2 थेस्सलनीकाकरांस

1 2 3


धडा 1

1 पौल सिल्वान आणि तीमथ्य याजकडून, थेस्सलनीका येथील मंडळीला जो देव आपला पिता आणि प्रभु येशू ख्रिस्ताची आहे त्यांना
2 देवपिता आणि प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा आणि शांति तुम्हांबरोबर असो.
3 बंधूंनो, आम्ही नेहमीच तुमच्यासाठी देवाचे आभार मानतो व तसे करणे योग्य आहे. कारण तुमचा विश्वास अद्भुत रीतीने वाढत आहे आणि जे प्रेम तुम्हांतील प्रत्येकाचे एकमेकांवर आहे ते वाढत आहे.
4 म्हणून आम्हाला स्वत: देवाच्या मंडळ्यांमध्ये सर्व छळात व तुम्ही सहन करीत असलेले दु:ख, त्याविषयीची तुमची सहनशीलता सोशिकपणा आणि विश्वासाचा अभिमान वाटतो.
5 देव त्याच्या न्याय करण्यामध्ये योग्य आहे हा त्याचा पुरावा आहे. त्याचा हेतू हा आहे की ज्यासाठी आता तुम्हांला त्रास सोसावा लागत आहे, त्या देवाच्या राज्यात प्रवेश करण्यास तुम्हांला पात्र ठरविले जावे.
6 खरोखर जे तुम्हांला दु:ख देतात त्याची दु:खाने परतफेड करणे हे देवाच्या दृष्टीने त्याच्यासाठी योग्य आहे.
7 आणि आमच्याबरोबर जे तुम्ही दु:ख भोगीत आहात त्यांना आमच्याबरोबर विश्रांती देण्यासाठी, प्रभु येशू प्रकट होताना तो स्वर्गातून आपले सामर्थ्यवान दूत आणि अग्निज्वालेसह येईल.
8 आणि ज्यांना देव माहीत नाही आणि आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी आवश्यक त्या आज्ञा पाळीत नाहीत त्यांना देव शिक्षा करील.
9 ते अनंतकाळचा नाश असलेला असा शिक्षेचा दंड भरतील. ते प्रभु येशूच्या समक्षतेतून आणि वैभवी सामर्थ्यातून वगळले जातील.
10 त्या दिवशी जेव्हा तो त्याच्या पवित्र लोकांत गौरविला जाण्यासाठी सर्व विश्वासणाऱ्याकडून आश्चर्यचकित केले जाण्यासाठी येईल तेव्हा त्यात तुमचाही समावेश आहे कारण त्याविषयी आम्ही सांगितलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला.
11 या कारणासाठी आम्ही नेहमी तुमच्यासाठी प्रार्थना करतो व विनंति करतो की, आमच्या देवाने त्याच्या पाचारणासाठी योग्य असे तुम्हाला गणावे तुमच्या विश्वासापासून निर्माण होणारे प्रत्येक काम व चांगुलपणाचा निश्चय समर्थपणे पूर्ण करावा.
12 यासाठी की आमचा देव आणि प्रभु येशूच्या कृपेने आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचे नाव तुमच्यामध्ये आणि तुम्ही त्याच्यामध्ये गौरविले जावे.
धडा 2

1 आता बंधूंनो, आम्ही तुम्हांला विनंति करतो, ती प्रभु येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयी, आणि त्याच्याबरोबर आमच्या एकत्र भेटण्याविषयी.
2 आम्ही तुम्हांला विनंती करतो की, तुम्ही तुमचे मन पूर्णपणे अस्वस्थ होऊ देऊ नका किंवा सतत विचलित होऊ नका, जर तुम्ही ऐकले की, प्रभूचा दिवस आला आहे, काही लोक अशा प्रकारचे भविष्य वर्तवतील. किंवा काही लोक शिकवणुकीद्वारे किंवा काही लोक आम्हांकडून पत्र लिहिले आहे असे भासवून असा दावा करतील.
3 तर कोणीही तुम्हाला कोणत्याही प्रकारे फसवू नये. म्हणून सावध असा. मी असे म्हणतो कारण पहिल्यांदा मोठी बंडखोरी झाल्याशिवाय प्रभूचा दिवस येणार नाही. आणि जो नाशासाठी नेमला आहे, तो नियम मोडणारा प्रकट होईल.
4 तो विरोध करील आणि स्वत:ला सर्व गोष्टींच्या वर उच्च करील. त्याला देव किंवा उपासना करण्याची कोणतीही एखादी वस्तु असे म्हणतील. येथपर्यंत की तो देवाच्या मंदिरात जाईल आणि सिंहासनावर बसेल आणि तो स्वत:ला देव असे जाहीर करील.
5 मी तुमच्याबरोबरच होतो तेव्हा तुम्हाला मी ह्या गोष्टींबद्दल सांगत होतो. ते तुम्हाला आठवत नाही काय?
6 आणि म्हणून अशा प्रकारे त्याला कशाचा प्रतिबंध होत आहे हे तुम्हांला माहीत आहे. यासाठी तो योग्य वेळी प्रकट व्हावा.
7 मी हे म्हणतो कारण दुष्टपणाची रहस्यमय शक्ति आधीपासूनच जगात काम करीत आहे. पण असा एक आहे जो दुष्टाची रहस्यमय शक्ति थोपवीत आहे. आणि जोपर्यंत ती शक्ति मार्गातून काढून बाजूला टाकली जात नाही, तोपर्यंत तो ती शक्ति थोपवून धरील
8 आणि मग दुष्ट प्रकट होईल. प्रभु येशू त्याला आपल्या मुखातील श्वासाने मारुन टाकील आणि प्रभु जेव्हा त्याच्या येण्याच्या वेळी मोठ्या वैभवाने प्रकट होईल तेव्हा तो त्याचा नाश करील.
9 दुष्टाचे येणे सैतानाच्या सामर्थ्याने होईल आणि त्याच्या येण्याबरोबर खोटे चमत्कार, चिन्हे आणि अद्भुत गोष्टी घडतील.
10 आणि जे नरकाच्या वाटेवर आहेत त्यांच्याविरुद्ध प्रत्येक प्रकारची दुष्टता फसवणूक व्हावी म्हणून तो आणील, कारण त्यांनी सत्यावर प्रेम करण्याचे नाकारले. यासाठी की त्यांचे तारण होणे शक्य व्हावे.
11 आणि या कारणासाठी देवाने त्यांना भ्रम पडेल असे केले. यासाठी की, जे खोटे आहे त्यावर त्यांनी विश्वास ठेवावा.
12 आणि त्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही तर दुष्टतेत आनंद मानला, त्यांना शिक्षा मिळावी.
13 पण आम्ही देवाकडे तुमच्याविषयी नेहमीच आभार मानले पाहिजेत. ज्यांच्यावर देव प्रेम करतो असे तुम्ही आमचे बंधु आहात. कारण आत्म्याच्या द्वारे शुद्धीकरण आणि सत्यावर विश्वास ठेवून तारण व्हावे म्हणून देवाने तुम्हाला प्रारंभापासून निवडले आहे.
14 आणि या तारणासाठीच, आम्ही सांगितलेल्या सुवार्तेद्वारेच देवाने तुम्हांला बोलाविले. यासाठी की, आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताचे जे गौरव ते तुम्हांलाही मिळावे
15 म्हणून बंधूंनो, दृढ उभे राहा. आणि आमच्या तोंडच्या वचनाद्वारे किंवा आमच्या पत्राद्वारे जी परंपरा आम्ही तुम्हाला शिकविली आहे तिला धरुन उभे राहा.
16 आता प्रभु येशू ख्रिस्त स्वत: आणि देव आमचा पिता ज्याने आम्हावर प्रेम केले आणि ज्याने आपल्या कृपेमध्ये आम्हाला अनंतकाळचे समाधान आणि चांगली आशा दिली.
17 ते तुमच्या अंत:करणाला समाधान देवोत व तुम्ही ज्या प्रत्येक चांगल्या गोष्टी करता अथवा सांगता त्यामध्ये तुम्हाला बळकट करो.
धडा 3

1 आम्हाला आणखी काही गोष्टी तुम्हाला सांगावयाच्या आहेत: बंधूंनो, कृपा करुन आमच्यासाठी प्रार्थना करा, यासाठी की जसा तुमच्यामध्ये झाला तसा प्रभूच्या संदेशाचा प्रसार लवकर व्हावा आणि ते गौरविले जावे.
2 आणि प्रार्थना करा की, हेकट व दुष्ट माणसांपासून आमची सुटका व्हावी कारण सर्वच लोकांचा प्रभूवर विश्वास नाही.
3 पण प्रभु विश्वासू आहे. तो तुम्हांला बळकट करील व दुष्टांपासून तुमचे रक्षण करील.
4 प्रभूमध्ये आम्हांला तुमच्याविषयी विश्वास आहे आणि खात्री आहे की, जे आम्ही तुम्हाला करण्यासाठी सांगत आहोत ते तुम्ही करीत आहात व ते पुढे करीतच राहाल.
5 प्रभु तुमची अंत:करणे देवाच्या प्रीतीत आणि ख्रिस्ताच्या सोशिक सहनशीलतेकडे नेवो.
6 आता, बंधूंनो, आम्ही तुम्हांला आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करतो की, जो कोणी बंधु, ज्या परंपरा त्यांना आमच्याकडून मिळाल्या त्या परंपरांप्रमाणे चालत नाही, तर आळशी जीवन जगत आहे तर त्याच्यापासून दूर राहा.
7 मी तुम्हांला हे सांगतो कारण तुम्ही स्वत: जाणता की तुम्ही आमचे अनुकरण कसे करायचे, कारण आम्ही तुमच्यामध्ये आळशी नव्हतो.
8 किंवा कोणाकडूनही आम्ही फुकटची भाकर खाल्ली नाही, उलट, रात्रंदिवस आम्ही काबाडकष्ट केले यासाठी की तुमच्यावर आम्ही ओझे होऊ नये.
9 याचा अर्थ असा नाही की, आम्हांला तुमच्याकडून मदत मागण्याचा अधिकार नाही, पण आम्ही आमच्या गरजा भागविण्यासाठी काम केले ते यासाठी की, आम्ही तुमच्यासमोर उदाहरण ठेवावे व तुम्ही आमचे अनुकरण करावे.
10 कारण आम्ही जेव्हा तुमच्याबरोबर होतो, तेव्हा आम्ही तुम्हांला हा नियम दिला: “जर एखाद्याला काम करायचे नसेल, तर त्याने खाऊ नये.”
11 आम्ही हे सांगतो कारण आम्ही ऐकतो की तुमच्यापैकी काही जण आळशीपणाचे जीवन जगत आहेत. ते काहीच काम करीत नाहीत. उलट कोणत्याही दिशाहीन असल्यासारखे इकडे तिकडे फिरत असतात. (इतरांच्या कामात दखल देतात)
12 आम्ही अशा लोकांना आज्ञा करतो व प्रभु येशू ख्रिस्तामध्ये बोध करतो की, त्यांनी शांतीने काम करावे आणि स्वत:ची भाकर स्वत:च मिळवून खावी.
13 पण बंधूंनो, तुम्ही तुमच्यासाठी चांगले करीत असता थकू नका.
14 जर कोणी या पत्राद्वारे आमच्या सूचनांचे पालन करीत नाही, तर तो कोण आहे हे लक्षात ठेवा व त्याच्याबरोबर राहू नका, यासाठी की त्याला लाज वाटावी.
15 पण त्याला शत्रू समजू नका, परंतु धाक द्या, जसे त्याला तुमचा भाऊ समजा.
16 आता प्रभु स्वत: जो शांतीचा उगम आहे, तो तुम्हाला सर्वकाळ आणि सर्व प्रकारे शांति देवो, प्रभु तुम्हा सर्वांबरोबर असो.
17 मी पौल माझ्या स्वत:च्या हातांनी हा सलाम लिहितो. माझ्या प्रत्येक पत्राची ही खूण आहे. ह्या प्रकारे मी प्रत्येक पत्र लिहितो व अशा प्रकारे लिहितो.
18 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.