्वर खोल पाण्याला आटून जायला सांगतो “तो म्हणतो की मी तुमचे झरे सुकवीन.”
28 परमेश्वर कोरेशला म्हणतो, “तू माझा मेंढपाळ आहेस. मला पाहिजे ते तू करशील. तू यरूशलेमला म्हणशील, ‘तुझी पुनर्बांधणी केली जाईल. ‘तू मंदिराला सांगशील, ‘तुझा पाया परत घातला जाईल.”‘
धडा 45

1 परमेश्वराने स्वत: निवडलेल्या राजाला, कोरेशला पुढील गोष्टी सांगितल्या,“मी कोरेशचा उजवा हात धरीन. इतर राजांकडून सत्ता काढून घेण्यास मी त्याला मदत करीन. नगराच्या वेशी कोरेशला थोपवू शकणार नाहीत. मी वेशी खुल्या करीन. आणि कोरेश आत जाईल.”
2 “कोरेश, तुझ्या सैन्याच्या पुढे मी चालीन. मी डोंगर भुईसपाट करीन. मी वेशीचे जस्ताचे दरवाजे मोडीन. त्यावरील लोखंडी सळ्या तोडीन.
3 तुला मी अंधारातून वाचविणारी संपत्ती देईन. मी तुला गुप्त धन देईन. मीच परमेश्वर आहे, हे तुला कळावे म्हणून मी हे करीन. मी इस्राएलचा देव आहे, व मी तुला नावाने हाका मारत आहे.
4 “माझा सेवक याकोब, आणि माझे निवडलेले लोक, म्हणजे इस्राएल ह्यांच्यासाठी मी हे करतो. कोरेश, मी तुला नावाने हाक मारीत आहे. तू मला ओळखत नाहीस, पण मी तुला नावाने ओळखतो.
5 मी परमेश्वर आहे मीच फक्त देव आहे दुसरा कोणीही देव नाही. मी तुला वस्त्रे घातली, पण तरीही तू मला ओळखत नाहीस.
6 “मी एकटाच देव आहे. हे मी ह्या सर्व गोष्टी करतो, त्यावरून लोकांना कळेल. मीच परमेश्वर आहे, दुसरा कोणीही देव नाही’ हे पूर्वेपासून पश्चिमेपर्यत सर्व लोकांना कळेल.
7 मी प्रकाश निर्माण केला आणि अंधारही. मी शांती निर्माण केली तशी संकटेही. मी परमेश्वर आहे व ह्यासर्व गोष्टी मी करतो.
8 “आकाशातील ढगांतून चांगुलपणा पृथ्वीवर पडो. पृथ्वी दुभंगो तारण वाढो, आणि त्याचबरोबर चांगुलपणा वाढो. मी परमेश्वराने त्याला निर्मिले आहे.
9 “ह्या लोकांकडे पाहा ते त्यांच्या निर्मात्याशीच वाद घालीत आहेत. माझ्याशी वाद घालणाऱ्यांकडे पाहा. ते खापराच्या तुकड्यासारखे आहेत. कुंभार भांडे करण्यासाठी मऊ, ओला चिखल वापरतो पण चिखल त्याला ‘तू काय करतोस?’ असे विचारीत नाही. निर्मितीला निर्मात्याला प्रश्र्न विचारण्याची हिंमत नसते. हे लोक त्या चिखलासारखे आहेत.
10 आई-वडील मुलांना जन्म देतात पण मुले वडिलांना ‘तुम्ही आम्हाला जीवन का दिले’ किंवा आईला ‘तुम्ही आम्हाला जन्म का दिला?’ असे विचारू शकत नाहीत.”
11 परमेश्वर इस्राएलचा पवित्र देव आहे, त्याने इस्राएलची निर्मिती केली. परमेश्वर म्हणतो,“माझ्या मुलांनो, तुम्ही मला काही खूण दाखविण्यास सांगितले. मी केलेल्या गोष्टी दाखविण्याचा तुम्ही मला हुकूम दिला.
12 म्हणून पाहा! मी पृथ्वी व तीवर राहणारी सर्व माणसे निर्माण केली. मी माझ्या हाताने आकाश केले, आणि मी आकाशातील सर्व सैन्यांवर हुकूमत ठेवतो.
13 कोरेशला चांगल्या गोष्टी करण्यासाठी मीच शक्ती दिली.मी त्याचे काम सोपे करीन. कोरेश माझी नगरी पुन्हा वसवेल. तो माझ्या लोकांना मुक्त करील. तो माझ्या लोकांना मला विकणार नाही. ह्या गोष्टी करण्यासाठी मला त्याला काही द्यावे लागणार नाही. लोक मुक्त केले जातील. आणि त्यासाठी मला काही मोजावे लागणार नाही.”सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
14 परमेश्वर म्हणतो, “मिसर आणि इथिओपिआ श्रीमंत आहेत. पण इस्राएल, तुला ती संपत्ती मिळेल. सेबाचे उंच लोक तुझ्या मालकीचे होतील. ते गळ्यात साखळ्या अडकविलेल्या अवस्थेत तुझ्यामागून चालतील (म्हणजेच ते तुझे गुलाम होतील) ते तुझ्यापुढे वाकतील आणि तुझी विनवणी करतील.” इस्राएल, देव तुझ्या बरोबर आहे दुसरा कोणीही देव नाही.
15 देवा, तुला लोक पाहू शकत नाहीत तू इस्राएलचा तारणारा आहेस.
16 पुष्कळ लोक खोटे देव तयार करतात. पण अशा लोकांची निराशा होईल. ते सगळे लोक लज्जित होऊन दूर जातील.
17 पण परमेश्वर इस्राएलला वाचवील आणि हे तारण निरंतर सुरूच राहील. परत कधीही इस्राएलला लज्जित व्हावे लागणार नाही.
18 परमेश्वरच फक्त देव आहे. त्यानेच आकाश व पृथ्वी निर्मिली. परमेश्वराने पृथ्वीला तिच्या जागी ठेवले. परमेश्वराने पृथ्वी निर्मिली तेव्हा त्याला ती रिकाती नको होती. ती पुढे जगावी म्हणून त्याने ती निर्मिली. तिच्यावर राहता यावे म्हणून त्याने ती निर्माण केली “मीच परमेश्वर आहे दुसरा कोणीही देव नाही.
19 मी गुप्तपणे कधी बोललो नाही. मी मोकळेपणानेच बोललो. मी जगाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात माझे शब्द लपविले नाहीत. रिकाम्या जागी मला शोधा’ असे मी याकोबच्या लोकांना कधीही सांगितले नाही. मी परमेश्वर आहे. मी नेहमीच सत्य बोलतो. खऱ्या गोष्टीच मी सांगतो.”
20 “तुम्ही लोक दुसऱ्या राष्ट्रातून पळालेले आहात. तेंव्हा गोळा व्हा आणि माझ्यासमोर या. (हे लोक स्वत:जवळ खोट्या देवाच्या मूर्ती बाळगतात. ते त्या त्यांना वाचवून न शकणाऱ्या देवांची हे लोक प्रार्थना करीत राहतात. ते काय करीत आहेत हे त्यांना कळत नाही.
21 त्या लोकांना माझ्याकडे यायला सांगा. ह्या सर्व गोष्टींबद्दल त्यांना एकत्रितपणे बोलू द्या.)“पुष्कळ वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींबद्दल तुम्हाला कोणी सांगितले? फार पूर्वीपासून तुम्हाला या गोष्टी कोण सांगत आले आहे? मी, देवाने, एकमेव परमेश्वराने, तुम्हाला या गोष्टी सांगितल्या. मीच फक्त देव आहे. माझ्यासारखा आणखी दुसरा कोणी आहे का? चांगला दुसरा देव आहे का? दुसरा कोणी देव त्याच्या लोकांना वाचवितो का? नाही कोणीही दुसरा देव नाही.
22 दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी देवाचे अनुसरण करणे थांबवले. तुम्ही मला अनुसरावे व स्वत:चे रक्षण करून घ्यावे. मीच देव. दुसरा देव नाही. मीच फक्त देव आहे.
23 “मी माझ्या सामर्थ्याच्या जोरावर वचन देईन. आणि जेंव्हा मी एखादी गोष्ट व्हावी म्हणून मी हूकूम देतो तेंव्हा ती होतेच. मी वचन देतो की प्रत्येकजण माझ्यापुढे (देवापुढे) नमन करेल. प्रत्येकजण मला अनुसरण्याचे वचन देईल.
24 लोक म्हणतील ‘चांगलुपणा आणि सामर्थ्य फक्त परमेश्वराकडूनच मिळते.”‘काही लोक देवावर रागावतात पण परमेश्वराचे साक्षीदार येतील आणि परमेश्वराने केलेल्या गोष्टींबद्दल सांगतील, मग परमेश्वरावर रागावणारे लोक लाजेने माना खाली घालतील.
25 परमेश्वर, इस्राएलच्या लोकांना सत्कृत्य करायला मदत करील, व लोक त्यांच्या देवाबद्दल अभिमान बाळगतील.
धडा 46

1 बेल आणि नेबो माझ्यापुढे वाकतात. ते खोटे देव म्हणजे फक्त मूर्ती आहेत. लोक त्या मूर्तीना जनावरांच्या पाठीवर लादतात त्या मूर्ती म्हणजे वाहून न्यावी लागणारी फक्त ओझी आहेत. खोटे देव लोकांना दमविण्याव्यातिरिक्त काहीही करीत नाहीत.
2 त्या सर्व खोट्या देवांना नमावे लागेल ते सर्व जमीनदोस्त होतील. ते पळून जाऊ शकणार नाहीत त्यांना कैद्याप्रमाणे धरून नेले जाईल.
3 “याकोबच्या वंशजांनो, आणि इस्राएलमधील वाचलेल्या लोकांनो, ऐका! तुम्ही आईच्या गर्भात असल्यापासून नेहमीच आधार देत आलो आहे.
4 तुम्ही जन्मल्यावर मीच तुम्हाला आधार दिला. आणि तुम्ही वृध्द झाल्यावर, तुमचे केस पिकल्यावरही मीच तुम्हाला आधार देईन, कारण मी तुम्हाला निर्माण केले. मी तुम्हाला आधार देतच राहीन व तुमचे रक्षण करीन.
5 “तुम्ही माझी तुलना दुसऱ्या कोणाशी करू शकता का? नाही! कोणीही माणूस माझ्याबरोबरीचा नाही. तुम्ही माझ्याबद्दल सर्वच जाणू शकत नाही. माझ्यासारखे काही नाही.
6 काही लोकांजवळ भरपूर सोने-चांदी असते. सोने त्यांच्या वटव्यातून गळत असते. चांदी ते तराजूने तोलतात. हे लोक कारागिराला पैसे देऊन लाकडापासून खोटा देव तयार करून घेतात. नंतर ते त्या देवाची पूजा करतात. त्याच्यापुढे नतमस्तक होतात.
7 ते स्वत:च्या खांद्यांवरून तो खोटा देव वाहून नेतात. तो देव निरूपयोगी आहे. लोकांना त्यास वाहून न्यावे लागते. लोक मूर्ती जमिनीवर बसवितात. तो देव हालू शकत नाही. तो त्याची जागा सोडून लांब जाऊ शकत नाही. लोक त्याच्याशी ओरडून बोलले तरी तो उत्तर देणार नाही, तो देव म्हणजे फक्त एक मूर्ती आहे, ती लोकांना संकटातून वाचवू शकणार नाही.
8 “तुम्ही लोकांनी पापे केली तुम्ही त्याबद्दल पुन्हा विचार करावा. ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि खंबीर व्हा.
9 पूर्वी घडलेल्या गोष्टी आठवा. मी देव आहे हे लक्षात ठेवा. दुसरा कोणताच देव नाही. ते खोटे देव माझ्यासारखे नाहीत.
10 अखेरीला काय होणार हे मी तुम्हाला आरंभीच सांगितले, फार वर्षांपूर्वी, ज्या गोष्टी घडल्या नव्हत्या, त्या मी तुम्हाला सांगितल्या म्हणजेच त्या गोष्टी घडण्यापूर्वी अनेक वर्षे मी त्या घडणार असल्याचे तुम्हाला सांगितले. मी योजतो, तसेच घडते मला पाहिजे ते मी घडवून आणतो.
11 मी पूर्वेककडून एका माणसाला बोलवीत आहे. तो माणूस गरूडासारखा असेल. तो अती दूरच्या देशातून येईल. आणि मी ठरविलेल्या गोष्टी तो करील. मी हे करीन असे तुम्हाला सांगत आहे आणि मी ते करीनच. मी त्याला घडविले आहे. मी त्याला आणीन.
12 “तुमच्यातील काहीजणांना आपल्याजवळ प्रचंड सामर्थ्य आहे असे वाटते. पण तुम्ही सत्कृत्ये करीत नाही, माझे ऐका.
13 मी चांगल्या गोष्टी करीन. लवकरच मी माझ्या लोकांना वाचवीन. मी सियोनचे तारण करीन. आणि माझा गौरव इस्राएलला देईन.”
धडा 47

1 “धुळीत पड आणि तेथेच बस! खास्दयांच्या (खाल्डियनांच्या) कुमारिके, जमिनीवर बस. तू आता सत्तेवर नाहीस. लोक तुला नाजूक, कुमारी समजणार नाहीत.
2 तू आता खूप मेहनत केली पाहिजेस. तुझी चांगली वस्त्रे आणि बुरखा उतरव तू जात्यावर धान्य दळले पाहिजेस. पुरूष तुझे पाय पाहू शकतील एवढे तुझे वस्त्र वर उचलून धर आणि नद्या पार कर. तुझा देश सोड.
3 पुरूष तुझा देह पाहतील आणि तुझा भोग घेतील. तुझ्या दुष्कृत्यांची किंमत मी तुला मोजायला लावीन. आणि कोणीही तुझ्या मदतीला येणार नाही.”
4 “माझे लोक म्हणतात, ‘देवाने आम्हाला वाचविले. त्याचे नाव आहे सर्वशक्तिमान परमेश्वर. इस्राएलचा पवित्र एकमेव देव.”
5 “बाबेल, तेथेच शांत बसून राहा. खास्दयांच्या (खाल्डियनांच्या) कन्ये, अंधारात जा, का? कारण तू यापुढे ‘राज्याची राणी’ राहणार नाहीस.
6 “मी माझ्या लोकांवर रागावलो होतो ते लोक माझे आहेत पण मी रागावलो असल्याने त्यांचे महत्व कमी केले. मी त्यांना तुझ्या ताब्यात दिले. तू त्यांना शिक्षा केलीस. पण तू त्यांना अजिबात दया दाखविली नाहीस. तू वृध्दांनासुध्दा खूप मेहनत करायला लावलीस.
7 तू म्हणालीस, ‘मी चिरकाल राहीन. मी नेहमीच राणी होईन.’ तू त्या लोकांना वाईट वागविलेस हे तुझ्या लक्षात आले नाही. काय घडेल याचा तू विचार केला नाहीस.
8 तेव्हा ‘सभ्य स्त्रिये,’ आता माझे ऐक! तुला आता सुरक्षित वाटते व तू स्वत:शीच म्हणतेस, ‘मीच तेवढी महत्वाची व्यक्ती आहे. माझ्यासारखे महत्वाचे कोणीही नाही. मी कधीच विधवा होणार नाही. मला नेहमीच संतती होईल.’
9 एके दिवशी, एका क्षणात तुझ्याबाबत पुढील दोन गोष्टी घडतील. पहिली तू तुझी मुले गमावशील आणि नंतर दुसरी म्हणजे तू तुझा पती गमावशील. हो! ह्या गोष्टी तुझ्याबाबत खरोखरच घडतील. तुझी सर्व जादू आणि तुझ्या प्रभावी युक्त्या तुला वाचविणार नाहीत.
10 तू दुष्कृत्ये केलीस आणि तरी तुला सुरक्षित वाटते. मनातल्या मनात म्हणतेस ‘माझी दुष्कृत्ये कोणालाच दिसत नाहीत.’ तुझे शहाणपण आणि ज्ञान तुला वाचवील असे तुला वाटते. ‘मीच एकमेव आहे. माझ्यासारखे महत्वाचे कोणी नाही’ असा विचार तू स्वत:शीच करतेस.
11 “पण तुझ्यावर संकटे येतील हे केव्हा होईल ते तुला कळणार नाही. पण तुझा नाश जवळ येत आहे. तू ती संकटे थोपवू शकणार नाहीस. काय होते आहे हे कळायच्या आतच तुझा नाश होईल.
12 “जादूटोणा आणि चेटूक शिकण्यासाठी तू आयुष्यभर मेहनत केलीस. तेव्हा आता त्याचा उपयोग करायला सुरवात कर. कदाचित् त्या युक्त्या तुझ्या उपयोगी पडतील; कदाचित् तू कोणाला घाबरवू शकशील.
13 तुला खूप सल्लागार आहेत. त्यांनी दिलेल्या सल्याचा तुला वीट आला का? मग ग्रहनक्षत्रे पाहून ज्योतिष सांगणाऱ्यांना पाठव. ते तुला महिन्याची सुरवात कधी आहे हे सांगतात; तर कदाचित् तुझा त्रास कधी सुरू होणार हे ही सांगू शकतील.
14 “पण ही माणसे स्वत:चा बचाव करण्यासही समर्थ असणार नाहीत. ते गवताच्या काडीप्रमाणे जळतील. ते इतक्या चटकन् जळतील की भाकरी भाजायला निखारे पेटणार नाहीत की उबेला आगोटी राहणार नाही.
15 “तू ज्या गोष्टींसाठी मेहनत घेतलीस त्या गोष्टींच्या बाबतीत असेच होईल. तू आयुष्यभर ज्यांच्याबरोबर व्यापार केलास ते सर्व तुला सोडून जातील. प्रत्येक जण आपापल्या मार्गाने जाईल. तुला वाचवायला कोणीही राहणार नाही.”
धडा 48

1 परमेश्वर म्हणतो, “याकोबाच्या वंशजांनो, माझे ऐका. तुम्ही, जे ‘इस्राएलच्या’ नावाने ओळखले जाता. तुम्ही यहुदाच्या वंशातील आहात. तुम्ही वचने देताना परमेश्वराचे नाव घेता. तुम्ही इस्राएलच्या देवाची स्तुती करता. पण हे तुम्ही सच्चे पणाने आणि खरेपणाने करीत नाही.”
2 हो ते पवित्र नगराचे नागरिक आहेत. ते इस्राएलच्या देवावर अवलंबून राहतात. सर्वशक्तिमान परमेश्वर अशी त्याची ख्याती आहे.
3 “मी तुम्हाला फार पूर्वीच भविष्यात घडणाऱ्या गोष्टीबद्दल सांगितले. मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगितले आणि अचानक त्या गोष्टी घडवून आणल्या
4 मी तसे केले, कारण तुम्ही हट्टी होतात व ते मला माहीत होते. मी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला तुम्ही नकार दिलात. जस्ताप्रमाणे कठीण आणि लोखंडाप्रमाणे न वाकणारा असा तुमचा हट्ट होता.
5 म्हणूनच गोष्टी घडायच्या कितीतरी आधी मी तुम्हाला त्या गोष्टीबद्दल सांगितले, असे सांगण्याचे कारण हेच की आम्ही आमच्या सामर्थ्यावर हे सर्व केले असे तुम्ही म्हणू नये. ‘आमच्या मूर्तीनी हे सर्व घडवून आणले’ असे तुम्ही म्हणू नये म्हणून मी हे केले.”
6 “तुम्ही काय घडले ते पाहिलेत व ऐकलेत. म्हणून तुम्ही ही वार्ता इतरांना सांगावी. आता मी तुम्हांला माहीत नसलेल्या नवीन गोष्टी सांगीन.
7 ह्या गोष्टी पूर्वी घडून गेलेल्या नाहीत. ह्या आता घडत असणाऱ्या गोष्टी आहेत. या आधी तुम्ही कधी या गोष्टींबद्दल ऐकले नसेल. त्यामुळे ‘आम्हांला हे अगोदरच माहीत होते’ असे तुम्ही म्हणू शकणार नाही.
8 “पण जरी मी तुम्हाला भविष्यात घडणार आहे हे सांगितले तरी ते ऐकून घ्यायला तुम्ही अजूनही नकार द्याल. तुम्ही काहीही शिकणार नाही. मी सांगितलेली कोणतीही गोष्ट तुम्ही केव्हाही ऐकली नाही. तुम्ही माझ्याविरूध्द जाल हे मला सुरवातीपासूनच माहीत होते. तुम्ही जन्मल्यापासून माझ्याविरूध्द बंड पुकारले आहे.
9 पण मी सहन करीन. हे मी माझ्यासाठी करीन. तुमच्यावर रागावून तुमचा नाश करीत नाही म्हणून लोक माझी स्तुती करतील. मी केलेल्या प्रतीक्षेबद्दल तुम्ही माझे स्तवन कराल.
10 “पाहा! मी तुम्हांला शुध्द करीन. लोक चांदी शुध्द करण्यासाठी गरम भट्टीचा उपयोग करतात. मी तुम्हांला संकटात टाकून शुध्द करीन.
11 हे मी माझ्यासाठी करीन. मला कमी लेखून तुम्हांला चालणार नाही. माझे वैभव आणि प्रशंसा मी खोट्या देवांच्या वाट्याला जाऊ देणार नाही. माझे नाव मी दूषित का होऊ द्यावे?
12 “याकोबा, माझे ऐक, इस्राएल, मी तुला माझे होण्यासाठी बोलाविले, तेव्हा माझे ऐक. मीच आरंभ आहे आणि मीच अंत आहे.
13 मी माझ्या हाताने पृथ्वी निर्माण केली. माझ्या उजव्या हाताने आकाश निर्माण केले आणि मी जर त्यांना हाक मारली तर ती माझ्यासमोर गोळा होतील.
14 “तुम्ही सगळे इकडे या आणि माझे ऐका. कोणत्याही खोट्या देवाने असे कसे होईल म्हणून तुम्हाला सांगितले का? नाही.” देव इस्राएलवर प्रेम करतो बाबेलबाबत आणि खास्द्यांबाबत देव त्याला पाहिजे ते करील.
15 परमेश्वर म्हणतो, “मी त्याला बोलवीन, असे मी तुम्हाला सांगितले आहे, मी त्याला आणीन आणि मी त्याला यशस्वी करीन.
16 इकडे या आणि माझे ऐका. बाबेल राष्ट्र म्हणून जगायला लागले तेव्हा मी तेथे होतो आणि आरंभापासून मी स्पष्टपणे बोललो का तर लोकांना मी काय म्हणालो ते समजावे.”नंतर यशया म्हणाला, “आता परमेश्वर माझा देव, मला आणि त्याच्या आत्म्याला पुढील गोष्टी सांगायला तुमच्याकडे पाठवितो.
17 मी परमेश्वर तुमचा तारणारा, इस्राएलचा पवित्र देव म्हणतो,“मीच परमेश्वर तुमचा देव आहे. मी तुम्हाला सत्कृत्ये करायला शिकवितो. तुम्ही कोणत्या मार्गाने जावे ह्याचे मी मार्गदर्शन करतो.
18 तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या असत्या तर पूर्ण भरून वाहणाऱ्या नदीप्रमाणे शांती तुमच्याकडे आली असती, समुद्राच्या परत परत येणाऱ्या लाटांप्रमाणे चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा तुमच्याकडे आल्या असत्या.
19 तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या असत्या तर वाळूच्या कणांप्रमाणे खूप संतती तुम्हाला झाली असती आणि तुमचे नाव माझ्यासमोर काढून टाकले गेले नसते अथवा नष्ट केले गेले नसते.
20 माझ्या लोकांनो, बाबेल सोडा, खास्दयापांसून पळा, ही वार्ता लोकांना आनंदाने सांगा. जगातील दूरदूरच्या ठिकाणी ही बातमी पोहोचवा. लोकांना सांगा, “परमेश्वराने त्याचा सेवक याकोब याची सुटका केली.
21 परमेश्वराने त्याच्या लोकांना वाळवंटातून पार नेले पण ते तहानेलेले राहिले नाहीत का? कारण देवाने आपल्या माणसांसाठी खडकातून पाणी वाहायला लावले. त्याने खडक फोडला आणि पाणी बाहेर वाहू लागले.”
22 पण परमेश्वर म्हणतो, “पाप्यांना शांती मिळणार नाही.”
धडा 49

1 दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व लोकांनो, माझे म्हणणे ऐका. जगातील सर्व लोकांनो, माझे ऐका माझ्या जन्मापूर्वीच परमेश्वराने त्याची सेवा करण्यासाठी मला निवडले मी आईच्या गर्भात असतानाच त्याने माझी निवड केली.
2 परमेश्वर त्याचे म्हणणे माझ्याकडून वदवितो. तो माझा उपयोग धारदार तलवारीसारखा करतो. त्याच्या ओंजळीत मला लपवून तो माझे रक्षणही करतो. परमेश्वर टोकदार बाणाप्रमाणे माझा उपयोग करतो, पण तो त्याच्या भाल्यात मला लपवितोही.
3 परमेश्वर मला म्हणाला, “इस्राएल, तू माझा सेवक आहेस. मी तुझ्याबाबत विस्मयकारक गोष्टी करीन.”
4 मी म्हणालो, “मी निरर्थक मेहनत केली. स्वत: झिजून झिजून निरूपयोगी झालो पण काहीही उपयोगी पडणारे केले नाही. मी माझी सर्व शक्ती खर्च केली पण माझ्याहातून काहीच झाले नाही. तेव्हा आता काय करायचे. ते परमेश्वरानेच ठरविले पाहिजे. देवानेच मला काय फळ द्यायचे ते निश्चित केले पाहिजे.
5 मी परमेश्वराचा सेवक व्हावे, याकोबला आणि इस्राएलला मी परत देवाकडे न्यावे, म्हणून मला देवाने जन्माला घातले. परमेश्वर माझा सन्मान करील. मला देवाकडून शक्ती मिळेल.”परमेश्वर मला म्हणाला,
6 “तू माझा फार महत्वाचा सेवक आहेस. इस्राएलचे लोक कैदी आहेत. पण त्यांना माझ्याकडे परत आणले जाईल. याकोबच्या वंशजांचा गोतावळा माझ्याकडे परत येईल. पण तुझे काम दुसरेच आहे, ते ह्या कामा पेक्षा महत्वाचे आहे. मी तुला सर्व राष्ट्रांना प्रकाश देणारा दिवा करीन. जगातील सर्व माणसांचे रक्षण करण्याचा माझा मार्ग तू होशील.”
7 परमेश्वर, इस्राएलचा पवित्र देव, इस्राएलला वाचवितो देव म्हणतो, “माझा सेवक नम्र आहे. तो अधिपतींची सेवा करतो पण लोक त्याचा तिरस्कार करतात पण राजे त्याला पाहतील आणि उभे राहून त्याला मान देतील. मोठे नेते त्याच्यापुढे वाकतील.” परमेश्वराला, इस्राएलच्या पवित्र देवाला हे व्हायला पाहिजे आहे म्हणून असे घडेल, परमेश्वर विश्वासू आहे. ज्याने तुला निवडले तोच तो आहे.
8 परमेश्वर म्हणतो, “माझी दया दाखविण्याची एक खास वेळ असेल. त्यावेळेला मी तुझ्या आळवणीची दखल घेईन. तुला वाचविण्याचा विशेष दिवस असेल. तेव्हा मी तुला मदत करीन. मी तुझे रक्षण करीन. माझा लोकांबरोबर झालेल्या कराराचा तू पुरावा असशील. देशाचा आता नाश झाला आहे पण ती जमीन तू ज्याची त्याला परत देशील.
9 तू कैद्यांना बाहेर येण्यास सांगशील. अंधारात राहणाऱ्या लोकांना तू म्हणशील ‘अंधारातून बाहेर या’ प्रवास करताना लोकांना खायला मिळेल. ओसाड टेकड्यांवरही त्यांना अन्न मिळेल.
10 लोक उपाशी राहणार नाहीत. ते तहानेलेही राहणार नाहीत. तळपणारा सूर्य आणि उष्ण वारे त्यांना इजा करणार नाहीत. का? कारण देव त्यांचे दु:ख हलके करील आणि त्यांना घेऊन जाईल तो त्यांना पाण्याच्या झऱ्याजवळ घेऊन जाईल.
11 “मी माझ्या लोकांसाठी रस्ता तयार करीन. डोंगर सपाट करीन आणि खोलगट रस्त्यावर भर घालून ते उंच करीन.
12 “पाहा! दूरदूरच्या ठिकाणाहून लोक माझ्याकडे येत आहेत उत्तर आणि पश्चिम दिशांकडून ते माझ्याकडे येत आहेत. मिसरमधील सीनीहूनही (आस्वानहूनही) लोक येत आहेत.”
13 हे स्वर्गा आणि हे पृथ्वी, आनंदित व्हा. डोंगरांनो, आनंदाचा कल्लोळ करा. का? कारण परमेश्वर लोकांचे दु:ख हलके करतो. गरिबांवर तो दया करतो.
14 पण आता सियोन म्हणते, “परमेश्वराने मला सोडून दिले, माझा प्रभु मला विसरला.”
15 पण मी म्हणतो, “आई आपल्या बाळाला विसरू शकते का? नाही. आपल्या गर्भातून जन्मलेल्या मुलाला विसरू शकते का? नाही. आई आपल्या मुलाला विसरू शकत नाही आणि मी (परमेश्वर) तुला विसरू शकत नाही.
16 पाहा! मी तुझे नाव माझ्या हातावर लिहिले आहे. मी नेहमी तुझाच विचार करतो.
17 तुझी मुले तुझ्याकडे परत येतील. लोकांनी तुझा पराभव केला पण ते लोक तुला एकटी सोडतील.”
18 वर पाहा, तुमच्या सभोवती पाहा. तुझी मुले एकत्र गोळा होऊन तुझ्याकडे येत आहेत. परमेश्वर म्हणतो, “मी प्रत्यक्ष आहे आणि मी तुला पुढील गोष्टींचे वचन देतो. तुझी मुले गळ्यात शोभून दिसणाऱ्या रत्नांप्रमाणे होतील. नववधूने गळ्यात घालायच्या हाराप्रमाणे ती होतील.
19 आता तुझा नाश केला गेला आहे आणि तुझा पराभव झाला आहे. तुझा देश कुचकामी आहे. पण थोड्या काळानंतर, तुझ्या भूमीवर खूप खूप लोक असतील. तुझा नाश करणारे खूप दूर जातील.
20 तुझ्या हरवलेल्या मुलांसाठी तू दु:खी झालीस. पण ती मुले तुला म्हणतील, “ही जागा फारच लहान आहे. आम्हाला राहायला मोठी जागा दे.’
21 मग तू मनाशी म्हणशील, ‘ही सर्व मुले मला कोणी दिली? हे फार चांगले आहे. मी दु:खी होते आणि एकटी होते. माझा पराभव केला गेला आणि मला माझ्या माणसांपासून दूर केले गेले. मग ही मुले मला कोणी दिली? पाहा मला एकटी सोडले, ही सर्व मुले कोठून आली?”‘
22 परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “बघ, मी हात उंचावून राष्ट्रांना खूण करीन. मी सर्व लोकांना दिसावा म्हणून माझा ध्वज उंच धरीन नंतर ते तुझी मुले तुझ्याकडे आणतील. ते त्यांना खांद्यांवरून आणि हातांतून आणतील.
23 राजे तुझ्या मुलांचे शिक्षक असतील. राजकन्या त्यांची काळजी घेतील. ते राजे व राजकन्या तुझ्यापुढे वाकतील. ते तुझ्या पायाची धूळ आपल्या मस्तकी लावतील. मग तुला कळेल की मीच परमेश्वर आहे. आणि माझ्यावर जो विश्वास ठेवतो त्याची निराशा होत नाही.”
24 जेव्हा एखादा शूर वीर युध्दात संपत्ती जिंकतो, तेव्हा तुम्ही ती त्याच्याकडून काढून घेऊ शकत नाही. जेव्हा एखादा बलवान शिपाई तुरूंगावर पहारा करतो तेव्हा कैदी तुरूंगातून निसटू शकत नाही.
25 पण परमेश्वर म्हणतो, “कैदी पळून जातील. कोणीतरी त्यांना त्या कडक पहाऱ्यातून दूर नेईल. हे कसे होईल? तुझी लढाई मी लढेन. मी तुझ्या मुलांना वाचवीन.
26 “त्या लोकांनी तुला दुखावले पण त्यांना स्वत:चेच मांस खायला मी लावीन. स्वत:च्याच रक्ताची त्यांना मद्यासारखी धुंदी चढेल. मी तुला वाचविले हे प्रत्येकाला माहीत होईल याकोबच्या सामर्थ्यवान परमेश्वराने तुझे रक्षण केले हे सर्वांना समजेल.”
धडा 50

1 परमेश्वर म्हणतो, “इस्राएलच्या लोकांनो, मी, तुमची आई यरूशलेमला, घटस्फोट दिला असे तुम्ही म्हणता. पण मी तिला घटस्फोट दिला हे सिध्द करणारे कायदेशीर कागदपत्रे आहेत का? माझ्या मुलांनो, मी कोणाचे पैसे देणे लागतो का? कर्ज फेडण्यासाठी मी तुम्हांला विकले का? नाही. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांमुळे मी तुम्हाला देऊन टाकले. तुमच्या आईने केलेल्या पापांमुळे मी तिला दूर केले.
2 मी घरी आलो तर घरी कोणीच नव्हते. मी खूप हाका मारल्या पण कोणीच उत्तर दिले नाही. मी तुमचे रक्षण करू शकणार नाही असे तुम्हाला वाटते का? तुमच्या सर्व संकटातून वाचविण्याचे सामर्थ्य माझ्यापाशी आहे. बघा! जर मी समुद्राला वाळून जाण्याची आज्ञा दिली, तर तो वाळून जाईल. मग पाणी नसल्याने मासे मरतील आणि त्यांना दुर्गंधी सुटेल.
3 मी आकाश काळे करू शकतो. मी काळोखाने आकाश शोकप्रदर्शक कपड्याइतके काळे करू शकतो.”
4 परमेश्वर, माझ्या प्रभूने, मला शिकविण्याची क्षमता दिली. तेव्हा आता या दु:खी लोकांना मी शिकवितो. रोज सकाळी तो मला उठवितो व विद्यार्थ्याप्रमाणे शिकवितो.
5 परमेश्वर, माझा प्रभू, मला शिकायला मदत करतो आणि मीही त्याच्याविरूध्द कधी गेलो नाही. मी त्याला अनुसरण्याचे सोडणार नाही.
6 मी त्या लोकांना मला मारू देईन. मी माझ्या दाढीचे केस त्यांना ओढू देईन. ते जेव्हा माझी निंदा करतील आणि माझ्या तोंडावर थुकंतील तेव्हा मी माझे तोंड लपविणार नाही.
7 परमेश्वर माझा प्रभु मला मदत करील. म्हणूनच लोकांनी माझी निंदा केली तरी मला त्रास होणार नाही. मी भक्कम होईन. माझी निराशा होणार नाही हे मला माहीत आहे.
8 परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. मी निष्पाप आहे हे तो जाणतो, म्हणून मी अपराधी आहे असे कोणीही म्हणू शकणार नाही. मी चुकत आहे असे कोणाला सिध्द करावेसे वाटत असेल तर त्याने माझ्याकडे यावे. आपण परीक्षा पाहू.
9 पण लक्षात ठेवा, माझा प्रभु मला मदत करतो. म्हणून कोणीही मला पापी ठरवू शकणार नाही. ते सर्व लोक जीर्ण जुन्या वस्त्राप्रमाणे होतील. कसर त्यांना खाईल.
10 परमेश्वराला मानणारे लोक परमेश्वराच्या सेवकाचे ऐकतात. तो सेवक, काय घडणार आहे हे माहीत नसताना, पूर्णपणे देवावर विश्वास ठेवून जगतो. त्याला देवाच्या नावाबद्दल खात्री वाटते आणि तो त्यावर अवलंबून राहातो.
11 “पाहा! तुम्ही लोक स्वत:च्या इच्छेप्रमाणे राहू इच्छिता. तुम्ही स्वत:चा अग्नी पेटविता आणि मशाली पाजळता. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे राहा. पण तुम्हाला शिक्षा होईल. स्वत:च पेटविलेल्या आगीत तुम्ही पडाल आणि जळाल. मी हे घडवून आणीन.”
धडा 51

1 “तुम्ही काही लोक चांगले जीवन जगण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करता. तुम्ही मदतीसाठी परमेश्वराकडे धाव घेता. माझे ऐका. तुम्ही तुमचे वडील अब्राहाम यांच्याकडे पाहावे तुम्हाला ज्यापासून कापून काढले तो तो खडक आहे.
2 अब्राहाम तुमचा पिता आहे. तुम्ही त्याच्याकडे पाहावे. जिने तुम्हाला जन्म दिला त्या साराकडे तुम्ही पाहावे. मी बोलाविले तेव्हा अब्राहाम एकटा होता. मी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याने मोठ्या वंशाचा आरंभ केला. त्याचा वंश खूप वाढला.”
3 त्याचप्रमाणे परमेश्वर सियोनचे आणि तिच्या उदध्वस्त ठिकाणांचे सांत्वन करील. परमेश्वराला तिच्याबद्दल आणि तिच्या लोकांबद्दल खूप वाईट वाटेल. तो तिच्यासाठी खूप काही करील. परमेश्वर वाळवटांचे रूप बदलेल. ते एदेनच्या बागेसारखे होईल. ती ओसाड जमीन देवाच्या बागेसारखी होईल. तेथील लोक खूप खूप सुखी होतील. ते आनंद व्यक्त करतील. ते आभाराची व विजयाची गीते गातील.
4 “माझ्या लोकांनो, माझे ऐका. नियम माझ्यापासूनच पुढे सुरू होतील. मी लोकांना प्रकाश ठरेल असा न्याय ठरवीन.
5 मी न्यायी आहे हे मी लवकरच दाखवीन. मी लवकरच तुम्हाला वाचवीन. मी माझ्या सामर्थ्याच्या बळावर सर्व राष्ट्रांचा न्यायनिवाडा करीन. दूरदूरची ठिकाणे माझी वाट पाहत आहेत. ते त्यांच्या मदतीसाठी माझ्या सामर्थ्याची वाट पाहत आहेत.
6 वर स्वर्गाकडे पाहा, खाली पृथ्वीवर तुमच्या सभोवती पाहा. धुक्याच्या ढगाप्रमाणे आकाश नाहीसे होईल. पृथ्वी वृध्द होईल. पृथ्वीवरची माणसे मरतील, पण माझे तारण अनंत कालापर्यंत चालू राहील. माझ्या चांगुलपणाला अंत नाही.
7 ज्यांना चांगुलपणा म्हणजे काय ते कळते त्यांनी माझे ऐकावे. माझ्या शिकवणुकीप्रमाणे वागणाऱ्यांनी मी काय सांगतो ते ऐकावे. दुष्टांना घाबरू नका. त्यांनी तुमची निंदा केली तरी भिऊ नका.
8 का? त्यांची अवस्था जुन्या वस्त्राप्रमाणे होईल. कसर त्याना खाईल. ते लाकडाप्रमाणे होतील. वाळवी त्यांना खाईल. पण माझा चांगुलपणा चिरंतन राहील. माझे तारण अखंड चालू राहील.”
9 परमेश्वराच्या बाहूंनो जागे व्हा (सामर्थ्या) जागा हो ऊठ आणि बलवान हो. प्राचीन काळी वापरली होतीस तशी तुझी शक्ती वापर. राहाबचा पराभव करणारी शक्ती तूच आहेस. तू आक्राळ-विक्राळ मगरीचा पराभव केलास.
10 समुद्र आटवायला तू कारणीभूत झालास. मोठ्या डोहातील पाणी तू आटविलेस. समुद्रातील अती सखोल भागाचा तू रस्ता केलास. तुझे लोक त्या रस्त्यावरून पार झाले आणि वाचविले गेले.
11 परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करील. ते आनंदाने सियोनला परततील. ते खूप खूप सुखी होतील. त्यांचे सुख त्यांच्या डोक्यांवरील मुकुटांप्रमाणे निरंतर राहील. ते आनंदाने गात राहतील. सर्व दु:ख कायमचे नाहीसे होईल.
12 परमेश्वर म्हणतो, “मीच तो एकमेव ज्याने तुमचे दु:ख हलके केले. मग तुम्ही लोकांना का भ्यावे? ती जन्म मृत्यु पावणारी माणसेच आहेत. ते फक्त मनुष्यप्राणी आहेत. ते गवताप्रमाणे मरतात.”
13 परमेश्वराने तुम्हाला निर्माण केले. त्याच्या सामर्थ्याने त्याने पृथ्वी निर्माण केली. आपल्या सामर्थ्याच्या जोरावरच त्याने पृथ्वीवर आकाश पसरविले. पण तुम्ही तुमचा निर्माता, देव आणि त्याच्या सामर्थ्याला विसरता म्हणूनच तुम्हाला दुखविणाऱ्या आणि रागावलेल्या माणसाला तुम्ही नेहमी घाबरता. त्या लोकांनी तुमच्या नाशाचा कट केला, पण आता ते कोठे आहेत? ते सर्व गेले.
14 तुरूंगातील कैद्यांना लवकरच सोडून देण्यात येईल. ते तुरूंगात कुजून मरणार नाहीत. त्यांना पोटभर अन्न मिळेल.
15 “मी, परमेश्वर, तुमचा देव आहे, मी समुद्र घुसळतो आणि लाटा निर्माण करतो.” (सर्वशक्तिमान परमेश्वर हेच त्याचे नाव आहे.)
16 “माझ्या सेवका, मी माझे शब्द तुझ्या तोंडी घालीन. मी तुला माझ्या हाताने झाकून तुझे रक्षण करीन. नवीन स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करण्यासाठी मी तुझा उपयोग करीन. इस्राएलला ‘तुम्ही माझे लोक आहात.’ हे सांगण्यास मी तुला सांगीन.”
17 ऊठ, ऊठ, यरूशलेम, जागी हो. परमेश्वर तुझ्यावर फार रागावला होता. म्हणून तुला शिक्षा झाली. विषाचा प्याला प्यायला लागावा तशी ही शिक्षा होती. तू तो विषाचा प्याला प्यायलीस.
18 यरूशलेममध्ये खूप लोक होते. पण त्यातील कोणीही तिचे नेते झाले नाहीत. तिने वाढविलेली कोणीही मुले, तिला पुढे नेण्यास, मार्गदर्शक झाली नाहीत.
19 दोन-दोनच्या गटाने यरूशलेमवर संकटे आली चोरी आणि नुकसान, भूक आणि युध्द.तू संकटात असताना तुला कोणीही मदत केली नाही. कोणी तुझ्यावर दया केली नाही.
20 तुझे लोक दुबळे होऊन जमिनीवर पडले आणि तिथेच पडून राहिले. प्रत्येक चौकात ते पडून राहिले. ते जणू जाळ्यात पकडलेले प्राणी होते. त्यांना आणखी शिक्षा सहन न होईपर्यंत परमेश्वराने रागाने त्यांना शिक्षा केली. जेव्हा देव त्यांना म्हणाला की मी तुम्हाला आणखी शिक्षा करीन, तेव्हा ते अगदीच लोळागोळा झाले.
21 ऐक, बिचाऱ्या यरूशलेम, ऐक, मद्यप्याप्रमाणे तू दुबळी झाली आहेस. पण तू मद्य घेतले नाहीस. “त्या विषाच्या प्याल्याने” तुला दुर्बल केले आहे.
22 तुझा देव, प्रभू परमेश्वर, त्याच्या लोकांसाठी लढेल. तो तुला म्हणतो, “मी हा ‘विषाचा प्याला’ (शिक्षा) तुझ्यापासून दूर करीत आहे. मी आता तुझ्यावर रागावणार नाही. ह्यापुढे माझ्या रागामुळे तुला शिक्षा होणार नाही.
23 आता तुला ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर मी माझा राग काढीन व त्यांना शिक्षा करीन. त्या लोकांनी तुला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ते तुला म्हणाले, ‘आमच्यापुढे वाक. आम्ही तुला तुडवून जाऊ.’ त्यांनी बळजबरीने तुला वाकविले आणि माती तुडवल्याप्रमाणे ते तुझ्या पाठीवरून चालले. तू जणू काही त्यांचा रस्ता होतीस.”
धडा 52

1 ऊठ, सियोन ऊठ. कपडे घालून तयार हो. बलशाली हो. पवित्र यरूशलेम, तुझी सुंदर वस्त्रे परिधान कर. ज्यांनी देवाला अनुसरायचे नाकारले आहेअसे लोक पुन्हा कधीही तुझ्यात प्रवेश करणार नाहीत. ते लोक शुध्द आणि निर्मळ नाहीत.
2 तुझ्या अंगावरची धूळ झटक, चांगली वस्त्रे परिधान कर. यरूशलेम, सियोनकन्ये, तू उठून बस, तू कैदी होतीस. पण आता तुझ्या गळ्याभोवती आवळल्या गेलेल्या पाशापासून स्वत:ची मुक्तता कर.
3 परमेश्वर म्हणतो, “तुला पैशासाठी विकले नव्हते. म्हणून, तुझी मुक्तता करण्यासाठी, मी पैशाचा उपयोग करणार नाही.”
4 परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “माझ्या माणसांनी प्रथम मिसरमध्ये वस्ती केली आणि मग ते गुलाम झाले, नंतर अश्शूरने त्यांना गुलाम केले.
5 काय घडले आहे ते आता पाहा दुसऱ्या एका राष्ट्राने माझ्या लोकांना ताब्यात घेतले आहे. माझ्या लोकांना गुलामाप्रमाणे ताब्यात घेणारे हे राष्ट्र कोणते? माझ्या लोकांना गुलाम म्हणून घेताना त्यांनी काहीही किंमत मोजली नाही. हे राष्ट्र माझ्या लोकांवर सत्ता गाजविते. त्यांची थट्टा करते. ते लोक नेहमीच माझी निंदा करतात.”
6 परमेश्वर म्हणतो, ‘असे घडले आहे. पण त्यामुळेच माझ्या लोकांना माझी ओळख पटेल. मी कोण आहे हे त्यांना कळेल. लोकांना माझा लौकिक कळेल आणि त्यांच्याशी बोलणारा मी म्हणजेच तोआहे हे समजेल.’
7 “शांती प्रस्थापित झाली आहे चांगुलपणा आला आहे. तारण झाले आहे. सियोन, तुमचा देव हाच राजा आहे.” अशी घोषणा देवदूताकडून ऐकणे असे शुभवर्तमान घेऊन टेकड्यांवरून येणारा देवदूताचा आवाज ऐकणे ही खरोखरच विस्मयकारक गोष्ट आहे.
8 टेहळणी करणारेआरडाओरडा करतात. ते सर्व मिळून आनंद व्यक्त करीत आहेत का? कारण त्यांच्यातील प्रत्येकाने परमेश्वराला सियोनला परत येताना पाहिले आहे.
9 यरूशलेमा, तुझ्या नाश झालेल्या इमारती पुन्हा आनंदित होतील. तुम्ही सर्व मिळून आनंद साजरा कराल का? कारण परमेश्वराने त्याच्या लोकांना सुखी केले आहे. त्याने यरूशलेमला मुक्त केले आहे.
10 परमेश्वर त्याची पवित्र शक्ती सर्व राष्ट्रांना दाखवील. देव त्याच्या लोकांना कसे वाचवितो हे अती दूरच्या सर्व देशांना दिसेल.
11 तुम्ही लोकांनी बाबेल सोडावे. ते ठिकाण सोडा, याजकांनो, पुजेचे साहित्य नेण्यासाठी स्वत:ला शुध्द करा. अपवित्र गोष्टींना स्पर्श करू नका.
12 तुम्ही बाबेल सोडाल. पण ते तुम्हाला घाईने बाबेल सोडण्याची सक्ती करणार नाहीत. ते लोक तुम्हाला पळून जाण्यास भाग पाडणार नाहीत. तुम्ही निघून याल. आणि परमेश्वर तुमच्याबरोबर असेल. परमेश्वर तुमच्या पुढे असेल. आणि इस्राएलचा देव तुमच्या पाठीशी असेल.
13 “माझ्या सेवकाकडे पाहा. तो नक्कीच यशस्वी होईल.त्याला अतिशय महत्व येईल. भविष्यात लोक त्याचा आदर करतील. त्याला मान देतील.
14 “माझ्या सेवकाला पाहून खूप लोकांना धक्का बसला. त्याला इतकी दुखापत झाली होती की मनुष्य म्हणून त्याला ओळखणे त्यांना शक्य नव्हते.
15 पण त्यांना अधिकच आश्चर्य वाटेल. राजे त्यांच्याकडे आश्चर्याने पाहातील पण ते एकही शब्द बोलणार नाहीत. माझ्या सेवकाची गोष्ट ह्या लोकांनी ऐकलेली नाही. काय झाले ते त्यांनी पाहिले. त्यांनी जरी ती गोष्ट ऐकली नसली तरी त्यांना ती सर्व समजलेली आहे.”
धडा 53

1 “आम्ही जाहीर केलेल्या गोष्टींवर खरा विश्वास कोणी ठेवला? परमेश्वराने केलेली शिक्षा खरोखरी कोणी स्वीकारली?
2 तो एखाद्या रोपट्याप्रमाणे परमेश्वरासमोर वाढला. ओसाड जमिनीवर वाढणाऱ्या अंकुराप्रमाणे तो होता. त्याच्यात काही विशेष नव्हते. त्याला विशेष शोभा नव्हती. आपण त्याच्याकडे पाहिल्यावर तो आपल्याला आवडावा असे त्याच्यात काहीही वैशिष्ट्य नव्हते.
3 लोकांनी त्याची चेष्टा केली. आणि त्याचे मित्र त्याला सोडून गेले. तो खूप दु:खी व व्यथित माणूस होता. घृणा व दु:ख म्हणजे काय हे त्याला चांगले समजले होते. लोक त्याच्याकडे साधे पाहण्याचेही कष्ट घेत नव्हते. तो आमच्या लक्षातही आला नाही.
4 पण त्याने आमचा त्रास स्वत:चा मानला. त्याने आमचे दु:ख आणि वेदना स्वत: भोगल्या आम्हाला वाटले की देव त्यालाच शिक्षा करीत आहे, त्याने केलेल्या कर्मांबद्दल त्याला ताडन करीत आहे.
5 पण आमच्या दुष्कृत्यांबद्दल त्याला दु:ख भोगावे लागले. आमच्या अपराधांमुळे तो भरडला गेला. आमचे कर्ज, आमची शिक्षा, त्याच्यावर लादली गेली. त्याने दु:ख सहन केले. म्हणून आम्ही बरे झालो.
6 पण त्याने एवढे सगळे केल्यानंतरही आपण मेंढ्यांप्रमाणे भरकटत गेलो. आम्ही प्रत्येकजण स्वत:च्या मार्गाने गेलो परमेश्वराने आपल्याला अपराधातून मुक्त केल्यावर आणि आपले अपराध त्याच्या नावावर केल्यावर आपण असे वागलो.
7 त्याला इजाही झाली आणि शिक्षाही झाली. पण त्याने कधीही तक्रार केली नाही. ठार मारायला नेणाऱ्या मेंढीप्रमाणे तो अगदी गप्प राहिला. मेंढ्यांची लोकर कापताना तो जसा शांत असतो तसा तो शांत होता. स्वत:चा बचाव करण्यासाठी त्याने कधीही तोंड उघडले नाही.
8 लोकांनी बळजबरीने त्याला नेले आणि त्याला योग्य न्याय दिला नाही. त्याला मृत्युलोकातून उचलून आणल्यामुळे त्याच्या वारसांविषयी कोणी काहीही सांगू शकत नाही. माझ्या लोकांच्या पापाची किंमत मोजण्यासाठी त्याला शिक्षा केली गेली.
9 तो मेल्यावर त्याला श्रीमंताबरोबर पुरले. त्याने काहीही चूक केली नव्हती. तो कधीही खोटे बोलला नाही पण तरीही त्याच्या बाबतीत हे घडून आले.
10 परमेश्वराने त्याला चिरडून टाकण्याचे ठरविले आणि परमेश्वराने दु:ख भोगलेच पाहिजे असे निश्चित केले. म्हणून सेवक स्वत:चा बळी देण्यास तयार झाला. पण त्याला नवे जीवन मिळेल आणि तो खूप खूप जगेल. तो त्याच्या लोकांना पाहील. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, सेवकाने करायच्या, सर्व गोष्टी तो पूर्ण करील.
11 त्याच्या आत्म्याला खूप क्लेश होतील. पण चांगल्या गोष्टी घडताना तो पाहील. तो जे शिकेल त्याबद्दल तो समाधान पावेल. माझा सज्जन सेवक, अनेक लोकांना त्यांच्या अपराधांतून, मुक्त करील. आणि त्यांच्या पापांचे ओझे स्वत:च्या खांद्यावर घेईल.
12 ह्यामुळेच मी त्याला सर्व लोकांत श्रेष्ठ बनवीन. बलवान माणसांबरोबर त्याला प्रत्येक गोष्टीत वाटा मिळेल. मी त्याच्यासाठी हे सर्व करीन कारण तो लोकांसाठी जगला आणि मेला. लोकांनी त्याला गुन्हेगार म्हटले. पण त्याने पुष्कळ लोकांच्या पापांचे ओझे स्वत: वाहिले. आणि तो पापी लोकांकरीता बोलतो आहे.”
धडा 54

1 स्त्रिये, सुखी हो. तुला मुले नाहीत. पण तू सुखी असावेस. परमेश्वर म्हणतो, “एकट्या असणाऱ्या बाईला.नवरा असणाऱ्या बाईपेक्षा जास्त मुले होतील.”
2 तुझा तंबू मोठा कर. तुझी दारे सताड उघड. तुझ्या घराचा आकार वाढव तुझा तंबू मोठा आणि मजबूत कर.
3 का? कारण तुझा पसारा खूप वाढणार आहे. खूप राष्ट्रातील लोक तुझ्या मुलांना येऊन मिळणार आहेत. तुझे वंशज राष्ट्रांची व्यवस्था लावतील आणि नाश झालेल्या शहरातून पुन्हा तुझी मुले वस्ती करतील.
4 घाबरू नकोस. तुझी निराशा होणार नाही. लोक तुझी निंदा करणार नाहीत. तुला ओशाळवाणे व्हावे लागणार नाही. तू तरूण असताना तुला लज्जित व्हावे लागले. पण आता तू ते विसरशील. पती गेल्यावर तुझी झालेली अप्रतिष्ठा तुला आठवणार नाही.
5 कारण तुझा पती हा तुझा निर्माता म्हणजेच देव आहे. त्याचे नाव सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. इस्राएलला वाचविणारा एक तोच आहे तो इस्राएलचा पवित्र देव आहे. आणि त्याला सर्व पृथ्वीचा पवित्र देव म्हटले जाईल.
6 तू परित्यक्ता स्त्रीप्रमाणे होतीस. तू मनातून फार दु:खी होतीस. पण देवाने तुला आपली मानले. पतीने तरूणपणीच सोडून दिलेल्या स्त्रीप्रमाणे तुझी अवस्था होती. पण परमेश्वराने तुला आपली मानले.
7 देव म्हणतो, “मी तुला सोडले ते थोड्या वेळापुरतेच. मी तुला माझ्यात सामावून घेईन आणि तुझ्यावर कृपा करीन.
8 मला खूप राग आला होता म्हणून मी थोड्या वेळापुरता तुझ्यापासून लपून बसलो. पण मी तुझ्यावर अखंड कृपा करून तुझे दु:ख हलके करीन.” परमेश्वर, तुझा तारणहार असे म्हणाला.
9 देव म्हणतो, “नोहाच्या काळात प्रलय आणून मी जगाला शिक्षा केली होती ते आठव. पण, पुन्हा प्रलय घडवून जग नष्ट करणार नाही असे वचन मी नोहाला दिले होते. त्याचप्रमाणे मी आता तुला वचन देतो की मी तुझ्यावर कधी रागावणार नाही आणि तुझी खरडपट्टी ही काढणार नाही.”
10 परमेश्वर म्हणतो, “एकवेळ डोंगर नाहीसे होतील, टेकड्यांचे रूपांतर धुळीत होईल. पण माझी तुझ्यावरची कृपा कधीही नाहीशी होणार नाही. मी स्थापन केलेली शांती चिरंतन राहील.” तुझ्यावर कृपा करणारा परमेश्वरच हे सगळे सांगत आहे.
11 “बिचाऱ्या नगरी, वादळाप्रमाणे शत्रू तुझ्यावर चालून आले आणि कोणीही तुझे सांत्वन केले नाही. पण मी तुला पुन्हा उभारीन. तुझ्या वेशीच्या पायासाठी मी अतिशय चांगला चुना वापरीन. मी पाया घालताना इंद्रनील वापरीन.
12 वेशीच्या भिंतीवरील दगड माणकांचे बसवीन. वेशीच्या दारासाठी मी चकाकणारी रत्ने वापरीन. वेशीसाठी मी हिरेमाणके वापरीन.
13 तुझी मुले देवाला अनुसरतील. आणि तो त्यांना शिक्षण देईल. मग तुझ्या मुलांना खरोखरच शांतता मिळेल.
14 चांगुलपणाच्या पायावर तुझी उभारणी होईल. म्हणून क्रौर्य आणि भय यांपासून तू सुरक्षित असशील. तुला कशाची भीती बाळगण्याचे कारण पडणार नाही. कशापासूनही तुला इजा होणार नाही.
15 माझे कोणतेही सैन्य तुझ्याविरूध्द लढणार नाही. आणि समजा कोणी तुझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाच तर तू त्याचा पराभव करशील.
16 “बघ! मी लोहार निर्मिला. तो विस्तव फुलावा म्हणून हवा फुंकतो. मग तापलेल्या लोखंडापासून त्याला पाहिजे तसे हत्यार तो बनवितो. त्याचप्रमाणे मी ‘नाश’ करणारा घडविला आहे.
17 “लोक तुझ्याविरूध्द लढण्यासाठी शस्त्रे तयार करतील. पण ती शस्त्रे तुझा पराभव करणार नाहीत. काही लोक तुझ्याविरूध्द बोलतील पण जो असे बोलेल त्याला त्याची चूक दाखवून दिली जाईल.”देव म्हणतो, “देवाच्या सेवकांना काय मिळेल? त्यांना माझ्याकडून आलेल्या चांगल्या गोष्टी मिळतील.”
धडा 55

1 “तहानलेल्यांनो, या आणि पाणी प्या. तुमच्याजवळ पैसा नसला तरी काळजी करू नका. या आणि पोटभर खा, प्या. अन्न आणि मद्य ह्यासाठी पैसे पडणार नाहीत.
2 जे खरोखरचे ‘अन्न’ नाही त्यासाठी पैसे वाया का घालविता? तुम्हाला ज्यापासून समाधान मिळत नाही असे काम तुम्ही का करता? माझे लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला चांगले अन्न मिळेल. तुमच्या जीवाला तृप्ती देणाऱ्या अन्नाचा आनंद तुम्हाला मिळेल.
3 मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका. म्हणजे तुम्ही जगाल तुम्ही माझ्याकडे या. मी तुमच्याशी चिरकालासाठी करार करीन. हा करार मी दावीदबरोबर केलेल्या करारासारखा असेल. मी दावीदला वचन दिले होते की मी अखंड त्याच्यावर प्रेम करीन व त्याच्यावर विश्वास ठेवीन. तुम्ही त्या करारावर विश्वास ठेवू शकता.
4 मी, सर्व राष्ट्रांकरिता, दावीदला माझ्या सामर्थ्याचा साक्षीदार केले. दावीद अनेक देशांचा राजा आणि सेनापती होईल असे मी त्याला वचन दिले.”
5 आता, काही राष्ट्रे कोठे आहेत हे तुम्हाला माहीत नाही. पण त्यांची आणि तुमची भेट होईल. त्या राष्ट्रांना, तुम्ही माहीत नाही. पण ती राष्ट्रे तुमच्याकडे धाव घेतील. परमेश्वराची, तुमच्या देवाची इच्छा असल्यामुळे हे असे घडून येईल. इस्राएलचा पवित्र देव तुमचा आदर करीत असल्याने हे असे होईल.
6 म्हणून फार उशीर होण्याआधी परमेश्वराला शोधा. तो जवळ असतानाच त्याला बोलवा.
7 दुष्टांनी दुष्टपणाने जगणे थांबवावे. त्यांनी वाईट विचार सोडून द्यावे. त्यांनी परमेश्वराला शरण यावे. मग परमेश्वर त्यांचे दु:ख हलके करील. आमचा देव क्षमाशील आहे म्हणून त्यांनी परमेश्वराला शरण जावे.
8 परमेश्वर म्हणतो, “तुमचे विचार माझ्यासारखे नाहीत. तुमचे मार्ग माझ्या मार्गांसारखे नाहीत.
9 स्वर्ग पृथ्वीपेक्षा उंच आहे. त्याचप्रमाणे माझे मार्ग आणि विचार तुमच्यापेक्षा उच्च आहेत.” परमेश्वर स्वत: असे म्हणाला.
10 “पाऊस वा बर्फ आकाशातून पडल्यावर पुन्हा आकाशात जात नाही तर तो जमीन भिजवितो, नंतर जमिनीतून रोपे अंकुरतात आणि वाढतात. त्यापासून शेतकऱ्यांना बी मिळते आणि लोकांना धान्य मिळते. धान्याची लोक भाकरी करतात.
11 तसेच माझ्या तोंडातून निघालेले शब्द परत येत नाहीत तर त्या शब्दाप्रमाणे गोष्टी घडतात. म्हणजेच माझे शब्द मला पाहिजे असलेल्या गोष्टी घडवून आणतात. मी त्यांना ज्या गोष्टी करण्यासाठी पाठविलेले असते त्या गोष्टी करण्यात ते यशस्वी होतात.
12 माझे शब्द आनंदाने बाहेर जातील आणि शांती घेऊन येतील. डोंगर आणि टेकड्या आनंदाने नाचू लागतील. शेतांतील झाडे आनंदाने टाळ्या वाजवतील.
13 जेथे झुडुपे होती, तेथे देवदारू वाढतील. काट्याकुट्यांच्या जागी मेंदी उगवेल. ह्या गोष्टी परमेश्वराला सुप्रसिध्द करतील. ह्या गोष्टी म्हणजे परमेश्वराच्या सामर्थ्याचे पुरावे असतील. हे पुरावे कधीही नष्ट होणार नाहीत.”
धडा 56

1 परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या, “सगळ्या लोकांशी न्याय्यबुध्दीने वागा. योग्य गोष्टीच करा. का? लवकरच माझे तारण तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. माझा चांगुलपणा लवकरच सर्व जगाला दिसेल.”
2 जो देवाचा शब्बाथचा नियम पाळतो त्याला देवाचा आशीर्वाद मिळेल. जो माणूस पाप करीत नाही. तो सुखी होईल.
3 यहुदी नसलेले काही लोक देवाला येऊन मिळतील. ह्या लोकांनी असे म्हणू नये “देव त्याच्या लोकांबरोबर आमचा स्वीकार करणार नाही.” नपुसंकाने असे म्हणू नये “मी म्हणजे वठलेला वृक्ष आहे. मला मुले होऊ शकत नाहीत.”
4 ह्या नपुसकांनी असे म्हणू नये कारण परमेश्वर म्हणतो, “ह्यातील काही शब्बाथचा नियम पाळतात. मला पाहिजे त्याच गोष्टी निवडून करतात. खरोखरच ते माझ्या कराराप्रमाणेवागतात म्हणून मी माझ्या मंदिरात त्यांच्या स्मरणार्थ एक शिला ठेवीन. माझ्या नगरात त्यांच्या नावांचे स्मरण केले जाईल. मी त्यांना संततीपेक्षा काही चांगल्या गोष्टी देईन. मी त्यांना चिरंतन राहणारे नाव ठेवीन. मी त्यांना माझ्या माणसांतून तोडून अलग करणार नाही.”
5
6 यहुदी नसलेले काही लोक परमेश्वराची सेवा करण्यासाठी आणि परमेश्वराच्या प्रेमाखातर स्वत:हून परमेश्वराला येऊन मिळतील. ते परमेश्वराचे सेवक होण्यासाठी येतील. ते शब्बाथचा दिवस हा उपासनेचा विशेष दिवस मानतील. आणि काटेकोरपणे माझ्या कराराचे (नियमांचे) सतत पालन करतील.
7 परमेश्वर म्हणतो, “मी त्या लोकांना माझ्या पवित्र डोंगरावर आणीन. माझ्या प्रार्थनाघरात मी त्यांना सुखी करीन. त्यांनी मला अर्पण करण्यासाठी आणलेले होमबली आणि मला वाहण्यासाठी आणलेल्या वस्तू मला आवडतील. का? कारण माझे मंदिर सर्व राष्ट्रांचे प्रार्थनाघर होईल.”
8 परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला.इस्राएलच्या लोकांना सक्तीने त्यांचा देश सोडावा लागला. पण परमेश्वर पुन्हा त्यांना एकत्र गोळा करील. परमेश्वर म्हणतो, “मी ह्या लोकांना गोळा करून एकत्र करीन.”
9 वन्य पशूंनो, या व खा.
10 रक्षक (संदेष्टे) आंधळे आहेत. ते काय करीत आहेत ते त्यांना समजत नाही. न भुंकणाऱ्या कुत्र्यांप्रमाणे ते आहेत. ते फक्त आडवे पडून झोपा काढतात. हो! त्यांना झोपायला आवडते.
11 ते भुकेल्या कुत्र्यांप्रमाणे आहेत. त्यांचे कधीच समाधान होत नाही. मेंढपाळांना आपण काय करीत आहोत हे माहीत नाही. ते त्यांच्या भटकल्या गेलेल्या मेंढ्यांप्रमाणे आहेत. ते हावरट आहेत. त्यांना फक्त स्वत:चा लाभ हवा आहे.
12 ते येऊन म्हणतात, “आम्ही थोडा द्राक्षरस पिऊ, आम्ही थोडे मद्य पिऊ. आम्ही उद्याही असेच करू. फक्त थोडे जास्त मद्य पिऊ.”
धडा 57

1 सर्व सज्जन माणसे नष्ट झाली. ह्याची कोणी साधी दखलही घेतली नाही. सज्जन लोक एकत्र जमले पण का ते त्यांना कळत नाही, तेव्हा संकटापासून वाचविण्यासाठी सज्जनांना दूर नेले गेले हे कोणालाही समजले नाही.
2 पण शांती येईल, लोक स्वत:च्या खाटल्यावर विश्रांती घेतील. आणि देवाच्या इच्छेप्रमाणे ते जीवन जगतील.
3 “चेटकिणीच्या मुलांनो, इकडे या. तुमच्या वडिलांनी व्यभिचार केला. त्यामुळे ते अपराधी आहेत. तुमची आई देहविक्रय करते. तुम्ही इकडे या.
4 तुम्ही दुष्ट आणि खोटारडी मुले आहात. तुम्ही माझी चेष्टा करता. तुम्ही मला वेडावून दाखविता. तुम्ही मला जीभ काढून दाखविता.
5 तुम्हाला प्रत्येकाला हिरव्या झाडाखाली फक्त खोट्या देवांची पूजा करायची आहे. प्रत्येक झऱ्याकाठी तुम्ही मुले ठार मारता आणि खडकाळ प्रदेशात त्यांचे बळी देता.
6 नदीतल्या गुळगुळीत गोट्यांची पूजा करायला तुम्हाला आवडते. त्यांची पूजा करण्यासाठी तुम्ही त्यांच्यावर मद्य ओतता, त्यांना बळी अर्पण करता. पण तुम्हाला त्या दगडांशिवाय काही मिळत नाही. ह्यामुळे मला आनंद होतो असे तुम्हाला वाटते का? नाही. मला ह्यामुळे अजिबात आनंद होत नाही. प्रत्येक टेकडीवर व उंच डोंगरावर तुम्ही तुमचे अंथरूण तयार करता.
7 तुम्ही ह्या ठिकाणी जमता आणि बळी अर्पण करता.
8 मग तुम्ही त्या अंथरूणात शिरता आणि त्या खोट्या देवांवर प्रेम करता. अशाप्रकारे वागणे हे माझ्याविरूध्द आहे. असे वागून तुम्ही पापे करता. तुम्ही त्या देवांवर प्रेम करता. त्यांची नग्न शरीरे पाहायला तुम्हाला आवडते. प्रथम तुम्ही माझ्याबरोबर होता. पण त्यांच्यासाठी तुम्ही मला सोडले. माझी आठवण तुम्हाला करून देणाऱ्या वस्तू तुम्ही लपवून ठेवता. तुम्ही अशा वस्तू दारामागे वा दाराच्या खांबामागे लपवून ठेवता व मग त्या खोट्या देवांकडे जाऊन त्यांच्याबरोबर करार करता.
9 तुम्ही मोलेखला चांगले दिसावे म्हणून तेले आणि अत्तरे वापरता. तुम्ही तुमचे दूत अती दूरच्या देशांत पाठविले. हे तुमचे कृत्यु तुम्हाला अधोलोकात पोहोचवील.
10 “ह्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत केली. पण तुम्ही कधीच दमला नाहीत. तुम्हाला या गोष्टींमुळे आनंद मिळत असल्याने तुम्हाला नवीन शक्ती प्राप्त झाली.
11 तुम्हाला माझी उठवण झाली नाही. तुम्ही माझी दखलही घेतली नाही. मग तुम्ही कोणाची काळजी करीत होता? तुम्ही कोणाला भीत होता? तुम्ही खोटे का बोललात? पाहा! मी बराच वेळ गप्प बसलो आणि तुम्ही माझा मान ठेवला नाहीत.
12 मी तुमच्या ‘चांगुलपणाबद्दल’ आणि सर्व ‘धार्मिक’ कृत्यांबद्दल सांगू शकलो असतो पण त्या गोष्टीत काही अर्थ नाही.
13 जेव्हा तुम्हाला मदतीची जरूर असते, तेव्हा तुम्ही तुमच्याभोवती जमविलेल्या खोट्या देवांची करूणा भाकता. पण मी तुम्हाला सांगतो की वाऱ्याची फुंकर सुध्दा त्या देवाना दूर उडवून देईल. झंझावात त्यांना तुमच्यापासून दूर नेईल. पण माझ्यावर विसंबणाऱ्याला जमीन मिळेल. माझा पवित्र डोंगर त्याचा होईल.
14 रस्ता मोकळा करा. रस्ता मोकळा करा. माझ्या लोकांकरिता रस्ता मोकळा करा.
15 देव अती उच्च व परम थोर आहे. देव चिरंजीव आहे. त्याचे नाव पवित्र आहे. देव म्हणतो, मी उंच आणि पवित्र जागी राहतो हे खरे पण मी दु:खी आणि लीन यांच्याबरोबरही असतो. मनाने नम्र असलेल्यांना आणि दु:खी लोकांना मी नवजीवन देईन.
16 मी अखंड लढाई करीत राहणार नाही. मी नेहमी रागावणार नाही. मी सतत रागावलो तर माणसाचा आत्मा मीत्याला दिलेले जीवन - माझ्यासमोर मरून जाईल.
17 ह्या लोकांनी पापे केली म्हणून मला राग आला. मग मी इस्राएलला शिक्षा केली. मी रागावलो असल्याने त्यांच्यापासून तोंड फिरविले. इस्राएलने मला सोडले त्याला पाहिजे त्या ठिकाणी तो गेला.
18 इस्राएल कोठे गेला ते मी पाहिले म्हणून मी त्याला बरे करीन. (क्षमा करीन.) मी त्याचे दु:ख हलके करीन आणि त्याला बरे वाटावे म्हणून शब्दांची फुंकर घालीन. मग त्याला व त्याच्या लोकांना वाईट वाटणार नाही.
19 मी त्यांना ‘शांती’ हा नवा शब्द शिकवीन. माझ्या जवळ वा दूर असणाऱ्यांना मी शांती देईन. मी त्या लोकांना बरे करीन. त्यांना क्षमा करीन.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या
20 पण पापी हे खवळलेल्या समुद्राप्रमाणे असतात. ते गप्प बसत नाहीत, शांत राहत नाही. ते रागावतात आणि खवळलेल्या समुद्रप्रमाणेच चिखल ढवळून काढतात. माझा देव म्हणतो,
21 ”पाप्यांना कधी शांती मिळत नाही.”
धडा 58

1 तुम्हाला शक्य असेल तेवढ्या जोरात ओरडा. थांबू नका. रणशिंगाच्या आवाजाप्रमाणे मोठ्याने ओरडा. लोकांनी केलेल्या चुका त्यांना सांगा. याकोबाच्या वंशजांपुढे त्यांच्या पापांचा पाढा वाचा.
2 म्हणजे माझी उपासना करायला ते रोज येतील. माझे मार्ग जाणून घ्यायची लोकांना इच्छा होईल. योग्यरीतीने जगणारे ते राष्ट्र होईल. देवाच्या चांगल्या आज्ञांचे पालन करण्याचे ते सोडणार नाहीत. त्यांना योग्य न्याय देण्यास ते मला सांगतील. न्याय निर्णयासाठी त्यांना देवाकडे जावेसे वाटेल.
3 आता ते लोक म्हणतात, “तुझ्याबद्दल आदर दाखविण्यासाठी आम्ही उपास करतो. तू आमच्याकडे का पाहत नाहीस? तुझा न राखण्यासाठी आम्ही आमच्या शरीरांना क्लेश करून घेतो. तू आमची दखल का घेत नाहीस?”पण परमेश्वर म्हणतो, “विशेष दिवशी उपास करून तुम्ही तुम्हालाच पाहिजे ते करता. तुम्ही तुमच्या शरीराला क्लेश देत नाही तर तुमच्या नोकरांना शिक्षा करता.
4 तुम्ही भुकेले आहात. पण ती भूक अन्नाची नाही, भाकरीची नाही तर भांडणाची आणि लढाईची आहे. तुमच्या पापी हातांनी लोकांना मारण्यासाठी तुम्ही भुकेले आहात. तुम्ही माझ्याकरिता उपास करीत नाही. माझी स्तुती करण्याची तुमची इच्छा नाही.
5 त्या विशेष दिवसांत उपास करून आपल्या शरीरांना लोकांनी क्लेश दिलेले पाहण्याची माझी इच्छा आहे असे तुम्हाला वाटते का? मला लोकांना दु:खी असलेले पाहावेसे वाटते असे तुम्हाला वाटते का? लोकांनी वाळलेल्या झाडांप्रमाणे माना झुकवाव्या व शोकप्रदर्शक कपडे घालावे अशी माझी इच्छा आहे; असे तुम्हाला वाटते का? लोकांनी राखेत बसून त्यांचे दु:ख मला दाखवावे अशी माझी इच्छा आहे, असे तुम्हाला वाटते का? विशेष दिवसांत उपास करून तुम्ही हे सर्व करता, परमेश्वराला हेच पाहिजे असे तुम्हाला वाटते का?
6 “मला कोणत्या प्रकारचा दिवस अभिप्रेत आहे ते मी तुम्हाला सांगीन. तो दिवस लोकांच्या मुक्ततेचा असावा, त्या दिवशी लोकांची ओझी तुम्ही हलकी करावी, अडचणीत असलेल्या लोकांना त्यातून सोडवावे, त्यांच्या खांद्यावरची ओझी तुम्ही उतरवावी.
7 भुकेलेल्यांना तुम्ही आपल्या घासातील घास द्यावा, बेघरांना शोधून तुमच्या घरात त्यांना आसरा द्यावा, उघड्या माणसाला तुम्ही तुमचे कपडे द्यावे अशी माझी इच्छा आहे. अशा लोकांना मदत करताना मागे-पुढे पाहू नका. ती तुमच्यासारखीच माणसे आहेत.”
8 तुम्ही ह्या केल्यात तर पहाटेच्या प्रकाशाप्रमाणे तुमचे भाग्य उजळेल. तुमच्या जखमा भरून येतील. तुमचा “चांगुलपणा” (देव) तुमच्या पुढे चालेल आणि परमेश्वराचे गौरव तुमच्या पाठीमागून येईल.
9 नंतर तुम्ही परमेश्वराला हाक मारल्यास परमेश्वर तुमच्या हाकेला ओ देईल. तुम्ही त्याचा धावा केल्यास तो म्हणेल, “हा मी येथे आहे.”लोकांना त्रास देण्याचे व त्यांच्या दु:खाचे ओझे वाढविण्याचे तुम्ही थांबवावे. तुम्ही लोकांना कटू शब्द वापरू नयेत आणि प्रत्येक गोष्टीबद्दल दोष देऊ नये.
10 भुकेलेल्यांची तुम्हाला दया यावी व त्यांना तुम्ही अन्न द्यावे. संकटात असलेल्यांना तुम्ही मदत करावी. त्यांच्या गरजा भागवाव्या. मग अंधकारातून तुमचे भाग्य चमकून उठेल. तुम्हाला कसलेही दु:ख होणार नाही. मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे तुमचे भाग्य तळपेल.
11 परमेश्वर नेहमीच तुम्हाला मार्गदर्शन करील. ओसाड प्रदेशात तो तुमचा आत्मा तृप्त करील. तो तुमची हाडे मजबूत करील. भरपूर पाणी मिळणाऱ्या बागेप्रमाणे तुम्ही व्हाल. सतत वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे तुम्ही असाल.
12 पुष्कळ वर्षे तुमच्या शहरांचा नाश झाला. पण नवीन शहरे वसविली जातील आणि त्या शहरांचा पाया अनेक वर्षे टिकून राहील. तुम्हाला “कुंपण पक्के करणारा आणि रस्ते व घरे बांधणारा” असे नांव मिळेल.
13 तुम्ही देवाच्या शब्बाथच्या नियमाविरूध्द वागून पाप करण्याचे थांबवाल आणि विशेष दिवशी स्वत:च्या खुषीकरिता काही करण्याचे टाळाल तेव्हा हे घडून येईल. तुम्ही शब्बाथला आनंदाचा दिवस मानावे. परमेश्वराच्या विशेष दिवसाचा तुम्ही मान राखावा. रोज तुम्ही जे करता आणि जे बोलता ते करण्याचे वा बोलण्याचे टाळून तुम्ही त्या दिवसाचा मान राखावा.
14 मग तुम्ही परमेश्वराजवळ त्याच्या कृपेची मागणी करू शकता. परमेश्वर तुम्हाला पृथ्वीवर उच्च जागी नेईल आणि तुमचे वडील याकोब यांच्या मालकीच्या सर्व गोष्टी तो तुम्हाला देईल. परमेश्वरानेच हे सर्व सांगितले असल्यामुळे हे सर्व घडून येईल.
धडा 59

1 हे पाहा, परमेश्वराचे सामर्थ्य तुम्हाला वाचवायला पुरेसे आहे. तुम्ही त्याची मदत मागता. ते तो ऐकू शकतो.
2 तुमच्या पापांनी देवाचे तोंड लपवले आहे. त्यामुळे तो तुमचे बोलणे ऐकत नाही.
3 तुमचे हात घाणेरडे आहेत. ते रक्ताने माखले आहेत. तुमची बोटे अपराधांमुळे झाकली गेली आहेत. तुमची तोंडे खोटे बोलतात. तुमची जीभ वाईट गोष्टी बोलते.
4 कोणीही दुसऱ्याबद्दल खरे सांगत नाही. लोक न्यायालयात एकमेकंाविरूध्द फिर्याद गुदरतात आणि ते दावा जिंकण्यासाठी खोट्या वादांवर विसंबतात. ते एकमेकांबद्दल खोटे सांगतात. ते संकटांनी घेरलेले आहेत. ते पापाला जन्म देतात.
5 विषारी सर्पाच्या अंड्यातून विषारी सर्पच निघतो. तसेच ते पापाला जन्म देतात. विषारी सर्पाचे अंडे तुम्ही खाल्ले तर तुम्ही मराल आणि ते तुम्ही फोडले तर त्यातून सर्पच निघेल.लोक खोट्या गोष्टी सांगतात-ह्या खोट्या गोष्टी कोळंयाच्या जाळ्याप्रमाणे असतात.
6 त्यांनी बनविलेल्या जाळ्याचा उपयोग कपड्यांसाठी होऊ शकत नाही. तुम्ही तुमचे अंग त्याने झाकू शकत नाही.काही लोक दुष्कृत्ये करतात आणि दुसऱ्यांना इजा करण्यासाठीच आपल्या हाताचा उपयोग करतात.
7 आपल्या पायांचा उपयोग ते पापांकडे पळण्यासाठी करतात. निष्पाप लोकांना मारण्याची त्यांना घाई असते. ते दुष्ट विचार करतात. मारामारी आणि चोरी हेच त्यांच्या जगण्याचे मार्ग असतात.
8 त्यांना शांतीचा मार्ग माहीत नसतो. त्यांच्या जीवनात अजिबात चांगुलपणा नसतो. त्यांचे मार्ग प्रामाणिक नसतात त्याच्याप्रमाणे जीवन जगणाऱ्या कोणालाही कधीही जीवनात शांतता लाभणार नाही.
9 सगळा प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा गेला आहे. आमच्याभोवती फक्त अंधार आहे. म्हणून आम्ही उजेडासाठी थांबले पाहिजे. आम्ही तेजस्वी प्रकाशाची आशा करतो. पण आम्हाला फक्त अंधारच मिळाला आहे.
10 आम्ही डोळे नसलेल्याप्रमाणे आहोत. आंधळ्यांप्रमाणे आम्ही भिंतीपाशी धडपडतो. रात्री अडखळून पडावे तसे आम्ही पडतो. दिवसासुध्दा आम्ही पाहू शकत नाही. दुपारी आम्ही मेलेल्या माणसांप्रमाणे पडतो.
11 आम्ही सर्व, फार दु:खी आहोत. आम्ही दु:खाने पारवे व अस्वले यांच्याप्रमाणे कण्हतो. लोक प्रामाणिक होण्याची आम्ही वाचविले जाण्याची वाट पाहत आहोत. पण अजून तरी कोठे प्रामाणिकपणा नाही. आम्ही वाचविले जाण्याची वाट पहात आहोत. पण तारण अजून खूप दूर आहे.
12 का? कारण आम्ही देवाविरूध्द वागून खूप खूप पापे केली. आपली पापे आम्ही चुकलो ते दाखवितात. ह्या गोष्टी करून आम्ही अपराध केला हे आम्हाला माहीत आहे.
13 आम्ही पाप केले आणि परमेश्वराविरूध्द गेलो. आम्ही त्याच्यापासून दूर गेलो आमी त्याला सोडले. आम्ही देवाच्याविरूध्द दुष्ट बेत केले. आम्ही वाईट गोष्टींचा विचार केला व मनात दुष्ट बेत केले.
14 न्याय आमच्यापासून दूर गेला आहे. प्रामाणिकपणा दूर उभा आहे. सत्य रस्त्यात पडले आहे चांगुलपणाला शहरात प्रवेश नाही.
15 सत्य गेले आणि सत्कृत्य करण्याचा प्रयत्न करणारे लुबाडले गेले. परमेश्वराने पाहिले पण त्याला कोठेच चांगुलपणा सापडला नाही. परमेश्वराला हे आवडले नाही.
16 परमेश्वराने पाहिले पण त्याला कोणीही ठामपणे उभा राहून लोकांना मदत करताना दिसला नाही. म्हणून परमेश्वराने स्वत:चे सामर्थ्य आणि चांगुलपणा वापरला आणि लोकांना वाचविले.
17 परमेश्वराने युध्दाची तयारी केली. त्याने चांगुलपणाचे चिलखत घातले, तारणाचे शिरस्त्राण घातले, शिक्षेचे कपडे घातले. दृढ प्रेमाचा अंगरखा घातला.
18 परमेश्वर त्याच्या शत्रूवर रागावला आहे. म्हणून परमेश्वर त्यांना त्यांच्या लायकीप्रमाणे शिक्षा करील. परमेश्वर त्याच्या शत्रूंवर रागावला असल्यामुळे सर्व देशांतील लोकांना तो शिक्षा करील. त्यांच्या पात्रतेप्रमाणे तो त्यांना शिक्षा देईल.
19 नंतर पक्ष्चिमेकडील लोक घाबरतील आणि परमेश्वराला मान देतील. पूर्वेकडचे लोक घाबरतील आणि देवाच्या गौरवांचा आदर करतील. देवाने सोडलेल्या झंझावातामुळे, वेगाने वाहणाऱ्या नदीप्रमाणे, देव जलद गतीने येईल.
20 मग तारणारा सियोनला येईल आधी पाप केलेल्या पण नंतर देवाला शरण आलेल्या याकोबच्या लोकांकडे तो येईल.
21 परमेश्वर म्हणतो, “मी त्या लोकांबरोबर एक करार करीन. मी तुमच्यात घातलेला माझा आत्मा आणि तुमच्या तोंडात घातलेले माझे शब्द कधीही तुम्हाला सोडून जाणार नाहीत, असे मी तुम्हाला वचन देतो. ते पिढ्यान् पिढ्या तुमच्याबरोबर राहतील ते आताही तुमच्याबरोबर असतील आणि चिरकाल तुमच्याबरोबर राहतील.”
धडा 60

1 “यरूशलेम, माझ्या ज्योती, ऊठ. तुझा प्रकाश (देव) येत आहे. परमेश्वराची प्रभा तुझ्यावर फाकेल.
2 आता अंधाराने जग व्यापले आहे आणि लोक अंधारात आहेत. पण परमेश्वराचा प्रकाश तुझ्यावर पडेल, त्याची प्रभा तुझ्यावर पसरेल.
3 राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे (देवाकडे) येतील. राजे तुझ्या तेजस्वी प्रकाशाकडे येतील.
4 तुझ्या सभोवती पाहा! बघ, लोक तुझ्या भोवती जमून तुझ्याकडे येत आहेत. ती तुझी दूरवरून येणारी मुले आहेत आणि त्याच्याबरोबर, तुझ्या मुलीही येत आहेत.
5 हे भविष्यात घडून येईल. त्यावेळी तू तुझ्या लोकांना पाहशील. तुझा चेहरा मग आनंदाने उजळेल. प्रथम तू घाबरशील. पण नंतर तुझ्या भावना अनावर होतील. समुद्रापलीकडील सर्व संपत्ती तुझ्यापुढे ठेवली जाईल. राष्ट्रांचे सर्व धन तुला मिळेल.
6 मिद्यान आणि एफा येथील उंटाचे कळप तुझी भूमी ओलांडतील. शेबातून उंटाची रीघ लागेल. ते सोने आणि सुंगधी द्रव्ये आणतील. लोक परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गातील.
7 लोक केदारमधील सर्व मेंढ्या गोळा करून तुला देतील. नबायोथचे मेंढे ते तुझ्याकडे आणतील. तू ती जनावरे माझ्या वेदीवर अर्पण करशील आणि मी त्यांचा स्वीकार करीन. मी माझे सुंदर मंदिर आणखी सुंदर करीन.
8 लोकांकडे पाहा! आकाशात वेगाने ढग सरकावेत त्याप्रमाणे ते घाईने तुझ्याकडे येत आहेत ते जणू घरट्याकडे उडत येणारे पारवे आहेत.
9 दूरचे देश माझी वाट पाहत आहेत मोठी मालवाहू जहाजे प्रवासास सज्ज आहेत. दूरच्या देशातून तुझ्या मुलांना आणण्याकरिता ती जहाजे तयार आहेत. परमेश्वराचा तुझ्या देवाचा, इस्राएलच्या पवित्र देवाचा, सन्मान करण्यासाठी ती मुले आपल्याबरोबर चांदी-सोने आणतील. परमेश्वर तुझ्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी करतो.
10 दुसऱ्या देशातील मुले तुझी तटबंदी पुन्हा बांधतील, राजे तुझी सेवा करतील “मी जेव्हा रागावलो तेव्हा मी तुला फटकावले. पण आता तुझ्यावर दया करण्याची माझी इच्छा आहे. म्हणून मी तुझे दु:ख हलके करीन.
11 तुझे दरवाजे सदोदित उघडे राहतील. दिवस असो वा रात्र ते कधीही बंद होणार नाहीत. राष्ट्रे आणि राजे, त्यांची संपत्ती तुझ्याकडे आणतील.
12 जे राष्ट्र अथवा जे राज्य तुझी सेवा करीत नाही त्याचा नाश होईल.
13 लबानोनमधील मौल्यवान चिजा तुला दिल्या जातील. लोक सुरू देवदारू आणि भद्रदारू तुला आणून देतील. माझे पवित्र स्थान सुंदर करण्यासाठी या झाडांच्या लाकडाचा उपयोग केला जाईल. ही जागा म्हणजे जणू काही माझ्या सिंहासनासमोरील चौरंग आहे आणि मी त्याला फार महत्व देईन.
14 पूर्वीच्या काळी ज्या लोकांनी तुला दुखावले, तेच आता तुझ्यापुढे नमतील. पूर्वी ज्यांनी तुझा तिरस्कार केला तेच आता तुझ्या पायाशी वाकतील. तेच लोक तुला ‘परमेश्वराची नगरी,’ ‘इस्राएलच्या पवित्र देवाचे सियोन म्हणून संबोधतील.”‘
15 “तुला पुन्हा कधीही एकटे सोडले जाणार नाही. पुन्हा कधीही तुझा तिरस्कार केला जाणार नाही. तुला पुन्हा कधीही ओस पाडले जाणार नाही. मी तुला चिरकालासाठी मोठी करीन. तू चिरंतन सुखी होशील.
16 राष्ट्रे तुला पाहिजे ती प्रत्येक गोष्ट देतील. हे म्हणजे मुलाने आईचे स्तनपान करावे तसे असेल.पण तू राजांच्या संपत्तीचे ‘पान’ करशील. मग तुला समजेल की तो मी आहे, जो तुला वाचवितो, तो परमेश्वर मी आहे. तुला कळेल की याकोबाचा महान देव तुझे रक्षण करतो.
17 “आता तुझ्याजवळ तांबे आहे, मी तुला सोने आणीन. आता तुझ्याजवळ लोखंड आहे, मी तुला चांदी आणून देईन. मी तुझ्याजवळील लाकडाचे तांबे करीन. तुझ्या खडकांचे लोखंड करीन. मी तुझ्या शिक्षेचे रूपांतर शांतीत करीन. आता लोक तुला दुखावतात, पण तेच तुझ्यासाठी चांगल्या गोष्टी करतील.
18 “तुझ्या देशात पुन्हा कधीही हिंसेची वार्ता ऐकू येणार नाही. लोक तुझ्या देशावर पुन्हा कधीही चढाई करणार नाहीत. आणि तुला लुटणार नाहीत. तू तुझ्या वेशीला ‘तारण’ आणि तुझ्या दरवाजांना ‘स्तुती’ अशी नावे देशील.
19 “या पुढे तुला रात्रंदिवस चंद्र सूर्य नव्हे तर परमेश्वर प्रकाश देईल. परमेश्वर तुझा चिरकालाचा प्रकाश होईल. तुझा देवच तुझे वैभव असेल.
20 “तुझा ‘सूर्य’ कधी मावळणार नाही आणि ‘चंद्राचा’ क्षय होणार नाही. कारण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश असेल. तुझा दु:खाचा काळ संपेल.
21 “तुझे सर्व लोक सज्जन असतील. त्यांना कायमची भूमी मिळेल. मी त्या लोकांना निर्माण केले. मी माझ्या स्वत:च्या हातांनी तयार केलेली ती सुंदर रोपटी आहेत.
22 सर्वात लहान कुटुंबाचा मोठा समूह होईल. सर्वांत लहान कुटुंबाचे मोठे बलवान राष्ट्र होईल. योग्य वेळी मी, परमेश्वर, त्वरेने येईन. मी ह्या गोष्टी घडवून आणीन.”
धडा 61

1 परमेश्वराचा सेवक म्हणतो, “परमेश्वराने, माझ्या प्रभूने, त्याचा आत्मा माझ्यात घातला. गरीब लोकांना चांगली बातमी सांगण्यासाठी आणि दु:खी लोकांचे सांत्वन करण्यासाठी देवाने मला निवडले. बंदिवानांची आणि कैद्यांची मुक्तता झाली आहे हे सांगण्यासाठी देवाने मला पाठविले.
2 परमेश्वराच्या कृपासमयाची घोषणा करण्यासाठी देवाने मला पाठविले. देव पापी लोकांना कधी शिक्षा करणार आहे हे त्यांना सांगण्यासाठी देवाने मला धाडले. दु:खी लोकांचे दु:ख हलके करण्यासाठी देवाने मला पाठविले.
3 सियोनच्या दु:खी लोकांकडे देवाने मला पाठविले. मी त्यांना उत्सवासाठी तयार करीन. त्यांच्या डोक्यांवरची राख मी झटकून टाकीन आणि मी त्यांना मुकुट देईन. मी त्याचे दु:ख दूर करीन. त्यांना सुखाचे तेल देईन. मी त्यांचा शोक नाहीसा करीन आणि त्यांना सणासुदीची वस्त्रे घालायला देईन. देवाने मला त्या लोकांना ‘चांगले वृक्ष’ आणि ‘परमेश्वराची सुंदर रोपटी’ अशी नावे ठेवण्यासाठी पाठविले आहे.
4 “त्या वेळेला नाश केली गेलेली जुनी शहरे पुन्हा वसविली जातील. ती आरंभी होती तशी नव्याने केली जातील. फार फार वर्षांपूर्वी नाश पावलेली शहरे नव्यासारखी केली जातील.
5 “नंतर तुमचे शत्रू तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मेंढ्यांची काळजी घेतील. तुमच्या शत्रूंची मुले तुमच्या शेतांतून आणि मळ्यांतून कामे करतील.
6 तुम्हाला ‘परमेश्वराचे याजक’, आमच्या देवाचे सेवक’ असे म्हटले जाईल. जगातील सर्व राष्ट्रांची संपत्ती तुम्हाला मिळेल आणि ती मिळाल्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल.
7 “पूर्वीच्या काळी लोकांनी तुमची अप्रतिष्ठा केली, तुमची निंदा केली. इतर लोकांपेक्षा तुमची अप्रतिष्ठा जास्त झाली. म्हणून तुमच्या जमिनीतून तुम्हाला इतरांपेक्षा दुप्पट पीक मिळेल. तुम्हाला अखंड आनंद मिळेल.
8 असे का घडेल? कारण मी परमेश्वर आहे आणि मला प्रामाणिकपणा आवडतो. मला चोरी व प्रत्येक चुकीच्या गोष्टीचा तिरस्कार वाटतो. म्हणून मी लोकांना योग्य तेच फळ देईन. मी माझ्या लोकांबरोबर कायमचा, करार केला आहे.
9 सर्व राष्ट्रांतील एकूण एक लोक माझ्या लोकांना ओळखतील. माझ्या राष्ट्रतील मुलांना प्रत्येकजण ओळखेल. त्यांना पाहताच कोणालाही कळून येईल की ह्यांना परमेश्वराचा आशीर्वाद मिळाला आहे.”
10 “परमेश्वर मला अत्यंत सुखी ठेवतो. देवामुळे मी सर्वस्वी सुखी आहे. परमेश्वर मला तारणाचे कपडे घालतो. हे कपडे स्वत:च्या लग्नात घालायच्या कपड्यांप्रमाणे सुंदर आहेत. परमेश्वर चांगुलपणाचा अगंरखा मला घालतो. वधूवेशाप्रमाणे हा अंगरखा सुंदर आहे.
11 जमीनीमुळे रोपे वाढतात. लोक शेतांत बी पेरतात. ते बी जमिनीत रूजून वाढते. त्याचप्रमाणे परमेश्वर चांगुलपणा वाढवील,” सर्व राष्ट्रांत त्याची प्रशंसा अधिकच वाढवील.’
धडा 62

1 “मी सियोनवर प्रेम करतो. म्हणून मी तिच्यावतीने बोलेन. मी यरूशलेमवर प्रेम करतो म्हणून मी बोलायचे थांबणार नाही. चांगुलपणा तेजस्वी प्रकाशाप्रमाणे चमकेपर्यंत आणि तारण तेजस्वी ज्योतीप्रमाणे जळायला लागेपर्यंत मी बोलेन.
2 मग सगळी राष्ट्रे तुझा चांगुलपणा पाहतील. सर्व राजे तुझी प्रतिष्ठा पाहतील मग तुला नवे नाव मिळेल. परमेश्वर स्वत:तुला नवे नाव ठेवील.
3 परमेश्वराला तुझा फार अभिमान वाटेल. तू परमेश्वराच्या हातातील सुंदर मुकुटाप्रमाणे होशील.
4 ‘देवाने त्याग केलेली माणसे’ असे तुम्हाला कधीही कोणी म्हणणार नाही. तुमच्या भूमीला ‘देवाने नाश केलेली’ असे कोणी केव्हाही म्हणणार नाही. उलट, तुम्हाला ‘देवाची आवडती माणसे’ असे म्हणतील तुमच्या भूमीला ‘देवाची वधू’ म्हणतील. का? कारण परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमची भूमी त्याच्या मालकीची आहे.
5 एखादा तरूण एखाद्या स्त्रीवर प्रेम करतो. मग तो तिच्याशी लग्न करतो व ती त्याची पत्नी होते. त्याचप्रमाणे ही भूमी तुझ्या मुलांची होईल. नवविवाहित माणूस खूप सुखी असतो, तसाच देव तुझ्याबरोबर सुखी होईल.”
6 “यरूशलेम, तुझ्या वेशीवर मी रखवालदार (संदेष्टा) ठेवतो. ते रखवालदार गप्प बसणार नाही. रांत्रदिवस ते प्रार्थना करीत राहतील.” रखवालदारांनो, तुम्ही देवाची प्रार्थना करीत राहिले पाहिजे त्याच्या वचनाची आठवण तुम्ही त्याला करून दिली पाहिजे. कधीही प्रार्थना करायचे थांबू नका.
7 पृथ्वीवरच्या सर्व लोकांनी स्तुती करण्याइतपत यरूशलेमला परमेश्वर प्रशंसनीय करीपर्यंत तुम्ही त्याची प्रार्थना केली पाहिजे.
8 परमेश्वराने वचन दिले. परमेश्वराचे सामर्थ्य हाच त्या वचनाचा पुरावा आहे, व ते वचन पूर्ण करायला परमेश्वर आपले सामर्थ्य वापरील. परमेश्वर म्हणतो, “तुमचे अन्न आणि तुम्ही बनविलेले मद्य मी तुमच्या शत्रूंना पुन्हा देणार नाही, असे मी तुम्हाला वचन देतो.
9 जो अन्न मिळवतो, तोच ते खाईल आणि तो परमेश्वराची स्तुती करील द्राक्षे गोळा करणारा त्या द्राक्षापासून निघणारे मद्य पिईल. हे सर्व माझ्या पवित्र भूमीवर घडेल.”
10 दरवाजातून आत या लोकांसाठी रस्ता मोकळा करा. रस्ता तयार करा. रस्त्यावरील दगड बाजूला काढा. लोकांकरिता निशाणी म्हणून ध्वज उंच उभारा.
11 ऐका! परमेश्वर दूरवरच्या देशांशी बोलत आहे “सियोनच्या लोकांना सांगा, पाहा! तुमचा तारणारा येत आहे. त्याचे बक्षिस त्याच्याजवळ आहे. त्याचे कर्म त्याच्या समोर आहे.”
12 त्याच्या लोकांना “पवित्र लोक”, “परमेश्वराने वाचविलेले लोक” असे म्हटले जाईल व यरूशलेमला “देवाला हवी असणारी नगरी,” “देव जिच्या बरोबर आहे ती नगरी” असे म्हटले जाईल.
धडा 63

1 अदोमाहून हा कोण येत आहे? तो बस्राहून येतो. त्याची वस्त्रे लालभडक आहेत. तो त्या वस्त्रांत अत्यंत सुंदर दिसत आहे. तो त्याच्या सामर्थ्यामुळे ताठ मानेने चालत आहे. तो म्हणतो, “माझ्याजवळ तुम्हाला वाचवायचे सामर्थ्य आहे आणि मी सत्य बोलतो”
2 “तुझी वस्त्रे लालभडक का? ती, द्राक्षांचा रस काढण्यासाठी द्राक्षावरून चालणाऱ्या माणसांच्या कपड्यासारखी आहेत.”
3 तो उत्तरतो, “मी स्वत:च द्राक्षकुंडावरून चाललो मला कोणी मदत केली नाही. मी रागावलो होतो आणि मी द्राक्षे तुडविली. तो रस माझ्या वस्त्रांवर उडाला. म्हणून माझी वस्त्रे आता मळीन झाली आहेत.
4 मी लोकांना शिक्षा करण्यासाठी वेळ निश्चित केली. आता लोकांना वाचविण्याची आणि त्यांना संरक्षण देण्याची वेळ माझ्यावर आली आहे.
5 मी सभोवर पाहिले. पण मला मदत करण्यासाठी कोणीही नव्हते. कोणीही मला मदत केली नाही म्हणून मला आश्चर्य वाटले. म्हणून मी माझ्या लोकांना वाचविण्यासाठी माझे स्वत:चे सामर्थ्य वापरले. माझ्या स्वत:च्या रागाची मला मदत झाली.
6 मी रागावलो होतो तेव्हा मी लोकांना पायाखाली तुडविले. मी वेडा झालो होतो तेव्हा त्यांना शिक्षा केली. मी त्यांचे रक्त जमिनीवर ओतले.”
7 परमेश्वर कृपाळू आहे ह्याचे मी स्मरण ठेवीन. परमेश्वराची स्तुती करण्याचे स्मरण मी ठेवीन. इस्राएलच्या घराण्याला परमेश्वराने खूप चांगल्या गोष्टी दिल्या. परमेश्वर आमच्यावर कृपा करीत आला आहे. परमेश्वराने आमच्यावर दया केली.
8 परमेश्वर म्हणाला, “ही माझी माणसे आहेत. ही मुले खोटे बोलत नाहीत.” म्हणून त्यांना परमेश्वराने वाचविले.
9 लोकांपुढे अनेक संकटे होती. पण परमेश्वर त्यांच्याविरूध्द नव्हता. परमेश्वराला त्यांच्याबद्दल प्रेम आणि सहानुभूती वाटत होती. म्हणूनच त्याने त्यांचे रक्षण केले, त्याने त्याचा खास देवदूत त्यांचे रक्षण करण्यासाठी पाठविला. त्याने त्यांना उचलले व नेले आणि सर्वकाळ तो त्यांची काळजी घेईल.
10 पण लोक परमेश्वराच्याविरूध्द उलटले. त्यांनी पवित्र आत्माला दु:ख दिले म्हणून परमेश्वर त्यांचा शत्रू झाला मग परमेश्वर त्यांच्याविरूध्द लढला.
11 पण पूर्वी काय घडले याची परमेश्वराला अजून आठवण आहे. मोशे आणि त्याची माणसे त्याला आठवतात. त्यांना समुद्रपार करणारा तोच एकमेव परमेश्वर आहे. परमेश्वराने त्याच्या मेंढपाळांना (संदेष्ट्यांना) कळप (माणसे) वळवायला लावले. पण मोशेला आपला आत्मा देणारा तो परमेश्वर आता कोठे आहे?
12 परमेश्वराने मोशेला उजव्या हाताने पुढे नेले. परमेश्वराने आपल्या विलक्षण सामर्थ्याचा उपयोग मोशेला पुढे नेण्यासाठी केला. लोकांना समुद्रातून पलीकडे जाता यावे म्हणून परमेश्वराने पाणी दुभंगविले. असे चमत्कार घडवून देवाने आपली कीर्ती वाढविली.
13 परमेश्वराने खोल समुद्रातून लोकांना पलीकडे नेले. घोडा जसा वाळवंट पार करतो, त्याप्रमाणे लोक न पडता पार झाले.
14 ज्याप्रमाणे गाय शेतातून चालताना पडत नाही, त्याप्रमाणे लोक समुद्र ओलांडताना पडले नाहीत. देवाच्या आत्म्याने लोकांना विश्रांतिस्थानाला नेले. सर्व काळ लोक सुरक्षित राहिले. परमेश्वरा, ह्याप्रमाणे तू लोकांना पुढे नेलेस. तू लोकांना मार्गदर्शन केलेस आणि तुझ्या नावाभोवती अदभुततेचे वलय निर्माण केलेस.
15 परमेश्वरा, स्वर्गातून खाली पाहा. आता काय घडत आहे ते पाहा. तुझ्या स्वर्गातील महान आणि पवित्र घरातून खाली आमच्याकडे बघ. आमच्याबद्दलचे तुझे ते आत्यांतिक प्रेम कोठे आहे? तुझ्या अंत:करणातून येणारी तुझी ती सामर्थ्यशाली कृत्ये कोठे आहेत? माझ्याकरिता असलेली तुझी दया कोठे आहे? तुझे कृपा युक्त प्रेम तू माझ्यापासून का लपवून ठेवीत आहेस?
16 हे बघ! तू आमचा पिता आहेस. अब्राहामला आम्ही माहीत नाही. इस्राएल (याकोब) आम्हाला ओळखत नाही. परमेश्वरा, तूच आमचा पिता आहेस. आम्हाला नेहमी वाचविणारा तूच एक आहेस.
17 परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्यापासून दूर का ढकलीत आहेस? तुला अनुसरणे तू आम्हाला कठीण का करीत आहेस? परमेश्वरा, आमच्याकडे परत ये. आम्ही तुझे सेवक आहोत. आमच्याकडे ये आणि आम्हाला मदत कर. आमची कुटुंबे तुझ्या मालकीची आहेत.
18 तुझी पवित्र माणसे स्वत:च्या देशात अगदी थोडा काळ राहिली. नंतर आमच्या शत्रूंनी तुझे पवित्र मंदिर पायाखाली तुडविले.
19 काही लोक तुला अनुसरत नाहीत. ते तुझे नाव धारण करीत नाहीत. आम्ही त्या माणसांसारखे होतो.
धडा 64

1 जर तू आकाश फाडून खाली पृथ्वीवर उतरलास तर प्रत्येक गोष्ट बदलेल. डोंगर तुझ्यासमोर वितळतील.
2 जळणाऱ्या झुडुपांप्रमाणे डोंगर जळतील. विस्तवावरच्या पाण्याप्रमाणे डोंगराला उकळी फुटेल. मग तुझ्या शत्रूंना तुझ्याबद्दल कळेल. तुला पाहिल्याबरोबर सर्व राष्ट्रे भीतीने कापू लागतील.
3 पण तू हे करावेस असे आम्हाला खरोखरच वाटत नाही. डोंगर तुझ्यासमोर वितळतील.
4 तुझ्या लोकांनी, खरोखर कधीच, तुझे ऐकले नाही, तू सांगितलेल्या गोष्टींकडे कधीच खरोखर लक्ष दिले नाही. कोणीही तुझ्यासारखा देव अजून पाहिला नाही. तुझ्याशिवाय दुसरा देव नाही-फक्त तूच आहेस. लोकांनी संयम पाळल्यास आणि तुझ्या मदतीची वाट पाहिल्यास, तू त्यांच्यासाठी महान गोष्टी करशील.
5 जे लोक सत्कृत्यात आनंद मानतात, त्यांच्याबरोबर तू असतोस. ते लोक तुझ्या चालीरीतींची आठवण ठेवतात. पण देवा, पूर्वी आम्ही तुझ्याविरूध्द जाऊन पाप केले म्हणून तू आमच्यावर रागावलास. आता, आमचे रक्षण कसे होणार?
6 आम्ही सगळे पापांनी मळीन झालो आहोत. आमचा सर्व चांगुलपणा जुन्या मळलेल्या कपड्यांप्रमाणे आहे. आम्ही सर्व पिकल्या पानांप्रमाणे आहोत. आमच्या पापांनी आम्हाला, वारा जसा पाचोळा दूर वाहून नेतो, तसे दूर नेले आहे.
7 आम्ही तुझी उपासना करत नाही. आम्ही तुझ्या नांवावर विश्वास ठेवत नाही. तुला अनुसरण्यासाठी आम्ही उत्सुक नाही म्हणून तू आमच्याकडे पाठ फिरविलीस. आम्ही तुझ्यापुढे असहाय्य आहोत. कारण आम्ही पापी आहोत.
8 पण, परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस. आम्ही मातीप्रमाणे आहोत आणि तू कुंभार आहेस. तुझ्या हातांनी आम्हाला घडविले आहे.
9 परमेश्वरा, सतत आमच्यावर रागावू नकोस. आमची पापे कायमची लक्षात ठेवू नकोस. कृपया आमच्याकडे लक्ष दे. आम्ही तुझी माणसे आहोत.
10 तुझ्या पवित्र नगरी ओस पडल्या आहेत. त्या आता वाळवंटाप्रमाणे झाल्या आहेत. सियोनचे वाळवंट झाले आहे. यरूशलेमचा नाश झाला आहे.
11 आमचे पवित्र मंदिर जाळले गेले आहे. ते आमच्या दृष्टीने महान होते. आमच्या पूर्वजांनी तेथे तुझी पूजा केली. आमच्या सर्व चांगल्या गोष्टींचा आता नाश झाला आहे.
12 तुझे आमच्याबद्दलचे प्रेम दाखविण्यापासून, ह्या गोष्टी, तुला नेहमीच दूर ठेवतील का? तू असाच सतत गप्प राहशील का? तू कायमच आम्हाला शिक्षा करशील का?
धडा 65

1 परमेश्वर म्हणतो, “माझ्याकडे सल्ला मागण्याकरिता न आलेल्या लोकांनाही मी मदत केली. जे मला शोधत नव्हते, त्यांनाही मी सापडलो. माझे नाव धारण न करणाऱ्या राष्ट्रबरोबर मी बोललो. मी म्हणालो, ‘मी येथे आहे! मी येथे आहे!’
2 “माझ्या विरूध्द गेलेल्या लोकांना स्वीकारायच्या तयारीत मी उभा राहिलो. ते माझ्याकडे येतील म्हणून मी त्यांची वाट पाहत होतो. पण ते त्यांच्या वाईट मार्गाप्रमाणेच जगत राहिले. त्यांच्या मनांत आले ते त्यांनी केले.
3 ते लोक माझ्यासमोर असे वागून मला राग आणतात. ते त्यांच्या खास बागांत होमार्पण अर्पण करतात आणि धूप जाळतात.
4 ते थडग्यांजवळ बसून मृतांकडून संदेश येण्याची वाट पाहतात? एवढेच नाही तर, ते मृत शरीरांजवळ राहतात. ते डुकराचे मांस खातात. त्यांचे काटे आणि सुऱ्या कुजलेल्या मांसाने माखून घाण झाल्या आहेत.
5 “पण हे लोक दुसऱ्या लोकांना सांगतात, ‘माझ्याजवळ येऊ नकोस. मी तुला शुध्द केल्याशिवाय मला शिवू नकोस.’ ते लोक माझ्या डोळ्यांत जाणाऱ्या धुराप्रमाणे आहेत. त्यांचा अग्नी सतत जळत असतो.”
6 “हे बघा, हा हिशेब चुकता केलाच पाहिजे. हा हिशेब, तुम्ही पापे करून अपराध केल्याचे दाखवितो. हा हिशेब चुकता केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि तुम्हाला शिक्षा करून मी हा हिशेब चुकता करीन.
7 “तुमची आणि तुमच्या वडिलांची पापे सारखीच आहेत.” परमेश्वर म्हणतो, “त्यांनी डोंगरावर धूप जाळून ही पापे केली. त्या टेकड्यांवर त्यांनी माझी अप्रतिष्ठा केली म्हणून मी त्यांना प्रथम शिक्षा केली. त्यांना मिळायला हवी होती तीच शिक्षा मी त्यांना दिली.”
8 परमेश्वर म्हणतो, “द्राक्षांत जेव्हा नवा रस भरतो, तेव्हा लोक तो पिळून काढून घेतात, पण ते द्राक्षांचा संपूर्ण नाश करीत नाहीत. कारण ती द्राक्षे अजून उपयोगात येऊ शकतात. मी माझ्या सेवकांच्या बाबतीत असेच करीन. मी त्यांना संपूर्णपणे नष्ट करणार नाही.
9 मी याकोबच्या (इस्राएलच्या) काही लोकांना ठेवीन. यहूदातील काही लोकांना माझा डोंगर मिळेल. माझे सेवक तेथे राहतील. तेथे राहण्यासाठी मी लोकांची निवड करीन.
10 मग शारोन दरी मेंढ्यांचे चरण्याचे कुरण होईल. अखोरची दरी गुरांचे विसाव्याचे ठिकाण होईल. ह्या सर्व गोष्टी, माझ्या लोकांसाठी मला शोधणाऱ्या लोकांसाठी होतील.
11 “पण तुम्ही परमेश्वराचा त्याग केला म्हणून तुम्हाला शिक्षा होईल. माझ्या पवित्र डोंगराला तुम्ही विसरला. तुम्ही गादाची पूजा करायला सुरवात केली. तुम्ही मनीवर खोट्या देवावर विसंबता.
12 पण मी तुमचे भविष्य ठरवितो. आणि मी तुम्हाला तलवारीने मारायचे ठरविले आहे. तुम्ही सर्व मारले जाल का? कारण मी तुम्हाला बोलाविले आणि तुम्ही मला ओ द्यायचे नाकारले. मी तुमच्याशी बोललो पण तुम्ही माझे ऐकले नाही. मी ज्यांना पापे म्हणतो, त्या गोष्टी तुम्ही केल्या. मला आवडत नसलेल्या गोष्टी करायचे तुम्ही ठरविले.”
13 तेव्हा, परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला, “माझ्या सेवकांना खायला मिळेल, पण तुम्ही पापी भुकेले राहाल. माझ्या सेवकांना पाणी मिळेल, पण तुम्ही तहानलेले राहाल. माझे सेवक सुखी होतील, पण तुम्ही लज्जित व्हाल.
14 माझ्या सेवकांच्या हृदयांत चांगुलपणा असल्याने ते सुखी होतील. पण तुम्ही दुष्ट प्रवृत्तीचे लोक रडाल, कारण तुमच्या हृदयांत वेदना असतील, तुमचा तेजोभंग होईल, आणि तुम्ही खूप दु:खी व्हाल.
15 माझ्या सेवकांना तुमची नावे शिव्यांसारखी वाटतील.” परमेश्वर, माझा प्रभू, तुम्हाला ठार मारील तो त्याच्या सेवकांना मात्र नव्या नावाने बोलावील.
16 आता लोक भूमीचे आशीर्वाद मागतात. पण भविष्यात ते खऱ्या देवाचे आशीर्वाद मागतील. लोक आता शपथ घेताना भूमीच्या बळावर विश्वास टाकतात. पण पुढील काळात ते खऱ्या देवावर विश्वास ठेवतील का? कारण पूर्वीचे सर्व त्रास विसरले जातील. माझ्या लोकांना पुन्हा कधीही त्या त्रासांची आठवण येणार नाही.
17 “मी नवा स्वर्ग आणि नवी पृथ्वी निर्माण करीन. लोक भूतकाळाची आठवण ठेवणार नाहीत. त्यांना त्यातील एकही गोष्ट आठवणार नाही.
18 माझे लोक सुखी होतील. ते अखंड आनंदात राहतील का? मी जे निर्माण करीन त्यामुळे असे होईल. मी यरूशेमला आनंदाने भरून टाकीन आणि त्यांना सुखी करीन.
19 “मग यरूशलेमबरोबर मलाही आनंद होईल. मी माझ्या लोकांबरोबर सुखी होईन. त्या नगरीत पुन्हा कधीही आक्रोश व दु:ख असणार नाही.
20 तेथे पुन्हा कधीही अल्पायुषी मुले जन्माला येणार नाहीत. त्या नगरीत कोणीही माणूस अल्प वयात मरणार नाही. आबालवृध्द दीर्घायुषी होतील. शंभर वर्षे जगणाऱ्याला तरूण म्हटले जाईल. पण पापी माणूस जरी शंभर वर्षे जगला तरी त्याच्यावर खूप संकटे येतील.
21 “त्या नगरीत घर बांधणाऱ्याला त्या घरात राहायला मिळेल. आणि द्राक्षाचा मळा लावणाऱ्याला त्या मळ्यातील द्राक्षे खायला मिळतील.
22 एकाने घर बांधायचे व त्यात दुसऱ्याने राहायचे किंवा एकाने द्राक्ष मळा लावायचा व दुसऱ्याने त्या मळ्यातील द्राक्षे खायची असे तेथे पुन्हा कधीही होणार नाही. माझे लोक वृक्षांएवढे जगतील. मी निवडलेले लोक, त्यांनी स्वत: तयार केलेल्या गोष्टींचा, आनंद लुटतील.
23 स्त्रियांना बाळंतपणाचा त्रास कधीच होणार नाही. बाळंतपणात काय होईल ह्याची त्यांना भिती वाटणार नाही. परमेश्वर माझ्या सर्व लोकांना व त्यांच्या मुलांना आशीर्वाद देईल.
24 त्यांनी मागण्या आधीच त्यांना काय पाहिजे ते मला समजेल. आणि त्यांचे मागणे पुरे होण्याआधीच मी त्यांना मदत करीन.
25 लांडगे आणि कोकरे, सिंह आणि गुरे एकत्र जेवतील. माझ्या पवित्र डोंगरावरील कोणाही माणसाला जमिनीवरचा साप घाबरविणार नाही. अथवा चावणार नाही. “परमेश्वराने ह्या सर्व गोष्टी सांगितल्या.
धडा 66

1 देव असे म्हणाला, “आकाश माझे सिंहासन आहे आणि पृथ्वी हे माझे पाय ठेवण्याचे आसन आहे. मग तुम्ही माझ्यासाठी घर बांधू शकाल असे तुम्हाला वाटते का? नाही. तुम्हाला ते शक्य नाही. तुम्ही मला विश्रांतीसाठी जागा देऊ शकाल का? नाही. तुम्ही जागा देऊ शकणार नाही.
2 मी स्वत:च सर्व गोष्टी निर्माण केल्या. मी घडविल्या म्हणून या सर्व गोष्टी येथे आहेत.” परमेश्वर असे म्हणाला, “मला सांगा, मी कोणत्या लोकांची काळजी घेतो? मी गरीब आणि नम्र लोकांची काळजी घेतो. हे लोक फार दु:खी आहेत. माझ्या शब्दांचे पालन करणाऱ्या लोकांची मी काळजी घेतो.
3 काही लोक बैलांना मारून होमार्पण देतात, पण ते लोकांनाही चोपतात ते लोक होमार्पण अर्पण करण्यासाठी मेंढ्या मारतात पण ते कुत्र्यांच्याही माना मुरगळतात. ते डुकराचे रक्त मला अर्पण करतात. ते लोक आठवणीने धूप जाळतात, पण ते त्यांच्या शून्य किंमतीच्या मूर्तीवरही प्रेम करतात. ते लोक त्यांचे स्वत:चे मार्ग निवडतात. माझे मार्ग निवडत नाहीत. ते त्यांच्या भयानक मूर्तीवर प्रेम करतात.
4 म्हणून मी त्यांच्याच युक्त्या वापरायचे ठरविले आहे. ह्याचाच अर्थ ते ज्या गोष्टींना फार भितात, त्या वापरून मी त्यांना शिक्षा करीन. मी त्या लोकांना बोलाविले पण त्यांनी ऐकले नाही. मी त्यांच्याशी बोललो, पण त्यांना ते ऐकू आले नाही म्हणून मी त्यांच्यासाठी तीच गोष्टी करीन. मी ज्यांना पापे म्हटले, त्या गोष्टी त्यांनी केल्या. मला न आवडणाऱ्या गोष्टी त्यांनी निवडल्या.”
5 परमेश्वराच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकहो तुम्ही परमेश्वर ज्या गोष्टी सांगतो त्या ऐकाव्या. “तुमच्या भावांनी तुमचा तिरस्कार केला. ते तुमच्याविरूध्द गेले, कारण तुम्ही मला अनुसरलात. तुमचे भाऊ म्हणाले, ‘परमेश्वराचा सन्मान केला गेल्यावर आम्ही परत तुमच्याकडे येऊ. मग आम्हाला तुमच्याबरोबर राहण्यात आनंद होईल.’त्या वाईट लोकांना शिक्षा केली जाईल.”
6 ऐका! नगरातून आणि मंदिरातून मोठा आवाज येत आहे. परमेश्वर शत्रूला शिक्षा करीत असल्याचा तो आवाज आहे. त्यांना योग्य शिक्षा देव करीत आहे.
7 “कळा आल्याशिवाय बाई मुलाला जन्म देत नाही. आपण जन्म दिलेल्या मुलाला पाहण्यासाठी बाईला कळा सहन कराव्या लागतात. त्याचप्रमाणे कोणीही नव्या जगाचा आरंभ एका दिवसात झालेला पाहिला नाही. एक दिवसात नवीन राष्ट्र उभे राहिल्याचे कोणीही ऐकलेले नाही. राष्ट्राला प्रथम प्रसूतिवेदनांसारख्या वेदना व्हाव्याच लागतात. प्रसूतिवेदनानंतर सियोन तिच्या मुलांना जन्म देईल.
8
9 त्याचप्रमाणे मी सुध्दा नवीन निर्मिती होऊ न देता वेदना होऊ देणार नाही.”परमेश्वर पुढे म्हणतो, “जर मी तुम्हाला प्रसूतिवेदना दिल्या तर तुम्हाला नवीन राष्ट्र मिळाल्याशिवाय राहणार नाही असे मी तुम्हाला वचन देतो.” तुमचा देव असे म्हणाला.
10 यरूशलेम, सुखी हो! यरूशलेमवर प्रेम करणारे तुम्ही लोकहो, सुखी व्हा! यरूशलेमला दु:खकारक गोष्टी घडल्या म्हणून तुमच्यातील काही लोकांना दु:ख झाले आहे. पण आता तुम्ही सुखी व्हावे.
11 का? कारण आईच्या स्तनातून येणाऱ्या दुधासारखी दया तुम्हाला मिळेल, ते “दूध” तुम्हाला खरी तृप्ती देईल. तुम्ही ते दूध प्याल आणि तुम्ही यरूशलेमच्या वैभवाने खरोखरीच आनंदित व्हाल.
12 परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी तुम्हाला शांती देईन. मोठ्या नदीप्रमाणे ही शांती वाहत वाहत तुमच्याकडे येईल. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या संपत्तीचा ओघ तुमच्याकडे येईल. पुराप्रमाणे हा संपत्तीचा ओघ येईल. तुम्ही लहान मुलासारखे व्हाल. तुम्ही ‘दूध’ प्याल. मी तुम्हाला उचलून कडेवर घेईन. मी तुम्हाला मांडीवर खेळवीन.
13 तुम्ही यरूशलेममध्ये आरामात राहाल. आई जशी मुलाला आराम देते, तसा मी तुम्हाला देईन.”
14 खरोखरी आनंद देणाऱ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. तुम्ही स्वतंत्र व्हाल आणि गवताप्रमाणे वाढाल. परमेश्वराचे सेवक त्याचे सामर्थ्य पाहतील आणि परमेश्वराचे शत्रू त्याचा राग अनुभवतील.
15 पाहा! परमेश्वर अग्नी घेऊन येत आहे. परमेश्वराचे सैन्य धुळीचे लोट उडवीत येत आहे. आपल्या रागाचा उपयोग परमेश्वर लोकांना शिक्षा करण्यासाठी करील. परमेश्वर रागावल्यावर त्या लोकांना अग्नीच्या ज्वाळांनी शिक्षा करील.
16 परमेश्वर लोकांना न्याय देईल. मग तो लोकांना अग्नीने आणि त्याच्या तलवारीने नाश करील. परमेश्वर खूप लोकांचा नाश करील.
17 हे लोक त्यांच्या खास बागांमध्ये पूजा करण्यासाठी शुचिर्भूत व्हावे म्हणून स्नान करतात. ते एकमेकांच्या मागून खास बागांमध्ये जातात. मग ते मूर्तीची पूजा करतात. पण परमेश्वर त्या सर्व लोकांचा नाश करील.“ते लोक डुक्कर, उंदीर ह्यांचे मांस व इतर घाणेरडया गोष्टी खातात. पण ह्या सर्व लोकांचा एकत्रितपणे नाश केला जाईल.” (परमेश्वराने स्वत: ह्या गोष्टी सांगितल्या)
18 “ते लोक दुष्ट विचार करतात आणि पापे करतात म्हणून त्यांना शिक्षा करण्यासाठी मी येत आहे मी सर्व राष्ट्रांना व सर्व लोकांना गोळा करीन. सर्व लोक एकत्र येऊन माझे सामर्थ्य पाहतील.
19 काही लोकांवर मी खूण करीन. मी त्यांना वाचवीन. मी ह्या वाचविलेल्या काही लोकांना तार्शीश, पूल, लूद (धनुर्धाऱ्यांचा देश), तूबल, यवान आणि दूरूदरच्या देशांत पाठवीन. त्या लोकांनी कधीच माझी शिकवण ऐकलेली नाही. त्यांनी कधीच माझे तेज पाहिलेले नाही म्हणून वाचविले गेलेले लोक, त्या राष्ट्रांना माझ्या तेजाबद्दल सांगतील.
20 आणि ते सर्व राष्ट्रांतून तुमच्या भावा बहिणींना आणतील. ते त्यांना माझ्या पवित्र डोंगरावर, यरूशलेमला, आणतील. तुमची ही भावंडे घोड्यांवरून गाढवांवरून, उंटांवरून, रथांतून आणि गाड्यांतून येतील. तुमची ही भावंडे म्हणजे जणू काही इस्राएलच्या लोकांनी निर्मळ तबकांतून, परमेश्वराच्या मंदिरात आणलेले नजराणे असतील.
21 ह्यातीलच काही लोकांना मी याजक व लेवी होण्यासाठी निवडीन.” परमेश्वर हे सर्व म्हणाला.
22 “मी नवे जग निर्माण करीन आणि नवा स्वर्ग व नवी पृथ्वी अक्षय राहतील. त्याचप्रमाणे तुमची नावे आणि मुले नेहमी माझ्याबरोबर असतील.
23 प्रत्येक पूजेच्या दिवशी, सर्व लोक माझी उपासना करण्यासाठी येतील. ते प्रत्येक शब्बाथला आणि महिन्याच्या पहिल्या दिवशी येतील.
24 “ते लोक माझ्या पवित्र नगरात येतील. आणि ते जर नगराच्या बाहेर गेले तर त्यांना माझ्याविरूध्द गेलेल्या लोकांची मृत शरीरे दिसतील. त्या मृत शरीरांत कधी न मरणारे किडे पडतील कधी न विझणारा अग्नी त्या मृत शरीरांना जाळून टाकील.”