2 तीमथ्थाला

1 2 3 4


धडा 1

1 येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या जीवनाविषयीच्या अभिवचनाची घोषणा करण्यास, देवाच्या इच्छेने पाठविलेला ख्रिस्त प्रेषित पौल याजकडून,
2 प्रिय मुलगा तीमथ्य याला, देवपिता आणि आमचा प्रभु येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा दया व शांति असो.
3 माझ्या पूर्वजांप्रमाणे ज्या देवाची मी शुद्ध विवेकभावाने भक्ती करतो, त्या देवाचे मी उपकार मानतो; आणि रात्रंदिवस माझ्या प्रार्थनेत तुझी नेहमी आठवण करतो.
4 माझ्यासाठी तू ढाळलेल्या अश्रूंची आठवण करताना तुला भेटण्याची आतुरतेने वाट पाहतो. यासाठी की मी आनंदाने भरूने जावे.
5 तुझ्यातील प्रामाणिक विश्वासाचे मला स्मरण होते जो पहिल्यांदा तुझी आजी लोईसमध्ये होता आणि तुझी आई युनीकेमध्ये होता. आणि माझी खात्री आहे की तोच विश्वास तुझ्यामध्येही आहे.
6 या कारणासाठी मी तुला आठवण करून देतो की, जेव्हा मी माझे हात तुझ्यावर ठेवले तेव्हा देवाच्या दानाची जी ज्योत तुला मीळाली ती तेवत ठेव.
7 कारण देवाने आम्हांला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही. तर तो सावधानतेचा व सामर्थ्याची स्फूर्ति देणारा आतमा दिला आहे.
8 म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यासाठी लाज धरु नको किंवा मी जो त्याच्यासाठी कैदी झालो त्या माझी लाज धरू नको. तर माझ्याबरोबर सुवर्तेसाठी दु:ख सोस. देव तुला जे सामर्थ्य देतो त्याच्या साहाय्याने दु:ख सोस.
9 त्याने आम्हांला तारले आणि त्याने आम्हांला समर्पित जीवनासाठी पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही तर त्याच्या स्वत:च्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा काळाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हांस दिली होती.
10 पण जी आता आम्हाला आमचा तारणारा ख्रिस्त येशू याच्या भूतलावर अवतीर्ण होण्याने प्रगट करण्यात आली आहे. ख्रिस्ताने मरणाचा नाश केला आणि सुवार्तेद्वारे अमरत्व व जीवन प्रकाशात आणले.
11 मला त्या सुवार्तेचा उपदेशक, प्रेषित आणि शिक्षक असे नेमले होते.
12 आणि या कारणांमुळे मीसुद्धा दु:ख भोगीत आहे. परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपविले आहे त्याचे तो रक्षण करील.
13 माझ्याकडून ऐकून घेतलेल्या सत्य शिक्षणाचा गाभा दृढ धर. आणि ख्रिस्त येशूमध्ये सापडणाऱ्या विश्वासाने व प्रीतीने ते कर.
14 आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे त्या चांगल्या ठेवीचे रक्षण कर.
15 आशिया प्रांतामध्ये असणाऱ्या सर्वांनी मला सोडले आहे हे तुला ठाऊकच आहे. त्यामध्ये फुगल व हर्मगनेस आहेत.
16 अनेसिफराच्या घरावर प्रभु दया दाखवो. कारण त्याने अनेकदा माझे समाधान केले आहे. आणि माझ्या तुरूंगात असण्याची त्याला लाज वाटली नाही.
17 उलट रोममध्ये असताना त्याने माझा तपास लागेपर्यंत कसोशीने माझा शोध केला.
18 प्रभु करो आणि त्याला त्या दिवशी प्रभुकडून दया मिळो कारण माझ्या इफिसातील वास्तव्य काळात त्याने अनेक प्रकारे माझी सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे.
धडा 2

1 माझ्या मुला तू ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान हो.
2 माझ्याकडून ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमोर ऐकल्यास त्या घे व इतरांना शिकविण्यास समर्थ अशा विश्वासू लोकांवर सोपवून दे.
3 ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक या नात्याने आपल्या दु:खाचा सहभागी बनून राहा.
4 सैनिकाचे काम करणारा कोणीही जीवनातील संसाराच्या कामकाजात अडकत नाही. यासाठी की त्याला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संतुष्ट करता यावे.
5 जर कोणी मैदानी स्पर्धेत भाग घेतो तर नियमाप्रमाणे स्पर्धेत घेतल्याशिवाय त्याला विजयाचा मुकुट मिळविता येत नाही.
6 अति श्रम करणारा शेतकरी हा पहिल्या फळाचा वाटा घेणारा असावा.
7 मी काय म्हणतो याविषयी तू विचार करावा अशी माझी इच्छा आहे. प्रभु तुला या सर्व गोष्टी समजून घेण्याचे सामर्थ्य देईल.
8 येशू ख्रिस्त जो मेलेल्यांतून उठला व दाविदाचा वंशज आहे त्याची आठवण करीत राहा. जी सुवार्ता मी सांगतो तिचा हा गाभा आहे.
9 कारण सुवार्तेमुळे मी दु:ख सहन करतो. येथपर्यंत की, गुन्हेगाराप्रमणे साखळदंडानी मला बांधण्यात आले. पण देवाचे शिक्षण बांधले गेले नाही.
10 म्हणून, देवाच्या निवडलेल्यांसाठी मी सर्व काही सोशीत आहे, म्हणजे त्यांनाही ख्रिस्त येशूद्वारे मिळणारे तारण व अनंतकाळचे गौरव प्राप्त व्हावे.
11 येथे एक विश्वसनीय सत्य आहे:जर आम्ही त्याच्यासह मेलेले आहोत. तर त्याच्याबरोबर जीवंतही राहू
12 जर आम्ही दु:खसहन केले तर आम्ही त्याच्याबरोबर राज्यसुद्धा करू जर आम्ही त्याला नाकारले तर तोही आम्हाला नाकारील
13 जरी आम्ही अविश्वासू आहोत तरी तो अजूनही विश्वासू आहे कारण तो स्वत:ला नाकारु शकत नाही.
14 लोकांना या गोष्टीची आठवण करुन देत राहा. देवासमोर त्यांना निक्षून ताकीद दे की, शब्दांविषयी भांडू नका. असे भांडण कोणत्याही फायद्याचे नाही. फक्त जे ऐकतात त्यांचा ते नाश करते.
15 देवाने पसंत केलेला व देवाचे वचन योग्य रीतीने शिकवण्यास पात्र असा आणि जे काम करतोस त्यात लाज वाटण्यासारखे काहीही नसलेला असा देवाने पसंत केलेला कामकरी होण्याचा प्रयत्न कर.
16 पण ऐहिक वादविवाद टाळ कारण ते लोकांना देवापासून अधिकाधिक दूर नेतात.
17 आणि अशा प्रकारे वादविवाद करणाऱ्यांची शिकवण कर्करोगासारखी पसरते. या लोकांमध्ये हुमनाय आणि फिलेत आहेत,
18 जे सत्यापासून दूर गेले आहेत. ते म्हणतात की, मरणानंतरचे सर्व लोकांचे पुनरुत्थान आधीच झाले आहे व ते काही लोकांच्या विश्वासाचा नाश करीत आहेत.
19 तथापि देवाने घातलेला भक्क म पाया त्यावर असलेला शिक्का यासह स्थिर राहतो. “प्रभु जे त्याचे आहेत त्यांना ओळखतो.”“ जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने वाईटापासून वळलेच पाहिजे.”
20 मोठ्या घरात केवळ सोन्याचांदीची भांडी असतात असे नाही तर लाकूड व माती यापासून बनविलेलीही असतात. काही प्रतिष्ठेच्या कामात वापरण्यासाठी असतात तर दुसरी काही कनिष्ठ प्रतीच्या कामी वापरण्यासाठी नेमलेली असतात.
21 म्हणून जर मनुष्य या अशुद्धतेपासून स्वत:ला शुद्ध करील तर तो मानसन्मानस योग्य असे भांडे होईल व धन्यासाठी प्रत्येकसमर्पित कामासाठी पवित्र केलेले व उपयुक्त पात्र होईल.
22 पण तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ जे प्रभूला शुद्ध अंत:करणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात, अशांच्या बरोबर, नीतिमत्त्व, विश्वास, प्रीति आणि शांति यांच्या मागे लाग.
23 नेहमी मूर्ख व निरर्थक अशा वादविवादापासून दूर राहा. कारण तुला माहीत आहे की, त्यामुळे भांडणे निर्माण होतात.
24 देवाच्या सेवकाने भांडू नये, तर सर्व लोकांशी दयाधर्माने वागावे तसेच शिक्षणात कुशल व सहनशील असावे.
25 जे त्याला विरोध करतात, त्यांना विनयाने शिक्षण द्यावे या आशेने की देवाने त्यांना पश्चात्ताप करण्यास सहाय्य करावे आणि त्यांना सत्याची ओळख व्हावी.
26 ते शुद्धीवर यावेत व सैतानाच्या सापळ्यांतून जेथे सैतानाने त्यांना त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी ठेवले आहे, तेथून त्यांची सुटका व्हावी.
धडा 3

1 हे लक्षात ठेव: शेवटच्या दिवसांत कठीण समय आपल्यावर येतील.
2 लोक स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, शिव्याशाप देणारे, आईवडिलांची आज्ञा न मानणारे, कृतघ्र, अधार्मिक
3 इतरांवर प्रीती नसणारे, क्षमा न करणारे, चहाडखोर, मोकाट सुटलेले, क्रूर, चांगल्याच्या विरुद्ध असले.
4 विश्वासघातकी, उतावीळ, गर्वाने फुगले, देवावर प्रेम करण्यापेक्षा चैनीची अधिक आवड धरणारे असे होतील;
5 ते देवाच्या सेवेचे बाहेरचे स्वरूप चांगले राखतील, परंतु त्याचे सामर्थ्य नाकारतील. त्यांच्यापासून नेहमी दूर राहा.
6 मी हे म्हणतो कारण त्यांच्यांपैकी काही घरात शिरकाव करतात व पापाने भरलेल्या, सर्व प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या, कमकुवत स्त्रियांवर ताबा मिळवितात.
7 अशा स्त्रिया नेहमी शिकण्याचा प्रयत्न करतात. पण सत्याच्या पूर्ण ज्ञानापर्यंत त्या कधीही जाऊ शकत नाहीत.
8 यान्रेस व यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला तसा ही माणसे सत्याला विरोध करतात. ज्यांची मने भ्रष्ट आहेत व सत्य अनुसरण्यात अयशस्वी ठरलेली अशी ही माणसे आहेत.
9 ते पुढे अधिक प्रगती करणार नाहीत. कारण जसा यान्रेस व यांब्रेस यांचा मूर्खपणा प्रकट झाला तसा यांचा मूर्खपणा सर्वांना प्रकट होईल.
10 तरीही तू माझी शिकवण, वागणूक, जीवनातील माझे ध्येय, माझा विश्वास, माझा धीर, माझी प्रीति, माझी सहनशीलता ही पाळली आहेस.
11 अंत्युखिया, इकुन्या, आणि लुस्त्र येथे ज्या गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या, जो भयंकर छळ मीसोसला ते माझे दु:ख तुला माहीत आहे! परंतु प्रभूने या सर्व त्रासांपासून मला सोडविले.
12 खरे पाहता, जे जे ख्रिस्त येशूमध्ये शुद्ध जीवन जगू इच्छितात, त्या सर्वांचा छळ होईल.
13 पण दुष्ट लोक व भोंदू लोक इतरांना वरचेवर फसवीत राहतील आणि स्वत:ही फसून अधिक वाईटाकडे जातील.
14 पण तुझ्या बाबतीत, ज्या गोष्टी तू शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या तू तशाच पुढे चालू ठेव. ती सत्ये ज्या कोणापासून तू शिकलास ते तुला ठाऊक आहे. तू त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतोस.
15 तुला माहीत आहे की, तू आपल्या अतिबाल्यावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्र वचनांची माहिती आहे. त्यांच्या ठायी तुला शहाणे बनविण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे. ते तुला तारणाकडे नेण्यासाठी लागणारे ज्ञान देण्यास समर्थ आहे.
16 प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो सत्य समजण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे.
17 यासाठी की, देवाचा माणूस प्रवीण होऊन पूर्णपणे प्रत्येक चागंल्या कामासाठी सज्ज व्हावा.
धडा 4

1 देवासमोर आणि ख्रिस्त येशूसमोर मी तुला गांभीर्याने आज्ञा करतो, जे जिवंत आहेत व जे मेलेले आहेत त्यांचा येशू ख्रिस्त हाच न्याय करणार आहे. येशू ख्रिस्ताचे राज्य व त्याचे परत येणे याविषयी घोषणा कर. मी तुला देवासमोर व ख्रिस्तसमोर ही आज्ञा करतो.
2 वचन गाजवीत राहा. सोयीच्या किंवा गैरसोयीच्या अशा कोणत्याही वेळी तुझे कार्य करण्यास तयार राहा. लोकांना जे करायचे आहे, त्याविषयी त्यांची खात्री पटव. जेव्हा ते चुका करतील तेव्हा त्यांना सावध कर; लोकांना उत्तेजन दे. आणि हे सर्व काळजीपूर्वक शिक्षण देण्याने व मोठ्या सहनशीलतेने कर.
3 मी असे म्हणतो कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण ऐकण्याची इच्छी धरणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्या स्वत:च्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील, त्यांची कानउघडणी कर.
4 सत्यापासून ते आपले कान दुसरीकडे वळवतील व आपले लक्ष ते भाकड कथांकडे लावतील.
5 पण तुझ्याबाबतीत स्वत: सावधानतेने वाग, दु:ख सहन कर; सुवार्तेची घोषणा करण्याचे काम कर; देवाने दिलेली सेवा पूर्ण कर.
6 माझ्याबाबतीत म्हणायचे तर, मी अगोदरच पेयार्पणा सारख ओतला जात आहे. व माझी या जीवनातून जाण्याची वेळ आली आहे.
7 मी सुयुद्ध जिंकेले आहे. मी माझी शर्यत संपविली आहे. मी विश्वास राखला आहे.
8 आता माझ्यासाठी विजेत्यासाठी असलेला मुकुट जो नीतिमत्त्व, तो वाट पाहत आहे. आणि प्रभु जो नीतिमान न्यायाधीश, तो मला त्या दिवशी मुकुट देईल आणि केवळ मलाच तो देईल असे नाही तर जे सर्व त्याच्या येण्याची प्रेमाने वाट पाहत आहेत, अशा सर्वांना देईल.
9 तुला शक्य होईल तितक्या लवकर मला भेटावयाला येण्याचा प्रयत्न कर.
10 कारण देमास मला सोडून थेस्सलनीकास गेला आहे. कारण त्याला आजचे हे जग प्रिय आहे. क्रेस्केस गलतीयास गेला आहे. व तीत दालमतीयास गेला आहे.
11 लूक एकटा असा आहे की, जो अजूनखील माझ्याजवळ आहे. जेव्हा तू येशील तेव्हा मार्कलाही तुझ्याबरोबर घेऊन ये. कारण सेवेकरिता तो मला उपयोगी आहे.
12 तुखिकाला मी इफिसास पाठविले आहे.
13 त्रोवसात कार्पाच्या घरी राहिलेला माझा झगा येताना घेऊन ये. तसेच माझी पुस्तके, विशेषत: चर्मपत्राच्या गुंडाळ्या घेऊन ये.
14 आलेवसांद्र तांबटाने माझे खूप नुकसान केले आहे. त्याने केलेल्या त्याच्या कृत्यांबद्दल देव त्याची फेड करील.
15 त्याच्यापासून स्वत:चे रक्षण कर. कारण त्याने आपल्या शिक्षणाला जोरदारपणे विरोध केला होता.
16 पहिल्यांदा जेव्हा मला माझा बचाव करायचा होता तेव्हा मला कोणीही साथ केली नाही. त्याऐवजी ते सर्व मला सोडून गेले. देवाकडून हे त्यांच्याविरुद्ध मोजले जाऊ नये.
17 प्रभु माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिले यासाठी की, माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व विदेश्यांनी ती ऐकावी. सिंहाच्या मुखातून त्याने मला सोडविले.
18 प्रभु माल सर्व दुष्कृत्यांपासून सोडवील व त्याच्या स्वर्गाच्या राज्यात सुखरूपपणे आणिल. त्याला सदासर्वकाळपर्यंत गौरव असो.
19 प्रिस्कीला अविवल्ला आणि अनेसिफरच्या घरातील लोकांना सलाम सांग.
20 एरास्त करिंथात राहिला. त्रफिमाला मी मिलेता येथे सोडले कारण तो आजारी होता.
21 तू हिवाळ्यापूर्वी येण्याचा अधिक प्रयत्न कर. युबुल, पुदेश, लीन, वलौदिया व इतर सर्व बंधु तुला सलाम सांगतात.
22 प्रभु तुझ्या आत्म्याबरोबर असो. देवाची कृपा तुम्हां सर्वांबरोबर असो.